अंजनीपुत्र हनुमान चरित्र भाग २, (५ ते ८)

गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

राजा दशराथांना बरेच दिवसांपासून शांतानंतर पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून पायसचे पात्र घेऊन दिव्य पुरुष बाहेर आला.ते पायसपात्र दशरथांच्या हाती देऊन तिन्ही राण्यांना द्यायला सांगीतले. त्याप्रमाणे राण्यांना प्रसाद देत सुमित्राच्या………………………..

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! अंजनीपुत्र हनुमान !!!

!! हनुमान !!!

भाग – ५.

हनुमानाने कारण विचारल्यावर सुग्रीव सांगू लागला, हनुमाना, माझे पिता सूर्यदेवांनी तुला माझ्याबद्दलची एक बाजू सांगीतली.दुसरी बाजू सांगणे त्यांना उचित वाटले नसावे.वाली कडून घडलेल्या अपराधाबद्दल मातंगऋषीने त्याला शाप दिला, जर त्याने या ऋषिमुख पर्वतावर पाय ठेवला तर, त्याचे मस्तक फुटून मृत्यु होईल.त्यामुळेच या पर्वतावर मी जीवंत आहे. तरीही वाली या पर्वतावर पाय न ठेवतां, वाली रोज माझा छळ व अपमान करतो .हे बोलत असतांनाच वेळ झाली…वेळ झाली.. असं सुग्रीव पुटपुट होता तोच कऽकऽड कडकड आवाज होत सुग्रीवाच्या डोक्यावर कशाचा तरी प्रहार झाल्याचे दिसले आणि सुग्रीव वेदनेने जमीनीवर लोटपोट होऊ लागला.सुग्रीव थोडा सावरल्यावर सांगू लागला… वाली सूर्याला चार महासागरात अर्ध्य देतो. तो एका उडीतच दक्षिण महासागराहून उत्तर महासागराकडे पोहचतो.व दुसर्‍या उडीत पूर्वेकडून पश्चिमेकडे पोहोचतो.प्रत्येक वेळी मुद्दाम या ऋषिमुख पर्वतावरुन जातांना माझ्या डोक्यावर लत्ता प्रहार करुन जातो.त्याची येण्या जाण्याची वेळ माहित असूनही त्याच्या लाथा खाण्याशिवाय मी कांहीच करुं शकत नाही. हे माझे मित्र रोजच हा अत्याचार बघतात पण वालीच्या अतुलनीय शक्ती व वेगापुढे हतबल आहेत.खरं तर संपूर्ण किष्किंधानगरीच त्याच्यापुढे हतबल आहे. आणि वेळ झाल्यामुळे सुग्रीव भितीने पुनः थरथर कापू लागला. हनुमान प्रतिकारास सज्ज झाला. लत्ताप्रहार करण्यासाठी वाली वेगाने खाली येत होता. तो सुग्रीवाच्या डोक्या वर प्रहार करणार तोच हनुमानाने त्याचे दोन्ही पावले एका हाताने धरलेले बघून वालीला धक्काच बसला. पावलं सोडवून घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला पण व्यर्थ! अचानक त्याची नजर हनुमानाच्या कानातील पंचधातुच्या कुंडलाकडे गेली आणि भीतीने त्याचा थरकाप उडाला. ज्याला अंजनीच्या गर्भातच मारण्याचा प्रयत्न केला होता तोच हा असल्याची त्याला खात्री पटली. हनुमाने त्याचे पावले घट्ट पकडल्यामुळे वेदना होऊ लागल्या. तो खाली खेचल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर आणि आपल्यात समोरच्या शत्रूची शक्ती खेचण्याचा त्याला मिळालेला ‘वर’ ही हनुमानापुढे निष्र्पभ ठरला. परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन वालीने दयेची याचना केली व पुन्हा या पर्वताकडे न येण्याचे व सुग्रीवला त्रास देणार नाही हे वचन दिल्यावर हनुमानाने त्याला मुक्त केले.वाली

निघून गेल्यावर सुग्रीवने सुटकेचा श्वास टाकला

पर्वताच्या एका कड्यावर हनुमानासह चौघेही बसले असतां, त्यांना पर्वत पायथ्याशी दोन पुरुष हातात धनुष्यबाण घेऊन चालतांना दिसले. सुग्रीवाने हनुमानाला खाली पाठवून ते कोण आहेत हे पाहायला पाठवले.वालीने माझा वध करण्यास यांना पाठवले असेल तर मृत्युला सामोरे जावे लागेल,नसतील तर त्यांच्याशी मैत्री करु.हनुमानाने भिक्षुक संन्यासाचा वेश धारण करुन खाली गेला व त्या दोन देखण्या पुरुषांना त्यांची ओळख देत त्यातील एकजण म्हणाला, आम्ही आमची ओळख देऊच पण तूं एक भिक्षुक असून तुझ्या गळ्यात ही मौल्यवान रत्नाची माळ कशी? ऐकून हनुमानाला ब्रम्हदेवां चे शब्द आठवले. ज्याची तो आतुरतेने वाट बघत होता, ते त्याचे स्वामी, देव त्याच्या समोर होते.आणि हा त्यांचा सेवक! हनुमान आपल्या मुळ रुपात येऊन त्यांचे चरणस्पर्श करीत म्हणाला, मी सुग्रीवाचा मंत्री हनुमान!

नंतर त्यांनी आपली ओळख देत म्हणाले, मी अयोध्येचा राजा दशरथपुत्र राम आणि हा माझा अनुज लक्ष्मण. आम्हाला १४ वर्षाचा वनवास झाला पैकी तेरा वर्षे संपली आणि दुर्देवाने माझी पत्नी सीतेचे अपहरण झाले. तिच्याच शोधार्थ आम्ही भटकत आहोत. या दोघांसह हनुमान सुग्रीवाकडे आला.यांना सुग्रीवाची ओळख करुन देत म्हणाला, याचा भाऊ वालीने याच्या पत्नीचे हरण करुन राज्यातून यांना निष्कषित केले.

हनुमानाचे विनम्र वागणे, सुसंकृत बोलणे, सेवाभावी वृत्ती पाहून, राम लक्ष्मणांनी जाणले हा सामान्य नसून वेदाध्यायी आहे. हा सहकारी म्हणून लाभला तर आपण नक्की यशस्वी होऊ. सुग्रीव आणि राम समदुःखी होते. त्यामुळे दोघांची मैत्री हनुमानासमक्ष अग्निसाक्षीने जुळली.दोघांनीही एकमेकांना मदत करण्याचे वचन दिले. नंतर मंत्रणा करुन वालीशी द्वंद करण्यास सुग्रीवास नगरीच्या वेशी वर पाठवले. पण सुग्रीवाच्या आटोक्यात वाली येत नसलेला बघून रामाने बाण सोडून वालीचा वध केला. सुग्रीव किष्किंधेचा राजा झाला व त्याची पत्नी त्याला परत मिळाली. पण तो विलासात रममाण झाला व रामांना दिलेले वचन विसरला.

क्रमशः
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! हनुमान !!!

भाग – ६.

सुग्रीवाने मदत करण्याचे रामाला वचन देऊन बरेच दिवस उलटले. ऐषारामात मग्न होऊन वचनाकडे केलेले दुर्लक्ष पाहून,लक्ष्मण अतिशय संतप्त होऊन सुग्रीवाच्या राजवाड्या समोर येऊन बोलत असलेले अपशब्द ऐकून भयभीत झालेल्या सुग्रीवाने बुध्दीमान ताराला पाठवले.

तिच्या बोलण्याने लक्ष्मण शांत झाल्या वर सुग्रीव समोर गेला. लक्ष्मण त्याला घेऊन रामाकडे गेला. हनुमान म्हणाला, राजन्! गेले चार महिने पावसाचे निमित्य करुन वेळकाढू पणा केला व आतां पावसाळा संपूनही बराच कालावधी उलटल्यावरही आपण श्रीरामांचे उपकार विसरुन विलासात दंग राहिलात. प्र रामांचा महिमा जाणत नाही का? ज्यांनी एका बाणात वालीला संपवले त्यांना तुम्हाला संपवण्यास वेळ लागेल का? राजा, कृतघ्नपणा सारखे दुसरे पाप नाही. हनुमानाने केलेली कान उघाडणी ऐकून त्याला पश्चाताप झाला व श्रीरामाच्या पायावर पडून क्षमायाचना करुं लागला. नंतर सुग्रीवातला राजा जागा झाला, आपल्या कर्तव्याची जाणीव झाली व ताबडतोब कामाला लागला.

सुग्रीवाने सर्वीकडे आदेश पाठवून सैन्या ची जमवाजमव केली. किष्किंधा नगरीत लाखों च्या संखेने वानरसेना दाखल होऊ लागली. शोध मोहिमेने वेग घेतला. सुग्रीवने सैन्याच्या चार तुकड्या केल्या. प्रत्येक तुकडीवर नायक नेमून भूभाग वाटून एक मासाच्या आंत सीता माताचा शोध घेण्यास सांगीतले. अंगदला एका तुकडीचे नायकत्व देऊन त्याच्या तुकडीत जांबुवंतासारखा अनुभवी जाणकार व हनुमाना सारखा महापराक्रमी वीर समाविष्ट होता. बलवान अशा या तिघांना दक्षिणेकडची मोहिम दिली. सर्वांची भिस्त या तुकडीवर जास्त होती. निघण्यापूर्वी हनुमानाला एकांतात बोलावून राम म्हणाले, हनुमाना, तुझ्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.सीतेचा शोध केवळ तूंच घेऊ शकतोस. म्हणून आमच्या नात्याचं प्रतिक ही अंगठी तुझ्याकडे देत आहे. म्हणाले, या अंगठी संबंधीचा प्रसंग सीता आणि माझ्यातलाच आहे ते सांगू लागले, एक दिवस सीता माझे पाय चुरत असतां तिने बोटातील अंगठी काढून फेकून दिली. या विचित्र वागण्याचे कारण विचारल्यावर म्हणाली, आपल्या नुसत्या पद स्पर्शाने पृथ्वीवरची सर्वात सुंदर स्री अहिल्येमधे रुपांतर झाले, या अंगठीतील हिर्‍याला आपल्या चरणस्पर्श झाला तर एखाद्या सौंदर्यवती स्रीमधे रुपांतर झाले तर? मला कोणीही स्पर्धक नकोय

तिच्या या भाबडेपणाचे तेव्हा हसूं आले होते.

बोलता बोलता रामाच्या डोळ्यात सीतेच्या आठवणीने अश्रू तराळले. तिची हनुमानाला ओळख पटावी म्हणून रामांनी तिचे हुबेहुब वर्णन केले.इतक्या कमी वेळात त्याने रामाचा विश्वास संपादन केला होता. निष्कलं व्यक्तिमत्व व उत्तम शिक्षणाचे संस्कार कसे असतात हे श्रीरामांनी या प्रसंगातून जगाला दाखवून दिले.

महिना संपत आला तरी सीतेचा शोध लागला नव्हता.सैन्य अन्नपाण्यावाचून मृत्युमुखी पडतील अशी स्थिती निर्माण झाली होती. अचानक एका गुहेमधून ओलाचिंब झालेला पक्षी बाहेर उडत आलेला दिसला.याचा अर्थ गुहेमधे पाण्याचे स्रोत्र असावे असे वाटून सैनिक गुहेत शिरले. तिथे दिसलेल्या पाण्यात उडी घेणार, तेवढ्यात त्यांना एक समाधीस्त स्री दिसली. सैनिकांची चाहूल लागल्यावर तिने डोळे उघडले व क्षणार्धात समोर सोन्याचा मेज, त्यावर अगनित चविष्ट पदार्थ व स्वर्गीय पेय ठेवलेले दिसले. ती स्री स्वयंय्रभा होती.तिने सर्वांना पोटभर जेवण्याचे आमंत्रण दिले.सर्व वानरसेनि मनापासून जेवली.आणि अचानक सगळं अदृष्य झालं. ते सर्व समुद्रकिनारी होते.

दिवसांमागून दिवस जात होते.सारे सैन्य भुक तहानेने व्याकुळ, मार्ग सांपडत नव्हता. एके दिवशी एका म्हातार्‍या गिधाडाला इतके सैन्य बघून, आपल्या भुकेची ददात मिटली याचा आनंद झाला.ते गिधाड बघून अंगदला हनुमान म्हणाला या गिधाडाला बघून आपल्या त्या जटायू गिधाडासारखेच दिसते, ज्याने रावणाच्या तावडीतून सीतामाईचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात आपले प्राण दिले. पण केवढा भाग्यवान ?त्याला रामाच्या हातून अग्नी मिळाला. या गिधाडाने आपल्यावर हल्ला केला तर श्रीरामांना आपले मृतशरीरही दिसणार नाही

त्याचं बोलणं संपत नाही तोच ते भलंमोठ गिधाड डोळ्यात अश्रू, दुःख, विषाद असलेला त्यांच्या पुढ्यात उभे राहत विचारले, तुम्ही जटायूला ओळखता? तो माझा छोटा भाऊ!

कांही वर्षापूर्वी एका अपघाताने आमची ताटातूट झाली. मी संपाती! तुमच्या बोलण्यातून जटायूच्या मृत्युबद्दल समजले.मला अतिशय दुःख झाले. सीतामाईला लंकेत नेतांना त्या दुष्ट रावणाला बघितले आहे.लंका येथून १०० योजने दूर समुद्रापलिकडे आहे.( एक योजन म्हणजे साधारण ८ मैल)

क्रमशः
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  हनुमान  !!!

                    भाग – ७.

          संपाती म्हणाला, तुम्हाला माझेपासून कांहीही धोका नाही. निश्चिंत असा.उलट मी तुम्हाला मदतच करुं शकतो. मला असलेल्या तीक्ष्ण दृष्टीने सीतामाई लंकेत कुठे वास्तव्यास आहे हे बघून सांगू शकतो.

            जटायूची व माझी ताटातूट झाल्यावर, एका प्रसंगात माझे पंख भाजल्या गेले.त्यामुळे मी जास्त दूर उडु शकत नाही.असाच असहाय्य बसलो असतांना एका साधूला माझी दया आली व वर देत म्हणाला, एक दिवस इथे वानरसेना येईल, त्यांना सीतामाईचा पत्ता सांगताच तुझे पंख पुर्ववत होतील.लंकेतील सीतामाईचा पत्ता सांगून संपाती उडून गेला. पत्ता मिळाला तरी मुख्य अडचण समोर होती. १०० योजने पसरलेला समुद्र कसा व कोण पार करेल?

        प्रत्येकजण आपापली क्षमता अजमावित होता.कोण किती योजनं समुद्र पार करु शकेल ते सांगत होता. अंगद म्हणाला, मी १०० योजने दूर समुद्र पार करुं शकेल परंतु लंकेतून परत येण्याचे बळ मात्र नसणार.जांबुवंतानेही अक्षमता दर्शविली.सगळे निराश होऊन स्वस्थ झाले. शेवटी स्वस्थ बसलेल्या हनुमानाला तो लहान असतांना देवतांनी दिलेल्या शक्तीची,व त्याच्यातल्या शक्तींची जांबुवंताने आठवण करुन देत जसजसे जांबुवतांचे शब्द कानावर पडू लागले, तसतसे त्याच्या विस्मृतीत गेलेल्या व हरवलेल्या शक्तीची आठवण झाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढत हनुमान आकाराने मोठा होत कांही क्षणांतच तो कांहीशे फुट उंच झाला. आणि त्याने गर्जना केली.त्याच्या गर्जनेने  चहु दिशांचे वृक्ष थरारले. पक्षी फडफडले. तो महेंद्र पर्वताच्या दिशेने पळत जाऊन मोठे अंतर पार केले. पर्वतशिखरावर पोहचून गर्जला मी आतां प्रभू रामाची मोहिम यशस्वी करुं शकतो.शक्ती अजमावण्यासाठी त्या पर्वतावर दाब दिल्या बरोबर पर्वत चिरडल्या जाऊन पर्वताखाली वास्तव्यास  असलेले ऋषी,प्राणी दूर पळू लागले. परत येऊन आपल्या सर्व साथींचा निरोप घेतला लंकेकडे प्रयान करायला!

             पर्वतावरुन झेप घेणे वेगळे आणि लंकेत पोहचणे वेगळे. हा प्रवास केवळ उड्डान भरुन समुद्रापलिकडे जाणे नव्हते तर  येणार्‍या संकटांना तोंड देत साहसी प्रवास होता. जांबुवंताच्या प्रेरणेने हनुमानाच्या विस्मृतीत गेलेल्या शक्ती परत मिळाल्या होत्या.

             हनुमानाला उडतांना पाहून देवतांनाही आनंद झाला.कांही देव त्याला मदत करुं इच्छित होते तर कांही देव परीक्षा घ्यायची इच्छा धरुन होते. हनुमान उडत असतांना त्याला समुद्रात कांही तरी चमकतांना दिसले. जसजसा तो पुढे जाऊ लागला, तशी ती वस्तू आकाराने मोठी होत असलेली दिसली. तो पर्वत होता. समुद्रातून भला मोठा आकार घेत आकाशाला टेकून हनुमानाची वाट अडवली. त्या पर्वतावर सुंदर तलाव, रसरशीत फळाची झाडे, औषधी वनस्पती, देखणे उद्यान, बसण्या साठी आरामदायी व्यवस्था, विहरत असलेले पक्षी, प्राणी…आणी पर्वताच्या मध्यभागी त्याच्याच उंचीचा तेजस्वी व्यक्ती हात जोडून हनुमानाकडे बघत होता. मंजुळ आवाजात ती व्यक्ती म्हणाली, मी देवतांच्या वतीने आलोय.   श्रीरामाला मदत करण्याची तुझी दुर्दम्य इच्छा बघून सर्व देव तुझ्यावर प्रसन्न आहे

मी मैनाक पर्वत! खूप वर्षापूर्वी स्वर्गराजा इंद्र विश्वातील सर्व पर्वत नष्ट करायला बाहेर पडले  होते. त्याकाळी पर्वतांना पंख असल्यामुळे आम्ही एका ठीकाणाहून दुसर्‍या ठीकाणी उडु शकत होतो. कांही गर्विष्ठ पर्वत उडण्याच्या शक्तीचा गैरवापर करुन मानवी वस्त्यांवर उतरल्यामुळे, प्रचंडप्रमाणात जिवित हानी झाली.संतापाने इंद्रदेवांनी सर्व पर्वतांचे पंख छाटल्यामुळे पर्वत अचल झाले.

              हातात वज्र घेऊन इंद्र माझेकडे  येत असलेले बघून मी खूप घाबरलो. समुद्रदेवता वरुणला माझी दया आली व इंद्राच्या कोपा पासून बचाव करुन माझी व्यवस्था समुद्रात खोल पाण्यात केली. आज या तुझ्या महान कार्यात व श्रीरामाच्या मदतीस निष्ठेने निघाले ल्या तुझे स्वागत करण्यासाठी वरुणदेवाने मला पाठवले आहे. पुढच्या प्रवासात तुला अधिक बळ मिळण्यासाठी कांही वेळ इथे विश्रांती कर. वरुणदेवाने माझी जशी मदत केली तशी मदत करण्याची संधी  मला मिळेल.

             मैनाक पर्वताची मोहात पाडणारी विनंती ऐकून हनुमान म्हणाला, मी जेव्हा मोहिमेवर निघतो तेव्हा विश्रांतीला थारा नसते. तुझ्या विनंतीचा स्विकार करतां येणार नाही. सध्या श्रीरामाच्या हिताचाच विचार आहे.परत येतांना विचार करेन.आतां आज्ञा द्या.

                       क्रमशः
 संकलन, लेखन व ©®मिनाक्षी देशमुख.
                      दि. २२-७-२०२२.

!!! हनुमान  !!!

                   भाग – ८.

          हनुमानाने पर्वताला हात लावून वंदन केले व पुढे मार्गस्थ झाला. हनुमानाची समर्पक वृत्ती बघून मैनाक पर्वत स्तब्ध झाला.अचानक समुद्र खवळला. हनुमानाने वेग कमी करुन अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दक्ष प्रजापती राजाची खापर पणती सुरसाला देवांनी याची परीक्षा घेण्यास पाठवले.ज्या देवां च्या कार्यासाठी हनुमान निघाले होते, तेच देव त्याची परीक्षा घेण्यासाठी कठोर ह्रदयी नाग माता सुरसाला पाठवतात. सुरसा त्याचा मार्ग अडवून म्हणाली मला टाळून तू पुढे जाऊ शकत नाही. मला मिळालेल्या ब्रम्हदेवांच्या वरा नुसार जो मला टाळून जायचा प्रयत्न करेल तो माझे भक्ष्य होईल. आज तू माझे भक्ष्य आहेस. हनुमान तिला विनवत म्हणाले, माते मी राम कार्यासाठी निघालो आहे. तुला वचन देतो, कार्य पूर्ण झाले की नक्की परत येईन विश्वास ठेव. पण ती ऐकायलाच तयार नव्हती. तिने आपले तोंड त्याला गिळता येईल एवढे उघडले. हनुमान स्वतःच महाकाय रुप धारण करत ती  जेवढं मोठं रुप उघडत होती ते तिच्यापेक्षा मोठं रुप धारण करीत होते. शेवटी छोटं रुप होऊन तिच्या तोंडात शिरुन बाहेर आले. तिच्यासमोर  हात जोडून उभे राहत हनुमान म्हणाले, माते, मी ब्रम्हदेवांच्या शब्दाचा मान करुन तुझ्या पोटात शिरुन बाहेर आलो. मला सीतामाईचा शोध घेण्यास जाण्यासाठी आशिर्वाद व अनुमती दे!

            हनुमानाची बुध्दीमत्ता बघून सुरसा प्रसन्न झाली. भरभरुन आशिर्वाद देऊन ती निघून गेली. हनुमानाने परत आकाशात झेप घेतली. मनाच्या विचारांबरोबर उडण्याचाही वेग वाढवला. अचानक त्याचं शरीर थांबलं,ते हवेत तरंगु लागले. त्यांना कुणीतरी पकडले होते. पण दिसत नव्हतं. खाली खेचल्या जाऊ लागले. कारण कळत नव्हते. कुठली तरी वाईट शक्ती त्यांच्या सावलीवर कब्जा करुन खेचत होती.ते वेगाने समुद्राकडे ओढल्या जाऊ लागले. ज्या क्षणी त्यांचे पाय समुद्राला लागतील त्या क्षणी ती शक्ती त्याचा घात करेल हे त्यांना जाणवले. हनुमानाला कांही कळायच्या आत समुद्राचे पाणी दुभंगले आणि तोंड वासून  बाहेर आली. “सिंहिका”  तिच्याबद्दल सुग्रीवने आधीच माहिती दिली होती. लंकेच्या मार्गातील ती सगळ्यात भयान व भितीदायक राक्षसीन होती. रावणाने तिला मुद्दाम उपाशी ठेवले होते.जेणे करुन लंकेकडे येणारला ती आपलं भक्ष्य सहज करुं शकेल. तिच्या भल्यामोठ्या तोंडात मोठे अणुकुचीदार दात होते. क्षणार्धात हनुमानाने सुक्ष्म रुप घेऊन तिच्या मुखात प्रवेश करुन तिचा जबडा पसरवून दहा बोटांच्या सहाय्याने आपल्या तीक्ष्ण टोकदार नखांनी फाडला व आत शिरत शिरत अख्ख शरीरच फाडलं. तिला आंतमधे असह्य वेदना होऊ लागल्याने ती व्याकुळ झाली. तिचे पोट फाडून हनुमान बाहेर आले.रक्ताचा प्रचंड लोट सुरु झाला. सिंहिका.. कुठे कुठे निशाचरी असाही उल्लेख आढळतो.

तिच्या शरीराचा असंख्य माशांनी फडशा पाडला. समुद्र रक्ताने लाल झाला. हनुमानाने पुन्हा उड्डान भरले. आतां कांही पळातच लंकेला पोहचणार होते, त्याच बरोबर सीतामाई जवळ कसे पोहचायचे हाही विचार सुरु होता.

            आकाशातून लंका फारच सुरेख दिसत होती.लंकेच्या भौगोलिक व स्वर्गीय सौंदर्याने ते मंत्रमुग्ध झाले. किनार्‍या पलिकडच्या डोंगरावर जंगल पसरले होते. त्या जंगलात लंकेच्या संरक्षणार्थ सोनेरी भिंत उभारलेली होती. हनुमान लंकेच्या पर्वतावर उतरले आणि आंधार पडण्याची वाट बघू लागले. सुवर्ण नगरीच्या आंत शिरण्यासाठी त्यांनी मांजराचे रुप धारण केले आणि प्रवेश दाराच्या गजामधून एवढ्या कडेकोट बंदोबस्तातून लंकेत शिरले. मांजर थोडे पुढे जाताच त्यांचा रस्ता रोखून एक भयानक आवाज गर्जला, कोण आहेस? आतां स्वतःचं खरं रुप लपवण्यात अर्थ नव्हता.कुठे कुठे मच्छराचे रुप घेतल्याचाही उल्लेख आढळतो. हनुमानाने वानररुप धारण केले. ती व्यक्ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, मी लंकिनी! माझ्या आणि लंकाधिशाच्या अनुमती शिवाय कुणीच प्रवेश करुं शकत नाही आणि रागाने तिने हनुमानाच्या थोबाडीत मारले. आज पर्यत हनुमानाला असे कोणीही मारले नव्हते. संताप अनावर होऊन हनुमानाने जोरदार मुक्का मारल्याबरोबर ती दूर जाऊन कांही क्षण निपचित पडली.

          जेव्हा उठली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते. कांही वेळापूर्वीची राक्षसी क्रूरता राहिली नव्हती. हात जोडून हनुमानापुढे गुडघे टेकून म्हणाली, फार पूर्वी ब्रम्हदेवांनी सांगीतले होते, ज्यावेळी वानर येऊन तुला ठोसा मारेल त्या दिवसापासून लंकापतनास सुरुवात होईल. आता लवकरच रावण इतिहासात जमा होईल. तू तुझ्या मोहिमेत यशस्वी होऊन प्रभू रामांचा विजय होईल असा आशिर्वाद देऊन निघून गेली

           लंकेचे ते महाद्वार एका ठोश्यात उघडल गेलं.आता सीतामाईचा शोध घ्यायचा होता.

                     क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                   दि. २२-७-२०२२.

                             

 

अंजनीपुत्र हनुमान चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading