सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ओवी १ ते २५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी-सर्व अध्याय
अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः

एकून श्लोक : 47धृतराष्ट्राचे  श्लोक:1संजयाचे, श्लोक
अर्जुनाचे श्लोक:भ. श्रीकृष्णाचे श्लोकएकून ओव्या : 275

अध्याय पहिला
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी-सर्व अध्याय
अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः
एकून श्लोक : 47 धृतराष्ट्राचे श्लोक:1 संजयाचे, श्लोक
अर्जुनाचे श्लोक: भ. श्रीकृष्णाचे श्लोक
एकून ओव्या : 275

अध्याय पहिला
1-1
श्री गणेशायनमः
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥1.1॥
आद्या,=जेथून सर्व जगत उत्पत्ती झाली ते तत्व. वेद प्रतिपाद्या = वेदांनी प्रतिपादन केलेले. स्वसंवेद्या,=स्वत: स्वत;ला जाणणारे.
(आत्मरूप-वंदन) अनादीसिद्ध वेदांनी वर्णन केलेल्या, ज्याच्या त्याच्या स्वतः प्रत्येयास येणाऱ्या, विश्वस्वरूप निर्गुण आत्मरूपा, तुझा जयजयकार करून तुला नमस्कार करत आहे. ॥1-1॥
2-1
देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥1.2॥
सकालार्थमतिप्रकाशु= सकल अर्थ आपल्या मतीत (बुद्धीत) प्रकाशित करणारे. अवधारिजो=ऐका
(ओंकार रूप गणेश वंदन) हे देवा! सर्व विश्वाच्या बुद्धीला प्रकाश देणारा जो गणेश, तो तूच आहेस. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, तो गणेश कसा आहे ते अवधानपूर्वक ऐक. ॥1-2॥
3-1
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥1.3॥
शब्दब्रह्म=वेद. अशेष=संपूर्ण. सुवेष=सुंदर. वर्णवपु=वर्ण(शब्द)रुपी देह.
संपूर्ण वेद हीच जणू काही पोषाख केलेली गणेशाची मूर्ती होय आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसते आहे. ॥1-3॥
4-1
स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥1.4॥
मन्वादिकांच्या स्मुर्ती हे त्याचे अवयव आहते. ते अवयव या स्मुर्तीतील अर्थ-सौंदर्याने जणू लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ॥1-4॥
5-1
अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें । पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्‍नांचीं ॥1.5॥
अठरा पुराणे हे गणपतीच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यामध्ये सांगितलेली ही रत्ने; आणि शब्दांची छंदयुक्त रचना ही त्यांची कोंदणे आहेत ॥1-5॥


6-1
पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर । जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥1.6॥
लालित्यपूर्ण पदरचना हेच उत्कृष्ट रंगाने रंगविलेले वस्त्र आहे. शब्द-अलंकार आणि अर्थ-अलंकार हे त्या वस्रवरील तेज:पुंज दिसणारे जरीचे तलम तंतू आहेत. ॥1-6॥

7-1
देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥1.7॥
काव्य आणि नाटक यांचा कौतुकाने विचार केला आसता, त्या गणपतीच्या पायातील रूणझुंणाऱ्या छोट्या-छोटया घागऱ्या आहेत अर्थ हा त्या घागऱ्यांना बसविलेल्या घुंगराचा मंजूळ असा ध्वनी आहे. ॥1-7॥
8-1
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी । दिसती उचित पदें माझारीं । रत्‍नें भलीं ॥1.8॥
व्यास,वाल्मिकी,भरतमुनी यांच्या काव्य नाटकातील विविध सिद्धांताच्या शब्दांचा एकाग्रतेने अभ्यास केला, तर त्यात कवीचे अलौकिक कौशल्य दिसून येते. अशी ही अनमोल शब्द-घागऱ्यांतील उत्तमोत्तम रत्ने आहेत ॥1-8॥
9-1
तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥1.9॥
महर्षी व्यासादिकांची बुद्धी ही गणपतीची मेखला म्हणजे कटिभूषण होय. त्याला लोंबत असलेल्या मोत्यांच्या पदरातील घोष हे त्या बुद्धीतील शुद्धत्व सात्विकपणे झळकत आहे. ॥1-9 ॥
10-1
देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति । म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥1.10॥
गणपतीचे सहा हात ही सहा शास्त्रे होत; म्हणून त्यांतील विविध प्रकारचा अभिप्राय ही त्या त्या हातातील वेगवेगळी शस्त्रे होत. ॥1-10 ॥


11-1
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥1.11॥
न्याय दर्शनातील सोळा पदार्थांचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीच्या हातातील परशू होय. वैशेषिक दर्शनातील सात पदार्थांचा सिद्धांतभेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे आणि उत्तरमीमांसा दर्शनातील ब्रम्हस्वरूप सिद्धांत हा गणपतीच्या हातातील अमृतमधुर मोदक होय. ॥1-11॥
12-1
एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥1.12॥
वार्तिककरांनी सांगितलेले आणि स्वभावतःच खंडीत झालेले जी बौद्ध मत आहे, ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभते. ॥1-12॥

13-1
मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥1.13॥
सत्कारवाद हा गणपतीचा वर देणारा कामलासमान हात होय. हा धर्माची सिद्धी करतो आणि हा अभय देणारा हात आहे. ॥1-13॥
14-1
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥1.14॥
गणपतीच्या ठिकाणी ब्रम्हानंद ही सरळ, निर्मळ आणि चांगले व वाईट याची निवड करण्यास समर्थ अशी सोंड आहे. ॥1-14॥
15-1
तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥1.15॥
गुरू-शिष्याचा हा सुखसवांद म्हणजे गणपतीच्या मुखतील दात असून ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी समता हा त्या दातांचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होत. ॥1-15॥


16-1
मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं । बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥1.16॥
पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हाच त्या गणपतीच्या कानांच्या ठिकाणी असून बोध हे त्याचे मदरूपी अमृत मुनिरूपी भ्रमर सेवन करतात, असे मला वाटते. ॥1-16॥
17-1
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ॥1.17॥
वेदशास्त्र पुराणात सिद्धांतरुपाने संगतलेली तत्वे ही गणपतीच्या अंगावरील तेजयुक्त पोवळी होत. द्वैत आणि अद्वैत मते ही मस्तकावरील गंडस्थळे असून सारखे पणाने ती तेथे एकत्र झाली आहेत. ॥
18-1
उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे । तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥1.18॥
ज्ञानरूपी मकरंद ज्या मध्ये परिपूर्ण भरलेला आहे, अशी ईशावास्य इत्यादी दहा उपनिषदे ही जणू सुगंधी फुले असून ती गणपतीच्या मुकुटावर उत्तम तऱ्हेने शोभून दिसत आहेत. ॥

19-1
अकार चरण युगल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ॥1.19॥
ओंकाराची पहिली अकारमात्रा हे गणपतीचे दोन्ही पाय आहेत. दुसरी उकरमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे. तिसरीमात्रा हा त्याचा मोठ्या वाटोळ्या मस्तकाच्या आकार आहे. ॥
20-1
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें । तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥1.20॥
अकार, उकार, मकार या तिन्ही मात्रा एकत्रित झाल्या, म्हणजे त्या ओंकारात संपूर्ण वेद संक्षेपाने समाविष्ट होत असतो. त्या बिजरूप ओंकाररूप गणपती देवरायास मी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने नमस्कार करतो. ॥


21-1
आतां अभिनव वाग्विलासिनी । ते चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥1.21॥
(सरस्वती-वंदन) या नंतर नित्यनूतन प्रतिभा आणि वाणीच्या रुपाने क्रीडा करणारे चातुर्य, अर्थ व कला यांची कामिनी, विविध रस आणि अलंकार युक्त मधुर भाषेद्वारा संपूर्ण विश्वाला मोहित करणारी अशी जी शारदा, तिला मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ॥1-21॥
22-1
मज हृदयीं सद्‍गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु । म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥1.22॥
(सद्गुरु-स्तवन) श्री सद्गुरूंनी सांगितलेले ज्ञान मी माझ्या हृदयामध्ये साठविले; त्या मुळे मला भवसागर तरुण जाता आला. म्हणून अंतःकरणातील विवेकावर माझे आत्यंतिक प्रेम आहे. ॥1-22॥
23-1
जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे । मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥1.23॥
ज्या प्रमाणे पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले असता त्याची दृष्टी सर्वत्र पसरते आणि त्याला भूमीमध्ये असणाऱ्या संपत्तीचा ठसा दिसू लागतो. ॥1-23॥
24-1
कां चिंतामणी जालियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥1.24॥
मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात, त्या प्रमाणे सद्गुरु निवृत्तीनाथांच्या मूळे मी पूर्णकाम झालो आहे. माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण झाल्या आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात. ॥1-24॥
25-1
म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे । जैसें मुळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥1-25॥
या साठी जाणकारांनी सद्गुरुवर परम श्रद्धा ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे, म्हणजे जीवन कृतकृत्य होईल. जसे, झाडाच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने सहजच विकसित होतात. ॥1-25॥

, , , , , , ,


✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading