
केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य अप्रतिम …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ३१.
शंकराचार्यांना एक उत्कृष्ट कार्यकर्ता त्याच्या सहस्त्रावधी अनुयायांसह मिळाला. संपूर्ण भारताची धर्मएकात्मता हे विशाल ध्येय नजरेसमोर असल्यामुळे एवढ्याशा विजयाने त्यांना तृप्ती मिळणे शक्य नव्हते. भारतातील संपूर्ण जनसमुदायाला अद्वैत तत्त्वज्ञानाचे महत्त्व पटवून देणे सोपे नव्हते. परंतु आचार्यांचा आपल्या कामावर, शक्तीवर, सूत्रसंचालक भगवंतावर पूर्ण श्रद्धा, निष्ठा होती.यशाची खात्री होती. जपजापत्याची चिंता न करता ते आपल्या कार्यात मग्न होते.
मंडन मिश्रांच्या संन्यास ग्रहणानंतर सरस्वतीचे इहलोकीचे कार्य संपले होते. ती शाप मुक्त झाली होती. आचार्य म्हणाले,
” माते ; तू साक्षात सरस्वती आहेस. तूच जर या मृत्यू लोकातून निघून गेलीस तर, सर्वच विद्या नाहीशा होतील. मला सनातन धर्माचे पुनरुत्थान करायचे आहे, त्या कार्याला तुझे आशीर्वाद हवेत. शृंगेरी येथे मठ स्थापणार आहे. तिथे तू नित्यनिवास कर.”
सरस्वतीने दिव्य रूपात शृंगेरी मठात राहण्याचे आश्वासन दिले. आणि देहत्याग केला.
त्या काळी काश्मीर पीठास सर्वज्ञ पीठ असे संबोधिले जात असे. जो खरोखर सर्व विद्यांचा जाणकार असेल ; त्यासच भगवतीच्या आदेशाने त्या पीठावर स्थानापन्न होता येत असे. या पीठास असणाऱ्या प्रत्येक द्वारावरील पहारेकऱ्यास शास्त्रार्थ करून जो हरवील ; त्यास पीठावर आरूढ होण्याची आज्ञा भगवती आकाशवाणीद्वारा देत असे. ते पीठ कित्येक वर्षे मोकळेच होते. म्हणून …..
सुरेश्वराचार्यांनी सर्वज्ञपीठावर स्थानापन्न होण्याची आचार्यांना विनंती केली. या सर्वज्ञ पीठाला शारदापीठ सुद्धा म्हणत. हे पीठ काश्मीरमध्ये होते. त्या पीठाकडे जाण्यास अद्याप अवधी होता.
शंकराचार्यांनी आपले शिष्य वेगवेगळ्या ठिकाणी कार्यान्वित करून त्यांना धर्म जागृतीचे कार्य करण्यास उद्युक्त केले. निवडक शिष्यांसह आचार्य पुढे जात होते.
आचार्य महिष्मतीतून पंचवटीत आले. श्रीरामाचे दर्शन घेतले. आर्यावर्ताच्या या मध्यभागातून खाली दक्षिणेपर्यंत बौद्ध व जैन मतांचा विशेष प्रसार झाला नव्हता. पंचवटीत काही काळ वास्तव केल्यावर, मार्गक्रमण करीत असता, वाटेतील घृष्णेश्वर, नागनाथ आणि वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन ते पंढरपूर क्षेत्री आले. पांडुरंगासमोर उभे असताना त्यांच्या मुखातून पांडुरंगाष्टक स्रवू लागले. त्यांच्या भाववृत्ती विभोर झाल्या.
तिथून आचार्य शिष्यांसोबत एका नगरीत प्रवेशले. तिथे भगवान विष्णूंचे मोठे मंदिर होते. त्या नगरात वैष्णव पंथी मोठ्या संख्येने होते. आचार्य शिष्यांसह दर्शनासाठी निघालेले पाहून नगरवासी आश्चर्यचकित झाले. आचार्यांच्या दंडातील व गळ्यातील रुद्राक्षमाला, लेपलेले भस्म पाहून ते शैवपंथी वाटत होते. मंदिराच्या पुजाऱ्याने दार बंद करून घेतले. आता काय होईल याची उत्कंठा सर्वांनाच लागली होती. आचार्य शांतपणे मंदिराजवळ येऊन म्हणाले,
” दार उघडा.”
” नाही उघडणार. तू कोण आहेस?”
” मी शंकराचार्य!”
” म्हणजे, तू शैव आहेस. हे विष्णुमंदिर आहे. इथे तुझे काय काम?*
मग दोघांमध्ये बराच वाद झाला. आचार्य म्हणाले,
“अंतिम सत्य परमेश्वर एकच आहे. त्यांची नाना रूपांची अनेक नावाने पूजा केली जाते.” पुजारी म्हणाला,
” तुमचे म्हणणे सिद्ध करून दाखवा.”
” ठीक आहे. दार उघडा.”
पुजाऱ्याने मंदिराची दारं उघडली आणि जोरात किंकाळी फोडून दूर झाला. वैष्णव पंडित पुढे झाले आणि त्यांनी गाभार्यात डोकावून बघितले तर त्यांनाही धक्का बसला. आतल्या मूर्तीचे रूपांतर हरिहराच्या मूर्तीमध्ये झाले होते. मूर्तीचे अर्धे शरीर श्रीविष्णूचे तर अर्धे श्रीशिवाचे झाले होते. पुजारी टुट्टाचार्य नरमले.
हा चमत्कार पाहून सर्वच नागरिक आश्चर्यचकित झाले. सर्वांनी आचार्यांचा जयजयकार केला. त्या नगरीचे नाव हरिहर असे पडले.
तिथून आचार्य श्रीशैल्य क्षेत्री आले. तिथे शाक्त, वीराचारी, कापालिकादी उग्रग्रंथीय बहुसंख्येने होते. तिथेही आचार्यांनी विजय मिळविले. आणि श्रीनगरमधील सर्व तांत्रिक वैदिक धर्मात समाविष्ट झाले. इतकेच नव्हे तर वामाचार दूर करून आचार्यांनी भैरवपंथीयांचे भैरव मतसुद्धा ग्राह्य मानले होते. त्यांचेपैकी अनेकजण आचार्यांशी शास्रार्थ करण्यास येत, पण सुरेश्वराचार्यापुढेच पराजित होऊन परत जात असत.
आचार्य आपणा सर्वांपेक्षा श्रेष्ठ तांत्रिक असावे असे वाटून उग्रगपंथीय घाबरले. अद्वैताची ओळख करून न घेता त्यांनी आचार्यांना वामाचारी ठरवले. कापालिकांनी यावर उपाय शोधण्यासाठी बैठक बोलावली. बरीच चर्चा झाल्यावर, आचार्यांना मारून टाकण्याचा बेत नक्की करण्यात आला. त्यासाठी उग्रभैरवाची सिद्धता झाली.
दुसऱ्या दिवशी साध्या वेषात उग्रभैरव आचार्यांना भेटायला आला व म्हणाला,
” मी मुक्तीच्या शोधात असून आपले शिष्यत्व पत्करायचे आहे. इथे राहण्याची अनुमती द्यावी.”
आचार्यांनी त्याला राहण्याची अनुमती दिल्यावर, आपल्या नित्यसेवेने, नम्र साध्या आचरणाने उग्रभैरव प्रिय झाला. एक दिवस श्रीशैल्यावरून आचार्य निघत असल्याचे त्याच्या कानी आले. दुसऱ्या दिवशी अमावस्या. म्हणून त्याचा फायदा उठवून आपले कार्य साधण्याचे त्याने ठरवले.
आचार्य एकटेच पाहून उग्रभैरव त्यांचे समोर येऊन रडू लागला. रडण्याचे कारण विचारल्यावर, त्याने सांगितले,
” आचार्य मी कापालिक असतांना उग्र तपस्या केली होती. ते प्रसन्न झाल्यावर, वर मागण्यास सांगितल्यावर मी त्यांना शिवलोकी निवास करण्याचा वर मागितला. त्यावर शिव म्हणाले, होम कुंड पेटवून चक्रवर्ती राजा किंवा सर्वज्ञ पुरुषाची आहुती दिलीस की तुला शिवलोकी निवास करता येईल.”
” मग काय झाले?”
उग्र भैरव आपला शब्दच्छलाने आचार्यांना स्वत:ची आहुती देण्यास तयार केले.
आणि आचार्यांनी विचारले,
” हा होम कुठे करणार आहेस?”
” आचार्य, उद्या रात्री अरण्यात निर्जन स्थानावर भैरवपीठाचे स्थान आहे. तिथे जाऊन हे कार्य मध्यरात्री पूर्ण करू. “
” चालेल…”
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग -३२.
गोड बोलून आचार्यांना फसवून अरण्यात आणून त्यांना ठार मारण्याचा आपला
डाव सफल झाला आहे — असे उग्रभैरवास वाटले. त्यास खूप आनंद वाटू लागला. तो अरण्यातील नियोजित स्थानी आला. तिथे दडून असलेल्या कापिलकांना खुणेच्या आवाजाने साद घालून त्यांना योग्य सूचना देऊन सर्वांना जवळपासच्या वृक्षावर लपून बसायला सांगितले.
रात्र झाली सगळीकडे शुकशुकाट झाल्यावर, उग्रभैरव आचार्यांच्या जवळ येऊन म्हणाला,
” चला आचार्य, सर्व सिद्धता झाली आहे.”
अमावस्येच्या त्या काळ्याकुट्ट रात्री दोघेजण नियोजित स्थानी आले.
” आचार्य, मी होम सिद्ध करतो. नंतर आपला बळी देतो. सिद्ध आहात ना?”
” होय तुझा होम सिद्ध होईपर्यंत मी समाधी लावतो. तुझी सिद्धता झाली की, मला जागृत कर. आणि बळी दे.”
” ठीक आहे. “
आणि उग्रभैरव होमाग्नी सिद्ध करू लागला.
आचार्यांनी डोळे मिटले. मनी विचार आला ….. आणि ध्यानातच ते प्रार्थना करू लागले …..
“या आर्यावर्तातील मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. वैदिक धर्माचा उदयकाळ आता दृष्टीपथात आला. आता हे कार्य माझे मुख्य शिष्य चित्सुख, पद्मपादाचार्य करतील. यांना बळ दे.”
. पद्मपादाचार्यांचे नाव त्यांचे मनात येताच, तिकडे पद्मपादाला काहीतरी अशुभाची जाणीव झाली. तो चटकन उठून बसला. त्यांनी बघितले बाजूचे आचार्यांचे अंथरुण रिकामे आहे. त्याने समाधी लावून आपल्या गुरुचा शोध घेऊ लागला. अकस्मात त्याला त्या अरण्यातील दृश्य दिसले .हेतू लक्षात आल्यावर, पद्मपाद नृसिंहाचा धावा करू लागले.
” हे देवाधिदेवा, तुम्ही हिरण्यकश्यपूच्या तावडीतून प्रल्हादाचे रक्षण केले होते. आज माझे आचार्य संकटात आहेत. त्यांचे प्राण वाचवले तर, असंख्य वैदिक धर्मानुयायांवर अनंत उपकार होतील. हें नृसिंहा! आपण भक्तवत्सल उदार आहात.हे देवा, माझ्या शरीरात प्रवेश करून त्या धूर्त कपटी कपालिकाचा नाश करा.”
क्षणात नृसिंहाने पद्मपादांच्या शरीरात प्रवेश केला. पद्मपाद… आता ; पद्मपाद राहिले नव्हते. ते नृसिंह झाले होते. उठून उभे राहत मोठी गर्जना केल्यावर, आसमंत ढवळला गेला. ते रूप पाहून काही शिष्य भयाने मूर्च्छित झाले. कित्येकांना ते तेज पाहणे अशक्य झाले.
नृसिंह वेगाने अरण्यात शिरले. सुरेश्वराचार्य व हस्तामलचार्यही त्यांचे पाठोपाठ धावले. उग्रभैरव परशु पेलीत होम कुंडाजवळ डोळे मिटून बसलेल्या आचार्यांच्या जवळ आला. आता उग्र भैरव परशु उगारणार तोच, नृसिहाने त्याचे वर उडी घेतली. त्यांनी उग्रभैरवाला मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडले. ते भयानक दृश्य पाहून लपून बसलेले कापालिक पळून जाऊ लागले. त्यांच्या मागे धावून कित्येकांना नृसिंहाने वधले. हे परमेश्वर रूप पाहून आचार्यांचे मन भरून आले. त्यांनी त्या रूपाचे स्तवन करताच नृसिंह शांत झाले. नृसिंहानी त्यांना आशीर्वाद दिले आणि अंतर्धान पावले. आणि पद्मपाद बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला.
सर्व सर्वजण पद्मपादांना घेऊन परत आले. त्यांच्या मुखावर जलसिंचन करून त्यांना शुद्धीवर आणले. आचार्यांना पाहून त्याला आनंद झाला. झाल्या प्रसंगाने सर्वच जण भारावल्यासारखे झाले. पद्मपाद म्हणाले,
” मी फक्त निमित्तमात्र आहे. गुरुदेवांचे प्राण वाचवण्याचे सर्व श्रेय त्या ईश्वराला आहे. पूर्वी त्यांनी वचन दिल्याप्रमाणे माझ्या शरीरात प्रवेश करून प्रत्यक्ष अनुभूती दिली.”
आचार्य म्हणाले,
” उद्या गोकर्णकडे निघायचे. तेथून दक्षिण प्रदेशात प्रवेश करणार आहोत आपण.. त्याची सर्वांनी तयारी करावी.”
इतका भूभाग पालथा घालूनही शंकराचार्यांना मनाजोगी जागा गवसत नव्हती. महिष्मतीला मंत्रबद्ध केलेल्या देवीसरस्वतीच्या ऋणातून मुक्त होण्याची वेळ अजून आली नव्हती. शक्तीपीठ स्थापन करायचे म्हणजे तेवढ्याच पवित्र भूभागाची आवश्यकता होती. तुंगभद्रेच्या वामतीरावरील एका आदिवासी तरुणांकडून एक लोककथा ऐकली. त्याने प्रभू रामचंद्राच्या जन्मापूर्वीची हकीगत सांगत म्हणाला, श्रृंगऋषींच्या नावावरूनच या भागाला श्रृंगेरी म्हणतात. आचार्यानी ठरवले की ; या अतिशय पवित्र पावन भूमीवरच शक्तीपीठाची स्थापना करायची.
आचार्यानी मंत्र सिद्ध केला. देवी सरस्वतीला आवाहन केले. मंत्रबद्ध झालेली शारदा देवी प्रगटून म्हणाली,
“आचार्य मी आपली मनीषा जाणते. मी आपणास सर्वतोपरी सहाय्य करण्यास वचनबध्द आहे. मी अनुगामिनी आहे. पण आचार्य माझी एक अट आहे. जिथे आपणास पीठस्थापना करायची आहे, तिथपर्यंत आपल्या मागे मागे येईन. मी मागे येत असल्याची साक्ष म्हणजे माझ्या पायातील नुपुरांचा झंकार !! पण ज्या क्षणी आपण मागे वळून पहाल त्या क्षणी थांबेल. मी पुढे येणार नाही.”
आचार्यांनी तिची अट मान्य केली. हस्तामलक व आचार्य चालू लागले. ध्वनीक्षेपाने शारदाम्बा त्यांच्यामागे होतीच. आचार्य आपल्याच विचारात गर्क होते. आता ही भ्रमंती संपवून जिथून धर्मकार्याची सूत्र हलवता येईल असे पीठासाठी योग्य स्थान मिळाले पाहिजे. ह्या विचारात असल्यामुळे त्यांना नृपुर ध्वनीचा विसर पडला. त्यांनी अनवधानाने ; अभावीतपणे मागे वळून पाहिले.
सरस्वती म्हणाली,
“आचार्य, तुम्ही माझी अट मोडली. आता मी पुढे येणार नाही.”
आचार्य म्हणाले,
” हा काहीतरी नियतीचा संकेत असावा. हीच तुझी जागा असावी. या पवित्र स्थानी तू मानवावताराची समाप्ती केलीस तरी चालेल. परंतु तुझी चैतन्यशक्ती माझ्या कार्यासाठी हवी. त्याशिवाय माझे धर्म कार्य सिद्धीस जाऊ शकणार नाही.”
” तुमची इच्छा सफल होईल. मी आता या तुंगभद्रा नदीत माझा देह विसर्जन करते. माझ्या देहाची शिळा होईल. त्यावर योग्य संस्कार करून मग स्थापन करा. या तुमच्या कार्याला यश मिळेल हा माझा आशीर्वाद आहे.”
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ३३.
शंकराचार्य म्हणाले,
” देवी याच ठिकाणी तुझ्या स्मरणार्थ शारदा पीठाची स्थापना करून इथे ; ” यावत्चंद्र दिवाकरौ ” तुझी यथासांग पूजा होत राहील.यावर ” तथास्तु! ” म्हणून शारदेने तुंगभद्रेच्या पात्रात उडी घेतल्याबरोबर तात्काळ तिच्या देहाची कृष्णवर्णीय शीळा झाली. नदीतीरी असलेले काही पारधी हे दृश्य पाहून विस्मयचकित झाले आणि नगरात जाऊन राजा वीरसेनच्या कानी ही वार्ता घातली.
राजा वीरसेन तात्काळ त्या ठिकाणी आले. तोपर्यंत हस्तामलकाच्या सहाय्याने ती कृष्णवर्णीय शीळा आचार्यांनी नदी किनारी आणली होती.
आचार्यांना वंदन करून राजा वीरसेन म्हणाले,
” द्वारकेच्या सुधन्वा नरेशांवर कडून आपली आणि आपल्या कार्यासंबंधी बरीच प्रशंसा ऐकली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार मी वैदिक धर्माच्या आचरणास सुरुवात केली आहे.”
सुधन्वाचे नाव ऐकताच, आचार्यांना कुमारील भट्टपाद आठवले. त्यांनी सुधन्वास अनुकूल करून घेतल्याचा सारा इतिहास आठवला.
राजा वीरसेनने त्यांच्या राज्यात आचार्यांनी वास्तव करावे अशी विनंती केली. त्यावेळी आचार्यांची दृष्टी आकाशाकडे होती. दिव्य देहधारी सरस्वतीने आपले कर्णफूल खाली टाकले ते नेमके कृष्ण शीळेच्या मध्यभागी पडले. तिची इच्छा आचर्यांना समजली. ते राजाला म्हणाले,
” इथे तू एक मठ बांधावा. मठात शारदांबाची स्थापना करावी अशी माझी इच्छा आहे.”
राजाने मोठ्या आनंदाने मान्यता दिली.
राजाज्ञा झाल्यावर, बांधकामास कितीसा वेळ लागणार? आचार्यांनी आपला मुक्काम श्रृंगेरीवरच ठेवला. मठ बांधणीसाठी ते वारंवार सूचना देत होते. तज्ञ शिल्पकारांना बोलावून कृष्णशीळेवर त्यांनी श्रीयंत्र कोरून घेतले. आणि दुसऱ्या शीळेवर विद्यायंत्र कोरून घेतले. दोन्ही यंत्रांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जेव्हा आचार्य कैलासात गेले होते, तेव्हा त्यांना श्रीशंकरांनी पंचलिंगे दिली होती. त्यापैकी भोग लिंगाची पण प्राणप्रतिष्ठा इथे करण्यात आली.
श्रृंगेरी मठ पूर्ण झाला. समारंभपूर्वक श्रीशारदाम्बाची व चंद्रमौलीश्वराची यथासांग विधी पूर्वक पूजा केली गेली. कायमच्या पूजेची व्यवस्था लावून दिली गेली.
या श्रृंगेरी मठाची स्थापना म्हणजे आचार्यांच्या धर्मकार्यातील महत्त्वाचा टप्पा होता. या मठामुळे आर्य सनातन वैदिक धर्माला स्थैर्य मिळून त्याची वृद्धी पण होणार होती. त्यांच्या द्विग्विजय यात्रेचे हे मोठेच फलीत होते. अर्थात आचार्यांना इथे निवास करणे शक्य नव्हते. त्यांच्यापुढे जगदोध्दाराचे मोठे कार्य होते. या मठाचा मठाधिपती तेवढाच समर्थ असणे आवश्यक होतेच. त्या दृष्टीने आचार्यांनी पूर्ण विचारांचती वय, अनुभव यांच्या कसोटी लक्षात घेऊन, सुरेश्वराराचार्यांची नेमणूक केली.
सुरेश्वराचार्यांच्या एकाच आयुष्यात कितीतरी स्थित्यंतरे झाली होती. काश्मिरातील सामवेदी मिथिला ब्राह्मण, विश्वरूप म्हणून होते. पुढे ते कुमारील भट्टांचे शिष्य मंडनमिश्र झाले. पुढे शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्करुन सुरेशश्वराचार्य झाले. आणि आता श्रृंगेरी पीठाचे मठाधिपती झाले.
मठाची व्यवस्था सुरळीत चालण्याच्या दृष्टीने आचार्यांनी “मठाम्नाय “( मठनियम ) लिहिले. श्रृंगेरीमठाचे ” दक्षिणाम्नाय” ; तसेच श्रृंगेरीपीठ असे नामाभिधान झाले.
” पीठः मीच शारदा क्षेत्रः रामेश्वर तीर्थः तुंगभद्रा।
देवः वराह, शक्तिः शारदा वा कामाक्षीः।
वेदः कृष्णयजुर्वेद, संप्रदायः भुरिवार,योगपट्टःभारती
सरस्वती, पुरी महावाक्यः अहं ब्रम्हास्मि।”
या मठाला व मठाधीपतीना राजा वीरसेन कडून मानमरातब व सरंजाम मिळाला. राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी. राजकारभार धर्माधिष्ठीत असावा असे मत प्रत्यक्ष राजाचेच असल्यामुळे, या मठाधिपती आणि धर्मसत्ताधीशांनाही सेवेकरी ; मानकरी ; ललकारी देणारे इत्यादी सेवकांची नेमणूक केली होती.
सुरेश्वराचार्य मठाधिपती झाले हा त्यांचा बहुमान होता. आधीही त्यांना बहुमान होताच, पण दोन्ही बहुमानात जमीन- अस्मानाचा फरक होता. मंडन मिश्रांची विद्वत्ता अहंमन्यतेने ताठरली होती, तर सुरेश्वराचार्यांच्या पांडित्यात नम्रता होती. आधीच्या त्यांच्या कर्मकांडात कामना, वासना होती. त्यामुळे समाधान नव्हते, तर आताच्या कर्मयोगात निष्कामता, स्वकर्तव्याची जाणीव असल्यामुळे संतोष होता. आधी सर्वाधिक असल्याचा गर्व होता तर ,आता सेवक असल्याच्या जाणिवेने कार्य करण्यात आत्मीयता होती. आणि आपल्यावर देखीलकुणाची तरी नजर आहे ; कृपादृष्टी आहे या जाणीवेने कार्यात दक्षता होती. त्यामुळे निरपेक्ष वृत्तीने वैदिक धर्मवृद्धीचे काम विशेष जोमाने होणार होते.
श्रृंगेरी मठाची व्यवस्था ठीक आहे का ? त्यात काही सुधारणांची गरज आहे का ? हे पाहण्यासाठी आचार्यांचा मुक्काम श्रृंगेरी मठातच होता. धर्मकार्याला बैठक तर मिळालीच, पण राज्यसत्तेचा आधार मिळणे ही सुद्धा सामान्य गोष्ट नव्हती.
एवढे यश मिळवूनही आचार्य अंतर्यामी अस्वस्थ होते. ते सतत विचार करीत होते की —
” धर्मकार्य करणाऱ्याचे आचरण शुद्ध पवित्र सात्विक असले पाहिजे असा उपदेश आपण करतो. आणि मी? मी परकाया प्रवेशाच्या निमित्ताने का होईना ब्रह्मचर्य व्रताचा भंग केला. अद्याप त्याचे प्रायश्चित घेतले नाही. तर मला उपदेश करण्याचा काय अधिकार आहे? या धर्माबाह्य कृत्याचे क्षालन झाल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही.”
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग ३४.
एक दिवस आचार्यांनी ठरवलं की… आपणच अंतर्मुख होऊन प्रायचित्त शोधून काढायचे.
त्यांनी सर्व शिष्यांना सूचना दिल्या.
” कोणत्याही कारणाने कोणीही सात दिवस पर्यंत ज्या एकांतातल्या खोलीत आचार्यांनी आपले आसन सिद्ध केले होते, त्या खोलीचे दार उघडायचे नाही.”
आचार्य पद्मासन घालून स्थिर बसले. योग सामर्थ्याने त्यांनी वाराणसीत प्रवेश केला. त्यांनी मनकर्णिका घाटावर गंगास्नान केलं. मोठ्या विनम्रतेने काशीविश्वेश्वराच्या समोर उभे राहून तळमळीने म्हणाले,
” हे चंद्रशेखरा, तूच माझा गुरु, तूच माझी माऊली. तूच माझा तारणहार. मी सर्वार्थाने तुला शरण आलोय. मला मार्गदर्शन कर.” भक्ताची तळमळ पाहून भोळे भगवान त्रिशूलपाणी त्यांच्यासमोर प्रगट झाले. तेजःपुंज कैलास राणाचे दर्शन होताच, त्यांच्या पायावर आचार्य गडबडा लोळू लागले. डोळ्यावाटे आनंदाश्रू वाहू लागले. गहिवरून म्हणाले,
” हे भक्तवत्सला! मी अपराधी असून देखील तू मला दर्शन दिलेस? नीळकंठ आशीर्वादात्मक हात उंचावत म्हणाले,
” शंकरा, खेद करू नकोस. तू पूर्णपणे निष्पाप आहेस. कोणताच अपराध घडलेला नाही तुझ्याकडून !! तुला संभ्रम पडल्यामुळे श्लोक तुझ्या स्मरणात नाही…
” मनसैव कृतं पापं न शरीर कृतं कृतम्।
ये नैवलिंगीता कांता ते नैवलिंगीता सुता।।”
मनाने केलेले पाप हेच खरे पातक. शरीराने केलेले नाही. जे शरीर कांताला आलिंगन देते, तेच शरीर कन्येलाही अलिंगन देते. पण दोन्ही मागची भावना वेगळी असते. देह आणि आत्मा निरळा आहे. याचे दर्शन घडवण्यासाठी तुला चांडाळवेषात दर्शन दिले होते. मग आता का संभ्रम? तुला लवमात्र ही पाप लागलेलं नाही.
” पापलेशस्य संबंधस्तव नास्ति न संशयः।
प्रत्यक्ष चंद्रमौलीश्वराकडूनच आश्वासन मिळाल्याने आचार्य निर्धास्त झाले. हृदयावरचा भार हलका झाला. ते म्हणाले,
” हे दयानिधना! मी या संसारात असल्याने दुःख, सुख, शंका, संभ्रम येणारच. बुद्धीकिंकर्तव्यमूढ होणारच. तेव्हा हे परमेश्वरा! या सर्वा पासून आपणच माझे रक्षण करा.”
” हे चंद्रचूडमदनान्तक शूलपाणे।
स्थाणो गिरीश गिरीजेश महेश शम्भो।
भूतेश भीत-भय- सूदन मामनाथं।
संसार दुःख गहनाज्जगदीश रक्ष।।”
अशी भगवंतास प्रार्थना करून योगबलाने पुन्हा ते श्रृंगेरीस आपल्या एकांत खोलीत आले.
इकडे आचार्यांच्या आज्ञेप्रमाणे सात दिवस शिष्यांनी खोलीचे दार उघडले नव्हते.
पण त्यांना आचार्याविषयी अहोरात्र काळजी होती. शेवटी एकदाची प्रतीक्षा संपली. सात दिवस पूर्ण झाले. खोलीचे दार उघडले तो काय आश्चर्य! कुबट वासाऐवजी सुगंधाची लयलूट जाणवली. आचार्यांचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे परमेश्वराचे दर्शन झाल्याची त्यांना अनुभूती आली.
आचार्य श्रृंगेरी मठात असताना, आनंदगिरी नावाचा एक युवक त्यांना भेटायला आला व म्हणाला,
” आचार्य, मला आपला शिष्य करून घ्यावे.”
” तुला काय येते? कसला अभ्यास झाला?” “आचार्य, मी मूढ. मला काहीच येत नाही. मी शास्त्रार्थ ऐकतो. वेदपठणही ऐकतो. पण लक्षात काहीच राहत नाही. येथे राहून मी आपली मनोभावे सेवा करत सेवाभावनेने राहीन. जे कानावर पडेल ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करीन.”
“ठीक आहे. राहा.”
त्या दिवसापासून गिरी तेथेच राहू लागला. आचार्यांची हर प्रकारे सेवा करून त्यांना आनंदित ठेवणेच ईश्वरसेवा आहे हे समजून वागत असे.
एकदा आचार्यांना अतिसार झाल्यामुळे, त्यांना सतत स्नान करावे लागे. तेवढ्या वेळा गिरीला वस्त्र धुवावी लागत. ते सर्व काम गिरी मनोभावे करीत असे. आपल्या नम्र वागणुकीने त्याने सर्वांचीच मने जिंकून घेतली. पण तो गुरुसेवेशिवाय काहीही करीत नाही ; अध्ययन करीत नाही ही गोष्ट पद्मपादाचार्यांना आवडत नव्हती.
एक दिवस गिरीला नदीवरून यायला उशीर झाला. सर्व शिष्य व आचार्य आपापल्या स्थानी येऊन बसले. पण आचार्य शिकवण्यास आरंभ करीनात. म्हणून पद्मपादाचार्यांनी विचारले,
” आचार्य, सर्वजण आलेले आहेत. सुरुवात करायची ना? “
“अरे पण, गिरी कुठे दिसत नाही.”
” आचार्य, त्याला गुरुसेवे शिवाय दुसरे काही येत नाही. काही दुसरे समजत नाही. मग त्याच्यासाठी कशाला थांबायचे?”
पद्मपादाला अहंकाराची बाधा झाल्याचे त्यांच्या लगेच लक्षात आले.
तेवढ्यात गिरी येऊन ; त्याने गुरूंना प्रणाम केला. चरण स्पर्श केला. आचार्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले,
” वत्सा, आजचा पाठ तूं घे.”
आता त्याची फजिती होईल म्हणून कित्येक जण हसू लागले. त्याचवेळी गिरीच्या मुखातून १२ अक्षरी ताटक छंदातील रचना बाहेर पडू लागली. सर्वजण आश्चर्यचकित झाले.
पद्मपादाचार्यांचा अहंकार गळून पडला. ते क्षमा मागत आचार्यांच्या पायावर पडले. म्हणाले
” गुरुसेवेची महती, शक्ती ओळखण्यास मी अपुरा पडलो.”.
” उठ पद्मपादा, तुला तुझी चूक उमगली यातच सर्व काही आले. आज हा गिरी संन्यासदीक्षा घेण्यास पात्र ठरला. याच्या मुखातून ताटक छंदातील रचना बाहेर पडली म्हणून हा “तोटकाचार्य “म्हणून ओळखला जाईल…
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.
🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ३५.
पद्मपादाचार्य अतिशय विद्वान होते. अद्वैताचे कट्टर पुरस्कर्ते होते. ते आचार्यांचे सुरुवातीचे शिष्य बनले होते. पण मधूनमधून त्यांची अहंकारी भावना उफाळून येत असे. सुरेश्वराचार्य पीठाधिपती झाल्याबद्दल त्यांना काही वाटले नाही. पण आचार्यांनी त्यांना ब्रह्मसूत्र भाष्यावर ” वार्तिक ” लिहायला सांगितल्याचे कळल्यावर, आचार्य आपल्याला तेवढेही योग्य समजले नाहीत — याचे मात्र त्यांना वाईट वाटले. आचार्यांकडे येऊन विचारल्यावर, आचार्य म्हणाले,
” पद्मपादा, हे कार्य कुमारील भट्टांनी करावे असे मला माझ्या मनात होते. पण त्यांना भेटण्यास उशीर झाला होता. भट्टांनी तुषाग्नीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले होते, मंडनला वादात जिंकून त्याच्याकडून वार्तिक लिहून घ्या. त्यानुसार मी हे कार्य सुरेश्वराचार्यावर सोपवले.”
” आचार्य, मी व इतर शिष्यांना भय वाटते की, सुरेश्वराचार्य पूर्वश्रमीचे श्रेष्ठ मीमांसक होते. आपल्याशी शास्त्रार्थात पराभूत झाले म्हणून त्यांनी संन्याश्रम स्वीकारला. आचार्य, भाष्यातील गुणदोष दर्शक विवेचन म्हणजे वार्तिक असते. हे मीमांसक मी ब्रह्मसूत्र भाष्य अद्वैत मतानुसार रचले आहे. सुरेश्वराचार्य वार्तिक लिहिताना त्यातील दोष दाखवून कर्मकांडाचे श्रेष्ठत्व सिद्ध करणार नाहीत कशावरून? “
सर्व शिष्यांचे असेच मत असल्याचे पाहून आचार्यांना दुःख झाले.
त्यांनी सुरेश्वराचार्यांना बोलावून म्हटले,
” कित्येकदा सर्वांना बरोबर घेऊन चालताना, कटू निर्णय घ्यावे लागतात. बहुसंख्य शिष्यांच्या मनात तुमच्या विषयी किंतू निर्माण झाला आहे. तुम्ही वार्तिक लिहायचे कार्य थांबवा.”
” पण आचार्य, पूर्वी मी मीमांसक होतो. पण आता तर मी पूर्णपणे अद्वैतवादी झालो आहे ना?”
” ते मला माहीत आहे. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच तुमची नियुक्ती श्रृंगेरी पीठाचे पीठाधीश म्हणून केली ना?”
” आचार्य, मग मला ही शिक्षा का?”
” मला कोणाचाही मनात संशय ठेवायचं नाहीय म्हणून!”
तुमच्यावर सर्वांच्या मनातील संशयाचे निराकरण करण्याची जबाबदारी सोपवीत आहे. तुम्ही अद्वैत सिद्धांतावर एक ग्रंथ लिहा. तो ग्रंथ “प्रमाण ग्रंथ” म्हणून मानला जाईल असा मी वर देतो. या ग्रंथांनी सर्व शिष्यांचे निराकरण होईल.”
” म्हणजे वार्तिक रचनेचे कार्य अपूर्णच राहणार तर ? “
” नाही वत्सा, मी असेपर्यंत कोणीही वार्तिक रचना करू शकणार नाही. म्हणूनच पद्यपादाचार्यांना ब्रह्मसूत्र भाष्यावर टीका ग्रंथ लिहिण्याचे कार्य सोपवले आहे.”
” आपली आज्ञा शिरोधार्य.” असे म्हणून सुरेश्वराचार्यांनी लेखनाल आरंभ केला. अतिशय मेहनत घेऊन अत्यंत अभ्यासपूर्ण अशी ग्रंथरचना केली. नाव दिले…” नैष्कर्म्यासिध्दी”. तो ग्रंथ त्यांनी आचार्यांना अर्पण केला. ग्रंथातील आवेशपूर्ण भाषा, रचना, तेजस्वी तर्क मांडणी पाहून आचार्यांना आनंद झाला. त्यांनी सर्व शिष्यांना बोलावून सर्वांना तो ग्रंथ दाखवला. व म्हणाले अद्वैततत्त्वावर प्रमाणभूत असा हा ग्रंथ आहे. यातील सिद्धांत प्रतिपादन परिपूर्ण आहे. प्रत्येकाने या ग्रंथाचा अभ्यास करावा. प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार वैदिक धर्माला आधारभूत होणारी ग्रंथरचना करावी. सुरेश्वराचार्यांनी सुद्धा एवढ्यावरच थांबू नये. तैतरीय आणि बृहदारण्यक उपनिषदावरील माझ्या भाषांवर वार्तिके लिहिण्याचे काम सुरू करावे.
काही दिवसांनी पद्मपादाचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्याच्या पहिल्या चार सूत्रावर लिहिलेला ग्रंथ आचार्यांना दाखवला. ती चतुःसूत्री टीका वाचून आचार्य प्रभावित झाले.
पद्मपादाचार्यानी विचारले,
“आचार्य, या ग्रंथाला कोणते नाव द्यायचे?”
” याला “विजयडिंडिम” नाव दे. या ग्रंथामुळे वैदिक धर्माचा विजय ध्वज संपूर्ण विश्वात फडकत राहील.”
” आचार्य, मी सुरेश्वराचार्यांना कमी लेखले, त्यांच्याबद्दल उगाच संशय घेतला ,त्याबद्दल मला पश्चाताप होत आहे. मनःशांतीसाठी तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा द्यावी.”
आचार्यांनी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यावर, तो म्हणाला,
” आचार्य, येथे राहून मनातली अपराध भावना अधिक प्रबल होईल. तीर्थयात्रेने आणि तीर्थक्षेत्रांमध्ये केलेल्या साधनेमुळे मन शांत होईल असे वाटते.”
” ठीक आहे जा. तीर्थयात्रा करून शुद्ध मनाने परत ये.”
सुरेश्वराचार्यांना कळल्यावर, ते आचार्यांकडे येऊन म्हणाले,
” गुरु चरणाशिवाय दुसरे कोणते तीर्थक्षेत्र असते? आपण त्याला कसे जाऊ दिले?”
” सध्या तो नैराश्याने ग्रासला आहे. आपल्यामुळे वार्तिक रचना अपूर्ण राहिली याचे त्याला वाईट वाटत आहे. मी त्याला तू लिहिलेल्या ग्रंथाची प्रत दिली आहे. त्या अभ्यासाने त्याला कळून येईल की, आपले तीर्थयात्रेला जाणे योग्य नाही. आणि मधूनच तो परत येईल.”
आता ••••••••
शंकराचार्यांनी द्विग्विजय यात्रा पुढे सुरू करायचे ठरवले .आणि श्रृंगेरीहून मुक्काम हलवला. मार्गात येणारे अनंत अडथळे पार करून ही काषायवस्त्रधारी संन्यासी मंडळी अखंड भ्रमण करीत होती. त्यांच्या धर्ममार्गात अनंत अडचणी येत होत्या. विरोधी प्रवृत्तीचे लोक, स्वार्थी द्वैतवादी, परमार्थाला व्यवसायाचे स्वरूप देणारे लोक, अशांशी मुकाबला करत क्वचित त्यांचा रोष पत्करून या सर्वांची ही यात्रा पुढे पुढे चालली होती.
विरोध करायच्या आवेशाने पुढे सरसावलेली कित्येक मंडळी आचार्यांच्या सामर्थ्यांमुळे त्यांच्याशी समरस होत होती.
दिग्विजय यात्रा रामेश्वरला आली. रामचंद्राच्या स्मरणाने आचार्य सद्गदीत झाले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-९-२०२३.


