पेशवाई संपुर्ण भाग ४, (१६ ते २०)

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या  स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! पेशवाई  !!!

भाग – १६.

        दुसर्या दिवशी चिमाजीआप्पा नानासाहेबांसहित सातार्यात दाखल झाले.छत्रपती शाहू महाराजांची भेट झाल्यावर,महाराजांनी त्यांना कांही दिवस आराम करायला सांगीतले. सातार्यात पेशव्यांच्या विरोधात एक गट होता.बाबूजी नाईक बारामतीकरांचे नांव पेशवेपदासाठी पुढे आले.यातच दोन महिने गेले.शाहूराजेंनी सारासार विचार केला.नानासाहेबांचा मिरजेचा पराक्रम  बघीतला होता.नानासाहेब जरी १९ वर्षाचे असले तरी,पेशवाई चालवण्यास फक्त नानासाहेबच योग्य असल्याची खात्री असल्यामुळे २५ जुन १७४० रोजी शाहू महाराजांनी स्वहस्ते नानासाहेबांना पेशवाईची वस्रे देत म्हणाले,राज्याचा चांगला बंदोबस्त राखा.नानासाहेबांनी स्वराज्याची शपथ घेऊन महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतले.नंतर चिमाजीआप्पा व महादजी पुरंदरेंना मानाची वस्रे व वस्तु देऊन त्यांचाही सन्मान केला.

             आज शनिवारवाडा दिव्यांच्या असंख्य ज्योतींनी उजळुन निघाला.नाना साहेबांचे भव्य स्वागत झाले.रात्री चिमाजीआप्पा आणि नानांची गुप्त मसलत झाली.आप्पा म्हणाले आपल्याला भरपूर विरोधक आहेत. रघुजी भोसले,बाबुजी नाईक बारामती कर ही मंडळी सदैव आपल्या वाईटावर टपलेली.त्यामुळे फार सावधतेने राहावे लागेल, अन्यथा…होय काका. आम्ही सतत जागृत राहु!

        चिमाजीआप्पा कौतुकाने अवघ्या १९ वर्षाच्या कोवळ्या नानासाहेबांकडे पाहत होते.भव्य कपाळ,तेजस्वी चेहरा, पाणीदार डोळे एक नवीन इतिहास घडवण्याची साक्ष देत होती.क्षणांत त्यांचा चेहरा विदिर्ण होऊन मस्तानीच्या आठवणीने डोळ्यांत अश्रू उभे राहिले.. नाना या जगात स्वराज्याची उभारणी अनेकवेळा होत राहिल परंतु….

          चिमाजीआप्पांना अश्रू आवरल्या गेलेच नाही.गदगदल्या स्वरांत म्हणाले, नाना!बाजीराव-मस्तानी प्रकरण आमच्या काळजात रुतुन बसलय!जसं रथाच चाक चिखलात रुतून बसावं!हा विषाद आम्हाला जिवनभर छळत राहिल खरोखरच आपण राऊ-मस्तानीशी खुपच वाईट वागलोय.प्रायश्चित घेऊ म्हटले तरी घेतां येणार नाही.हे पाप आपल्या हातून कां घडावं?मस्तानीने काय गुन्हा केला होता?नाना!बाजीराव मस्तानी इतिहासा च्या पानावरची सुवर्णाक्षरं ठरतील.परंतु याची पुनरावृत्ती होऊ देऊ नकोस.त्या समशेर बहाद्दर कडे बघीतलं की,नाना प्रचंड वेदना होतात.मनःस्तापाच्या आगीने आमचं सर्वांग रोज करपत आहे. काका!आम्हीसुध्दा या पापाचे भागीदार आहोत,परंतु काका,समशेर पेशव्यांचं रक्त आहे.त्याला आम्ही वार्यावर नाही सोडणार.तो इथेच या शनिवारवाड्यात राहील,त्याची सर्व व्यवस्था आम्ही जातीने करु.तसच व्हायला पाहिजे.हेच आपलं कांही अंशी प्रायश्चित होईल.

            काका!आमचे पिताश्री श्रीमंत बाजीराव खूप थोर!शिवाजी महाराजां च्या स्वप्नाला साम्राज्यात रुपांतरीत करुन नव्या पिढीला त्यांनी जगण्याचा विशाल महामंत्र दिला.आज कर्नाटक,हिंदुस्थान (दिल्ली),गुजराथ,स्वदेश,खानदेश, बागलान आणि भिवरथरी तसेच वसई पर्यंतचा मुलूखही काबिज केला.परंतु दक्षिण कोकणांत मात्र अजुनही आपला अंमल चालत नाही हीच खंत पिताश्रींना आणि आज आम्हालाही आहे.

            संभाजी आंग्रे आणि मानाजी आंग्रेत असलेल्या वादात तुळाजी आंग्रे तेल ओततोय,त्याला धडा शिकवणे गरजेचे आहे.सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्गा वरुन या तिघां भावांमधे यादवी युध्द सुरु आहे.आपण मानाजी आंग्रेची बाजू घेऊन डाव तडीस न्यावा.काकाश्री!बंडखोर तुळाजीला आवरायला प्रसंगी आपल्या ला पोर्तुगीज,इंग्रजांची मदत घ्यावी लागली तरी चालेल.

            लढाईचा मुहूर्त ठरला.स्वार शिबंदी,हत्ती अंबारी,घोडेस्वार,सैनिक शनिवार वाड्यासमोर दाखल झाली. औक्षण करण्यासाठी अवघी १५ वर्षाची गोपिकाबाई समोर आल्या.गोपिकाबाईं चा जन्म १७२५ मधे मोठे सरदार भिकाजी रास्तेच्या पोटी झाला.त्यांच्या कडे दिवाळीसणांसाठी शाहू महाराज आले असतां, त्यांना ही चुणचुणीत गोपिका नजरेत पडल्यावर त्यांनी भिकाजी रास्तेला नानासाहेबांसाठी मागणी घातली.त्यांच्या शब्दाचा मान ठेवून नानासाहेब आणि गोपिकाबाईचा विवाह ११ जानेवारी१७३० ला वाई येथे धुमधडाक्यात झाला होता.त्या गोपिका बाईंनी औक्षण केल्यावर नानासाहेब आजी राधाकाबाई व आई काशीबाईंना भेटून आशिर्वाद घेऊन देवडीबाहेर सैनिकासमोर आलेले पाहून सैनिकांनी नवीन पेशव्यांचे उत्स्फुर्त हर हर महादेवा च्या गजराने स्वागत केले.

              क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – १७.

          प्रचंड फौजेसह श्रीमंत नानासाहेब पेशवे कोकणांत उतरले.रायगडच्या बाजूचा परिसर तसेच सुवर्णदुर्ग,अंजन वेल,आणि रत्नागिरी अंकित केली. ठरल्याप्रमाणे नानासाहेब मानाजी आंग्रे च्या मदतीस धावून आले.तुळाजी व संभाजी आंग्रेशी युध्द करुन तुळाजी आंग्रे कैद झाला.हा तुळाजी कान्होजी आंग्रेचा मुलगा!कान्होजी आंग्रेच्या मृत्यु नंतर या तीन भावांमधे सत्तेसाठी नेहमीच यादवी युध्द होत असे.तुळाजी कैद झाल्यावर,नानासाहेबांनी त्याला ठणकावुन सांगीतले,या स्वराज्यात फक्त शाहू महाराजांचाच अंमल चालेल. आपापसांतील यादवी युध्द संपवा अन्यथा तुम्हाला संपवायला वेळ लागणार नाही.तुळाजी आंग्रेने वैर संपव ण्याचे कबूल करुन कुलाब्याकडे प्रस्थान केले.जातांना तुळाजीने सारा कोकण, साळशी,देवगड पर्यंतचा सगळा मुलूख नानासाहेबांच्या स्वाधीन केला.

          नानासाहेबांनी प्रत्येक किल्ल्यावर हवालदार,सरनौबत तसेच दरकदार, पोतनीस,फडणीस,मुजूमदार,दप्तदार, दिवाण सबनीस,हशमनीस,मामलेदार आणि कारखानीस यांच्या नेमणूका करुन कोकणचा बंदोबस्त केला. आणि संगमेश्वरवरुन मळ्याघाटामार्गे सातार्यास दाखल झाले.त्यांच्या या पराक्रमाचं शाहूराजेंनी भरभरुन कौतुक केले.आणि सातार्या मुक्कामी असलेल्या आजारी चिमाजी आप्पांच्या भेटीस गेले.

          चिमाजीआप्पासारखा महायोध्दा असा अंथरुणाला खिळलेला पाहून नाना साहेबांना अतिशय वाईट वाटले.चिमाजी आप्पांना पोटशूळ आणि अंगात विषमज्वर भरला होता.पेशवाई घडवण्यात आप्पांचा फार मोठा मोलाचा वाटा होता.पोर्तुगीजांचा धार्मिक जुलुम मोडीत काढण्यासाठी मोठ्या फौजेनीशी आप्पा  त्याच्यावर तुटून पडले होते. या निकराच्या लढाईत पोर्तुगीज सेनापती ठार झाल्यावर वसई किल्ल्यावर मराठी भगवे निशाण फडकवून स्वराज्याचा श्वास मोकळा केला होता,त्यांच्या या जीवन संग्रामांत त्यांच्या आयुष्यात एकच डाग लागला होता…बाजीराव मस्तानी!

        नानासाहेब आल्याचे कळल्यावर चिमाजीआप्पांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले.नानांनी त्यांना अलगद लोडाला टेकवून बसवले.नानांनी कोकणच्या मोहिमेची हकिकत सांगीतल्यावर आप्पा समाधान पावले.पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून नांनानी विचारले,काका! कशाचं एवढं वाईट वाटतय? समशेरचं! आमच्यामुळे त्याची आईवडीलांची ताटातूट झाली.मस्तानीचं पोर अनाथ झालं.नाना त्यावेळी समाजाच्या चौकटीने तसं करण्यास भाग पाडले.कुठे फेडणार हे पाप?काकाश्री या पापात आम्हीही तितकेच वाटेकरुं आहोत.

        नाना समशेर एकटा पडला.त्याला दोनदा वाड्यावर बोलावलं होतं पण ते मानी लेकरुं आलं नाही.नाना तुम्ही त्याला जवळ करा.मस्तानिची सगळी संपत्ती त्याच्या नांवावर करा.ही जाती पातीची फळी मोडून स्वराज्याची मान उंचवा त्यातच पेशवाईची भलाई आहे. काका!पुण्यात गेल्याबरोबर दरबार भरवुन समशेरला सरदारकी बहाल करुं. आणखी बरचस बोलनं झाल्यावर, महारांजी भेट घेऊन नानासाहेब तडक पुण्यास पोहचले.विजयी पेशव्यांचं पांच तोफांची सलामी देऊन त्यांचं भव्य स्वागत केलं.नानासाहेब शनिवार वाड्याचा दरवाजा ओलांडून आंत आले.

         कांही वेळानंतर निरवानिरव झाल्यावर,गोपिकाबाईंकडे समशेरची विचारपूस केली.नंतर नानासाहेब स्वतः मस्तानी महालात गेले.चिमुरडा समशेर समोर येऊन त्यांना मुजरा केला.नानांनी त्याला जवळ घेत म्हणाले,आजपासुन तुम्ही अम्हाला दादा म्हणायचय!आम्ही तुमचे मोठे भाऊ ना?आणि शनिवार वाड्यात अगदी मोकळ्या मनाने यायच, खेळायच,गप्पा मारायच्या,छान मोकळे पणे वागायचय!त्याला जवळ घेऊन कुरवाळत उद्या दरबारात कसं वागायच याच्या सुचना देऊन निघून गेले.

        दुसर्या दिवशी नानासाहेबांनी दरबार भरवून समशेर बहाद्दरला वारसा हक्क म्हणून सरदारकी प्रदान केली. तसेच राजा छत्रसालने बाजीरावांना दिलेला मुलूख आणि बाजीरावांनी मस्तानीला दिलेले पाबळ आणि केंदूर ही गांवे त्याच्या नांवे करुन सोबत बाल समशेरची सरदारकीची व्यवस्था बघण्या साठी महादजी गोविंद काकिर्डे यांची कारभारी म्हणून नियुक्ती केली.लगेच काकिर्ड्यांनीही समशेरला सर्व प्रकारचं शिक्षण देण्याचं प्रशिक्षन सुरु केलं. बाजीराव मस्तानीवर केलेल्या अन्यायाचं हे कांही अंशी प्रायश्चित होतं,परिमार्जन होत.!

              क्रमशः
  संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – १८.

        १७ डिसेंबर १७४० रोजी चिमाजी आप्पाच्या निधनाच्या बातमीने नाना साहेब कोलमडून पडले.त्यांचा फार मोठा आधार गेला.पण सदाशिवरावाच्या रुपात सदैव सावलीसारखं पाठीशी राहणार्या भावाची साथ मिळाल्यामुळे दुःखाची बोच थोडी कमी झाली.एके दिवशी पहाटे त्यांना अचानक जाग आली.जाग कशाने आली याचे कारण शोधत ते देवडीच्या बाहेर आले.तितक्यात त्यांना तानपुर्या चा मंजुळ स्वर कानी पडला.त्या रोखाने नानासाहेब झपाझप पावले टाकीत नाटकशाळेजवळ येऊन दारातून पाहिले असतां एक सुंदर तरुणी डोळे मिटून तन्मयतेने तानपुरा वाजवत असलेली दिसली.

          वाss अतिसुंदर!क्या बात है?या अचानक आलेल्या आवाजाने त्या तरुणी ची भावसमाधी भंगली.तानपुरा स्तब्ध झाला.ती चटकण उठून हात जोडत म्हणाली, मा…फ ..माफ करा सरकार!

आपली झोपमोड झाली.घाबरुं नकोस.तू

अतिशय सुंदर तानपुरा वाजवतेस.नांव काय?मी..मी येसू!आपली दासी!हळुवार पावलांनी नानासाहेब तिच्याजवळ येऊन म्हणाले,आजपासुन दररोज आमच्या साठी,केवळ या नानासाहेबांसाठी वाजवायचे असे म्हणुन तीला मिठीत घेतले.परत शनिवारवाड्यात प्रितीचा नवा रंग उभारला.

         सकाळची आन्हिक,पुजापाठ उरकवुन नानासाहेब दिवाणखान्यात बसले असतां गोपिकाबाई येऊन म्हणाल्या,आपण सातार्याला जाणार ना  महाराजांना भेटून सहा महिने झाले असतील,अलिकडे त्यांची प्रकृती पण ठीक नसल्याचे ऐकलय!खरंय!वय झालेलं,त्यात वंशाला दिवा नाही.दत्तक घेण्याच्या विचारात आहेत.कोल्हापुरांत वेगळच राजकारण शिजतय!ताराबाई विरोध केल्याशिवाय राहणार नाही.

            नानासाहेबांच्या हाती दुधाचा पेला देत गोपिकाबाई म्हणाल्या,यावेळी सातार्याला गेल्यावर सदाशिव भाऊंना पुण्यात चलण्याची गळ वगैरे घालू नका.

महाराजांना सांगुन कुठेतरी दिवाणीच्या कामाला लावा म्हणावं.नानासाहेब चमकले.त्यांना असं बोलणं अपेक्षित नव्हतं.गोपिका!सदाशिवभाऊ ही पेशव्यां ची खानदान आहे,कुणा उपर्याची नाही. त्यांनी सातारला चाकरी केली तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील.

           नाही,गोपिका नाही!सदाशिव आमचे बंधू आहेत,चिमाजीअप्पांचे चिरंजीव!आम्ही काकांशी वचनबध्द आहोत.सदाशिवरावांना शनिवारवाड्यात पंगतीचा मान द्यावाच लागेल.आणि नाही दिला तर?नानासाहेब खिन्न नजरेने पत्नी कडे बघतच राहिले.गोपिका!सदाशिवरावांनी इकडे येऊं नये असं कां वाटतं?निःशब्ध का?घरातल्या वादळानं घरटी उध्वस्त होतात,मग हा अट्टाहास कशासाठी?या वाड्यात रघुनाथराव, जनार्दन,समशेर बहाद्दर,आपले चिरंजीव विश्वासराव राहतात.मग भाऊलाच परकी वागणूक कां?

          आमचे चिरंजीव विश्वासरावांच्या भविष्यात त्यांचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून!पुढे वारसाहक्काने पेशवाईच्या गादीचा अधिकार मागतील,त्यापेक्षा ते सातार्यातच असलेले बरे!नाही गोपिका! सदाशिवरावांना आम्ही पुरते ओळखतो. ते कधीच गादीची लालसा धरणार नाही असे म्हणून तडक आपल्या महाली निघून गेले.पुन्हा गोपिकाबाई त्यांच्या महाली दाखल झाल्या.रागानेच विचारले, आतां आणखी काय?पहाटेच स्वारी कुठे गेली होती?नेमकं काय म्हणायचय?मांजर डोळे मिटून दूध प्यालं तरी जगाचे डोळे उघडेच असतात.नानासाहेबांचा पारा चढला.तुम्ही आमच्या खाजगीत लक्ष घालू नये,नाहीतर परिणाम वाईट होईल.कां?कां?आम्ही तुम्हाला सुख देण्यात कुठे कमी पडलो?थोरल्या मामंजींनी मस्तानीविषयी जी चूक केली तीच करायला तुम्ही निघालात!खामोशs केवढ्यांदा तरी नानासाहेब ओरडले. म्हणजे येसूदासीबद्दलचा आमचा अंदाज खरा ठरला तर?तीला आजच वाड्यातून हाकलून लावते.खबरदारsssती कुठेही जाणार नाही.ती आमची आहे.गोपिका बाईंना रडू कोसळले.तोंडाला पदर लावून चटकण बाहेर निघून गेल्या.नानासाहेबां च्या मस्तकात मात्र स्फोट होऊ लागले.

          दुसर्या दिवशी नानासाहेब सातार्याला निघून गेले.सकाळचं आन्हिक उरकवून पेशवे राजवाड्यात महाराजांच्या भेटीस आल्यावर त्यांचा योग्य सन्मान करुन महाराज म्हणाले, नानासाहेब!शुजा,रोहिले,रजपूत,जयपूर वाला माधोसिंग यांचेवर जातीने लक्ष ठेवावे लागेल.सोबतच मराठी माणसांची मने जपावी लागेल,तरच स्वराज्याची पताका अटकेपार फडकत राहील.चिंता  नसावी.काळजी घेऊ.

              क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – १९.

         शाहू महाराज पुढे म्हणाले,नाना साहेब!दिल्लीचं वातावरण फार गढूळ होत चाललय!बादशहाच्या नावानं सर्वच आपलं वर्चस्व गाजवण्याच्या संधीच्या शोधात आहे.आपणही मागे पडतां कामा नये.महाराज आपण आमच्या मनांतलं बोललात.सध्या अयोध्याचे नबाब,नजीब खान,गाझीउद्दीन या सर्वांनी बादशहाची चांगलीच कुतरओढ चालवली.अशावेळी आपण पुढाकार घेणे उचित राहिल.उत्तम कांही अडचण असल्यास दिलखुलास सांगा….

        दुसर्या दिवशी सदाशिवभाऊंसह नानासाहेब शनिवार वाड्यात परतले.पण गोपिकाबाईंना भाऊचे येणे मुळीच आवडले नाही.त्या म्हणाल्या,स्वारी!भाऊं ना खाजगीच्या दप्तरात बसवा. राजकारणांत त्यांची लुडबुड नको.सतत तेच ते कानावर पडत असल्यामुळे,अखेर नानासाहेबांनी भाऊंना खाजगीच्या दप्तरी ठेवले.अर्थात ही बाब,जाणकर रामचंद्रबाबांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही.त्यांनी भाऊंना कानमंत्र दिला.लगेच अंमलात आणुन भाऊ म्हणाले,दादा!तुम्ही मला राजदरबारांंत बसू देणार नसाल तर आम्ही कोल्हापूरला जातो. तिथून आवतन आले,पेशवे बनवु म्हणुन! नानासाहेबांना माघार घेण्यावाचून पर्याय नव्हता.दुसर्या दिवशीपासून सदाशिव दरबारात बसूं लागले.

          १७४२-४३ मधे नानासाहेबांनी दिल्लीच्या रोखाने स्वारी केली.यात नेमाड,माळवा घेतला.रजवाड्यांकडून खंडणी गोळा केल्या.दिल्लीच्या बादशहा शी तह करुन ग्वाल्हेर किल्ला ताब्यात घेतला.व पुण्यास परतले.१७४४-४५ मधे परत कर्नाटकाची मोहिम आखली. सावनूरला वेढा घालून नबाबाला झुकवले.नबाबाने तह करुन पन्नास हजाराचा मुलुख नानासाहेबांच्या सुपुर्द केला.नानासाहेब पुण्यास परतले.

         १७५३ मधे राधाबाई मृत्युशय्येवर होत्या.नानासाहेब भेटायला गेल्यावर त्यांच्या गालावरुन हात फिरवत म्हणाल्या,जवळच्या माणसांना सांभाळा, प्रत्येकाला कामगिरी वाटून द्या!बोलत असतांनाच त्यांची जीवनज्योत मालवली शनिवारवाड्यात आरोळ उठला.मस्तानी बाजीरावांच्या प्रेमाला कलंक लावणारं एक महापर्व संपलं!

      श्रीमंत नानासाहेब कर्नाटकच्या स्वारीहुन परत आले,त्यावेळी सातार्यात बाबुजी नाईका विरुध्द आगेमोहोळ उठले होते.बाबुजी नाईकांना कर्नाटकच्या युध्दात अपयश आल्यामुळे,महाराजांची थोरली पत्नी,दाभाडे,गायकवाड,रघुजी भोसले या मुतालिक मंडळींनी बाबुजी नाईकाविरुध्द तंटा उभा केला,तेव्हा नाना साहेबानी सर्वांना शांत करुन बाबुजी नाईकांसोबत सदाशिव भाऊना पाठवून कर्नाटक मोहिम फत्ते केली.सदाशिव भाऊ म्हणजे नानासाहेबांची जणूं सावलीच!भाऊ इतके पराक्रमी असतील याची नानांना कल्पनाही नव्हती.आप्पाचे नांव काढले.

      कृष्णतुंगा दुवाबातील ठाणी देशमुखां नी उठवली होती.१७४६ साली ती ठाणी सदाशिवभाऊंनी घेतली.त्याचबरोबर १७४७ साली कोवळ्या वयाच्या भाऊंनी बहादूर भेंड्याचा किल्ला घेऊन स्वराज्या ची पताका दक्षिणेत फडकवली.यशमाला घालून सदाशिवभाऊ पुण्यास परतले.

          छत्रपती शाहू महाराजांची प्रकृती चिंताजनक असल्याचा लखोटा आल्याने नानासाहेब सैनिकांची मोठी फौज घेऊन सातारत  दाखल झाले.

         शिवपुत्र संभाजीराजेंचे चिरंजीव  छत्रपती शाहू महाराज!औरंगजेबने त्यांना बालपणीच कैद केले होते.पुढे औरंगजेबच्या मृत्युनंतर त्यांना सोडून देण्यात आले.पुढे बाळाजी विश्वनाथांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन शाहूमहाराजां चे आसन स्थिर केले.ही जान ठेवून शाहू महालाजांनी बाळाजींना पेशवाईची महा वस्रे प्रदान केली.बाळाजींनी पेशवाईची मुहूर्तमेढ रोवली.त्यावर सुंदर मंदिर बांधले बाजीरावांनी आणि कळस चढवि ण्याचे काम आले नानासाहेबांकडे!नाना साहेबांनी दक्षिणेत स्वराज्याचा झेंडा फडकवला.कोकणही सर केले.आता फक्त दिल्ली हस्तगत करायची बाकी होती.पण हा सुवर्णयोग पाहण्यापूर्वीच शाहूराजे अंथरुणाला खिळले.

         ६७ वर्षाचे शाहू महाराज मृत्युंशी झुंज देत होते.डोळे खोल गेले होते.चैतन्य हरवले होते.नानासाहेब त्यांच्या शयनगृही दाखल झाले.त्यांची अवस्था पाहून नानांना अतिशय वाईट वाटले.धीर देत म्हणाले,महाराज स्वराज्याची अजिबात चिंता करुं नका.सारं व्यवस्थित होईल. नाना!आम्ही तुम्हा लोकांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांची गादी चालवली. आतां ताराबाईच्या शब्दाचा मान राखुन राजारामांना गादीवर बसवुन त्यांची मर्जी राखा.गादीची कुलमुख्त्यारी तुम्हाला सोपवत आहे.स्वराज्याचं कल्याण करा.

१५ डिसेंबर १७४९ ला शाहू महाराजांची जीवनज्योत मालवली.

                क्रमशः
 संकलन आणि ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – २०.

         रामराजे भोसले म्हणजे ‘सातारच्या’ शिवछत्रपतींच्या घराण्यातील  दुसर्या शिवाजींचे चिरंजीव!मातोश्रीचे नांव भवानीबाई!रामराजेंचा जन्म वडीलां च्या मृत्युआधी १७१२ ला झाला होता. राजारामांचे चुलते दुसरे संभाजी व चुलती जिजाबाईने  राजारामास जीवे मारण्याचा कट केला होता,परंतु त्यांना गुप्तपणे पळवून बावड्याजवळील पानगावला ठेवण्यांत आले.पानगांवला पंत अमात्यांनी तब्बल १५ ही स्वराज्या ची अमानत जपून ठेवली.पुढे ताराबाईंना त्यांच्या अस्तित्वाचा शोध लागला. स्वराज्याची ही ठेव अजून जिवंत आहे तरी सारे हेवेदावे विसरुन त्यांना दत्तक घेऊन गादीवर बसविण्याचा सल्ला शाहू महाराजांना दिला.महाराजांनाही विचार पटल्याने त्यांनी तातडीने नानासाहेबांना बोलावुन राजारामांनाच गादीवर बसविण्याची आज्ञा दिली आणि शाहू महाराजांच्या मृत्युनंतर सगळ्या विरोधां ना झुगारुन ६ जानेवारी १७५० ला सातारच्या गादीवर राजारामांना बसविले.

           शाहू महाराजांनी मरतेवेळी नाना साहेबांना मुख्त्यारपत्र दिले होते,त्या आधारावर स्वतंत्र राजसत्ता स्थापण्याचे नानांनी ठरविले.गुप्त बैठक घेऊन सदाशिव भाऊंना म्हणाले,आपण स्वतंत्र पणे कारभार करु लागलो याचा असंतोष सातार्यात पसरतोय तो भडकण्याच्या आधी सांगोल्यात असलेल्या राजाराम महाराजांशी सल्लामसलत करुन संपूर्ण महासत्ता पेशवाईच्या नांवाने लिहुन घ्या. आज्ञेप्रमाणे सदाशिवभाऊ रामचंद्रबाबां सह  प्रचड फौज घेऊन सांगोल्यात दाखल झाले.आगत स्वागत झाल्यावर, राजाराम महाराजांना मोहिमांची यथोचित माहिती,अनेक घडामोडी,शत्रूं पक्षांचा गोषवारा कथन केला.हे मराठा साम्राज्याचं वादळ राजारामांना अवघड वाटले असावे म्हणून त्यांनी स्वराज्याची संपूर्ण राजसत्ता श्रीमंत पेशव्यांना सोपवली.

          आणि याचक्षणी मराठेशाहीची शस्रे गोठली.भोसले घराण्याची राजसत्तेचं स्थलांतर पेशवे घराण्याकडे झालं.रामराजे केवळ १५ लाखांचे मानकरी व सातारचे धनी फक्त राहिले.ही हकिकत ताराबाईंना कळतांच त्यांच्या अंगाचा नुसतां भडका उडाला.राजारामां ना तातडीने सातारच्या किल्ल्यावर बोलावुन त्यांच्यावर शब्दांचा भडीमार केला.सरळसरळ मराठ्यांची राजसत्ता ब्राम्हणांच्या हाती सोपवली,कां?आमच्या पूर्वजांनी किती कष्टाने हे साम्राज्य उभं केलं आणि तुम्ही?तुम्ही एका क्षणांत सारं मातीत मिळवल, कांss ? छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम,संभाजी महाराजांचं बलिदान सर्व तुम्ही विसरलात!असा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? कष्टानं उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचं मातेरं केल राजे तुम्ही.आणि संतापलेल्या तारा बाईंनी रामराजेंना कैद केले.

        आतां संपूर्ण स्वराज्याचा कारभार पुण्याच्या शनिवारवाड्यातून स्वतंत्रपणे सुरु झाला.शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा सर्वासाठी खुला झाला.हळुहळु इंग्रज,पोर्तुगीजांचीही हजेरी लागु लागली लहानमोठे अधिकारी सन्मानाने दिल्ली दरवाजातुन प्रवेश करुं लागले.श्रीमंत पेशव्याची भेट दुर्मिळ होऊ लागली.

           आई व काशीबाईच्या इच्छेनुसार पर्वती डोंगरावर देवदेवेश्वरांचं मंदिर बांधुन शिवलिंगाची स्थापना केली.शाहू महाराजांच्या निधनानंतर छत्रपतीच्या पुजेतील शिवलिंगाची स्थापना केली.या देवालयाच्या चारही कोपर्यावर चार पंचायतन देवतांची स्थापना केली.

          नानासाहेब पेशवे म्हणजे महान रसिक व्यक्तिमत्व!उत्तम शस्राचे नाना प्रकारची पुराणे,ग्रंथ,नाटकशाळा, कलावंत,कलाकारांच्या कलागुणांना वाव दिला.सारसबाग,कात्रजचे तळे,पर्वतीचे तळे,तुळशीबाग,बेलबाग आणि इतर बागा साकार करुन पुण्यनगरी फुलवली. पुणे शहराचा चेहरा मोहराच बदलवला. सरदार,धनिकांचे वाडे,मोमोठ्या हवेल्या, आळी आळीत सुरेख घरे बांधली.

           मोहिमा फत्ते करुन मराठे सरदार आले की,त्यांच्या इष्कबाजीला प्रेमाचे घुमारे फुटत.म्हणजे लोकसंगीताची!खुद्द पेशवे कलाप्रेमी असल्याने,संगीत आणि नृत्याला राजाश्रय मिळाला.इष्काचा पेला भरुन देणारी शाहिराची लावणी आणि तमाशाचे फड जोमाने उभे राहिले. ही परंपरा शनिवार वाड्यातही दाखल झाली नंतर पर्वती डोंगर्याच्या पायथ्याशी रमणा बांधला.या रमण्यावरुन दक्षिणा वाटताहेत हे कळल्यावर संपूर्ण हिंदुस्थानातील विद्वान,पंडीत पुण्यात येऊ लागले.पण हा वर्ग सोडला तर अठरापगड जातीचा शिपाई,बलूतेदार, ज्यांच्या पराक्रमावर ही प्रचंड दौलत उभी केली,तो शिपाईगडी कदाचित कोरडा ठणठणीतच राहिला असावा.

        पुढे नानासाहेबांनी रास्तेंना सरदारकी,चार हजार फौजेच्या खर्चा साठी दोन लक्षांचा मुलुख जहागीर दिला.

तसेच पटवर्धनांनी चोख कामगिरी बजावल्यामुळे सरदारकी व मिरज प्रांताचा ३२ लाखांचा मुलुख व मिरजचा किल्लाही दिला.विंचूरकरांनाही २० लक्षाचा मुलुख दिला.नारोशंकर बहाद्दरां ना ३० लक्ष मुलुख जहागीर देऊन फौजेची जबाबदारी सोपवली.

            क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

पेशवाई संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading