सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

451-13
कैवल्यसुखासाठीं । परमाणु घे किरीटी । उधळती पायांपाठीं । चालतां जे ॥451॥
अर्जुना, श्रीगुरू चालत असताना त्यांच्या पायामागे जी धूळ उडते त्यातील रज:कण तो गुरुभक्त मोक्षसुखाच्या किंमतीचे समजतो.
452-13
हें असो सांगावें किती । नाहीं पारु गुरुभक्ती । परी गा उत्क्रांतमती । कारण हें ॥452॥
हे राहू दे, मी गुरुभक्तीसंबंधाने किती सांगू? गुरूवरील प्रेमाला अंत नाही परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ती झाली, हेच या विस्ताराचे कारण आहे.
453-13
जया इये भक्तीची चाड । जया इये विषयींचें कोड । जो हे सेवेवांचून गोड । न मनी कांहीं ॥453॥
ज्याला या भक्तीची इच्छा आहे ज्याला याविषयी कौतुक आहे व जो या सेवेवाचून दुसरे काही चांगले मानत नाही,
454-13
तो तत्त्वज्ञानाचा ठावो । ज्ञाना तेणेंचि आवो । हें असो तो देवो । ज्ञान भक्तु ॥454॥
तो पुरुष तत्वज्ञानाचे ठिकाण आहे. ज्ञानाला त्याच्याच योगाने इभ्रत असते. हे वर्णन पुरे. अशी गुरूची सेवा करणारा जो आहे तो देव आहे व ज्ञान त्याचा भक्त आहे.
455-13
हें जाण पां साचोकारें । तेथ ज्ञान उघडेनि द्वारें । नांदत असे जगा पुरे । इया रीती ॥455॥
ह्या रीतीने खरोखर तेथे (त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी) जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते, हे तू खरोखर समज.

456-13
जिये गुरुसेवेविखीं । माझा जीव अभिलाखी । म्हणौनि सोयचुक॥ बोली केली ॥456॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) ह्या गुरुसेवेविषयी माझ्या अंत:करणात उत्कट इच्छा आहे, म्हणून मार्ग सोडून गुरुभक्तीचे व्याख्यान केले.
457-13
एऱ्हवीं असतां हातीं खुळा । भजनावधानीं आंधळा । परिचर्येलागीं पांगुळा- । पासूनि मंदु ॥457॥
नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा, मला डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याच्या कामी आंधळा आहे व सेवा करण्याविषयी पाय असून पांगळ्यापेक्षा मंद आहे.
458-13
गुरुवर्णनीं मुका । आळशी पोशिजे फुका । परी मनीं आथि निका । सानुरागु ॥458॥

वाचा असून गुरुवर्णनाविषयी मी मुका आहे व ज्यास फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे. परंतु माझ्या मनामधे गुरुभक्तीविषयी चांगले प्रेम आहे.
459-13
तेणेंचि पैं कारणें । हें स्थळ पोखणें । पडलें मज म्हणे । ज्ञानदेवो॥459॥
त्याच कारणामुळे ह्या (आचार्योपास्ति) पदाचे व्याख्यान विस्तृत करणे भाग पडले असे ज्ञानदेव म्हणतात.
460-13
परि तो बोलु उपसाहावा । आणि वोळगे अवसरु देयावा । आतां म्हणेन जी बरवा । ग्रंथार्थुचि ॥460॥
तरी ते माझे लांबलचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्याला सवड द्यावी. आता पुढे ग्रंथाचा अर्थच चांगला सांगेन.

461-13
परिसा परिसा श्रीकृष्णु । जो भूतभारसहिष्णु । तो बोलतसे विष्णु । पार्थु ऐके ॥461॥
ऐका ! ऐका ! भूतांचे ओझे सहन करणारा विष्णू जो श्रीकृष्ण तो बोलत आहे व अर्जुन ऐकत आहे.
462-13
म्हणे शुचित्व गा ऐसें । जयापाशीं दिसे । आंग मन जैसें । कापुराचें॥462॥
श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे कापूर हा आत व बाहेर दोन्ही बाजूंनी स्वच्छ असतो, त्याप्रमाणे ज्याचे शरीर आणि अंत:करण ही शुद्ध असतात, अर्जुना, तशा प्रकारचे शुचित्व ज्याचे ठिकाणी असते.
463-13
कां रत्नाचें दळवाडें । तैसें सबाह्य चोखडें । आंत बाहेरि एकें पाडें । सूर्यु जैसा ॥463॥
जसे रत्नाचे स्वरूप आतबाहेर चोख असते, अथवा सूर्य जसा आतबाहेर एकसारखा (प्रकाशमय) असतो.
464-13
बाहेरीं कर्में क्षाळला । भितरीं ज्ञानें उजळला । इहीं दोहीं परीं आला । पाखाळा एका ॥464॥
तसा बाहेरून जो कर्माने शुद्ध झालेला आहे व आतून तो ज्ञानाने शुद्ध झालेला आहे, अशा रीतीने जो या दोन्ही प्रकारांनी शुद्धत्वाला प्राप्त झालेला आहे.
465-13
मृत्तिका आणि जळें । बाह्य येणें मेळें । निर्मळु होय बोलें । वेदाचेनी॥465॥
वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती व पाणी, ह्यांच्या योगाने बाह्य जे शरीर ते निर्मळ होते.

466-13
भलतेथ बुद्धीबळी । रजआरिसा उजळी । सौंदणी फेडी थिगळी । वस्त्रांचिया ॥466॥
बुद्धीच्या बळाने वाटेल तेथे आरसा धुळीने (मातीने) स्वच्छ करता येतो व परिटाच्या भट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसे करते.
467-13
किंबहुना इयापरी । बाह्य चोख अवधारीं । आणि ज्ञानदीपु अंतरीं । म्हणौनि शुद्ध ॥467॥
फार काय सांगावे? ऐक. याप्रमाणे त्याचे शरीर शुद्ध असते व मनात ज्ञानरूपी दिवा असतो. म्हणून अंतर शुद्ध असते असे समज.
468-13
एऱ्हवीं तरी पंडुसुता । आंत शुद्ध नसतां । बाहेरि कर्म तो तत्त्वतां । विटंबु गा ॥468॥
अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आत मन शुद्ध नसताना बाहेर केवळ शरीराने कर्मे करणे, ही विटंबना होय.
469-13
मृत जैसा शृंगारिला । गाढव तीर्थीं न्हाणिला । कडुदुधिया माखिला । गुळें जैसा ॥469॥
प्रेतास जसे अलंकार घालून सजवले किंवा गाढवाला जसे तीर्थात स्नान घातले अथवा कडू असलेला दुध्या भोपळा जसा गुळाने चोपडला.
470-13
वोस गृहीं तोरण बांधिलें । कां उपवासी अन्नें लिंपिलें । कुंकुमसेंदुर केलें । कांतहीनेनें ॥470॥
ओसाड घराला जसे तोरण बांधले किंवा उपवासी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले अथवा विधवेने कुंकू व शेंदूर लावला


471-13
कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील तें झळाळ । काय करूं चित्रींव फळ । आंतु शेण ॥471॥
आतून पोकळ व बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जे असतात त्यांच्या वरील नुसत्या दिखाऊ चकाकीला आग लागो. शेणाची फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन, जरी ती हुबेहूब फळांसारखी दिसणारी केली तरी त्यांना घेऊन काय करायचे आहे? कारण त्यांच्या आत शेण आहे.
472-13
तैसें कर्मवरिचिलेंकडां । न सरे थोर मोलें कुडा । नव्हे मदिरेचा घडा । पवित्र गंगे ॥472॥
आत शुद्ध नसून केवल बाह्यात्कारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे. वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तर तो खपत नाही. जशी दारूने भरलेली घागर गंगोदकात बुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र होत नाही.
473-13
म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें । मग बाह्य लाभेल स्वभावें । वरी ज्ञान कर्में संभवे । ऐसें कें जोडे? ॥473॥
म्हणून मनामधे ज्ञान असावे, मग बाह्य शुद्धि सहजच प्राप्त होईल. शिवाय ज्ञान व कर्म या दोहोंनी उत्पन्न होणारी अशी पवित्रता कोठे मिळेल?
474-13
यालागी बाह्य विभागु । कर्में धुतला चांगु । आणि ज्ञानें फिटला वंगु । अंतरींचा ॥474॥
याकरता अर्जुना, बाहेरील भाग कर्माने चांगला धुतलेला (शुद्ध केलेला) आहे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकलेला आहे.
475-13
तेथ अंतर बाह्य गेले । निर्मळत्व एक जाहलें । किंबहुना उरलें । शुचित्वचि ॥475॥
त्या स्थितीत आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला व दोन्ही शुचित्वे एक झाली, फार काय सांगावे? केवल एक शुचित्व मात्र राहिले.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading