आद्य शंकराचार्य भाग ४, (१६ ते २०)

केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य  अप्रतिम ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य  अप्रतिम …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  आद्य शंकराचार्य !!! 

    भाग – १६.

     शंकराचार्यांचा  हिमालय उतरणीचा म्हणजे परतीचा प्रवास सुरू झाला. शंकराचार्यांनी मोठ्या भक्तीभावाने, श्रद्धेने हिमाद्री पर्वताला वंदन केले. आणि काय आश्चर्य! विशाल वृक्षाखाली बसलेल्या आदिनाथ शिवाचे — प्रत्यक्ष भगवान शंकरांचे दर्शन घडले. भगवान शुभ्र धवल त्रिनेत्र होते. मस्तकावर अर्धचंद्र विलसत होता. हातात जपमाळ, शेजारी अमृतकुंभ, सर्पाचा कमरपट्टा, गळ्यात तेजस्वी मोत्यांची माळ अशा या शिवाभोवती वशिष्ठ, वामदेव, बादरायण ; व्यास, शुकमुनी, गौडपादाचार्य असे कितीतरी महर्षी बसले होते. त्या सर्वांचे एकत्रित दर्शन झाल्याने शंकराचार्यांना अतिशय आनंद झाला. आणि त्यांना दक्षिणामूर्ती स्तोत्र स्फुरले….

“विश्व दर्पण दृश्यमाननगरीतुल्यं निजान्तर्गतम्।

पश्यन्नात्मनि मायया  बहिरीवोद् भूतं यथा निद्रया।

य साक्षात् कुरुते प्रबोधसमये स्वात्मानमेवाद्वयम् ।

  तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्री दक्षिणामूर्तये ।।”

            ” ज्याला श्रीशंकररूप जे श्री गुरु, त्यांच्या कृपाप्रसादाने अद्वैत ब्रह्मसाक्षात्कार झाला असा अद्भुत साक्षात्कार ज्या शंकर गुरूंच्या अनुग्रहाने होतो, असे  श्रीगुरुमूर्ती जे श्री दक्षिणामूर्ती भगवान महादेव, त्यांना मी श्रद्धाभक्तीपूर्वक  वंदन करतो.”

      दक्षिणमुख असलेल्या सद्गुरु भगवान शंकरासमोर नतमस्तक होऊन शंकराचार्यांनी तेरा लोकांचे स्तोत्र आपल्या मधुर वाणीने म्हणून, जणू स्तोत्र पुष्पमाला भगवान शंकराला भक्तीभावाने अर्पण केली. आणि त्यांची भाव समाधी लागली.

              या दक्षिणमूर्ती स्तोत्राने भगवान शंकरांची सद्गुरु म्हणून स्तुती केल्यावर भगवान प्रसन्न झाले. त्यांनी शंकराचार्यांना अध्यात्म संन्यासाची दीक्षा, भगवी वस्त्रे व दंड, कमंडलू दिला. या सद्गुरु ने सर्व एषणांचा- लोकेषणा, वित्तेषणा पुत्रेषणात्याग करण्याचा उपदेश दिला.

           शंकराचार्यांनी भगवत्पाद श्रीगोविंदयती यांच्याकडून सन्यास दीक्षा घेताना या सर्वांचा आधीच त्याग केला होता. आता या आदिनाथ  गुरूंच्या साक्षात दर्शनाने त्यांची ऐहिक सुखापासून पूर्ण निवृत्ती झाली. आता ही परमेश्वरी इच्छा पूर्ण करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी लगेच परापूजा स्तोत्र रचून भगवंतांची जणू षोडपोचारे पूजा केली…..

” अखंडे सच्चिदानंदे निर्वीकल्पैक रुपिणि।

  स्थितेऽ द्वितियभावेऽ स्मिन्कथं  पूजा विधीयते।”

        अर्थात ” जो आत्मा अखंड, सच्चिदानंद, एकमात्र निर्विकल्प स्वरूप आहे नित्य अद्वितीय भावाने वर्तमान असल्यामुळे त्याच्या ठिकाणी द्वैतभावाचा गंधही नाही अशा आत्मतत्त्वाची पूजा कशी केली जाणार?”

     ही आठ श्लोकांची परापूजा भगवंतांनी स्वीकारली. ते संतुष्ट झाले. त्यांनी त्यांना महाकाव्यांचा बोध केला. त्यामुळे शंकराचार्यांची अध्यात्म दीक्षा पूर्ण झाली.

      शंकराचार्यांनी केलेल्या ब्रह्मसूत्र भाष्याचे निरीक्षण केल्यावर अद्वैत सिद्धांत भूतलावर प्रस्थापित करण्यास हे भाष्य समर्थ आहे असे त्या देवाधिदेवाला वाटले. म्हणून तेच भाष्य आपली भेट म्हणून त्यांना दिली.

           प्रत्यक्ष भगवंत शंकराने शंकराचार्यांना महाकैलासावर नेले. भगवंताच्या कृपेने तिथे त्यांना अविचल अशी अद्वैतानुभूती लाभली. त्यांना जीवनामुक्तावस्था प्राप्त झाली. तेथे शंकराचार्यांनी भगवंताचे शिवपाददिकेशान्त वर्णन आणि शिवकेशादिपादान्त वर्णन स्तोत्र रचले. त्यानंतर त्यांना घेऊन भगवान शंकर पुन्हा महाकैलासाच्या पायथ्याशी असलेल्या बद्रिकाश्रमा जवळ पोहोचले. आणि काय आश्चर्य?  सर्व ऋषींसह भगवान अदृश्य झाले.

   वाचकवृंद हो ; आत्तापर्यंत आपण बघितले की ; आचार्य शंकर हे भावावस्थेमध्ये या सर्व रचना करीत होते. जेव्हां साधकाची  अंतरंग प्रेरणा प्रबळ होते ; तेव्हांच अशा रचना आपोआप स्फुरत असतात. आणि मुखावाटे बाहेर पडत असतात. ही परावाणी वैखरीत उतरते — ती जनकल्याणसाठीच !! आणि आचार्यांचे ध्येय पण तेच तर होते. जाता जाता एक उल्लेख आवर्जून बघावा की — आजच्या काळात अशी दिव्य प्रतिभा अगदीच अपवादाने दिसते. कारण अंतरंग विकसित झालेले नसते. म्हणून जे काही प्रस्तुत होत राहत ते म्हणजे ; इकडून तिकडून गोळा करून प्रस्तुत केलेलं असत. अशी ही ” निर्मितीतून निर्मिती ” तकलादू ठरते ; आणि जेव्हां ” आंतून ” स्फुरण होऊन काही निर्मिले जाते तेव्हां त्यास त्या व्यक्तीचे व्यक्तित्व येत असते. अशा प्रस्तुती अजरामर ठरतात. हे लक्षांत घेतल की ; आजही हे आपले भारतीय महात्मे आपल्यावर का गारूड करून आहेत ? हे लक्षांत यायला हरकत नसावी. स्वतः चिंतन केल्यावरच अशी परा प्रसवत असते ; आणि वैखरीमधून स्रवू लागते ; आणि महान कार्ये ; संशोधने वगैरे होत राहतात. या दृष्टीने आजच्या शिक्षणपद्धतीवर नजर टाकून बघावी. कित्येक बदल मुळापासून अत्यावश्यक आहेत ते समजेल. असो….

        नंतर शंकराचार्य व विष्णू शर्मा बद्रिकाश्रमातून पुढील प्रवासास निघाले. काही अंतर गेल्यावर त्यांना कालटीतला अग्नि शर्मा नबुंद्री येताना दिसला. तो जवळ येईपर्यंत शंकराचार्यांच्या मनात आईच्या प्रकृती संबंधीचे अनेक आशंका निर्माण झाल्या. जवळ आल्यावर त्यांनी शर्माचा हात हातात घेऊन सर्वांचे क्षेमकुशल विचारले. पण अग्निशर्मा नीट बोलेना.

       शंकराचार्यांनी विचारले तू एकटाच इतक्या दूरवर कसा आलास? अग्नि शर्मा म्हणाला, 

“आर्याबाने, तुझ्या मातेने सगळीच निरवानिरव केली आहे. आणि एक पोटली त्यांच्यासमोर ठेवत म्हणाला,  

   ” हा तुझ्या घरातला सारा धनसंचय तुझ्या सुपूर्द करण्यासाठी तिने माझ्याकडे सोपवला. ज्याची संपती त्याच्याकडे सोपवण्यासाठीच मी  येथवर येण्याचा खटाटोप केला.”

       आचार्यांच्या डोक्यावर जणू वज्रप्रहार झाला. अम्बने निरवानिरव केली ? का? काही अशुभ? अग्निशर्मा  म्हणाला, 

   “आचार्य, आर्याबा फार थकली. कडक व्रतवैकल्ये, व्रतस्थ राहणी, त्यामुळे ती अतिशय क्षीण झाली. हे गाठोडे देऊन मला म्हणाली, जिथे शंकर असेल तिथे ही श्री त्याच्या स्वाधीन करून, त्याला माझ्या मरणा समयी येथे येण्याची आठवण करून दे.”

    एवढे जीवन मुक्त आत्मज्ञानी आचार्य, पण मातेच्या आठवणीने गहिवरले. अग्नि शर्मा म्हणाला,  

  “आचार्य, आर्याबाच्या प्रकृतीचे काही खरं नाही. ती डोळ्यात प्राण आणून तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. तुम्ही लगेच कालटीकडे प्रयाण करायला हवे.”

               शंकराचार्यांनी बदरीवनाच्या राजाची भेट घेऊन ती संपत्ती त्याच्या स्वाधीन करून म्हणाले,  

   ” राजन्  या अलकनंदेच्या तीरी नारायणाचे मंदिर बांध. या मंदिराचा पुजारी मात्र हा अग्नि शर्मा नंबुद्री राहील. तसेच वंशपरंपरेने पण असे  पुजारीपण त्याच्याकडे राहील अशी व्यवस्था करावी. “

गाठोड्यातील सुवर्णपात्र हाती घेऊन आचार्य म्हणाले,  

   ” हे पात्र आमच्या देवघरातील आहे. यातच बद्रीनारायणाला नैवेद्य प्रदान करावा.”  

    या ठिकाणी नारायणाचे मंदिर होणार म्हणून सर्वांना आनंद झाला एक वयोवृद्ध सज्जन तपासणी म्हणाले…

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. ९-९-२८२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                     भाग – १७.

                   अलकनंदातीरी नारायणाचे मंदिर बांधले  जात असल्याची वार्ता ऐकून एक वृद्ध तपस्वी येऊन आचार्यांना म्हणाला,  

   ” आचार्य, एक विनंती आहे. या अलकनंदेच्या पात्रात नारद कुंड आहे. त्यात भगवान विष्णूची मूर्ती आहे. एका चिनी राजाने या कुंडात फेकून दिली होती. ती काढता आली तर त्याच मूर्तीची या मंदिरात स्थापना करता येईल.”

         अलकनंदेच्या प्रवाहाला विलक्षण ओढ, पाणी बर्फतुल्य,  त्यातच नारदकुंडाची खोली, त्यामुळे तिथून मूर्ती काढून आणणे केवळ अशक्य होते. पण शंकराचार्यांना अशक्य शब्दच माहीत नव्हता. सारा भार परमेश्वरावर टाकून त्यांनी त्या नारदकुंडात उडी मारली आणि मूर्ती घेऊनच बाहेर आले. ती मूर्ती भंगलेली होती म्हणून आचार्यांनी ती मूर्ती विसर्जित करण्याचे ठरविले, तोच आकाशवाणी झाली,   

  ” कलियुगात या खंडित मूर्तीचीच पूजा होईल.”

त्यांनी मूर्ती अग्नि शर्माच्या स्वाधीन केली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. लोकांनी जय जयकार केला.

        आचार्य आता वेगाने मातेच्या भेटीसाठी निघाले. मनात अनेक शंकांनी घर केले होते. मातेची अनेक रूपे  त्यांच्या नजरेसमोर साकार होत होती. प्रवासात मावळत्या सूर्याला नमस्कार करताना आचार्यांना आईचा भास झाला. माझी माता ह्या तेजोनिधीसारखी निःसपृहपणे मला प्रकाश दाखवत राहिली. सदा समाधान, शांतभाव हा तिचा स्वभाव .तरी माझ्या भेटीसाठी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असेल.”

          आचार्यांची मौनावस्था चित्सुखाचार्यांना जाणवत असल्यामुळे विविध विषय काढून ते  त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करीत होते. तरी त्यांची उदासीनता कमी होत नसलेली पाहून, चित्सुखाचार्य म्हणाले,  

” आचार्य, आपण आत्मज्ञानी असून असे उद्वीग्न का?”

आचार्य म्हणाले,

   ” अरेऽ, प्रेमरज्जू चे धागे इतके नाजूक, चिवट असतात की, त्याचा गुंता सुटता सुटत नाही. माझ्या मातेची ओढ या रजतंतुंनीच गुंफली आहे. त्यामुळे काही क्षण तिच्या आठवणीने व्यथित होतो. पण दुसऱ्याच क्षणी माझा विवेक जागृत होतो. भावभावनांचा उद्रेक होणे माणसांचा नैसर्गिक गुणधर्म आहे. पण त्यावर विवेकाचा अंकुश ठेवणे हा अभ्यासाचा विषय आहे… “

              शेवटी प्रवास संपला. जन्मभूमीच्या स्पर्शाने हा विरागी आत्मज्ञानी पुरुष मोहरून निघाला. घराजवळून वाहणार्‍या पूर्णेला वंदन करून म्हणाले, 

  ” मी इथे नसताना माझ्या मातेला अखंड सोबत केलीस. तुला कोटी कोटी नमस्कार !! तुझ्या चरणी मी कृतज्ञ आहे. “

      क्षीण झालेल्या, अंथरुणाला खिळलेल्या आर्यबाची सुश्रुषा गौरवम्मा करत होती. गौरम्माला ती म्हणाली, 

  ” जरा दारात जा बरे! एक प्रकाश शलाका आपल्या घराकडे झेपावत आहे. जा.. लवकर जा. “.

  गौरम्माला वाटले, यांना  पुत्र विरहाचा भ्रम झाला असावा. कसली आली प्रकाश शलाका?

             तेवढ्यात पाण्याचा घडा डोक्यावर सावरीत कमला घरात प्रवेश करत म्हणाली,

   ” आर्याबे, अगं दोन यती वेषातील तरुण आपल्या घराकडेच येत आहेत. त्यातला एक आपला शंकर असल्यासारखा वाटतो.”    हे ऐकताच आर्यांबा बाजेवरून उठून खाली उतरणार तोच, शंकर वेगाने आत आले आणि  तिला पुन्हा बाजेवर बसवल्यावर म्हणाले,    “अम्ब, हा बघ तुझा शंकर आलाय.”

         शंकराचार्यांनी आईचे दोन्ही हात हातात घेतले. मातेच्या अश्रूने चिंब झाले. माय – लेकराची भेट होत असतानाच, गौरम्मा आतल्या दालनात जायला निघाली तोच, आर्यांबा म्हणाली, 

   ” अगं! गौरम्मा तिकडे कुठे चाललीस? हा कोणी परका आहे का? ये इकडे. “

   वैधव्य दर्शक धवल वस्त्रातील गौरमा खाल मानेने तिथे आली.

        आर्याबा म्हणाली,  

   ” अरे शंकर, ही आपली गौरंम्मा बरं का!  लग्नानंतर लगेच माहेरी आली. तू गेल्यावर माझे सांत्वन करत म्हणाली होती,  आचार्य गेले तरी, मी तुझी सेवा करेन. आणि नियतीने तिचे शब्द खरे केले. तिच्यावर वैधव्याची कुर्‍हाड पडली. आता ती माझी सेवा करण्यास इथेच असते.”

          एवढ्या बोलण्यानेही आर्याबाला थकवा आला. त्या बाजेवर ती आडवी झाली. क्षीण स्वरात म्हणाली,  

   ” शंकरा, तू एवढ्या लहान वयात परमार्थाचा फार मोठा टप्पा गाठलास. माझा परलोक प्रवास सुखकर होईल अशी काहीतरी अमृतवाणी ऐकव….”

               आचार्य म्हणाले, 

   ” अम्ब! तू सुज्ञ आहेस. तुझ्या ठिकाणी उच्च धारणाशक्ती आहे. “

        मग त्यांनी अगदी सोप्या भाषेत अद्वैत तत्वज्ञान सांगितले. आपल्या साधुपुत्राच्या तोंडून अवघड विवरण ऐकून ती धन्य झाली. तत्वबोध ऐकून तिला परमानंद सुखाचा आनंद मिळाला. ती म्हणाली,

   ” बेटा, मला भगवान श्रीकृष्णाच्याबद्दल माहिती सांग.” 

आईच्या इच्छेसाठी त्यांनी तात्काळ कृष्णाष्टक रचले. कृष्णाश्टक ऐकता ऐकता आर्याबाला साक्षात कृष्ण दर्शन झालं. आणि सहजपणे ध्यानमग्न समाधी अवस्थेत अनंतात विलीन झाली.

आचार्य स्थिरचित्ताने मातेच्या कलेवराकडे पाहत होते. त्यांना वाटले, जाताना मातेने मार्गदर्शन केले. जणू ती म्हणत होती ;

” बेटा, तू धर्म यात्रेला निघणार. लोकांना प्रबोधन करणार. पण बाळा, सर्वसामान्यांना कसे कळणार?  नुसते वेदांत तत्वज्ञान रुक्ष असते. पण त्याला भक्तीचे आवरण घातले की, जनसामान्यांना गोडी निर्माण होईल, समजण्यास सोपे जाईल. अद्वैत सिद्धांत लोकांना पटवून देणे सोपे जाईल.”

            शेवटचे काहीच तास मातेची भेट झाली. पण  केवढा मोठा बोध मार्गदर्शन करून गेली. माझ्या सानिध्यामुळे तिला समाधान मिळाले व मलाही  वचनपूर्तीचा लाभ मिळाला.

           आईचा दाहसंस्कार स्वतः आचार्य करणार हे ऐकताच, पुट्टु स्वामी म्हणाले,

   ” हे अवैदिक आहे. संन्याशाने अग्नीला स्पर्श करायचा नसतो. संन्यास ग्रहण करतेवेळी ती व्यक्ती स्वतःचे श्राद्ध विधी करूनच चतुर्थाश्रमात प्रवेश करते . म्हणून त्याला दहन विधी निषेध आहे. कर्मशास्त्राला हे  मान्य नाही..

          क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. ९-९-२०२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                 भाग – १८.

                सर्वांची  मतमतांतरे ऐकल्यावर शांतपणे आचार्य म्हणाले,

   ” तुम्हा लोकांच्या म्हणण्यानुसार सर्व शास्त्र विधीनिषेध मला मान्य आहे. तरीही मी मातेचा दहन विधी करणार आहे. कारण सन्यास ग्रहणाच्या वेळी मी तिला तसे वचन दिलेले होते.”

           जेष्ठ पंडित म्हणाले,  

   ” आचार्य, हे आम्हाला मान्य नाही. आम्ही कालटीवासी यामध्ये सहभागी होणार नाही. तुम्हाला दहनविधीसाठी स्मशानभूमीही उपलब्ध होणार नाही.”

          सर्वजण निघून गेले. या साऱ्या वादात कलेवर काष्ठवत कडक झाले होते. घरात फक्त गौरम्मा व चित्सुखाचार्य होते. कलेवर कुठे दहन करायचे? दाराबाहेर कसे काढायचे? थोडा मोठा यक्षप्रश्न होता.

         आचार्यांनी शांतपणे विचार केला. या मृतदेहाची योग्य व्यवस्था करण्यासाठी त्यांनी तो देह बाहेर आणला. आचार्यांनी परसदारी वाळलेल्या केळीच्या पानांच्या राशीवर मातेचां  देह ठेवला. मग  त्यांनी योगसामर्थ्याने अग्नी निर्माण केला व वेदमंत्रांच्या जयघोषणात मातेस  मंत्राग्नी दिला. त्याचवेळी त्यांना मातृस्तुती काव्य सुचले….

” आस्ता तवादियं प्रसूति समये दूर्वार शूलवस्था।

  नैरुच्चे तनुशोषण मलमयी शय्याच सावंस्तरी।

  एकस्यापि न गर्भभारभारण क्लेशस्य यस्याःक्षमो।

दातुं निष्कृति मुन्न तोऽपी तनय स्तयै जनयैः नमः।।”

             आचार्यांनी मातेबद्दलची श्रद्धा उत्कट होती. तिला दिलेले वचन त्यांनी पूर्ण केले व स्वतः कृतर्थ झाले.

      आईच्या आठवणीने डबडबलेले डोळे आचार्यांनी निग्रहाने पुसले ; आणि कालटी सोडून निघाले. गौरम्मा सकाळपासूनच व्यथित होती. तिच्या स्वप्नात मधून मधून एक संन्यासी येऊन आशीर्वादात्मक हात उंचावून लगेच नाहीसा होत होता. तिने आर्याबाला या स्वप्नाबद्दल सांगितल्यावर, ती म्हणाली होती,

   ” मी सतत शंकराबद्दल तुला सांगते, म्हणून  “मनी वसे ते स्वप्न दिसे” असे होत असेल.”

             पण आचार्य आल्यावर त्यांना पाहता क्षणीच तिला जाणवले, स्वप्नात येणारा हाच संन्यासी आहे. वास्तविक शंकराची मूर्ती लक्षात नव्हती, की त्यांची ओढ लागण्यासारखी घटनाही कधी घडली नव्हती. तरी हीच मूर्ती स्वप्नात कशी येते? याला प्रेम म्हणावे का? पण या प्रेमात वासना नाही. अगदी स्वच्छ, शुद्ध भावना आहे. हीच मधुराभक्ती असेल का? तिला प्रेम प्रकारच माहीत नव्हता. समज येण्यापूर्वीच लग्न झाले. पतीची ओळख होण्यापूर्वीच विधवा झाली. त्यामुळे दुःख, आनंद ह्या भावना कधी कळल्याच नव्हत्या.

        ” आचार्य पुन्हा कालटीला येतील का? दर्शन होईल का? हा सच्छिल त्यागी तरुण लोककल्याणासाठी नि:स्वार्थपणे जगतो आहे. धर्माच्या प्रतिष्ठेसाठी लोकोध्दारासाठी कणाकणांनी झिजून आपले जीवन सार्थकी लावणार. म्हणून मलाही  देवाने अशी सर्वसंगपरित्याग करून जगण्याची संधी दिली तर, या तरुण संन्याशाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही लोककार्यात वाहून घ्यायला हवे. मला माझ्या कार्यात त्यांच्या आशीर्वादात्मक हात असाच उंचावलेला राहो हीच देवाजवळ प्रार्थना! जनसेवेसाठी पुरेसे बळ, श्रद्धा आणि फुरसत मिळावी हीच ईश्वरचरणी विनम्र मागणी आहे.”

           ती परत मनात म्हणाली,

  “आचार्य तुमच्याशी बोलण्याचे धाडस झाले नाही.  नाहीतर अनुग्रह घेतला असता. निदान मार्गदर्शन करण्यापुरते तरी स्वप्नात येऊन मी स्वीकारणार असलेल्या जनसेवेच्या व्रताला आपले  प्रोत्साहन मिळावे.”

   आचार्यांची मूर्ती दूर दूर क्षितिजरेषेच्या  पलीकडे गेली….

             इकडे नर्मदातीरावरील आश्रमात गोविंदयती आपल्या प्रिय शिष्याची वाट पाहत आसन्नमरणावस्थेत पडले होते. या सन्यासाच्या  कर्तृत्वाचे एक एक दालन त्यांच्या मनःचक्षुपुढे साकार होत होते…. हिमालयात असताना गौडपादाचार्याच्या  आज्ञेनुसार हा बालशिष्य शंकर बदरीवनातल्या एका गुहेत ब्रह्मसूत्र भाष्य लिहून त्यावर विवरणही करीत असे. ऐकण्यासाठी बराच शिष्यवर्ग जमत असे. त्यात एक जड बुद्धीचा शिष्य होता. तो शंकराचार्यांची सेवा मोठ्या निष्ठेने श्रद्धेने करीत असे. एकदा आचार्य अलकनंदेवर स्नान करून काही शिष्यांसह बोलत बोलत स्वस्थानी परतले. गिरी मात्र आचार्यांची छाटी, लंगोटी धुण्यात गर्क होता. त्यामुळे परतायला त्याला वेळ लागला.

          शंकराचार्य भाष्य विवरणास बसले पण गिरी आला नाही म्हणून ते थांबलेले पाहून, इतर शिष्य कुचेष्टाने म्हणाले,

” आचार्य, तो मूढबद्धी, त्याच्यासाठी कशाला थांबायला हवे?”

   आचार्यांनी मनी विचार केला,” या सर्वांना स्वतःच्या बुद्धी, ज्ञानाबद्दल गर्व झालाय. त्याचे निरसन व्हायलाच हवे. ” मग  त्यांनी मन:सामर्थ्याने नदीवर असलेल्या गिरीला उपदेश केला. आणि आश्चर्य म्हणजे त्याला त्या सर्व सिद्ध्या अवगत झाल्या.

गिरी परत आल्यावर त्याला पद्मासनात बसायला सांगितले. आणि उपनिषदाचे स्पष्टीकरण विचारल्यावर गिरीने आचार्यांना वंदन करून, “तोटकवृत्तांत” उपनिषदसार सांगितले. सारा शिष्यवृंद आश्चर्यचकित झाला. त्यांचा गर्व नाहीसा झाला. ही सर्वच  कृपा शंकराचार्यांचीच आहे हे त्यांच्या लक्षात आले. . त्यांच्या सामर्थ्याबद्दल सर्वांची खात्री पटली. जितके सामर्थ्य शंकराचे आहे ; तितकीच श्रद्धा, निष्ठा गिरीच्या ठाई असल्याने त्यालाही सामर्थ्य प्राप्त झाले आहे ; म्हणूनच त्याला विद्या अवगत झाली.” हे सगळ्यांचाच लक्षात आले.  असे असे अनेक प्रसंग अर्धवट ग्लानीत असलेल्या गोविंदयतींना  दिसत होते….

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि. ९-९-२०२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                 भाग – १९.

                गोविंदयतीना गिरी प्रसंगाने त्यांच्या शिष्योत्तमाचे  सामर्थ्य कळले. ते मनात म्हणू लागले — ” माझे गुरुपद धन्य केले. श्रीनारायणापासून चालत आलेल्या परंपरेची धारा हा शंकराचार्य नक्कीच पेलू शकेल. आता मात्र निर्याण समयी तो माझ्या जवळ असायला हवा.”

            गोविंदयती अर्धवट ग्लानीत असल्यामुळे आपला प्रिय सद्शिष्य जवळ येऊन कधी बसला हे त्यांना समजले सुद्धा नाही. आपल्या गुरुदेवांची आसन्नमरणावस्था व भोवती संचित होऊन बसलेला शिष्यगण पाहून आचार्य शंकराचार्यांना तीव्र वेदना झाल्या. ते पूज्यपदांच्या अंगावरून मृदूपणे हात फिरवू लागले. डोळ्यात अश्रू तरळले. आपल्या मधुर, रसाळ वाणीने धनाष्टक म्हणायला सुरुवात केली….

” विषमिव विषयान् यो मन्यमानो दुरन्तान्।

  जयति परमहंतो मुक्तीभावं समेति।”

          हे मधुर अष्टक कानी पडताच  भगवान पूज्यपाद एकदम उठून बसले. शंकराचार्यांना पाहिल्यानंतर त्यांना अवर्णनिय आनंद झाला. त्यांनी कडकडून मिठी मारली. ते सर्व शिष्यांना म्हणाले, 

   ” आमची अंतिम इच्छा पूर्ण झाली. आम्ही ही कुडी सोडणार. आता इथून पुढे माझ्या जागी हा आचार्य राहील. या महापुरुषावर सर्वांनी विश्वास ठेवून माझ्या जागी त्यांना समजून त्यांच्या आज्ञेत राहावे.”

       नंतर त्यांनी सर्व शिष्यांना तुरियाश्रम संन्यासधर्म, यतिधर्म व ते आचारण्याचे नियम सांगून शेवटचा श्लोक सांगितला…….

” भिक्षाटणं जपः नित्यं शौचं ध्यानं सुरार्चनम्।

  कर्तव्यानि षडेतानि सर्वदा नृपदण्डवत्।।”

            गोविंद यती म्हणाले,

   ” शंकर, तू अद्वैत सिद्धांत प्रस्थापित कर.”

           नंतर त्यांनी आपले लक्ष ॐकारावर केंद्रित केले. व अत्यंत समाधानाने आपला आत्मा अनंतात विलीन केला. तो दिवस होता, कार्तिक पौर्णिमेचा. गुरुदेवांनी मोठ्या विश्वासाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन असे त्यांनी  गुरुदेवांना मनोमन वचन दिले.

          गोविंदयतींच्या निर्वाणाची  बातमी उज्जयिनीमध्ये मिळताच ; सम्राट हर्ष विक्रमादित्य या माधांत बेटावर आले. पित्याच्या समाधीचे दर्शन घेतले. पितृस्मृतीप्रीत्यर्थ ओंकारेश्वर मंदिर बांधले. भर्तृहरीच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला यात्रा उत्सव सुरू केला.

             शंकराचार्याचे निकटचे दोन पाश… मातृदैवत आणि गुरुदैवत दृष्टीआड झाले होते. आता गुरुआज्ञेनुसार धर्मयात्रेस प्रारंभ करायला हवा  होता.

                 तत्पूर्वी सर्व आश्रमवासीयांना शंकराचार्य म्हणाले, 

   ” मी आपणा सर्वांपेक्षा अनुभवाने लहानच !!  आपल्याला उपदेश करण्याचा मला अधिकार कसा असेल ? तरीपण गुरुदेव श्रीगोविंदयतीच्या इच्छेनुसार दोन शब्द सांगणार व मग धर्मयात्रेचे प्रस्थान ठेवणार. असे म्हणून,त्यांनी  “उपदेश पंचकम स्तोत्र” रचले….

” वेदो नित्यमधीयंता तदुदितं कर्म स्वनुण्ठीयताम्।

  तेनेशस्य विधीयतामचितिः काम्ये मतिस्त्यज्यताम्।

पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसंधीयताम्।

आत्मेच्छा व्यवसीयतां निगृहात्तूर्णं विनिर्गम्यताम्।।”

            नेहमी वेदांचे पवित्र सदग्रंथाचे वाचन करा. सज्जनांची संगती करा. ‘तत्तवमसि’  चा विचार करा. एकांतात बसून परब्रम्हस्वरूपावर चित्त स्थिर करा. इत्यादी उपदेश  त्यांनी या पाच लोकात केला. उपासना प्रार्थना वगैरे उपदेश करून शंकराचार्य म्हणाले, 

   ” ज्यांना सद्गुरूंच्या पश्चात परमार्थ करायचा असेल, सदगती प्राप्त करायची असेल, त्यांनी उपासना प्रार्थनांची कास बळकट हाती धरली तर, अध्ययन तपश्चर्याला वेगळे तेज चढेल. मी, चित्सुखाचार्य आणि पद्माचार्य काशीक्षेत्राकडे निघत आहोत ;  ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचे असेल त्यांनी अवश्य यावे.ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवायः !! •••••

             त्यांनी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे नामस्मरण करून हाती दंडकमंडलू  घेतला ; आणि त्यांची धर्मयात्रा पुढे निघाली. या त्रयींचा विश्राम  सहसा धर्मवाटिकेत, धर्मशाळेत, मंदिरात होत असे. तिथे शंकराचार्य वैदिक धर्मप्रचार जनप्रबोधनासाठी प्रवचन करीत. आचार्य-वाणीच्या सुगंध सर्वत्र  दरवाळू लागला. या तेजस्वी संन्याशाच्या व्यक्तिमत्वाने, विद्वत्तापूर्वक मधुर संभाषणाने सुलभ रसाळ प्रवचनाने लोक मोहित होऊन त्यांची  अमृतवाणी ग्रहण करण्यास गर्दी करू लागले. आचार्यांनी आवाहन  केले की, काही जिज्ञासू त्यांना प्रश्न विचारत व उत्तरातील मार्मिकता, अर्थगर्भता पाहून, लोक आचार्यांच्या चौफेरबुद्धीचे कौतुक करत म्हणत,

  ” वय लहान पण अभ्यास गाढा !! “

           भारतीय तत्त्वज्ञान कर्मविपाक, आत्मज्ञान, ज्ञानयुक्त भक्ती, कडकडीत वैराग्य या सर्व विषयांना आपल्या सनातन धर्मात किती महत्त्व आहे? हे सारे शंकराचार्य विशद करून सांगत. जिज्ञासू प्रश्न विचारत आणि आचार्य त्यांचे पूर्ण समाधान करत. आचार्यांचे अफाट वाचन, धारणा शक्ती, प्रश्नांची थेट उकल करून सांगण्याची हातोटी सारेच स्पृहणीय होते.

चर्मण्वती ( चंबळ ) नदी ओलांडून ही पदयात्रा पुढे जात राहिली. एका गावात आल्यावर भिक्षेसाठी एका वाड्यासमोर उभे राहिल्याबरोबर, एखादी चवताळलेली वाघीण अंगावर यावी तशी एक वृद्ध स्त्री डोळे गरागरा फिरवत बाहेर येऊन हातवारे करत म्हणाली,

   “अरे, गोसावड्या, तुम्ही समाजाचा सत्यानाश केला आहे. चांगले तरणेबांड धट्टेकट्टे असून दारोदार भीक मागायला शरम नाही वाटत तुम्हाला? चला… चालते व्हा….”

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. ९-९-२०२३.

!!!  आद्य शंकराचार्य  !!!

                  भाग – २०.

                 शांतपणे शंकराचार्य म्हणाले, “आजीबाई, तुम्हाला भिक्षा वाढायची नसेल तर नका वाढू. पण आपल्या इतकं संतप्त होण्याचे कारण कळेल का?”

आचार्यांच्या बोलण्याचा परिणाम झाला की काय? ती एकदम शांत होत म्हणाली,

  ” अरे, भिक्षा न देण्याइतकी कृपण नाही मी. पण मुंडन केलेले तरुण बघितले की, माझा संताप होतो. तोल जातो.”

  ” का? तुमचा संन्यास आश्रमावर विश्वास नाही का?”

  ” विश्वास नसयला काय झालं? खुद्द आमच्याच घरात माझ्या आजे – सासर्‍यांनी समाधी घेतली होती. लोक त्यांना देवतुल्य मानत. त्यांची समाधी आहे इथे.”

” तरीही तुमचा संन्यासावर राग आहे?”

         ” नाही… माझा राग वैदिक धर्मातील संन्याश्रमावर नाही. तो तर पवित्र आश्रम आहे. स्वार्थाचा लवलेशही न ठेवता सर्व संगपरित्याग करून  ते सन्यासी लोकहितासाठी कार्य करतात. त्यांचेवर कोण राग धरेल? पण हल्ली फुकट्या संन्याशांचाच  समाजात सुकाळ झाला आहे. आळशी, कर्तृत्वशून्य तरुण खुशाल मुंडन करून घेतात आणि भिक्षा मागत दारोदार हिंडत राहतात. अरे, या बौद्ध धर्मात लहान मुलांना सुद्धा संन्यास ग्रहण करता येतो. शिवाय भटक भवान्या मुरळ्या टाळकी भादरुन संन्यास घेतात. इथपर्यंत तरी ठीक होते. पण या भिख्खु भिक्खिणीचा अनाचार फार बोकाळला आहे. त्यामुळे संताप संताप होतो.”

      आचार्य म्हणाले, 

   ” आजीबाई, तुम्हाला त्याची नक्कीच झळ पोचली असेल. म्हणूनच एवढ्या संतापल्या असाल.”

आचार्यांनी जणू तिच्या मर्मावरच बोट ठेवले होते.  अश्रूपूर्ण नेत्रांनी म्हातारी म्हणाली,

  ” तू अगदी मनकवडा दिसतोस.”

          ती पुढे सांगू लागली…

” एवढा मोठा हा वाडा, शेतीवाडी पण वारस नाही. एकुलता एक नातू तो ऐतखऊ निघाला. हा सर्व व्याप नको म्हणून त्याने बौद्ध भिक्षु धर्म स्वीकारला. आता एक वतनदार दारोदार भीक मागत फिरत आहे. या म्हातारीची पर्वा नाही.”

म्हातारीची कर्म कहाणी ऐकून तिघेही मर्मांहत झाले. दुःखी मनाने तिथून  काशीकडे  निघाले.

           शंकराचार्यांनी काशीच्या प्रवासात गंगास्तोत्राचे तेरा श्लोक रचले.ते म्हणतच काशी नगरात प्रवेश केला

” देवी सुरेश्वरी भगवति गंगे त्रिभुवनतारिणी तरल तरंगे

  शंड्ःकर मौलि विरही विहारीणि विमले मम मतिरास्तां तव पदकमले।।”

            भागीरथीच्या विशाल प्रवाहाचा तो रमणीय मनकर्णिका  घाट — रुंद, उंच प्रस्तरांच्या पायऱ्यांनी बांधलेल्या पंचायती पैकी हा प्रमुख घाट पाहून आचार्य तर हरखूनच गेले…..

” त्वत्तीरे मनिकर्णिके हरिहरौ सायुज्यमुक्ती प्रदौ।

  वादं तौ  कुरुतः परस्परमुभौ  जन्तोः  प्रयाणोत्सवे।

   मद्रूपो मनुजोऽयमस्तु हरिणा प्रोक्तः शिवस्तत्क्षणा।  

    तन्मध्या  भृगुलांच्छनो गरुडगः पीताम्बरो निर्गतः।।”

                 हे मनिकार्णिकाष्टक आचार्य  गंगेकडे एकटक पाहत म्हणत होते. तिथे त्यांना कळले की, काशीक्षेत्री काळभैरवाचे अत्यंत महत्त्व आहे. तिथे वास करायचा असेल तर प्रथम काळभैरवाचे दर्शन घेऊन अनुमती घ्यावी लागते. त्यांनी कालभैरवाष्टक रचले…..

” देवराज सेव्यमान पावनाघ्रि पड्ःकजम्।

  व्याल यज्ञ सूत्रमिन्दू शेखरं कृपाकरम्।

  नारदादी योगिवृन्द वंदितं दिगंबरम्।

  काशीकापुराधिनाथ कालभैरवं भजे।।”

        मग त्यांनी काळभैरवाच्या मार्गदर्शनानेच मनकर्णिका घाटाजवळ बांधलेल्या आश्रमात आचार्यांनी शिष्यांसह वास्तव केले.

             हां हां म्हणता, काशीपुरात वार्ता पसरली, एक विद्वान तरुण संन्याशी मनकर्निका घाटावर उतरला आहे. पंडित मंडळींनी शंकराचार्यांची कीर्ती ऐकली होतीच. पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. त्यामुळे विद्वान, पंडित, शास्त्री मीमांसक, कर्मकांडी, कापालिक ; सौर, गाणपत्य, शैव, वैष्णव, बौद्ध, जैन असे अनेक पंथाचे, अनेक धर्माचे लोक त्यांना भेटायला, पाहायला मनकर्णिकेवर आले.

         आचार्यांचे अल्पवय, दिव्य तेज, प्रसन्न प्रफुलित नेत्र पाहून मंडळी दिपून जात. त्यांच्याशी बोलताना त्यांची तीक्ष्णबुध्दी, अगाध विद्वता, प्रकांड पंडित्य पाहून गर्विष्ठ विद्वान पंडित थक्क होत.

           गंगेच्या वाळवंटात आचार्यांनी नित्य प्रवचनास आरंभ केला. पारंपारिक विषयावरील रसाळ वकृत्वाने सारेच भारावून जात. आबालवृद्ध, सुशिक्षित, अशिक्षित बहुसंख्येने प्रवचनास येऊ लागले. ते विद्वान मंडळी प्रश्न विचारीत. चर्चा करीत. आचार्यांचं विद्वत्तापूर्ण निरूपण कौशल्य पाहून ती मंडळी आकृष्ट झाली होती. प्रवचनाला श्रोत्यांची रीघ लागू लागली आता तर !! 

          आचार्यांना वाटे, इथे येणारे सारे हिंदू आहेत. ते सर्व एकाच वैदिक धर्माच्या साखळीखाली यायला हवेत. पण प्रत्यक्षात त्यांच्यात दुही, आपापसातले वैर विकोपाला गेले होते. मधून मधून आचार्य प्रवचनाच्या माध्यमातून सांगत,

” आपण सारे एक आहोत. एका राष्ट्राचे, एका धर्माचे. आपल्या सोयीसाठी आपण वेगवेगळे पंथ निर्माण केले आहेत. त्यामुळे कोणीही श्रेष्ठ व कनिष्ठ नाहीत. पण पंथभिन्नतेत आपण गुरफटलो, हे अनिष्ट आहे. घातक आहे.”

” आपण सारे एका आईची लेकरे. आपला पिता वैदिक धर्म. तेव्हा सर्वांनी सलोख्याने वागायला हवे. शेवटी परब्रम्ह स्वरूप एकच असते. दुसऱ्याच्या देवतांबद्दल आदर ठेवला तर आपली देवता प्रसन्न होते. या सर्व देवतांची सगुणरूप उपासना केली की, आपोआप निर्गुण परब्रम्हाची प्राप्ती होते..

          क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. ९-९-२०२३.

आद्य शंकराचार्य संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading