आद्य शंकराचार्य भाग ६, (२६ ते ३०)

केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य  अप्रतिम ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य  अप्रतिम …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  आद्य शंकराचार्य !!! 

भाग – २६.

                    शंकराचार्यांनी सर्व शिष्यांना एकत्रित केले ; आणि  म्हणाले, 

   ”  मी काही शिष्य सोबत घेऊन मंडन मिश्रांच्या भेटीसाठी महिष्मती नगरीकडे जाणार आहे. बाकीच्या शिष्यांनी या त्रिवेणी परिसरातल्या विविध मोठ्या क्षेत्री निवास करून तेथील लोकांना वैदिक धर्माची महती पटवून द्यावी. वैदिक धर्मात ;  राजधर्म, समाज धर्म, व्यक्ती धर्म इत्यादींचा अंतर्भाव आहे. तसेच वैदिक धर्मांतर्गत समाजशास्त्रातील शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष , आयुर्वेद, धनुर्वेद इत्यादी लोकोपयोगी शिक्षणाच्या मार्गदर्शनाचा देखील समावेश आहे. हेही त्यांना समजावून सांगावे. हे धर्म कार्य करत असताना प्रत्येकावर फार मोठी महत्त्वाची जबाबदारी आहे. ती म्हणजे, स्वतःचे शुध्द आचरण !!  प्रचार करणाऱ्यांचे आचार विचार शुद्ध हवेत. त्याशिवाय लोकमानसावर योग्य परिणाम होणार नाही.”

          आचार्यांचा विशाल दृष्टीकोन आणि कार्य विस्ताराच्या दृष्टीने घेतलेला  निर्णय ऐकून सारा शिष्यवृंद भारावून गेला. प्रत्येकाने गुर्वाज्ञेपुढे आदरपूर्वक मान तुकावली.

            भराभर शिष्यांची विभागणी करण्यात आली. काही शिष्य रुद्राख्यपुरला, काही कौशिंबी  नगरीकडे, तर काही प्रयागकडे गेले.  काहींनी आपापल्या सोयीनुसार नगरे पसंत केली.

        नर्मदायात्रेला निघालेल्या शंकराचार्याबरोबर चित्सुखाचार्य, पद्मपादाचार्य, तोटकाचार्य नुकताच बद्रिकाश्रमातून पूर्वश्रमीच्या गिरी व सर्वात लहान असलेला  हस्तामलक आणि काही निवडक शिष्यपरिवार होता.

             नित्याप्रमाणे प्रवासात आचार्यांची प्रवचने चालूच होती. त्यात त्यांचे दोन हेतू होते, एक म्हणजे, शिष्यांना तयार करणे ; आणि   दुसरा हेतु जनजागरण हा होता. आचार्य नेहमी नवीन नवीन विषय प्रवचनाला घ्यायचे ;  आणि ते विषय दृष्टांताद्वारे फुलवीत असत. या प्रवास मार्गावरही त्यांचा शिष्य समुदाय वाढतच होता. टाळ, मृदुंग, शंख  इत्यादी वाद्यांच्या गजरात हा जत्था शिस्तबद्ध सेनादलाप्रमाणे जाई , तेव्हा त्याला आपोआपच शोभायात्रेचे स्वरूप प्राप्त होत असे. ही शोभायात्रा महिष्माती नगरीच्या गाव सीमेवरील घनदाट वृक्ष छाया पाहून मुक्काम ठोकती झाली. सर्वांना तिथेच थांबायला सांगून, आचार्य ; पद्मपादाचार्यांसह मंडनमिश्रांना भेटायला निघाले. आचार्य मंडनमिश्रांची  माहिती पद्मपादाचार्यांना सांगत म्हणाले,

” हा मंडनमिश्रा काश्मीरमधील सामवेदी मिथिल ब्राह्मण. मूळ नाव विश्वरूप. आता मगधात येऊन स्थायिक झाला. त्याची विद्वत्ता, तपस्या, अभ्यास, वेदांतावर अपूर्व श्रद्धा आहे. शिवाय तर्कशुध्द पांडित्यपूर्ण तत्वज्ञानपर साहित्यावर त्यांनी भाष्य पण केले आहे. असा महान पंडित जर आपल्याला येऊन मिळाला तर, आपले कार्य सुफल होईल.

   इथे एक गोष्ट आवर्जून लक्षांत घ्यावी की ; शंकराचार्य हे शास्त्रार्थ करण्यासाठी मंडन मिश्राना भेटणार होते. वाद किंवा भांडण करण्यासाठी नव्हे. शास्त्रार्थ झाल्यावर देखील हार किंवा जीत हा भाव त्यात असणारच नव्हता. मंडन मिश्रा यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगूनच ते त्यांच्या भेटीसाठी उत्सुक होते.

       दोघाही गुरु शिष्यांनी पवित्र नर्मदेत स्नान केल्यावर, आचार्य म्हणाले,

” तू या नर्मदातीरी असलेल्या देवालयात थांब. मी येईपर्यंत जागा सोडू नकोस.”

  आणि आचार्य  मंडनमिश्राच्या वाड्याकडे निघाले. त्यांना पाणी भरून येणाऱ्या काही स्त्रिया दिसल्या. आचार्यांनी मंडनमिश्रांच्या वाड्याची चौकशी केल्यावर, एक स्त्री देववाणीत म्हणाली,

” स्वतः प्रमाणं प्ररतः प्रमाणं”  अशी वेदाबद्दलची चर्चा ज्यांच्या वाड्याच्या दारावर ;  पिंजऱ्यातला पोपट-मैना करतील तोच वाडा मंडनमिश्रांचा समजावा.

           हे चतुर उत्तर ऐकून शंकराचार्य चकित झाले. ज्यांच्या गांवातील महिलाही देववाणीत बोलतात ते मंडन मिश्र  किती विद्वान असतील?

     आचार्य ;  मंडनमिश्राच्या वाड्यासमोर आले. वाडा म्हणजे जणू प्रति राजवाडाच. आज वाड्यात मंडन मिश्राकडे पितृश्राध्द होते. वेळ मध्यान्हीची. वाड्याची सर्व दारे आणि  खिडक्या बंद होत्या. आचार्यांना तर वाड्यात जायचे होते. शेवटी त्यांनी लघिमा या योगसिद्धीच्या साह्याने लघुरुप धारण करून श्राद्धकर्म करणाऱ्या मंडनमिश्रा यांच्यासमोर जाऊन उभे राहिले.

          मंडनमिश्र जेवढे विद्वान, तेवढेच शीघ्रकोपी, कर्मठ होते. श्राध्दकर्माच्या वेळी संन्यासाचे मुखवलोकन करणे म्हणजे महा अपशकुन. संतापाने त्यांनी  विचारले ;

” कुतो मण्डी?( तू कुठून आलास?)” आचार्यांनी श्र्लेषात्मक अर्थ लावला आणि  उत्तरले,

” आगलान मुंडी” ( गळ्यापासून वर मुंडन केलेले आहे.

  या उत्तराने बिथरलेले मंडनमिश्रा म्हणाले, ” सुरा पिता” (दारू प्यायलास काय?) सुरा पिता याचा अर्थ दारू पिवळी असते, असा श्लेशात्मक अर्थ करून  आचार्य  विनोदाने म्हणाले, 

” नैव नैव श्वेता.” 

( नव्हे नव्हे ती पांढरी असते)

              मंडन मिश्राचा राग मस्तकात पोहोचला. ते  चिडून म्हणाले, 

” तिचा रंग तुला माहित आहे?” 

आचार्य म्हणाले, 

” मला रंग माहित आहे. तुम्हाला रुची माहीत आहे?” 

  निरुत्तर झालेल्या मंडन मिश्रांचा राग शांत होईना. श्राद्ध करण्यासाठी आलेले ब्राह्मण म्हणाले, 

” माध्यान्हीला आलेल्या अतिथीला अशी वागणूक देतात का? मग आम्हीही परत जावे का?”

मंडन मिश्रा थोडे वरमले. त्यांनी आचार्यांना श्राद्ध कर्म होईपर्यंत अग्नीशाळेत थांबण्यास सांगून, पत्नी सरस्वतीला त्यांना भिक्षा वाढायला सांगितले.

      सरस्वती भिक्षा घेऊन आल्यावर आचार्य म्हणाले, 

” देवी, मी आपले बंधू कुमारील भट्टांच्या सांगण्यावरून येथे आलोय.”.

भावाचा निरोप म्हटल्यावर, ती क्षणभर आचार्यासमोर थांबली. थोडाफार संवाद झाल्यावर ; इतक्या कमी वेळात सरस्वतीची योग्यता, बुद्धिमत्ता, अभ्यास, वाक्चातुर्य  सारे आचार्यांच्या लक्षात आले. कुमारील भट्टांच्या देहापर्णाची सारी हकीगत आचार्यांनी तिला सांगितली. तिने अत्यंत स्थिरचित्ताने  संयमाने ऐकली. आचार्यांनी या धैर्यशील शक्ती देवतेला मनोमन नमस्कार केला.

         श्राद्धकर्म आटोपल्यावर मंडनमिश्र अग्नी शाळेत आले. त्यांना क्रोधित पाहून आचार्य म्हणाले,  

” मिश्राजी, आपण दोघेही एकाच ध्येयाचे यात्रेकरु असल्यावर एकमेकांबद्दल राग कशाला?”.

मिश्रांचा क्रोध तसाच पाहून, आचार्य म्हणाले, ” आपण दोघेही वैदिक धर्माचा पुनरुध्दार करु  इच्छिणारे एकाच  मार्गावरील अनुयायी आहोत…”

                     क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                   दि. ९-९-२०२३.

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                 भाग – २७.

                मंडन मिश्रा वैदिक धर्माचे नाव ऐकताच थोडे चमकले. त्यांना आचार्यांचे म्हणणे नीट लक्षात आले नसल्यामुळे म्हणाले, ” धर्माच्या गोष्टी करता आणि व्यवहार मात्र बौद्ध भिक्षुकांसारखा करता?”

       आचार्यांच्या मुखावर आश्चर्य पसरले. दाराआड उभी असलेल्या सरस्वतीही आश्चर्यचकित झाली. मंडनमिश्र म्हणाले, 

” वैदिक धर्मात संन्यास आहेच कुठे? आणि श्राद्ध कर्माच्या दिवशी संन्यासाची उपस्थिती वेदाविरुद्ध नाही का?”

       आचार्य किंचित हसून म्हणाले,

“आपल्यासारख्या विद्वान पंडितांना सुद्धा वैदिक धर्मातल्या संन्याश्रमाचा विसर पडला ना? आज देशाची परिस्थितीच अशी झाली आहे की;  जैन, बौद्ध धर्मीय पंथीयांचा जनमतावर प्रचंड पगडा बसला आहे. त्यांचे वैदिक धर्मावरचे आक्रमण इतके जबरदस्त झाले की, वैदिक धर्माचे विस्मरण पडणे साहजिक आहे. अलीकडे संन्यासी पाहिला की तो बौद्ध भिख्खुच वाटतो. कारण त्यांचे मुंडन बाहुल्य.”

     ” वैदिक धर्मात चार आश्रम आहेत ना ?  बौद्ध पंथीयांनी वेदातल्या ऋचा घेऊन त्या सोयीस्करपणे स्वतःच्या म्हणून रुढ करून  सामान्य जनतेच्या डोळ्यात  धूळफेक केली. या साऱ्यांचा तुमच्याशी उहापोह करायचा आहे. म्हणूनच आगंतुकपणे मी तुमच्या विद्यालयात आलो आहे.”

”  ठीक आहे. आता आपण भिक्षा स्वीकारावी.”

         आचार्य म्हणाले, 

” मी भिक्षा घेण्यासाठीच आलो. पण मला शास्त्रार्थाची  भिक्षा हवी आहे. “.

   ” मला मान्य आहे.

पण वादाचा निर्णय कोण करणार?” 

आचार्य म्हणाले,  

  “आपल्या पत्नीच्या विद्वत्तेबद्दल मी ऐकले आहे. त्यांना आपत्ती नसेल तर, त्या निर्णेती म्हणून राहतील.” 

” माझी पत्नी पक्षपात करणार नाही यावर आपला…. माझा पूर्ण विश्वास आहे.”

  ” भट्टापादांचार्यांची भगिनी खोटे कर्म करूच शकणार नाही. भट्टपादाचार्यांनीच निर्वाणापूर्वी आपल्याशी शास्त्रार्थ – चर्चा करण्याचा निर्देश दिला होता. “.

  आणि नंतर आचार्यांनी त्यांच्या देहार्पणाबद्दल मिश्रांना सांगीतले.

         महिष्मती नगरात शंकराचार्य आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्यात आणि  मंडनमिश्रात शास्त्रार्थ – चर्चा होणार आहे, हे ऐकल्यावर, दोन प्रकांड पंडित, वैदिक धर्माचे कट्टर अनुयायी यांच्यात होणारी चर्चा  तितकीच उच्च कोटीची होणार हे जाणून, विद्वान,  शास्त्री, पंडित इत्यादी सर्वांची व्यवस्था विद्यालयातील प्रशस्त मोकळ्या जागेत केली होती, तिथे सारे उपस्थित झाले. तीन भव्य व्यासपीठे उभारली होती. एक आचार्यांसाठी, दुसरे मंडन मिश्र आणि तिसरे न्यायदान करण्यासाठी. काही ठिकाणी असेही वर्णन आहे की ; असा हा दिव्य शास्त्रार्थ श्रवण करण्यासाठी देव – देवता देखील उपस्थित झाले होते.

           आचार्य आणि मंडन मिश्र सभास्थानी आले. उपस्थितांना अभिवादन करून स्थानापन्न झाले. वाद निर्णेती  मंडन पत्नी उभय भारती यांनी दोन पुष्पहार घेऊन सभागृहात प्रवेश केला. उभयवादपटूंना नमस्कार करून म्हणाल्या , उपस्थित जन हो! या वादाची निर्णेती म्हणून माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद.. मी या पुष्पमाला या वादपटूंच्या गळ्यात घालणार. ज्याच्या गळ्यातील माळ कोमेजेल तो पराजित झाला असे समजले जाईल.

        पुष्पमाला गळ्यात घालून वादपटू सज्ज झाले.  शंकराचार्यांचा शिष्यगण तसेच मंडन  मिश्रांचा शिष्यपरिवार, त्यांचे चाहते व अन्य पंडितही मोठ्या संख्येने उपस्थित होते. महत्त्वाचे दोघेही प्रकांड पंडितांचा महत्त्वाचा शास्त्रार्थ ऐकण्यासाठी सर्व उत्सुक झाले होते.

          आचार्य म्हणाले,  

” कर्म, उपासनेद्वारे चित्तशुद्धी झाल्यावर अहं ब्रह्मास्मिचे ज्ञान लाभते. अद्वैत वेदांचे तात्पर्य पण हेच  आहे. मुक्ती मिळवण्यासाठी केवळ कर्म व उपासनाचा उपयोग होत नाही तर, अद्वैत ब्रह्मज्ञानाने मुक्ती मिळते. पुनर्जन्म न होता पूर्णपणे मुक्ती मिळते.”.

आचार्यांच्या या मतावर मंडनमिश्रा म्हणाले,

  ” कर्म हेच वेदांचे तात्पर्य आहे. कर्म  आणि  आत्मा यातील अभेद भाव, कर्म उत्तम प्रकारे करता यावे यासाठी वेदांनी  सांगितला आहे. केवळ कर्मच करत राहिले तर स्वर्गप्राप्ती होते.”

     अशा प्रकारे हा वाद सूक्ष्म व सूक्ष्मतर विचारात शिरू लागला. उभय वादपटू एकमेकांचे भाष्य खोडून काढू लागले. दोष दाखवू लागले. कठीण प्रश्न उपस्थित होऊ लागले .दोन्ही पक्ष तुल्यबळ भासत होते. कोणाच्याही तर्कात उणीव दिसत नव्हती. दोघांच्याही  गळ्यातल्या पुष्पमाला  टवटवीत होत्या. संध्याकाळ झाली तसा वाद-विवाद थांबला.

         दुसरा दिवस उजाडला. मंडन मिश्रानी सुरुवात केली.

” फक्त फळ ईश्वरांमुळे मिळत नसून कर्म केल्याने मिळते. ईश्वर ही कल्पनाच मिथ्या आहे. कर्त्याने कर्म केले तर तात्काळ फळ मिळते.”.

        आचार्य म्हणाले,  

   ” तुम्ही तर बौद्धांवरही वरताण  केली . त्यांच्या मते ईश्वरही नाही व कर्म ही नाही. केवळ शून्यवाद आहे. आणि तुम्ही म्हणता, कर्म आहे पण ईश्वर नाही.”

” ईश्वर म्हणजे काय? समजत नसेल तर, तो नाही असे म्हणणे म्हणजे पलायन वाद नाही का?”

       मंडन मिश्रा  म्हणाले,  

  ” वेदाने ठरवून दिल्याप्रमाणे कर्मे मिळतात. मग ईश्वर कुठून आला? विश्व हे अनादी अनंत आहे .उत्पत्ती नाही की, प्रलयही होणार नाही. ज्ञानमार्ग हा रुक्ष असल्याचे सांगून वेद म्हणतात, ब्रह्म ही कल्पना आकलनाच्याही पलीकडे आहे. कर्म केले तर वैभव प्राप्ती. नाही केले तर आपत्ती. जसे कर्म तसे फळ ही आमची धारणा आहे…”

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. ९-९-२०२३.

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                भाग – २८.

   दोघांच्याही शास्त्रार्थात चांगलाच रंग भरू लागला. आचार्यांच्या प्रतिपादनानुसार ; ब्रह्म एक आहे — आणि जीव हे त्याचेच रूप !! यास उपनिषदे प्रमाण आहेत.

   यावर मंडन मिश्रांचे  प्रतिपादन होते की — जीव आणि ब्रह्म अलग अलग आहेत. फलनिष्पत्ती होते ती कर्मामुळेच !! कारण आपण त्यांचे एकत्व थोडेच बघू शकतो;?

    यावर आचार्य शंकर म्हणाले ….

कर्म तर ठीक आहे. ते करायला पण हवय. तथापि ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ; फक्त स्थूल ज्ञानच देऊ शकतात ; किंवा प्राप्त करू शकतात. त्यामुळे साक्षात्कारासाठी इंद्रिये मुळीच  सक्षम नाहीत.

   दोघांच्याही शास्त्रार्थातील सूक्ष्मता गहरी होत चालली होती. उपस्थित असणारे सर्वजण भान हरपून ऐकत होते.  जणू शब्दच ; शब्दांना ऐकत होते ;  स्वादच – स्वादाचा आस्वाद घेऊ लागला होता.  तेजच तेजाला म्हणजे स्वतःलाच  बघू लागले होते . प्रकाशच ; प्रकाशाला अनुभवत होता जणू !!

    आचार्य पुढे  म्हणाले, 

” तुमच्या वादात केवळ भौतिक जीवनादिचा विचार दिसतो. जीवनाचा अंतिम हेतू सर्वश्रेष्ठ आनंदाचा लाभ घेणे हा आहे. मन बाह्य बाजूंकडे धाव घेते ते वळवायला हवे. तसे केले तरच परम सत्य समजून येते. उपनिषदानुसार ब्रह्म हे जगाचे उपादन कारण  आणि कर्तृत्वकारक आहे. ब्रह्मापासून जगाची उत्पत्ती व अखेरक्षय होतो. जडवादी चार्वाकमताचे आल्यामुळे  तुम्ही आणि इतर पंथीय एकमेवाद्वितीय अशा ब्रह्माचा विचार करीत नाही. परब्रम्ह हेच केवळ सत्य आहे. बाकी सर्व मिथ्या आहे. परब्रम्ह हेच अद्वैत्य आहे.”

         मंडन म्हणाले,  

  ” म्हणजे विश्व खोटे आहे? तुम्ही आम्ही सुद्धा खोटेच कां?”

आचार्य म्हणाले, क्क

   ” छे!छे! तुम्ही विपर्यास करता आहात. तुमचा आमचा आत्मा अविनाशी ब्रह्मच आहे. तो मिथ्या कसा असेल? परंतु त्यावरील शरीराचे आवरण मात्र मिथ्या आहे. श्रीमद् भगवदगीतेत वर्णिल्याप्रमाणे जुनी वस्स्त्रे  टाकून नूतन वस्त्रे परिधान करावीत ; तद्वतच आत्मा जुने शरीर टाकून नवीन धारण करतो.”

             संध्याकाळ झाल्याने वाद-विवाद थांबण्यात आला.

         पुन्हा तिसऱ्या दिवशी सुरुवात झाली. सतत वाद सुरूच होता. दोघेही पूर्वमीमांसा,आणि उत्तरमीमांसाचे विद्वान होते. शंकराचार्यांनी कर्मकांडांचे स्वरूप स्पष्ट केले. त्यांचा दैनंदिन जीवनातील नित्य कर्म व कर्मकांडाना विरोध नव्हता. पण मीमांसकांच्या ;   केवळ कर्मकांडच बरोबर आहेत या मतावर त्यांचा आक्षेप होता. जीव व  शिव वेगळे नसून ते एकच असल्याने अविनाशी असल्याचे त्यांचे मत होते. मोक्ष मिळवण्यासाठी अद्वैत मतावरच श्रद्धा असली पाहिजे असा त्यांचा सिद्धांत होता.

             एकविसाव्या दिवशी मंडन मिश्रांच्या लक्षात आले की, आक्षेप घेण्यासारखे आता काहीच उरले नाही. त्यांच्या प्रत्येक आक्षेपावर आचार्यांनी सप्रमाण उत्तरे दिले होते. आपले तत्त्वज्ञान ठिसूळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना वाटले, आपण सहज आचार्यांवर मात करून जिंकू. पण आता  पराभव समोर दिसू लागल्यावर हा धक्का त्यांना सहन होत नव्हता. आयुष्यभर जतन केलेल्या कर्मकांडाचा पराभव दिसू लागताच शेवटचे प्रभावी अस्राचा उपयोग केला. मंत्र सामर्थ्याने त्यांनी प्रत्यक्ष पूर्व मीमांसांच्या सूत्राधारालाच आव्हान केले. आणि जैमिनी ऋषी प्रगट झाले.

         ” बोल वत्सा, का आव्हान केलेस?”

मंडन मिश्रा आहत स्वरात म्हणाले,व

” हे मुनीवर, तुमच्या सूत्रांचा पराभव होत आहे. तुमच्या सांगण्यानुसार, वेदांचा अर्थ कर्मकांडात्मक असून, ज्या वाक्यातून अर्थ निघतो, तो निरर्थक आहे. जन्मभर मी कर्मकांड पाळले. आज माझा म्हणजे पर्यायाने तुमचा पराभव होत आहे. कृपया मार्गदर्शन करावे.”  जैमिनी म्हणाले,   

” वत्सा, हा आचार्य प्रत्यक्ष शिव आहे. याने जे सांगितले तेच माझे मत आहे.”.

” तसे असेल तर, मग आपण बुद्धीभ्रम का निर्मिलात?”

                जैमिनी म्हणाले,  

  ” मी जे सांगितले ते सर्वसामान्यांसाठी होते. तू शोध- प्रज्ञेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतास तर, ज्ञानमार्गाची महती तुला कळली असती. तुझ्यासारखा असामान्य बुद्धिवेत्ता मनुष्य पूर्वमीमांसेच्याच आणि त्याच्या अर्थपक्षाला चिटकून राहिला हेच आश्चर्य आहे. उत्तरमीमांसेचा अभ्यास न करणे हे चमत्कारिक वाटते.”

      ” तर मुनीवर आपण तसेच स्पष्ट का नाही लिहिले? “.

मुनी म्हणाले,   

   ” तसे लिहिले असते तर, सर्वजण ज्ञानमार्गी झाले असते असे का तुला वाटते? अरे, ज्ञानमार्गी क्वचितच निर्माण होतो. सर्वसामान्यांनी ऐहिक जीवन कसे जगावे हे सांगण्यासाठी मी कर्मकांडांचा आश्रय घेतला. त्याचा तुम्ही आणि बौद्धांनी निरिश्वरवाद ओढून आणला. हा दोष कुणाचा?*

” क्षमा असावी मुनीवर !! “

       शंकराचार्यांना प्रणाम करून जैमिनीऋषी अंतर्धान पावले. मंडन मिश्रांच्या गळ्यातील पुष्यमाला पूर्णपणे कोमेजली होती. उलट आचार्यांच्या गळ्यातील माला नुकतीच घातल्यासारखी २१व्या दिवशी सुद्धा टवटवीत दिसत होती.

  निर्णेती या नात्याने उभय भारतीनी घोषित केले की त्यांचे पती मंडन मिश्रा हे पराभूत झाले आहेत.

           मंडनमिश्र पराजित झाले. मीमांसक मतवाद संपला. मुख्य कुलगुरूच हरल्यावर आपोआपच त्यांचे शिष्य अद्वैत मताच्या झेंड्याखाली येतील. त्यामुळे शिष्य समुदाय  पण बराच वाढणार होता.

   मंडन मिश्रानी नम्रपणे आचार्यांना प्रणाम करून त्यांचा शिष्य होण्यासाठी संन्यास दीक्षा मागितली. +++++

         तोच उभय भारतींचा खणखणीत स्वर आला …..

   ” माझे पती पराभूत झाले असले तरी पूर्ण पराभव म्हणता येणारच नाही. मी त्यांची अर्धांगिनी आहे. जोवर मी पराभूत होत नाही तोवर माझे पती पराभूत झाले हे मानता येणार नाही. आचार्य, आपण माझ्याशी शास्त्रार्थ करा. मी पराभूत झाले तर सत्यार्थाने माझे पती पूर्ण  पराभूत ठरतील.”

           आचार्य म्हणाले,  

  ” माते, अद्यापपर्यंत मी कोणा स्त्रीबरोबर शास्त्रार्थ केला नाही.”

  “आचार्य, आपण एकीकडे माता संबोधता आणि दुसरीकडे स्त्री म्हणून शास्त्रार्थ नाकारतात हे चुकीचे नाही का? माझ्याशी शास्त्रार्थ करायचा नसेल तर हार पत्करा.”

    ” माते, तू मला पेचात टाकलेस…”

” यत्र नार्यस्तु पूज्यन्ते  रमन्ते तत्र देवता” हीच आपली संस्कृती असल्यामुळे मी शास्रार्थ करण्यास तयार आहे.”

          पुन्हा शास्त्रार्थ  रंगू लागला. मंडन मिश्रांनी केवळ श्रोत्याची भूमिका घेतली. हा शास्त्रार्थ कित्येक दिवस चालला.उभय भारतींची सूक्ष्म विचार शक्ती आणि धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास पाहून सर्वजण विस्मित झाले. सरस्वतीच्या प्रश्नांना आचार्य सहज उत्तराने निष्रभ करू लागले.

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. १०-९-२०२३.|

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                   भाग – २९.

    महिलेबरोबर शास्त्रचर्चा आजवर आचार्यांनी केलेली नव्हती. त्यामुळे ते संकोच करू लागलेले पाहून उभय भारती म्हणाल्या …

  ” हे भगवन ; आपल्या मताविरुद्ध  जो कोणी काही प्रतिपादन करीत असेल ; तर त्याचे खंडन जरूर करायला हवे. मग ती व्यक्ती पुरुष असो वा महिला !! आणि यापूर्वीही जनक राजाने महिलेबरोबर चर्चा केलीच होती ना ? याज्ञवलक्यानी गार्गी बरोबर केली होती. तर मग आपणासच संकोच वाटायचे कारण काय ?  एक तर माझ्याशी शास्त्रार्थ करा ; नाहीतर हार स्वीकारा. “

     यामुळे आता आचार्यांच्या मनातले संदेह दूर झाले ; आणि दोघांची शास्त्रचर्चा सुरू झाली.  

   उभय भारती देखील प्रकांड पंडित ; साक्षात सरस्वती त्यांच्या जिव्हाग्री !! अनेकानेक शास्त्र सिद्धांत त्या मांडत गेल्या ; आणि आचार्य त्यावर यथायोग्य प्रमाणांद्वारा खंडन करीत गेले.  दोघेही पट्टीचे विद्वान ; मनातल्या मनात दोघांनीही एकमेकांची क्षमता  आदरपूर्वक मान्य केली.

  दोघेही वादपटू  अक्षरशः तोडीस तोड !! उभय भारतीनी  वेद ; उपनिषदे ; सगुण – निर्गुण ; पुराणे ; संहिता ; विविध सूक्ते ; इत्यादी अनेक विषयांवर प्रश्न आचार्यांच्या समोर मांडले. आणि विशेष म्हणजे आचार्यांनीही प्रमाणांसहित अचूक शास्त्र कथन करून त्यांचे समाधान केले. शेवटी अति – सूक्ष्म अशा धनपाठ ; मोक्षपाठ इत्यादींवर उभय भारतीनी शास्त्रार्थ आरंभ केला. त्याचे देखील उचित विश्लेषण आचार्यांनी केले.

   उभय भारतींच्या त्वरित लक्षांत आले की ; हा बाल संन्यासी साक्षात शिवावतार आहे ; त्यास पराभूत करणे केवळ अशक्य !!

  .    आचार्य  कोणत्याच बाबतीत हार जात नाहीतसे पाहून एक दिवस सरस्वतीने ( म्हणजे उभय भारतीनी )  वेगळाच पवित्रा  घेतला. मृदु वाणीने तिने प्रश्न केला…

          आचार्य, कामाचे लक्षण सांगा. स्त्रीच्या काम भावनेबद्दल आपले काय मत आहे? शरीराच्या कुठल्या भागावर कामाचा अधिक वास असतो? शुक्ल  आणि कृष्ण पक्षात स्त्री-पुरुषाच्या शरीरात काम वासनेचा ऱ्हास होतो किंवा वृद्धी या प्रक्रिया कशा घडतात?

     संपूर्ण  सभा तटस्थ झाली. एका विद्वान व धार्मिक स्त्रीकडून अशा प्रश्नांची अपेक्षा ना सभेत असणाऱ्या उपस्थितांना होती ना आचार्यांना. सरस्वतीला सुद्धा एका संन्याशाला असे प्रश्न विचारताना वेदना होत होत्या. परंतु पतीला पराभवा पासून वाचवण्याचा हा एकच मार्ग शिल्लक उरला होता.

    या प्रश्नांवर तर मंडन मिश्रा देखील नाराज झाले. ते पत्नीला म्हणाले —

” देवी ; असे प्रश्न संन्याशाला विचारणे सर्वथा अयोग्य आहे. आपण दुसरे काहीही जरूर विचारू शकता. ”   यावर उभय भारती बोलल्या ;  ” इथे शास्त्रार्थ चालला आहे. काम विज्ञान हेही शास्त्रच आहे ना ? मग त्यावर चर्चा होणे — यांत अनुचित काय आहे ? “

   या ठिकाणी आपण ही बाब जरूर लक्षांत घ्यावी की ; मंडन मिश्रा देखील प्रति पक्षाची बाजू घेत आहेत. कारण तेही उच्चविद्याविभूषित आहेत. अत्यंत प्रामाणिक आहेत. असो …..

   उभय भारतींचे प्रश्न ऐकून आचार्य शंकर अधोवदन करून काही वेळ गप्प बसले.

थोड्या वेळाने आचार्य म्हणाले,  

” माते, संन्याशाला काम विषयक प्रश्न विचारण्याचा  आपला काय हेतू आहे? कामवासनेचा  पूर्णतः त्याग करूनच संन्यासी  होता  येते हे तुला माहीत असून देखील असे प्रश्न का विचारतेस? देवी असले प्रश्न विचारून तू गृहस्थ धर्मालाच नव्हे तर संन्याशाला सुद्धा कलंकित करत आहेस.”

      आता मात्र आचार्य पेचात पडले. प्रश्नाचे उत्तर द्यावे तर, सनातन धर्म आणि वय आडवे येते. न द्यावे तर पराजय  स्वीकारावा लागेल. अखेरीस ते म्हणाले,

” माते, मला सहा महिन्याचा अवधी दे. मी अन्य शरीरात प्रवेश  करून या प्रश्नाचे उत्तर ग्रंथाद्वारे देईन. ”       ती म्हणाली,

” आचार्य, अन्य शरीरात शिरून काम भावनेचा विचार केला तर संन्यास धर्माला बाधक ठरणार नाही का?”

      ” नाही माते, पूर्वजन्मीचा चांडाळ पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्माला आला तर, त्याला आणि त्याच्या ब्राह्मणत्वाला बाधा निर्माण होते का? तद्वतच काही काळापुरते हे शरीर सोडून अन्य शरीरात प्रवेश केल्याने पुनर्जन्मासारखेच असते. त्या शरीराने भोग भोगून पुन्हा या शरिरात  प्रवेश करेन. आत्मा अविनाशी आहे.”

   उभय भारतींना हे मान्य करावेच लागले. त्या आचार्यांना म्हणाल्या —

        ” आचार्य, तुम्ही मला माता म्हणून संबोधलं. बालक म्हणून तुमची इच्छा मातेने पूर्ण करायलाच हवी, म्हणून तुम्हाला सहा महिन्याचा अवधी देते.” 

       आणि वादसभा विसर्जित झाली.

   आचार्य आपले शिष्य हस्तामलक व पद्मपादाचार्या सह पूर्वेकडे निघाले.

    तिघेही अमृतपुर नगरातून जात असताना, एका राजाची शवयात्रा दिसली. आचार्य म्हणाले, 

” पद्मपाद, मी या राजाच्या शरीरात परकाया प्रवेश करतो. त्याच्या इतर वैभवाबरोबरच त्याच्या राण्यांचा सहवास मिळेल आणि मला सरस्वतीच्या प्रश्नांची उत्तरे देता येतील. मी राजाच्या शरीरात प्रवेश केल्यावर माझे  हे शरीर अचेतन होईल. इथे जवळच असलेल्या गुहेत या शरीराचे प्राणपणाने रक्षण करा. ईप्सित साध्य झाले की मी परत येईन. पण काही कारणाने माझे शरीर नष्ट झाले तर मात्र, मला गती मिळणार नाही. तेव्हा माझ्या स्थूल शरीराचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

      असे म्हणून एका गुहेत शंकराचार्यांनी प्राणनिरोध करून दश्मद्वारावाटे आपल्या स्थूल देहातून लिंग देह  काढून घेतला. हा लिंग देह वायुवेगाने स्मशानभूमीवर आला व चितेवर असलेल्या अमरुक राजाच्या निष्र्पाण देहात ब्रम्हरंघ्राद्वारे प्रवेश केला.

         चित्तेला अद्याप अग्नी द्यायचा होता. ब्राह्मणांचे विधी, मंत्रोच्चारण सुरू होते. इतक्यात नवल घडले. चंदनाच्या चितेवरील प्रेतात चैतन्य संचारले. राजा अमरुक डोळे चोळत चितेवर उठून बसला. सर्वांचीच बोबडी वळली. हे काय झाले? कसे घडले? राजवैद्य मात्र जीवाच्या भीतीने तेथून पळून गेला. त्यानेच राजा गतप्राण झाल्याचे जाहीर केले होते. कोणीच त्याला माफ केले नसते. दुसऱ्या वैज्ञाने राजाची नाडी पाहून ‘सर्व ठीक’ असल्याचे सांगितले.

          राज्यावर आलेली शोककळा आनंदात परिवर्तित झाली. राजा अमरुकाचा जयजयकार झाला. नुकतीच ज्याची शवयात्र काढली होती, त्या राजाची वैभवयात्रा काढण्यात आली. वाद्यांच्या गजरात, आनंदात, जल्लोषात राजाची मिरवणूक राजवाड्यात आली.

            राजाची पट्टराणी कनकमंजिरी अतिव दुःखाने मूर्च्छित झाली होती. दासीने तिला मोठ्या प्रयत्नाने शुद्धीवर आणून राजे जिवंत असल्याची शुभ वार्ता दिली.

      पतीराजांची मूर्ती महालाकडे येत आहे हे ऐकताच तिचे मुख लज्जेने आरक्त झाले. त्यानंतर पतीचे आगमन, त्यांचे नेत्रकटाक्ष, अलिंगन वगैरे सर्वच गोष्टीत कनकमंजिरीला अत्यंत सात्विकता जाणवत होती. हा इतका फरक कसा पडला? राजाचा उतावळा स्वभाव कुठे लोप पावला? राजेसाहेबांमध्ये पडलेला फरक राजदरबारातील लोकांच्याही ध्यानात आला होता.

   महाराजांची मर्यादाशील भाषा, काटेकोर नि:पक्षपातीपणा, न्यायदान पद्धती, त्वरित निर्णय घेण्याची कृती, कारभारातील चोखंदळपणा, हाताखालील लोकांवर असलेली तीक्ष्ण नजर, अतिथींचे  आदरयुक्त स्वागत वगैरे सर्वच गोष्टीत अमूलाग्र फरक पडला होता. महामंत्री, प्रधान, उपप्रधान सर्वांना एकच प्रश्न पडला, महाराज इतके बदलले कसे? बुद्धीत तीव्रता, वाणीत गोडवा, नजरेत चौफेरता कशी आली? राजकारणाचा सर्व सूत्रे सूत्रबध्दतेने चालत आहे, हे परिवर्तन कसे घडले?

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                 दि. १०-९-२०२३.

🕉 धार्मिक व ऐतिहासिक लेखमाला ☯:

.!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                   भाग – ३०.

                 अमरुक राजाच्या राणीवशातही हाच विचार कुजबुजला जात होता. कोणी राणी म्हणे, ” स्वारीचा इतका उतावळा स्वभाव इतका कसा शांत झाला?”  तर दुसरी म्हणे,

” त्यांना  नक्कीच कुणीतरी योगीराज गुरु भेटला असावा. ” स्वारी सर्व कृतींकडे अलिप्तपणे, तटस्थपणे पाहतात.”.

तिसरी म्हणे, ” ते वेगळ्याच विचारात तल्लीन असतात तरीही रममाण झाल्यासारखे वाटतात.”

अशा तऱ्हेने प्रत्येक राणी, महाराणी आपापले मत व्यक्त करीत असे.

                राजा अमरुक मात्र आपल्या कर्तव्यात कोणत्याही तर्‍हेची कुचराई न करता अत्यंत अलिप्तपणे वागत होता. राजाच्या राणीसहवासातील प्रत्येक वागणुकीत  सरस्वतीने विचारलेल्या  प्रश्नांची उत्तरे होती. ते अलिप्त असले तरी, राणींना मात्र समरस झाल्यासारखे वाटत असतं..

              मुदतीतल्या दिवसातील काहीच दिवस शिल्लक राहिले होते. प्रत्येक राणी पतीशी एकरूप होत होती. त्यामुळे रतिरहस्य उलगडण्यास वेळ लागला नाही. स्वदेहात जायला आता काहीच हरकत नव्हती.

      इकडे राजा अमरुकच्या नव्या अविष्काराचा त्यांच्या मंत्रीमंडळींना दाट संशय आला होता. नक्कीच काहीतरी रहस्य दडले आहे. त्याशिवाय एवढे परिवर्तन शक्य नाही. कोणी जाणकार म्हणाला, 

” महाराजांचे देहावसन झाले आणि  ते सरणावरच परत जागृत झाले. इथेच काहीतरी बिंग दडलेले असले पाहिजे. कुणीतरी योग्याने त्यांच्या देहात प्रवेश मिळवला असावा. म्हणूनच ते जागृत झाले. तर मग त्या योग्याचे कलेवर इथेच कुठेतरी जवळपास असले पाहिजे.”  

  महामंत्र्यांनी गुप्तपणे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन गुप्त फर्मान काढले व गुप्तहेर चारही दिशेला रवाना केले.

        शोध घेत घेत एक दोन हेरांना वरूणशा पर्वताच्या डोंगर कपारीत दोन संन्याशी दिसले. त्यातील एक संन्याशी झोपलेला होता. महामंत्र्याला बातमी कळताच दोन्ही संन्यासाला बंदिस्त करून निद्रिस्त संन्यासाला (कलेवराला) दहन करण्याची आज्ञा केली.

          कुणकुण महाराजांच्या कानी गेली मात्र, ते आपल्या मंचकावर पहुडले आणि प्राणविरोध करून या संयमिंद्र आचार्यांनी राजाची कुडी सोडली व सूक्ष्म देहाने वायुवेगाने गुहेकडे गेले. पण तिथे पोहोचायला त्यांना काही क्षण विलंब झाला होता. तोवर राजसेवकांनी पद्मपाद व हस्तामलकास बद्ध करून, गुहेत ठेवलेले आचार्यांचेचे कलेवर ताब्यात घेऊन सरणावर ठेवले होते. पद्मपादाचार्य ओरडून म्हणत होते, ” अरे सेवकांनो, हे शव संन्याशाचे आहे. चतुर्थाश्रमाच्या नियमाप्रमाणे त्याचे दहन न करता भू-समाधी द्यायची असते. असा अधर्म करू नका.”

   पण त्यांनी प्रेत दहनाचाच विचार पक्का केला होता.

        सरणाला अग्नीस्पर्श होण्यापूर्वीच आचार्य सूक्ष्म देहाने सरणावरच्या स्थूल देहात प्रवेश करते झाले.. त्याच क्षणी पद्मपादांच्या देहात नृसिंहांचा संचार व हस्तामलकाच्या शरीरात वायूचा संचार झाला. सोसाट्याचा वारा सुटला. सेवकांच्या डोळ्यात जबरदस्त धूलीकण गेले. संधी साधून तिघेही संन्यासी त्वरेने दक्षिणेकडे निघाले. या सर्व प्रकाराने राज्यसेवक भयभीत झाले. तिन्ही आरोपी निसटले होते. बराच शोध घेतला पण…. इकडे राजगृहात महाराजांच्या अकस्मित निधनाची बातमी वायुवेगाने पसरली. पुन्हा एकदा अमृतपुर शोकसागरात बुडून गेलं. आपल्या दोन शिष्यांसह शंकराचार्य महिष्मती नगरात येऊन  तडक मिश्रांच्या विद्यालयात पोहोचले.

          इकडे सरस्वती दिवस मोजत होती. आचार्यांनी दिलेली मुदत पूर्ण व्हायला फारच थोडा अवधी शिल्लक होता. तेवढ्यात आचार्य परत आल्याचा तिला निरोप मिळाला. आचार्यासमोर सरस्वती विनयाने उभी राहिली. मंडनमिश्रही निरोप कळताच उपस्थित झाले. आचार्य म्हणाले, 

   ” देवी, तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी मुदतीपूर्व आलोय.”

सरस्वती खाली मान घालून म्हणाली,

  “आचार्य, आपले उत्तरे विद्ध आहेत म्हणूनच आपण परत आलात. मला कोणत्याच प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा नाही. आपण पूर्णार्थाने जिंकला आहात. आपण सर्वज्ञ आहात.

 प्रतिज्ञाप्रमाणे माझे पती संन्याश्रम स्वीकारण्यास तयार आहेत. आपण त्यांना संन्यास दीक्षा द्यावी. मग मी स्वर्गगमन करण्यास मोकळी होईन.”

                आचार्य म्हणाले,

” देवी शारदे, तुझ्या सत्य अस्तित्वाचा विसर पडला का तुला ? तुला जरी विस्मरण झाले असले तरी,मला तुझे रहस्य ठाऊक आहे. हे देवी ब्रह्मवाहिने, तू दुर्वास मुनींच्या शापाने मानव जन्मात आली आहेस. हे देवी सरस्वती, तू स्वर्गगमन केलेस तर, मी करत असलेल्या धर्मकार्याची अधिष्ठात्री देवी म्हणून तुझा वास या भूतलावर असल्यावरच मला प्रेरणा मिळेल. म्हणून तू जाऊ नये अशी माझी प्रार्थना आहे.”

           देवी सरस्वतीने सुद्धा या महापुरुषाचे सामर्थ्य ओळखले. म्हणून तिने सुस्मित मुद्रेने त्यांच्या विनंतीस होकार देऊन ‘तथास्तु’ म्हटले.आणि सरस्वतीने देहत्याग केला. •••

आणि जेव्हा शंकराचार्यांनी पहिला मठ स्थापन केला तेव्हा त्या स्थानी श्रीयंत्र स्थापिले. त्यामध्ये या सरस्वती अर्थात उभय भारती देवी प्रतिष्ठित झाल्या आहेत.

     नंतर यथासमय •••••••••

शंकराचार्यांनी मंडनमिश्रांना विधीपूर्वक संन्यास दीक्षा देऊन त्यांना चतुर्थाश्रमात त्यांचा प्रवेश करविला. मंडन मिश्रानी  संन्यास  स्वीकारल्यावर आचार्यांनी  त्यांचे नामकरण केले… “सुरेश्वराचार्य!”

              सुरेश्वराचार्यांनी आपल्या आधीच्या सर्व शिष्यांना पाचारण करून सांगितले,  

  ” आता मी तुमचा गुरु नाही. मी चतुर्थाश्रमात प्रवेश केला आहे. तुम्ही सर्वांनी पूज्य शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्करावे.”

        आचार्यांच्या कार्याचा हा फार मोठा विजय होता. एका फार मोठ्या कर्मठ  मीमांसकासह मोठा समुदाय आचार्यांना मिळाला होता. त्यांच्या धर्मकार्यातील फार मोठा अडथळा दूर झाला होता. आता वैदिक धर्माचा प्रसार वेगाने होण्यास कोणतीच अडचण नव्हती.

    येथे एक गोष्ट आवर्जून बघावी की — मंडन मिश्रा हे ब्रह्मा चे अवतार म्हटले जात ; तर आचार्य शंकर शिवावतार ; सरस्वती उर्फ उभय भारती या साक्षात सरस्वती म्हटल्या जात असत. आचार्यांनी संन्यास ग्रहण केल्यावर ते विष्णुरूप पण झाले. म्हणजे जो शास्त्रार्थ घडून आला तो — ब्रह्मा – विष्णु – महेश – सरस्वती यांच्यामध्ये !! अशी ही अजरामर घटना आहे.

               क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. १०-९-२०२३.

आद्य शंकराचार्य संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading