
राजा दशराथांना बरेच दिवसांपासून शांतानंतर पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून पायसचे पात्र घेऊन दिव्य पुरुष बाहेर आला.ते पायसपात्र दशरथांच्या हाती देऊन तिन्ही राण्यांना द्यायला सांगीतले. त्याप्रमाणे राण्यांना प्रसाद देत सुमित्राच्या………………………..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! अंजनीपुत्र हनुमान !!!
!!! हनुमान !!!
भाग – ९.
हनुमानांनी अगदी छोटं रुप घेऊन लंकेत एक फेरफटका मारला.तेथील सौंदर्यापुढे स्वर्गही फिके वाटत होते. त्या नगरीतील सर्वात सुंदर इमारत म्हणजे संपूर्ण सोन्याने मढवलेला लंकाधीश रावणाचा राजवाडा!रावणाच्या राजवाड्याच्या विविध कक्षांमधून सीतामाईचा शोध घेत फिरुं लागले.एका शयन कक्षामधे अपुर्या वस्रांमधे बर्याच स्रीया मद्यपान करुन झिंगत असलेल्या दिसल्या.आतल्या कक्षेत प्रचंड शय्येवर दशानन, लंकेचा अधीपती दिसल्यावर हनुमानाच्या मनात रावणाविषयी संमिश्र भावना निर्माण झाल्या व कीवही आली. राजेशाही,अतिशय देखणा,सुडौल,तल्लख बुध्दीमत्ता, वेदपरायण,संगीततज्ञ इतके चांगले गुण त्याच्यातील खलप्रवृतती, गर्व, अहंकारा मुळे सारे मातीमोल झाले होते.
सीतामाईचा शोध घेत असतांना हनुमानाची नजर एका सुंदर शय्येवर पहुडलेल्या सौंदर्यवान स्रीवर पडली. त्यांना वाटले आपला शोध संपला पण क्षणभरच! रावणाच्या शय्येवर सीतामाई? कालत्रयी शक्य नाही.श्रीरामांनी सीतामाईच्या तळपायावर पद्म रेखा व कमलपुष्पाच्या खुणा असल्याचे सांगीतले होते. त्या दोन्ही खुणा त्या स्रीच्या पायावर न दिसल्याने ही नक्कीच सीतामाई नसून रावणाची पट्टराणी मंदोदरी असावी.
हनुमान ब्रम्हचारी असल्याने अश्या अर्धनग्न स्रीया पाहाव्या लागत असल्याने त्यांना योग्य वाटत नव्हते पण हेतू फक्त सीतामाईचा शोध घेणेच असल्यामुळे अशा प्रसंगाला सामोरे जाणे भाग होते. या सर्व शोधात त्यांच्या लक्षात आले इथे सीतामाई असणे शक्य नाही.सीता तर प्रखर अग्निशिखा, त्यामुळे सीतेला या भौतिका पासून दूर ठेवणेच रावणाला सोईस्कर होते…. पण कुठे? एवढ्या मोठ्या नगरीत कुठे शोधावे?
लंकेचा कोपरा न् कोपरा, एकून एक राजवाडे, प्रत्येक रस्ता, गुप्त ठीकाणे शोधून झाले पण सीतामाईचा पत्ता लागत नव्हता. हनुमानच्या बुध्दीचा कस लागत होता.सीतामाई पर्यंत पोहचण्याचा रस्ता गवसत नव्हता. त्याचे मन विचलित होऊन नको त्या शंका मनात येऊ लागल्या. सीतेच्या नकारामुळे रावणाने तिचे बरेवाईट तर केले नसेल? लंकेत आणतांना समुद्रात तर पडली नसेल? रामविरहात जीवाचे बरेवाईट तर करुन घेतले नसेल?
नैराश्यावस्थेत हनुमान लंकेच्या अंधार्या कोपर्यात बसला. समुद्रकिनारी हजारो वानर त्यांच्या यशस्वी आगमनाची वाट बघत होते.पराभवाची वार्ता कळल्यावर आपले साथी मृत्युमुखी पडतील व सुग्रीवही आपले जीवन संपवेल.त्यांच्या एका पराभवाने केवढी भिषण स्थिती निर्माण होईल याचे चित्र समोर उभे राहिले. पराभव झालाच तर स्वतःही संपवण्याचा विचार केला.
सीता शोधण्याचे सर्व मार्ग बंद झाले वर हनुमानाने रामनाम जप सुरु केला.आणि अचानक ढगाआडून चंद्र उगवल्यामुळे लंकेतील सर्वात सुंदर बाग दिसली.नक्कीच सीतामाईला इथे ठेललं असावं आणि हनुमान मोठ्या आशेने व उत्साहाने पळत सुटले.
बागेतील एका अशोकाच्या झाडाखाली कृश पण दैदीप्यमान स्री बसलेली दिसली. त्यांनी ताडले, अश्रूंनी भिजलेला चेहरा,साधे वस्र, असलेली हीच ती सीतामाई! या निरागस स्रीभोवती भयान दिसणार्या राक्षसीनींचा कडेकोट पहारा होता.अशा या भयान वातावरणातही अविचल होती.
तोवर पहाट झाली होती.अचानक ढोलाच्या आवाजाने सर्व पहारेकरी सजग झाले हलचल, लगबग वाढली. हनुमान सुक्ष्म रुपात एका झाडामागे लपले. लंकाधीश येत असल्या ची घोषणा झाली.त्याच्या बरोबर रेशमी वस्रांनी झाकलेल्या वस्रालंकाराच्या सुवर्ण थाळ्या घेऊन मोठा लवाजमा आला होता. सीतेसमोर येऊन रावण याचना करुं लागला, म्हणाला, हे सीते, या सुंदर वस्तुंचा स्विकार करुन स्वामी म्हणून, त्या भटक्या रामाला विसरुन माझा स्विकार कर! राम तुला कधीच शोधू शकणार नाही, नेण्याची गोष्ट तर दूरच.मला शरण ये व जीवनाचा आनंद घे.रावण एकाच वेळी आज्ञाही करीत होता व याचनाही!
सीतेच्या चेहर्यावरील आलेला संताप, करारीपणा एवढ्या दूरुनही हनुमानाला दिसत होता.ठाम आवाजात म्हणाली, हे रावणा! या शुल्लक भेटीचं आमिष मला काय दाखवतोस? मला या भोगवादी वस्तुंची किंचितही किंमतही नाही. सीता रामापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही….
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २२-७-२०२२
!!! हनुमान !!!
भाग – १०.
सीता म्हणाली, हे रावणा, तुला एक संधी देते, मला श्रीरामाच्या स्वाधीन करुन स्वतःचा या तुझ्या सुवर्णलंकेचा विनाश टाळ! मी तुला वचन देते, तुला रामाच्या क्रोधापासून वाचवेन. सीतेचा अवर्भाव पाहून, इतके दिवसां पासून छळूनही सीता तसूभरही बदलली नाही. संतापाने भेटवस्तूंच्या थाळ्या भिरकावून दिल्या. सोबतचे सारे भीतीने लटपटत होते,पण सीता मात्र शांत, अविचल, आव्हानात्मक नजरे ने रावणाकडे पाहत होती. रावणाने संतापाने मुठी आवळल्या, तिच्यावर हात उचलणार तेवढ्यात मंदोदरीने रोखले. कडक आवाजात त्याने सीतेला चेतावणी दिली.एका महिन्यात शरण नाही आलीस तर तुझे तुकडे तुकडे करीन आणि पाय आपटत निघून गेला. तो निघून गेल्यावर कांहीवेळा पूर्वी तिच्या अंगात संचारलेला आवेश नाहीसा होऊन परत ती आपल्या कोशात गेली.
हनुमानाला वाटले लवकरात लवकर सीतामाई जवळ पोहचायला हवय! पण कस? मुख्य दोन अडचणी होत्या. मुख्य म्हणजे तिच्या भोवती असलेल्या राक्षसीनींचा पहारा व दुसरं त्याला ती ओळखणार कशी? वेश बदलून रावणाचा हेर असेल अशी पण शंका तिला येऊ शकेल.सगळ्यात म्हणजे तिने आरडाओरडा केला तर सुरक्षारक्षक सजग झाले तर?सर्वांगीन विचार करुन योग्य संधीची वाट बघण्याचे हनुमानाने ठरविले.
सीतामाई ज्या झाडाखालि बसली होती त्याच झाडावर हनुमान बसले.अशोक वाटिका शांत होऊन गाढ झोपी गेली होती. तिच्या भोवतीच्या पहारेकर्याही पेंगुळल्या होत्या. वाटिकेच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षक पहारा देत होते. काय करावे? आणि सुचले. त्यांनी फक्त तिलाच ऐकू जाईल येवढ्या हळू आवाजात रामकथा म्हणायला सुरुवात केली. त्यात रामजन्मापासून ते वनवास, सीताहरण, सीताशोध मोहिमेत केलेल्या प्रयत्नांचे वर्णन व आतां हनुमान तिच्यापर्यत कसा पोहचला हेही कळवलं. ऐकून सीता अश्रू ढाळू लागली. हनुमान सुक्ष्मरुपात तिच्यासमोर जाऊन रामाचा दूत म्हणून स्वतःची ओळख करुन दिली. खरच तो रामदूत आहे की, नाही ते तपासण्यासाठी त्याची परीक्षा घेण्याचे तीने ठरवुन त्याला रामाचे वर्णन करायला सांगीतले.वर्णन केल्या वर हनुमानाने तिची खूण पटण्यासाठी रामाने दिलेली अंगठी तिच्यासमोर ठेवली.अंगठी पाहतांक्षणी तिचे डोळे वाहू लागले.रामांनी तिची अंगठी जपून ठेवल्याने त्यांच्याबद्दलचे प्रेम उफाळून आले.झालेला आनंद अवर्णीय होता. कृतज्ञतेने ती त्याच्याकडे पाहत होती. माते, माझ्या पाठीवर बसून रामाकडे चला. क्षणार्धात तुमची सारी दुःखे संपतील.असे तिने म्हटल्यावर आश्चर्याने त्याच्याकडे बघितल्यावर, हनुमानाच्या लक्षात तिच्या मनातील गोंधळ लक्षात आल्याने, त्वरीत आपल्या भव्य स्वरुपात येऊन वंदन केले व दुसर्याच क्षणी परत सुक्ष्मरुप धारण केले. आणि तिच्या निर्णयाची वाट पाहू लागले. ती म्हणाली, जगाला वाटेल हिचा पती राम सीतेला सोडवण्यास अक्षम आहे.एका राक्षसाने तिला लंकेत नेले आणि वानराने परत आणले.
नंतर सीतेने विचारले, राम कसे आहेत
तुम्ही त्यांच्यापासून दुरावल्यापासून ते नुसते तुमच्या विरहात जळत आहेत. रावणाने तिला पुष्पक विमानानून आणतांना समुद्राची अथांगता अनुभवली होती. म्हणूनच हनुमान एवढा मोठा समुद्र ओलांडून येणे सोपे नव्हते.त्याचे कौतुक करत म्हणाली, हनुमाना, तूं खरोखरच शक्तीमान आहेस. संकोचून म्हणाला, मला श्रीरामाने मला निवडले हे माझे परमभाग्यवान आहो.त्यांचे ठायी माझी संपूर्ण निष्ठा वाहिली आहे.आपल्याला संदेश पोहचवण्याची त्यांनी जबाबदारी माझेवर सोपवली ती पूर्ण केली. मी परत जाऊन सुग्रीव ससैन्य व राम-लक्ष्मणांना घेऊन सत्वर येतो. मी आपल्याला भेटून संदेश दिल्याची श्रीरामासाठी खूण द्यावी. तिने अंबाड्यातील चुडामणी काढून त्याच्या सुपर्द करत म्हणाली, या चुडामणीची माहिती फक्त तीन व्यक्तीनांच माहित आहे. हा माझ्या आईने राम व त्यांच्या पित्यासमोर दिला होता. हे सांगून तिने काळासुर नावाच्या कावळ्याची गोष्ट सांगून म्हणाली, ही गोष्ट फक्त राम आणि मलाच माहित आहे. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी गाठी बांधून हनुमान प्रभू रामांकडे निघाला.
हनुमानाने जाता जाता अशोक वन व इतर बगीचे नष्ट केले होते. फक्त ज्या झाडा खाली सीता बसली होती ते एकमेव अशोकाचे झाड उभे होते. रावणाने चौकशीकरितां पाठवले ल्या ऐंशी हजार सैनिकांचा नायक सीतेजवळ आला तोच त्याच्या तोंडावर हनुमानाने सफरचंद फेकून मारले. झाडावर कोण आहे हे पाहण्यासाठी एका सैनिकाला झाडावर चढण्या चा आदेश दिला. तो झाडावर चढला तोच त्याच्या बरगड्यावर जबरदस्त लाथ बसली खाली पडून गतप्राण झाला. हे पाहून सर्व सैनिक छुप्या शत्रुला तोंड देण्यास सज्ज झाले, तोच…
क्रमशः
संकलन, लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-७-२०२२.
!!! हनुमान !!!
भाग- ११.
हनुमान एका झाडाच्या जाड फांदीवर एक हात कमरेवर व दुसर्या हातात गदा घेऊन उभा दिसला. दोन सैनिकांच्या मस्तकावर प्रहार केल्याबरोबर त्यांच्या कवट्या फुटून तात्काळ गारद झाले. ते पाहून सेनानायकाने सैनिकांना हल्ला करण्याचा आदेश दिला. हजारो सैनिक शस्रांनिशी हनुमानावर झेपावले. आपली गदा गरगर फिरवत जय श्रीराम चा नामघोष करीत कांही वेळातच ऐंशी हजार सैनिक गारद झालेत
दुसरी तुकडी येईपर्यंत हनुमान फळं खात होते. यावेळी रावणाने आपला पुत्र अक्षयला पाठवले. आजपर्यत तो एकही युध्द न हरण्याचा विक्रम होता. त्यामुळे त्याच्यात जबरदस्त आत्मविश्वास होता पण हनुमानाच्या एकाच लाथेच्या प्रहाराने त्याचा आत्मविश्वास चक्काचूर झाला. त्याचे पाय धरुन हनुमानाने गरगर फिरवत जमीनीवर आपटले. अक्षयकुमारच्या मृत्युमुळे सगळी लंका हादरली.कोणालाही हनुमानाजवळ जाण्याचे धाडस होत नव्हते.
संतापून रावणाने मोहिमेची जबाबदारी
सर्वात शक्तीशाली पुत्र इंद्रजितवर सोपवली. इंद्रजितने अवलोकन केल्यावर शत्रू सामान्य नसल्याचे लक्षात आले. लबाडीने पकडण्याचा प्रयत्न केला पण सर्व चाली असफल झाल्या. शेवटी सर्वात शक्तीमान आणि हमखास अस्र हनुमानाच्या छातीचा नेम धरुन फेकले. हनुमानालाही आतांच सर्व सैन्य गारद करायचे नव्हते फक्त रावणाला हिसका दाखवायचा होता. आतापर्यंत बरचसं नुकसान करुन लंकेत दबदबा निर्माण केला होता. आता त्याचेशी समक्ष बोलण्याची वेळ आली होती म्हणून स्वतःच स्वाधीन व्हायचे ठरविले. ब्रम्हास्राचा मान राखावा म्हणून स्वतःला जखडून घेतले. ब्रम्हदेवांनी दिलेल्या वरामुळे कोणत्याही अस्र शस्राचा परिणाम हनुमानावर होऊ शकत नव्हता. त्यांनी स्वतःला कैद करवून घेतले.
हिरेजडीत रत्ने व पाचुंनी मढवलेल्या उंच सिंहासनावर बसलेला, पूर्ण लंकेत दहशत पसरवणार्या एवढ्याशा वानराला अपले शूर सैनिक पकडू शकले नाही व एवढा विध्वंश केल्याचे त्याला आश्चर्य वाटले.रावणाचे व्यक्ती मत्व बघून हनुमान प्रभावित झाले.जर त्याच्यात अहंकार नसता तर, रावण जगाचा पालनकर्ता झाला असतां पण….? आपल्याला आसन देत नसल्याचे बघून हनुमानाने स्वतःच्या शेपटी लांब करुन त्याची गुंडाळी केली व रावणाला त्यांचे कडे मान उंचावून पाहावे लागेल इतक्या उंचीचं आसन करुन त्यावर बसले. आपली ओळख देत म्हणाले, मी राजा दशरथ पुत्र रामाचा दूत, संदेश घेऊन आलो. सीतामाईला सन्मानाने रामाच्या स्वाधीन कर, अन्यथा येणार्या संकट आणि विनाशाला सामोरे जाण्याची तयारी ठेव. आपल्याच दरबारात सर्वांच्या समोर एका वानराने वापरलेली ही उद्दाम भाषा ऐकून क्रोधीत रावणाने त्याला ठार मारण्याचा आदेश दिला.
सर्व सैनिक शस्रे सरसावून हनुमानास मारण्यास पुढे सरसावलेले बघून, रावणाचा बंधू बिभिषण पुढे येऊन रावणाला युध्दाच्या नियमां ची आठवण देत म्हणाला, दूताला ठार करणं सर्वथा वर्ज्य आहे. इतक्या धीटपणे बोलणार्या बिभिषणाचे हनुमानाला कौतुक वाटले. बोलण्यात तथ्य वाटून, ठार मारण्यापेक्षा कांही भयंकर करायचे ठरविले.
रावणाच्या आज्ञेने शेकडो कापडाचे तुकडे दरबारात आणून हनुमानाच्या शेपटीला गुंडाळण्यात आले. अख्ख सभागृह व्याप्त होईल येवढी शेपटी हनुमानाने लांबवली. शेपटीला आग लावण्यात आली. हनुमानाला सभागृहाच्या बाहेर काढून, अख्ख्या नगरातून हनुमानाची धिंड काढण्यात आली. यावेळी हनुमानाने शहराचे अवलोकन केले. लंकावासी त्यांचे होणारे हाल बघून आनंदित होत होते.
सीतेला जेव्हा हनुमानाची शेपटी पेटवल्याचे समजले, तेव्हा त्याला कांही इजा होऊ नये अशी अग्निदेवाला प्रार्थना केली. अचानक दाह कमी झाल्याचे हनुमानाला जाणवले. ही सीतामाईचीच कृपा आहे हे ओळखले. पटकण कामगिरीला लागण्याचा निर्णय घेतला. अचानक त्यांनी आकार लहान करुन बंधणातून सहज मुक्त झाले.सैनिकांच्या हाती फक्त दोरच राहिला. सैनिक त्यांना इकडे तिकडे शोधत होते तोच ते एका इमारतीच्या छतावर दिसले. पाहतां पाहतां हनुमानाने इमारत पेटवली. तोच दुसर्या इमारतीवर उडी मारुन तीही पेटवली. अशा प्रकारे बिभिषणाची इमारत सोडून सुवर्ण नगरीतील सार्या इमारती पेटवल्या. लंकावासियांचा आकांत व भीतिग्रस्त लोकांवर त्यांना हसू येत होते.तोच अचानक…
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-७-२०२२.
!!! हनुमान !!!
भाग – १२.
हनुमानाच्या सर्व प्रयत्नावर पाणी फेरल्या गेले. इंद्राने अचानक पाऊस पाडला. लंकावासीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कां केले इंद्रांनी असे? ते नक्की कोणाच्या बाजूने आहेत? रावणाच्या की, रामाच्या? हनुमान व्यथित होऊन इंद्र काम आटोपून परतत असतांना त्यांची वाट अडवून विचारले, असे कां वागलात? हसून इंद्राने त्याला लंका नगरीकडे बघायला सांगीतले. लंकावासी अतिव दुःखाने व भयाने सैरावैरा पळत होते. संपूर्ण नगरीत हाहाकार माजला होता.आगीचे डोंब उंच उंच चढत होते. देवा हे कसं घडलं? इंद्र म्हणाले, हा पाऊस पाण्याचा नसून इंधनाचा आहे.त्यांचा इंद्राबद्दल अभिमान दुणावला. पर्वतशिखरावर बसून हनुमान लंकेचा
संहार बघत होते. नगरीचा कोपरा न् कोपरा पेटलेला होता. आणि एकदम सीतामाईची आठवण झाली, भीतीने अंगावर काटा उभा राहिला. हातून घडलेल्या मुर्खपणाबद्दल संताप आला.त्या आगीत अडकल्या असतील का?
ज्या कारणासाठी एवढ्या संकटावर मात करुन हनुमान लंकेत आले ते कारणच नष्ट होऊ घातले होते. या आगीमधे सीताबाईचे कांही बरे वाईट झाले तर जगण्याला अर्थच उरणार नव्हता. राम-लक्ष्मण, सुग्रीव समोर कोणत्या तोंडाने जाणार होते? स्वतःला दोष देत त्यांनी अशोक वाटीकडे झेप घेतली. आणि मन.. पायापेक्षाही भविष्याच्या विचाराने धावत होते. या बातमीने सर्वच सुग्रीवासकट राम लक्ष्मण देखील प्राण त्यागतील.आणि भरत शत्रृघ्न देखील! इक्ष्वाकू वंशच संपेल.संपूर्ण मानव दुःखाने ग्रासतील. या सर्व नाशाला आपण कारणीभूत होऊ. अशा विचारांच्या आवर्तनातच ते अशोकवनात पोहचले.
एकदम त्यांना जाणवले, अरेऽ अग्निच अग्निचं दहन कसे करेल? सीतेचं पावित्र्य अग्नीच्या पावित्र्याइतकेच प्रखर! अरेऽ जिच्या प्रार्थनेमुळे माझ्या शेपटीचा दाह कमी झाला, ती आगीत नष्ट कशी होऊ शकते? तिला सुरक्षित पाहून त्यांना खूप आनंद झाला. आशिर्वाद घेऊन हनुमान प्रभू राम व समुद्र किनार्यावर असलेल्या वानरसेनेकडे जाण्याची अनुमती घेतली. आपल्या एकट्याला येणंचं एवढं कठीण गेलं तर अख्ख सैन्य घेऊन येणे किती अवघड होईल या विचारातच हनुमान परतीच्या वाटेला लागले.
शोधमोहिमेवर निघालेली प्रत्येक तुकडी पराभवाची वार्ता घेऊन आल्याने रामाची अस्वस्थता वाढली होती. आतां वाट होती, दक्षिणेकडे गेलेल्या अंगदच्या टोळीची! रामांचा ताण वाढला होता.तेवढ्यात हनुमान तुकडीसह येतांना दिसली. प्रभु रामांजवळ धावत येत हनुमान म्हणाले, लंकेत सीतामाईचा शोध लागला. तिथे घडलेली प्रत्येक घटना सांगून झाल्यावर सीताने दिलेला चुडामणी दिल्यावर सीतेच्या आठवणीने त्यांना अश्रू आवरेनासे झाले. वातावरणातील ताण हलका करण्या साठी सीतामाईने सांगीतलेली काकासुराची गोष्ट सांगीतली.
राम म्हणाले, माझ्यासहित सारा रघुवंश हनुमानाच्या या कामगिरीबद्दल सदैव ऋणी राहील. आणि हनुमानाला रामाने अलिंगन दिले. हनुमानाला आपल्या श्रमाचे चीज झाल्याचा आनंद झाला. ज्या अलिंगनासाठी मोठमोठे ऋषीमुनी हजारो वर्षे तपश्चर्या करतात,ती मिठी आपल्यासारख्या यत्किंचित वानराला मिळाली यापेक्षा आणखी मौल्यवान भेट काय असू शकते? आणि नंतर कामाला एकदम वेग आला
नल आणि नील या वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली केवळ पांच दिवसात एक जुटीने वानरसेनेने शंभर योजने लांब व दहा योजन रुंद असा पाषाण सेतू समुद्रावरुन लंके पर्यंत बांधला. रावणाशी युध्द करायला उत्सुक वानरसेना लंकाकिनार्यावर पोहचण्यास आतूर झाली होती. आणि पोहचली सेना एकदाची लंकेत. युध्द रात्रंदिवस सुरु होते. दिवसा वानर सेना वरचढ असे तर, रात्री राक्षससेना मायावी शक्तीने सरस ठरायचेत.
रावणपुत्र इंद्रजित युध्दात उतरुन,त्याने अदृष्य रुपात हल्ला चढवला.विद्युतवेगाने हालचाल करत विविध दिशांनी अस्र चालवत होता. वानरसेना इंद्रजितच्या या मायावी युध्दा पुढे हतबल झाली.प्रतिहल्ला करणे अशक्य झाले. ब्रम्हदेवांकडून इंद्रजितला मिळालेले ब्रम्हास्र त्याने रामलक्ष्मणावर सोडले. ब्रम्हास्र लक्ष्मणाला लागून लक्ष्मण बेशुध्द झाले. वानर सेनेचं अवसानच गळालं. हातातील हत्यारे टाकून बेशुध्द पडलेल्या नेत्याकडे धाव घेतली. संधीचा फायदा घेऊन राक्षससेना वानरसेनेवर तुटून पडली. दुसरीकडे युध्दात गुंतलेल्या जांबुवंताला यायला उशीर झाला. हनुमानही गर्दीतून वाट काढत लक्ष्मणाजवळ पोहचल्या वर लक्ष्मणाची अवस्था बघून डोळ्यांना धारा लागल्या.पण जांबुवंत आल्यावर धीर आला.ते नक्कीच मार्ग काढतील ही खात्री होती.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-७-२०२२.


