भाग क्र.12
सर्वसंगाचा परित्याग .
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकी रामायणातले संस्कृती दर्शन पाहु.
अयोध्याकांडापासुन विषय आरंभ आहे व रामचंद्रांच्या वनवास वचनापर्यंत आपण आलोय गेल्या भागात सीतामाईची समजुत घालताना निरोपाची संस्कृती आपण पाहिली होती आज थोड पुढे पाहु.
सीतेला अनेक प्रकारे समजवुन देखील ती रामचंद्रांसोबतच वनात येण्याचा हट्ट करु लागली तेव्हा रामचंद्रानी नाईलाजाने अनुमती दिली.तसच नाईलाजाने लक्ष्मणालाहि रामचंद्रांनी सोबत येण्याची परवानगी दिली. (या दोघांना रामांनी विविध प्रकारे समजवल होत पण त्यांनी हट्ट सोडला नाहि)
रामचंद्र म्हणतात सीते वनात तापसी बनुन जायचे आहे वल्कले नेसायची, जटाजुट माथ्यावर ठेवायची आहेत व पर्णकुटित निवास करायचा आहे. आता आपणास या सुवर्ण अलंकार वगैरेंचा त्याग करुन त्यांचा दानधर्म केला पाहिजे.
सुयज्ञ नावाच्या वसिष्ठांच्या पुत्राला जो वेदशास्त्र पारंगत होता त्याला या करता बोलवणे धाडले
जातरुप मयैर्मुख्यैरङ्गदै:कुण्डलै:शुभै:।
सहेमसुत्रैर्मणिभि: केयुरैर्वलयैरपि।। (32.5)
काकुत्स्थकुलभूषण रामाने सोन्याने बनवलेले विविध अलंकार, कुंडले , अंगठ्या सुवर्ण तंतु ओवलेल्या विविध मणि व रत्नांच्या माऴा पूजन पूर्वक सुयज्ञाला दिल्या.
हारंच हेमसुत्रंच भार्यायै सौम्य हारय ।
रशनां चाथ सा सीता दातु मिच्छति ते सखी ।।(7)
सुयज्ञाला राम म्हणतात देवी सीता तुमच्या पत्नीला आपला हार, सुवर्णसुत्र, कमरेतली मेखला वगैरे देणारे ती देखील तुम्हि घ्यावी
अगदि रामचंद्रानी आपला पलंग जो सुवर्ण निर्मित व विविध रत्नांनी नटलेला होता तो देखील दान दिला मग शत्रुंजय नामक हत्ती देखील एक हजार मोहरांसहित सुयज्ञास दान दिला
अशा प्रकारे राम व सीतेने दान दिले.
लक्ष्मणाने अगस्त्य व कौशिक व विश्वामित्रांना विविध दाने दिली.
तैत्तरीय व कठ शाखेच्या ब्राह्मणांना व ब्रह्मचारी बटुंना विविध दाने दिली
आता एखादा नास्तिक पटकन म्हणेल कि हे पुरोहित आपल्यालाच दाने मिऴतात म्हणुन दानधर्म सांगताहेत व रामाचे कौतुक करताहेत.
चित्ररथ नावाच्या सूताला एक हजार गायी व बकरी दान दिल्या
आश्रीत सेवकांना 14 वर्षे पुरेल एवढे दान दिले
त्यानंतर बाल वृध्द कृपण (अशक्त रोगी) व भिक्षुक (भिक्षा मागणार्या) सर्वांना भरपुर दानधर्म केला.
गायी वासरे भूमी वस्त्र बकरी सर्वांचे दान केले.
वनात जर तपस्वी म्हणुन जाणार तर या धनाची काय गरज आहे.वल्कले नेसणे व जटा बांधुन पर्णकुटित राहायचे व झाडावरुन पडलेली फऴे व कंद खाणे या करता धनाची काय गरज.
रामचंद्र हे विरक्तांचे विरक्त होते.
घरात धन द्रव्य सोनेचांदि असले कि बाहेर गेलेल्या माणसाचा जीव त्यातच अडकतो व सारखा द्रव्याचाच विचार सुचतो रामचंद्र तापसी म्हणुन वनात जाताहेत (तापसी म्हणजे तपस्वी) त्यामुऴे वनात जर सारखा घरचा व द्रव्याचा विचार येवु लागला तर मनाला चंचलता येईल व ते वचनपालनात बाधक ठरेल हे रामांनी जाणले होते यास्तवच हा दान प्रपंच त्यांनी केला.
सर्वसंग परित्याग करुनच विरक्त व्हावे हि आपली संस्कृती आहे .
अनेक संतानी हिच संस्कृती आचरली प.प.वासुदेवानंद सरस्वति (टेंब्ये स्वामी) नेसत्या वस्त्रानिशी पत्नीसह दत्तमुर्ती घेवुन घरातुन निघाले सोबत अन्य काहिच घेतले नाहि भारतभर अनवाणी पायी प्रवास अगदि पाण्याचा देखील संग्रह सोबत नसे.(तहान लागली कि नदिवरुन पाणी आणणे किती वैराग्य)
आपल्याकडे मुंजीनंतर बटुला लंगोटि नेसवली जाते ती याच वैराग्याकरता असते. बटुला वैराग्य आल्याशिवाय तो गुरुसेवा करुन शिक्षण घेणारच नाहि यास्तव केवऴ गऴ्यात जानवे, कंबरेला लंगोटि व पंचा याच गोष्टि पाठशाऴेत जाण्याकरता पुरतात. (पैसे फेकुन शिक्षण विकत घेता येत हि समजच चुकिची आहे. याने साक्षर होता येईल पण सरस होता येणार नाहि)
रामचंद्र हे वनात तपाचरणाकरता जात होते व तपानेच ज्ञान प्राप्ती होते.
पैसे नाहित म्हणुन वनात राहणे हि आगतिकता त्यात नव्हती.
प.पू.गोंदवलेकर महाराजांच्या चरीत्रात असाच उल्लेख आहे त्यांनी घरातले धान्य वगैरे दान दिले व नंतर यात्रेकरता बाहेर पडले.
बरेचदा गृहिणींचा घरात जीव अडकलेला असतो त्या बाहेरगावी जरी असल्या तरी दिवसातुन चार वेऴा तरी फोन करुन दुध गरम करा, कपाट बंद करा, गँस बंद करा वगैरे सुचना देतात.
संत तुकोबांनी तर वेऴप्रसंगी आपण उपाशी राहुन धान्यदान दिले आहे.
दानाची संस्कृती आपली आहे.दधिची ऋषिंनी तर आपला देह जाऴुन अस्थि इंद्राला दिल्या होत्या.
दान म्हणजे नको असलेली गोष्ट देणे असा नव्हे .
बाबा आमटें सारख्या अनेकांनी आपल घरदार सोडुन सर्व सुखांचा त्याग करुन वनात जावुन कुष्ठरोग्यांची सेवा हे तपाचरणच अव्याहत पणे केलय.
परवाच एका दांपत्याने आपली सर्व संपत्ती भारतीय लष्कराला दान दिल्याची बातमी पेपर मधे होती.
डोंबिवली मधील एक गृहस्थ आपले घरदार दान देवुन रा.स्व.संघाच्या वनवासी कल्याण कार्यक्रमाकरता ईशान्य भारताकडे जाते झालेत.( परवाच हि बातमी वाचली या दोघांची नावे विसरलो आहे)
पैसे नाहित म्हणुन जंगलात जाणे हि यात मजबुरी नसुन सर्व सुखे हात जोडुन पुढ्यात उभी असताना ती त्यागुन विरक्ती घेण्याचा आनंद आहे.
हि संस्कृती आजहि अनेक जण जोपासताहेत
रा.स्व.संघाचे ईशान्य भारतातील अनेक प्रचारक व हिंदु धर्माभिमानी हे अगदि अमेरीकेतल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या सोडुन आलेत व हे काम करताहेत हि देखील तप:साधनाच आहे.
अनेक गरीबांना मोफत शिकवणे हा ज्ञानयज्ञ ते करताहेत.
हा रामचंद्रांचा वारसा व संस्कृती जपताहेत या सर्वांना धन्यवाद देवुन आज थांबतो
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
