सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

51-9
परि भोगाचिये ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलेंचि सुखा भरे । ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥51॥
परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील कांठावर उभे असतांही चित्त आनंदयुक्त होते, असे सुलभ आणि सोपे असून जे परब्रह्म होय.
52-9
पैं गा आणिकही एक याचें । जें हाता आले तरी न वचे । आणि अनुभवितां कांहीं न वेचे । वरि विटेहि ना ॥52॥
खरोखर या ज्ञानांत आणखीही गुण आहेत, ते हे की, हे प्राप्त झाले असतां नाहीसे होत नाही; हे अनुभव घेतल्यानें कमी होत नाही, तसेच जवळ असते, परंतु विटतही नाही.
53-9
येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका । ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ॥53॥
हे चतुर अर्जुना, आता, तूं जर अशी शंका घेशील की, एवढी अप्रतिम वस्तु असतां लोकांना मिळाल्याशिवाय कशी राहिली?
54-9
एकोत्तरेयाचिया वाढी । जे जळतिये आगीं घालिती उडी । ते अनायासें स्वगोडी । सांडिती केविं ॥54॥
जे लोक एकोत्रा व्याजाकरितां जळत्या आगीतहीं उडी घालण्यास मागेपुढे पहात नाहीत, ते सहज आपल्या ठिकाणींच असलेली गोडी कशी टाकुन देतील?
55-6
तरि पवित्र आणि रम्य । तेविंचि सुखोपायेंचि गम्य । आणि स्वसुख परि धर्म्य । वरि आपणपां जोडे ॥55॥
तरी पवित्र आणि रमणीय, तसेच सुख देणारे, जाणण्यास सुलभ, अति सुखकारक, धर्माला पूर्ण अनुकूल व आपले ठिकाणींच प्राप्त होणारे,

56-9
ऐसा अवघाचि सुरवाडु आहे । तरी जनाहातीं केविं उरो लाहे । हा शंकेचा ठाव कीर होये । परि न धरावी तुवां ॥56॥
अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असतांही लोकांच्या हाती लागल्याशिवाय हे कसे राहिले, ही शंका घेण्यास जागा आहे खरी; परंतु तूं अशी शंका घेऊं नको.
अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि॥9.3॥

57-9
पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड । परि तें अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ॥57॥
पहा, गाईचे दूध हे पवित्र असून गोड आहे; तसेच अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आंतच आहे; परंतु त्याचा त्याग करून गोचीड रक्तच सेवन करीत नाही का?
58-9
कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणुक एकेचि घरीं । परि परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे ॥58॥
किंवा कमळाचा कांदा व बेडूक हे एकेच ठिकाणीं वास्तव्य करतात, परंतु कमळांतील मकरंदाचे सेवन भ्रमर करतात व बेडकांच्या वांट्याला चिखलच राहतो!
59-9
नातरी निदैवाचां परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥59॥
अथवा, दुर्दैव्याच्या घरी मोहरा वगैरे अगणित द्रव्य पुरलेले असूनही तो तेथे बसून उपास काढून दरिद्रावस्था भोगतो
60-9
तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु । कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ॥60॥
त्याचप्रमाणे; मनुष्याच्या सर्व सुखाचें विश्रांतिस्थान असा मी ” राम ” मनुष्याच्या ह्रदयांत असतां त्या अज्ञानी पुरूषाची विषयावर वासना असते.


61-9
बहु मृगजळ देखोनि डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा । तोडिला परिसु बांधिला गळा । शुक्तिकालाभें ॥61॥
पुष्कळसे मृगजळ दृष्टीस पडून तोंडात असलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, किंवा शिंप मिळाली असतां गळ्यांत बांधलेला परीस तोडून टाकावा,
62-9
तैसीं अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवतीचि बापुडीं । म्हणोनि जन्ममरणाची दुथडी । डहुळितें ठेलीं ॥62॥
त्याचप्रमाणे ज्यांचे मनावर अहंममतेचा पगडा बसलेला आहे, ते बिचारे मला प्राप्त होत नाहीत. म्हणून जन्ममरणांच्या दोन्ही तिरांच्या मध्येंच बुचकळ्या खात बसतात
63-9
एऱ्हवीं मी तरी कैसा । मुखाप्रती भानु कां जैसा । कहीं नसे न दिसे ऐसा । वाणीचा नव्हें ॥63॥
येरव्ही मी कसा आहे म्हणशील, तर सुर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाराला तोंडासमोर दिसतो, त्याचप्रमाणे आहे, परंतु त्याच्यांत जी एक उणीव आहे, की तो केव्हां दिसतो व केव्हां दिसत नाही, ती मात्र माझ्यांत नाही.
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित:॥9.4॥

64-9
माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें । हे जगचि नोहे आघवें । जैसें दूध मुरालें स्वभावें । तरि तेंचि दहीं ॥64॥
माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्तार कोणता म्हणशील, तर हे सर्व जगच नव्हे का? ज्याप्रमाणे, दूध सहज जरी थिजले तरी तेंच दही;
65-9
कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु । तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥65॥
किंवा बीजाचाच वृक्ष होतो, अथवा सुवर्णाचे अलंकार होतात, त्याचप्रमाणे, निर्गुण असा जो एकटा मी, त्या माझा जो विस्तार तेंच हे जग होय.


66-9
हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें । तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ॥66॥
हे स्वरूप अव्यक्त असते. तेव्हां निराकार असते, तेच मग सृष्टीच्या रूपाने विस्तार पावून आकाराला येते. याप्रमाणे, निर्गुण असून साकार झालेला जो मी, त्यानेंच हे त्रैलोक्य मांडले असे जाण.
67-9
महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें । परि माझां ठायीं बिंबते । जैसे जळीं फेण ॥67॥
महात्तत्त्वापासून देहापर्यंत ही सर्व भूते खरोखर माझ्यापासूनच उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे पाण्यापासून फेंस उत्पन्न होतो,
68-9
परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पंडुसुता । नातरी स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥68॥
परंतु त्या फेसाच्या आंत पाहूं गेले असता पाणी दिसत नाही, किंवा अर्जुना,स्वप्नांत जीवाचे अनेक रूपे धारण करणे ज्याप्रमाणे जागे झाल्यावर नाहींसे होते,
69-9
तैसीं भूतें इयें माझां ठायीं । बिंबती तयांमाजी मी नाहीं । इया उपपत्ती तुज पाहीं । सांगितलिया मागां ॥69॥
त्याप्रमाणे, ही भूते जरी माझ्या ठिकाणीं भासली, तरी त्यांचे ठिकाणीं मी नाही. हे उत्पादन तुला मागे सांगितलेंच आहे. (अध्याय 7 श्लोक 12)
70-9
म्हणऊनि बोलिलिया बोलाचा आतिसो/न कीजे यालागीं हें असो । तरी मजाआंत पैसो । दिठि तुझी ॥70॥
म्हणून, बोललेल्या गोष्टींचा पाल्हाळ करुं नये. तेव्हां ते राहूं दे. परंतु तुझ्या दृष्टीचा प्रवेश माझ्या अंतर्यामी होऊं दे.
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
भूतभृन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावनः॥9.5॥


71-9
आमचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहों । तरी मजमाजि भूतें हेंही वावो । जे मी सर्व म्हणऊनि ॥71॥
मायेच्या पलीकडील माझे जे स्वरूप, ते जर कल्पनेशिवाय पाहूं लागलास, तर माझे ठिकाणीं सर्व भूतें आहेत असे जे तुला सांगितले, ते सर्व मिथ्या आहे असे तुला भासेल; कारण सर्व मीच आहे.
72-9
एऱ्हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे । म्हणोनि अखंडित परि झांवळें । भूतभिन्न ऐसें देखें ॥72॥
एरव्ही, संकल्परूप संध्याकाळचे वेळेस ज्ञानरूप डोळे अज्ञानरूप अंधकाराने काही वेळ ग्रासले जातात; म्हणून त्या झांजडींत, मी अखंड असतां भूतें मजहून निराळी दृष्टीस पडतात.
73-9
तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरुपें । जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें ॥73॥
त्याच संकल्परूपी संध्याकाळचे वेळेचा लोप झाला म्हणजे, ज्याप्रमाणे नीळमण्याच्या माळेवर कवड्या सापाचा झालेला सर्व भास, शंका दूर होण्याबरोबर नाहींसा होतो, त्याप्रमाणे मी अखंड आहे असा दिसतो.
74-9
एऱ्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेया गाडगेयांचे निघती कोंभ । परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥74॥
येरव्ही जमिनीतून घागर, मडकी वैगेरेचे कोंब स्वतःसिद्ध निघतात काय? परंतु कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार होतात.
75-9
नातरी सागरींचां पाणीं । काय तंरगाचिया आहाती खाणी । ते अवांतर करणी । वारयाची नव्हे ॥75॥
किंवा समुद्राच्या पाण्यांत लाटांच्या खाणी का आहेत? तर ते कृत्य वाऱ्याशिवाय इतराचें नव्हें;

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading