अंजनीपुत्र हनुमान चरित्र भाग ७, (२५ ते २८)

गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

राजा दशराथांना बरेच दिवसांपासून शांतानंतर पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून पायसचे पात्र घेऊन दिव्य पुरुष बाहेर आला.ते पायसपात्र दशरथांच्या हाती देऊन तिन्ही राण्यांना द्यायला सांगीतले. त्याप्रमाणे राण्यांना प्रसाद देत सुमित्राच्या………………………..

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! अंजनीपुत्र हनुमान !!!

!!!  हनुमान  !!!

                  भाग – २५.

          श्रीराम रावणाचा एक एक भाग तोडून वेगवेगळ्या दिशेने फेकत होते. पण परत अवयव जुळत होते. वैतागून बिभीषणाला उपाय विचारल्यावर तो म्हणाला, आम्हा तिघा भावांनाच माहित असलेला एक उपाय आहे. अनेक वर्षे तपश्चर्या करुन रावणाने हा वर मिळवला होता.परंतु त्याचबरोबर शापही मिळाला होता. ब्रम्हदेवांनी एक ब्रम्हबाण तयार केला होता. तो बाण त्याच्या नाभीत मारला तरच त्याला मृत्यु येऊ शकतो.अन्यथा कोणत्या ही अस्रशस्राने मरु शकत नाही.जवळजवळ तो अमर आहे.तो बाण अशा ठीकाणी लपवला आहे की, तिथे वार्‍यालाही शिरकाव नाही.रामां ची द्विधावस्था बघून हनुमान म्हणाले, स्वामी मला संधी द्या. मी तो बाण शोधून आपल्या चरणी अर्पन करतो.

           बिभीषण म्हणाला, त्या बाणाची माहिती फक्त रावणपत्नी मंदोदरीच जाणते. मंदोदरी महल अत्यंत सुरक्षावस्थेत आहे. जय श्रीराम म्हणून हनुमान मोहिमेवर निघाले. लंकेच्या निर्मनुष्य ठीकाणी जाऊन, एका वयस्कर ज्योतीषाचे रुप घेतले. गदेचे रुपांतर पंचागात केले. काखेत पंचाग व हाती काठी घेऊन पांढरा शुभ्र डगला घालून शहरातून रावणाचा जयजयकार करत फिरुं लागले. लंके ची जनता आधीच भयभीत झालेली, जो तो आपापली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे येऊ लागला. रस्त्याच्या कडेला एका कोपर्‍यात बसून अचुक भविष्य सांगत असल्यामुळे जनतेला दिलासा मिळत होता.

            असं करत करत ते मुख्य महालाच्या  दिशेने चालू लागले,मंदोदरीच्याही कानावर या अद्भुत ज्योतिष्याची वार्ता पोहचली.तो रावण भक्त असल्याचे माहित झाल्याने उत्सुकतेने त्यांना पाचारण केले. त्यांना दिलेलं उच्चासन नाकारुन साध्या दर्भासनावर बसल्यामुळे मंदोदरीची खात्री पटली हा ज्योतिष्य खरं,सत्य भाकीत सांगेल.हनुमान पंचागात बघत चिंतेचा भाव डोळ्यात आणत म्हणाले, श्रीमान रावण आजच ठार होतील,पण तुझ्या महालात जे गुपित दडवून ठेवले आहे त्यानेच ते वाचू शकतील. तिला अतिशय आश्चर्य वाटले.इतकी गुप्त गोष्ट आज आलेल्या या अपरिचिताला कळली कशी? तिला वाटले तो कदाचित दुसर्‍या गोष्टीबद्दल बोलत असेल म्हणून ती बराच वेळ बोलत नाहीसे बघून हनुमान म्हणाले मला फसवू नकोस. मी भूत,वर्तमान,भविष्य सर्व जाणतो.मला रावणांविषयी काळजी वाटते म्हणून सुचित करत आहे. नसेल सांगायचे तर हरकत नाही असे म्हणून ज्योतिष्य महालाबाहेर  जाऊ लागलेले बघताच ती कळकळीने म्हणाली हा माझ्या पतीच्या जीवनाचा प्रश्न आहे.तुमच्या वर विश्वास ठेवून सांगते तो बाण या काचेच्या खांबात…तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आंत खऽळ आवाज झाला.फुटलेल्या खांबातून बाण घेऊन जयश्रीराम म्हणत कोणाला कळायच्या आंत महालाबाहेर पडले. प्रतिकार करायचाही कुणाला अवसर मिळाला नाही. त्या ब्रम्हदेवा च्या ब्रम्हबाणाने रावणाचा अंत झाला..

            राम विजयी झाल्यावर त्यांना घाईने अयोध्येस परतायचे होते. विनाशाचा देव शंकराचे उपकार मानल्याशिवाय ते परतु शकत नव्हते. चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर एक दिवस जरी उशीर झाला तर भरत प्राणत्याग करणार होता. भरताचे आयुष्य पणाला लागले होते.वेळ फार कमी होता. कांही क्षणात हजारो योजने अंतर पार करुन हनुमानाने कैलास पर्वताचा कोपरा न कोपरा शोधला पण शिवलिंग सांपडले नाही. म्हणून हनुमानाने ध्यान लावून शिवशंकरांना पाचारण केले. शिवशंकर प्रसन्न होऊन त्यांनी स्वतः शिवलिंग हनुमानाच्या स्वाधीन केले. आणि क्षणात रामाजवळ पोहोचले, पण तिथले दृष्य बघून हनुमानाचे डोळे पाणावले. रामांनीअसं कां केल? हनुमाना ची वाट न बघतां आधीच कुणीतरी दिलेल्या शिवलिंगाचे सोपस्कार पूर्ण केले होते.रामांनी सामान्य शिवलिंग स्विकारल्याने हनुमानांना अतिशय वाईट वाटले. आपल्याकडून रामाची सेवा नीट करुं न शकल्याने प्राणत्याग करायचा विचार करुं लागले.

           रामांनी त्यांची अवस्था अचूक ओळखून

समजावले, वेळ कमी असल्यामुळे ही पुजा करणे आवश्यक असल्यामुळे…घडले ती परिस्थिती वेगळी होती.याचा अर्थ तूं कमी पडला असे नाही. हे शिवलिंग सीतेने सुमुद्राच्या रेतीपासून श्रध्देने तयार केले आहे.आणि तूं सुध्दा प्रत्यक्ष शिवशंकरांना प्रसन्न करुन एवढे कष्ट घेऊन आणलेस. दोन्हीही शिवलिंग माझ्या साठी तेवढीच पवित्र आहेत. याचीही पुजा करु. सीतेने बनवलेले शिवलिंग या शिवलिंगाजवळ आणून ठेव. हनुमान आनंदीत होऊन ते शिवलिंग उचलायला गेले तर ते तसूभरही हलले नाही. हनुमानाने सारे प्रयत्न केले पण शिवलिंग जिथल्या तिथेच. शेवटी एवढा जोर लावला की लिंग तर हलले नाही पण भूमी हलली आणि हनुमान तोंडावर पडून बेशुध्द झाले.राम धावत येऊन त्याचे डोके मांडीवर ठेवून त्यांच्या थकलेल्या शरीरावर हळुवार हात फिरवल्या बरोबर हनुमानाच्या अंगात नवचैतन्य आले.

                   क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                    दि. २७-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                   भाग – २६.

          हनुमान शुध्दीवर आल्यावर आपले डोके प्रभू रामांच्या मांडीवर असलेले बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. रामांनी त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले, हनुमाना आपण पम्पा सरोवराजवळ भेटलो तेव्हा तू माझी ओळख सुग्रीवाशी करुन दिल्यावर तू स्वतः सतत मला मदत करशील असं आश्वासन दिले होते. जे कोणीही करु शकणार नाही एवढं तू माझ्यासाठी केलेस. तुझ्या या निःस्वार्थ सेवा आणि बलिदानाबद्दल मी तुझा सदैव ऋणी आहे

ऐकून हनुमानाच्या डोळ्यातून कृतज्ञथेचे अश्रू ओघळू लागले. नंतर त्यांनी आणलेले शिवलिंग सीतेने बनवलेल्या शिवलिंगाशेजारी ठेवून प्रतिष्ठापना व रितसर पुजा केली. आणि घोषणा केली, आजपासून जो कोणी रामेश्वरला येईल ते प्रथम हनुमानाने आणलेल्या व नंतरच सीतेने तयार केलेल्या शिवलिंगाची पुजा करतील.

              आजही ती दोन शिवलिंग रामेश्वरात आहे.श्रध्दा,भक्तीने केलेल्या सेवेचे किती मोल आहे हे प्रभू रामांनी जगाला दाखवून दिले.

          लंकेचा पराभव व रावणाचा अंत झाल्या वर अयोध्येकडे रामलक्ष्मण सीता यांचे बरोबर हजारो वानर सेना निघाली. सितेच्या आग्रहा नुसार किष्किंधामधील कांही वानरींना घेण्यास थांबले असतां, हनुमानाने आईच्या दर्शनाची इच्छा केल्याने सर्वजन अंजनीद्री पर्वतावर उतरले. हनुमानांनी धाव घेऊन आईचे चरण पकडून आशिर्वाद मागीतला. तिने त्यांना उठवून आपल्या जवळ बसवले.आणि मोहिमे ची माहिती विचारली.हनुमानाने रामाच्या प्रथम भेटीपासून ते रावण वधापर्पंतच्या सर्व घटना कथन केल्या.

          सर्व ऐकल्यावर अंजनी संतापून म्हणाली

तूं माझा लायक पुत्र नाहीस.माझ्या दुधाची लाज राखली नाहीस. तुझ्या या भेकडपणा बद्दल मी अतिशय नाराज आहे. सर्वांना व स्वतः हनुमानाला आपले काय चुकले हेच कळेना.कां ती एवढी संतापली? हनुमानाने विनवणी करत कारण विचारल्यावर अंजना म्हणाली, लंकेचा  विनाश करायला तू एवढा विलंब कां लावलास?

तुझ्यात शारिरी,वैचारिक क्षमता असल्यावर पहिल्याच भेटीत लंकेचा विध्वंश करु शकला असतांस. प्रभु रामांना त्याहीपेक्षा सीतामाईला एवढा त्रास कां होऊ दिलास? संपूर्ण वानर सेनेला युध्द करण्यास कां भाग पाडलेस? माझ्या दुधाचा अपमान करुन पूर्ण निराश केलेस. यापुढे तुझा माझा कांही संबंध नाही. जा इथून, परत तोंड दाखवू नकोस.

           आपल्या आईचा संताप पाहून तिच्या समोर गुडघे टेकून बसत म्हणाला, माते! तू म्हणते तसंच करायचा माझा विचार होता. पण मनांत दोन विचार आल्याने तसं करुं शकलो नाही. पहिला विचार हा की, मी श्रीरामाचा दूत  म्हणून गेलो होतो. विश्वस्त म्हणून सीतामाईला निरोप देणे व तिचा निरोप श्रीरामांना पोहचवणे होता.रावणाच्या वधाचा आदेश नव्हता. मी जर तसे केले असते तर रामांनी दिलेली आज्ञाभंग केली असं झालं असत. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मी रावणवध केला असता तर रामांची अपकीर्ती झाली असती. रामाला आपल्या पत्नीचे रक्षण करता आले नाही, वाचवता आले  ही टीका तर झाली असती आणि लोकांनी माझी शौर्यगाथा गायल्या असत्या. मला माझ्या स्वामींनाच विजयाचं संपूर्ण श्रेय जावं ही माझी आंतरिक इच्छा होती. माझ्या वागण्याचे स्पष्टीकरण देत नाही तर माझे जे विचार,इच्छा होती तसे वागलो. तरीही मी चुकलो, लांच्छंन आणले असे वाटत असेल तर आताच्या आता समुद्रात जीव देऊन तुला मानहानीपासून वाचवतो.

             पुत्राने नेटकं व योग्य स्पष्टीकरण दिल्यावर अंजनाचे समाधान झाले. त्याला मिठीत घेत म्हणाली,मी पाजलेलं दुध कधी वाया जाणार नाही.हे दुध प्यालेला कधी भेकड असूच शकत नाही.

          माता-पुत्राची गळाभेट सुरु असतांना लक्ष्मण विचार करीत होता, अंजनाच्या दुधामधे असं काय दुर्मिळ आहे की, हनुमानाकडून एवढ्या अपेक्षा होत्या? अंजना श्रेष्ठ योगीनी होती.ती दुसर्‍याच्या मनातील भाव वाचू शकत होती.तिने लक्ष्मणाच्या मनातील चलबिचल लगेच ओळखली. तिने हनुमानाला बाजूला केले

पर्वताच्या दुसर्‍या टोकाकडे जाऊन आपले स्तन दाबले आणि त्यातून निघालेलं दुध थेट  समोरच्या पर्वतशिखराभर पोहचताच धडामऽऽ आवाज झाला.

            ज्याक्षणी त्या पर्वतशिखराला तिच्या दुधाचा स्पर्श झाला, त्या शिखराचा स्फोट झाला. दुधाची क्षमता पर्वतशिखर पेलू शकले नाही. सर्वानी त्या मातेला वंदन केले, जिने या श्रेष्ठ पराक्रमी पुत्राला जन्माला घातले. आणि सर्वांनी अयोध्येकडे प्रस्थान केले.

             अयोध्येमधे राजसभा भरली होती. एकाने हनुमानाला प्रश्न विचारला, या घडीला प्रभू रामांचा सर्वोत्तम भक्त कोण? हनुमान म्हणाले, श्रीरामांनी त्यांच्या खाजगी वहीत आपल्या श्रेष्ठ भक्तांची नोंद केलेली आहे. तूं सरळ रामांना विनंती करुन नोंंदवहीची मागणी कर, तुला आपोआप उत्तर मिळेल. 

                     क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                   दि. २७-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                     भाग – २७.

           हनुमानांनी सुचवल्यानुसार तो मनुष्य  नोंदवही मागण्यासाठी प्रभू रामांकडे जाऊन विनंतीपूर्वक त्यांच्या नोंदवहीची मागणी केल्या वर जिकडे ती वही होती तिकडे रामांनी निर्देश केला. त्या प्रचंड वहीत पहिलंच नांव आपलं बघून त्याला परमानंद झाला. मग उत्सुकतेने एक नांव शोधण्यासाठी वहिचे हजारो पानं चाळली पण अपेक्षित नाव न दिसल्याने त्याला आश्चर्य वाटले. त्याच दोलायमान अवस्थेत तो हनुमानाकडे येऊन म्हणाला, त्या वहित माझे नाव असल्याचा आनंद झालाच पण संपूर्ण वहीत तुझे नांव दिसले नाही याचे वाईट वाटते. तूं स्वामींचा एवढा मोठा भक्त! त्यांनी तुझे नांव कसे वगळले? तूं प्रभू रामांची छोटी वही बघीतली कां?

           काऽय? प्रभूंकडे आणखी नोंदवही आहे   तो मनुष्य परत रामांकडे जाऊन दुसरी वही मागीतली. रामांनी आपल्या ह्रदयाजवळ असलेली छोटी नोंदवही अतिशय हळुवारपणे पकडून त्याच्या हाती दिली. खूप उत्सुकतेने त्याने ती छोटी नोंदवही उघडल्याबरैबर सर्वात प्रथम हनुमानाचे नांव बघून आश्चर्य वाटले. स्वतःच नांव शोधत दोनदा वही चाळली पण दिसले नाही.उत्सुकतेपोटी दोन वेगळ्या वह्या ठेवण्याचा अर्थ काय हे समजावे म्हणून रामां जवळ इच्छा प्रगट केली. रामांनी दिलेले उत्तर म्हणजे खर्‍या भक्तीचे सार होते.

           राम म्हणाले, जो भक्त त्याच्या मनात मला ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याचे नांव मोठ्या नोंदवहीत आहे. आणि ज्यांची नांवे मला लक्षात ठेवावी लागते अशी नावे छोट्या वहीत असते. त्या भक्ताच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. धावत हनुमानाकडे येऊन त्यांचे पाय धरले.त्याला उठवत हनुमान म्हणाले, सर्वश्रेष्ठ भक्ताचे नांव जाणून घ्यायची आवश्यकताच कां

          हनुमान बरेच दिवसांपासून सीतामाईच्या मागे मागे फिरत होते. आज तर सकाळपासूनच पिच्छा पुरवला काय कारणाने ते कळेना. त्याच फक्त शरिरच प्रचंड आहे पण मन मात्र अगदी बाळासारखं भाबडं आहे याची तिला खात्री होती. दरबारातून यायची रामांची वेळ होत आली होती, म्हणून ती तयारी करण्यासाठी आरशासमोर बसून ती भांगात कुंकु भरत असलेली बघून  हनुमान जवळ येऊन विचारले, माते! हे लाल लाल काय लावलेस? त्याच्या निरागस, भाबड्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे तिला सूचेना. पण उत्तर घेतल्याशिवाय तो गप्प बसणार नाही हे लक्षात घेऊन म्हणाली, रामांना लाल रंग खूप आवडतो, म्हणून लावते.रामांना काय प्रिय आहे हे शोधण्यासाठी गेल्या कांही दिवसांपासून सीतेच्या भोवती फिरत होते ते गुपित गवसले.

              ऐकल्याबरोबर हनुमानांनी धावत एका कापडव्यापाराच्या गोदामात प्रवेश केला व तिथे कपडे रंगवण्यासाठी लाल रंगाचा हौद भरुन असलेल्या हौदात हनुमानाने सरळ त्यात उडी घेतल्यावर बाहेर आले ते लाल रंगाचे माकड! सर्वजण हसून लोटपोट होऊ लागले पण त्यांना कशाची पर्वा नव्हती. ते थेट रामांच्या दरबारात शिरले. तिथं महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु होती. अचानक राम हसू लागले. सर्वाना आश्चर्य वाटले.इतक्या गंभीर विषयावर बोलणे सुरु असतांना राम लोटपोट होऊन कां हसताहेत? मागे वळून बघितले तर एक लाल माकड उभे दिसले.

             हसू आवरत रामांनी विचारले, हनुमाना! या अवताराचे रहस्य कळेल का? आनंदाने हनुमान म्हणाले, बरेच दिवसांपासून मी सीतामाईच्या अवती भोवती फिरत होतो. तुम्हाला आनंदी करण्यासाठी काय काय उपाय करतात हे बघण्यासाठी. त्यांनी आज कपाळा वर लाल कुंकु रेखाटल्यावर त्यांना कारण विचारले, त्या म्हणाल्या लाल रंग तुम्हाला खूप आवडतो.मी विचार केला, एवढ्या छोट्या ठीपक्याने तुम्हाला आनंद मिळतो तर, मी पूर्ण लाल बनून आलो तर तुम्ही किती आनंदीत व्हाल? आणि मी दरबारात प्रवेश केल्या केल्या प्रचिती आली. यापूर्वी तुम्हाला कधीही एवढं आनंदी व खळखळून हसतांना बघितले नव्हते. माझं यश तुम्हाला आनंदी ठेवण्यातच आहे.

            आज दरबारात गुप्त सभा सुरु होती. महत्व नसलेले एक काम देऊन हनुमानाला बाहेर पाठवले होते. रामांची सेवा करतांना हनुमान दुसर्‍यांना संधी मिळू देत नाही म्हणून सर्व नाराज होते. म्हणून हनुमानाच्या अपरोक्ष बैठक भरवून  त्यांची सेवा करण्यासाठी छोट्यात छोटे काम प्रत्येकाच्या नावापुढे लिहिले होते. शुल्लकही काम हनुमानासाठी शिल्लक नव्हते. आपल्या विरुध्द कांही तरी

 गुप्त कट शिजत असल्याची कल्पना आली होती.त्यांना दिलेले काम उरकवून परत आल्या वर त्यांना रामाच्या हाती यादी दिसली. त्या यादीत शुल्लकही काम बाकी नव्हते.रामांनी यादीला नुकतीच मंजूरी दिली होती.वास्तविक सर्वांनी सहकार्याने काम करावे, सगळं आपनच घेण्याची पध्दत रामांना कधीच मान्य नव्हते. सामंज्यस्य असावे असे त्यांना वाटायचे.

                 क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                      दि. २८-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                    भाग – २८.

              हनुमानांनी यादीचे अवलोकन केल्या वर  ते म्हणाले, प्रभू मला एका छोट्या सेवेची संधी द्याल? कोणती हनुमाना? चुटकी वाजवण्याची? अर्थ कुणालाच कळला नाही. सर्वजण एकमेकांकडे टकमका बघू लागले. स्पष्टीकरण देत हनुमान म्हणाले, जेव्हा आपण जांभई द्याल तेव्हा तोंडासमोर चुटकी वाजवाय ला कुणी तरी हव ना? त्यांची अफलातून कल्पना ऐकून सर्वांना खूप हसू आले.नंतर सगळे आपापल्या कामात गर्ग झाले पण रामा शेजारी उभे राहून हनुमान त्यांच्या जांबईची वाट बघत होते.

            संध्याकाळी सर्वी कामे आटोपून सीता बरोबर वेळ व्यतित करण्यासाठी अंतस्थ कक्षा कडे निघाले. सीतासुध्दा त्यांची आतुरतेने या वेळेची आतुरतेने वाट बघत असे. राम कक्षात शिरताच सावलीसारखा हनुमानही त्यांच्यामागे शिरतांना बघून तिचा विरस झाला. चिडून विचारले हनुमाना तूं इथे काय करतोस? तुला माहित आहे ना ही आमची खाजगी वेळ असते

              माते! मी फक्त माझे काम करतोय. प्रभू राम जेव्हा जांभई देतील तेव्हा त्यांच्या तोंडासमोर टिचकी वाजवण्याचे माझे काम आहे. त्यांनी झोपेत जांभई दिली तर टिचकी वाजवण्याचे माझे कर्तव्य नाही कां? त्याचा तर्क ऐकून सीतेने हात टेकले. रात्रभर हनुमान त्यांचा सुंदर चेहरा न्याहाळत बसला.दुसर्‍या दिवशी टिचकी वाजवण्याचे काम यादीतून वगळण्यात आले.

             श्रीरामांचा अश्वमेध यज्ञाचा अश्व सुरतचा राजाचा पुत्र चंपकने धरला. अंगदची नेमणूक युध्दापूर्वीच्या विचारविनिमयासाठी केली होती. अश्वमेधाचा घोडा राजाने सोडून द्यावा म्हणून अंगदचे सारे प्रयत्न व्यर्थ गेले. अंगदच्या ऐकण्यात आले होते, सुरत राजाला यमदेवांनी अमरत्वाचे वरदान दिले होते. स्थानिक राजाला यमदेव एवढा मोठा वर कसा देऊ शकतात? चिडून त्याने युध्द घोषणा केली. रामांच्या सैन्याचे नेतृत्व भरतपुत्र पुष्पककडे तर सुरत राजाच्या सैन्याचे नेतृत्व राजपुत्र चंपक कडे होते. घनघोर युध्द होऊन भरतपुत्र पुष्कल ची हार झाल्यावर, हनुमान रामदूत म्हणून राजा कडे जाऊन खूप समजावले पण तो अश्वमेध अश्व सोडायला तयार होईना. भक्तीभावाने वागणार राजाचे उद्दाम वागण्यांमागे नक्कीच कांहीतरी कारण असावे हे जाणून घेण्यासाठी हनुमानाने सुक्ष्म रुप राजमहालात शिरले तेव्हा डोळ्यात पाणी आणून पुत्र चंपकला म्हणत होता, हा अश्व माझा मुक्तीदूत आहे. यमदेवांना सांगीतले होते, स्वतः प्रभू राम आल्याशिवाय हा देह सोडणार नाही.रामांचा महिमा आहे की, त्यांचा भक्त अडचणीत असल्यावर ते आल्याशिवाय राहत नाही. हे ऐकून हनुमानाला दखल घ्यावी वाटली.दुसर्‍या दिवशी सेनेचं नेतृत्व हनुमानाने आपल्याकडे घेतले. राजा सुरत व त्यांच्यात घनघोर युध्द झालं.हनुमान बंदी झाल्यावर युध्द  थांबवले.सुरत राजाने तलवारीचे टोक त्यांच्या गळ्याला लावले. एका छोट्या राजाकडून आपला पराक्रमी सेनापती बंदी झालाच कसा?

 हनुमानाने डोळे मिटून रामनामाचा जप सुरु केला.अचानक शंखनाद झाला. स्मित वदनाने प्रत्यक्ष प्रभू राम हनुमानासमोर प्रकट झाल्या बरोबर हनुमानाचे बंधन आपोआप गळून पडले राम दर्शन झाल्याने राजा सुरत रामांच्या चरणां वर अश्रूंचा अभिषेक करुं लागला. राजाची उन्मनी अवस्था बघून हनुमानाला बंदी करवून घेतल्याचे सार्थक वाटले.

          नंतर पुढे गेल्यावर अश्वमेधाचा घोडा राजा सुबाहूचा १६ वर्षाचा पुत्र दमनने पकडला.  घनासाम युध्द होऊन पुष्कलने दमनला बेशुध्द केले.पण दमनच्या कुशल व चपळ सारथ्याने दमनला सुरक्षित स्थळी हलवले.नंतर स्वतः राजा सुबाहु व भाऊ सुकेतू युध्दात उतरले. स्वतः राजानेच युध्दात भाग घेतल्यामुळे त्याचा दुसरा पुत्र चितरंजनच्या सेनेत चैतन्य आले व त्वेषाने लढू लागले. प्रमू रामांच्या सेनेत हाहाकार माजल्याचे बघून चिडून पुष्कलने लढत देऊन चितरंजनचे मस्तक उडवले.

          आपल्या मुलाच्या मृत्युने शोकाकुल व क्रोधीष्ट राजा सुबाहु  वाटेत येईल त्याला ठार करत सुटला. प्रचंड जीवितहानी थांबवण्या साठी हनुमानाने राजाची वाट अडवली. त्याने हनुमानावर केलेला बाणांचा वर्षाव निष्र्पभ झाला. अचानक राजाचा रथ शेपटीत धरुन आकाशात झेप घेतली.ठराविक उंचीवर रथ स्थीर झाल्यावर राजाने बाण वर्षाव केला त्यात हनुमान जखमी झाले.संतापून हनुमाने केलेल्या लत्ताप्रहाराने राजा खाली चक्कर येऊन पडला.

            अचानक राजाच्या समोर लख्ख प्रकाश पडला. आणि साक्षात राम त्याच्या समोर होते. रामांना प्रणिपात करुन, युध्द थांबवण्याची आज्ञा दिली.अचानक युध्द थांबण्याचे कारण जाणण्यास दोन्ही पक्षाचे सैनिक उत्सुक असल्यामुळे राजा सांगू लागला

                    क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                      दि.२८-७-२०२२.

                             

 

अंजनीपुत्र हनुमान चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading