
केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य अप्रतिम …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! आद्य शंकराचार्य !!!
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ३६.
शंकराचार्य रामेश्वरला आले. ते रामेश्र्वरासमोर उभे राहीले . त्यांनी मनोमन ठरवले की ; पाखंडी, द्वैतवादी मंडळींच्या प्रवृत्तीचे खंडन करुन अद्वैत मत प्रस्थापित करायचे
. त्यांनी प्रभुरामाची प्रार्थना केली….
” विशुध्दं परं सच्चिदानंद रुपं ।
गुणाधार आधार हीनं वरेण्यं ।
महान्तं विभान्तं गुहान्तं गुणान्तं ।
सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये ।।”
. प्रभू रामचंद्राने म्हणजेच एका वैष्णवाने केलेली शिवपूजा वैशिष्ट्यपूर्ण होते. शैव, वैष्णवांचे एकत्व यापेक्षा वेगळे काय असणार?
आणि आचार्य तर संन्यासी ; आणि संन्यासी म्हणजे विष्णुस्वरूप !!
शंकराचार्यांनी देवालयास स्फटिक लिंग अर्पण केले. बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या शिवाला त्यांनी वंदन केले. स्तोत्र रचना केली. सर्व शिष्य जनांसह आचार्य रामेश्वराहून “मध्यर्जुनला” आले. येथे कट्टर वैष्णवांची वस्ती होती. इथे लोक विष्णूशिवाय दुसरे कोणतेच दैवत मानत नव्हते. शैव, स्मार्त इत्यादींचा ते अत्यंत द्वेष करीत.
या ठिकाणी शंकराचार्यांनी चांगलेच क्रांतिकारक पाऊल उचलले. त्यांनी पंचयतन पूजा प्रस्तुत करून ; अशा पूजेचे महत्त्व पटवून दिले. आपल्या प्रवचनाद्वारे, उपदेशाद्वारे पंचायतन पूजेचे महत्त्व पटवून देतांना ते म्हणाले,
” प्रत्येक देवाचा एक एक विशेष गुणधर्म आत्मसात करण्यासाठी… सूर्याकडून तेज, गणपती कडून बुद्धी, विष्णू कडून वैभव, इत्यादी. या सर्वांची एकत्र उपासना आवश्यक आहे. या सर्वांमुळे निर्गुण परब्रम्हाची उपासना घडून मनःशांती, परमानंद अशा दुर्मिळ गोष्टींची प्राप्ती होते.”
वैदिकांच्या शक्ती – संघटनेच्या दृष्टीने एकात्म भावाच्या दृष्टीने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल होते. आचार्यांचा एकमेव हेतू होता…. या पंचायन पूजेमुळे आपापसातील कटू भावना नष्ट होऊन परस्परांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती जावी. आणि सर्वत्र एक संघमाने मते तयार व्हावीत. या पदयात्रेत रामेश्वरांचे नरेश भोजसिंह सामिल झाल्यामुळे या धर्मकार्यास राजसत्तेचा पाठिंबा आहे हे लोकांना दिसत होते. लोकमत अनुकूल होत होते. लहान-मोठी तीर्थक्षेत्रे करीत करीत आचार्य कावेरी नदीतीरी असलेल्या श्रीरंगम् ला आले.
श्रीरंगम् च्या राजाने या सर्व सन्यासी समूहाचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. तेथील अतिभव्य मंदिरात असलेल्या अतिभव्य श्रीरंगमूर्तीचे सर्वांनी मनोभावे दर्शन घेतले.
तेथून ही मंडळी मदुरेला आली. मीनाक्षी सुंदरेश्वराचे सर्वांनी दर्शन घेतलं. मीनाक्षी देवीचे दर्शन घेताना आचार्यांना कालटीच्या त्रिपुरसुंदरी देवीची आठवण झाली. आणि जन्मभूमीचे दर्शन घेण्याची ओढ तीव्र झाली. आपण आपल्या जन्मभूमीच्या इतक्या जवळ आलोच आहोत तर, मातृस्मृती प्रीत्यर्थ कालटीस जावे.
” जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि”
आचार्यांनी कालटीच्या गाववेशीत प्रवेश केला. आपल्या जन्मभूमीचा स्पर्श होताच त्यांच्या भावना पुलकित झाल्या. मातेचे और्ध्वदेहिक केल्यानंतर इतक्या वर्षानंतर ते प्रथमच कालटीस आले होते. जिथे मातेला अग्नी दिला त्या स्थानाचे दर्शन घेण्यासाठी आले, तो त्यांना काय दिसले… रंगबिरंगी फुलांची झाडे होती. तिथे एक शुभ्रवेशातील तरुणी सडा घालत होती. आचार्यांना पाहिल्यावर तिने झटकन खाली वाकून आचार्यांना नमस्कार केला.
आचार्यांनी विचार केला, कालटीत ही तपस्वीनी कोण असावी? माझ्या अम्बची सेवा का करते? या विचारात असतानाच चित्सुखाचार्यांनी खुलासा केला,
” आचार्य, ही गौरम्मा असावी.”
पण आचार्यांचे मन मातेच्या स्मृतीत विहरत होते. मातृस्मृतीने दुःखावेग आवरेना. त्यांचे अश्रू मातेच्या समाधीला अभिषेक घालत होते.
नंतर ते शिष्यांसह पूर्णा नदीवर स्नानास गेले. मातेचे पूजास्थान असलेले कृष्णमंदिर, नित्य पूजेत असलेला वटवृक्ष या साऱ्यांचे आचार्यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. एवढ्यात आचार्य आल्याची बातमी गावकऱ्यांना मिळाल्याबरोबर त्यांना भेटायला कृष्ण मंदिरात आले. सर्वांशी क्षेमकुशलच्या गप्पा सुरू असताना गौरम्माचा विषय निघाला. ती तपस्विनीचे जीवन जगते आहे. सतत आपल्या ध्यान धारणेत असते. भिक्षान्नात फळे व गोरसच सेवन करते. अन्न कधीच वर्ज्य केलेले आहे. नियमितपणे आर्याबाच्या समाधीची सेवा, झाडलोट, सडा घालणे, फुल झाडांना पाणी देणे वगैरे कामे करते. हे ऐकून आचार्यांनी मनोमन स्त्री शक्तीला वंदन केले.
आचार्यांना जन्मभूमीची जेवढी तीव्र ओढ होती त्याहीपेक्षा भारत मातेच्या उत्कर्षाची होती. शृंगेरीला मठस्थापना झाली ती फक्त दक्षिणेपुरती झाली. शृंगेरी प्रमाणे भारताच्या चारही दिशांना त्यांना अशा मठाची स्थापना त्यांना करायची होती.
कालटी ग्रामवासीयांचा विनंतीवजा आग्रह त्यांना होऊ लागला की ; आचार्यांनी प्रवचन करावे तसेच त्यांनी आतापर्यंत झालेल्या कार्याबद्दल पण काही सांगावे. आणि पुढे काय करणार असल्याची योजना सांगावी. गावकरी म्हणाले,
” आचार्य ; तुम्ही कितीही मोठे झालात तरी आम्हा गावकऱ्यांसाठी लहानच आहात. तुमचे कौतुक ऐकून आम्हाला अभिमानच वाटेल.”
त्या दिवशी आचार्यांनी ग्रामवासीयांबरोबर दिलखुलास चर्चा केली. चर्चा सुरू असतानाच कांची नगरीचा राजा, राजसेनचा निरोप आला की ….. ” आपली द्विग्विजय यात्रा कांचीपुरीत येऊ द्या. येथे सर्वज्ञपीठ आहे. दैतवाद्यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याशी वादचर्चा करून अद्वैत तत्त्वज्ञान त्यांना समजावून सांगून त्याची प्रस्थापना करावी.”
शंकराचार्यांनी कालटीचा निरोप घेतला तेव्हां समस्त गाव वेशीपर्यंत आला होता. त्यात गौरम्माही होती. पण अशा ठिकाणी उभी होती की, ती कुणाला दिसणार नाही. आचार्यांसारख्या महापुरुषाल तिने मनोमन गुरू म्हटलेच होते. आणि असे महान गुरुदेव लाभल्यामुळे ; ती स्वतःला धन्य समजत होती.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२८२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ३७.
राजाच्या विशेष आमंत्रणाने आचार्यांची दिव्य यात्रा कांची नगरीकडे निघाली होती. आचार्यांचे शिष्यत्व कित्येक गृहस्थाश्रमी लोकांनीही स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर शूद्र जाती- जमातीनाही आचार्य उपदेश करीत त्यांच्या संघटना बांधीत होते. मठ स्थापना करून नीट नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही देत होते. त्यामुळे विविध मठांची स्थापना होत होती. आचार्यांच्या व्यक्तिमत्त्वाने, मधुर आणि मुद्देसूद बोलण्याने सामान्य माणूसही प्रभावित होत होता.
कांची नगरात राजा राजसेनने आचार्यांचे भव्य स्वागत केले. आचार्यांनी सर्वज्ञपीठाची व द्वैतमतवाद्यांची इत्थंभूत हकीगत ऐकल्यावर, ते राजसेनला म्हणाले,
” राजन, राजकारणाप्रमाणेच धर्मकारणात एकच नीती अवलंबून चालत नाही. सर्वच ठिकाणी वादसभा जिंकून काम होत नाही. कधी साम-दंड-भेद ही नीती अवलंबावी लागते. इथे शैव व वैष्णव दोघेही तुल्यबळ आहेत. त्यासाठी राजन, तुम्ही एक शैवासाठी व एक वैष्णवासाठी अशा दोन नगरींची उभारणी करा. त्यामुळे आपण कोणी नगण्य नाही, मान्यवर आहोत ही भावना त्यांच्यात निर्माण होईल. मग हा द्वैतवाद कसा घातकी आहे? ही दोन्ही दैवते कशी एकरूप आहेत? हे त्यांच्या गळी उतरवता येईल. तुम्ही या कामाची सुरुवात करा. तोवर आम्ही उत्तरेकडे जातो.”
राजाने आचार्यांच्या म्हणण्यानुसार नगर उभारण्याच्या कामाला आरंभ केला.
आचार्यांचा ह्यात एक हेतू होता. राज्यातील संपत्ती धार्मिक कार्याच्या कामी लागेल आणि आळशी बनलेले लोक कामाला लागतील. राजा राजसेनचे राज्यबळ, राज्यक्षेत्र वाढेल.
आचार्यांची धर्मयात्रा मजल दरमजल करीत थेट विदर्भात येऊन पोहोचली. ठिकठिकाणी त्यांनी वाडसभेत ; स्व -मतांचे समर्थन व विरुद्ध मतांचे खंडन केले. गरजेनुसार विरोधही केला. वैदिक धर्माची ध्वजा आता चांगलीच उंचावली होती. या शोभा यात्रेचा प्रजाजनांवर सहजच प्रभाव पडून लोक आकृष्ट होत होते. त्यांच्या प्रवचनाला लोक आवर्जून येत होते.
आता धर्मयात्रा पूर्व समुद्राकडे निघाली. पूर्व जलाधी तीरावर मठस्थापना करायचा आचार्यांचा हेतू होता. म्हणून ते जगन्नाथपुरीला आले. तेथील जगन्नाथाच्या मंदिरात दर्शन घेतले आणि तिथेच त्यांनी जगन्नाथाष्टक रचले.
तेथील मुक्कामात शिष्याशी विचार विनिमय करताना आचार्य म्हणाले,
” या भागात बौद्ध धर्माचा संचार विपुल प्रमाणात आहे. त्यांची प्रमुख केंद्रे बौद्धगया, सारनाथ येथून जवळच आहेत. इथल्या लोकांचे पूर्ण बुद्धकरण होण्यापूर्वी आपला वैदिक धर्म त्यांना समजावून सांगून त्यांची नष्ट होत असलेली विजिगीषुवृत्ती पुन्हा प्रज्वलित होण्यासाठी इथे श्रृंगेरी सारखी मठस्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे.”
तोपर्यंत इकडे तीर्थयात्रेस गेलेले पद्मपादाचार्य पश्चातापदग्ध होऊन ; यात्रा अर्धवट सोडून आचार्यांकडे परत आले होते. आलेल्या पद्मपादाचार्यास आचार्य म्हणाले,
” या पिठाचे नाव गोवर्धन ठेवू या. याची सर्व जबाबदारी तुम्हाला सांभाळायची आहे. अंग, वंग, उत्कल, कलिंग एवढे प्रांत तुमच्या अधिपत्याखाली राहतील.”
तशी आचार्यांनी दुसऱ्या दिवशी घोषणा केली.
शुभ मुहूर्तावर आचार्यांनी पद्मपादचार्यांची गोवर्धन पीठाचे मठाधिपती म्हणून विधीपूर्वक नेमणूक करून या पीठाचा आम्नाय लिहून दिला. त्यांनी सांगितले की,
” मठाधिपतीच्या हाती धर्मदंड असतो. धार्मिक नितिमत्ता कायम राहून समाज नेहमी धर्मवर्धिष्णु राहावा. म्हणून हा धर्म दंड धारण केलेला असतो. याचे मठाधिपतीने भान ठेवावे.”
हे सारे नितिनियम, उपदेश व्यावहारिक पातळीवर विचार करून केले होते. हे नियम फक्त एका पीठापुरते नव्हते तर; तर संपूर्ण पीठपरंपरेसाठी होते. पद्मपदाचार्यांनी आचार्यांना वचन दिले की,
” हा मठ सत्यतेने, सचोटीने, पूर्ण वैराग्य अंगी बाणवून, नम्रता राखून सांभाळीन. कितीही अडथळे आले तरी वैदिक धर्माची वृद्धी वाढवण्याचे काम जोमाने करीन.”
पद्मपादाचार्यांना बहुमान मिळाला. स्वतंत्र कार्य करण्याची संधी उपलब्ध झाली. पण आता गुरुविरह सहन करावा लागेल. धर्म यात्रेत सहभागी होता येणार नाही, म्हणून ते व्याकुळ झाले. इतके दिवस गुरूंच्या छत्रछायेखाली असल्याने त्यांना कोणतीच अशी जबाबदारी नव्हती. पण आता परिस्थिती वेगळी होती. सतत मोठेपणाची जाणीव ठेवून प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय वैदिक धर्मानुकुल ; तसाच लोकहिताभिमुखही असायला हवा. अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार सावधपणे व वेगाने करावा लागेल. आता आचार्यांचा सल्ला मिळणार नव्हता.
त्यांची ही स्थिती आचार्यांच्या नजरेतून सुटली नाही. ते हसून म्हणाले,
” अरे तुला फक्त स्मरणाने श्री लक्ष्मी-नृसिंहासारखे वरददैवत सन्निध आहे. असे असताना तू एवढा अस्वस्थ का? स्वतंत्रपणे कार्य केल्याशिवाय आत्मविश्वास कसा येणार? अरे, हे धर्म संस्थापनेचे कार्य मी एकटा कसा करू शकणार? तेव्हा निश्चिंत मनाने देवाचे स्मरण करून या गोवर्धन पीठाचे कार्य कर. आपण धर्म- सेवक आहोत ही जाणीव सतत मनी ठेव. पीठाचे महत्त्व आपल्या आचरणावर पण अवलंबून असते.
त्या दिवशी प्रवचनात आचार्य म्हणाले
” प्रत्येक हिंदूला काशीयात्रा घडावी ही आंतरिक इच्छा असते. पण थोडे अंतर्मुख होऊन पाहिले तर, लक्षात येईल की, आपला देह म्हणजे काशी क्षेत्रच आहे.”
आणि आचार्य काशी पंचक स्तोत्र म्हणू लागले.. मधून मधून श्रृंगेरी पीठाचीही आचार्य माहिती घेत होतेच. सुरेश्वराचार्य अत्यंत चोखपणे मठ सांभाळत असून त्यांचे वार्तिक पण लिहिणे सुरू होते. त्यांनी आपसातील लोकांचे बखेडे मोठ्या कौशल्याने हाताळून लोकांचा कल वैदिक धर्मानुकूल करून त्यात ते यशस्वी होत असल्याचे ऐकून आचार्यांना पुढील कार्य उभारणीस उत्साह येई.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ३८.
आचार्य आपल्या शिष्यांसह काशीत आल्याचे कळताच, काशीचे महाराज त्यांच्या दिग्विजय यात्रेला सामोरे आले. त्यांनी आचार्यांचे यथोचित स्वागत करून, सजवलेल्या हत्तीच्या अंबारीत बसवून आचार्यांची मिरवणूक काढण्याची आपली इच्छा नम्रपणे व्यक्त केल्यावर, काशीराजांची इच्छा डावलणे त्यांना प्रशस्त वाटले नाही. केवळ वैदिक धर्माचा मान म्हणून श्रीविश्वेश्वराचे स्मरण करून आचार्य अंबारीत बसले. सर्वांनी जयजयकार केला.
” शंकराचार्य महाराज की जय.. भगवान काशीश्वर की जय….”
मागच्यावेळी आचार्य काशीत आले होते, तेव्हापेक्षा आता जनमानसात कितीतरी फरक पडलेला दिसला. वैदिक धर्माचे महत्त्व लोकांना पटले होते. शंकराचार्यांनी हाती घेतलेल्या कार्याचा हा फार मोठा विजय होता.
भारताच्या चारही दिशाना मठस्थापना करण्याचा विचार असल्याने आताच पश्चिम सागरतीरी द्वारकेला मठ स्थापना करावा. राजा सुधन्वा वैदिक धर्माला अनुकूल असल्याने त्याचेही बरसचे सहाय्य मिळू शकेल, या त्यांच्या विचाराने नवीन उमेदीने, उत्साहाने ही द्विग्विजय यात्रा द्वारकेकडे रवाना झाली. यात्रा पश्चिमेकडे चालली असताना, आचार्यांना कुमारील भट्टाची आठवण झाली. त्यांनी केवढे मोठे कार्य करून ठेवले होते. राजा सुधन्वाला जैन – धर्मियांच्या मगर मिठीतून काढून आपल्या वैदिक धर्मासाठी अनुकूल करून घेणे सोपे नव्हते. वैदिक परंपरेबद्दल त्याच्या मनात आदर निर्माण झाल्यामुळे, आचार्यांच्या कामाला त्याची मदत होऊ शकेल .श्रृंगेरीचा राजा वीरसेन, रामेश्वरचे नरेश भोजसिंह अशा राजसत्ता अनुकूल झाल्यामुळे, धर्म स्थापनेचे कार्य वेगाने व सुलभतेने होईल.
प्रवास सुरू असताना चित्सुखाचार्य हळूच म्हणाले,
” आचार्य, आपले शिष्यत्व पत्करलेला शाक्तपंथी अभिनव गुप्त आपल्या यात्रेत आहे. त्याची अघोरी मार्ग अनुसरायची सवय गेलेली नाही. आपला होत असलेला मानमरातब, उत्कर्ष त्याला सहन होत नाही. अलिकडे तो काहीतरी करणीचे प्रकार करत असल्याचा दाट संशय आहे.”
आचार्यांना हल्ली उष्णतेचा त्रास जाणू लागला होताच. पण ते कुणाला बोलले नव्हते. तोटकाचार्य धाडस करून म्हणाले,
” आचार्य, हल्ली आपल्या छाट्या खराब होत असल्याचे मला धुताना जाणवते. आपल्याला काही त्रास? “.
आचार्य म्हणाले,
” तुम्ही कोणी काळजी करू नका. प्रारब्धात त्रास भोगायचाच असेल तर तो टळणार नाही. शिवाय ह्या करणी, जादूटोणा ह्यावर किती विश्वास ठेवायचा?”
त्या दिवशीच्या प्रवचनात आचार्यांनी नरदेह म्हणजे,” रत्नमंजुषा” हा विषय घेतला. मनुष्याने आपले आचरण कसे शुद्ध ठेवावे? उपासना ध्यानधारणा केल्याने आंतरिक प्रगती कशी होते ? हे सविस्तर सांगितल्यावर म्हणाले,
” ह्या उलट जो वाममार्गाचे अवलंबन करतो, जो दुष्ट बुद्धीने दुसऱ्यासाठी खड्डा खणतो त्यात तो स्वतःच पडतो ; आणि केलेल्या कर्माची फळे भोगतो. नरदेह हा अमूल्य पुण्याईने मिळतो. तो सत्कारणी लावून आपले सार्थक करून घ्यावे.”
द्वारका नगरी जवळ येत होती. ही कृष्णभूमी म्हणजे सुवर्णभूमी. त्याचा जन्मच मुळी धर्म संस्थापनेसाठी. आचार्य मनी विचार करू लागले,
” मीही त्या कर्मभूमीत वैदिक धर्माचे संस्थापन करण्यासाठी चाललो. तर तो दयाघन नक्कीच आशीर्वाद देईल. “.
आणि त्यांनी कृष्णाटक म्हणायला सुरुवात केली…
” गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपावरं।
सुद्विषन्निकन्दनं नमामि गोपनंदनं।
नवीन गोप नागरं नवीन केलिलंपटम्।
नमामि मेघसुंदरं तडीत्प्रभालसत्पटम्।।”
हे अष्टक म्हणतच त्यांनी गोमती तीरावरच्या द्वारावतीत प्रवेश केला. राजा सुधन्वा अंबारी पालखीसह आणि लवाजम्यासह सामोरा आला. त्याने आपल्या धर्मसत्कारमूर्ती आचार्यांचे भव्य स्वागत केले. इथे मठ स्थापन होणार हे ऐकून राजा आणि प्रजाजनांना अतिशय आनंद झाला.
राजाने मठस्थापनेस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्यावर, आचार्य म्हणाले.
” लोकांचे ; परिस्थितीचे — निरीक्षण करता यावे यासाठी भोवतालच्या तीर्थक्षेत्रांना भेट द्यायचा मानस आहे. ”
त्याप्रमाणे ते सुदामपुरीस आले. तेथून गिरनारला आले. गिरनार म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रयांचे ठाणे !! नवनाथांचे विश्रांती स्थान !! पण तिथे जैन पंथींयांचे प्राबल्य होते. ह्या पर्वतावरचा पहिला टप्पा जैन मंदिरांनी व्यापला होता. दुसऱ्या टप्प्यावर असलेल्या श्रीदेवी अंबेला मनःपूर्वक प्रार्थना करून, त्यांनी कार्यात यश मागितले. तिसऱ्या टप्प्यावरील दत्तात्रयांच्या पादुका व तेथील निसर्गसौंदर्य आणि ऊर्जेचे वैभव पाहून आचार्य भारावून गेले. क्षणभर होणाऱ्या उष्णतेच्या त्रासाचाही त्यांना विसर पडला.
पुढे ते सोरटी -सोमनाथच्या दर्शनाला आले. शंभू महादेवाचे दर्शन घेताच, त्यांना शिवशंकरांच्या विविध रूपांचे दर्शन झाले. अनंत रुपे त्यांच्यापुढे प्रकट झाली.
” सौराष्ट्र देशे वसुधावकाशे ज्योतिर्मयं चंद्रकलावंत सम। भक्तीप्रदानाय कृतावतारं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये।।”
आजूबाजूची लहान-मोठी देवस्थाने पाहत पाहत सर्वजण पुन्हा द्वारकेत दाखल झाले.
मठ स्थापनेच्या कार्याला सर्वाचाच सहभाग लाभला. मठ पूर्ण झाला. मठावधीपती म्हणून हस्तामलकाची आचार्यानी नियुक्ती केल्यावर, ते गडबडले. पण लगेच स्वतःला सावरले की — ” मी समर्थ आचार्यांचा शिष्य आहे. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून काम करायला हवे. गुरुदेवांची संतुष्टी, समाधान हीच खरी गुरुभक्ती. “.
असे ठरवून त्यांनी जबाबदारी पेलली. राजा सुंधन्वाला हस्तमालक -आचार्य हे, कुमारील भट्टांचे शिष्य असून प्रभाकराचार्याचे पुत्र आहेत हे समजताच राजाला आनंद झाला. विशेष जवळीक वाटू लागली……
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ३९.
आचार्य द्वारका मुक्कामी असतानाच, कांची राजाकडून निरोप आला की,
” शिवकांची व विष्णुकांची नगराची उभारणी पूर्ण होत आली आहे. आपल्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.”
आचार्यांनी उलट उत्तर पाठवले,
” आम्ही मरुदेशामार्गे भारताचा शिरोबिंदू काश्मीरला जातो आहोत.तोवर पाठशाळा, धर्मशाळा, आणि विद्यापीठाची बांधणी करावी.
आचार्य आपले देह दुःख कितीही लपवत असले तरी, तोटकाचार्य मात्र अस्वस्थ झाले होते. हल्ली आचार्यांच्या छाट्या फारच खराब होऊ लागल्या होत्या. त्यांनी ही हकीगत हस्तामलकाच्या कानावर घातली ; आणि आचार्याचे काहीही न ऐकता आचार्यासाठी राजवैद्याची योजना केली. आचार्यांची प्रकृती तपासून ते एकदम घाबरून म्हणाले,
” महाराज, आपले दुखणे चमत्कारिक आहे. आपल्या प्रकृतीला प्रवास सोसवणार नाही.”
वैद्याने राजा सुधन्वा व हस्तमालकला सांगितले की,
” आचार्यांना भगंदर झाला आहे.”
हे असह्य चेंगट दुखणे. नुसते ऐकूनच सारेच घाबरून गेले. आचार्यांना कळल्यावरही ते शांत होते. ते म्हणाले,
” हा देह प्रारब्धास्वाधीन केला आहे. जे भोग आहे ते भोगावेच लागतील. ओरडून, रडून काय फायदा? “
उदंक म्हणाला,
“आचार्य आपण इथेच विश्रांती घ्यावी. ही द्विग्विजय यात्रा आम्ही पुढे नेऊ.”
” उदंका, मी इथे राहिलो तरी व्याधी बरी होईल याची काय खात्री? अरे, आता तर धर्मकार्य जास्त वेगाने करायला हवे…”
” गृहीत इव केशेषु मृत्युना धर्मचाचरेत” हे मी स्वतःच्या मनी ठसवले आहे. रिकामा निष्क्रिय राहिलो तर, सारे लक्ष दुखण्यावर केंद्रित होईल. कार्यरत राहिलो तर, मात्र मनाने मी दुःख मुक्त होईल.”
आचार्यांच्या दृढनिश्चयापुढे कोणाचेच काही चालले नाही. हस्तामलक पूर्णपणे जाणून होता, हे सारे कारस्थान अभिनव गुप्ताचेच आहे. पण आचार्यांच्या अनुमतीशिवाय त्याचे पारिपत्य करणार कसे? या धर्मयात्रेतून त्याला हाकलून तरी कसे देणार?
आता ही यात्रा द्वारका सोडून पुढे निघाली. हस्तामलकने मोठ्या कष्टाने अश्रूपूर्ण नेत्रांनी सर्वांना निरोप दिला.
इकडे गोवर्धन पीठात पद्मपादाचार्य ध्यानस्थ झाले की, त्यांना आचार्यांची म्लानवदन मूर्ती दिसू लागली. त्यांना कळेना असे का? नेहमी प्रसन्नवदन आचार्य असे कष्टी का? त्यांची प्रकृती तर बिघडली नसेल ना? नुकताच घडलेल्या कापालिकाचा प्रसंग त्यांना आठवला. तो क्रूरकर्मा क्रकच आठवला. असाच काही त्यांच्या जीवाला धोका असेल की काय? पण मी इथून काय करू शकणार? आचार्यांनी दंडक घालून दिला की, काही झालं तरी, माझी धर्मराज्य सीमा ओलांडायची नाही. मग मी कसे त्यांचे पर्यंत जाणार?
जसे जसे दिवस उलटत होते, तसे तसे ध्यानात पद्मपादाचार्यांना आचार्यांचा वेदनाग्रस्त चेहरा दिसत होता. दुखणे तीव्र असल्याचे जाणवत होते. आचार्य अस्वस्थ तर स्पष्टपणे दिसत होते , स्थिर असं बसू शकत नव्हते. काय झाले असेल त्यांना? त्यांना आठवले, एकदा तोटाचार्य म्हणाला होता, आचार्यांना काही विचित्र व्याधी झाली आहे. अलीकडे त्यांच्या छाट्यावर डाग असतात. पण इतक्या लांबून त्यांची कशी सेवा करणार?
एकदा पद्यपादाचार्यांना ध्यानात असताना जाणवले की, हे दुखणे केवळ दुष्ट बुद्धीने कुणीतरी केलेल्या करणीचा प्रकार आहे. हे समजताच त्यांचा संताप अनावर झाला. पण इतक्या लांबून करणार काय? वास्तविक त्यांच्या अंगात नृसिंह संचार होत असे. मंत्र सिद्धीचेही ज्ञान होते. पण आचार्यांच्या परवानगीशिवाय सारे व्यर्थ होते.
इकडे धर्मयात्रेची आगेकूच चालूच होती. मरुभूमीतून प्रवास सुरू झाला होता. रेताड प्रदेशात उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवत होते. पायाखालची वाळू जणू धगधगती भट्टी. सावली, शीतलता नाही. आचार्य म्हणायचे,
” ह्या बाह्य चटक्यापेक्षा वैदिक धर्मावर आलेली काळोखी जास्त तापदायक आहे.”
अनंत अडचणी, यातना सोसत धर्मयात्रा पंचनद प्रदेशात येऊन पोहोचली. आचार्य तक्षशीला नगरीत येऊन पोहोचले. आचार्यांनी औषधी घेतली की, त्यांची व्याधी थोडी ठीक राहायची. थोडे जरी दुर्लक्ष झाले तर असह्य व्हायचे. त्यांचे औषध पाणी पाहणारा उदंक धारिष्ट करून म्हणाला, आचार्य, मनुस्मृतीकार म्हणतात…
” गुरुं वा बाल वृद्धो वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम।।”
आतातायिनमायान्त हन्यादेवा विचारयत्।।”
दुष्ट माणूस कोणीही असला तरी बेधडक त्याला ठार करावे. या अशा माणसाशी “यो यथा वर्तते मनुष्यः। तथा वर्ततव्यं इति धर्मः” याच धर्माची आवश्यकता आहे ना? सर्व शिष्यश्रेष्ठांना अभिनव गुप्ताचा दाट संशय होता. आचार्यांचे क्लेश पाहवत नव्हते. शिष्य आडून आडून म्हणत,’ शठं प्रति शाठ्यम्
आचार्य हसून म्हणत,
“आपल्या धर्मात सहिष्णुतेलाही तेवढेच महत्त्व आहे. मी माझे मन इंद्रियनिग्रहाने शांत, स्थिर केलेले आहे. माझे क्लेश मी त्रयस्थ भूमिकेतून सोसतो आहे. दुर्लक्ष करणे सुद्धा फार मोठे शस्त्र आहे. म्हणून संशयित व्यक्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष करा. परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही…”
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ४०.
मागील प्रस्तुतीमध्ये आपण बघितले की ; वादसभा जिंकण्यापेक्षा बहुसंख्येने असणारे शैव आणि वैष्णव यांना वेगळ्या मार्गाने एकत्र आणावे लागेल. त्यासाठी त्यांनी राजाकडून शिवकांची आणि विष्णुकांची अशा दोन नगरींची उभारणी करून घेतली ; आणि पाठशाळा वगैरेंची पण निर्मिती करण्यास राजाला सांगितले.त्यानुसार राजाने केले. नंतर आचार्यांनी शैव – वैष्णव दोघात ऐक्य देवून आणले. त्यामुळे भविष्यात होऊ शकणारा शैव – वैष्णव वाद दूर होऊन ; सर्वचजण ” परस्पर देवो भव ” या तत्त्वानुसार सर्वजण एक झाले. इथे आचार्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन दिसून येतो. आता आपले कथानक पुढे बघू. …
नंतर आचार्य तक्षशीला येथे गेले…
तक्षशिला म्हणजे बौद्ध धर्मपंथीयांचा मानबिंदू. इथे स्वतःला विद्वान म्हणून घेणारे पुष्कळसे प्रकांडपंडित होते. आचार्य होते. पण त्यांचे कोणतेच सिद्धांत तर्कसंगत नव्हते. केवळ वाद-वैभवावर त्यांचा भर होता. मोठमोठे विद्वत्ताप्रचुर शब्द वापरून प्रतिपक्षावर छाप टाकावी, एवढाच त्यांचा शब्द सामर्थ्याचा उपयोग होता.
शंकराचार्य तक्षशिलेत आल्याचे कळताच, ज्येष्ठ भिख्खुंनी विचार केला की, हा आचार्य उत्तम ज्ञानगर्भ कार्यकर्ता, संघटनकुशल , आणि प्रखर बुद्धीचा आहे. जर हा आपल्या धर्मात येऊन, त्यांनी बौद्धधर्म स्वीकारला तर, आपल्या धर्माला ऊर्जितावस्था प्राप्त होईल.सम्राट अशोकाच्या वेळी जसा बौद्ध धर्म सर्वदूर फोफावला होता, तसे होऊ शकेल. आणि संपूर्ण भारत बौद्धमय होईल.
हा उद्देश मनी धरून, बौद्ध प्रमुखांनी वादचर्चेसाठी आचार्यांना आमंत्रित केले. तसेच ठिकठिकाणच्या विद्वानांनाही पाचारण केले. वार्तालापासाठी भव्य मंडप उभारण्यात आला.
ठरलेल्या दिवशी बौद्ध भिख्खुनी सारा मंडप गच्च भरला. हाती दण्ड घेऊन, ताठ मानेने, लयबद्ध चालीत ; आचार्यांनी मंडपात प्रवेश केला. त्यांच्यासाठी असलेल्या आसनावर स्थानापन्न झाले. जणूं मूर्तीमंत मांगल्यच त्यांच्यासोबत आलं होतं. श्रोतृवृंद विचार करू लागले,
” हा इतक्या लहान वयाच्या युवकाने एवढी विद्वत्ता, पांडित्य, प्रखर वैराग्य हे सारे संपादन केले तरी केव्हा? याचा गुरु तरी कोण आहे?”
प्रमुख भिख्खु उठून अत्यंत नम्रपणे म्हणाले,
” आपण अनुग्रहित श्रेष्ठतम विद्वान आहात. म्हणूनच केवळ सत्य जाणून घेण्याच्या उत्कंठेने आपणास पाचारण करण्यात आले आहे. इथे कोणताच भलता प्रसंग होणार नाही. केवळ सुसंवादच घडेल.”
आचार्य त्याच्या धूर्त बोलण्यावर किंचित हसून म्हणाले ” ठीक आहे.”
एक ज्येष्ठ भिख्खु म्हणाले,
” या दुःखी दुनियेत शांतीचा मार्ग केवळ भगवान बुद्धांचाच आहे. आपण वैदिक धर्माच्या आणि कर्मकांडाच्या जंजाळात सापडून आपले जीवन दुर्बल करू नका. संघ सरणं गच्छामि। धम्मम सरणं गच्छामि। या पवित्र मंत्रोचाराने निर्वाण पदाचे अधिकारी व्हावे.”
आचार्य धीर गंभीर आवाजात म्हणाले,
” भगवान बुद्ध माझेही पूर्वज आहेत. त्यांची सहृदयता, मानव कल्याणाची तळमळ, समाजाचे दुःख दूर करण्याची तीव्र इच्छा ; उत्कंठा, आपल्या ध्येयसिद्धीसाठी खडतर जीवन जगण्याची तयारी, त्यांचा त्याग, वैराग्य, शांती, जिज्ञासू वृत्ती हे सर्व गुणविशेष खरोखरच अनुकरणीय आहेत. ते आमच्या राष्ट्राचे महापुरुष होते. भगवान बुद्धांशी माझा बिलकुल विरोध किंवा त्यांच्या नैतिक आदेशाशींही विरोध नाही.”
ते ऐकताच भिख्खुंना वाटले, मासा गळाला लागला. आचार्य नक्कीच बौद्ध धर्म स्वीकारतील याची त्यांना खात्री झाली.
आचार्य म्हणाले,
” भिख्खु श्रेष्ठ हो! आपण विचार करा, खरोखरच आपण त्यांच्या आदेशाचे पालन करतो का? भगवान बुद्धांनी घोर तपश्चर्या, अत्यांतिक कष्ट सहन करून त्यांनी बुद्धत्व प्राप्त करून घेतले. कोटी – कोटी भारतवासीयांचे जीवन सुखी करण्यासाठी ज्ञानप्रकाश ज्योत तेवत ठेवली. पण आज? आज काय घडते आहे? भोवताली घडणारी पाशवी कृत्ये पाहून तुमचे हृदय आक्रंदून उठत नाही? त्या दुःखी जीवांसाठी दोन अश्रूही ढाळू शकत नाही तुम्ही ? केवळ वासना, लालसा आणि लालसा! याला बौद्ध धर्म म्हणायचा का? तुमच्या अशा वागणुकीने भगवान बुद्धांच्या आत्म्याला किती क्लेश होत असतील?”
एक भिख्खु म्हणाला,
” बौद्ध धर्माचा प्रसार होण्याच्या दृष्टीने असे थोडेफार घडणारच. या धर्माचा विश्वात प्रसार होऊ नये असे तुम्हाला वाटते का?”
आचार्य म्हणाले,
” भिख्खुवृंद हो! भगवान बुद्धांचा संदेश लोकापर्यंत अवश्य पोहोचायला हवा. “कृण्वन्तो विश्वमार्यम्” हा प्राचीन सिद्धांत आपल्या सगळ्यांचाच आहे. पण आपण मात्र फुटके पात्र घेऊन विश्वाची तहान भागवण्याचा प्रयत्न करतो. हे धर्माचे विडंबन नाही का? आपण थोडे आत्मपरीक्षण केल्यास माझे म्हणणे लक्षात येईल. सत्य सिद्धांत कुणालाच अमान्य नसतो.
हिंदू धर्मात किंवा बौद्ध धर्मात पूजाअर्चा, भाव, भक्ती ह्या कशातच भेद नाही. तुम्ही सुद्धा हिंदू आहात.”
” काय? आम्ही हिंदू? “
आचार्य म्हणाले,
” होय! तुम्ही बौद्ध तर आहातच पण हिंदूही आहात. इतकेच नव्हे तर शैव, वैष्णव, स्मार्त, गाणपत्य वगैरे सर्व काही आहात. आपण सारी या पुण्यभूमीची लेकरे आहोत. म्हणून सर्वजण हिंदू आहोत. तुम्हाला भगवान बुद्धाच्या आत्म्याचा साक्षात्कार लाभला म्हणून तुम्ही बौद्ध आहात. “
आचार्य पुढे म्हणाले,
” राजकुमार सिद्धार्थांनी बुद्धत्व प्राप्त करून घेतले. तेही भगवान विष्णूचाच अवतार आहेत. गयेला त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. ते स्थान आम्हालाही तीर्थच आहे. तेथे आम्ही पितृतर्पण करतो. आज आपण आपल्या श्रद्धा पूर्वजांच्या चरणी अर्पण करू या. त्यामुळे आपल्या पूर्वजांना समाधान लाभेल.”
आचार्यांच्या पवित्र वाणीचा परिणाम झाला होता. हृदयपरिवर्तन झाल्यासारखे एक मुखाने सर्वांनी एका स्वरात जयजयकार केला… भगवान बुद्ध की जय… हिंदू की जय …शंकराचार्य की जय… वैदिक धर्म की जय… बौद्ध मंडळींनी आयोजित केलेल्या वादचर्चेचा असा सुखांत झाला होता.
तक्षशिला नगरी म्हणजे बौद्धांचा बालेकिल्ला. पण आचार्यांनी भरकटलेल्या बौद्धांना परत आणले होते. हा आचार्यांचा प्रचंड विजय होता. आपले तत्त्वज्ञान त्यांच्या गळी उतरवणे सोपे नव्हते. पण आचार्यांनी येथे देखील प्रचंड विजय मिळवला. बौद्ध, हिंदूंचा साधलेला हा समन्वय अपूर्व होता. तो टिकवून ठेवणे तेवढेच महत्त्वाचे होते. म्हणून त्यांनी काही शिष्यांना तिथे ठेवण्याचे ठरवले. मनाचा तोल ढळू न देण्याचा कानमंत्र त्यांनी शिष्यांना दिला.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३


