सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ७६ ते १०० पहा.

, ,

76-9
पाहें पां कापसाचां पोटीं । काय कापडाची होती पेटी । तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥76॥
हे पहा, कापसाच्या पोटांत कापडाचे गठ्ठे असतात का? वापरणाराच्या समजुतीनें तो कापड बनला आहे!
77-9
जरी सोनें लेणें होऊनि घडे । तरी तयाचें सोनेपण न मोडे । येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावें ॥77॥
जर सोन्याचे दागिने बनविले तर सोनेपण नाहींसे होते का? बाकी स्थुल दृष्टीने वापरणाराच्या कल्पनेनें ते दागिने दिसतात;
78-9
सांगें पडिसादाची प्रत्युत्तरें । कां आरिसां जें आविष्करे । तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें ॥78॥
आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनि ऐकूं येतो, किंवा आरशांत जे आपले स्वरूप आपण पाहतो, तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे, किंवा आपल्या पूर्वीच ते तेथे होते सांग बरे!
79-9
तैसी इये निर्मळे माझां स्वरुपीं । जो भूतभावना आरोपी । तयासी तयाचां संकल्पीं । भूताभासु असे ॥79॥
त्याचप्रमाणे ह्या माझ्या निरुपाधिक स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप घेतो, त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणीं भूतांचा भास होतो.
80-9
तेचि कल्पिती प्रकृती पुरे । आणि भूताभासु आधींच सरे । मग स्वरुप उरे एकसरें । निखळ माझें ॥80॥
तीच कल्पना करणारी माया संपली, म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास नाहीसा होतो. मग, माझे निरुपाधिक असे जे शुद्ध स्वरूप, तेच निखालस उरते.


81-9
हें असो आंगीं भरलिया भवंडी । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी । तैशी आपुलिया कल्पना अखंडीं । गमती भूतें ॥81॥
हे असो; आपल्या भोवती गरगर फिरतांना भोवंड आल्यावर ज्याप्रमाणे डोंगर वैगेरे फिरतातसे दिसते,
82-9
तेचि कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं । हें स्वप्नींही परि नाहीं । कल्पावयाजोगें ॥82॥
त्याचप्रमाणे, आपल्या मनांत कल्पना उत्पन्न झाल्यावर अखंड ब्रह्मस्वरूपांत भूतांचा भास होतो. तीच कल्पना सोडून जर पाहीले, तर मी भूतांच्या ठिकाणीं व भुते माझ्या ठिकाणीं आहेत, अशी स्वप्नांत देखील कल्पना करण्यासारखी गोष्ट नाही.
83-9
आतां मीच एक भूतातें धर्ता । अथवा भूतामाजि मी असता । या संकल्पसन्निपाता । आंतुलिया बोलिया ॥83॥
आतां, ‘ मीच एक भूतांचा धारण करणारा अथवा भूतांत असणारा’ ह्या सर्व गोष्टी संकल्परूप सन्निपात वायुच्या लहरीतील बडबडी आहेत.
84-9
म्हणोनि परियेसीं गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वासीं विश्वात्मा । जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥84॥
म्हणून हे प्रियोत्तमा, ऐक की, अशा प्रकारे मी सृष्टीचा विश्वात्मा किंवा खोट्या सृष्टीचा आधार, ह्या कल्पना मिथ्या आहेत.
85-9
रश्मीचेनि आधारें जैसें । नव्ह तेंचि मृगजळ आभासे । माझां ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंही भावीं ॥85॥
ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रखर किरणांनी, पाणी नसता मृगजलाचा भास होतो, त्याप्रमाणे, सर्व भूतें माझ्या ठिकाणीं आहेत व मीही त्यांमध्ये आहे, अशी कल्पना उत्पन्न होते.


86-9
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु । जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥86॥
अशा प्रकारे, भूतांना उत्पन्न करणारा असुनही, सुर्य आणि त्याचें तेज ही ज्याप्रमाणे एकच आहेत, त्याप्रमाणे मी त्यापासून निराळा नाही.
87-9
हा आमचा ऐश्वर्ययोगु । तुंवा देखिला कीं चांगु । आतां सांगें कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ॥87॥
हा आमचा ऐश्वर्ययोग (अद्भूत कृत्य) तुला चांगला समजला ना? तर आता सांग बरे, की मी व प्राणिमात्र यांच्यात कांही तरी भेदाचा संबंध आहे काय?
88-9
यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें । आणि भूतावेगळिया मातें । कहींच न मनीं हो ॥88॥
याकरितां, माझ्याहून सर्व प्राणिमात्र खरोखर वेगळे नाहींत; आणि मीही त्यांच्यापासून वेगळा आहे असे कधी समजूं नको.
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय॥9.6॥

89-9
पैं गगन जेवढें जैसें । पवनु गगनीं तेवढाचि असे । सहजें हालविलिया वेगळा दिसे । एऱ्हवीं गगन तेंचि ते ॥89॥
आकाशाचा जेवढा विस्तार आहे, तेवढा वारा भरून राहीलेला आहे; परंतु तो सहज हालवला तर आकाशापासुन निराळा भासतो. येरव्ही आकाश तेंच तो आहे;
90-9
तैसें भूतजात माझां ठायीं । कल्पिजे तरी आभासें कांहीं । निर्विकल्पीं तरि नाहीं । तेथ मीच मी आघवे ॥90॥
त्याप्रमाणे, प्राणी माझ्या ठिकाणीं आहेत अशी मनांत कल्पना आली, म्हणजे थोडा भास होतो. तेच कल्पनेच्या अभावी पांहू गेले असतां सर्वत्र मी एकच आहे.


91-9
म्हणऊनि नाहीं आणि असे । हें कल्पनेचेनि सौरसें । जे कल्पनालोपें भ्रंशें । आणि कल्पनेसवें होय ॥91॥
म्हणून भूतांचे नसणे आणि असणे हे कल्पनेच्या संबंधाने भासते; व जे कल्पना नाहींशी झाल्यावर भासत नाही आणि कल्पनेबरोबर भासते,.
92-9
तेंचि कल्पितें मुदल जाये । तैं असें नाहीं हें कें आहे । म्हणऊनि पुढती तूं पाहें । हा ऐश्वर्ययोगु ॥92॥
तेच कल्पना उत्पन्न करणारे अज्ञान समूळ नाहींसे झाल्यावर भूतांचे असणे व नसणे कोठून भासणार? म्हणून यापुढे माझी अद्भूत कृति तुला सांगतो ती पहा
93-9.
ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणपेयातें कल्लोळु एक करीं । मग जंव पाहासी चराचरीं । तंव तूचि आहासी ॥93॥
अशा ह्या अनुभवरूपी समुद्रांत तू स्वतः एक लाट बनून रहा; मग तूं या चराचरांकडे पांहू लागलास, म्हणजे सर्वत्र तूंच भरला आहेस असे तुझ्या दृष्टीस पडेल ऐस
94-9
या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना म्हणती देवो । तरी आतां द्वैतस्वप्न वावो । जालें कीं ना ॥94॥
देव म्हणाले :- अर्जुना ! हे जे मी तुला ज्ञान सांगितले त्याचा तुझ्या मनांत काही प्रकाश पडला का? तर आता तुला जे मी व विश्व ही दोन आहेत असे स्वप्न पडले होते, ते खोटे ठरले नाही का?
95-9
तरी पुढती जरी विपायें । बुद्धीसि कल्पनेची झोंप ये । तरी अभेदबोधु जाये । जैं स्वप्नीं पडिजे ॥95॥
परंतू पुढे कदाचित् तुझ्या बुद्धीला जर कल्पनारूपी झोप लागली, तर मी व जग ही एकच आहेत असा जो बोध, तो जगद्रूपी स्वप्न पडूं लागल्यावर नाहींसा होईल;


96-9
म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे । निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे । ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावो आतां ॥96॥
म्हणून या कल्पनारूप निद्रेची वाट मोडून, शुद्ध असे जे ब्रह्मज्ञान ते आपोआप तुला प्राप्त होईल असे जे एक खरे तत्त्व आहे ते तुला आता दाखवून देतो.
97-9
तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देईं बा धनंजया । पैं सर्व भूतांतें माया । करि हरि गा ॥97॥
तर, हे धैर्यवान धनंजया, तूं नीट लक्ष दे की, प्राणिमात्राची उत्पत्ति, स्थिति व लय यांस एक मायाच कारण आहे.
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्॥9.7॥

98-9
जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरुपा ॥98॥
त्या मायेला प्रकृति असे म्हणतात, व ती दोन प्रकारची आहे म्हणून तुला पूर्वी (अध्याय 7 श्लोक 4-5) सांगितलेंच आहे. पैकी एक आठ प्रकारच्या रूपाने भिन्न आहे व दुसरी जीवरूप अशी आहे.
99-9
हा प्रकृतीविखो आघवा । तुंवा मागां परिसिलासे पांडवा । म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती ॥99॥
हे पांडवा, हा प्रकृतीचा सर्व विषय तू पूर्वी ऐकलाच आहेस, म्हणून त्याजबद्दल पुनः पुनः सांगण्याचे कारण नाही.
100-9
तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंती । सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासी येती ॥100॥
तरी महाप्रलयाच्या शेवटी ही सर्व भूते माझ्या प्रकृतिरूप अव्यक्त स्वरूपांत लय पावतात.

, ,

Leave a Reply