पेशवाई संपुर्ण भाग ७, (३१ ते ३५)

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या  स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! पेशवाई  !!!                 

भाग—३१

       माधवराव या स्वार्थी काकाकडे बघतच राहिले.माधवराव!वेळ आमच्या मुठीत आहे.

मुठीतला सुरुंग उडवण्यापुर्वी  पेशव्याचे विभाजन करुन सार्या समस्यांचे निराकरण करा.नाही काका, नाही!पेशवाईचे विभाजन मुळीच होणार नाही.पोटतिडकेने माधवराव म्हणाले, काका,ही पेशवाई तुमची,आमची,लढणा र्या प्रत्येक सैनिकाची आहे.दुधारी तलवार चालवून पेशवाईचे तुकडे करायला कां निघालात?असं नका हो करु काका!असचं होणार श्रीमंत,असचं होणार!असं म्हणून राघोबा निघून गेले.

         राघोबादादा हट्टास पेटून निजामाचे पाय धुवायला सुरुवात केली.उदगीरच्या तहात जो प्रांत सदाशिवराव भाऊंनी आणि विश्वासरावांनी जिंकला होता तो  राघोबांनी अगदी सहज देऊन टाकला. धुर्तपणे निजामाने दौलताबादचा किल्लाही राघोबांकडून परत घेतला. सातारच्या छत्रपतींचे सेनापतीपद रामचंद्र जाधवला मिळवून दिले.जानोजी भोसलेची छत्रपती होण्याची मनिषा मात्र पूर्ण करतां आली नाही.बाबूराव आणि त्रिंबक पेठेंना काढून सखाराम बापूंची नेमणूक केली शिवाय जहागगिरी आणि सिंहगडचा किल्ला देण्यात आला व आबा पुरंदरेंना किल्ल्यावर नेमले.आतां राघोबादादांची नजर मिरजकडे वळली.

           सखाराम बापूंनी राघोबांना सल्ला दिला,मिरजेला जातांना सातारला छत्रपतींची गाठ घेऊन पेशवाईची वस्रे मागा!छत्रपतींची भेट झाल्यावर अनास्थेने त्यांना पेशवाईची वस्रे दिली.मागे

कर्नाटकच्या स्वारीवर जातांना माधवरावांनी,गोपाळराव पटवर्धनांना तिजोरीत पैसे नसल्यामुळे,

मिरजेच्या किल्ल्याचा बंदोबस्त स्वखर्चाने करायला सांगीतला होता.त्याप्रमाणे त्यांनी केलेही. दादासाहेबांनी जेव्हा मिरजेच्या किल्ल्याचा ताबा मागितल्यावर पटवर्धनांनी केलेला खर्च मागीतल्यावर दादासाहेबांचा अतिशय संताप झाला. आणि मिरजेवर स्वारी केली,पण ते पोहचण्याआधीच गोपाळरावांनी निजामशाही गाठली.

          माधवराव संध्यापुजा आटोपुन नुकतेच दिवाणखाण्यात येऊन बसले, तोच नाना फडणीस आले.मुजरा केल्या वर म्हणाले,श्रीमंत!मुलखातलं पाणी पेटणार व तुम्ही परत गादीवर येणारसे दिसते.रघुनाथदादांनी पेशवाईचं वर्चस्व प्राप्त केल्यापासून,त्यांच्या छळाला कंटाळून,

त्यांच्या विरुध्द सगळीकडे असंतोष पसरला.चांगली चांगली माणसे निजमाच्या फडात दाखल झाली.अगदी जानोजी भोसले व गोपाळराव पटवर्धन सुध्दा!मध्यंतरी रामचंद्र जाधवांनी राघोबा दादाच्या खुनाचा प्रयत्न देखील केला होता परंतु डाव फसला नी कैद मात्र कपाळी आली.राघोबांचे सारे शत्रू निजामाच्या छावणीत जमा झाले.मराठी मुलखावर कधी धाड घालतील सांगता येत नाही.नाना,ही गोष्ट तर स्वराज्या साठी घातकच आहे ना?घरचा वाद केव्हाही मिटवता येईल,परंतु साम्राज्याची घडी विस्कटली की,सहजासहजी नीट करतां येत नाही नाना!नाना फडणीसांना त्यांची स्वराज्याची कळकळ व प्रेम बघून मनोमन कौतुक वाटले.

        भीमेच्या पूर्वेपलिकडचा सर्व भाग स्वाधीन करण्याबद्दलचा निजामचा खलिता राघोबादादांना आला.ते खिन्न स्वरात समोर बसलेल्या सखाराम बापूंना म्हणाले,बापू! हे भयानक वादळ कसं थोपवावं सुचत नाही.क्षणभर विचार करुन म्हणाले,दादासाहेब!आहे एक उपाय.आपण माधवरावांची समजूत घालुन,चुक झाली हे कबुल करुन, आपल्याला पश्चाताप झाला असे सांगुन त्यांना आपल्या बाजूने उभे करा.

        राघोबांनी माधवरावांची समजुत घातल्यावर त्यांनीही जास्त ताणून न घेता स्वराज्याचे हित लक्षात घेता,स्वराज्याच्य अस्तित्वासाठी,अस्मितेसाठी ते तयार झाले.नजरकैद संपली.सर्वांशी मसलत करुन युध्दाचा प्रस्ताव सर्वांनुमते मंजूर झाला.

         श्रीमंत माधवरावांनी पेशवाईची महावस्रे परिधान केली आणि कितीतरी दिवसांनी त्यांनी शनिवारवाड्याबाहेर  पाऊल टाकलं.समोर उभ्या असलेल्या अथांग सैनिकांनी त्यांना मानाचा मुजरा घातला.हातातील भगवे झेंडे फडकवत होते.प्रत्येकाच्या चेहर्यावर चैतन्य दाटले होते.राघोबांना स्वतःची प्रतिष्ठा,वयाने लहान असलेल्या माधवरावांसमोर खुजी वाटली.मनांत आणि दुःख अशा संमिश्र भावनेने डोळे भरुन वाहु लागले.पश्चाताप दग्ध राघोबांनी भारावलेल्या अवस्थेत माधवरावांची गळाभेट घेत म्हणाले, श्रीमंत!माफ करा.फार मोठी चूक झाली. मोठ्या मनाचे माधवराव म्हणाल,काका! माफी कशास्तव?आपण वडीलस्थानी! पेशवाईच्या रथाचे वेसन आपल्याच हाती आहे.आमचं कांही चुकलं तर!कान धरण्याचा आपला अधिकार!

       पेशवाईवरच गंडांतर आल्याने मराठा खडबडुन जागा झाला. आपापसातले मतभेद विसरुन प्रत्येक जण स्वराज्याच्या भगव्या झेंड्याखाली दाखल झाले.

               क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

*!!!पेशवाई!!!

भाग—३२

         ६ मार्च १७६३,मराठ्यांनी औरंगाबादवर हल्ला चढवुन दोन लाख खंडणी वसूल केली.

मात्र सुडाने पेटलेल्या जानोजी भोसलेनं निजामाच्या सहाय्याने मराठी मुलखावर झडप घातली.

अगदी पंढरपूर देखील पायदळी तुडवलं.लोकां ची घरंदारं जळून खाक झाली.मुलंबाळं, माणसं घोड्याच्या टापांखाली चिरडल्या गेली.स्रीयांच्या अब्रुचे धिंडवडे निघाले. संस्कृती नग्न होऊन हंबरडा फोडत होती उभी पिकं जळून खाक झाली होती.

            मराठी मुलूख आणि पुणे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे मराठ्यांच्या व पेशव्यांच्या अस्मितेला जबरदस्त धक्का बसला होता.ज्या मराठ्यांच्या नसांनसांतुन स्वराज्याचा दरवळ ठासून भरला होता,रायरेश्वराच्या मंदिरांत बाल शिवबांनी मावळ्यांसोबत जशा शपथा वाहिल्या होत्या अगदी तशाच शपथा याहीवेळी देवासमोर बेल भंडार हाती घेऊन पुन्हा वाहल्या…

           माधवरावांच्या अधिपत्याखाली गुप्त कारवायान्वये निजामाकडे रुसुन गेलेली माणसं परत मिळवली.गोपाळराव पटवर्धन,जानोजी भोसले सुध्दा आणि इतर सरदारही पेशव्यांना येऊन मिळाली  आणि भर मुसळधार पावसांत श्रीमंतां च्या फौजा मोहिमेवर निघाल्या.गोदावरी ला नेमका महापूर होता.निजाम गोदावरी पलिकडे जाऊ नये म्हणुन माधवराव व दादासाहेबांच्या फौजा वेगाने दौडत होत्या.राक्षसभुवभ येथे मराठी फौजेने निजामावर अचानक धाड टाकुन त्याला पळतां भुई थोडी केली.त्याच्याकडे चांगले सरदार नसल्यामुळे निजामाचा सहज पराभव झाला.

राक्षसभुवनाची लढाई माधवरावानी जिंकली आणि पुन्हा एकदा सिध्द केले,हिंदवी स्वराज्य अजुन जिवंत आहेss !

           परत पेशवाईचा महाडंका,तुतार्या आसमंतात फुरफुरु  लागल्या.निजामशी तह करुन उदगीरच्या लढाईतला ८२ लाखांचा मुलूख मराठ्यां ना परत मिळाला.श्रीमंत पेशवे विजयश्री ची माळ घालुन पुण्यात दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतार्थ ५ तोफांची सलामी देण्यांत आली.

          १८ सप्टेंबर १७६३ या शुभ मुहूर्ता वर पुण्याची पुर्नरचना व नव्या पेठा बसवल्या.

माधवरावांना रत्नांची चांगली पारख होती.महादजी शिंदे १७२० साली जन्मलेले स्वराज्यातील शिरपेचातला सुंदर चलगीतुरा!मुत्सद्दी खानदानी मराठा,सारी निष्ठा पेशवाईला वाहिलेली, राणोजी शिंदेचा कुलदिपक,मातोश्री चिमाबाई राजपूत स्री होती.राणोजी शिंदे नंतर महादजी शिंदेंनी सुरुवातीला पेशव्यांच्या पागेत चाकरी केली होती. पण त्यांना लढाईची आवड असल्यामुळे ते स्वार्यांवर जाऊ लागले.युध्द कलेचे व शूर योध्याचे गुण संपादन करुन प्रथमच तळेगांव उंबरीच्या लढाईत शौर्याची केलेली पराकाष्ठा संपादन करुन पेशव्यां च्या नजरेत भरले होते.निजामास मिळालेल्या जानोजी भोसलेचे मनपरिवर्तन करुन मराठी फौजेत परत आणले होते.त्यामुळेच ते माधवरावांचे उजवे बाहु बनले होते.

         सदाशिव भाऊंच्या तालिमीत तयार झालेले गणेश कानडेवर माधवरावांचा प्रचंड विश्वास होता.

         कोकणांतील राजापूर प्रांतातील तोरवण गांवचा शूर योध्दा,विसाजी कृष्ण बिनीवाले,

वडिलांच्या सावकारी व्यवसायात त्यांचे मन कधीच रमले नव्हते,म्हणून स्वराज्य फौजेत दाखल झाले होते. १७५७ साली बळवंत मेहेंदळें च्या हाताखाली काम करुन विसाजींनी पराक्रम गाजवला असल्यामुळे,रत्न पारखी माधवरावांनी विसाजीला आपल्या जवळ ठेवून घेतले होते.

       श्रीमंत माधवरावांची चिकाटी,धैर्य, शिस्त,जरब आणि इतर गुण कसोटीला उतरत असतांनाच,राघोबादादांच्या काळजांत राज्यतृष्णेचा ज्वराने पुन्हा डोके वर काढले.सखाराम बापूंना म्हणाले,बापू,एकदा आमचा डाव फसला परत नाही फसायचा.आम्ही शून्यातून स्वराज्य निर्माण करु!बापू,यासाठी आम्ही पेशवाईची एक एक वीट तोडू. बापू,बघत रहा आतां हा राघो भरारी काय काय करतो…

         श्रीमंत माधवराव पेशवे कुठेही असले तरी त्यांची संध्यापुजा कधीच चुकायची नाही.

आज कितीतरी दिवसांनी माधवराव मुळामुठेच्या झुळझुळ वाहणार्या पाण्यांत स्नानसंधेसाठी नदी वर आले होते.नदीकाठी उभे असलेले हरिपंत फडके,महादजी शिंदे,विसाजी कृष्ण बिनिवाले आणि रामचंद्र कानडे श्रीमंत माधवरावांकडे कौतुकाने पाहत होते.अर्ध्य देऊन झाल्यावर पेशवे बाहेर येऊन वस्रे परिधान केले.

             क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!पेशवाई!!!

भाग—३३

         मंडळी! निजामाची कांही खबर? श्रीमंत!निजामाने आपली चांगलीच धास्ती घेतलीय!

आतां तो पेशवाईशी संबंध प्रस्थापित करण्याच्या विचारांत आहे.श्रीमंत म्हणाले, हा विजय केवळ आपल्या लोकांमुळे प्राप्त झाला.खरे  रणांगणात लढणारे आपण आहात, आम्ही निमित्यमात्र आहोत.आता फक्त एकच इच्छा अपुरी राहिली.पानिपतच्या युध्दाचा डाग अजून आमच्या काळजात रुतलेला आहे.तो धुवून निघायला हवा! आपलं वर्चस्व दिल्लीच्या तख्ताला मान्य झाल्याशिवाय पानिपतच्या डाग धुवून निघणार नाही.

           रामचंद्र कानडे आणि विसाजी बिनीवालेवर उत्तरेला फौज नेण्याची जबाबदारी सोपवुन श्रीमंत पेशवे म्हणाले स्वराज्याचं वर्चस्व दिल्लीच्या गादीवर प्रस्थापित करुन विजयी होऊन परत या.

          हरिपंत फडकेंना माधवराव म्हणाले, सध्या त्रिंबकमामा पेठे आणि गोपाळराव पटवर्धन दक्षिणेचा प्रदेश सांभाळताहेत,आतां चिंता फक्त एकच आहे.घरची!घरभेदी राघोबाकाका केव्हा उठाव करतील याचा नेम नाही.त्यांच्या कडे जातीने लक्ष ठेवा!आम्ही त्यांची सतत बाजु उचलुन धरतो ते केवळ स्वराज्यहितासाठी!पेशवाईचे तुकडे झाले तर स्वराज्याला कुणी वाली राहणार नाही.पंत! कांही जखमा सौभाग्यालंकारा सारख्या शरीरावर जपाव्या लागतात हीच फार मोठी आमची शोकांतिका आहे

          श्रीमंत माधवरावांनी एकुन पांच स्वार्या केल्यात.पहिली स्वारी जून १७६१ ते जानेवारी १७६२ यात त्यांनी धारवाड ते तुंगभद्रिपर्यंतचा टापू घेऊन खंडण्या वसूल केल्यात.दुसरी स्वारी १७६४ ते १७६५ यात हुबळी,गदग, कुंदटगोळ,नवलगुंद,बेलहळ्ळी,मुळगुंद आणि जालिटाळ या ठाण्यांसह तुंगभद्रा पर्यंतचा प्रदेश काबिज केला.सोबतच धारवाड,सावनूर,रेट्टहळ्ळी,हवेरी आणि अनवाडी येथे लढाया करुन स्वराज्याची शान वाढवुन ३२ लक्ष खंडणी मिळवली.

तिसरी स्वारी १७६६ ते १७६७ मधे तुंगभद्रेचा दक्षिण तीर सोबतच शिंदे, होसकोटे,बालापूर आणि इतर छोटी मोठी गांवे काबिज करुन ३० लक्ष रुपयां ची खंडणी स्वराज्यात आणली होती.

          श्रीमंत पेशवे माधवरावांकडे इतर  गुणांबरोबर कल्पकता सुध्दा होती. त्या अनुषंगाने दरबारात चर्चा करीत असतां दूरदृष्टी समोर ठेवून सदस्यांना म्हणाले, येणारा काळ फार वाईट दिसतोय!इंग्रज पोर्तुगीज,यवनी सत्ता हळुहळु आपली पाळेमुळे स्वराज्यात रोवण्याच्या तयारीत असल्याने आपण सतर्क असायला हवय.

आपण दारुगोळा,तोफा आणि शस्रास्रा साठी आपल्याला दुसर्यावर अवलंबुन राहावे लागते.आपणच आपल्या मालकी चे दारुगोळा,तोफा आणि शस्रांचे कारखाने काढावे असा मानस आहे.

          लगेच शस्रास्रांच्या कारखान्याची योजना कार्यान्वित झाली.पुणे,नाशिक, ओतूर आणि बागलकोट येथे शस्रास्रे निर्मितीचे कारखाने उभे राहिले.परंतु नीट माहिती नसल्यामुळे ही योजना धुळीस मिळाली.

          राघोबांची राज्य धारण करण्याची तृष्णा खूपच वाढल्यामुळे श्रीमंत पेशव्यां ना कठोर पावले उचलणे भाग पडले. अखेर जून १७६६ मधे घोडपेला झालेल्या लढाईत विजय मिळाला.दादा साहेबांना कैद करण्यांत आले.एक ढाण्या वाघ शनिवारवाड्यात कैद झाले.

           तशातच जानोजी भोललेने पुन्हा उचल खाल्ली.मार्च १७६९ साली झालेल्या लढाईत माधवरांचा विजय झाला. २३ मार्च १७६९ रोजी किनकेश्वर चा तह करुन जानोजी भोसलेचा पार नक्षा उतरवला.तो कायम पेशव्यांसमोर नतमस्तक झाला.

            २७ ऑगस्ट १७६९ च्या तिसर्या प्रहरी माधवराव पर्वतीवर दर्शनाला गेले असतां अचानक त्यांच्यावर सशस्र खूनी हल्ला झाला,पण नशीब बलवत्तर म्हणून सैनिकांच्या सतर्कतेने त्यांचा जीव वाचला.

         चौथी स्वारी परत कर्नाटकावर नोव्हेंबर १७६९ ते जून १७७० मधे केली.

या स्वारीत तुंगभद्रेच्या पलिकडचा प्रांत काबिज करुन भैरवगड आणि निजगड प्राप्त केले.या लढाईत गोपाळराव पटवर्धन आणि मुरारराव घोरपडेंनी पराक्रमांची शर्थ केली होती.

        पांचव्या स्वारीवर जायच्या आदल्या दिवशी एकांतात रमाबाईंनी आपल्याला मुल नसल्याची खंत बोलुन दाखवली.कदाचित मस्तानीचा शाप तर भोवत नसेल ना? रमा स्वराज्याची पुजा बांधण्याच्या नादात आमचे गृहलक्ष्मीकडे दुर्लक्ष झाले.माफ कर रमा!माफ कर! कर्नाटकच्या स्वारीवरुन परत आल्यावर दत्तक घेण्याचा विचार करु.शांत हो रमा! शांत हो!

                 क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!पेशवाई!!!

भाग—३४

      कर्नाटकच्या  पांचव्या मोहिमेवर माधवराव निघाले असतां संपूर्ण वाटेत अस्वस्थ होते.

रात्रीचे रमाचे केविलवाणे रडणे आठवत होते.आपण पत्नीला सुख देऊ शकत नाही याची खंत त्यांच्या मनाला लागुन राहिली.अचानकच हे वादळ कां उठावं?जीवणाचं की मृत्युचं?

           जून १७७१ मधे पेशव्यांच्या फौजा दक्षिणेत शिरल्या.यावेळी निजामानेही मदत केली.हैदरबरोबरच्या लढाईत हैदराच्या पराभव झाल्यावर तहा अंतर्गत ३६ लक्ष रुपये,सालाकाठी १४ लक्ष खंडणी कबूल केली.याच संधीचा फायदा घेऊन शाहू महाराजांच्या वेळेचा सर्व मुलूख स्वराज्यात खेचून आणला.या  विजयोत्साहाचा आनंदाला ग्रहण लागले.

         श्रीमंत माधवरावांची तब्बेत अचानक बिघडली.फणफणून ताप चढला.प्रसिध्द गंगा विष्णू आणि रुपेश्वर बुवांनी तपासल्यावर राजयक्ष्माचे(क्षय) निदान झाले.हरिपंतांना म्हणाले,अशा अवस्थेत मोहिमेवर जाणं ठीक नाही. त्यांना आरामाची सक्त आवश्यकता आहे पेशवे पुण्यास परतले,बाकीचे पुढे गेले.

         शनिवारवाड्यातील वातावरण गंभीर झाले.वैद्य उपचारांची पराकाष्ठा करीत होते.

पोर्तुगीज डॉक्टर लिमाक्षु द माद्री द देऊस,गोव्याचे डॉक्टर  दो मान्युमल फ्रान्सिस्क गोन्साल्सिस यांचेही औषधोपचार झाले,पण कशानेच फरक पडत नव्हता.हवापालटसाठी त्यांना कटोरेला आणले.

सुवर्णतुला केली.हरि पंत सावलीसारखे त्यांच्यासोबत राहुन सुषुश्रा करीत होते.रमाबाईचे तर अश्रू थांबता थांबत नव्हते.एका पहाटे त्यांना देवांचा देव ब्रम्हांडपती अधिनायक गजाननाचे दर्शन झाले.

विश्वसूर्याचा साक्षात्कार झाल्याने मनाशीच म्हणाले, आमचा देह ब्रम्हरुप झाला.हा देह ब्रम्हाडांच्या हाती सोपवण्याची खूणगाठ मिळाली.मन शांत,तृप्त झालं.शेवट गजाननाच्या दारी व्हावा यासाठी थेऊरला जाण्याचे ठरविले.

        श्रीमंत पेशव्यांना पालखीतून थेऊर ला आणण्यांत आले.गाभार्यातील चिंतामणीच्या मूर्तीला मनोभावे हात जोडून म्हणाले,गजानना आयुष्याची शिदोरी तुझ्याच चरणी सुटु दे!खूप कष्टावलं या देहाला.येवढ्यात बाहेर लटकवलेल्या मोठ्या घंटेकडे लक्ष गेले. पुर्वज चिमाजीअप्पांनी वसईला पोर्तगीज विजयात ही मिळालेली घंटा या चिंतामणी मंदिरांत बांधली.अशाच घंटा पाली आणि मोरगांवलाही बांधल्यात.

       हरिपंत!पुण्यास जाऊन,  कर्नाटकात कांही महत्वाचे निर्णय घ्यायचे असल्याने सर्वांना आठ दिवसांत इथे येण्याबद्दल पत्रे रवाना करायला नाना फडणीसांना सांगा.श्रीमंतांना क्षयाचा अंतर्दाह सहन होईना.खोकल्याची मोठी उबळ आली की त्यांचा जीव कासावीस होत.रमाबाईंनी पाठ चोळली की,थोडं बर वाटायचं.कसला विचार करताहात? आमच्या मातोश्रीचा!त्या रुसल्यात ना?

त्यांची राजकारणातील ढवळाढवळ सहन झाली नाही,त्यांच्या मनाप्रमाणे न ऐकल्याने त्या गंगापूरी निघून गेल्या. त्यांच्यासाठी १८,००० खर्च करुन गंगापूरला मोठा वाडा बांधून दिला.खर्चा साठी बेलगाम आणि गंगापूर ही दोन गांवे तोडून दिले.सालाना १९०० रुपये वसूल त्यांना मिळतो.परंतु आज? या स्थितीत त्यांनी आमच्या जवळ नसावं? त्यांच्या मायेची,ममतेची उब हवी आहे रमा!कां येऊ नये?माता एवढी निष्ठूर होऊ शकते?

         रमा!तुम्ही एकट्या सोडल्या तर, सगळ्या रक्ताच्या माणसांनी घातच केला वाळीतच टाकले.राघोबाकाकांनी तर जन्माचा उभं वैरच मांडलं.रमा आम्ही कोणाचं काय बिघडवलं होतं?रमा आमच्या नंतर तुमचं कसं होईल?या स्वार्थी लोकांत कशा जगाल?स्वामी शांत व्हा! आज मात्र श्रीमंतांना थांबवत नव्हते त्यांना पैलतीरीची शीळ ऐकू येऊं लागली रमा,मृत्यु म्हणजे मुक्तीचा महामंत्र जाणणारा चैतन्याचा अलौकिक वेद आहे रमा,कांही दिवसांतच हे शरीर आम्हाला.. रमाबाईंनी श्रीमंताच्या ओठावर हात ठेवला.स्वामी नका ना हो असं बोलु… रमाबाईंना रडू कोसळलं.त्या श्रीमंतांच्या कुशीत शिरुन ढसाढसा रडू लागल्या.मग मात्र श्रीमंतांना अश्रू आवरणे कठीण झाले.रमा, तुम्ही नका मागे राहू,ही माणसं तुम्हाला कावळ्यासारखं टोचून टोचून मारतील.आमच्याबरोबर सहगमन करा.ते एकदाच सती जाणं होईल.मागे राहिलात तर रोज सती जावं लागेल.

         रमाबाईंना आयुष्याचा सार गवसला.आयुष्याचं ओझं हलकं झालं. पदराने डोळे टिपले.श्रीमंतांचा हात हाती घेत म्हणाल्या,आपली इच्छा इश्वरेच्छा मानुन आपल्यासोबतच सती जाऊ! त्यांना आवेगाने मिठीत घेत श्रीमंत म्हणाले,रमा, भैरवीच्या आधीच आम्ही आपल्या मैफलीतून उठून जावे लागत आहे.माफ करा …रमा..आम्हाला माफ करा…तेवढ्यात हरिपंत व नाना फडणीस आलेत.श्रीमंतांनी १०८ सुलक्षणी गायी आणि ५० हजार रुपये कांची कामाक्षीस दान करण्याचा संकल्प नानाजवळ व्यक्त केल्यावर म्हणाले, श्रीमंत आपल्या मनाप्रमाणे होईल.

              क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!पेशवाई!!!

भाग—३५

          नाना फडणीसांनी विचारले, श्रीमंत!गादीवर कुणाला बसवावे?आमचे धाकटे बंधु नारायणराव!नाना,ते थोडे अवखळ आहेत,पण तुम्ही आणि हरिपंतानी सांभाळून घ्यावे.आपल्या हुकमाप्रमाणे सर्वांना पत्रे गेलीत उद्या सगळे हजर होतील.

        श्रीमंतांनी १०८ गायींचे गोरगरिबां ना दान केले.रमाबाईंनीही पैसे,दागिने वाटून दिले.सांडणीस्वार बजरंगास पुण्या हुन सतीची वस्रे आणण्यास सांगीतले. त्या दिवसापासुन रमाबाईंनी जेवणखाण सोडून दिले.फक्त दुध आणि गोमुत्रावर निर्वाह सुरु झाला.

         पत्रें मिळाल्याबरोबर घोड्यांच्या हजारो टापा थेऊरच्या पंचक्रोशीत दौडत आल्या.धुळीचे लोट उसळले.थेऊरला सैनिकांच्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. सैनिकांची पालं,सरदारांचे डेरे उभे राहीले जिकडेतिकडे मराठ्यांची मंदीयाळीच दिसूं लागली.त्रिंबकमामा पेठे,गोविंद शिवराम खाजगीवाले,आनंदराव, जिवाजी पानसरे,विंचूरकर,पटवर्धन,राजे बहाद्दर,मोरोदादा,फडणीस,आणि इतर लहान मोठे मुत्सद्दी,सरदार,फौज,स्वार, शिबंदीसह चिंतामणी गजाननाच्या सभा मंडपात येऊन दाखल झाले.

        नाना फडणीसांनी शनिवारवाड्या च्या कडेकोट बंदोबस्तात राघोबादादा व आनंदीबाईस ठेवून,नारायणराव,आणि सखारामबापूंना घेऊन थेऊरात दाखल झाले.हरिपंत फडके,ओवरीतून हळूवार पावलांनी श्रीमंतास आणत आहे,तोच भालदार,चोपदारांची आरोळी उठली…

होशियारsss पृथ्वीपती श्रीमंत सरकार, विक्रमवीर,परमप्रतापी,दक्षनाधिश,श्रीमंत माधवराव पेशव्यांची स्वारी येत आहे… आस्ते कदम!आस्ते इदम निगा रखो! मेहेरबानss आस्ते कदम sss चिंतामणी च्या सभामंडपातील सर्व मंडळी आदराने उठून उभी राहिली.प्रथम गजाननास प्रणिपात करुन साधाच अंगरखा परिधान केलेले श्रीमंत साध्या सोवळ्याच्या आसनावर आरुढ झाले.

         सर्वांकडे डोळे भरुन पाहत श्रीमंत म्हणाले,मंडळी,आमची सारी कारकीर्द अकरा वर्षाची!या अल्पावधीत राज्य कारभाराची विस्कटलेली घडी नीट करण्याचा प्रयत्न केला.

आपणांसर्वांमधे एकजूटता,नवचैतन्य निर्माण केलं.आमचे बहुतेक हेतू पूर्ण झालेत,परंतु तीन गोष्टी मनांतच राहिल्या,त्या पूर्ण झाल्याशिवाय आमचा जीव सुखाने जायचा नाही.

        कोणत्या तीन गोष्टी श्रीमंत?आम्ही जरुर पुर्या करु.नाना फडणीसांचे आश्वासन ऐकून श्रीमंत समाधान पावले, म्हणाले,पानिपतावर मराठ्यांची, स्वराज्याची बहुत हानी झाली.परंतु आज पावेतो तो काळा डाग धुतल्या गेला नाही ती जबाबदारी मंडळी तुमच्यावर सोपवतो.गिलच्यांचे पारिपत्य करुन स्वराज्याचा भगवा झेंडा पुन्हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवला तरच आमच्या आत्म्याला शांती मिळेल.श्रीमंतांनी व्यक्त केलेली इच्छा सोपी नव्हती.नव्या पानिपतला जन्म देणारी होती.त्यामुळे कांही सरदारांच्या माना खाली वळलेल्या बघून,हरिपंत फडके म्हणाले,

श्रीमंत!चिंता नसावी.आम्ही हा डाग पुसण्याचा जरुर प्रयत्न करु!

         दुसरी अट!त्रिंबकमामा पेठे,आपण हैदरवर चालून जाण्याची जबाबदारी आपणांवर सोपवत आहे.जरुर श्रीमंत!

         आणि तिसरी अट!पेशवाईच्या उन्नतीसाठीच घेतलेल्या कर्जाचा डोंगर झाला आहे.आमची खते सावकाराकडे गुंतली आहे,ती सोडवल्यास आमचा जीव संतोष पावेल.नाना फडणीस म्हणाले,श्रीमंत आपण मुळीच चिंता करुं नका.कर्जाची खते उद्या सकाळपर्यंत आपल्या हातात पडतील.लगेच नानांनी रामचंद्र नाईकावर कर्जाची जबाबदारी सोपवली.नंतर श्रीमंत हरिपंताकडे बघत म्हणाले,पंत तुम्ही रात्रंदिवस एकनिष्ठेने आमच्या पाठी सावलीसारखे राहुन बहुत सेवा केली.फुल ना फुलाची पाकळी म्हणून,श्रीवर्धनच्या देशमुखीपैकी आमच्या हिश्यातला मुलूख बक्षिस देत आहे.घ्या ही पत्रे!हरिपंतांचा कंठ दाटून आला.रडू आवरेना.वेगाने उठून ओवरी कडे निघून गेले.

       नंतर श्रीमंतांनी नऊ कलमी योजना सरदारांना समजावून सांगत असतांनाच दिल्लीहुन गुप्तहेर आनंदाची बातमी घेऊन सभामंडपात दाखल झाला.श्रीमंत दिल्लीत हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकवलाss ! गिलच्यांचे पारिपत्य झाले.महादजी शिंदे विसाजी बिनिवाले आणि रामचंद्र कानडें नी पराक्रमाची शर्थ करुन बादशहाचे शिक्के कट्यार मराठ्यांच्या ताब्यात आले.एवढी आनंदाची बातमी ऐकून श्रीमंतांना अगदी हर्षवायुच झाला.नाना त्यांचा यथायोग्य सन्मान करा.

        दुसर्या दिवशी  राघोबादादा कैदेतुन निसटुन माधवरावांच्या भेटीस आले.आंनदीबाई सतरा वर्षाचे नारायणराव व त्यांची पत्नी गंगाबाईस श्रीमंताजवळ आणले.राघोबादादांनी चिंतामणीस दुर्वा वाहुन सभामंडपात मान खाली घालून गुपचूप बसले.

                क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

पेशवाई संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading