अंजनीपुत्र हनुमान चरित्र भाग ४, (१३ ते १६)

गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

राजा दशराथांना बरेच दिवसांपासून शांतानंतर पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून पायसचे पात्र घेऊन दिव्य पुरुष बाहेर आला.ते पायसपात्र दशरथांच्या हाती देऊन तिन्ही राण्यांना द्यायला सांगीतले. त्याप्रमाणे राण्यांना प्रसाद देत सुमित्राच्या………………………..

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! अंजनीपुत्र हनुमान !!!

!!!  हनुमान  !!!

                    भाग – १३.

            जांबवंतानी हिमालयात उपलब्द असलेल्या चार वनस्पतींची नांवे सांगून हनुमाना ला आणायला सांगीतले. औषधी वनस्पतीचे गुणधर्म सांगत, पहिली वनस्पती मृतसंजीवनी.. ही मृत मनुष्यास जीवदान देते. दुसरी शैल्य करणी.. या वनस्पतीने रुतून बसलेले शस्र बाहेर निघून जखम त्वरीत भरुन येते. तिसरी वनस्पती सुवर्णकर्णी.. ही शरीरास त्याचा मूळ रंग,रुप परत देते.आणि चौथी वनस्पती समधानी… ही मोडलेल्या हाडांना जोडते.

            चारही वनस्पतींची नांवे मनावर कोरुन हनुमानाने हिमालयाकडे प्रस्थान केले.हनुमान येईपर्यत जांबुवंताने वानरांच्या मदतीने संपूर्ण युध्दभूमीवर स्वच्छता अभियान सुरुं केलं. सर्व राक्षसांचे मृतदेह समुद्रात फेकून दिले.आणि वानरांचे मृतदेह एका बाजूने गोळा करुन ठेवले. दीर्घ अनुभवाने जांबुवंताला माहित होते, वनस्पतीने चमत्कार नक्की घडेल. याचा फायदा शत्रूपक्षाला म्हणजेच राक्षसांना होऊ नये म्हणून ही स्वच्छता मोहिम ताबडतोब हाती

घेतली.

            वाटेतल्या आव्हानांना तोंड देत हनुमान हिमालयावर पोहचले.औषंधांची पुरेशी माहिती नसल्यामुळे औषध शोधने हनुमानाला अवघड जात होते. एरवी शोधलीही असती, पण वेळे अभावी शेवटी संपूर्ण पर्वत उखडून अतिशय वेगाने परतीच्या प्रवासाला लागले.युध्दभूमीवर पोहचल्यावर जांबुवंताने तुरंत उपचार केला.लक्ष्मणासह सर्व मृत वानर सुध्दा जिवंत झालेले बघून सर्वांना आनंद झाला. हनुमानाने  हिमालय पर्वत पुन्हा जागेवर नेऊन ठेवला. आणि परत येऊन युध्दाच्या शेवटच्या टप्प्यात सहभागी झाले.

            लक्ष्मणाने इंद्रजितचा तर हनुमानाने  राक्षसांचा नायनाट केला. श्रीराम आणि रावण यांच्यातील द्वंदयुध्द दोन्हीकडील सेना युध्द थांबवून पाहत होती. बाणांचा वादळी पाऊस दोन्ही बाजूंनी सुरु होता. प्रभू रामांच युध्द कौसल्य बघून वानरसेना थक्क झाली. दोन्ही बाजू तेवढ्याच ताकदीच्या होत्या. शेवटी रामांनी सोडलेला बाण रावणाच्या छातीत घुसला व रावण निष्र्पभ होऊन कोसळला.सर्वी वानरसेना आनंदाने नाचू लागली.

            एकीकडे वानरसेना विजयोत्सव साजरा करीत होते तर दुसरीकडे राक्षससेना नवीन राजाच्या अभिषेकाचा आनंदोत्सव साजरा करीत होते. एवढा सर्व आनंदमय वातावरण असतांना राम मात्र काळजीत होते. सीतेबरोबर पुनर्मिलन व भरतभेट! राम चिंतेत दिसल्यामुळे हनुमानानेही आनंदोत्सवात भाग घेतला नाही. त्यांची मोहिम अजून संपलेली नव्हती.

बिभीषणाच्या राज्यभिषेकानंतर रामांनी अशोक वाटिकेतून सीताला आणण्याची आज्ञा झाल्याबरोबर हनुमान धावत निघालेला बघून त्यांना थांबवत राम म्हणाले, बिभीषण लंकेचा राजा आहे त्याच्या परवाणगी शिवाय त्यांच्या शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणे योग्य नाही.किती दूरदृष्टी होती रामांची? उगीच नाही त्यांच्या एका हाकेवर प्राणपणाला लावत लोकं!

               हनुमान अशोकवाटिकेत प्रवेश करत असलेले पाहून पहार्‍यावरील ७०० राक्षसीनी बाजूला होऊन त्यांना सीतामाईकडे जाण्यास वाट करुन दिली. त्यांच्या डोळ्यांसमोर पूर्वीच्या भेटीचं दृष्य साकारलं.गेल्या सात दिवसात लंकेत सर्वच गोष्टी बदलल्या होत्या.आणि म्हणूनच पहारेकरींनी निर्विघ्न सीतेजवळ जाऊ दिले.सीतेसमक्ष पोहचून तिला वंदन केले.आणि रावणाच्या मृत्युची बातमी व राम खुशाल असल्याचे सांगून, त्या रामाकडे जाण्यास स्वतंत्र असल्याचे सांगीतले.रामांनी वचन दिल्या प्रमाणे तिची रावणाच्या कैदेतून सोडवले होते. सीतेच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिच्या सुटकेसाठी हनुमानाने घेतलेले कष्ट पाहून असंख्य आशिर्वाद दिले. सीता त्याच्या बरोबर निघाली असतां हनुमानाने विचारले, गेल्या दहा महिन्यात या छळ करणार्‍या राक्षसीनींचा वध कसा करायचा विचारल्यावर ती म्हणाली, त्यांनी आपल्या स्वामींची आज्ञा पाळली. स्वतः च्या मर्जीने नाही छळले.माझ्या गतजन्मीची फळं असेल.चुक करणार्‍यांना क्षमा करण्यातच मनुष्याचा मोठेपणा आहे बदला घेण्यात नाही.तिचे ऊच्च विचार ऐकून हनुमान भारावले. नंतर तावून सलाखून अखेर राम सीता मिलन झाले.

         रामांना आणखी एक महत्वाचे काम करायचे होते. भरताला भेटणे. १४ वर्षे पूर्ण झाल्याबररोबर राम भेटले नाही तर, भरत अग्नीप्रवेश करणार. त्या साठी वेळेत अयोध्येला जाण्यासाठी बिभीषणा ने पुष्पक विमानाची व्यवस्था केली होती. मार्गात बरेच ठीकाणी थांबावे लागणार होते. विमान मनोवेगाने जरी उडत असलं तरी रामांनी अनेक ऋषीमुनींना भेटण्याचे वचन दिले होते. म्हणून भरताला संदेश देण्यासाठी कांहींना पुढे पाठवले होते.

                  क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                 दि. २३-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                    भाग – १४.

              १४ वर्षाचा वनवास संपल्यावर एक दिवसही थांबणार नाही असे भरताने रामाला सांगीतले होते. आजच्या दिवसाचा अखेर व्हायला थोडाच अवधी शिल्लक होता. राम येण्याचे कांहीच चिन्ह दिसत नव्हते.जसा वेळ जाऊ लागला, भरत रामभेटीसाठी व्याकुळ होऊ लागला.शतृघ्न,मंत्री व मान्यवरांना कळेना, भरताला अग्नीप्रवेशा पासून प्रवृत्त कसे करावे?

भरताच्या बाजूच्या झाडावर हनुमान बसले होते भरताला निरोप देण्यास रामांनी त्याला पुढे पाठवले होते.पण इथे तर जीवन संपवण्याची पूर्ण तयारी भरताने केली होती. त्यांनी लगेच रामकथा गाण्यास सुरुवात केली. हे गोड गायन ऐकून भरताने आपला विचार स्थगित केला.या रामदूताने त्यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्या ला संकटातून वाचवले. सीतेला प्रभू रामांचा संदेश सांगून, लक्ष्मणाला हिमालयातून औषध आणून आणि आतां राम येत असल्याची बातमी देऊन भरताला वाचवले.

           प्रभू रामांच्या अभिषेकानंतर ज्यांनी निरपेक्षपणे मदत केली त्यांना अंशतः भेटवस्तू द्यायची रामांची इच्छा होती.त्यानुसार प्रत्येका ला बोलावून आदरसत्कार केला.शेवटचा होता, अतिशय शालीन,लाडक्या हनुमानाचा, त्यांच्या पराक्रमाचा,शौर्याचा, कर्तबगारीचा! रामाने उठून त्यांना अलिंगन दिले. सीतेने त्याला आपल्या गळ्यातील मौल्यवान हार दिला. खरे तर रामाच्या स्नेहाशिवाय कांहीही नको होते. पण सीतामाईला नाही म्हणू शकत नसल्याने निरिच्छपणे सीतेची भेट स्विकारली. त्यानी तो हार निरखून बघितला पण त्यांना हवे ते सांपडत नव्हते म्हणून हारातला एक एक हिरा फोडला. हजारो चेहरे अचंबेने पाहत होते. सभागृहातील प्रत्येकाला त्यांचे हे कृत्य पचवणे जड जात होते. कुणीही प्रत्यक्ष सीतेने दिलेली भेट तेही तिच्याच समोर उध्वस्त करुं शकतो? सर्वांना चीड आली. स्पष्टीकरण मागतल्यावर अतिशय नम्रपणे हनुमान म्हणाले , रामसीते शिवाय आपल्याला कांहीही मौल्यवान नाही. म्हणून प्रत्येक हिर्‍यात त्यांना शोधत होतो. हे ऐकून राम सीता अत्यंत प्रसंन्न झाले. दोघांसाठी खरा हिरा हनुमानच होता. परंतु हनुमानाने त्यांचा अपमान केला असे वाटल्याने एकाने हनुमानाला आव्हान देत म्हणाला, तुला जर कोणत्याही वस्तुत, हिर्‍यात रामसीता नाही दिसले तर कवडीमोल वाटत असेल तर, तुझ्या ह्रदयात राम लक्ष्मण आहेत हे सिध्द करुन दाखव. हनुमंताने क्षणाचाही विलंब न लावता सभागृहा च्या मध्यभागी उभा राहून, ओरबडून आपली छाती उधडून उघडी केली. संपूर्ण सभागृहात रक्त पसरले.लोक भयचकित झाले. हनुमानाने स्वतःच्या हाताने छाती फाडली आणि त्यांना दिसले, त्याच्या ह्रदयात सिंहासनावर बसलेले राम सीता दिसले. सर्व लोकं अचंबित झाले. राम सीताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.लोकं लज्जित होऊन या निष्ठावान भक्ताच्यापायाशी लोटांगण घालू लागले.

             रामांनी प्रत्येक वानराचा व सेनाप्रमुखा चा स्वतः सत्कार केला होता.सर्वांनी नीतिमत्ये नुसार समाजसेवा चालु ठेवण्यास सांगून, स्वगृही परतण्याची विनंती केली.सर्वांनी स्वाश्रू नयनाने अयोध्येचा निरोप घेतला. मागे राहिलेत फक्त राम, लक्ष्मण व हनुमानाला मनातील कांही इच्छा असल्यास मोकळेपणे सांगण्यास रामांनी सांगीतले. पहिल्यांदा हनुमान मनातील विचार सांगू लागला, प्रभू! आपल्याविषयी सदैव प्रेम राहावे, आपली सेवा करतांना तसूभर ही लक्ष विचलित होणार नाही, आपला क्षणभर विसर पडणार नाही, आपल्या व्यतिरिक्त कुणाचीही सेवा करण्याची इच्छा होऊ नये. या विश्वात जोपर्यंत आपली कथा आपली कीर्ती राहील तोपर्यंत मी रहावे एवढा एकच “वर” मिळावा! याशिवाय दुसरी इच्छा नाही.

         हनुमानाचे वक्तव्य ऐकून राम सद्गदित झाले.भावनाविवश होऊन त्यांनी हनुमानाला कडकडून अलिंगन दिले. आणि केलेल्या सेवे बद्दल कृतज्ञता व्यक्त करुन म्हणाले, आजपर्यत जे केले व पुढे जे केले त्याबद्दलची परतफेड केवळ अलिंगन देऊन करतील. रामांनी दिलेल्या अलिंगनामुळे हनुमानमधे विशेष शक्ती निर्माण झाली.हनुमानाने ठरविले, श्रीरामांच्या कृपेने लाभलेले हे शरीर कायम भौतिक जगात राहिल आणि विश्वात जिथेही रामकथा गायल्या जाईल त्या ठीकाणी शांतपणे कथा ऐकत राम स्मरणात वेळ व्यतित करेन.

                     क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                  दि.२४-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                   भाग – १५.

           अयोध्यानगरीत एक ज्योतिष आल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. चौकाचौकातून भविष्य बघण्यार्‍यांची गर्दी होऊ लागली पत्रिका व हस्तरेषांवरुन भविष्य सांगणे त्याच्या हातचा मळ होता. उद्देश मात्र वेगळा होता. वेशांतरीत ज्योतिषी दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवान शंकर होते.राजवाड्यातील बाल रामाचे दर्शन घ्यायचे होते. कौसल्येच्या कानी वार्ता गेल्यावर तिने रामाचे भविष्य बघण्यासाठी पाचारण केले. त्याबरोबर शंकरांना अतिशय आनंद झाला.त्यांना बाळरुपात असलेल्या श्रीविष्णूचे दर्शन झाले पण त्यांच्या योजनेचा बट्टयाबोळ झाला. माता कौसल्याने बाळाला खाली सोडल्याबरोबर ते दुडक्या चालीने ज्योतिषाजवळ जाऊन त्यांचे चरणस्पर्श करुन नमस्कार केला. शिवशंकर स्तब्ध झाले. प्रभू रामांनी त्यांचे चरणस्वर्श केल्यामुळे त्यांना खूप ओशाळल्यासारखे झाले.

                कांही वेळाने अयोध्यानगरा बाहेर पडल्यावर कांही तरी ठरवून ते दक्षिण दिशेला हजारो दूर असलेल्या अंजनाद्री पर्वतावर पोहचले.विष्णू रुपातील रामांनी त्यांचे चरणस्पर्श केल्याने ते इतके अस्वस्थ झाले की, रामाचे सेवक होऊन राहण्याची इच्छा निर्माण झाली. रामसेवक आणि घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप करण्यासाठी शिवशंंकरांना अवतार घेण्यावाचून पर्याय नव्हता.म्हणूनच ते अंजद्रा पर्वतावर आले होते. इथे आधीच त्यांच्या अवतारात हनुमान राहत होता. हनुमानाला अयोध्येस नेण्यासाठी त्याची आई अंजनाला समजावून तिची अनुमती मिळवली.

             कांही दिवसांनी एक मदारी एका चपळ माकडाला घेऊन अयोध्या नगरीत येऊन लोकांचे मनोरंजन करुं लागला. हा मदारी श्री शंकराच्या तोडीचा डंबरु वाजवतो अशी चर्चा  लोकांत सुरु झाली.ठीकठीकाणी खेळ दाखवत मदारी त्या गोंडस माकडाला घेऊन राजवाड्या समोर येऊन खेळ दाखवू लागला. डमरुचा ध्वनी ऐकून राम अपल्या तिन्ही भावांसह राज वाड्याच्या प्रवेश दारावर आले.पाठोपाठ राजा दशरथ व तिन्ही राण्याही आल्या.आलेल्या प्रभू रामाला बघून मदारी व माकडात नवीन उर्जा निर्माण झाली.मदारी स्वर्गीय वादन करीत असल्यामुळे सर्वजण आनंदाने डोलत होते. वादन अगदी शिगेला पोहचले आणि मदारीने खेळ आवरता घेतला.तेवढ्यात ते माकड हवय म्हणून रामांनी दशरथ राजाकडे हट्ट धरला. मदारीला माकड मागीतल्यावर त्याने आनंदाने दिले.

         श्रीरामाच्या स्पर्शाने माकड इतके आनंदी झाले की स्पर्शसुख घेण्यासाठी त्याने डोळे मिटून घेतले.आनंदाश्रू वाहू लागले.इच्छित स्थळी पोहचल्याचा आनंद झाला. सहजपणे माकडाला दिल्याबद्दल मदारीला कांही द्यावे म्हणून राजाने त्याला बोलवावे म्हणून बघितले तर मदारी गायब!  सर्वांनी खूप शोध घेऊनही सांपडला नाही. पण खरच तो गायब झाला होता का? नाही… तो माकडाच्या रुपात अयोध्येतच राहिला होता.

            प्रभूराम त्या माकडावर ऐवढे खुष होते की रात्रंदिवस त्याच्याशीच खेळत.आपल्या जन्मोजन्मीच्या स्वामीबरोबर रहायला मिळत असल्यामुळे ते माकडही खुश होते.त्यांचे तो छोटे मोठे कामे करीत. काम नसेल तेव्हा रामां कडे टुकुरटुकुर बघत बसे.ते माकड रामाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग झाला होता. राम जे ही करत त्या सर्व कामात,खेळण्यात, घोडस्वारीत प्रत्येक ठीकाणी तो रामांबरोबर असायचा.राम झोपल्यावर त्यांच्या पलंगाखाली झोपत असे.

       असेच एक दिवस राम पतंग उडवित होते. त्यांनी माकडाला पतंग हाती घेऊन आकाशात सोडायला सांगीतले. पतंग उडत उडत उंच ढगा आड गेल्यावर रामाने ढील दिल्यावर पतंग आणखी उंच गेली व अडकली.खूप प्रयत्न करुनही पतंग सुटेना तेव्हा दोर्‍यावरुन माकडा ला वर जाऊन पतंग सोडवून आणायला सांगीतले. माकड शिताफीने वर जात स्वर्गात पोहचला. स्वर्गात इंद्रपुत्र जयंतने पतंग पकडली होती. ही पतंग रामाची असून सोडण्याची विनंती केली पण जयंत अडूनच बसल्यावर, माकड आपल्या पूर्व हनुमानाचे रुप धारण केले. जयंतने भेटीची इच्छा व्यक्त केल्यावर राम चित्रकुटावर भेटतील असे आश्वासन दिले.पतंग मिळताच हनुमानानं परत माकडाचे रुप धारण करुन पतंग घेऊन रामाकडे आला.

              परतु सुखाचे क्षण अचानक संपुष्टात आले.एके दिवशी विश्वामित्र ऋषी राजा दशरथा कडे येऊन रामाला सोबत नेण्याची विनंती केली.बराच वेळ विचारविनिमय झाल्यावर राजाने अनुमती दिली. रामाला कळल्यावर, राम माकडाला म्हणाले, हनुमाना, आपला एकत्र राहण्याचा काळ कांहीवेळासाठी संपुष्टात आला.माझ्या आयुष्य मोहिमेवर जाणं गरजेचं आहे. तूं आतां सुग्रीवाचा मंत्री म्हणून रुजू हो. एक दिवस मी तिथे येईन तेव्हा तूं माझ्या आयुष्याच्या मोहिमेचा भाग म्हणून रुजू होशील वय मोठं झालं की, जबाबदारी बरोबर त्यागही येतोच.रामाने आधी त्याचा त्याग केला आणि हनुमानाने  स्वतःचं स्वातंत्र्य त्यागून सुग्रीवाची चाकरी रामाज्ञाने स्विकारली.

                    क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                      दि. २४-७-२०२२.

!!!  हनुमान  !!!

                      भाग – १६.

               एक दिवस हनुमानाच्या कानावर वीणेचे मधूर स्वर ऐकू आल्यावर त्यांना संगीत शिकायची इच्छा निर्माण झाली.संगीताचे सखोल अभ्यास करुन सगळी वाद्य शिकायचा निश्चय केला. ज्या दिशेने आवाज येत होता तिकडे गेले तर, नारदमुनी मधूर आवाजात गात असलेले दिसले.त्यांनी नारदाला विनम्र नमस्कार करुन संगीत शिकवण्याची विनंती  केली.आणि कांहीच दिवसात हनुमानाने संगीत कला आत्मसात केली.विविध वाद्ये अतिशय कौसल्यपूर्ण वाजवण्यात इतक्या कमी वेळात विश्वास बसणार नाही एवढी प्रगती केली.परीक्षा म्हणून हनुमानला अवघड रचना गाण्यास सांगीतली. पद्मासन घालून डोळे मिटून एकाग्रतेने अतिशय गोड आवाजात ह्रदयापासून त्यांनी गायलेलं गाणं नारदाला अतिशय आवडले.ते स्तब्ध होऊन गाणे ऐकतांना हातातील वीणा कधी निसटली  नारदांना कळलेच नाही.

          हनुमंताच्या गोड गायनाने आजूबाजूचे वातावरण मंत्रमुग्ध, प्रफुल्लीत झाले.पाषाणाला पाझर फुटला.झाडांमधून फुलं बरसू लागली. प्राणी,पक्षी भान हरवून गाणं ऐकू लागले.या सर्वापासून अनभिज्ञ हनुमान मनापासून गात होते. त्यांचे गायन संपल्यावर सर्व पुर्ववत झाले. शिष्याचे कौतुक वाटायला नारदांना शब्द अपूरे पडले.आणि हातातून वीणा निसटल्याचे नारदा च्या लक्षात आल्यावर ते वीणा घेण्यास खाली वाकले. वजनाला अतिशय हलकी वीणा उचलायला लागले तर वीणा तसूभरही जागची हलली नाही.जमीनीला चिटकली होती. वीणा काढतांना नारदांना घाम फुटला. पाषाण विरघळावा म्हणून गाण्याचाही प्रयत्न केला पण व्यर्थ! त्यांनी मदतीच्या अपेक्षेने हनुमानाकडे बघितले. मिस्किल हसत मागे मागे गेले.नारदही त्यांच्या मागे गेले. निराश झालेले नारद त्यांच्या मागे चालू लागले.तसा हनुमानाने वेग वाढवला.  तेवढ्याच जोराने नारद त्यांचा पाठलाग करुं लागले. दोघेही एकमेकांचा पाठलाग करत संपूर्ण पर्वत पालथा घातला.आणि मुळस्थाना वर येऊन वीणाशेजारी हनुमान येऊन बसले. नारदही पोहचले.शांत बसलेल्या हनुमानाकडे बघत, नारदांनी विचारले, तूं असा पळून कां गेलास? हात जोडून नम्रपणे हनुमान म्हणाले, गुरुजी, या संपूर्ण भूमीवर तुमच्या पदकमलांची धूळ हवी होती.अशी युक्ती केली नसती तर आपण कधीच माझी ही इच्छा पूर्ण केली नसती.आपल्याला धावायला लावल्याबद्दल क्षमा असावी. असं म्हणून हनुमान परत गायन करुं लागले. आणि कांही क्षणातच पाषाण विरघळू लागले. नारदांनी आपली वीणा सोडवून घेतली.ते आपल्या शिष्याच्या गुणांवर प्रसन्न तर झालेच, पण नम्रपणा आणि गुरु बद्दलचा असलेला आदर त्यांना स्पर्शून गेला. तुझ गाणं सदैव तुझ्या स्वामीचं लक्ष वेधून घेईल असा आशिर्वाद देऊन नारद निघून गेले.

            रावणाकडे प्रहस्तपुत्र जांबुमाली नावाचा अत्यंत बलाढ्य, शक्तीमान राक्षस होता तो जागृतावस्थेत असला की, त्याला आवरणे फार अवघड व्हायचे म्हणून त्याला सतत मद्याच्या नशेत ठेवल्या जाई. हनुमानाने लंकेतील सर्व उद्याने उध्वस्त केले तेव्हा जांबुमालीला शुध्दीवर आणण्याची आवश्यकता भासली.त्याच्या मद्याच्या पेल्यात चुपचाप नशा उतरवण्याचे ओषध घातल्यावर त्याची नशा उतरली व चाल असल्याचे त्याच्या लक्षात आले तो आक्रमक बनून सैन्यावर कोसळणार एवढ्यात एका सैनिकाने धीर एकवटून नगराची झालेली अनावस्था सांगून रावण खूप चिंताग्रस्त असल्यामुळे तुम्हाला शुध्दीवरआणावे लागले. रावण तुमच्या प्रतिक्षेत आहेत.

            वास्तविक रावणाला त्याचे उध्दट वागणे, बोलणे बिल्कुल आवडत नसे पण कठीण प्रसंगी पूर्वी सुध्दा बरेचदा रावणाच्या कामी आला होता. त्यामुळे त्याला सहन करणे भाग होते. तो समोर आल्यावर काळजीयुक्त स्वरात रावण म्हणाला, तुला एका माकडाशी लढा द्यायचा आहे. काय? माझी थट्टा चालवली की काय? एका शुल्लक माकडाशी लढायला सांगताहात? तेव्हा त्याच माकडाने केलेल्या सर्व विध्वंशाची व हजारो सैनिक ठार केल्याचे सांगीतल्यावर जांबुमालीने मोहिम स्विकारली.

            त्याला फौजफाट्याची गरज नसतांना रावणाच्या आग्रहास्तव नाईलाजाने ऐंशी हजार सैनिकांसह अशोक वाटिके जवळ पोहचला. वाटिकेमधल्या राजवाड्याच्या उंच स्तूपावर एक माकड फळं खातांना दिसला.आलेली फौज बघून हनुमान म्हणाले, आतां कोणाचे दिवस भरलेत? मी प्रभूराम सेवक आहे. संतापून जांबुमाली म्हणाला तू कुठे आहेस हे माहित आहे का? जिथे गंधर्व व नवग्रह रावणाच्या दिमतीला असतात, माझे पिता प्रहस्त मोठमोठे पहाड खाऊन पचवतात तिथे तुझ्यासारख्या माकडाची.. एकदम हनुमान म्हणाले, तो भूतकाळ झाला. मी वर्तमान आहे. जरा चहुकडे नजर टाक. लंकेतील सर्व सुंदर उद्याने मी उध्वस्त केलेत, हजारो सैनिकांचा खात्मा केला.

           हनुमानाचे बोल ऐकून जांबुमाली एवढा संतापला की……

                 क्रमशः
 संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                    दि. २४-७-२०२२.

                             

 

अंजनीपुत्र हनुमान चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading