151-9
तैसा कृतनिश्चय वायां गेला । जैसा कोण्ही एकु कांजी प्याला । मग परिणाम पाहों लागला । अमृताचा ॥151॥
त्याचप्रमाणे संसारात मी आहे असा जो त्यांचा कृतनिश्चय, तो वाया जातो. असा कोणी एखादा कांजी पिऊन अमृतापासून होणाऱ्या सुखाचा लाभ इच्छितो,
152-9
तैसें स्थूलाकारीं नाशिवंते । भरंवसा बांधोनि चित्तें । पाहती मज अविनाशातें । तरी कैंचा दिसें ॥152॥
त्याप्रमाणे, अंतःकरणपूर्वक भरंवशाने नाशवंत अशा देहाचे ठिकाणीं अविनाशी अशा मला पाहतात, तर मी त्यांना कसा दिसेन?
153-9
काइ पश्चिमसमुद्राचिया तटा । निघिजत आहे पूर्विलिया वाटा । कां कोंडा कांडतां सुभटा । कणु आतुडे ॥153॥
हे पहा कोणी पश्चिमसमुद्राकडे जाण्याचा हेतूने पूर्वसमुद्राच्या वाटेला जाऊ लागला, तर त्याला पश्चिमसमुद्र प्राप्त होईल का? किंवा हे महाविरा, कोंडा कांडू लागले असतां त्यांत धान्य प्राप्त होईल का?
154-9
तैसें विकारलें हें स्थूळ । जाणितलेया मी जाणवतसें केवळ । काइ फेण पितां जळ । सेविलें होय ॥154॥
त्याचप्रमाणे, हे विस्तार पावलेले जग जाणल्याने निर्दोष अशा मला जाणतां येईल का? फेस प्याल्याने पाणी प्याल्याप्रमाणे होते का
155-9
म्हणोनि मोहिलेनि मनोधर्में । हेंचि मी मानूनि संभ्रमें । मग येथिंचीं जियें जन्मकर्में । तियें मजचि म्हणती ॥155॥
म्हणून मायामोहीत मनोवृत्तीने संसारांतच मी आहे असे भ्रांतीने मानून तेथील जन्ममरणादि सर्व स्थिति मलाही आहेत असे समजतात.
156-9
येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासि कर्म । विदेहासि देहधर्म । आरोपिती ॥156॥
याप्रमाणे नामरहित, क्रियारहित व देहरहित असा जो मी, त्या मला नामधारी, कर्मकारी व देहधर्मानी युक्त असणारा असे समजतात,
157-9
मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु । मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥157॥
मला निराकाराला आकार, निरुपाधिकाला उपचार, कर्तव्यरहिताला व्यवहार,
158-9
मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु । मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥158॥
मला जातिरहिताला जात, गुणातीताला गुण, चरणहिताला चरण, हस्तरहिताला हस्त,
159-9
मज अमेया मान । सर्वगतासी स्थान । जैसें सेजेमाजी वन । निदेला देखे 159॥
मज परिमाणातीताला परिमाण, सर्वव्यापकाला ठिकाण; ज्याप्रमाणे अंथरुणांत निजलेला वनाची शोभा स्वप्नांत पाहतो.
160-9
तैसें अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र । अगोत्रा गोत्र । अरुपा रुप ॥160॥
त्याप्रमाणे कर्णरहिताला कान, नेत्ररहिताला नेत्र, गोत्ररहीताला गोत्र, निराकाराला रूप,
161-9
मज अव्यक्तासि व्यक्ती । अनार्तासी आर्ती । स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥161॥
अव्यक्त असा जो मी त्या मला व्यक्ती, निरिच्छास इच्छा व जो मी स्वयमेव तृप्त आहे, त्यास तृप्ति अशा कल्पना करतात.
162-9
मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण । मज सकळकारणा कारण । देखती ते ॥162॥
मी वस्त्ररहित म्हणजे सर्व जगाला पांघरूण घालणारा, त्या मला पांघरूण घालतात; भूषणातीत म्हणजे निराकार असा जो मी, त्या मला दागिने घालतात;
163-9
मज सहजातें करिती । स्वंयभातें प्रतिष्ठिती । निरंतराते आव्हानिती । विसर्जिती गा ॥163॥
मी सर्व जगाला उत्पन्न करणारा असून मला दुसऱ्यांनी उत्पन्न केला आहे असे मानतात; मी स्वयमेव असून माझ्या मूर्ति करतात; मी स्वतःसिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करतात, व ओतप्रोत भरलेला असून माझे आव्हानविसर्जन करतात.
164-9
मी सर्वदा स्वतःसिद्धु । तो कीं बाळ तरुण वृद्धु । मज एकरुपा संबंधु । जाणती ऐसे ॥164॥
मी नेहमीं स्वयमेव व निराकार असून मला बाल्य, तारुण्य व वार्धक्य अशा अवस्था आहेत असे मानतात.
156-9
मज अद्वैतासि दुजें । मज अकर्तायासि काजें । मी अभोक्ता कीं भुंजें । ऐसें म्हणती ॥165॥
मी अद्वैत असून माझ्या ठिकाणीं द्वैत मानतात; मी कांहीएक न करणारा असून कर्मे करतो व कांही न खाणारा असून खातो, असे म्हणतात;
166-9
मज अकुळाचें कुळ वानिती । मज नित्याचेनि निधनें शिणती । मज सर्वांतराते कल्पिती । अरि मित्र गा ॥166॥
मला कुळगोत नसून माझ्या कुळाचे वर्णन करतात, मी नित्य असून मी मरतो असे मानून माझ्या मरणाने शोक करतात; तसेच मी सर्वांच्या अंतर्यामी राहणारा असून अमक्याचा शत्रु व अमक्याचा मित्र अशी माझ्या ठिकाणीं कल्पना करतात.
167-9
मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेकां सुखांचा कामु । अवघाची मी असे समु । कीं म्हणती एकदेशी ॥167॥
मी निजानंदांत निमग्न असणारा, त्या मला इतर सुखांची इच्छा करणारा असे मानतात, व सर्व ठिकाणी माझी समदृष्टि असुन मला एकदेशी म्हणजे एका स्थळी राहणारा म्हणतात.
168-9
मी आत्मा एक चराचरीं । म्हणती एकाचा कैंपक्ष करीं । आणि कोपोनि एकातें मारीं । हेंचि वाढविती ॥168॥
मी सर्व स्थावरजंगमांचा आत्मा असून एकाचा कैवारी व एकावर रागावून त्यास मारणारा अशी माझी सर्वत्र प्रसिद्धि करतात.
169-9
किंबहुना ऐसे समस्त । जे हे मनुष्यधर्म प्राकृत । तयाचि नांव मी ऐसें विपरीत । ज्ञान तयांचें ॥169॥
किंबहुना जे जे मनुष्यधर्म, ते ते सर्व मला लागू आहेत असे त्यांचे विपरीत ज्ञान असते.
170-9
जंव आकारु एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावें भजती । मग तोचि बिघडलिया टाकिती । नाहीं म्हणोनि ॥170॥
ज्या वेळेस ते दृष्टीसमोर एखादी मूर्ति पाहतात, त्या वेळेस ती देवच आहे या भावाने तिला भजतात;; मग तीच भंगल्यावर तिच्यांतील देवपण नाहींसे झाले असे मानून तिचा त्याग करतात.
171-9
मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें । म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी ॥171॥
अशा प्रकारानें मी मनुष्याचा देह धारण करणारा आहे असे समजतात, म्हणून त्यांचे हे ज्ञानच खऱ्या ज्ञानाच्या आड येते.
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतस: ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता:॥9.12॥
172-9
यालागीं जन्मलेचि ते मोघ । जैसें वार्षियेवीण मेघ । कां मृगजळाचे तरंग । दुरुनीचि पाहावे ॥172॥
सारांश, ज्याची मजविषयी अशा प्रकारची समजूत असते, त्यांचा जन्म व्यर्थच होय. ज्याप्रमाणे, पर्जन्यकालावांचून मेघ व्यर्थ आहेत किंवा मृगजलाच्या लाटा जशा दुरूनच पाहण्यास योग्य होत,
173-9
अथवा कोल्हेरीचे असिवार । नातरीं वोडंबरीचे अळंकार । कीं गंधर्वनगरीचे आवार । आभासती कां ॥173॥
अथवा मातीच्या चित्रांतले घोडेस्वार, कपटविद्येचे अलंकार किंवा संध्याकाळी ढगांत दृष्टीस पडणाऱ्या गांवाचे कुसूं भासते,
174-9
सांवरी वाढिन्नल्या सरळा । वरि फळ ना आंतु पोकळा । कां स्तन जाले गळां । शेळिये जैसे ॥174॥
शेर जरी सरळ वाढला तरी तो जसा आंत पोकळ असून वर फलही येत नाही, किंवा शेळीच्या गळ्याला उत्पन्न झालेल्या स्तनांतून जसे दूध निघत नाही,
175-9
तैसें मूर्खाचें तयां जियालें । आणि धिक् कर्म तयांचें निपजलें । जैसें सांवरी फळ आलें । घेपे ना दीजे ॥175॥
किंवा सांवरीच्या झाडाला फळ झाले असतां तें जसे कोणाला घेता किंवा देतां येत नाही, त्याप्रमाणे त्या मूर्खांचे जिणे होय, आणि त्यांच्या कार्यालाही धिक्कार असो!
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १५१ ते १७५ पहा.
Previous Post
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १२६ ते १५० पहा.
Next Post
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १७६ ते २०० पहा.
