॥ सार्थ ज्ञानेश्वरी:॥ अथ द्वादशोऽध्यायःअध्याय बारावा ॥ भक्तियोग ॥
एकूण ओव्या 247
अध्याय बारावा
1-12
जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनवरत आनंदे । वर्षतिये॥1॥
हे सद्गुरु आई ! तू शुद्ध म्हणजे अखंड अज्ञानादि दोषरहित आहेस, तू एक अत्यंत उदार म्हणून प्रसिध्द आहेस व तू अखंड आनंदस्वरूप किंवा प्रेमरूप असून शिष्याचे ठिकाणी अखंड परमानंदाचा वर्षाव करणारी किंवा परमानंदरूप प्रेमाची प्राप्ती करून देणारी आहेस. (श्रीगुरूंचा जयजयकार करून व आपल्याकडे बालपण घेऊन श्रीज्ञानेश्वर महाराज लडिवाळपणाने श्रीगुरुंचे स्ववन करतात.
जय जय वो शुद्धे — येथे शुद्ध हे विशेषण जीवाच्या ठिकाणी असलेल्या अशुद्धीच्या अपेक्षेने आहे. जीवाच्या ठिकाणी अज्ञान व अज्ञानजन्य अनेकत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, राग, द्वेष, अभिनिवेश, पाप इत्यादि नानाप्रकारची अशुद्धी आहे. तसेच त्याची ज्ञानदृष्टीही विपरित-ज्ञानरूप अशी अशुद्ध असून, त्याचे देहादिक पंचभौतिकही अशुद्ध आहेत.
पण श्रीगुरूची दृष्टी शुद्ध चिन्मय असून ज्ञानभक्तीने त्याची सगुण साकार मूर्तीही चिन्मयच झालेली असते- म्हणजे श्रीगुरु आत-बाहेर पूर्ण चिन्मयच असतात- म्हणून ते सर्वतोपरी उपाधिरहित-म्हणजे शुद्ध आहेत किंवा पूर्ण ब्रह्म आहेत, असे ‘शुद्ध’ या शब्दाने माउलिंनी संबोधून जयजयकार केला आहे.)
2-12
विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥2॥
विषयरूपी भयंकर सर्पाने जीवाच्या ठिकाणी मिठी मारल्यामुळे जी त्याला आत्मविस्मृतीची मूर्च्छा आली आहे, ती कशानेही नाहीशी होत नाही, पण हे श्रीगुरो ! एक तुझ्या कृपादृष्टीनेच विषयरूपी सर्पाचे विष उतरून ती मूर्च्छा नाहीशी होते. (परमार्थात संसारनिवृत्तिरूप मोक्षप्राप्तीकरिता ज्ञानभक्तीनिष्ठ श्रीगुरुकृपेवाचून दुसरा उपाय नाही असा भाव)
3-12
तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥3॥
तुझ्या अंतःकरणांत ज्याच्याविषयी कृपाप्रेमाचा पूर येऊन त्याच्या लाटा उसळू लागल्या असता, संसारातील त्रिविधतापाने कोण पोळला जाईल? व त्याला प्रियवस्तूचा वियोग व अप्रियवस्तूंचा संयोग यांच्याविषयीचा शोक कसा जाळू शकेल?
4-12
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥4॥
हे प्रेमळ सद्गुरु आई ! तू आपल्या प्रेमळ अनन्य सेवकांना आपल्या प्रेमानेच योगसुखाचे सोहळे भोगवितेस आणि त्यांचे सोहंसिध्दीचे लळे- म्हणजे लाड तू पुरवितेस.
5-12
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥5॥
आधारशक्तीच्या मांडीवर, कुंडलिनीशक्ती जागी करून, तिच्या सहाय्याने, सेवकाला कौतुकाने वर नेतेस आणि ह्रदयाकाशरूपी पाळण्यात, त्याला आपल्या शुध्द आत्मस्वरूपाच्या ऐक्याचे झोके देतेस.
6-12
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं । आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥6॥
तू आपल्या सेवकाला प्रत्यग्ज्योतीची ओवाळणी करून मनपवनाची खेळणी करून देतेस व आत्मसुखाची बाळलेणी लेववितेस. (प्रत्यग्ज्योती- म्हणजे देहापासून बुद्धीपर्यत जेवढी स्थूळसूक्ष्म तत्वे आहेत, त्या सर्वांच्या अंतर्यामी राहणारे चैतन्य
ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला प्रेमाने ओवाळते, त्याप्रमाणे श्रीगुरुही आपल्या प्रेमळ सेवकाला ह्रदयाकाशाच्या ठिकाणी, स्वयंज्योती अशा प्रत्यक् आत्मचैतन्यरूप ज्योतीने ओवाळतात म्हणजे त्याला सर्व उपाधीरहित करून सोडतात.
बाळलेणी म्हणजे बालपणी घातले जाणारे अलंकार. आई जसे आपल्या मुलाला लहानपणी सोन्याचे अलंकार घालते, त्याप्रमाणे श्रीगुरुआई आपल्या सेवकाला त्याच्या बालपणातत आत्मसुखाचे अलंकार घालते. अर्थात गुरुसेवकाचे बालपण म्हणजे ज्ञानाहंकाररहित असणे होय. या ज्ञानाहंकाररहिततेमुळेच सेवकाचे अंगी दंभदर्परहित असणे, मन इंद्रियादिक देहाच्या सुखांकरिता विषयाकडे न धावता शांत असणे, हर्ष-दुःख, मान-अपमान, इत्यादि द्वंदाचे ठिकाणी चित्ताची समता असणे हे सर्व गुण सहज बाणतात व आत्मसुखाची प्राप्ती होते.
हे सर्व श्रीगुरुच्या कृपेनेच साधले जाते, हे ‘लेवविसी’ या शब्दाने माऊलिंनी सुचविले आहे.)
7-12
सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी । समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥7॥
त्याला सतराव्या अमृतकलेचे स्तन्य पाजून अनाहताचे गाणे गातेस आणि ऐक्यज्ञानाच्या उपदेशाने त्याचे समाधान करून त्याला समाधी साधून देतेस व निजवितेस. (सतरावी-म्हणजे योगशास्रांतील अमृतकला. तिचे स्तन्य म्हणजे दूध. चंद्राच्या सोळा कला सांगितल्या आहेत. कृष्णपक्षात एक एक कला कमी होऊन अमावास्येला तो चंद्र दिसेनासा होतो व शुक्ल पक्षात एक एक कला वाढत जाऊन पौर्णिमेला 16 कलांनी पूर्ण होतो, असे आपणाला दिसते. पण हे सर्व पृथ्वीच्या उपाधीमुळे आहे. वास्तविक चंद्र हा अखंड सोळा कलांनी पूर्णच असतो. ही त्याची अखंड पूर्णता सतरावी कला म्हटली जाते.
त्याप्रमाणेच देहउपाधीने जीवाचे ठिकाणी भासणारे जन्ममृत्यू नाहीसे होऊन, तो जीव ज्या स्थितीत आपले मूळचे अविनाशित्वाचे सुख अनुभवितो, त्या स्थितीला सतरावी कला म्हणतात व त्या सुखभोगाला अमृतपान म्हणतात.)
8-12
म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं । या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥8॥
म्हणून हे सद्गुरु आई ! तू साधकाची सतत कृपादृष्टीने सांभाळ करणारी आई आहेस, तुझे चरण ज्या साधकाच्या ह्रदयात राहतील, त्याला सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त होतात. यास्तव मी तुझ्या कृपेची सावली सोडत नाही.
9-12
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी । तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥9॥
हे सद्गुरुचे कृपादृष्टि ! तुझ्या करुणेचा आश्रय होऊन, तो सृष्टी निर्माण करणार्या ब्रह्मदेवाप्रमाणे नाना विद्यांची सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव होतो.
10-12
म्हणौनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते । आज्ञापीं मातें । ग्रंथनिरूपणीं ॥10॥
म्हणून हे माते ! परमेश्वराप्रमाणे तू षड्गुणैश्वर्यसंपन्न असल्यामुळे श्रीमंत आहेस आणि म्हणूनच आपल्या भक्तजनांची कामना पूर्ण करणारा कल्पतरू आहेस. (आता) मला ग्रंथ निरूपण करण्याला आज्ञा कर.
11-12
नवरसीं भरवीं सागरु । करवीं उचित रत्नांचे आगरु । भावार्थाचे गिरिवरु । निफजवीं माये ॥11॥
माझे हे निरूपण नवरस सागरांनी भरून जाऊ दे – म्हणजे माझ्या निरूपणात नऊही रस अमर्याद भरलेले असू दे. वेदान्तमान्य अशा सिध्दान्तरूप रत्नांचे ते भंडारगृह कर व त्यातून गूढार्थाचे मोठे पर्वत निर्माण कर.
12-12
साहित्यसोनियाचिया खाणी । उघडवीं देशियेचिया क्षोणीं । विवेकवल्लीची लावणी । हों देई सैंघ ॥12॥
या माझ्या मराठी भाषेच्या भूमीत साहित्य – म्हणजे उपमा, अलंकार इत्यादि-सोन्याच्या खाणी जागोजागी निघू दे आणि सर्वत्र आत्मानात्मविवेकरूपी वेलींची लागवण होऊ दे.
13-12
संवादफळनिधानें । प्रमेयाचीं उद्यानें । लावीं म्हणे गहनें । निरंतर ॥13॥
(संवाद म्हणजे विरोधी वाक्यांची एकवाक्यता) या संवादरूपी फळाला आश्रयस्थान होणार्या सिध्दान्ताच्या मोठमोठ्या बागा सर्वकाळ लाव – म्हणजे पूर्वोत्तर निरूपणात विरोध राहील व सिध्दान्ताला बाधा येईल असे निरूपण होऊ देऊ नकोस
14-12
पाखांडाचे दरकुटे । मोडीं वाग्वाद अव्हांटे । कुतर्कांचीं दुष्टें । सावजें फेडीं ॥14॥
पाखांड- म्हणजे श्रृतिस्मृतिपुराणे यांना सोडून असणारे विचार, ह्याच कोणी दर्या आणि वितंडवादाच्या आडवाटा यांचा विध्वंस कर. कुतर्क- म्हणजे प्रमाणावर उभारले नसलेले तर्क-हेच कोणी हिंसक प्राणी, यांचा नायनाट कर- म्हणजे नास्तिक विचारांचा, वितंडवादाचा व कुतर्कांचा सहज नाश होईल असे माझे निरूपण होऊ दे!
15-12
श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें । राणिवे बैसवी श्रोते । श्रवणाचिये ॥15॥
सर्वत्र श्रीकृष्णाचे गुणवर्णन करण्यात मला उल्हास वाटेल, असे कर आणि श्रोतेजनांना एकाग्र श्रवणाच्या राज्यावर बसव – म्हणजे श्रोत्यांकडून अत्यंत एकाग्रतेने श्रवण होऊ दे.
16-12
ये मराठीयेचिया नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी । घेणें देणें सुखचिवरी । हो देई या जगा ॥16॥
या मराठीभाषेच्या नगरांत ब्रह्मविद्येचा सुकाळ कर आणि या जगातील सर्व लोकांच्या घेण्यादेण्याचा व्यवहार ब्रह्मसुखाचाच होऊ दे.
17-12
तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघुरविशील सदैवें । तरी आतांचि हें आघवें । निर्मीन माये ॥17॥
हे सद्गुरु जननी ! महद्भाग्यवान पुरुषांनाच प्राप्त होणार्या आपल्या कृपादृष्टीरूप प्रेमपदराने मला झाकशील, तर वर वर्णन केलेल्या गुणांनी युक्त असे संपूर्ण निरूपण आताच निर्माण करीन.
18-12
इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी । म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥18॥
श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी, अशी श्रीसद्गुरु निवृत्तिनाथांची प्रार्थना केल्याबरोबर, श्रीनिवृत्तिनाथांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व गीतार्थ सांगण्यास सुरुवात कर, फार बोलू नको, असे ते म्हणाले.
19-12
तेथ जी जी महाप्रसादु । म्हणौनि साविया जाहला आनन्दु । आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ॥19॥
श्रीनिवृत्तिनाथांचे वचन ऐकून श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, “अहोजी महाराज ! हे आपले म्हणणे म्हणजे महान प्रसादच आहे” असे म्हणून ते (श्रीज्ञानेश्वरमहाराज) फार आनंदित झाले आणि आता ग्रंथाचे निरूपण करितो, लक्ष द्यावे.” अशी त्यांनी प्रार्थना केली.
अर्जुन उवाच
। एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः॥12.1॥
अर्जुन म्हाणाला याप्रमाणे सतत (तुझ्या व्यक्त स्वरूपाचे ठिकाणी) युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात त्या दोन प्रकारच्या (योग्यांपैकी) उत्तम योगी कोणते॥12-1॥
20-12
तरी सकलवीराधिराजु । जो सोमवंशीं विजयध्वजु । तो बोलता जाहला आत्मजु । पंडुनृपाचा ॥20॥
नंतर संपूर्ण पराक्रमी वीरांमध्ये श्रेष्ठ व जो सोमवंशातील विजयरूपी ध्वजच होय, असा पांडुराजाचा पुत्र अर्जुन भगवंताला म्हणाला.
21-12
कृष्णातें म्हणे अवधारिलें । आपण विश्वरूप मज दाविलें । तें नवल म्हणौनि बिहालें । चित्त माझें ॥21॥
भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, ऐकले का देवा ! आपण मला जे विश्वरूप दाखविले, ते पूर्वी कधी न पाहिलेले असे अद्भूतच होते; म्हणून ते पाहिल्याबरोबर माझ्या चित्ताला भीती वाटली.
22-12
आणि इये कृष्णमूर्तीची सवे । यालागीं सोय धरिली जीवें । तंव नको म्हणोनि देवें । वारिलें मातें ॥22॥
आणि या तुमच्या श्रीकृष्णमूर्तीच्या सहवासाचा सतत अभ्यास व गोडी असल्यामुळे ती पाहण्याचाच मला ध्यास लागला; पण तसे करणे चांगले नव्हे, म्हणून मला परावृत्त केले.
23-12
तरी व्यक्त आणि अव्यक्त । हें तूंचि एक निभ्रांत । भक्ती पाविजे व्यक्त । अव्यक्त योगें ॥23॥
पण तुझे व्यक्त- म्हणजे एकदेशीय श्रीकृष्णस्वरूप व अव्यक्त विश्वरूप हे दोन्ही निःसंशय तूच एक आहेस. भक्तीने तुझे व्यक्तस्वरूप प्राप्त होते व योगाने तुझे अव्यक्त विश्वरूप प्राप्त होते.
24-12
या दोनी जी वाटा । तूंतें पावावया वैकुंठा । व्यक्ताव्यक्त दारवंठां । रिगिजे ये थ ॥24॥
हे वैकुंठनाथा ! तुझ्याशी ऐक्य पावण्याकरिता भक्तियोग व ज्ञानयोग असे दोन मार्ग असून तुझे एकदेशीय सगुण साकारास्वरूप व अव्यक्त विश्वरूप हे अनुक्रमे, त्या मार्गाचे दोन दारवंठे आहेत. त्या दारवंठ्यांनी तुझ्या ठिकाणी येता येते.
25-12
पैं जे वानी श्यातुका । तेचि वेगळिये वाला येका । म्हणौनि एकदेशिया व्यापका । सरिसा पाडू ॥25॥
पण एका शंभर नंबरी सोन्याच्या लगडीला जो कस असतो; तोच कस त्याच्यातून तोडलेल्या वालभर सोन्याचा असतो; म्हणून तुझे एकदेशीय, डोळ्यांनी दिसणारे व्यक्तस्वरूप आणि तुझे व्यापक विश्वरूप यांची सारखीच योग्यता आहे.
