101-3
इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङक्ते स्तेन एव सः॥3.12॥
भावार्थ :- स्वधर्माचे आचरण केल्याने (यज्ञाने) तृप्त झालेले देव तुम्हाला प्रिय व हितकर भोग्य वस्तू देतील. त्यांनी दिलेल्या भोग्य वस्तू देवाला समर्पण न करता जो त्याचा उपभोग घेतो (घेईल), तो चोर समजावा.
तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हापांठी ॥101॥
पाहा, त्याप्रमाणे सर्वसुखासह मूर्तिमंत भाग्यच तुमचा मार्ग शोध करीत-करीत तुमच्या पाठीमागे येईल.
102-3
ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ॥102॥
अशा रीतीने बाबांनो, जर तुम्ही एकनिष्टपणाने स्वधर्माचे आचरण कराल, तर सर्व ऐश्वर्याने तृप्त होऊन तुमच्या मनात विषयांची इच्छा राहणार नाही.
103-3
कां जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनियां स्वादां । विषयांचिया ॥103॥
याउलट, सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊन देखील जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन उन्मत्त इंद्रियांच्या सांगण्याप्रमाणे वागेल; आणि
104-3
तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी । तयां स्वमार्गीं सर्वेश्वरीं । न भजेल तो ॥104॥
यज्ञानी संतुष्ट झालेल्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे, त्या संपत्तीच्या द्वारा जो स्वधर्माने ईश्वराला भजणार नाही,
105-3
अग्निमुखीं हवन । न करील देवतापूजन । प्राप्त वेळे भोजन । ब्राह्मणांचे ॥105॥
जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही, देवतापूजन करणार नाही, यथाकाळी परमार्थाच्या मार्गावरून वाटचाल करणाऱ्यास (ब्राम्हनांस) जो भोजन देणार नाही,
106-3
विमुखु होईल गुरुभक्ती । आदरु न करील अतिथी । संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ॥106॥
जो गुरुभक्ती करणार नाही, अंतःकरणापासून अतिथींचा आदर करणार नाही, मानवजातीला संतोष देणार नाही,
107-3
ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणे प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥107॥
अशा प्रकारे जो स्व धर्माचे आचरण करणार नाही, जो सम्पन्नतेमुळे उन्मत्त होऊन केवळ विषयभोगांमध्ये आसक्त होईल,
108-3
तया मग अपावो थोरु आहे । जेणें तें हातीचे सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥108॥
त्याला मोठमोठे अपाय होतील. त्यामुळे त्याच्याजवळ असलेले सर्व ऎश्वर्य नाहीसे होईल. त्याला प्राप्त असलेले भोगही तो भोगू शकणार नाही.
109-3
जैसें गतायुषीं शरीरीं । चैतन्य वासु न करी । कां निदैवाचां घरीं । न राहे लक्ष्मी ॥109॥
जसे आयुष्य संपलेल्या शरीरात जीवात्मा राहत नाही किंवा दैवहीन माणसाच्या घरात लक्ष्मी राहत नाही,
110-3
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवे हरपला । प्रकाशु जाय ॥110॥
ज्याप्रमाणे दिवा मालविला की प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे स्वधर्म जर लोप पावला, तर सुखाचा प्रकाश नाहीसा होऊन दुःखाचा अंधकार पसरतो.
111-3
तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे ॥111॥
याप्रमाणे जो स्वधर्मचा त्याग करतो, त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. प्रजाजन हो ! हे नीट ऐका (समजून घ्या), असे ब्रम्हदेव म्हणाले.
112-3
म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील । चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयांचे ॥112॥
म्हणून स्वधर्मचा जो त्याग करील, त्याला काळच शिक्षा करील आणि हा चोर आहे, असे जाणून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल.
113-3
मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें । रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैशी ॥113॥
रात्र झाली की, ज्याप्रमाणे पिशाच्य स्मशान व्यापून टाकतात, त्याप्रमाणे सर्व पापे अशा माणसाला पछाडतात.
114-3
तैशी त्रिभुवनींची दुःखे । आणि नानाविध पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥114॥
त्याप्रमाणे त्रिभुवनातील विविध दुःखे, नाना तऱ्हेची पातके, सर्व दारिद्रे त्या स्वधर्माने न वागणाऱ्या माणसाजवळ राहतात.
115-3
ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापां रुदतां । परी कल्पांतीहीं सर्वथा । प्राणिगण हो ॥115॥
प्रजाजन हो ! याप्रमाणे त्या उन्मत्त माणसाला दुःख भोगावे लागते. बाबांनो ! त्याने कितीही आक्रोश केला, तरी कल्पाच्या अंतापर्यंतदेखील (युगा) त्याची त्यातून सुटका होत नाही.
116-3
म्हणोनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रिये बरळों नेदावीं । ऐसें प्रजांते शिकवी । चतुराननु ॥116॥
म्हणून स्वधर्म आचरण सोडू नये आणि इंद्रियांना भलत्याच मार्गाने जाऊ देऊ नये. याप्रमाणे ब्रम्हदेव प्रजेला समजावून सांगू लागले.
117-3
जैसें जळचरां जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे । हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये॥117॥
ज्याप्रमाणे एखाद्या (जलचर प्राणी) माश्याला पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते त्यप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो, म्हणून त्याने स्वधर्म कधीहि सोडू नये.
118-3
म्हणोनि तुम्ही समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं । निरत व्हावें पुढतपुढती । म्हणिपत असे ॥118॥
म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या स्वधर्माप्रमाणे निरंतर कर्मे करावीत, हे मी पुनः पुनः सांगत आहे, असे ब्रम्हदेव म्हणाले.
119-3
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यते सर्वकिल्बिषैः ।
भुङजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात्॥3.13॥
भावार्थ :- यज्ञातील शेष राहिलेले अन्न खाणारे महान पुरुष सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणाकरताच भोजन करतात, ते तर अन्नाच्या रूपाने केवळ पापच भक्षण करत असतात.
देखा विहित क्रियविधी । निर्हेतुका बुद्धी । जो असतिये समृद्धी । विनियोगु करी ॥119॥
पाहा, जो विहित कर्म अनासक्त बुद्धीने करतो आणि आपल्या संपत्तीचा विनियोग स्वधर्मासाठी करतो,
120-3
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं । निमितादिकीं यजी । पितरोद्देश ॥120॥
जो गुरूंची मनोभावे सेवा करतो, स्वगोत्रातील लोकांवर उपकार करतो, अग्नीची पूजा करतो, योग्य प्रसंगी ब्राम्हणांची सेवा करतो आणि पितरांच्या करिता श्राद्धादि नैमित्तिक कर्मे करतो;
121-3
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां । हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥121॥
या सर्व विहित, उचित अशा यज्ञाकर्माच्या रूपाने यज्ञभोक्ता ईश्वराच्या ठिकाणी हवन करून जे जे यज्ञशेष सहज राहील,
122-3
तें सुखे आपुलां घरीं । कुटुंबेसीं भोजन करी । कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥122॥
ते सुखा-समाधानाने जो कुटुंबासह सेवन करतो; त्या सेवणामुळेच त्याची सर्व पापे नाहीसे होतात.
123-3
तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अघी । जयापरी महारोगीं । अमृतसिद्धी ॥123॥
ज्याप्रमाणे अमृताच्या सेवनाने महारोग नाहीसे होतात, त्याप्रमाणे यज्ञातील अवशेष जो भोगतो (किंवा त्याचे सेवन जो करतो) त्याची सर्व पातके (दुःख) नाहीसे होतात.
124-3
कां तत्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥124॥
अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ माणसाला भ्रांतीपासून यत्किंचितही बाधा होत नाही, त्याप्रमाणे यज्ञशेष सेवन करणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही.(करणाऱ्यास दोष लागत नाही)
125-3
म्हणोनि स्वधर्में जें अर्जें । तें स्वधर्मेचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥125॥
म्हणून स्वधर्माच्या आचरणाने जे मिळेल, त्याचा विनियोग (खर्च करावे) स्वधर्मासाठीच करावा. मग जे शिल्लक राहील, त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा.
