सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

401-13
गुरूतें पक्षिणी करी । चारा घे चांचूवरी । गुरु तारू धरी । आपण कां स ॥401॥
गुरूला पक्षिणी करतो व आपण (पिल्लू बनलेला) तिच्या चोचेतून चारा घेतो. गुरूला पोहणारा करून आपण त्यांच्या कासेला लागतो.
402-13
ऐसें प्रेमाचेनि थावें । ध्यानचि ध्यानातें प्रसवे । पूर्णसिंधु हेलावे । फुटती जैसे ॥402॥
ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटामागून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते.
403-13
किंबहुना यापरी । श्रीगुरुमूर्ती अंतरीं । भोगी आतां अवधारीं । बाह्यसेवा ॥403॥
फार काय सांगावे? याप्रमाणे तो गुरुमूर्ती आपल्या अंत:करणात भोगतो. आता त्याची बाहेरील (शारीरिक) सेवा ऐक.
404-13
तरी जिवीं ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निकें । जैसें गुरु कौतुकें । माग म्हणती ॥404॥
गुरूंची शारीरिक सेवा –
तर त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरूचे असे चांगले दास्य करीन की जेणेकरून गुरू मला प्रेमाने ‘माग’ म्हणून म्हणतील.
405-13
तैसिया साचा उपास्ती । गोसावी सुप्रसन्न होती । तेथ मी विनंती । ऐसी करी न ॥405॥
तशा खर्‍या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील, त्या वेळी मी अशी विनंती करीन.

406-13
म्हणेन तुमचा देवा । परिवारु जो आघवा । तेतुलें रूपें होआवा । मीचि एकु ॥406॥
मी असे म्हणेन की देवा हा जो तुमचा सर्व परिवार आहे, तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे.
407-13
आणि उपकरतीं आपुलीं । उपकरणें आथि जेतुलीं । माझीं रूपें तेतुलीं । होआवीं जी ॥407॥
आणि आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे (पूजेची भांडी वगैरे वस्तू) आहेत, महाराज, तेवढे सर्व मी व्हावे.
408-13
ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती श्रीगुरु । मग तो परिवारु । मीचि होई न ॥408॥
असा मी (श्रीगुरूला) वर मागेन,की ते हो म्हणतील मग मी त्यांच्या परिवाराचा होईन.
409-13
उपकरणजात सकळिक । तें मीचि होईन एकैक । तेव्हां उपास्तीचें कवतिक । देखिजैल ॥409॥
श्रीगुरूच्या सेवेमध्ये जेवढीं उपकरणे लागतात, त्यापैकी प्रत्येक वस्तू मीच होईन तेव्हाच मला सेवेचे सुख प्राप्त होईल. तेंव्हाच माझ्या उपासनेचे खरे कौतुक होईल.
410-13
गुरु बहुतांची माये । परी एकलौती होऊनि ठाये । तैसें करूनि आण वायें । कृपे तिये ॥410॥
श्रीगुरू हे पुष्कळांची आई आहेत पण ते माझी एकट्याची आई होऊन रहातील असे करून (म्हणजे अनन्यभावाने त्यांची सेवा करून) त्यांच्या कृपेकडून शपथ वाहवीन.

411-13
तया अनुरागा वेधु लावीं । एकपत्नीव्रत घेववीं । क्षेत्रसंन्यासु करवीं । लोभाकरवीं ॥411॥
श्रीगुरूंच्या प्रेमाला माझा छंद लावीन व त्या प्रेमाकडून एकपत्नीव्रत घेववीन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्रसंन्यास करवीन, (म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कोठे जाणार नाही असे करीन),
412-13
चतुर्दिक्षु वारा । न लाहे निघों बाहिरा । तैसा गुरुकृपें पांजिरा । मीचि होईन ॥412॥
वारा कितीही धावला तरी तो जसा चार दिशांच्या बाहेर निघू शकत नाही, त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला पिंजरा होईन.
413-13
आपुलिया गुणांचीं लेणीं करीन गुरुसेवे स्वामिणी । हें असो होईन गंवसणी । मीचि भक्तीसी ॥413॥
गुरुसेवा जी माझी मालकीण तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन, हे असो. (एवढेच काय पण) गुरुभक्तीला मीच गवसणी होईन.
414-13
गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं । ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची ॥414॥
गुरूंच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन, याप्रमाणे मनोरथांच्या अनंत सृष्टीला तयार करतो.
415-13
म्हणे श्रीगुरूंचें भुवन । आपण मी होईन । आणि दास होऊनि करीन । दास्य तेथिंचें ॥415॥
तो म्हणतो, गुरूंचे रहाते घर, मी स्वत: होईन व त्यांच्या घराचा चाकर होऊन तेथील चाकरी मीच करीन.

416-13
निर्गमागमीं दातारें । जे वोलांडिजती उंबरे । ते मी होईन आणि द्वारें । द्वारपाळु ॥416॥
श्रीगुरू बाहेर जाते वेळी व घरात येतेवेळी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मीच होईन. आणि घराची द्वारे व द्वारांवरील राखण करणारे गडी मीच होईन.
417-13
पाउवा मी होईन । तियां मीचि लेववीन । छत्र मी आणि करीन । बारीपण ॥417॥
श्रीगुरूंच्या खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्याचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करीन.
418-13
मी तळ उपरु जाणविता । चंवरु धरु हातु देता । स्वामीपुढें खोलता । होईन मी ॥418॥
श्रीगुरूंना खालीवर जाणवणारा (चोपदार) मीच होईन, त्यांच्यावर चवरी धरणारा मीच होईन, त्यांना हात देणारा मीच होईन व श्रीगुरूंपुढे चालणारा वाटाड्या मीच होईन.
419-13
मीचि होईन सागळा । करूं सुईन गुरुळां । सांडिती तो नेपाळा । पडिघा मीचि ॥419॥
श्रीगुरूंचा झारी धरणारा शागीर्द मीच होईन व त्यास चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन.
420-13
हडप मी वोळगेन । मीचि उगाळु घेईन । उळिग मी करीन । आंघोळीचें ॥420॥
श्रीगुरूला विडा देण्याची सेवा मीच करीन, त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन.

421-13
होईन गुरूंचें आसन । अलंकार परिधान । चंदनादि होईन । उपचार ते ॥421॥
गुरूंचे आसन मी होईन, त्यांचे अंगावर घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र आणि चंदनादि उपचार मीच होईन.
422-13
मीचि होईन सुआरु । वोगरीन उपहारु । आपणपें श्रीगुरु । वोंवाळी न ॥422॥
श्रीगुरूंचा स्वयंपाक करणारा मी आचारी होईन व त्यांस फराळाचे वाढीन व मी आपल्या आपलेपणाने श्रीगुरूंस ओवाळीन.
423-13
जे वेळीं देवो आरोगिती । तेव्हां पांतीकरु मीचि पांतीं । मीचि होईन पुढती । देईन विडा ॥423॥
श्रीगुरू जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व (भोजन झाल्यानंतर त्यांना) मीच पुढे होईन आणि विडा देईन.
424-13
ताट मी काढीन । सेज मी झाडीन । चरणसंवाहन । मीचि करीन ॥424॥
श्रीगुरूंचे भोजन केलेले पात्र मीच काढीन व त्यांचा बिछाना मी झाडीन व त्यांचे पाय चेपीन.
425-13
सिंहासन होईन आपण । वरी श्रीगुरु करिती आरोहण । होईन पुरेपण । वोळगेचें ॥425॥
मी स्वत: सिंहासन होईन, त्यावर श्रीगुरू बसतील व सेवेचे पुरेपण होईन (म्हणजे संपूर्ण सेवा करीन).

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading