अंजनीपुत्र हनुमान चरित्र भाग ८, (२९ ते ३३)

गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

राजा दशराथांना बरेच दिवसांपासून शांतानंतर पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून पायसचे पात्र घेऊन दिव्य पुरुष बाहेर आला.ते पायसपात्र दशरथांच्या हाती देऊन तिन्ही राण्यांना द्यायला सांगीतले. त्याप्रमाणे राण्यांना प्रसाद देत सुमित्राच्या………………………..

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! अंजनीपुत्र हनुमान !!!

!!!  हनुमान  !!!

                     भाग – २९.

            अचानक राजा सुबाहुने युध्द थांबवण्या ची आज्ञा कां दिली? हे कारण जाणण्यास दोन्ही पक्षाकडील सैनिकांची उत्सुकता बघून, राजा सांगू लागला…

          जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी एकदा अतिसंग ऋषीच्या आश्रमात गेलो तेव्हा त्यांनी रामाला शरण जाण्याचा व रामजप करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी राम हे इतर राजांप्रमाणेच सामान्य मानत होतो. त्यांच्या देवत्वाबद्दल शंका घेतल्याने ऋषींनी क्रोधाने शाप दिला की, मला जीवनाचे सत्य तर कधी उलगडणार नाहीच पण सारे आयुष्य फक्त उदरभरणासाठीच व्यतित होईल. शाप वाणीने उद्विग्न होऊन व मला झालेला प्रामाणिक पश्चाताप पाहून ऋषींने उःशाप देत म्हणाले, ज्या दिवशी तुझे सैनिक रामांचा अश्वमेध घोडा अडवतील व हनुमानाचा लत्ताप्रहार होईल त्या वेळी तुला जीवनाची सारी सत्य उलगडून ज्ञान

प्राप्ती होईलच त्याचबरोबर प्रभू रामांचे साक्षात दर्शन युध्दभूमीवर होईल.एवढं सांगून राजाने रामदूत हनुमानाचे चरणस्पर्श केले व राम सैन्याची क्षमा मागीतली.

           रामांच्या अश्वमेधचा घोडा व सैन्य गाव शहरं,पर्वत,नद्या पार करत युध्द जिंकत जात असतांना अचानक घोडा गारठला. हनुमानाने घोड्याला चलवण्याचा बराच केला पण तो प्रतिसाद देईना. रामांचा अभिषेक झाल्यानंतर बर्‍याच काळाने अश्वमेध यज्ञ आयोजित केला होता. यज्ञ सुरु होण्यापूर्वी संपूर्ण पृथ्वीवर आपलं अधिराज्य आहे हे अश्वमेध यज्ञ करणार्‍या राजाला सिध्द करायचे असते. त्या नुसार या कामी या घोड्याची निवड करण्यात आली होती. हा अश्व जवळ जवळ अर्धी पृथ्वी फिरुन हनुमान, शत्रृघ्न, पुष्कल, सारखे पराक्रमी योध्दे विजयाच्या अंतिम टप्यात आले असतांना मधेच ही अडचण निर्माण झाली. सर्व प्रयत्न व हनुमानाची शक्तीही त्या दिवशी कुचकामी ठरली होती.

            विचारांती शौनकमुनींचा सल्ला घ्यायसाठी त्यांच्याकडे गेले. मुनींनी ध्यान लावले. थोड्या वेळाने समाधीवस्थेत मुनी बोलू लागले. अनेक वर्षापूर्वी एका ब्राम्हणाने मुनींना त्रास दिल्यामुळे त्यांच्या शापाने तो ब्रम्ह राक्षस झाला. शापाचे गांभीर्य लक्षात आल्यावर कळकळीची विनवनी करुन उःशाप मागीतला.

उःशाप देत मुनी म्हणाले, जेव्हा तुला रामकथा ऐकायला मिळेल तेव्हाच मुक्ती मिळेल. व रामा चा अश्वमेध घोडा त्याच्या आयुष्यात येईल. हनुमानासह सगळे घोड्याजवळ येऊन थांबले. तिथल्याच एका खडकावर हनुमान पद्मासन घालून बसले व अतिशय गोड आवाजात रामायण गाऊ लागले. रामकथा संपली आणि घोडा मोकळा झाला.अचानक वटवृक्ष झाडाची फांदी तुटून खाली पडली.त्यातून ब्रम्हराक्षस बाहेर आला. पवित्र पध्दतीने एका अपवित्रतेचा अंत झाला.

             एकदा काशीच्या राजाला नारदाने सांगीतले, रामदरबारात जाऊन कोणाकडेही न बघतां फक्त प्रभू रामांनाच वंदन करावे. तिथे शिघ्रकोपी विश्वामित्र होते.त्यांच्याही कडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी संतापून आपली नाराजी रामा कडे व्यक्त केली.त्यांना आश्वास्त करत म्हणाले आज संध्याकाळ पर्यत त्याचा शिरच्छेद केल्या जाईल.रामांनी आपल्या भात्यातून तीन बाण सुध्दा निवडले. राजा नारदाकडे जाऊन गयावया करत म्हणाला आतां मला रामाच्या क्रोधापासून  वाचवणे फक्त तुमच्या हाती आहे.

            अशा परिणामाची कल्पना नारदांना आधीच होती. राजाला म्हणाले,तू फक्त माझ्या सुचनांचे पालन करत रहा.संध्याकाळपर्यत तुझ्यामुळे जगासमोर विशेष कांंही तरी घडेल. आतां तडक हनुमानाची माता अंजनाकडे जा तीच तुला वाचवू शकेल.

            काशीराजा वेगाने जाऊन अंजनाच्या महाली जाऊन तिचे पाय धरुन आर्ततेने विनवू लागला. तिने आपल्या कर्तबगार पराक्रमी पुत्र हनुमानाला बोलावून राजाचे रक्षण करण्याचा आदेश दिला. राजासह हनुमान शरयूनदी वर गेले व राजाला गळ्यापर्यंत पाण्यात उतरवून रामसीताचा जप करण्यास सांगीतला. कांही वेळाने एक बाण आला.मृत्युभयाने राजाने आणखी जोराने रामजप सुरु केला.हनुमान राजाच्या शेजारीच उभे होते. अतिवेगाने बाण जसा राज्याच्या गळ्याकडे आला ,हनुमानाने तंतोतंत वेळ जुळवून आपलं तोंड राजाच्या गळ्याजवळ नेऊन राऽम उच्चारत उघडलं. आणि ज्याक्षणी बाण राजापर्यंत पोहचला तेव्हा रामनानाच्या लहरी बाणापर्यंत पोहचल्या.बाणा ने दिशा बदलून खाली पडला. दुसर्‍या बाणाच्या वेळीही असेच घडले. तिसरा बाण हनुमानाने आदराने स्विकारायचे ठरवले. रामनाम जप करणार्‍या राजा समोर हनुमान उभे राहिले. तिसरा बाण थेट त्यांच्या छातीवर आदळला त्याच क्षणी बाणाचे रुपांतर कमळाच्या सुंदर हारामधे झाले. हार हनुमानाच्या छातीवर खुलून  दिसू लागला.

           रामांना आपले बाण कोणत्या तरी शक्तीने निष्र्पभ होत आहेसे कळल्यावर त्यांनी लक्ष्मणाला शोध घेण्यास सांगीतले.

                  क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                  दि. २८-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                   भाग – ३०.

            लक्ष्मणाने शोध घेतल्यावर यामागे हनुमान असल्याचे रामांना सांगीतल्यावर तात्काळ हनुमानाला पाचारण करण्यात आले.  रामाचा बाण इच्छित ठीकाणी पोहचू न देणे हा अपराध सामान्य नव्हता. आपल्या नेहमीच्या नम्र आणि लीन स्वभावाने हनुमान सभागृहात दाखल झाले.  संंतापून राम गरजले,राजाला दिलेल्या शिक्षेत ढवळाढवळ करण्याची तुझी हिंमत झालीच कशी? नम्रपणे हनुमान उत्तरले , मी आपल्याच सूचनांचे पालन करीत होतो. राम नाम जप करणार्‍या प्रत्येकाचे रक्षण करण्यास आपणच सांगीतले होते. जेव्हा आपले बाण काशीराजाकडे येत होते त्यावेळी तो अतिशय व्यग्रतेने रामनाम जपत होता.त्यावेळी  जर त्याचे रक्षण केलं नसते तर आपले पवित्र नाम जप निष्र्पभ ठरला असतां. आपल्या नामाचं बळ जपणं बाणापेक्षा जास्त महत्वाचे वाटले. तरी माझे चुकले असे वाटत असेल तर,आपण द्याल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे. राम प्रसन्न झाले पण ते विश्वामित्रासमोर व्यक्त करुं शकत नव्हते. तेवढ्यात नारदमुनी काशीराजा सह प्रवेशून, राजाला विश्वामित्रांना शरण जाण्यास  सुचवले. विश्वामित्रांनी राजाला क्षमा केली व रामांना शिक्षा रद्द करण्याची सूचना केली.रामांनी भला मोठा सुटकेचा निःश्वास टाकला.

             एका पर्वतावर बसून आपल्या तरुण पणातील हजारो वर्षाच्या गत आयुष्यातील घटना आठवत हनुमान बसले होते. तेवढ्यात शनिदेव त्यांना म्हणाले, हे वृध्द माकडा, तुझा काळ संपला. आतां माझी सत्ता आहे. त्यांना शनिदेवाच्या बोलण्यात अजिबात रस नव्हता. त्यांना या वयात आध्यात्मिक साधनेवर लक्ष केंद्रीत करायचे होते. तरुणपणी त्यांनी अशा उद्दाम लोकांना धडा शिकवला होता. अरेऽऽ मुर्ख वानरा, एकदा तू मला रावणापासून वाचवले होते त्यावेळी मी तुझे आभारही मानले होते.पण ती घटना आतां इतिहास जमा झाली. तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे हे जगाला दाखवून द्यायचे आहे.चल, उठ माझ्याशी सामना कर, पळपुट्यासारखा माघार नको घेऊस असे म्हणून हनुमानांच्या खांद्यावर ठोसा मारला व हिसका देऊन त्यांना ओढण्याचा प्रयत्न करु लागला.पण झाले उलटेच. शनिदेवांच्या पायांना हनुमानाने शेपटीचा विळखा बसून त्यांची दोन्ही पावले एकत्र आली. व विळखा शनिच्या छाती पर्यत आल्याने शनी तसूभरही हलू न शकल्याने पूर्ण हतबल झाले. हनुमानांनी आकाशात झेप घेत समुद्राच्य दिशेने उड्डान भरुन प्रचंड हेलपाटे बसवू लागल्याने शनि घाबरले. नंतर त्यांना समुद्रात बुचकाळवले.डोकं समुद्रातील पाषाणा वर आदळलं.हा पाषाण रामसेतूचा आहे हे लक्षात आल्यावर परत तरंगणार्‍या दगडावर आपटत होते.तो क्लेशदायक मार शनिला असह्य होऊन डोक गरगरायला लागले. आपल्या अंताची वाट बघत असतांनाच शेपटीची पकड सैल केल्याबरोबर शनि खाली पडले. दोघेही पूर्वस्थळ पर्वतावर आले.

             शनीने एवढ्या यातना भोगल्या तरी गर्व कमी झाला नव्हता.शनी म्हणाले, कृषाणावतारा नंतर कलीयुग सुरु झाला. या युगात सर्वात जास्त माझा प्रभाव असणार, तूं  शक्तीने बलवान असलास तरी मी लोकांच्या मनावर प्रभाव पाडतो. म्हणून तू ही पृथ्वी सोडून जा. या पृथ्वीवरच्या प्रत्येक मानवावर, दर साडेबावीस वर्षानंतर साडेसात वर्ष प्रभाव टाकण्याची अनुमती मिळाली आहे.त्यांच्या उद्दामपणाची हनुमानाला चिड आली.तूं कसा प्रभाव पाडणार शनीदेवा?

              शनी म्हणाले, मी साडेसात वर्षाचे तीन भाग केलेत. पहिली अडीच वर्षे डोक्यावर

राज्य करणे,दुसर्‍या वेळी गैरसमज करणे, कोणत्याही घटनेबाबत चुकीचे अंदाज बांधणे, मनाचा तोल बिघडला की, त्याच्या पचनसंस्थे वर परिणाम होऊन विविध आजारांना निमंत्रण देतो. आणि शेवटच्या अडीच वर्षात त्याच्या पायाशी राहिल्याने त्याची सर्व संपती लयाला जाते असं म्हणून शनी हनुमानाच्या डोक्यात शिरला. त्याबरोबर त्यांचे प्रचंड डोके दुखु लागले.शांतपणे उठून हनुमान एका पहाडा जवळ जाऊन तो डोक्यावर ठेवला.शनीला पाठीवर प्रचंड भार जाणवले. शनी हनुमानाच्या डोक्यातून ओरडू लागला.हनुमानाने एक एक करत चार पर्वत एकावर एक डोक्यावर ठेवले. हनुमानाने या वजनाचे कांही वाटत नव्हते पण शनीला असह्य झाले.हनुमान आणखी एका पर्वताकडे जातांना बघून शनी ओरडत म्हणाला,  मी तुझ्या शरीरात फक्त अडीच दिवसच राहिन पण त्यांना अटी मान्य नव्हत्या.पांचवा पर्वत उचलला तसा शनी जीवाच्या आकांताने ओरडून दयेची भीक मागत म्हणाले,मी परत तुला कधीही त्रास देणार नाही.तुझं नांव घेणार्‍याला छळणार नाही.शनीचा गर्व पार हरण झाल्याचे बघून त्यांनी डोक्यावरचे पर्वत खाली टाकले.शनी कसेबसे बाहेर आले. त्यांची पाठ अतिशय दुखत असल्याने, दुखणे कमी करण्यासाठी दर्दनिवारक एखाद्या तेलाची मागणी केल्यावर हनुमान म्हणाले, मी तर सन्यासी! माझ्याकडे कुठले तेल? तूं ज्यांना छळतोस त्यांना तेल माग. त्या दिवसापासून शनीच्या अंगावर तेल ओतण्याची प्रथा पडली. शनीनेही आपला शब्द पाळला.

                  क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                   दि. २८-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                    भाग – ३१.

            महाकाय कलंक राक्षसाने मथुरेवर हल्ला केला. लोकांमधे घबराट पसरली.सेनेला सज्ज राहण्याच्या आज्ञा सुटल्या. श्रीकृष्ण व बलराम मथुरेबाहेर असल्यामुळे संरक्षणाची जबाबदारी कृष्णपुत्रांवर आली. तरुण राज पुत्रांच्या नेतृत्वाखाली यादव किल्ल्याचे महाद्वार उघडून बाहेर पडले.प्रचंड बलवान उंच कलंकराक्षस सैनिक,रथ,हत्ती चिरडून टाकत होता. यादव सेनाप्रमुख हतबल झाले. कृष्णपुत्र प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते.पण फरक पडत नव्हता. कृष्णाच्या एका पुत्राने कपिंडास्र किंवा मर्कट क्षेपणास्र सोडल्याबरोबर एका महाकाय वानराच्या रुपात हनुमान प्रकट होऊन कलंकाएवढा उंच होऊन कलंकाच्या कमरेला विळखा घालून त्याच्या मुखावर जबरदस्त मुष्ठीप्रहार केला. कलंक बेशुध्दावास्थेत असतांनाच त्याच्या अंगा वर पर्वत फेकला.आणि पर्वताखाली दबून त्याचा अंत झाला.

             द्रौपदीचे बलाढ्य पांच पती असूनही संधी साधून जयद्रथने तिचे हरण केले.अर्जुन, भीमाने तिची सुटका केली परंतु अर्जुनचे मन उद्विग्न झाले. त्याच मनःस्थितीत तो नदीकडे मन शांत करण्यासाठी गेला असतां तिथे मार्कडेंय ऋषी भेटले. त्याची कहाणी ऐकून त्याचे दुःख हलके करण्याचे दृष्टीने रामायणाची गोष्ट सांगीतली. सीतेचे अपहरण झाल्यावर रामही अशाच विचित्र मनःस्थितीतून गेले होते.

वानरसेनेच्या मदतीने रामांनी समुद्रावर सेतू व रावणाशी लढा देऊन सीतेची सुटका केली होती. जवळच हनुमान रामनामाचा जप करीत होते. त्यांना अर्जुनाची घालमेल होत असलेली बघून म्हातार्‍या वानराचे सोंग घेऊन अर्जुना जवळ आले. अर्जुन रामाबद्दलच विचार करीत होता. श्रीराम निष्णात धनुर्धर असतांना वानरांची मदत घेण्यापेक्षा त्यांनी स्वतः सेतू कां बांधला नाही? त्यांना तर कांही मिनिटातच शक्य होते. त्याच्या मनातील विचार हनुमानांना सहन न होऊन म्हणाले, तूं सुध्दा महान योध्दा आहेस. तूं सेतू बांध, पण सेतूने माझे वजन पेलले नाही तर मग काय? तर मी अग्निप्रवेश करेन.

           अर्जुनाने मंत्रजप करुन हजारो बाणांच्या फळ्या तयार करुन दणकट सेतू तयार केला व व त्या वृध्द वानराकडे दृष्टीक्षेप टाकला.वानर सेतूजवळ येऊन नुसत्या शेपटीने संपूर्ण सेतू उध्वस्त केला. वानराने परत एक संधी दिली. दुसरा सेतू आणखी मजबूत बांधला तो सेतू देखील म्हातार्‍या वानराने उध्वस्त केला. अर्जुनाला स्वतःचाच राग आला.असे अपमानी जीवन जगण्यापेक्षा जीवन संपवावे असे ठरवून मोठी चित्ता रचून पेटवली.

           आता अर्जुन अग्नी प्रवेश करणार एवढ्यात तिथे तेजस्वी ब्राम्हण प्रगट होऊन म्हणाला, तुम्ही दोघांनी कुणी साक्षीदार ठेवला होता कां? कोणतेही आव्हान साक्षीदाराशिवाय पूर्ण होत नसते. त्याच्या साक्षीने अर्जुनाला परत सेतू बांधायला सांगीतला.अर्जुनाने श्रीकृष्णाचा धावा करुन गांडीव धनुष्यातून बाणांचा वर्षाव करत मजबूत सेतू बांधला.त्या ब्राम्हणाने वानराला सेतू तोडण्याचे आव्हान केले, हनुमाना ने पूर्णशक्तीनिशी खूप प्रयत्न केला पण सेतू तसूभरही हलला नाही. हनुमान मुळ रुपात येऊन सेतूवरुन खाली उतरले व अर्जुनाजवळ आले. दोघांच्याही लक्षात आले साक्षीदार ब्राम्हण अदृष्य झाले. खूप शोध घेतलेला तो ब्राम्हण रक्ताळलेल्या खांद्याने पाण्यातून वर येतांना दिसला. तो ब्राम्हण म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण होते. दोघेही धावत जाऊन त्याच्या चरणावर पडून क्षमा याचना करुं लागले.

           यापुढे कुणाच्याही शक्तीबद्दल शंका घेऊन नावं ठेवणार नाही व प्रभूच्या कोणत्याही भक्तावर अविश्वास करुन परीक्षा घेणार नाही. दोघांनीही शपथा घेतल्या. श्रीकृष्णाच्या आज्ञे नुसार महाभारतीय युध्दात अर्जुनाच्या ध्वजावर राहून मदत करण्याचे स्विकारले.

              द्रौपदी नदीकाठी बसली असतां, एक हजार पाकळ्यांचं सुंदर कमळपुष्प वाहत येतांना पाहून तिने ते हाती घेतले.त्याचा सुगंध दूरवर पसरला होता. तेवढ्यात तिथे आलेल्या भीमाला बघून म्हणाली, या नदीत असलेली अशीच कमळपुष्पे आणून द्या ना! द्रौपदीने पहिल्यांदा आपल्याला कांही मागितले म्हणून आनंदित होऊन भीम नदी काठाने जाऊ लागला. आनंदविभोर होऊन शंखनाद करत भीम जात असतांना त्याच्याही पेक्षा मोठा शंख नाद ऐकून भीम आवाजाच्या दिशेने गेला तर त्याला थकलेल्या अवस्थेत एक म्हातारा वानर शेपटी पसरवून पहूडलेला बघूने भीमाने त्याला शेपटी बाजूला करायला सांगीतल्यावर तो वृध्द वानर म्हणाला मी खूप म्हातारा व दमलोय, थोडेही हलण्याचे त्राण माझ्यात नाही, तूंच ती शेपटी बाजूला कर. भीमाने शेपटी बाजूला करायला लागला पण शेपटी तसूभरही हलली नाही.सर्व शक्ती पणाला लावली पण व्यर्थ!दहा दहा हत्तीचे बळ असलेल्या आपण एका वृध्द वानराची शेपटी हलवू शकत नाही. हे वानर साधे नाही हे लक्ष आल्यावर, भीमाने हात जोडून विनम्रपणे, आपले खरे स्वरुप दाखवण्याची विनंती केल्यावर हनुमान आपल्या तेजस्वी रुपात भीमासमोर उभे राहिले. भीमाला  आनंदाश्रू आवरेनासे झाले. हनुमानाने त्याला अलिंगन दिले. आणि  सोंगधिका (कमळपुष्प)  मिळण्याचा पत्ता सांगीतले. ती कमळफुले घेऊन भीम द्रौपदीकडे आला.

टीप ः-( ही घटनि घडली ते ठीकाण “हनुमान चट्टी” म्हणून ओळखल्या जाते.ते ठीकाण बद्रीनाथ जवळ आहे म्हणतात.)

                     क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                    २८-७-२०२२

!!!  हनुमान  !!!

                    भाग – ३२.

            कुब्जाच्या ब्राम्हणाकडे  ४,४०० खेडी ताब्यात होती. ही खेडी  त्यांच्या पूर्वजांना श्रीरामांनी उपहारात दिली होती आणि साक्षीदार प्रत्यक्ष हनुमान होते. परंतु राजा कुमारपाल सुशिक्षित असल्यामुळे, अश्या अफवांवर विश्वास नसल्यामुळे, आज श्रीराम, हनुमान कुठे आहेत? मला जोवर त्यांना प्रत्यक्ष पाहत नाही तोवर त्यांच्या अस्तित्वार मला विश्वास नाही.हनुमानाला माझ्यासमोर साक्ष द्यायला हजर करा.अन्यथा तुमच्या जमीनी जप्त करुन आयुष्यभर भीक मागावी लागेल.

एका रात्रीत आपल्या मिळकतीवर गडांतर आल्यामुळे त्यांना पुरावा आणल्याशिवाय पर्यायच नव्हता.

               तीन हजार ब्राम्हण श्रीराम आणि हनुमानाच्या शोधार्थ दक्षिणेकडे निघाले.घनदाट जंगल, कडेकपारी, नद्या पार करत, दिवसांतून फक्त एकदाच कंदमुळे खात नामस्मरण करत पुढे जात होते. एक दिवस असा आला की, खाण्याला कांहीच नव्हते. थकलेले ब्राम्हण एक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हते. सगळ्यांनी अगतिकतेने प्रभु रामांचा सुरु केला. तेवढ्यात एक साधू त्यांचेजवळ येऊन प्रवासाचे कारण विचारल्यावर त्यांना आपली व्यथा सांगून म्हणाले, आम्ही सर्व ब्राम्हण प्रभू राम व हनुमानांना भेटायला रामेश्वराकडे निघाले.ऐकून त्यांना जाण्यास खूप विरोध केला. तरीही ब्राम्हण आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर जीवानाच्या अंतापर्यत शोध घेत पुढे जातच राहिले.

            दुसर्‍या दिवशी आणखी एक विचित्र साधू भेटून म्हणाला, मी देशभर भ्रमण करीत आहे पण मला कधी हनुमान किंवा श्रीराम भेटले नाही की, दर्शन झाले नाही. या सार्‍या दंतकथा असतात, त्यामुळे आणखी हाल सोसत पुढे जाऊ नका असे साधुन म्हटल्यावर एका ब्राम्हणाला संशय आला. तो ब्राम्हण त्या साधूला म्हणाला, कालपासून तू सारखा आम्हाला पुढे जाण्यास विरोध करतोस. तूं नक्कीच हनुमान असावा असे वाटते.

           हसून तो साधू आपल्या हनुमानाच्या मूळ रुपात आला. तीन हजार ब्राम्हण त्या पवन पुत्रा समोर नतमस्तक झाले. त्यातील एका उत्साही ब्राम्हण म्हणाला, हे भगवान हनुमाना! आमच्यावर तूं प्रसन्न झाला असशील तर, तुझं रामायण युध्दातील विराटरुप दाखव ना! त्या ब्राम्हणांच्या भाबड्या साधेपणावर प्रसन्न होऊन त्यांना आपलं विराट रुप दाखवल्यावर सर्व ब्राम्हणांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. नंतर हनुमान गुडघ्यावर बसून आपला हात त्यांच्या पुढे पसरला.त्यावर हजारो रसरशीत फळं होती. हनुमान म्हणाले, ही फळं खाल्ल्याने तुमची भूक तर भागेलच पण आनंदही प्राप्त होईल.सर्वांनी एक एक फळ उचलून खाल्ल्या वर त्यांना पोटभर जेवण्याचे समाधान वाटले. हनुमान आपल्या मुळ रुपात येऊन उभे राहिले. अचानक त्यांनी उजवा हात उंचावून एका बटव्यात वस्तू ठेवली. तीच क्रीया डाव्या हाताने केली. दोन्ही बटवे ब्राम्हणांच्या स्वाधीन करत म्हणाले, तुम्ही तुमच्या कुब्जा गावी परत जाऊन राजाला आपली मिळकत परत मागा. राजाने द्यायला नकार दिला तर डाव्या बटव्याचा उपयोग करा. नंतर राजाला पश्चाताप होऊन क्षमायाचना करेल तेव्हा उजव्या बटव्याचा प्रयोग करायचा.त्यांनी जर हनुमानांच्या सुचनेचे तंतोतंत पालन केले तर, त्यांच्या जमीनी परत मिळतील. सर्वजण आनंदातिशयाने नाचू लागले भक्तांचा आनंद बघून हनुमानही आनंदी झाले.

                 हनुमानांनी एक पहाड फोडून सपाट केला व त्यावर त्या तीन हजार ब्राम्हणांना विश्रांती करायला सांगून अदृष्य झाले. ते सर्व झोपेत असतांनाच तो सपाट पहाड उचलल्या जाऊन कुब्जा नगरात पोहचला.जे अंतर कापायला त्यंना कित्येक महिने लागले असते ते अंतर त्या सपाट पहाडाने कांही क्षणात पार केले. जेव्हा ब्राम्हण जागे झाले तेव्हा ते आपल्या कुब्जागावात पोहचल्याचे आणि गावकरी आश्चर्यांने पाहत असलेले दिसले. त्यांचा त्रास वाचवल्याबद्दल त्यांनी हनुमानाची कृतज्ञापूर्वक प्रार्थना केली.

          सगळे ब्राम्हण तडक राजवाड्यात राजा समोर उभे राहिले. आणि हनुमान भेटीचा प्रसंग कथन करुन म्हणाले, देवांचा रोष ओढवून घ्यायचा नसेल तर आमच्या जमीनी परत कराव्यात अशी विनंती राजाला केली. पण राजाचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. हट्टी राजा ऐकत नाहीसे पाहून डाव्या बटव्यातील वस्तू काढून विखुरली व सर्व ब्राम्हण बाहेर पडल्याबरोबर संपूर्ण राजवाड्यात आगीचे लोळ  पसरु लागलेले पाहून, पश्चातापदग्ध राजा बाहेर येऊन त्या ब्राम्हणांच्या पायी लोटांगण घेऊन क्षमा मागू लागले. दयाळू ब्राम्हणांनी उजव्या बटव्यातील वस्तु काढून बाहेर विखुरल्या बरोबर आग शमली व राजवाडा पूर्ववत दिमाखात उभा होता

               दरबार भरवून राजाने ब्राम्हणांच्या जमीनी परत देऊन कायमस्वरुपी त्यांच्याच राहतील असा आदेश जारी केला.उंचावर बसलेल्या हनुमानाला आपल्या भक्तांचा आनंद बघून समाधान वाटले.

                     क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                  दि. २९-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                 अंतिम भाग-३३.

            मुगल बादशहाला कळले की, हिंदु, मुसलमान लोकं एका साधूचे दर्शन घ्यायला गर्दी करत आहे तर बादशहाचीही उत्सुकता निर्माण झाली ती आशिर्वादासाठी नाही तर साधु करत असलेली जादू पाहण्याची! थोड्याच वेळात साधुला दरबारात आणल्या गेले.साधुचा रामनामजप बादशहासमोरही सुरुच होता. साधु दरबारात आणताच सार्‍या दरबारींनी भक्तीने हात जोडले. साधुचा आदर सत्कार न करतां बादशहा म्हणाला, तुझी कर्तबगारी करुन दाखव. किती तथ्य आहे ते कळेल. नम्रपणे साधू म्हणाला, मी जादूगार किंवा जादुई शक्ती नाही. मी फक्त श्रीरामांंच्या नामस्मरणाने लोकांची मलिन ह्रदये स्वच्छ करतो.अशा शक्ती देवाचं देणं असते. त्या शक्ती देवाजवळ जाण्या साठी व मानवतेची सेवा करण्यासाठी वापरल्या जाते. प्रसिध्दी किंवा नांव कमावण्यासाठी नाही

                एका बलशाली,शक्तीशाली बादशहाची कोणी अवज्ञा कशी करुं शकतो? उचला या भोंदु साधुला व टाका बंदीशाळेत. फटके खाल्ले की याची मती ठीकाणावर येईल.  राजेज्ञेने सुरक्षारक्षकांनी साधूला ताब्यात घेतले. साधुने कांहीही प्रतिकार केला नाही.फक्त डोळे मिटून नामजप सुरु केला.प्रथम हळूहळू नंतर उच्च स्वरात प्रार्थना गाऊ लागला.दरबारातील सारे विस्मित झाले.जसा आवाज चढला तसे दरबाराच्या दालनाच्या काचा, फुलदाण्या फुटु लागल्या.राजवाड्यातून किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. थोड्याच वेळात शेकडो वानरांच्या झुंडी दरबारात येऊन जे हाती सांपडेल त्याची नासधूस करुं लागले.दरबारात नुसतां गोंधळ माजला. वानरांनी दरबारात घाण केली.प्रत्येक वस्तुंची नासधूस केली.

                 होत असलेला विध्वंश पाहून कसे तोंड द्यावे समजत नव्हते.सिंहासनावर  थरथर कापत स्वतःला वाचवत उभा होता. या सर्व गदारोळात तो साधु  शांतपणे जोरजोराने नामजप करत डोळे बंद करुन उभा होता.अखेर बादशहाने त्याच्या जवळ जाऊन,पाय धरुन वानरांचे थैमान थांबवण्याची विनंती केल्यावर साधुने डोळे उघडून मंत्रजप थांबवल्या बरोबर सगळी वानरं शांतपणे निघून गेली. साधु रुपातील हनुमानाने बादशहाचे पूर्ण ह्रदय परिवर्तन केले होते.

              हनुमान चिरंजीवी असल्यामुळे त्यांना अंत नाही, समाप्ती नाही.

          आतां आपण हनुमानांची प्रसिध्द मंदिरांची माहिती घेऊ….. याकु मंदिर उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला मधे  प्रसिध्द हनुमान मंदिर आहे. राजस्थान राज्यातील चुरु जिल्ह्यात सालसार या खेड्यात “सालसार बालाजी” हनुमान मंदिर प्रसिध्द आहे इथला हनुमान जागृत असून त्याला दाढीमिश्या आहेत.मध्यप्रदेशातील चित्रकुटच्या डोंगर माथ्यावर गुहेत असून एकाच पाषाणापासून मूर्ती बनवलेली आहे.हे त्याच विश्रांतीस्थान म्हणून ओळखल्या जाते.महाराष्र्टातल्या औरंगाबाद जिल्ह्यात खुल्ताबाद या छोट्या शहरात “भद्र मारुती” मंदिर असून इथे हनुमान निद्रिस्त स्थितीत दिसतात.असच दुसरं मंदिर प्रयागराजला आहे.

           भगवान जगन्नाथांच्या मंदिरापर्यत समुद्र लाटांच्या गाजचा आवाज होत असल्याने त्यांनी आपला भक्त हनुमानाला दक्षिणेकडे पहारा देण्यास सांगीतले.कानपत म्हणजे कानांना व्यस्त ठेवणे म्हणून इथल्या हनुमानाला “कानपत” हनुमान म्हणून ओळखल्या जाते. जगन्नाथपुरीत वर्गी हनुमानाचं प्रसिध्द मंदिर आहे. पुरीतच जगन्नाथ मंदिराच्या पूर्वेकडे समुद्राने मंदिरात शिरु नये म्हणून हनुमानांना पहार्‍यावर ठेवले पण ते सतत फिरतीवर राहात होते म्हणून नाराज होऊन श्रीविष्णूंनी त्यांना साखळदंडाने बांधून ठेवले.आजही ते खांबाला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत मंदिराची सुरक्षा करतांना दिसतात. याच मंदिराच्या उत्तर द्वाराच्या सुरक्षेसाठी चार हातांमधे सुदर्शनचक्र धारण केलेले आठ हात असलेली मूर्ती चार फुट उंच पूर्वाभिमुख आहे. हे मंदिर “चारीचक्र आणि अष्टभूजा हनुमान” म्हणून प्रसिध्द आहे.आंध्र प्रदेशात कडप्पा जिल्ह्यात “चक्रयपेट गंडी अंजनेय” मंदिर आहे.आंध्रप्रदेशच्या कर्नुल जिल्ह्यामधे असलेल्या अडोणी गावी “रणमंडल अंजनेय स्वामी” हनुमान मंदिर प्रसिध्द आहे. याच जिल्ह्रात मंत्रालयम् या सुप्रसिध्द तीर्थक्षेत्रा वरील डोंगराच्या पायथ्याशी “मंगरयरु गुडी” हनुमान मंदिर आहे.याच जिल्ह्यात तुंगभद्रेच्या दक्षिण तीरावर मंचला जे आतां मंत्रालय म्हणून ओळखल्या जाते तिथे “पंचमुखी अंजनेय” किंवा ” पंचमुख अंजनेय” म्हणून प्रसिध्द हनुमान मंदिर आहे.कर्नाटकातल्या होस्पेट जिल्ह्यात हनुमानाचे जन्मस्थान आहे.त्या परिसरात असलेल्या अनेक डोंगरांपैकी एक अंजनाद्री पर्वत आहे तिथे हनुमानाचा जन्म झाला.अंजनाद्री पर्वताजवळ माल्यवान टेकडी वर राम हनुमानाची प्रथम भेट झाली होती त्या स्मरणार्थ कोदंड राममंदिर आहे.त्या मंदिराच्या मागे “यंत्रोध्दारक” हनुमान मंदिर प्रसिध्द आहे. तामिळनाडूमधे नम्मकळ जिल्ह्यात “नमकुल” हनुमानाचे अठरा फुट उंच मूर्ती प्रसिध्द आहे.

         ,बुध्दी,शौर्य,पराक्रम,बलिदान, रामांचा एकनिष्ठ सेवक,भक्त असलेल्या हनुमानाला कोटी कोटी दंडवत!

              आशा आहे आपणास ही माहिती आवडेल.

                 धन्यवाद!
                        !! समाप्त  !!
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                   दि.२९-७-२०२२.

                             

 

अंजनीपुत्र हनुमान चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading