
कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३६.
बलरामाचा अद्वितिय पराक्रम पाहुन दुर्योधनादी कौरव मंडळी शरण येऊन म्हणाले, भगवान! तुझी शक्ती अनंत आहे.आमच्या अपराधाला क्षमा कर! सांबाला मुक्त करुन आनदाने व आदराने लक्ष्मणा त्याला अर्पन केली. बलरामाच्या या अद्भभुत पराक्रमाची खुण आजही हस्तिनापुरच्या दक्षिण बाजुस नांगराचा फाळ घालुन ओढल्याने शहराच्या त्या बाजुला आलेला उंचवटा अद्यापही कायम आहे.
अभिमन्युच्यावेळी गरोदर असलेल्या सुभद्रेला पहिली प्रसुती माहेरी व्हावी या प्रथेनुसार विवाहानंतर प्रथमच श्रीकृष्ण तिला न्यायला इंद्रप्रस्थाला गेल्यावर त्याचे यथोचित स्वागत झाले.श्रीकृष्णाचा मुक्काम अर्जुनाच्या महाली असे.एकांतात अनेक विषयांवर बोलणी होत नदी किनारी फिरायला जात.असेच बोलत असतांना तिथे मनुष्यरुप धारण केलेले अग्निदेवता त्यांच्याजवळ येऊन हात जोडुन म्हणाले,भगवान! मी भुकेला आहे माझी भुक शांत कर!तसही इंद्रप्रस्थाच्या पश्चिमेस खांडववन हे घनदाट अरण्यात रानटी लोक व हिंस्र पशुंचा उपद्रव राज्या ला नेहमीच होत असल्यामुळे कृष्णार्जुनाने ते खांडववन अग्निला देण्याचे मान्य केले.
अग्नीला कबुल केल्यानुसार कृष्णार्जुनाने ते दाट अरण्य सगळीकडुन पेटवुन दिले.आग एवढी भयानक भडकली की,त्यातुन कोणीही बाहेर पडु शकले नाही.तिथे राहत असलेल्या मया सुराला कृष्णाने वाचवुन सुरक्षित बाहेर जाऊ दिले.त्याच वनांत तक्षक नावाचा नाग बाहेर गेलेला असल्यामुळे वाचला आणि त्याचा भाऊ युक्तीने निसटला. तेव्हापासुन ते दोघेही पांडवांचे व त्यांच्या पुढील वंशाचे कायम शत्रु बनले.खांडव वन जळल्यामुळे पांडवांना वसाहतीला व शेतीला मोठा मुलुख मिळाल्याने राज्याची भरभराट जलद गतीने झाली.अग्नीतुन वाचलेल्या मयासुराने कृतज्ञतेने पांडवांना इंद्रप्रस्थात दिव्य मयसभा बांधुन दिली. या दिव्य मयसभा व पांडवांच्या अतुल पराक्रमाची किर्ती भरत खंडातच नव्हे तर त्रिभुवनात पसरली.
श्रीकृष्णाचे वय आता ६६-६७ वर्षाचे झाले होते.त्याचे गृहस्थश्रमी आयुष्य जीवनक्रम सुरळीत व आनंदात सुखात चालले होते.तो सर्वांना सुख देत व स्वतः भोगीत सर्व कर्तव्ये पार पाडीत होता.अगदी बालवयापासुन ते आतांपर्यंत लोकांसमोर स्ववर्तनाने,कृतीने आदर्श ऊभे केले होते.हा विष्णुचा अवतार आहे याची जाणीव लोकांना झाली होती.
परित्राणाय साधूनां।विनाशाय च दुष्कृतोम् । धर्म संस्थापनार्थाय। संभवामि युगे युगे ।। या वचनाप्रमाणे अवतार कार्य पुर्ण करण्याची वेळ हळु हळु जवळ येत होती.उन्मत्त क्षत्रियांचा भार हलका करण्याविषयी पृथ्वीने श्रीविष्णुंना प्रार्थना केली होती.त्यानुसार स्वतः विष्णुने कृष्णरुपाने अवतार घेऊन पृथ्वीवर आले.
एके दिवशी नित्याप्रमाणे श्रीकृष्ण ‘सुधर्मा’ सभेत बसला असतां दूत आल्या चे सांगीतल्यावर सभेतच घेऊन यायला सांगीतले.दूत आंत येऊन तेजस्वी श्रीकृष्णाकडे पाहुन मनोभावे नमस्कार करीत सांगु लागला,जरासंधाने द्विग्विजय करण्याचे ठरवुन अफाट सैन्यानिशी सगळीकडे भ्रमण करुन ज्या राजांनी करभार दिला त्यांना मांडलिक व ज्यांनी दिला नाही त्यांना जिंकुन बंदिवासात टाकले.त्यांचा नरमेध यज्ञ करणार आहे. म्हणुन सगळ्या राजांच्या वतीने मदती साठी आपल्याकडे पाठविले आहे.ठीक! तू सर्व राजांना अशास्तव करुन सांग की, त्यांची लवकर सुटका करीन.दूत कृतज्ञ होऊन वंदन करुन हे शुभ वर्तमान राजांना कळविण्यास निघुन गेला.
जरासंध तसा अवध्य,त्याच्या जवळ अगणित सैन्य पण “सुष्टांचे संरक्षण आणि दुष्टांचे निर्दालन” हेच या लोकीचे माझे कार्य आहे.सभा बरखास्त करुन उठणार तेवढ्यात इंद्रसेन नामक दूत इंद्रप्रस्थावरुन धर्मराजाला कांही सल्लामसलत करण्यासाठी तातडीने बोलवल्याचा निरोप सांगीतला.श्रीकृष्ण आपल्या अष्टभार्यांसह इंद्रप्रस्थाकडे रवाना झाला.अष्टभार्यांसह श्रीकृष्ण येत असल्याचे आनंदवृत्त समजल्याने धर्भ राजा आपल्या राजवैभवानिशी श्रीकृष्णा ला सामोरे गेले.भव्य मिरवणुकीसह वाजत गाजत जयघोषात श्रृंगारलेल्या इंद्रप्रस्थ नगरीत प्रविष्ट झाले.दारोदारी सुवा सिनींनी पंचारतीने ओवाळले.जंगी वैभव शाली मिरवणुक राजवाड्याजवळ पोहोचली .श्रीकृष्णांच्या अष्टभार्यांना द्रौपदीला पाहण्याची उत्सुकता लागली होती.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३७.
अष्टभार्यांसह श्रीकृष्णाने राजगृहात प्रवेश केल्यावर कृष्ण सर्वप्रथम कुंतीच्या दालनात गेल्यावर दोघांनी एकमेकांना गाढ अलिंगन दिले.कुंती आत्या तर होती च पण परमभक्तही होती.महासाध्वी द्रौपदीने कृष्णाला पाहिल्याबरोबर तिचे नेत्र अत्यानांदाने भरुन आले.हा आपला बंधु,सखा,नित्य पाठीराखा असुन अढळ भक्तीची भावनाही निर्माण,ज्या वेळी अर्जुनाने ‘पण’ जिंकुन त्याच्याबरोबर आला तेव्हाच झाली होती.८-१० दिवस आनंदात घालवल्यावर युधिष्ठीराने सभेचे आयोजन केले.त्या सभेत सर्वच स्तराती ल लोकं निमंत्रित होते. सारे सभा कशा साठी बोलावली म्हणुन उत्सुक झाले होते
श्रीकृष्णाकडे पाहुन गंभीर स्वरात युधिष्ठीराने बोलण्यास सुरुवात केली. वासुदेवा! बरेच दिवसांपासीन राजसूय यज्ञ करण्याचा विचार मनी आहे. मधुसुदना!आम्ही आज जे कांही आहोत ते केवळ आणि केवळ तुझ्यामुळेच!हे राज्य उत्कर्ष पावुन वैभवास आले तेही तुझ्याचमुळे!नारदमुनींनी सुध्दा यज्ञाचा आग्रह केला,म्हणुनच मुद्दाम तुला बोलाव ले आहे.राजधर्मा! तूं सर्वतोपरी योग्य व समर्थ आहेस,तरी सुध्दा यज्ञ करण्यापुर्वी सर्व राजांना जिंकुनच अखिल भूतलावर सत्ता प्रस्थापित करणे गरजेचे आहे.पण एक मोठी अडचण आहे,या भरत खंडात चंद्रवंशी व सुर्यवंशी एकंदर १॰१ कुळे आहेत. परशुरामाने जिंकलेल्या आणि त्यांच्या कत्तलीतुन वाचलेल्या क्षत्रियांनी तेव्हापासुन आपल्याचपैकी कोणा एकाला सार्वभौम मानुन त्याच्याच आज्ञेत सर्वांनी चालावे असा कडक नियम घालुन दिलेला तुला माहीतच आहेच.सध्या भोज कुल बलिष्ठ असुन मगध देशाचा राजा जरासंधाला सर्वांनी सम्राट मानले असुन चेदिपती शिशुपाल त्याचा सेनापती आहे. तसेच विदर्भाचा भीष्मक,पौंड्रकपती वासुदेव,करुणपति दंतवक्र इत्यादी राजे त्याचे आज्ञाधारक आहेत.तुझा मामा कुंतीभोज फक्त तुझ्याबाजुने आहे,बाकी सर्वच राजे त्याला अनुकुल आहे हा सर्व विचार करतां जरासंध जोवर जिवंत आहे तोपर्यंत दिग्विजय करणे तुला अशक्य आहे.आतां त्याच्या पापाचाही घडा भरत आला आहे.शेकडों राजांना जिंकुन कैदेत टाकले,महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पुरीषमेध यज्ञ करायचा त्याचा विचार आहे.त्या सर्व राजांच्या सुटकेसाठी तरी त्याला ठार करणे,त्याचा काटा काढणे आवश्यक आहे.ते बंदिस्त राजे मुक्त झाले तर ते पण तुझे सहाय्यकारी होतील त्याला लढाईत जिंखणे तर अशक्य आहे द्वंदयुध्दातच फक्त अर्जुन किंवा भीम मारुं शकेल.ही वार्ता कर्णोपकर्णी होण्याआधी गुप्त वेशाने या दोघांसह मगधदेशी जाऊन त्याला द्वंदयुध्दाचे आव्हान केले की, तो द्वंदयुध्द नाकारणार नाही.अर्जुन भीम व श्रीकृष्णासह कृशतृणांची वल्कले व हाती कमंडलू घेऊन ब्राम्हणवेशात तिघे मगधदेशी पोहोचले.निर्भयतेने ते तेजस्वी ब्राम्हण चालले असतां कुणीही त्यांना अडविले नाही.ते सरळ जरासंधाजवळ पोहोचले, त्याने उठुन आदराने त्यांचा पायसमधुपर्काचा सत्कार पुढे केला पण तिघांनीही अस्विकार केला.तुम्ही ब्राम्हण आहात तर पुजासत्कार कां स्विकारत नाही? या तिघांनी जरी ब्राम्हणवेष धारण केला असला तरी,त्यांची धिप्पाड आकृति कसलेले शरीर धनुष्याचा चाप ओढुन हाताला पडलेले घट्टे पाहुन हे ब्राम्हण नसुन क्षत्रिय आहे, हे त्याने ओळखले. शिवाय चेहेरेही ओळखीचे वाटत होते. त्याच्या मनांतील भाव ओळखुन,कृष्ण म्हणाला,बरोबर आहे! हे दोघे पांडव भीम अर्जुन व मी ह्रषिकेश शौरी,तुला द्वंदयुध्दा चे आव्हान करायला आलो आहोत.एक तर तू कैदेत टाकलेल्या सर्व क्षत्रिय राजाना सोडुन दे किंवा द्वंदाला तयार हो! हे ऐकुन जरासंध दर्प व त्वेषाने बोलला,अरे पळपुट्या!तू तर माझ्यापासुन पळुन गेला ठीक!या भीमाबरोबर बाहुयुध्द करण्यास तयार आहे.पूर्ण तयारीनिशी आखाड्यात उतरला.इकडे भीमाने श्रीकृष्णाला नमस्कार करुन तोही आखाड्यात उतरुन समोरासमोर दोघे उभे ठाकले.आणी १४ दिवस युध्द सुरु राहिले,पण निकाल लागेना.संधी साधुन भीम कृष्णाला म्हणाला,इतके दिवस कसा तरी दम धरत लढलो,पण यापुढे त्या महावीरापुढे टिकाव लागेलसे वाटत नाही.तू बाहुयुध्दा ला सुरुवात कर!मी उपाय सुचवतो. श्रीकृष्णाला आठवले की,जरासध जन्माला आला तेव्हा त्याच्या शरीराचे दोन शकले होती. ‘जरा’ नामक राक्षसीने ती सोडली,सांधली तेव्हा तो जगला.म्हणुनच त्याला जरासंध नांव पडले.याच्या शरीरा चे दोन शकले केली तरच हा मरण पावेल हे लक्षात आल्यावर, त्याने जाडसर गवता ची काडी उभी चिरुन त्याची दोन शकले करुन दोन बाजुला टाकलेली भीमाला दाखवले.भीमाने लगेच ओळखुन जरासंधाला आपटुन उभा चिरले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३८.
जरासंधाचा वध झाल्यावर लगेच श्रीकृष्णाने त्याचा पुत्र सहदेवला गादीवर बसवुन कारागृहात खितपत पडलेल्या सगळ्या राजांची मुक्तता केली.आणि इंद्र प्रस्थास यशस्वी होऊन परत आल्याने धर्मराजाला खुप आनंद झाला.मार्ग निष्कंट झाल्यामुळे राजसूय यज्ञासाठी द्विग्विजयाला निघण्याची सुचना करुन गर्भवती सुभद्रास सोबत घेऊन श्रीकृष्ण द्वारकेस परत आला.श्रीकृष्णाच्या पराक्रमाने व सामर्थ्याने अजिंक्य जरासंधाच्या वधाची वार्ता सर्वीकडे पोहोचल्याने काही राजांना आनंद झाला तर कांहीना कृष्णा च्या वाढते प्राबल्य पाहुन त्यांच्या मनांत विषाद उत्पन्न झाला.पोंड्रीक राजा वासुदेव तर पेटुन उठला. तो स्वतःला देवाचा अवतार समजत असे.तो श्रीकृष्णासारखेच पित वस्रे,गळ्यात वनमाला,शंख,चक्र,गदा,शार्ड्गाःयुध बाळगुन रथावर गरुडध्वज लावत असे. मत्सराग्निने भडकुन द्वारकेला दूत पाठवून युध्दाचे आव्हान केले.पौंड्रुकावर श्रीकृष्णाने तात्काळ स्वारी केली.तोही ससैन्य काशीजवळ आला.काशीराजही त्याला मिळाला.यादवाचे व त्याचे घनघोर युध्द होऊन श्रीकृष्णाने त्याचे मस्तक ऊडविले.काशीराजालाही ठार केले. दोघांचा वध करुन श्रीकृष्ण विजयी होऊन द्वारकेस सन्मासह परतला.
श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार,इंद्र प्रस्थी युधिष्ठीराने आपल्या चारही बंधुना चारी दिशा जिंकण्यासाठी रवाना केले. त्यांनी आपापल्या दिशेचे राजे जिंकुन त्या राजांनीही आनंदाने करभार देऊन राजसूय यज्ञास येण्याचे मान्य केले.इंद्र प्रस्थात द्रव्याच्या,रत्नांच्या राशी जमा झाल्यात.प्राथमिक तयारी झाल्यावर यज्ञाचा समय निश्चित करुन श्रीकृष्णाला बोलवणे पाठविले.श्रीकृष्णादी विपुल, द्रव्याच्या राशी घेऊन इंद्रप्रस्थात दाखल झाला.श्रीकृष्णाच्या आज्ञेने यज्ञास आरंभ झाला.द्वैंपायन,भारद्वाज,सुमंत, गौतम असित,वशिष्ठ, च्यवन,कण्व,मैत्रेय,विश्वा मित्र, पाराशर,गर्ग,वेंशपायन,कश्यप, धौम्य, भार्गवराम या ब्राम्हवेत्त्या ऋषींना ऋषिजांची अध्वर्दुची कामे वाटुन दिली. स्वतः व्यासमहर्षि ब्रम्ह,याज्ञवल्क अध्वर्यु झालेत.धर्मराजा व द्रौपदीने यज्ञाची दीक्षा घेतली.केवळ भूलोकीचे राजेच नव्हे तर इंद्रादी लोकपाल,ब्रम्हदेव,शंकर,इत्यादी मोठ मोठ्या देवांना प्रार्थनापुर्वक यज्ञाला निमंत्रित केले.
नकुल स्वतः हस्तिनापुरला जाऊन भीष्म,द्रोणाचार्य,धृतराष्र्ट त्यांच्या पुत्रां सह सन्मानाने इंद्रप्रस्थी आणले.आणि यज्ञकृत्यातील योग्य अधिकारही भेदभाव न ठेवतां वाटुन दिले.कृष्णाने स्वतः ब्राम्हणांचे पाय धुवुन त्यांचे पुजन करण्याचे काम स्वतःकडे घेतले.
ते यज्ञायतन सतत एक महिन्या पर्यंत दुमदुमत होते.यज्ञाचा शेवटही आनंदमय व्हायला हवा होता पण…..
यज्ञविधी आटोपल्यावर अवभृत स्नानाची वेळ आली तेव्हा यज्ञाहरण म्हणजे यज्ञा साठी आलेल्या मोठ्या लोकांचे पुजन करण्याचा समारंभ असतो.हा समारंभात अग्रपुजेचा मान पितामह भीष्मांनी श्रीकृष्णाला दिलेलं शिशुपालला आवडलं नाही,तो क्रोधाने व संतापाने भडकुन वाटेल तसा अद्वातद्वा व वाटेल तसे दुषने कृष्णाला लावु लागला.सर्व राज्यसभा सुन्न झाली.श्रीकृष्ण अगदी स्तब्द,शांत बसला होता.त्याला भीष्म म्हणाले,जो क्षत्रिय,शत्रुला जिंकुन सोडुन देतो,असा या सभेत एकही राजा दिसत नाही. श्रीकृष्ण अजिंक्य आहे.हा अच्युत आम्हालाच नाही तर तिन्ही लोकात पुज्यत्तम आहे.हा श्रीकृष्ण वयोवृध्द नसला तरी, ज्ञानवृध्द,बलवृध्द आणि धनवृध्द आहे. सर्व द्विजात श्रेष्ठतम,वेदवेदांगाविद व सत्वबलसंपन्न,सर्वांचा आचार्य,गुरु आहे.
भीष्मांचे भाषण ऐकुन शिशुपाल चवताळु न भीष्मांनांही फारच अपमानकारक बोलु लागल्यावर मात्र भीष्मांना राग अनावर होऊन म्हणाले,या माधवाला अग्रपुजेचा दिलेला मान ज्यांना मान्य नसेल त्यांनी अच्च्युताशी युध्दास उभे राहुन,बल,क्षात्र तेज सिध्द करावे.शिशुपाल ताडकण ऊठुन क्रोधाने शस्र उगारुन द्वंदयुध्दास तयार होऊन पुढे आला,तोच त्याच्या आईला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याचे १०० अपराध पुर्ण झाल्याने श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र फेकुन क्षणार्धात शिशुपालची गर्दन मारली, हे अद्भुत कृती पाहुन सर्व राज सभा स्तिमित झाली.राजसूय यज्ञात अचानक आलेले विघ्न श्रीकृष्णाने मोठया धाडसाने,पराक्रमाणे यज्ञाचा शेवट सिध्दीस नेला.अवभृत स्नान झाल्यावर युधिष्ठीराला सार्वभौम साम्राज्य पदाचा अभिषेच होऊन राजसूययज्ञ पुर्ण झाला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३९.
राजसूययज्ञ सिध्दीस गेला खरा, पण भावी कलहाचे बीज पेरल्या गेले. कारण अनेक राजेलोक मनांतुन कृष्ण व पांडवांवर जळफळतच परतले,त्यातही दोन राजांच्या अंतःकरणांत द्वेषाग्नी,मत्सराग्नी भडकला तो अनिवार होता.कृष्णाच्या कट्टर शत्रुंपैकी अजुन शाल्व व रुख्मी शिल्लक होते.रुख्मी श्रीकृष्णाचा मेहुणा, रुख्मिणीचा भाऊ असल्यामुळे उभय पक्षी शांती होती.पण शाल्वाच्या बाबतीत तसे नव्हते.त्याच्या देखत शिशुपालाचा वध झाल्याने त्याचा क्रोधाग्नी भडकला, पण श्रीकृष्ण,पांडव व यादवांच्या सामर्थ्यापुढे त्यावेळी तो कांहीच करुं शकला नाही. श्रीकृष्णाचा सूड हा एकच ध्यास त्याला होता.
इकडे हस्तिनापुरी दुर्योधनाचीही अशीच स्थिती झाली.पांडव नाशासाठी अगदी लहानपणापासुन अनेक प्रयत्न केले होते.युधिष्ठीर सम्राट म्हणुन सर्व राजे मांडलिक झाले होते.युधिष्ठीराचे अपरिमित अतुलनीय ऐश्वर्य,त्यात ती दिव्य ‘मयसभा’ पाहुन वैष्यम्याने मत्सरा ची आग भडकली.त्यात भर म्हणजे मय सभेत त्याची झालेली फजिती व द्रौपदी च्या डिवचत्या शब्दाने तर,अपमानाने त्याचा क्रोध पराकाष्टेला पोहोचला. त्यामुळे त्याच्या प्रकृत्तीवर झालेला परि णाम धृतराष्टाच्या लक्षात आल्यावर ते म्हणाले, पुत्रा! तुला सर्व सुख अनुकुल असुन सर्व तुझ्या आज्ञेत असतांना तुझी ही दशा कां व्हावी?
दुर्योधन तीव्र स्वरांत म्हणाला,तात पांडवांची संपत्ती,ऐश्वर्य मला खुपत आहे. दुर्योधन गप्प बसला नाही.शकुनी,कर्णा सह एकांती खलबतं सुरु होती.अखेर दुष्ट व नाशाप्रत नेणारी एक युक्ती धृतराष्र्टा च्या सम्मतीने निश्चित केली.क्षत्रिय जसे युध्दाचे आव्हान नाकारत नाही तसे द्यूताचे ही नाकारत नाही.द्युताची फारशी माहिती नसलेल्या भोळ्या युधिष्ठीराला द्युत खेळण्यास बोलावुन त्याची संपत्ती हरण करण्याचा डाव या कुटील चौकडीने रचला.वेगाने तयारीला सुरुवात झाली. मयसभेप्रमाणेच एक दिव्यसभा तातडीने बांधण्याचा हुकुम धृतराष्र्टाने पारित केला सर्व तयारी झाल्यावर धृतराष्र्टाने मानभावी प्रेमाणे इंद्रप्रस्थाला दूत पाठवुन सभा पाहण्यास चार दिवस एकत्रित आनंदात घालवण्यासाठी सुनांसह सर्वांना येण्याचा अगत्याचा निरोप विदुरहस्ते पाठवला.याचा भावी परिणाम वाईट होईल हे माहित असुनही क्षत्रियाच्या ब्रीदाला जागुन धर्मराज आपले चार बंधु, द्रौपदी,माता कुंतीसह हस्तिनापुरी आले.
हस्तिनापुरी सर्वांचे मोठ्या प्रेमाणे स्वागत झाले.चार दिवस मेजवानी,सहलीत गेले आणि संधी साधुन शकुनीने द्युत खेळण्यास सरळ वृत्तीच्या धर्मराजाला राजी केले.खेळाला सुरुवात झाली.युधिष्ठीर डावावर डाव हरु लागला.सगळी संपत्ती अश्व,गज शेवटी राज्य हरला. स्वतःला,भावांना डावाला लावुन तेही हरला.द्रौपदी पणाला लावुन तीही हरला. उन्मत्त दुर्योधनाने प्रतिकामी दूताला अंतः पुरातुन दासी झालेल्या द्रौपदीला सभेत आणायला सांगीतले.तो परत येऊन म्हणाला,द्रौपदीने विचारले की,प्रथम धर्मराज स्वतः हरल्यावर, मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना आहे का? इरेला पेटलेल्या अधर्मी दुर्योधनाने तिला आणण्यास दुःशासनाला पाठविले.मी रजस्वला,एकवस्रा आहे असे परोपरीने सांगीतले पण त्याने ऐकले नाही.तीचे विपुल लांबलचक केस पकडुन ओढत ओढत भरसभेत आणले.तिची अनन्वित दुर्दशा पाहुन सभेतील सर्व लोकांनी शरमे ने मान खाली घातली.अग्निज्वालेतुन निर्माण झालेली प्रखर द्रुपद कन्या सभेत सभोवार नजर फिरवुन धृतराष्र्ट,भीष्म, द्रोणाचार्यांना स्वरक्षणार्द प्रत्येकाला विनवु लागली,पण मुकपणे मान घालुन सर्वजण बसुन राहिलेत.दुःशासनाने तिच्या निरिला हात घातला.
सर्वीकडुन निराश द्रौपदीने आर्तपणे, भाऊ,सखा,पाठीराखा प्रभु श्रीकृष्णाचा धावा करीत श्रीकृष्णचरणी लीन झाली. आणि कृपाळु,भक्तांचा कैवारी तिच्या हाकेला धावुन येऊन तिचे लज्जारक्षण केले.दुःशासन तिचे वस्र ओढुन थकुन गेला.वस्रांचा मोठा ढीग पडला.सारी सभा स्तंभित,विस्मयचकित झाली.धन्य!धन्य! त्या महासती द्रोपदी असे प्रशंसोद्गार,अंध धृतराष्र्टाला दिसत नसले तरी ऐकु येत होते.विदुराने वस्तुस्थिती सांगीतल्यावर, लोकलाजेस्तव तिला हवा तो वर मागायला सांगीतले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !! भाग – ४०.
धृतराष्र्टाने द्रौपदीस वर मागण्यास सांगीतल्यावर,आपले पती दास्यातुन मुक्त व्हावे! त्यांनी आणखी वर मागण्यास सांगीतल्यावर,माझ्या पतीचे राज्य परत मिळावे!असे म्हनुन धृतराष्र्टां ना वंदन करुन आंत निघुन गेली. सभा बरखास्त झाल्यावर युधिष्ठीर आपल्या परिवारासह इंद्रप्रस्थाकडे रवाना झाला.
पण दुर्योधनादी चांडाळ चौकडीने एवढा रचलेला डाव,हाती आलेले पृथ्वीचे साम्राज्य पित्याने ऊधळुन लावल्याने दुर्योधनाचा संताप संताप झाला.पण शकुनीने झटपट नवा डाव रचुन दुर्योधना ला, तात्काळ धृतराष्र्टाकडे पाठविले.तात सापाच्या शेपटीवर पाय देऊन तसाच सोडला तर दंश,सूड घेतल्याशिवाय राहणार नाही.तात! ते निश्चित सूड उगवुन आमचा सर्वनाश करतील.हे जर टाळाय चे असेल तर! आताच्या आता युधिष्ठीरा ला परत बोलवा.आम्ही फक्त एकच पण लावतो.जो हरेल त्याने १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात जावे.लाडका पुत्र काकुळतीला आलेला पाहुन,अंध धृतराष्र्टाने पांडवांना परत बोलावले.
धर्मराज पुन्हा परतला,नाही..त्याला परतावेच लागले.कारण युध्द आणि द्युता ला क्षत्रिय नकार देऊच शकत नाही.परत द्युताचा पट मांडल्या गेला.आणि युधिष्ठीर “पण” हरला.ठरल्याप्रमाणे युधिष्ठीर चारही बंधु व द्रौपदीसह वल्कले नेसुन वनवा साला निघाले.कुंती निरुपायाने विदुराघरी राहिली.हे सर्व वृत्त दूताकडुन श्रीकृष्णाला कळल्यावर पांडवांची व सखी,लाडक्या बहिणीची दुर्दशा ऐकुन त्याला खुप दुःख झाले.पण या अवतार कार्यात पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी ज्या गोष्टी घडवुन आणायच्या आहेत. त्यामुळे तो शांत झाला.
काम्यवनात वास्तव्यास असलेल्या पांडवांना भेटण्यासाठी जाण्याचा निश्चय कृष्णाने केला.पांडवांची काम्य वनातील दिनचर्या सुरुळीत सुरु होती. वनवासाला सुरुवात झाल्यामुळे युधिष्ठीर अत्यंत दुःखी व अंतर्मुख झाला होता.माझे भ्राते शूर व अजिंक्य असुनही,याज्ञसेनेची विटंबना अगतिक होऊन केवळ माझ्यासाठी पाहत बसले.धिक्कार असो माझा….तो स्वतःच्याच दुःखात चुर असतांनाच,कृष्ण येत असल्याची वार्ता अर्जुनाने सांगीत ल्यावर,त्याच्या मनाची उद्गिनता व दुःख विसरुन,सर्व बंधु,ऋषीमुनींसह कृष्ण स्वागतासाठी सामोरे गेले.सोबत इतरही देशाचे राजे होते.ते कौरवांच्या नीच कृत्या ने क्रुध्द झाले होते.याज्ञसेनेची भरसभेत झालेल्या विटंबनाचे वृत्त कळल्यापासुन श्रीकृष्ण विलक्षण संतापला होता.पण अर्जुनाने अपल्या मृदु बोलाने शांत केले.
भोजन आटोपल्यावर सर्वजण ऋषीमुनीं सभोवताल बसल्यावर, कृष्ण यीधिष्ठीराला म्हणाला,राजसूययज्ञात माझी अग्रपुजा केल्यामुळे शिशुपालाला सहन न झाल्याने तो उन्मत्त बनल्यामुळे त्याचा वध करावा लागला.त्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी क्रोधीत शाल्व मी द्वारकेत नाही ही संधी घेऊन,द्वारकेवर स्वारी करुन द्वारकेचे अतोनात नुकसान तर केलेच शिवाय हाती लागेल ती संपत्तीही पळविली.राजसूययज्ञ आटोपुन जेव्हा द्वारकेला गेलो तेव्हा शाल्वाचे कृत्य कळ ल्यावर त्याचे परीपात्य करुन द्वारकेस परतलो तेव्हा द्युताची अनर्थकारी वार्ता कळली.युधिष्ठरा!कौरवांचे दिवस आता भरत आलेत,जो अधर्माने वागतो,त्याचा नाश निश्चित आहे.
धर्मा पांडवांचा अपमान तो प्रत्यक्ष माझा अपमान! कृष्ण एकदम क्रुध्द झालेला पाहुन,नित्य प्रसन्नमुखी,संयमी अर्जुन त्याला शांत करीत म्हणाला, माधवा!पुर्वी तूं मनोवृत्ती,आचरणाने गध मादन पर्वतावर बरीच वर्षे फिरलास,फक्त जलप्राशन करुन बराच काळ राहिलास, मधुसुदना!बद्रीकाश्रमात केवळ वायु भक्षण करीत एका पायावर उभा होतास! भगवंता! लोकांची प्रवृत्ती धर्माकडे वळावी म्हणुन स्वतः नियमनिष्ठ होऊन प्रभास तिर्थावर जाऊन घोर तपश्चर्या केलीस!श्रीकृष्णा तूं अंतरात्मा असुन सर्व प्राण्यांचे आदिकरण आणि लय पावण्याचे स्थान आहेस.यदूनंदना!तू आदितीचा पुत्र होऊन विष्णु नांवाने प्रसिध्द झालास. श्रीकृष्णा!तुझ्या ठीकाणी क्रोध,मत्सर, असत्यपणा अगर क्रोर्य असुच शकत नाही.अर्जुनाचे बोलणे ऐकुन श्रीकृष्णाचा क्रुध्द चेहरा सौम्य झाला.कांहीशा गंभीर स्वरात म्हणाला,अरे पार्था! माझाच तू व तुझाच मी! दोघेही एकरुप आहोत.हे अजिंक्य अर्जुना! तू नर असुन मी श्रीहरी स्वरुप नारायण आहे.आपणा उभयंतातील अंतर कोणालाही कधीच कळणार नाही.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.


