
केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य अप्रतिम …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – ११.
त्या कुमार संन्याशाचा आवेग इतका प्रचंड होता की गुरुपाऊले त्यांना सोडवत नव्हती. त्यांनी आजपर्यंत अशा आनंदाची अनुभूती कधी घेतलीच नव्हती. गुरु गोविंदयतींची अवस्था पण यापेक्षा वेगळी नव्हती. त्यांनी शंकराचार्यांचे दोन्ही खांदे धरून उठवले. मुखावलोकन केले. तरतरीत चेहऱ्याचा, आरोग्य संपन्न, असा हा कुमार संन्यासी पाहून त्यांना आनंद झालाच, पण फार फार जवळीक जाणवली. पूर्व पुण्याईच्या संचिताचा बहुमोल साठा घेऊनच हा जन्माला आला आहे. याला अनुग्रह देणे केवळ उपचार आहेत. खरंतर परमगुरु परात्पर गुरूंचे पूर्वाशीर्वाद आहेतच याला.
ते म्हणाले,
” वत्स ; इतक्या लहान वयात संन्यास? “
शंकर नम्रपणे म्हणाले,
” मी फक्त मानसिक संन्यास घेतला आहे. विधिवत शास्त्राधार पूर्वक संन्यास दीक्षा घ्यायला आपल्या पायाशी आलो आहे.”
नंतर आपल्याबद्दल सगळी माहिती सांगून हा बाल संन्यासी म्हणाला …
” या देहाला शंकर म्हणतात.”
” देहाला म्हणजे? “
” गुरुदेव, मी कोण ? याचा उलगडा अजूनही झालेला नाही. हा पंचमहाभूतात्मक देह म्हणजे मी नाही हे कळले ; तरी मी कोण हा प्रश्न तसाच राहतो. म्हणूनच मी आपल्या चरणाशी आलो आहे.”
” गुरुदेव, गुरुकुलातील विद्याभ्यास पूर्ण झाला तरी, मनाला समाधान वाटेना. सद्गुरुशिवाय तरणोपाय नाही हा विचार खोलवर मनी रुजला आणि मी संन्यास घेऊन घराबाहेर पडलो. श्रीरंगपट्टणला भगवान अच्युतांनी दृष्टांत देऊन गोकर्ण – महाबळेश्वरी आल्यावर नर्मदातीरी जाण्याचा आदेश दिला ; आणि त्यानुसार आपल्या आश्रयाला इथे आलो.”
” काऽय? प्रत्यक्ष भगवान अच्युताने तुला स्वप्नदृष्टांत दिला? अरे मलाही तसाच दृष्टांत झाला. म्हणूनच तुझी वाट पाहत खोळंबलो होतो.”
असे म्हणून गुरू गोविंदयतींनी त्यांना कवेत घेतले. खऱ्या अर्थाने शंकरांना गुरु भेट झाली. शंकरांची वणवण थांबली. योग्य स्थान त्यांना मिळाले. कृतार्थता अनुभूत झाली.
गोविंदयतींना स्वतःच्या सद्गुरु भेटीचा प्रसंग आठवला. ते सांगू लागले…
” मी पूर्वाश्रमीचा काश्मीर निवासी चंद्रशर्मा ब्राह्मण. व्याकरणावर महाभाष्य शिकण्यासाठी दक्षिणेकडे चिदंबरला निघालो. उज्जैन नगरी जवळ एका महा वटवृक्षाखाली विसावण्यासाठी थांबलो असता, अचानक एक ब्राह्मण आला आणि पाणीनीच्या अष्टाध्यायातील पकव ह्या अपवादात्मक सूत्राचे विश्लेषणाचे रूप विचारल्यावर, मी तात्काळ उत्तर दिले. उत्तर ऐकून ब्राम्हणाला अतिशय आनंद झाला. विचारले, कुठे निघालास? मी उत्तर दिले, चिदंबरला महाभाष्य शिकायला.
” म्हणजे तू पतंजली मुनींकडे जातो आहेस तर?”
ब्राह्मण म्हणाला,
” मी गौडापादाचार्य. माझे गुरु पतंजली आहेत. मला हे महाभाष्य येते. मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. मी तुला शिकवेन. तुला आता दक्षिणेत जायला नको.”
हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. वाटले प्रवासाचे श्रम वाचले. पण लगेच शंका आली. कशावरून हे पतंजलीचे शिष्य असतील? इथे यांचा मुक्काम कसा? असे प्रश्न निर्माण होऊन चेहरा साशंक झालेला पाहून, गौडपादाचार्य म्हणाले, तुला विद्यादान देण्यापूर्वी माझा पूर्वा इतिहासा सांगतो….
ते सांगू लागले …….
” मी विध्यान्द्रीच्या उत्तरेकडचा गौड प्रदेशाचा रहिवासी. पतंजली मुनींची कीर्ती ऐकून तामिळ प्रदेशातील चिदंबरला आलो. त्यावेळी आम्ही एकूण १००० शिष्य पतंजलीगुरुंकडे विद्याभ्यासासाठी होतो. नटराज मंदिरात असलेल्या १००० खांबाच्या सभागृहात एकदाच आमचा पाठ घेत असत. तिथे एका जाड पडद्याच्या पलीकडे गुरुदेव बसून त्यांचे विद्यादानाचे कार्य सुरू होई. त्यांचे दोन नियम फार कडक होते. ते कटाक्षाने पाळण्याचे बंधन होते. पाठ चालू असताना कोणीही पडद्याकडे पाहायचे नाही. आणि परवानगीशिवाय बाहेर जायचे नाही.
एकदा मला नैसर्गिक विधी अनावर झाल्यामुळे, परवानगी नेता न घेता बाहेर गेलो. त्याचवेळी एका जिज्ञासू छात्राने हळूच पडदा उचलून पाहिला आणि आत त्याला महाभयंकर दृश्य दिसले. गुरुदेवांच्या व्यासपीठावर १००० फणा असलेले आदिशेषनाग शास्त्र विवरण करीत होते. आवाज झाल्यामुळे तो महासर्प प्रत्येक शब्दागणिक विषाचे फव्वारे सोडू लागला. तिथे असलेले ९९९ शिष्य जळून भस्मसात झाले. पतंजली हे आदिशेषाचा अवतार होते. मी बाहेर गेल्यामुळे केवळ दैवाने वाचलो. पण जेव्हा आपला शेषावतार बदलून पतंजलींनी मला जिवंत पाहिले तेव्हा त्यांचा क्रोध अनावर झाला. मी त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे ब्रह्मराक्षस योनी प्राप्त होईल असा शाप दिला. पण त्यांची करूणा भाकल्यावर त्यांनी उःशाप दिला की, जो मला पकव अपवादात्मक सूत्राचे उत्तर बरोबर देईल, तेव्हाच या योनीतून मुक्तता होईल. त्याप्रमाणे तू माझ्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिल्यामुळे मी शाप मुक्त होऊन ब्रह्मराक्षस योनीतून मुक्त झालो.
हे अद्भुत, अकल्पित ऐकून शंकर अवाक् झाले. लगेच त्याच वटवृक्षाखाली गौडपादाचार्यांनी सर्व व्याकरण शास्त्र शिकवले. ते सर्व भाष्य त्यांनी भोजपत्रावर लिहून घेतले.
विद्याभासाचे काम अखंडपणे १४ दिवस चालले असल्यामुळे क्षणभरही विश्रांती मिळाली नव्हती की, नीट झोप नव्हती. अध्ययन संपल्यावर भूर्जपत्रांचा गठ्ठा उशाशी घेऊन तिथेच वृक्षा खाली झोपल्यवर ; लगेच गाढ झोप लागली. एका बोकडाने येऊन उषालगतच्या पत्रांचा काहीच भाग ओरबडून खाण्याचा प्रयत्न केला. जाग आली तेव्हा या दुर्मिळ ज्ञानाचा नाश झालेला पाहून अतिशय वाईट वाटले. ” दैव देते न कर्म नेते” तसेच हे झाले. शेवटी दैव, प्रारब्धावर विश्वास ठेवावाच लागतो. जिथे गौडपापादाचार्या सारख्या ज्ञानी पुरुषाला ब्रह्मराक्षस योनी भोगावी लागली. याला कर्मगतीच कारण झाले ना? माझ्याही नशिबात पुढे काय भोग आहे हे मला तरी कुठे माहित होते? असा विचार करून शंकर शांत झाला.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-९-२०२३.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – १२.
गौडपादाचार्य पुढे सांगू लागले…
” १४ दिवसांच्या श्रमाने मी पार थकून गेलो होतो. शरीरात बिलकुल त्राण नव्हते. तरी त्या ज्ञानपत्रांच्या सुरक्षिततेसाठी तो गठ्ठा डोक्यावर घेऊन उज्जयिनीला येत असताना मूर्च्छित झालो. एका वैश्य ( वाण्याच्या ) कन्येने पाहिलं. आणि तिने मला तिच्या घरी आणले. वैश्य कन्येने माझ्या सुश्रुतेसाठी शूद्र कन्या ठेवली होती. दोघींच्याही सेवेने मी लवकरच पूर्ववत सुदृढ झालो. बोकडाने खाल्लेल्या भोजपत्रावरील भाषांचा भागाचा जेवढा आठवला तेवढा भाग मी लिहून काढला.
तोच ध्यानीमनी नसताना धर्मसंकट कोसळले. वैश्यकन्या व त्या शूद्र कन्येचा माझ्यावर जीव जडला. वैश्यकन्येने आपली इच्छा वडिलांना सांगितल्यावर, माझे रूप गुण बघून त्यांनाही जावई म्हणून मी पसंत पडलो. वैश्य म्हणाला,
” माझ्या कन्येने तुझी मनोभावे सेवा केली. तुला जीवदान दिले. तेव्हा तिची इच्छा पूर्ण करणे तुझे कर्तव्य आहे.”
मी नम्रपणे म्हणालो,
” वैश्यश्रेष्ठ, माझा जन्म शास्त्रांचा अभ्यास करण्याकरता आहे. मला लग्न करण्याची बिलकुल इच्छा नाही. ल”
” पण माझ्या कन्येने तुला मनोमन वरले आहे. तेव्हा तिची इच्छा पूर्ण करणे तुझा धर्म आहे. तुम्हाला पुत्र झाल्यावर तिच्या अनुमतीने पुढे संन्यास घेऊ शकशील.”
मी पेचात पडलो. एकीकडे मन वैराग्याकडे धांव घेत होते. त्यासाठी मी माझा देश सोडला होता. तर दुसरीकडे उपकर्त्या स्त्रीचे ऋण फेडणे ही धर्माज्ञा होती. काय करावे समजेना.
अखेर प्रश्न राज्यसभेत मांडला गेला. राजाने माझे सोज्वळ चेहऱ्यावरचे विद्येचे तेज, राजबिंडे शरीर पाहून राजाला वाटले याला आपली कन्या दिली तर, पुढे आपली राजगादी याच्या सुपूर्द करता येईल. असा विचार करून राजाने आपला मनोदय माझ्यासमोर व्यक्त केला. मी पेचात पडलो. एक मुलगी नाकारण्यासाठी येथे आलो तर दुसरी राजलक्ष्मीसह गळ्यात पडू पाहत होती. काही न सुचून मी गप्प बसलो तर, राजाला माझा होकार आहे असे वाटले. तेवढ्यात प्रधान म्हणाले,
” माझी सुंदर सुविद्य कन्या या भाग्यवंतास द्यावीशी वाटते.”
हाय रे दैवा! वैश्य कन्येच्या बाबतीत संकटात सापडलो. न्याय मागायला राजाकडे आलो तर, त्यांनी त्यांची कन्या देऊ केली. राजाज्ञेचे उल्लंघन होऊ नये म्हणून गप्प बसलो तर, मंत्री महोदय आपली कन्या देवू पाहत आहेत. आता ती शुद्र कन्याही गळ्यात पडते की काय असा विचार करतो आहे, तोच नियतीने तेच घडवले. ब्रह्मचर्य पालन वृत्ती असलेल्या मला ; चार स्त्रियांचा पती होण्याची पाळी आली होती.हा दैवविलासच नाही का?
यथावकाश चारही पत्नींना पुत्र प्राप्ती झाली. राजकन्येचा पुत्र श्रीहर्ष विक्रमादित्य पुढे उज्जयिनीचा राजा झाला. प्रधानाची ब्राह्मण कन्येचा पुत्र भर्तृहरी माझा परमार्थिक वारसा चालवतो. तो विरागीवृत्तीने माझ्याजवळ आश्रमीय जीवन व्यतीत करतो आहे. आणि वैश्य व शुद्र कन्यांची मुले भट्टी व वरुची उत्तम क्षेत्रे गाजवीत आहे. चारही समंजस पत्नींनी माझ्या संन्याशी जीवनक्रमाला मान्यता दिली.
त्यानंतर मी सर्व संगपरित्याग करून सद्गुरू शोधार्थ बाहेर पडलो. यात्रा करीत करीत बद्रिकाश्रमी आलो. खूप वणवण करून मनाच्या तळमळीने माझ्या सद्गुरूंची भेट झाली. माझी सारी तपश्चर्या फळाला आली.
गुरु गोविंदयतींनी सर्व हकीगत कथन केल्यावर म्हणाले,
” आज तुझ्यासारख्या कुमार संन्याशाला भेटल्यावर, मला माझ्या सद्गुरूंची भेटीची आठवण झाली. दिव्याच्या ज्योतीने दुसरा दिवा लावावा तसे मला झाले. माझे गुरुऋण फेडता येईल. तुला अनुग्रह दिला की, परंपरेने चालत आलेल्या गुरुऋणातून मी मुक्त होईन.”
या कुमार संन्याशाला गुरु गोविंदयतींच्या आश्रमाचा परिसर अतिशय आवडला. कित्येकदा नर्मदेचा खळखळात ऐकता ऐकता त्यांना ध्यान समाधी लागायची. विष्णू शर्माही या गुरु शिष्यांच्या भेटीमुळे भारावला होता. गुरु गोविंदमुनींच्या साधनाश्रमासमोर काही मुनीवर या कुमार संन्याशासंबंधी चर्चा करत होते. हा कुमार संन्यासी ज्याने १२ व्या वर्षीच संपादन केलेली विद्या अफाट आहे. तो तर वयाच्या आठव्या वर्षी वेदवेडःदांग पारंगत झाला. तर्कशास्त्र, न्यायशास्त्र, व्याकरण शास्त्रातही त्यांनी प्राविण्य मिळवले. हा नक्कीच कोणीतरी योगभ्रष्ट पुण्यात्मा असावा. आठव्या वर्षी आचार्य पदवी कोणालातरी मिळाली आहे का आजवर ?
त्यांची चर्चा सुरू असताना दुरून कुमार शंकर व विष्णू शर्मा येताना दिसले. ते जवळ आल्यावर एक ऋषी म्हणाले, आमचे एका प्रश्नाचे निराकरण करावे. म्हणाले,
” त्या दिवशी पूज्यपादांसमक्ष तुम्ही म्हणाले होते की, पंचमहाभूतात्मक देहधारी नाही. तर मग तुम्ही आहात तरी कोण? ”
कुमार म्हणाले…
” मनोबुध्द्यहंकार चित्त्तानिदानादं श्रोत्राजिव्हे नच घ्राणनेत्रे। नचव्योमभूर्मीर्न तेजो न वायुः चिदानंद रूपः।
शिवोऽहं, शिवोऽहं।।”
अर्थात मन, बुद्धी, अहंकार, चित्त मी नाही. श्रोत्र जिव्हा, नाक, डोळे पंचंद्रिय मी नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचभूते मी नाही. मी चिदानंद स्वरूप शिव आहे.
खरं म्हणजे पंचमहाभूतात्मक देहधारीच नव्हे तर माझी इंद्रिय असलेले विकार, हे मी काहीच नाही. फक्त सुषुप्ती अवस्थेत साक्षी असलेला मी शिव आहे. मी चैतन्य आनंदरूप असलेला शिवात्मा आहे. असे सांगून त्यांनी तिथल्या तिथे सहा श्लोक तयार करून दाखवले. या सहा श्लोक म्हणजेच निर्वाण ; षटक !!
त्यांची विचारधारा, काव्यशक्ती, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून सारे ऋषी थक्क झाले. शंकरांनी या षटकानंतर लगेच आत्मपंचक स्तोत्र रचले व म्हणून दाखवले….
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-९-२०२३.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – १३.
बाल संन्याशाचे असे अगाध ज्ञान पाहून एका ऋषीनी त्यांस शंका विचारली,
” हे सर्व जर तुला माहित आहे तर तू इथे का आलास? “
शंकर म्हणाले,
” मला जशी अनुभूती यावी तशी आलेली नाही. गुरुमाऊलीच्या सानिध्यात राहून अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव घ्यायचा आहे.”
सगळे ऋषी मनात म्हणाले, ” आम्ही फक्त वयाने वाढलो. ज्ञान काही झाले नाही. हा मुलगा खरोखरच बृहस्पतीसारखा दिव्य पुरुष आहे.”
आचार्य शंकर प्रज्ञावंत आणि विज्ञाननिष्ठ तर होतेच त्याचबरोबर ते भाषा प्रभुत्वातही अग्रेसर होते. एकाने प्रश्न केला,
” जर सर्व खल्वीदम ब्रम्ह आहे तर, मग तू स्वतः आणि गुरुदेव गोविंदयती हे सुद्धा ब्रह्मच ना ? मग असे अद्वैत प्रतिपादन न करता तू येथे द्वैती कसा? तू शिष्य, ते गुरु, तू वंदन करतोय ते स्वीकारतात. तू सेवा करतोस. ते स्वीकारतात. हे कसे? “
शंकरने लगेच..” तत्वोपदेश” हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला व म्हणाले…
” भावाद्वैत सदा कुर्यात क्रियाद्वैतं न काहिंचित्।
अद्वैत त्रिषु लोकेषु न अद्वैतं गुरुणा सह।।”
अर्थात मी ब्रह्म दोन नसून एकच आहोत हा भाव सदा अंगी बाणावा. परंतु प्रत्यक्ष कार्य करताना आपण इतरहून वेगळे आहोत अशा समजुतीने वागावे. सर्व भुवनत्रयाबद्दल अद्वैत वृत्ती असावी, पण गुरुशी वागतांना मात्र ते सेव्य, मी सेवक अशी भावना असावी. तिथे अद्वैत योग्य नाही.”
थोडक्यात शंकरने सूचीतच केले की ; अद्वैत ही अवस्था असावी. आणि द्वैत हा भाव असणेच योग्य असते. जिव्हेवर कोणताही पदार्थ नसताना तिची असणारी ती अवस्था ; त्याचवेळी आस्वाद घेण्याची शक्ती कायम असते ना तिची ? आस्वाद घेणे हा भाव झाला.
असे हे उत्तर ऐकून सर्वांचे समाधान झाले. शंकरांची गुरुनिष्ठा नम्रभाव सर्वांना प्रकर्षाने जाणवला.
नर्मदा मैयाच्या साक्षीने गोविंदयतीनी या पूर्णापुत्राला ( म्हणजे पूर्णा नदीच्या कांठी वास्तव्य असणाऱ्या ) विधीपूर्वक संन्यास दीक्षा दिली. तो दिवस होता फाल्गुन वद्य द्वितीया. पारमार्थिक क्षेत्रातील त्यांची पायरी उंचावणारा होता. श्री नारायणापासून सुरू झालेली ही पवित्र परंपरा ,!! त्यात आज या कुमार संन्यासी शंकराचार्याने प्रवेश केला. आता खऱ्या अर्थाने शंकराचार्यांच्या कार्याला सुरुवात झाली. आणि अनुग्रह मिळाल्यामुळेच की काय त्यांना काव्य स्फूर्ती स्फुरली…. हा दीक्षाविधी नर्मदेच्या साक्षीने तिचाच किनारी संपन्न झाला. आणि त्यांच्या मुखातून ” परा ” प्रसवू लागली ती ” वैखरी “मधून •••••
” सबिंदु- सिंधू- सुस्खलततरड्ःग-भड्ःग रज्जितम्।
दीषस्तु पापजात- जातकारि-वारी-संयुतम्-संयुतम्।
कृतान्तदूत- कालभूत भीतिहारि- वर्मदे।
त्वदीय-पाकपड्ःकजं नमामि देव नर्मदे।।”
कृतांत दूताप्रमाणे भयंकर असलेले ‘कालभूत’ म्हणजे काळासारखे प्राण घातक यांच्या भीतीपासून संरक्षण देतेस. ‘वर्म’ चिखलत होतेस. अशी तू समर्थ आणि दयाळू आहेस. नर्मदेची त्यांनी केलेली ही स्तुति म्हणजेच हे आठ कडव्यांचे नर्मदा स्तुतीपर नर्मदाष्टक !! हे अष्टक लिहिल्या नंतर त्यांनी प्रातःस्मण साधनपंचक ,यतिपंचक ही स्तोत्रे लिहिली. तसेच ” वाक्यवृत्ती”, ; ” विवेक चूडामणी” हे ग्रंथ लिहिले. या सर्व लेखनातील ओघवती भाषा, ज्ञानप्रचुरता, पारमार्थिक दृष्टिकोनाची उंची सारे विलक्षण, केवळ स्तिस्मित करणारे होते. इतक्या लहान वयात एवढे ज्ञान प्राप्त कसे झाले आणि त्यांच्या लेखणीतून कसे उतरते ? हे आश्चर्यच होते.
गुरु गोविंदयतींनी या शिष्याला अध्यापनाचा पण अधिकार आता दिला. त्यामुळे शंकराचार्य लहान आणि छात्र समुदाय वयाने मोठे अशी विसंगती दिसू लागली. असे असले तरी ते एकरूपतेणे अखंड शिकवत असत.
गोविंदयती त्यांना गौडपदाचार्यांनी शिकवलेला मांडूक्य-कारिका हा सुप्रसिद्ध ग्रंथ शिकवत होते. यातील सूक्ष्म निरूपणाने शंकराचार्य प्रभावित होत होते. त्यांचे अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य वेगाने चालू होते.
श्रावण महिन्याचे दिवस होते. जोरदार पाऊस चालू होता. नर्मदेचे पाणी बांध फोडून बेफानपणे वाहत होते. क्षणोक्षणी पाणी वाढत होते. सारे जण हवालदिल झाले होते. क्षणोक्षणी फुगत जाणारी नर्मदा किनाऱ्याच्या आश्रयाला राहणाऱ्या लोकांना जणू आपल्या पोटात सामावून घेऊ पहात होती. श्रावण मास असल्यामुळे ओंकारेश्वराला यात्रेकरूंची तुफान गर्दी होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठमोठे वृक्ष उन्मळून पडत होते. मृत्यूची भीषणता सर्वांनाच जाणू लागली. नर्मदा सर्वांनाच आपल्या सामावून घेत होती.निसर्गाचे ; सृष्टीचे हे रौद्र स्वरूप अक्षरशः धडकी भरवत होते.
त्याचवेळी गोविंदयती आपल्या गुहेत ध्यानस्थ होते. नर्मदामैया गुफेच्या तोंडापर्यंत आली होती. जणू त्यांचे चरणदर्शन घेण्यास उत्सुक होती. शंकराचार्य स्थिर नजरेने पाण्याचे तांडव पहात शांतचित्ताने नर्मदाष्टक म्हणत होते…. सबिंदु… सिंधू …नमामि देवी नर्मदे…
” हे आई, तू सर्व प्राण्यांना सुख देणारी आहेस. आई नर्मदे, मी तुला अनन्यभावे नमस्कार करतो.”
शंकराचार्यांना स्वतःच्या प्राणाची क्षती नव्हती. त्यांना फक्त गुरु गोविंदयतींच्या समाधीभंग व प्राणाची भीती वाटत होती. नर्मदा मात्र पुढे पुढे येत होती. सारा आश्रम तिने वेढून घेतला. सगळे शिष्य गर्भगळीत झाले.
शंकराचार्य नर्मदेला उद्देशून म्हणाले,
” हे शंकर कन्ये, तुला पूर्णा नदीचे काय झाले माहीत नाही का? एकदा ती अशीच उन्मत्त झाली होती. पण क्षणात तिला तिचे पात्र बदलावे लागले होते. अगं!”अति सर्वत्र वर्जते” तुला माहित नाही का ? “
असे म्हणून तिथे असलेला कमंडलू त्यांनी कलता केला. आणि जलाकर्षण मंत्र म्हणू लागले. आणि काय आश्चर्य? तो प्रचंड जलप्रपात त्या छोट्याशा कमंडलूमध्ये येत येत गुप्त होऊ लागला. नर्मदेचे तांडव कमी होऊ लागले.
येथे एक स्पष्टीकरण अवश्य करू इच्छितो आहोत की — पंचमहाभूतांची ही सृष्टी ; ज्यांनी पंच महाभूतांवर आपल्या तपोबलाने विजय मिळविलेला असतो असे महात्मे ; या पंचमहाभूतांचे नियंत्रण निश्चितच करू शकतात. आपण फक्त या त्रिमिती जगतातील निकषांवर अशा गोष्टी पाहू जातो तेव्हां याबद्दल कोणतेही समाधानकारक असे वैज्ञानिक उत्तर मिळत नाही ; आणि म्हणून आपण या गोष्टी चमत्कार या सदरात टाकून मोकळे होत असतो. तथापि याहीपलीकडील कितीतरी विज्ञाने आहेत हे फक्त साधकच समजू शकतो.
सारे शिष्यगण, ऋषिमुनी आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. त्यांना वाटले, ही काहीतरी अघोरीशक्तीने नर्मदेला रोखले आणि ते आणखी भयभीत झाले. पण गोविंदयती पुत्र भर्तृहरिला मात्र आचार्यांची योग्यता पटली. त्यांना अतिशय आनंद झाला.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-९-२०२३.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – १४.
एव्हाना गोविंद यतींची समाधी उतरल्यामुळे ते गुफेतून बाहेर आले.भर्तृहरीने पित्याला निसर्ग प्रकोप कथन करून शंकराचार्यांनी योगसाधनेने सारा जलप्रलय कमंडलूत कसा आकर्षून घेतला ? हे सांगितले. केवळ त्यांच्यामुळेच जीवदान मिळाले हे ऐकून पूज्यपाद गोविंदयती ; नतमस्तक उभ्या असलेल्या शंकराचार्यांकडे कौतुकाने पाहू लागले. डोळ्यातून आनंदाश्रु वाहात असताना त्यांनी शंकरांना आपल्या कवेत घेतले. म्हणाले, ” तो तूच…तूच रे तो… “
गोविंदयती पुढे सांगू लागले —–
” बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी सद्गुरुंसह बद्रिकाश्रमात होतो. भगवान व्यासही आमच्यात येऊन बसत. एकदा मी त्यांना म्हणालो,
“आपण बदानारायणाच्या वेदांत सूत्रांवर भाष्य का लिहीत नाही?”
ते म्हणाले होते •••••
“जो शिष्य तुझा तुझ्या समाधीचा भंग होऊ नये म्हणून नर्मदेचा रौद्र प्रवाह एका छोट्या कमंडलूत अडवून ठेवेल, तो तुझा शिष्य हे भाष्य लिहील. आणि सूत्रार्थांचा गोंधळ करणाऱ्या कथित पंडितांचा पराभव करील.
भगवान व्यासांनी सांगितलेला तो तूच.. स्वयं नारायणाने तुला इथे पाठवले आहे. तसा मला स्वप्नदृष्टांतही झाला होता. आता तू किरकोळ काव्यरचना करणे सोडून भाष्यरचनेला प्रारंभ कर.”
नम्रपणे शंकर म्हणाले,
” आपली आज्ञा शिरोधार्य. पण तत्पूर्वी…” “अडखळू नकोस. काय ते स्पष्ट सांग.”
शंकर म्हणाले,
“श्रीमद् गौडपादाचार्यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा आहे.”
” ठीक आहे. लवकरच माझ्या सद्गुरूंची आणि तुझी भेट घडवून आणतो.”
या नर्मदामैयेच्या सानिध्यात कुमार संन्याशांनी जीवनाचा बराच टप्पा गाठला होता. ओंकारेश्वर स्नान म्हणजे सर्वार्थाने त्यांच्या प्रगतीचे स्थान ठरले होते. अच्युताने दिलेल्या स्वप्नदृष्टांताची प्रचिती त्यांना आली होती.
काही दिवसांनी गोविंदयति आणि शंकराचार्य बद्रिकाश्रमी पोहोचले. गुरूंच्या गुरुची म्हणजेच आपल्या परमगुरूंची भेट होताच शंकराचार्यांना अतिशय आनंद झाला. गौडपादांनी मांडुक्योपनिषदाचा अभ्यास करून मांडूक्य कारिका भाष्य लिहिले होते.
एके दिवशी गोविंदयती म्हणाले,
” वत्सा शंकरा, आता तू पूर्ण ज्ञानी झालास. तुला बरेच कार्य करायचे आहे. सर्व विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या काशी क्षेत्र जाऊन प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहून तुझ्या कार्याचा आरंभ कर.”.
“आज्ञा शिरोधार्य! “
गुरूंना प्रणिपात करून ते वाराणसी कडे निघाले.
शंकराचार्य आणि त्यांचा पहिला शिष्य विष्णू शर्मा काशी कडे निघाले.विंध्याचलच्या मार्गावर अनेक नगरे, ग्रामे लागत. रात्री ते एखाद्या मंदिरात निवास करत. मग तिथे प्रवचन करीत. सहज सोप्या भाषेत वेदांतावर अधिकारवाणीचे त्यांचे प्रवचन ऐकून, या बालसंन्याशाला पाहायला जनसमुदाय लोटे. काशी क्षेत्री पोहोचेपर्यंत शंकराचार्यांनी “शतश्लोकी” ची रचना पण केली. काशीत पोहोचल्यावर त्यांनी विष्णू शर्माच्या विनंतीवजा आग्रहाने त्यांस विधीवत् दीक्षा दिली. त्याचे नाव ठेवले चित्सुखाचार्य. हेच शंकराचार्यांचे प्रथम शिष्य !! शंकराचार्यांना काशीच्या दर्शनाने अत्यानंद झाला. भाववृत्ती उचंबळून आल्यावर तर त्यांनी काशीचे वर्णन करणारे “काशी पंचक” रचले….
” काश्यां हि काशते काशी, काशी सर्व प्रकाशिका।
सा काशी विदिता येन, तेन प्राप्त काशिका।।”
अर्थात काशी म्हणजे आत्मा, तो काशीतच प्रकाशतो. ह्या काशीचा गूढार्थ ज्याला कळला तोच खरा काशीला पोहोचतो.
या काशीतच शंकराचार्यांच्या प्रतिभेला विलक्षण बहर आला. त्यांनी माणिकार्णिकाष्टक, द्वादश- ज्योतिर्लिंग स्तोत्र अन्नपूर्णाष्टक, कालभैरव अष्टक इत्यादी स्तोत्रे रचली. ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या रोजच्या प्रवचनानंतर विद्वानांशी शास्त्रार्थ होऊ लागला. शिष्यांची संख्या वाढू लागली.
एके दिवशी चोळ राज्यातील अहोबिल या गावाचा एक तेजस्वी सनंदन नावाचा युवक त्यांच्याकडे येऊन, अत्यंत नम्रपणाने शंकराचार्याची करुणा भाकू लागला.
अहोबिल मध्ये लक्ष्मी नृसिंहाचे सुंदर मंदिर प्रसिद्ध होते. सनंदनाचे माता पिता नेहमी या मंदिरात जात. दुर्दैवाने त्याच्या लहानपणीच मातापित्यांचा स्वर्गवास झाला. सनंदनचे पालन, पोषण, शिक्षण त्याचे मामा दिवाकरने केले. दिवाकर मीमांसक असल्यामुळे कर्मकांडांना जास्त महत्त्व देत असे. त्याने सनंदन कडून तोच अभ्यास करून घेतला. या सर्वाचा अभ्यास केल्यावर सनंदानाला प्रश्न पडला… अंतिम सत्य कोणते? केवळ कर्मकांड करून उपयोग काय? सत्याकडे पोहोचण्याचा मार्ग कोणता? त्याने आपल्या मामांना विचारले. मामाने रुक्षपणे उत्तर दिले व त्याचे लग्न आपल्या कन्येशी लावून दिले. ती सुखोपभोगाची भोक्ती होती. तिला वैदिक चर्चेत रस नव्हता. सनंदन अस्वस्थ झाला.
योग्य मार्ग सापडेना.
त्याने घर त्यागण्याचा आपला विचार मामांना सांगितल्यावर, ते संतापून म्हणाले,
” अरे मूढा, तू ज्यासाठी गृहत्याग करतोस ते अंतिम सत्य म्हणजे कर्मकांडच आहे. कर्मानुसार फळ मिळते असे शास्त्र वचन आहे. जर तू गृहत्याग केल्यास तर, तुझी पितृक संपत्तीतील कपर्दिकही मिळणार नाही तुला !!”
” जशी आपली इच्छा! “
सनंदन मामाच्या गुरुकडे आला. पण तिथेही त्याची निराशा झाली. तेही त्यांचे समाधान करू शकले नव्हते.
ज्ञानमार्गाचा अभ्यास करायला हवा. योग्य गुरू मिळायला हवेत. सनंदन काशीक्षेत्री आला. शंकराचार्यांचे रोजचे प्रवचन ऐकून त्यांच्यावरील सनंदनचा विश्वास दृढ झाला. एकदा गंगा तीरावर शंकराचार्य व चितसुखाचार्य उभे होते. पलीकडच्या तीरावर सनंदन उभा होता. आचार्य म्हणाले,
” चित्सुखा, आज आपण याची परीक्षा घेऊ. उत्तीर्ण झाला तर याला संन्यास दीक्षा द्यायची…”
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-९-२०२३.
!!! आद्य शंकराचार्य !!!
भाग – १५.
चित्सुखाचार्य म्हणाले,
” हा आता तर पलीकडच्या काठी आहे. त्याला इथे बोलावू का?”
” होय! बोलाव. तीच त्याची परीक्षा!”
त्यांनी सनंदनला हाक मारून त्वरित इकडे यायला सांगितले. सनंदनने पाहिले, गंगा पार करण्याचे कोणतेच साधन नाही. पाण्याला वेगही फार होता. पण गुरूंची अवज्ञा कशी करणार? मृत्यू आला तरी हरकत नाही. सनंदनने त्यांच्या नावाचा जप करत गंगेत पाऊल टाकले. आणि वेगाने आचार्यांकडे येऊ लागला. आणि काय आश्चर्य ? त्याच्या प्रत्येक पावलाखाली कमल पुष्प उगवू लागले. त्या कमल पुष्पावर पाय ठेवत ठेवत सनंदन आचार्यांकडे पोहोचताच त्यांनी त्याचे स्वागत केले.
” ये पद्मपादा… तुझ्याच प्रतिक्षेत होतो.”
नंतर शंकराचार्यांनी त्याला दीक्षा देऊन त्याचे नाव पद्मपादाचार्य ठेवले.
काही काळानंतर •••••
गुरु गोविंदयती व शंकराचार्य हिमालयाच्या प्रवासाला निघाले. आश्रमाची व्यवस्था भर्तृहरिकडे सोपवली. ओंकारेश्वर, अमरकंटक ते हिमालयापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक ठिकाणचे महात्म्य, संन्यास धर्माचे आचरण, वैदिक धर्म, देशकार्य यांची योग्य सांगड कशी घालावी? प्रत्येकाचे कर्तव्य — इत्यादी अनेक विषयांचे मार्गदर्शन गुरुदेव त्यांना देत होते. दोघांनाही गुरु भेटीची विलक्षण ओढ लागली होती.
दोघेही बद्रिकाश्रमी पोहोचले तेव्हा तिथे अलकनंदेच्या काठी भव्य शीलाखंडावर ब्रह्मनिष्ठ गौडापादाचार्य पद्मासन घालून समाधी अवस्थेत बसले होते. गुरुदेवांचे हे दर्शन म्हणजे सर्व विकार, श्रम नाहीसे करणारे केवळ आनंद निर्मिती करणारं होतं.
दोघांनीही त्यांना साष्टांग दंडवत घातला. गुरु गौडापादाचार्यांनी शंकराचार्याकडे स्निग्ध नजरेने पाहिले. त्याचवेळी त्यांना जाणवले की ; हा कुमार संन्यासी प्रकाश मार्गावरून आला आणि प्रकाश मार्गानेच त्याचा प्रवास पुढे जाणार. जणू प्रकाशातूनच आलाय हा — सर्वत्र प्रकाश करण्यासाठी !!
गोविंदयतींना ते म्हणाले,
” याला इथे काही काळ राहायला हवे. याला इथे ठेवून तू परत जा.”
त्याप्रमाणे गुरु गोविंदयती ओंकारेश्वरला परतले. आणि इकडे गौडपादाचार्यांच्या देखरेखेखाली या कुमार संन्याशांचे अध्ययन सुरू झाले.
एकीकडे अध्ययन चालू असताना, परम गुरुच्या आज्ञेने ग्रंथनिर्मितीचे कार्य पण पुढे सुरू झाले. सरळ सोप्या भाषेत कारिकेचे लेखन सुरू झाले. त्यावरील त्यांच्या लेखनाची गती पाहून गौडपादाचार्यांना अतिशय आनंद झाला. शंकराचार्यांचे सामर्थ्य पाहून त्यांना प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिण्याची त्यांनी आज्ञा केली. सामान्यांना या प्रस्थानत्रयीवरचे साधे वाचन, अवलोकन, अवघडच !! मनन चिंतन तर केवळ अशक्य !! अशा या कठीण विषयाचे शंकराचार्यांनी आधी अध्ययन केलं. नंतर भाष्य लिहिण्यास सुरुवात केली.
हे अशक्यप्राय प्रस्थानत्रयीवरचे भाष्य त्यांनी अगदी थोड्या अवधीत लिहून काढले. आणि जगप्रसिद्ध अशा षोडश भाष्यांची रचनाही केली. वेदांत सूत्रावरचे शंकराचार्याचे भाष्य केवळ अद्वितीय असे झाले.
भगवान गौडपादाचार्य या शिष्याच्या कर्तृत्वाने धन्य झाले. आणि म्हणाले,
” शंकर मला प्रेरणा झाली की, माझे परमपूज्य शुक्राचार्य आणि पणजेगुरु ( म्हणजेच परात्पर गुरू ) महर्षी व्यासांचे तुला दर्शन घडवावे. त्यासाठी आपल्याला कैलास पर्वतावर जावे लागेल. कैलास म्हणजे, देवाधिदेव महादेवाचे निवासस्थान. तिथे सहसा कोणी जाऊ शकत नाही.
आचार्य शंकर यांच्यासाठी ही महान अशी पर्वणीच होती. अशा पवित्र स्थानी परमगुरू गौडपादाचार्यांसोबत जायला मिळते म्हणजे अहोभाग्यच!!
यथासमय कैलास पर्वतावर पोहोचल्यावर, शंकराचार्यांना अणुरेणुत भगवंताची प्रचिती येऊ लागली. वेदांत सूत्राचे आद्य प्रणेते महर्षी व्यासांचे दर्शन होताच शंकराचार्यांचे देहभान हरपले. जीवनातील सर्वोच्च आनंद गवसल्याचे समाधान वाटले. त्यांनी त्याच क्षणी “धन्याष्टकाची” रचना केली. शंकराचार्यांनी लिहिलेले ब्रह्मसूत्रावरील भाष्य, तत्त्वज्ञान विषयक अध्ययन अद्वितीय आणि अप्रतिम असल्याचे शुकमणी आणि महर्षी व्यास म्हणाले. व ते अजरामर होईल असा आशीर्वाद दिला.
तिथून परतल्यावर गौडापादाचार्य म्हणाले,
” शंकर, या ज्ञानाचा उपयोग तू लोकहितार्थ कर! आज भारतात धुमाकूळ घालत असलेले अन्य धर्म- बौद्ध, जैन , चार्वाक याच्यातील फोलपणा दाखवून तू आर्य सनातन अशा आपल्या वैदिक धर्माची प्रतिष्ठापना कर. त्यासाठी हाती दंड, कमंडलू , आणि आपल्या सत्य सनातन वैदिक धर्माची भगवी पताका घेऊन धर्म यात्रेला आरंभ कर.
तारुण्यात पदार्पण करणारा हा तेजस्वी संन्यासी देशभ्रमणास निघाला. वास्तविक कालटी सोडल्यापासूनच भ्रमंतीस सुरुवात झालीच होती. दक्षिण टोकापासून उत्तरेपर्यंतचा सारा प्रदेश भ्रमंती करून झालाच होता. परंतु त्या भ्रमंतीत आणि या भ्रमंतीत जमीन अस्मानाचा फरक होता. कारण आता त्यांना ज्ञानगर्भता लाभली होती. लोकोद्धाराचे विशाल ध्येय त्यांचे समोर होते. त्यांनी विचार केला — “आपण हिमालय पर्वताचा आदर्श समोर ठेवायला हवा. कितीही प्रतिकूल परिस्थितीत हा उतुंग हिमालय ताठ मानेने उभा आहे. भारताचा हा मानदंड कुठेही वाकत नाही. मोडत नाही.उलट प्रखर उन्हात बर्फ वितळवून भागीरथीला जीवनदान करतो, त्यामुळे भारतातील असंख्य जीवांना जीवनदान मिळते. लोकहितांसाठी तो कोणताही गाजावाजा न करता झिजत असतो. हे व्रत साधे सोपे नाही. मी सुद्धा लोक गंगेच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिले पाहिजे. जनतेच्या मनातील दाटलेला वैदिक धर्माबद्दलचे अज्ञान आणि अंध:कार दूर केला पाहिजे. वैदिक धर्माची महती पटवून दिली पाहिजे. त्यासाठी लेखन कार्य, प्रवचन या गोष्टींची कांस धरायला पाहिजे. त्यावेळी आलेल्या संकटांना तोंड देत, परधर्मियांना धीटपणे सामोरे जाऊन, धैर्याने कणखरपणे तत्त्वबद्ध राहायला हवे…”
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-९-२०२३.


