426-13
श्रीगुरुंचे मन । जया देईल अवधान । तें मी पुढां होईन । चमत्कारु ॥426॥
श्रीगुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन, असा चमत्कार करीन.
427-13
तया श्रवणाचे आंगणीं । होईन शब्दांचिया आक्षौहिणी । स्पर्श होईन घसणी । आंगाचिया ॥427॥
श्रीगुरूंच्या श्रवणरूपी अंगणात असंख्य शब्द मी होईन, त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्शविषय मी होईन.
428-13
श्रीगुरूंचे डोळे । अवलोकनें स्नेहाळें । पाहाती तियें सकळें । होईन रूपें ॥428॥
श्रीगुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पहातील त्या सर्व मीच होईन.
429-13
तिये रसने जो जो रुचेल । तो तो रसु म्यां होईजैल । गंधरूपें कीजेल । घ्राणसेवा ॥429॥
त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणांची सेवा करीन.
430-13
एवं बाह्यमनोगत । श्रीगुरुसेवा समस्त । वेंटाळीन वस्तुजात । होऊनियां॥430॥
याप्रमाणे सर्व वस्तूमात्र मी होऊन श्रीगुरूंची सर्व बाह्य सेवा करीन. असे त्याचे मनोगत असते.
431-13
जंव देह हें असेल । तंव वोळगी ऐसी कीजेल मग देहांतीं नवल । बुद्धि आहे ॥431॥
हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून अशी सेवा केली जाईल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड मी बुद्धीमधे धरीन. (ती अशी)
432-13
इये शरीरींची माती । मेळवीन तिये क्षिती । जेथ श्रीचरण उभे ठाती । आराध्याचे ॥432॥
जेथे पूजनीय श्रीगुरूंचे चरण उभे रहातील, त्या जागी या (माझ्या) शरीराची माती मिळवीन.
433-13
माझा स्वामी कवतिकें । स्पर्शीजति जियें उदकें । तेथ लया नेईन निकें । आपीं आप ॥433॥
माझे स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात माझ्या शरीरातील पाणी मी लयाला नेईन.
434-13
श्रीगुरु वोंवाळिजती । कां भुवनीं जे उजळिजती । तयां दीपांचिया दीप्तीं । ठेवीन तेज ॥434॥
ज्या दिव्यांनी गुरूस ओवाळतात अथवा जे दिवे श्रीगुरूंच्या मंदिरात लावतात, त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिसळीन.
435-13
चवरी हन विंजणा । तेथ लयो करीन प्राणा । मग आंगाचा वोळंगणा । होईन मी ॥435॥
श्रीगुरूंची चवरी व पंखा जो असेल तेथे त्या चवरीत व पंख्यात मी माझ्या प्राणांचा लय करीन. व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन.
436-13
जिये जिये अवकाशीं । श्रीगुरु असती परिवारेंसीं । आकाश लया आकाशीं । नेईन तिये ॥436॥
ज्या ज्या पोकळीत गुरू आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन.
437-13
परी जीतु मेला न संडीं । निमेषु लोकां न धडीं । ऐसेनि गणाविया कोडी । कल्पांचिया ॥437॥
परंतु जिवंत असतांना अथवा मेल्यावर श्रीगुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिषही (एक निमिषभर गुरूंची सेवा) लोकांवर सोपवणार नाही व अशी ही सेवा कोट्यवधी कल्पनांचा काल मोजला तरी ती चालू राहील.
438-13
येतुलेंवरी धिंवसा । जयाचिया मानसा । आणि करूनियांहि तैसा । अपारु जो ॥438॥
येथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही अपारच असतो. (म्हणजे गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा राहिलेलीच असते).
439-13
रात्री देवो नेणे । थोडें बहु न म्हणें । म्हणियाचेनि दाटपणें । साजा होय ॥439॥
(गुरुसेवेपुढे) तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची गर्दी असली म्हणजे तो प्रसन्न असतो.
440-13
तो व्यापारु येणें नांवें । गगनाहूनि थोरावे । एकला करी आघवें । एकेचि काळीं ॥440॥
गुरुसेवा करावयाची म्हटले म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकटा गुरूची सर्व सेवा एकाच काळी करतो.
441-13
हृदयवृत्ती पुढां । आंगचि घे दवडा । काज करी होडा । मानसेंशीं ॥441॥
त्याच्या अंत:करणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते, त्याची प्रत्यक्ष कृती मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करते.
442-13
एकादिया आळामाळा । श्रीगुरुचिया खेळा । लोण करी सकळा । जीविताचें ॥442॥
श्रीगुरूंच्या एखाद्या जराशा लीलेला आपल्या सर्व जीविताचे लोण करतो (म्हणजे आपले सर्व जीवित त्यांच्या थोड्याशा खेळावरून ओवाळून टाकतो).
443-13
जो गुरुदास्यें कृशु । जो गुरुप्रेमें सपोषु । गुरुआज्ञे निजवासु । आपणचि जो ॥443॥
जो गुरुसेवेच्या योगाने रोडका झालेला असतो, जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व जो आपण स्वत: श्रीगुरूच्या आज्ञेचे स्वत:च्या रहाण्याचे ठिकाण असतो,
444-13
जो गुरु कुळें सुकुलीनु । जो गुरुबंधुसौजन्यें सुजनु । जो गुरुसेवाव्यसनें सव्यसनु । निरंतर ॥444॥
जो श्रीगुरूच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो, जो आपल्या गुरुबंधुवरील स्नेहाचे योगाने भला मनुष्य ठरलेला असतो व जो नेहेमी गुरुसेवेच्या छंदामुळे व्यसनी असतो.
445-13
गुरुसंप्रदायधर्म । तेचि जयाचे वर्णाश्रम । गुरुपरिचर्या नित्यकर्म । जयाचें गा ॥445॥
गुरुसंप्रदायाचे जे आचार असतात, ते ज्याचे वर्णाश्रम विहितकर्मे असतात, अरे गुरुसेवा हे ज्याचे नित्यकर्म असते.
446-13
गुरु क्षेत्र गुरु देवता । गुरु माय गुरु पिता । जो गुरुसेवेपरौता । मार्ग नेणें ॥446॥
गुरू हेच क्षेत्र, गुरू हीच देवता, गुरूच माता, गुरूच पिता, तो गुरुपूजेपलीकडील दुसरा मार्ग जाणत नाही.
447-13
श्रीगुरूचे द्वार । तें जयाचें सर्वस्व सार । गुरुसेवकां सहोदर । प्रेमें भजे ॥447॥
श्रीगुरूचे द्वार हेच ज्याचे सर्वस्व सार आहे व गुरुसेवकांना तो सख्या भावाच्या प्रेमाने भजतो.
448-13
जयाचें वक्त्र । वाहे गुरुनामाचे मंत्र । गुरुवाक्यावांचूनि शास्त्र । हातीं न शिवे ॥448॥
ज्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते, व गुरुवाक्यावाचून दुसर्या शास्त्राला हात लावत नाही,
449-13
शिवतलें गुरुचरणीं । भलते जे पाणी । तया तीर्थयाञे आणी । तीर्थे त्रैलोक्यींचीं ॥449॥
ज्या कोणत्याही पाण्याला श्रीगुरुचरणांचा स्पर्श झाला आहे, त्या पाण्याला तीर्थे समजून त्या तीर्थाच्या यात्रेला त्रैलोक्यातील तीर्थे आणतो म्हणजे त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे समजतो.
450-13
श्रीगुरूचें उशिटें । लाहे जैं अवचटें । तैं तेणें लाभें विटे । समाधीसी ॥450॥
त्याला जेव्हा श्रीगुरूंचे उच्छिष्ट अकस्मात प्राप्त होते, तेव्हा त्या लाभाने तो समाधीस विटतो.
