
कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ४१.
स्रीसमुहाच्या अग्रभागी बसलेली याज्ञसेनी वरुन जरी निस्तब्ध,शांत वाटत असली तरी,कौरवांकडुन झालेल्या विटंबनेच्या आठवणींनी अंतरी क्रोध,त्वेष उफाळुन श्रीकृष्णाला म्हणाली,सख्या! या सृष्टीची उत्पादक तूंच आहेस.मधुसुदना! तूच अजिंक्य विष्णू असुन,यज्ञ,यज्ञकर्ता होमद्रव्येही तूच आहेस.माधवा!तूच साध्य आणि रुद्रांचा अधिपती असुन लोकांचा नियंता भूतांचा स्वामी आहेस.मधुसुदना! स्वर्ग आणि मृत्युमधे वास करणार्या सर्व प्राण्यांचा स्वामी तूच आहेस.द्रौपदीच्या बुध्दीवादी,चातुर्यपुर्ण बोलणे ऐकुन तिथे जमलेले सर्व राजे!ऋषीमुनी आवाक झाले.ती विलक्षण बुध्दीमान राजकन्या, वेदाध्ययात,धनुर्विद्येत पारंगत होती.अरे कृष्णा!अजिंक्य अपराजित पांडवांची भार्या, सर्वशक्तीमान असलेल्या तुझी बहिण,सखी,शूर द्यृष्टद्युम्नची भगिनी अशी मी रजःस्वला स्थितीत भरसभेत कौरवांनी माझी विटंबना केली.अरे कृष्णा पांडव,पांचाल,यादव हे सर्व द्विग्विजयी जिवंत असतांना मला दासी बनवुन उपभोग घेण्याच्या वल्गना केल्या,अरे! महा पराक्रमी भीष्म,सम्राट धृतराष्र्टाची राजस्नुषा असुनही आपल्या पुत्रांचे नीच, हीन बोलणे निमुट ऐकुन घेतले.बोलतां बोलतां तिचा आवाज चढला. अग्निच्या ज्वाळा चेहर्यावर उमटल्या.स्वरांतुन ठीणग्या उडत होत्या. जमलेले सारे आवाक,भयभित झालेत.
श्रीकृष्णा!जरी सामर्थ्य कमी असले तरी, आपल्या स्रीचे संरक्षण करणे हा धर्म आहे तसच पत्नीचाही धर्म आहे. आणि त्यानुसार मला वर मिळाल्यावर,या पांडवांना त्यांची दास्यातुन मुक्तता करुन माझा धर्म पाळला.कृष्णा! अरे,पांडव एवढे सिंहासारखे पराक्रमी असतांना… नाही…माधवा… नाही…माझी झालेली घोर विटंबना, अंतःपुरातुन माझे हे विपुल केस धरुनओढत तो नराधम दुःशासनाने भरसभेत आणले,नाही…कृष्णा…नाही.. मला हे विटंबीत दुःख सहन होत नाहीय, कृष्णा…कृष्णा त्यावेळी माझं कुणीच नव्हतं,अरे ना पती,पुत्र,बंधु,पिता, आणि- आणि कृष्णा तू…तू…तू….ही माझा नव्हतास.मी असहाय्य,एकटी,एकाकी होते रे कृष्णा….तिचा अनावर दुःखावेग पाहुन श्रीकृष्ण मनी हेलावुन गेला.निश्चयी शांत स्वरात म्हणाला, सखे!कृष्णे शांत हो! ज्यांच्यावर तुझा क्रोध आहे त्यांचा मी योग्य समाचार नक्की घेईन विश्वास ठेव! मी तुझा सखा,या सर्वासमक्ष प्रतिज्ञा पुर्वक सांगतो की, पांडव पुनः निश्चितच पृथ्वीपती होऊन तूं सम्राज्ञी होशील व अश्वमेध यज्ञही होईल.
आलेली मंडळी कांही दिवस राहुन निघुन गेले.श्रीकृष्ण याज्ञसेनीचा निरोप घ्यायला गेला असतां ती म्हणाली,कृष्णा त्यादिवशी भावनावेगात टाकुन बोलले पण..पण त्याप्रसंगी तूच तर माझी लाज राखली,रक्षण केले होते,सख्या! असेच माझे सदोदित रक्षण कर!त्याने किंचित हसुन तिच्या मस्तकी हात ठेवुन,मी नित्य, तुझा पाठीराखा आहे.असे म्हणुन निघुन गेला.
वनवासाची बारा वर्षे व अज्ञातवासा चा एक अशी तेरा वर्षे पांडवांची दुःखात गेलीत तशीच कृष्णाची त्याच अवस्थेत गेलीत.मुलं,नातु मोठी झाली,त्यांचे विवाह ही झालेत, सर्व मार्गी लागल्यावर,शास्रा प्रमाणे श्रीकृष्ण गृहस्थाश्रमातुन बाहेर पडुन सर्व लक्ष मोक्ष साधनेकडे लावले. उपनिषद् तत्वांचे श्रवण,मनन,अध्ययन सुरु केले.अंगिरस मुनींकडुन आत्मविद्या ग्रहण केली. अशाप्रकारे तेरा वर्षाचा काळ घालवला.जी पण विद्या ग्रहण करायची त्यांत पारंगत होऊन श्रेष्ठत्व प्राप्त करण्याच्या वृत्तीने,लहानपणी मल्ल श्रेष्ठ,तरुणपणी धनूर्धरश्रेष्ठ,योगसाधनेत श्रेष्ठत्व मिळवल्यामुळे योगीश्रेष्ठ अशी त्याची ख्याती पसरली,म्हणुनच त्याला “योगेश्वर श्रीकृष्ण” म्हणु लागले,
जगाला मोक्षमार्ग समजावा म्हणुन धर्मस्थापना करण्याच्या तयारी साठीच तो तेरा वर्षे कुठेही न जातां द्वारकेतच तपःश्चर्या व वैराग्यात घालविली.बलराम-कृष्ण उज्जयिनीला सांदीपनी गुरुंच्या आश्रमात असतांना एक गरीब ब्राम्हण शुध्द आचरणाचा,जे मिळेल त्यावर संतुष्ट राहणारा सुदाम नांवाचा मुलगा श्रीकृष्णाचा जिवलग मित्र बनुन त्याच्या कठीण प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन कृष्णाने त्याला दिले होते.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ४२.
सुदामाची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकिची होती.कित्येकदा उपवासही घडत.मुलांना धड अंगभर कपडेही नव्हते अशातच एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली,श्रीकृष्ण तुमचा जिवलग सखा आहे ना?मुलांचे किती हाल होत आहेत, एकदा द्वारकेस जाऊन त्याची गाठ घेतल्यास तो दयानिधी तुमच्यासारख्या शुध्दाचरणी ब्राम्हणावर,मित्रावर नक्कीच अनुग्रह करील.तिच्या आग्रहानुसार तो जायला तयार झाला पण रिक्त हस्ते कसे जावे?म्हणुन तिने घरांत असलेले थोड्यास्या पोह्याची उपरण्यात पुरचुंडी बांधुन सुदामा द्वारकेस निघाला खरा,पण मार्गात तो अनेक तर्क करीत होता.कृष्ण आतां फार मोठा झालेला,इंद्रापेक्षाही धनवान,पुर्ण नगरी सुवर्णाची,तो आपली भेट घेईल का?फिरावे का परत?पण मन तयार होईना.अखेर एकदाचा पोहोचला द्वारकेला.कुणीही त्याला अडविले नाही. अनेक रत्नजडीत,सुवर्णमय महालं ओलांडुन एका महालात प्रवेश केला.तिथे मंचकावर बसलेल्या श्रीकृष्णाचे लक्ष समोर गेल्यावर लगबगीने उठुन सुदामा ला दृढ अलिंगन देऊन मोठ्या आदराने व प्रेमाने मंचकावर आपल्या शेजारी बसविले.त्याची पुजा करुन कुशल क्षेम विचारल्यावर,श्रीकृष्ण म्हणाला,अरे सुदामा! एवढ्या दुरुन भेटीस आलास,कांही तरी भेट आणली असशीलच!दे बघु काय आणले ते!सुदामा संकोचुन गेला, कृष्ण म्हणाला,मित्रा!माझ्या सख्याने,भक्ताने कांहीही,कितीही शुल्लक,फुलाची एखादी पाकळी जरी प्रेमाणे दिली तरी,त्याचे मोल त्रिभुवनापेक्षा जास्त मानतो.तेव्हा संकोच सोडुन जे कांंही आणले असेल ते आण बघु लवकर!संकोचाने सुदामाने पोह्याची पुरचुंडी बाहेर काढल्याबरोबर झपटा मारुन त्याच्या हातातुन घेऊन सोडली व मुठभर पोहे तोंडात टाकले. दुसरी मुठ घेणार तेवढ्यात, दोघां मित्राचा संवाद ऐकत उभी असलेल्या रुख्मिणीने विनयाने हसुन म्हणाली,आम्हालाही थोडा प्रसाद ग्रहण करुंं देत की!
तो ब्राम्हण म्हणुन त्याची षोडोपचारे पुजा करुन मिष्टांचे जेवण झालेवर तांबुल दिला.रात्रभर गप्पागोष्टी झाल्यात.दुसर्या दिवशी यथोपचार आदरसत्कार झाल्या वर एकमेकांना कडकडुन मिठी मारली. सुदामा परत जायला निघाला तेव्हा त्याला पोहोचवायला श्रीकृष्ण दूरवर गप्पा मारत चालत गेला.सुदामा मार्गस्थ झाल्यावर विचार करुं लागला,आपण कांही मागीतले नाही व श्रीकृष्णानेही कांही दिले नाही.आतां घरी गेल्यावर पत्नि निश्चितच निर्भत्सना करेल,शेजारी ही हसतील.भगवान श्रीकृष्णाने आपण होऊन,परिस्थिती जाणुन कां बरं मदत केली नाही?रिक्तहस्ते कां बरं पाठवावे?जसजसे घर जवळ येऊ लागले तसे त्याचे मन निराशाने भरुन पावले मंद पडु लागली.पण जाणे तर भागच होते.
विचाराच्या नादात घराजवळ पोहोच ला तर आश्चर्यचकित,गोंधळुन क्षणभर तिथेच थबकला.त्याच्या मोडक्या तोडक्या घराचे स्वरुपच बदलुन गेले होते. सभोवती बागबगीचा असलेला राजवाडा सारखे सुंदर घर,दारात उत्तम रेशमी वस्रा लंकारांनी सुशोभित पत्नि उभी,सुंदर कपडे परीधान केलेली मुलं समोर पाहुन तो पार गोंधळुन गेला.त्याला पाहुन पत्नी म्हणाली,तुमचा मित्र,श्रीकृष्णाने,मयासुर शिल्पी व कारागीरांना पाठवुन एका दिवसांत हे सर्व घडवुन आणले.शिवाय दोन दासी व चार नोकर ठेवुन गेलेत.घर धनधान्याने,द्रव्याने भरुन गेलेय.जन्माची ददात मिटविली.सुदामा मनोमनी हेलावुन गेला.देवा,परमात्म्या! अरे तुझ्या दर्शनाने पावन झालो.धन्य झालो.आतां तुझे चिंतन,नामस्मरणा शिवाय दुसरे कांहीही करणार नाही.अरे तूं मला मोक्षाचा मार्ग दाखवलास.तेवढ्यात मुले येऊन त्याला बिलगली.आनंदाश्रु नेत्रात उभे राहिलेत. अशा तर्हेने श्रीकृष्णाने आपले मित्र कर्तव्य पार पाडले.
पांडवांनी वनवासाचे १२ वर्षे काढ ल्यावर,विराटराजाकडे वेगवेगळ्या भुमिकेत व वेशात अज्ञातवासाचे एक वर्ष संपवुन प्रगट झाल्याबरोबर कौरव प्रचंड सेनेनिशी विराटवर चालुन आले,पण पांडवांनी त्यांचा पराभव केला.विराट राजा संतुष्ट होऊन आपली कन्या उत्तरा अर्जुनाला देऊ केली,पण ती आपली शिष्या,कन्येसमान असते म्हणुन नकार दिला,पण मुलगा अभिमन्युसाठी तिला मागणी घातली.ही सारी वार्ता दुताकरवी श्रीकृृष्णाला कळल्यावर त्याला खुप आनंद झाला.अभिमन्यु श्रीकृष्णाचा अतिशय
लाडका होता.स्वतः कृष्णाने त्याला धनुर्विद्या शिकवली.धनुर्धर अर्जुनाचा पुत्र आणि धनुर्धर श्रीकृष्णाचा शिष्य..तो महाधनुर्धर बनला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ४३.
द्वारकेतुन श्रीकृष्ण,सुभद्रा अभिमन्युसह बरीचशी यादव मंडळी विराट नगरी विवाहास जमली.थाटामाटा त अभिमन्यु-उत्तरेचा विवाह पार पडला. पांडवांनी रितसर आपले राज्य परत करण्यासाठी दूत पाठविला असतां,दूता करवी दुर्योधनाने उलट निरोप पाठविला की,तेरा वर्षे पुर्ण होण्याआधीच तुम्ही प्रगट झाल्यामुळे,द्युतअटीनुसार परत १३ वर्षे वनवास पत्करा! असच कांही तरी घडेल हे श्रीकृष्ण जाणुन होताच.”सुष्टांचे संवर्धन,संरक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करण्याची वेळ समीप आली आहे,आतां युध्दाशिवाय पर्याय उरला नव्हता.
ऊपलव्य शहराबाहेर द्रुपदराजा आणि विरांटांच्या सैन्याने तळ दिला. तिथुनच सर्व राजांना सत्य हकिकत सांगुन मदतीसाठी पाचारण केले,इकडे दुर्योधनानेही पांडवांना नेस्तनाबुत करण्याचा चंग बांधुन युध्दाची तयारी केली.त्याने ही मदतीसाठी राजांना पाचारण केले. कौरवांविषयी मित्रभाव असणारे राजे कौरवांकडे ससैन्य व पांडवांशी स्नेहभाव आणि त्यांची बाजु न्याय्य आहे हे पटलेले राजे ससैन्य उपलव्याकडे निघाले.सारा भारत या युध्दाने व्यापुन गेला.सत्य आणि असत्य,धर्म आणि अधर्म असे या युध्दाला स्वरुप आले. पुढील विनाश टळण्याच्या दृष्टीने युधिष्ठीराने पांच गांवा ची मागणी दुर्योधनाकडे केली,पण उर्मट पणे दुर्योधनाने निरोप पाठवला की,सुई च्या अग्रावर मावेल एवढीही भूमी मिळणार नाही.कृष्णशिष्टाईही वाया गेली अखेर युध्द अटळ झाले.
श्रीकृष्णाची मदत घेण्यासाठी अर्जुन व दुर्योधन एकाचवेळी द्वारकेस पोहोचले. दुपारच्या भोजनोत्तर विश्रांती घेत कृष्ण झोपला होता.दुर्योधन आधी आंत जाऊन श्रीकृष्णाच्या उशागत बसला.अर्जुन नम्र पणे नंतर जाऊन त्याच्या पायथ्याशी उभा राहिला.कृष्णाला जाग आल्यावर, डोळे उघडताच प्रथम पायथ्याशी उभा असलेला अर्जुन दिसला.उठुन बसल्यावर
उशालगत बसलेला दुर्योधन दिसला.दोघां चा हेतू त्याने जाणला.हसुन त्यांचे स्वागत करीत अकस्मात येण्याचे कारण विचारल्यावर दुर्योधन म्हणाला,मी प्रथम आलो, रितीप्रमाणे प्रथम माझे कार्य व्हावे. श्रीकृष्ण हसुन म्हणाला, दुर्योधना तूं व्याही व अर्जुन मेव्हणा,दोघेही मला सारखेच आहात.आतां मी वृध्दत्वाकडे झुकलेला,माझ्याने शस्र धरवल्या जाणार नाही.एकाने माझे सारे सैन्य व दुसर्या कडे फक्त मी असेन,अर्जुन लहान असल्यामुळे मागण्याचा प्रथम हक्क त्याला आहे.बोल अर्जुना!काय पाहिजे तुला?मला फक्त तू. हवा कृष्णा!दुर्योधन खुश झाला.एकटा कृष्ण त्याला नकोच होता.त्यानंतर दुर्योधन बलरामाकडे गेला. पण बलराम म्हणाला,मी तटस्थ राहणार व तिर्थयात्रेला जाणार! यादववीर त्यांच्या मर्जीनुसार दोन्हीकडे वाटल्या गेले.सात अक्षौहिणी सैन्य पांडवांकडे व कौरवाकडे ११ अक्षौहिणी सैन्य जमा झाले.(एक अक्षौहिणी म्हणजे २१,८७० हत्ती,२१,८७० रथी,तिप्पट म्हणजे ६५,६१० घोडेस्वार व पांचपट म्हणजे १,०९,३५० पायदळ या हिशोबाने सरासरी तीन लाख मनुष्ये एका अक्षौहिणीत होतात)
सर्व तयारी झाल्यावर श्रीकृष्णाच्या आज्ञेने सर्व सैन्य कुरुक्षेत्रावर जमा झाले. दोन्हीकडील सैन्य परस्परांशी लढण्यास सिध्द झाली. अर्जुनाचा सारथी बनलेल्या कृष्णाला रणमैदानाच्या मधे रथ घ्यायला सांगीतला.अर्जुनाने दोन्ही सैन्याकडे दृष्टी टाकली तेव्हा त्याला आप्त,नातलग,गुरु दिसले.यांना वधावे का?गदगदल्या स्वरांत तो कृष्णाला म्हणाला,केशवा! या लाखो निरपराध वीरांना,पुज्य गुरु,प्रिय बंधु यांना ठार करुन राज्य मिळवलंतर काय कामाचं? अरे!त्रेलोक्याच्या राज्या साठी सुध्दा यांच्यावर शस्र चालवु शकणार नाही मग या एवढ्याशा कुरुराज्यासाठी कसे काय शस्र उचलु?आक्रोश करीत रथात शस्र टाकुन उद्वेगाने खाली बसला. अर्जुनाची अशी विषण्य अवस्था झालेली पाहुन,श्रीकृष्ण म्हणाला,अर्जुना! तुला हा दुबळेपणा शोभत नाही.ज्या आजोबांच्या अंगाखांद्यावर खेळलो,ज्या द्रोणगुरुंनी स्वतःच्या पुत्रापेशा अस्रशस्र विद्येत निपुन केले,त्यांचेवर कसं शस्र चालवु?त्यापेक्षा आम्ही परत वनवास पत्करु! केशवा! तूं योग्य अयोग्य सारं जाणतोस.प्रत्यक्ष विष्णु आहेस.मी मनोभावे तुला शरण आलोय,मार्ग दाखव.श्रीकृष्णाने त्याला बराच ऊपदेश करुन शेवटी म्हणाला, पार्था, तूं युध्दात कामी आलास तर वीर गती मिळुन स्वर्गप्राप्ती होईल आणि विजयी झालास तर,पृथ्वीवरील राज्य भोगशील.अरे! सुख-दुःख,लाभ-हानी, जय-पराजय हे सारखच मानुन युध्दास तयार हो! तरी अर्जुनाचे मन स्थिर झाले नाही,चलबिचल थांबली नाही.मान खाली घालुन आपल्याच विचारांत गर्क होता.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !! भाग – ४४.
अर्जुनाच्या मनाची अवस्था पाहुन, श्रीकृष्ण म्हणाला,आतांपर्यंत तुला “सांख्यबुध्दी” म्हणजे “परमार्थ ज्ञानयोग” सांगीतला.आतां कर्मयोग सांगतो. कर्म योग सांगुन झाल्यावर,श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना! तूं फक्त कर्माचा अधिकारी आहे, फलाचा अधिकारी होऊ नकोस.कर्म करीत रहा,फलाची इच्छा ठेवु नकोस.हा सर्व उपदेश ऐकल्यावर अर्जुन बराच स्वस्थचित्त झाला.हे पाहुन श्रीकृष्ण मनात समाधान पावला.आणि स्थितप्रज्ञा चे लक्षण सांगीतले.अर्जुना ह्याच स्थिती ला “ब्रम्हस्थिती” म्हणतात.श्रीकृष्णाचे सर्व तत्वज्ञान ऐकुन त्याला कृष्णाव्दारे नवीनच ज्ञान प्राप्त झाल्याची जाणीव झाली.मधुसुदना! आतां जो समत्वयोग सांगीतला तो चंचल मनामुळे जमेलसे वाटत नाही.अर्जुना तो अभ्यासाने साध्य होतो.नंतर अर्जुनाने अनेक शंका निर्माण केल्यात व समर्पक समाधान कृष्णाने केले.अर्जुना! तुझे चित्त शुध्द झाल्याने अधिकारी झालास,म्हणुन विज्ञानसहित गुह्यज्ञान तुला सांगतो.धनंजया!सर्वांच्या अंतरी असणारा “मी” अविनाशी आत्मा आहे.आणि सर्वांच्या आदी,मध्य, अंत ही मीच आहे.वेदांमधले सात वेद मीच आहे. देवांमधे इंद्र,रुद्रामधे शंकर!यक्षराक्षसा मधे कुबेर,,अष्टवसुंमधे अग्नी,पर्वतांमधे मेरु या सर्वांमधे मीच व्याप्त आहे.हे सर्व जग मीच व्यापले आहे. हे नक्की समज!
अर्जुन अंतर्यामी पार बदलुन गेला. ज्ञानी,अधिकारी झाला. सविनय कृष्णा ला म्हणाला,हे परमेश्वरा! स्वतःविषयी जे सविस्तर वर्णन केले,ते तुझे दिव्य,अलौ किक,व्यापक रुप दाखवावे घननिळा! ठीक आहे धनंजया!चराचरासहित सर्व जग,आणि तू जे पाहु इच्छितो ते सर्व माझ्या देहामधे एकत्र,एकाच ठीकाणी पहा… आणि अर्जुनाला इश्वरशक्ती बघ ण्यासाठी दिव्यदृष्टी देऊन, महायोगेश्वर श्रीकृष्णाने आपलेपरमश्रेष्ठ विश्वरुप दाखवल्यावर अर्जुन भयभीत स्वरांत म्हणाला, हे प्रभो! आतां प्रसन्न व्हावे. व हे उग्र,अक्राळ-विक्राळ रुप धारण करण्याचा काय हेतू आहे? हेतू? या पृथ्वीवर भार झालेल्या मानव,प्राणीमात्र, जगाचा क्षय करणार! यासाठीच अर्जुना उठ!युध्दास सज्ज हो!धनंजया! मी सांगी तलेले गीताशास्र ऐकलेस ना?अज्ञानामुळे तुझ्या मनात निर्माण झालेला विकल्प नाहीसा झाला ना? होय जगदिश्वरा!मी आतां पुर्ण संशयरहित झालोय!जे तूं सांगशील तसेच वागेन मी…. गुरु-शिष्यां चा संवाद,गुह्य ज्ञान देणारा श्रीकृष्ण आणि धनुर्धारी पार्थ एकत्रीत आल्यावर लक्ष्मी,विजय,ऐश्वर्य,निश्चल नीती या सर्व गोष्टी निश्चितच पांडवांच्या बाजुने असती
दोन्ही पक्षाकडील सेनापती सैन्यांचे व्युह रचण्यांत गुंतलेले असल्यामुळे गुरु शिष्यातील संवादात अडथळा आला नाही,की कुणाला कांही ऐकुही गेलं नाही. संवाद संपला व खाली ठेवलेले धनुष्य अर्जुनाने हाती घेतले.रणशिंगे फुंकल्या गेले.उभय पक्षाकडील सैन्य युध्दार्थ पुढे सरकणार,तेवढ्यात युधिष्ठीराने धनुष्य खाली ठेवुन,कवच काढुन लगबगीने एकटाच पितामह भीष्मांच्या रथाकडे पायी निघालेला पाहुन त्याचे चारही बंधु त्याच्या मागे धावले.श्रीकृष्णाने धर्माचा हेतू जाणला.युध्दापुर्वी,सर्व जेष्ठ श्रेष्ठांची अनुमती व आशिर्वाद घेण्यासाठी निघाला.भीष्मांनी त्याला सद्गदीत स्वरांत म्हणाले,”जिथे धर्म तिथे जय” तेव्हा निःशंक मनाने तयार हो! अरे धर्मा!जिथे कृष्ण तिथे जय हा अविनाशी सिध्दांत आहे,
दोन्हीकडचे सैन्य लढू लागले,भीष्मांचा अतुलनीय पराक्रम पाहुन व ते आवरत नाहीसे पाहुन अखेर श्रीकृष्णाने रथ चक्र उगारुन भीष्मावर चाल केली. कृष्ण स्वतःच आपल्यावर चाल करुन येत असलेला पाहुन भीष्मांनी धनुष्य खाली ठेवले व हात जोडुन म्हणाले! हे देवाधिदेवा!जगधिशा,श्रीकृष्णा!तुझ्या हातुन जर मरण आले तर माझ्यासारखा भाग्यवान कोण असेल?तेवढ्यात शुध्दीवर आलेल्या अर्जुनाने समोरचे दृष्य पाहुन, श्रीकृष्णाला म्हणाला, हे करुणानिधी! भक्तासाठी केलेली प्रतिज्ञा मोडलीस, आतां रथात चढुन सारथ्य कर व बघ माझे सामर्थ्य! श्रीकृष्ण रथारुढ झाला व भीष्मार्जुनाचे घनघोर युध्द संध्याकाळ पर्यत चालले. आणि युध्दाचा नववा दिवस संपला.रात्री दुर्योधन भीष्मांच्या शिबिरात जाऊन त्यांना अपमानकारक बोलल्याने, संतापलेले भीष्म म्हणाले, उद्या एकतर पांडव तरी राहतील किंवा मी उद्याचे युध्द न भूतो न भविष्यती असे भयंकर होईल.निश्चिंत मनाने तुझ्या शिबिरात परत जा….
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ४५.
युध्दाचा दहावा दिवस उजाडला. भीष्मांना परशुरामाकडुन मिळालेल्या अस्राने पांडव सैन्याचा नाश करण्यास सुरुवात केली.भयंकर रणकंदन करीत ते कौरवसेनेपासुन बरेच पुढे आल्याने, पांडवसैन्याने त्यांना चारही बाजुंनी घेरुन शिखंडीचा रथ पुढे करुन,अर्जुनाने त्यांचे वर बाणांचा वर्षाव केला.असंख्य बाण त्यांच्या शरीरांत घुसल्याने शेवटी सुर्य अस्ताला जाण्याच्या सुमारास पुर्वेकडे डोके होऊन रथातुन भीष्म खाली पडले.अंगात असंख्य बाण घुसल्यामुळे बाणांच्या शय्ये वर अधांतरी राहिले.कौरवांचा सीमावृक्ष उन्मळुन पडला.त्यांचे डोके लोंबकळते पाहुन अर्जुनाने भूमीत तीन बाण मारुन त्यांचे डोके अलगद सावरुन ठेवले.आणि ती महान विभूती उत्तरायणाची वाट बघत इच्छामरणी असल्यामुळे जीव देहात धरुन ठेवला.शेवटचा प्रयत्न म्हणुन त्यांनी परत एकदा दुर्योधनाला संधी करण्या करितां समजावण्याचा प्रयत्न केला,पण “विनाशकाले विपरित बुध्दी” त्याला पटणे शक्यच नव्हते.दोन्ही पक्षाकडील रथी महारथींनी भीष्मांना नमस्कार करुन जड पावलांनी शिबिराकडे परतले.
११ व्या दिवशी कर्णाच्याच सांगण्यावरुन द्रोणाचार्य सेनापती झाले.त्या दिवशी तुंबळ युध्द होऊन पांडवसैन्याचा भयंकर नाश झाला.दोन्हीकडच्या रथी महारथींच्या आहुत्या पडत होत्या.शेवटच्या म्हणजे अठराव्या दिवशी भीम-दुर्योधनाचे गदायुध्द होऊन भीमाकडुन दुर्योधन ठार झाला.आणि युध्दाचा शेवट होऊन पांडव विजयी झाले.
श्रीकृष्णाच्या आज्ञेने पुढील योजनांच्या विचारविनिमयासाठी द्रौपदीसह सर्व पांडव छावनीपासुन दूर नदीकिनारी गेले. विचारांती असे ठरले की, दुर्योधनाचा शेवट ज्याप्रकारे झाला ते कळल्यावर, महातपस्विनी व सत्याने राहणारी गांधारी देवीचे तप एवढे उग्र आहे की,त्रैलोक्यही दग्ध करण्याचे सामर्थ्य असल्यामुळे, तिच्या कोपापासुन पांडवांना वाचवण्या साठी श्रीकृष्ण त्वरेने हस्तिनापुरी निघुन गेला.सरळ धृतराष्र्ट महालीच गेला.तिथे द्वैपायन महर्षी व्यास,संजय,व गांधारी बसलेली होती.जनार्दनाने व्यास व धृतरा ष्र्टाचे पदवंदन व गांधारीला अभिवंदन केले.श्रीकृष्ण धृतराष्र्टासमीप बसुन, त्याचेकडुन पेरलेले विषारी बीज,पुत्रमोहा मुळे केलेल्या अपराधामुळे झालेला कुलक्षय इत्यादी गोष्टींचा धृतराष्र्टापुढे पाढा वाचुन केवळ आणि केवळ तुझ्या मुळेच एवढा नरसंहार,कुलक्षय झाला. निदान आतां तरी,पांडवांबद्दलचा आकस असुया करु नकोस,ते तुझेच व तुझ्या कुळातील आहे.त्यांना जवळ कर!नंंतर गांधारीकडे वळुन म्हणाला,तपस्वीनी! तुझ्यासारखी निरपेक्षपणे हितकर उपदेश करणारी,स्वपुत्राला शेवटपर्यंत आशिर्वाद न देणारी,सतत सत्याची कास धरुन ठेवणारी स्री अखिल जगात नाही.आतां शोक न करतां पांडवांच्या विनाशाचा विचारही मनांत आणु नकोस…कृष्णा पुत्रवियोगाने तशी मानसिक दुःखाने दग्ध होऊन कांही वेळापुरती माझी बुध्दी थोडी हळवी झाली होती,पण तुझे बोलणे ऐकुन बुध्दी ताळ्यावर आली.आतां या पुत्रहिन अंधाना पांडवच आधार असेल.
श्रीकृष्ण हस्तिनापुरी धृतराष्र्ट गांधारीच्या सांत्वनात गुंतला असतांना इकडे पांडव व दौपदी नदीकिनारी बोलत बसले होते.पांडवांना जरी विजय मिळाला तरी विशेषतः युधिष्ठीर या सगळ्या महाविनाशाने उद्गिग्न होऊन अंतःकरण विरक्तीने भरुन गेले होते.
सुर्यास्तासमयी मुर्च्छित झालेल्या दुर्योधनाची शुध्द येऊन फुटलेल्या मांडी च्या वेदनेने विव्हळत असतांनाच,रणांगण सोडुन गेलेले अश्वत्थामा,कृपाचार्य,आणि कृतवर्मा तिथे येऊन पोहोचले.आपल्या राजाची दयनीय अवस्था पाहुन तिघेही क्रोधीष्ट झाले.अश्वत्थामा संतापाने कठोर पणे म्हणाला, पांडवांनी विश्वासघाताने अतिशय निचपणे माझ्या पित्याचा घात, तुझी अशी अवस्था केली.राजा!शत्रु केवळ अधर्माने विजयी झाले, राजा जर तुझी अनुमती असेल तर अजुनही पांडवांना ठार करीन.
दुर्योधनाचा क्षीण झालेला स्वर एका एकी उत्तेजीत झाला.अश्वत्थामाचा सेनापती म्हणुन अभिषेक करण्यांत आला.दुर्यौधनाला अशास्तव करुन तिघे रथात बसुन दक्षिणेकडील एका अरण्यांत एका झाडाखाली विसाव्यास बसले.कृत वर्मा व कृपाचार्य थकल्याने गाढ झोपी गेले,पण अश्वत्थामाला अति क्रोधाने सूड सूड करीत विचारांच्या गर्तेत तसाच पडुन राहिला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.


