
हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! पेशवाई !!!
भाग – ४६.
पुरंदरच्या या तहामुळे निराश झालेल्या राघोबांना पुन्हा सुरतला रवाना केले.कांही दिवस सुरतच्या महंमदी बागेतल्या बंगल्यात ठेवण्यात आले,परंतु पुरंदर तहानुसार पेशवाईचा नाद सोडून गंगातीरी स्वस्थ बसावे,पेशवे सरकार कडून तीन लाख,पंधरा हजार मिळतील. सुरत सोडा.असे इंग्रजांकडुन सांगण्यात आले.राघोबा संतापाने पेटून उठले.इंग्रज मदत करणार नाही हे जाणून,३१ मार्च १७७६ ला फिरंगी वाखारकर जैरेनिक दिबेरे मार्फत दमणकरांशी संधान बांधून दमणला पोर्तुगीजांचा आश्रय घेतला, परंतु पेशवाईची अभिलाषा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.राघोबा दमण सोडून तारापूर मार्गे मुंबईला येऊन इंग्रजांच्या आश्रयाने मलबार हिलवर उंच इमारत बांधुन दोन वर्षे त्यांनी तिथेच काढले.
१२ जुलै १७७७ मधे गंगाबाईचा नवज्वराने मृत्यु झाल्यामुळे सवाई माधवरावांची जबाबदारी पार्वतीबाई व नाना फडणीसांवर पडली.पुरंदरच्या तहा नंतर नाना फडणीसांना मिळालेला मोठे पणा त्यांचे चुलतभाऊ मोरोबा फडणीस व सखाराम बापूंच्या मनांत आकस निर्माण झाला.शेवटी इंग्रज वकील व सखाराम बापूच्या मदतीने नाना फडणीस ना अटक करण्याचा कट समजल्यावर, सतर्क नानांनी मोरोबांना कैद केले. पेशवे दरबारात हळुहळु फुट पडत असल्याची संधी साधुन इंग्रजांनी २४ नोव्हेंबर १७७७ साली कर्नल एग्स्टर्न व राघोबादादा फौजे सह मराठी मुलखावर चालुन येत असल्याचे कळताच,नाना फडणीसांनी, महादजी शिंदे,तुकोजी होळकर आणि हरिपंत फडके यांना फौजेसह तळेगांवा कडे रवाना केली.तळेगांवच्या इंग्रज- मराठेंच्या लढाईत कॅप्टन स्टुअर्ट मारल्या गेला.मराठ्यांनी इंग्रजांना पार जेरीस आणले.राघोबांचे रक्षक सैन्य नोकरी सोडून निघून गेले.राघोबांची तीसरी फळी तुटली.
शेवटी १४ जानेवारी १७७९ ला तहाची बोलणी करण्याकरितां फार्मर नांवाचा अधिकारी नाना फडणीसांकडे आल्यावर,प्रथम राघोबांना ताब्यात देण्याची मागणी केली.१६ जानेवारी १७७९ ला वडगांवचा तह झाला.या तहात श्रीमंत माधवरावांच्या मृत्युनंतर, इंग्रजांनी व्यापलेला सर्व प्रदेश इंग्रजांनी परत करावा.कर्नल गार्डरचे सैन्य मराठी मुलखात थांबणार नाही.मराठ्यांच्या शत्रुला व राघोबांना संरक्षण देऊ नये.
अखेर निराश राघोबादादा महादजी शिंदेसमोर आत्मसमर्पण करुन कैद करवली.या वडगांवच्या तहामुळे राघोबादादांचा पेशवाईवरचा अधिकार कायमचा संपुष्टात आला असला तरी त्यांच्यातील बंड कांही कमी झाले नाही. महादजी शिंदेबरोबर परिवारासह झांशी ला जात असता,राघोबा म्हणाले, महादजी,कांही लोकांची अजुनही आम्ही पेशवेपद स्विकारावे अशी इच्छा आहे. महादजी शिंदे मिश्कील हसलेले पाहुन, राघोबांनी अंगरख्यातून दोन चिठ्ठया काढून त्यांच्या हाती ठेवल्या.महादजींनी चिठ्ठया वाचले नी त्यांचे डोळेच फाटले. सखाराम बोकीलांनी पेशवाईत चांगलाच सुरुंग पेरला तर….
महादजींनी त्या चिठ्ठया नाना फडणीसांकडे पाठविल्या.नाना,हरिपंत फडकेंना म्हणाले,हरिपंत!ज्यांना आम्ही पेशव्यांचा दर्जा दिला,त्यांची आम्हाला व सवाई माधवरावांना अटक करेपर्यंत मजल जावी?पाठीत सुरा खुपसावा?नाही हरिपंत!आतां स्वस्थ बसून चालणार नाही.नाना फडणीसांनी चतुराई ने सखाराम बापूंच्या षडयंत्राचा धुव्वा उडवुन २७ फेब्रुवारी १७७९ ला अटक करुन त्यांची रवानगी सिंहगडावर केली. त्यांची ५० लक्षांची दौलत जप्त करुन सरकारांत जमा केली.पुढे सखाराम बापू ने फितूरी करुं नये म्हणून,प्रतापगड,नगर रायगड अशा वेगवेगळ्या किल्ल्यांवर स्थलांतरीत केले.शेवटी अतिसाराने रायगडावर त्यांचा मृत्यु झाला.शस्र, शास्रांंची भाषा जाणणारा राजकारणी विधिपुरुष,प्रतिसृष्टी निर्माण करण्याची बुध्दी असलेला,राघोबांच्या कृष्णकृत्याला धडा शिकवणारा पेशवाईतला हा शहाणा पुरुषाला एका साध्या चुकीमुळे जीवाला मुकावे लागले.
२१ एप्रील १७७९ ला पांच वर्षाचे कृष्णासारखे नटलेल्या सवाई माधवरावां ची सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात मौंजीचा कार्यक्रम पार पडला.२६ एप्रील १७७९ ला शुभ मुहूर्ता वर शनिवारवाड्यात सवाई माधवरावांचे आगमन झाले.त्यांच्या स्वागतार्थ पुणे शहर नव्या नवरीसारखी नटली.रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी लोकं हाती पुष्प घेऊन उभी होती.सनई चौघड्यांचा मंगल ध्वनी वाजत होती.आपल्या नव्या पेशव्यांना लोकं मुजरा करीत,सवाई माधवरावांचा विजय असोss जय भवानीss जय शिवाजीsss हर हर महादेवss च्या गजरात अंबारीतुन मिरवणूक शनिवार वाड्यात पोहचली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – ४७.
श्रीमंत सवाई माधवरावांची मिरवणूक दिल्ली दरवाज्यासमोर आल्या
वर सुवासिनींनी औक्षण केले.२१तोफां ची सलामी दिली.दारु,फटाके फुटले. सर्वात शेवटी पेशव्याच्या गादीसमोर येऊन स्वराज्याच्या गादीला प्रणिपात करुन उजवं पाऊल पुढे टाकुन सवाई माधवराव आसनस्थ झाले.सर्वानी आपल्या नव्या पेशव्यांना मुजरे केले.या मंगलमय वातावरणांत श्रीमंतांना सरदारां नी नजराणे पेश केले.निरोपाची वस्रे,पान सुपारी,अत्तर गुलाल होऊन दरबार संपला.
नाना फडणीस आणि हरिपंत एक स्वप्न साकार झाल्याच्या समाधानात असतांनाच,गुप्तहेराने बातमी आणली, राघोबादादांनी पहारेकर्याच्या हातावर तुरी देऊन,महादजी शिंदेच्या नजर कैदेतुन फरार झाले.हरीपंत!कात टाकलेला साप अधिक भयानक होतो. श्रीमंताच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण पुणे शहराचा कडेकोट बंदोबस्त करावा लागेल.इंग्रजांनी तह मोडून धोका दिला. त्याच्याशी लढा देण्यासाठी मुधोजी भोसले,हैदर,निजाम,पोर्तुगीज यांना एकत्रीत आणण्याचे ठरविले.
दुसर्याच दिवशी पुण्याच्या कडक बंदोबस्ताची अंमलबजावणी सुरु झाली. ३० हजार हुजरातीची फौज,आणि मानकरी,एकांडे,शिलेदार,सरंजाम मिळून २० हजार, तसेच अरब,सिद्दी,पठाण, राजूत,मुसलमान,दक्षिणी लोक,रांगडे, परदेशी या सर्वांना नाना फडणीसांनी आदेश पाठवल्याने, ५०,००० फौज पुण्यात दाखल झाली.पावलोपावली सैनिक पुणे शहरांतून फिरुं लागले.
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या सुरक्षिततेसाठी खास विश्वासू मंडळीत, मोरोपंत भावे,दाजीबा आपटे,बाळाजी पंत केळकर ही मंडळी सतत त्यांच्या जवळ असायची.ते झोपतील त्या मंचका च्या चारही बाजुस ही मंडळी झोपायची.!
तिकडे राघोबादादाने महादजी शिंदेच्या नजर कैदेतून पळ काढून सुरत गाठले.सुरत मधील एका नागर ब्राम्हणा ची मधुरा नावाच्या मुलीला राघोबांनी पळवुन आणल्यामुळे त्या ब्राम्हणाने पत्नीसह आत्महत्या केली.त्या मुळे चिडलेल्या इंग्रजांनी त्यांना वाड्या बाहेर न पडण्याची सक्त मनाई केली. बिचारी मधुरा!कांही दिवसांतच देवीच्या साथीला बळी पडून ५जून १७८० ला मरण पावली.
इकडे स्वराज्यातील वातावरण चांगलच तापलं.प्रशिक्षित व कवायती इंग्रज वादळाशी टक्कर व अखंड हिंदुस्थानच्या भवितव्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन फौजा उभ्या केल्यात संपूर्ण हिंदुस्थानात आगडोंब उसळला.वसईचा वेढा,मलंगचा वेढा, बोरघाटची लढाई यामुळे गांवच्या गांवं भस्मसात होऊन,सामान्य माणसं किड्या मुंग्यासारखी चिरडली गेली.रक्ताचे पाट वाहू लागले.मराठ्यांनी जागोजागी इंग्रजां ची रसद अडवली.इंग्रज सैन्य अन्नपाण्या वाचून तडफडू लागले.शेवटी बाॅम्बे काॅन्सीलने
ताबडतोब युध्द थांबवण्याचे आदेश दिले. अखेर १७ मे १७८२ ला सालबाईचा तह झाला.या तहानुसार– इंग्रजांनी राघोबां दादांचा पक्ष सोडावा.राघोबांना वार्षिक तीन लक्ष तैनातीसह बेट येथे पाठवावे. साष्टीबेट सोडून इतर सर्व ठाणी इंग्रजांनी परत करावी.
राघोबादादांचा ८-९ वर्षाचा आधार कायमचा संपला.अनेक विचारां चा चिखल त्यांच्या मनी दाटला.शरीर अनेक व्याधींनी ग्रस्त झाले.बुध्दीभ्रंश होऊ लागला.चित्रविचित्र स्वप्ने पडू लागली.राघोबांना पेशव्यांच्या स्वाधीन करण्याविषयी २१ मे १७८३ रोजी करार नामा केला.त्याप्रमाणे सुरतमधुन जायला सांगण्यासाठी इंग्रज अधिकारी त्यांच्या समोर येऊन सॅल्यूट मारत म्हणाला,तुम्ही सुरत सोडून कोपरगावला जावे.हे ऐकून राघोबांचे अग्निकुंड भडकले.आम्ही कुठेच जाणार नाही.आम्ही हिंदुस्थानचा पेशवा आहो.एवढ्यात आनंदीबाई बाहेर येऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायला लागल्याबरोबर त्यांच्याकडे तिरस्काराने बघत ओरडले,दूर हो कलंकिनीss ,आमच्या आयुष्याचे सारे वाटोळे केलेस.माझ्यातल्या सैतानाला आगीचे निखारे सतत पेटवत ठेवून अनेक पापे करण्यास भाग पाडलेस.कांs चांडाळणीsss कां केलेस असे?आणि ढसाढसा रडूं लागले.आगीत तेल ओतुन पेशवाई पेटवण्याचा अधिकार तुला कोणी दिला होता?कां असं करायला भाग पाडलेस कैदासिनेsss ?आमच्या अंगाखांद्यावर खेळवलेल्या नारायणरावां चा कोथळा,काकाss वाचवाss असा आर्तनाद करत असतांनाही बाहेर पडतांना आम्ही बघीतला.कांss?कांss म्हणत भिंतीवर डोके आपटू लागले. इतक्यात हरिपंत फडके आले.राघोबांची स्थिती पाहून त्यांनाही वाईट वाटले.जेर बंद झालेला वाघ कसा व किती हताश होतो,हे ते आज जवळून बघत होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग -४८.
हरिपंतांना समोर बघुन राघोबा त्यांना म्हणाले,पंत आम्ही कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहो,देहदंडाची शिक्षा द्या,देशद्रोही म्हणून साखळदंडाने बांधून हत्तीच्या पायी द्या,चामडी सोला, पण आम्हाला स्वराज्यात येऊ द्या.नाहीs राजकैदी म्हणून तुम्हाला कोपरगाव बेटातच रहावे लागेल.राघोबादादा, आनंदीबाई,दत्तकपुत्र अमृतराव आणि कुमार वयाचे बाजीराव यांना कोपरगाव बेटातील वाड्यात आणूंन वाड्याभोवती कडक बंदोबस्त करुन चौकी पहारे बसवले.
नाना फडणीस म्हणजे इतिहासाची निरगाठ!ती निरगाठ सोडून बघीतल्या शिवाय पेशव्यांचा इतिहास कळायचा नाही.श्रीमंत सवाई माधवरावांवर नानांचा फार जीव!त्यांनी माधवरावांच्या सर्वांगीन उन्नतीसाठी व वेगवेगळे विद्या,ज्ञान,कला युध्दाचे डावपेच शिकण्यासाठी त्यांनी वेगवेगळे शिक्षण नेमले.मनोरंजनासाठी वेगवेगळ्या जातीचे पक्षी,प्राणी,गेंडे,चित्ते संग्रहित केले.नऊ वर्षाचे होताच केशव नाईक भौरव थत्ते(ओकेकर) यांच्या रमा
बाई नावाच्या कन्येशी १० फेब्रुवारी १७८३ ला पर्वतीवर मोठ्या थाटामाटाने विवाह लावून दिला.या विवाहाला संपूर्ण हिंदुस्थानातील राजे महाराजे उपस्थित होते.हा आनंदोत्साह महिनाभर चालू होता.पुण्यांतील चूलीही महिनाभर बंद होत्या.अनेक देवदैवतांना अहेर पाठवण्यात आले होते.
याच काळांत सातारा आणि कोल्हापूरच्या भोसले छत्रपतींच्या घराण्यांत अत्यंत स्थित्यंतरे झाली. छत्रपती रामराजांनी त्रंबक बावीकरांचा मुलगा विठोजीस दत्तक घेतले.त्याचे नांव शाहू ठेवण्यात आले.या शाहू महाराजां च्या पोटी प्रतापसिंग राजे,रामचंद्र राजे आणि शहाजीराजे भोसले अशी वंशावळ उदयास आली.नाना फडणीसांच्या लक्षात त्यांची धोरणे आल्यावर सातारकर आणि कोल्हापूरकर छत्रपतीं वर जबरदस्त दबाव आणुन छत्रपती राज सत्तेने डोके वर काढू नये,यासाठी त्यांनी डाव टाकला.दोघांच्याही खर्चाचा बंदोबस्त करुन शांत बसवले.छत्रपतींची अवस्था अडकित्त्यात सुपारी पकडावी तशी झाली.निजामाने नाना फडणीसांना मदारुल महा-मुख्य प्रधान ही पदवी देऊन सन्मानित केले.
इकडे कोरेगाव बेटच्या वाड्यात, राघोबादादा अनेक व्याधींनी ग्रस्त झाले. असंख्य वेदना छळू लागल्या.सारखी स्वप्ने पडू लागली.काकाss मला वाचवा हा आवाज सतत कानात घुमु लागला. मोठमोठ्यांनी ओरडू लागले की,आनंदी बाई त्यांंना शांतवू लागायच्या,त्यातच त्यांना पुन्हा दिवस गेलेत.त्यांना राघोबा म्हणाले आम्ही प्रायश्चित घेण्याचे ठरवले. तसे पत्र पुण्याला रवाना करा.
गोदावरी आणि वारणा नद्यांच्या संगमातीरी सांगवी गांवी ४ ऑगस्ट १७८३ ला नारायणरावांच्या नांवाने सक्षौर प्रायश्चित घेतले.मागे राघोबांनी हिंगणी गावी गोदावरीच्या दक्षिणेला एका जंगी वाड्याच्या बांधकामाला सुरुवात केली होती,परंतु अनेक कारणांमुळे वाड्याचे काम अपुर्णच राहिले.फक्त तीन भिंती बांधल्या गेल्या.राघोबांनी मरणोत्तर या वाड्यात त्यांना दहण करण्याची इच्छा व्यक्त केली.
रात्री राघोबांना खोकल्याची जबरदस्त उबळ आली.छातीत मरणाच्या वेदना होऊ लागल्या.डोळ्यांतील प्राण श्वासांशी लढू लागले.कांही वेळानंतर थोडे बरे वाटल्यावर, म्हणाले,एकवेळ गोपिकावहिनींना भेटल्याशिवाय हा देह पवित्र होणार नाही.त्यांना बोलवण्यास पाठवलेला सांडणीस्वार गोपिकाबाईंनी भेटण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे परत आला.राघोबांच्या विनंतीवरुन,त्यांच्या इच्छेखातर हरिपंत फडके स्वतः गोपिका बाईंकडे जाऊन रदबदली केली.
हरिपंत! भाऊजींनी आमच्या काळजाला किती क्लेष दिले?पेशवाईशी गद्दारी,माधवाला दिलेला त्रास,नारायणा चा खून,काय काय नी कसे विसरु?कसं दर्शन देऊ?हरिपंतांना त्यांच्या भावना उमगल्या होत्या.राघोबामुळे पेशवाईलाच नव्हे तर संपूर्ण स्वराज्याला फार मोठी किंमत मोजावी लागली होती.हरिपंताच्या चिकाटीच्या विनवण्यानंतर,राघोबांनी प्रायश्चित घेऊन इथे आल्यावर आम्ही विचार करुं!अनुमती घेऊन इच्छापंत कोपरगांव बेटकडे वळले.
कांही दिवसांनी गंगापूरला आलेल्या पालखीतून राघोबादादा उतरतां ना पाहुन त्यांच्याकडे तिरस्काराचा एक कटाक्ष टाकुन गोपिकाबाई आंत निघून गेल्या.राघोबांना २-३ दिवस ताटकळत ठेवून माफी न मिळतांच राघोबांना परत फिरावे लागले.कांही ठीकाणी माफ केल्याचा पण उल्लेख आहे.राघोबादादा कोपरगांव बेटला परत आले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – ४९.
राघोबादादांना कोपरगांव बेट मधल्या वाड्यात करमेना म्हणून,परिवारा सह जवळच असलेल्या कचैश्वर गांवी विष्णू आणि शुकलेश्वर मंदिराजवळ राघोबांचा असलेल्या भव्य वाड्यात आले
शरीर अंथरुणाला खिळलेलं,डोळ्यातील तेज हरपलेलं,वेदना सोसणारं शरीर शीत होत चाललं होत.राघोबांना आतां पैलतीरीची ओढ लागली होती.११ डिसें. १७८३ च्या रात्री राघोबादादांचं निधन झालं.अटकेपार झेंडा फडकवणारा शूर सेनापती कायमचा निघून गेला.हिंदवी स्वराज्यातलं एक भयानक वादळ शांत झालं.राघोबादादांच्या इच्छेनुसार तीन भिंतीच्या वाड्यात त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आलं.रघुनाथरावांचे द्वितिय चिरंजीव दुसरे बाजीराव अग्नी ज्वालांंकडे बघत होते.
आनंदीबाईंच्या इच्छेनुसार कचेश्वराहून पुनः कोपरगांव बेटला आनंदीबाई,अमृतराव आणि बाजीराव आले.सैनिकांचा पहारा होताच.३० मार्च १७८४ ला आनंदीबाई प्रसुत झाल्या. बाजीरावांना चिमणाजी नांवाचा सख्खा भाऊ मिळाला.पहिले दत्तकभाऊ अमृतराव होतेच.
बाजीरावांचं बालपण अगदी ठिल्लर पोरांसारखं उनाडक्या करण्यांत गेलं.हेतूपुरस्पर त्यांना कोणी युध्द कलेचं, राजनितीचं शिक्षण दिलं नव्हत.शनिवार वाड्यातील सवाई माधवरावांचे कौतुक कानावर आले की,त्यांच्यातील जळावु वृत्ती उफाळून येत असत.बोथट तलवार घेऊन लढतां येत नाही.अक्कलहुशारीने समोरच्याला फसवता येते.परंतु युध्द जिंकतां येत नाही.
१७८२ मधे हैदरच्या मृत्युनंतर टिपू सुलतान म्हैसूरच्या गादीवर आला.गादी वर आल्यावर टिपूने राज्यविस्तारास प्रारंभ केला. २॥ कोटीचे राज्य उभे केले. उत्तम तोफखाना आणि किल्ल्यांचा कडेकोट बंदोबस्त केला.नरगुंद संस्थान खालसा करण्यासाठी पाऊले उचलली. त्यासाठी नरगुंद संस्थानाकडे जबर खंडणी मागीतली.नरगुंदाच्या मागणी नुसार मराठ्यांनी मदत करण्याची हमी घेतली.भयंकर लढाई झाली.टिपूने विश्वासघाताने नरगुंला ठार केले.निजाम मराठे एकत्र येऊन टिपूचा पराभव केला. मराठ्यांना बदामी,कित्तूर,नरगुंद मुलूख मिळाले.निजामाला औदानी शहर व ४५ लक्ष रुपयांची खंडणी मिळाली.पुढे इंग्रज निजाम,मराठे यांनी टिपूस जेरीस आणून बराचसा मुलूख पदरात पाडून घेतला.
तिकडे उत्तरेकडे महादजी शिंद्यांनी ज्या गिलचे,इराण्यांना पाणी पाजले,त्या इराण्यांचा पराभव करुन पार अटकेपार हाकलून लावल्यामुळ आपोआपच दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात आली आणि दिल्लीच्या बादशहाला ६५ हजार रुपये मासिक तनखा ठरवून वकील-ई-मुतालिक आणि मिरबक्षिसी च्या वतनी सनदा पेशव्यांना मिळाल्या.
१७८६ साली इंग्रजांच्या वतीने
पेशव्याच्या दरबारी सर चार्लस मॅटेलची प्रतिनिधी म्हणून निवड झाली.
७ जून १७९१ मधे शनिवारवाड्या ला अचानक आग लागून वरचे पांच मजले जळून खाक झाले.उरले फक्त खालचे दोन मजले.
औरंगबादचा घाशीराम नशीब काढण्यासाठी पुण्यांत आला.तो व्यापार धंद्याच्या शोधात पुण्यात फिरत असतांना चोर समजुन त्याला चांगला चोप मिळाला आणि इथेच त्याच्यातला ब्राम्हण संपला व पुणे शहराचा बदला घेण्याची शपथ घेतली.पुढे घाशीरामने एका नर्तकीकडे नोकरी पत्करली.नर्तकी बरोबर घाशीरामही शनिवारवाड्यात येऊ लागला.इथेच त्याने नाना फडणीसांची मर्जी संपादन केली.घाशीरामने स्वतःच्या मुलीच्या बदल्यात पुण्याची कोतवाली मागीतली.
घाशीराम कोतवाल झाला आणि अन्यायाला सुरुवात झाली.त्याच्या परवानगीशिवाय पानंह हलत नसे.३५ ब्राम्हण तेलंगास निघाले असतां,त्यांना एका भुयारात कोंडले.३५ पैकी २१ ब्राम्हण भुयारात गुदमरुन मेले.ब्राम्हणांनी उठाव केला.घाशीरामच्या मुसक्या बांधुन शनिवारवाड्यात आणण्यांत आले.श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी छड्याची शिक्षा देऊन त्याला ब्राम्हणाच्या स्वाधीन केले.त्याला गारपीटावर उलटे टांगुन, दगडाने ठेचून ठार केले.२१ ऑगस्ट १७९१ ला घाशीरामची ब्रम्हहत्या घडली.
३१ जानेवारी १७९३ मधे पेशव्यां ची धर्मपत्नी नवज्वराने निपुत्रिक मरण पावली.१२ फेब्रुवार १७९३ रोजी महादजी शिंदेचं पुण्याजवळ वानवडी येथे आजाराने निधन झाले.३ मार्च१७९३ मधे सवाई माधवरावांचा दुसरा विवाह यशोदाबाईशी झाला. २० जून १७९३ मधे हरिपंत फडके पोटदुखीने सिध्दटेक मधे मरण पावले.महादजी शिंदे व हरिपंतांच्या निधनाने नाना फडणीस अगदी एकाकी पडले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – ५०.
रघुनाथरावांचे २० वर्षाचे पुत्र दुसरे बाजीरावांनी बारभाईचे पाईक असलेले बळवंतराव वामोरीकरांना बोलावुन भरपूर पैशाची लालूच देऊन चिठ्ठी देत म्हणाले,ही चिठ्ठी पुण्यांत श्रीमंत सवाई माधवरावांच्या हाती द्यायची.बळवंतरावां नी फितूरी पत्करुन पुणे गाठले.श्रीमंतांनी चिठ्ठी वाचली.त्यात लिहिले होते…श्रीमंत आपण एका रक्ताचे!मागचं सगळं विसरुन बारभाईच्या कुबड्या झुगारुन, शेफारलेल्या नानांना हळुहळु दूर करुन आपण नेटानं राज्य चालवु!यातच आपल्या दोघांचं व स्वराज्याचे हित आहे.
२१ वर्षाच्या सवाई माधवरावांच्या मनांत हलकल्लोळ उठला.बाजीरावांचे म्हणने त्यांना पटायला लागले.ही बातमी नानांना कळलीच!श्रीमंत! जुन्नरवरुन बाजीरावां च्या चिठ्ठया येतात खरय ना?नानाकाका! आम्ही निर्णय घेण्याइतपत नक्कीच मोठे झालोय!कसले निर्णय श्रीमंत?बाजीराव कोण आहे ठाऊक आहे का?तुमच्या पित्याचा खून करणार्या राघोबादादांचा घरभेदी पुत्र!तो तुमचा आणि स्वराज्याचा घात करेल,सावध व्हा!
उसळुन माधवराव म्हणाले,नाना काका!पेशवे तुम्ही आहात की,आम्ही? क्षणांत नाना फडणीसांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होऊन,आपण चाकर असून पेशव्यासमोर बोलतो आहो याचे भान आले.
आजपर्यंत श्रीमंतांच्या भल्या साठी जे जे करायचं तेवढं केलं,परंतु आज?श्रीमंत,आम्ही चाकर आहोत हे विसरलो नाही.तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं.बारभाईचा कारभार उभा केला.जीवनदान सोपवलं,आणि तुमच्या लेखी आमची कांहीच किंमत नाही?नानाकाका!या उपकाराची किंमत पेशवाईकडुन पुरेपूर वसूल केली.श्रीमंतs नानांचा स्वर कापरा झाला.असे बोलतील ही नानांना स्वप्नातही अपेक्षा नव्हती.डोळे भरुन आले.तरी हात जोडत म्हणाले,तुम्ही आनंदाने राज्य हाका!परंतु या घरभेदी बाजीरावाचे वादळ बाहेरच थोपवा,अन्यथा घात होईल.काळाची पावले ओळखा.आमची कळकळ समजून घ्या.नानांना आज प्रथमच परके पणाची जाणीव झाली.जड पावलाने बाहेर पडले.
इकडे जुन्नरच्या वाड्यात बाजीरावां च्या सुचनेनुसार एका मांत्रिकाकडुन सवाई माधवरावांच्या नांवाने मंतरलेला ताईत बाजीरावांना मिळाला.याचा स्पर्श माधवरावांना होताच त्यांचा बुध्दीभ्रंश होईल.त्यांनी तो ताईत बळवंतराव नागनाथ वामोरीकरा मार्फत पुण्यास रवाना केला.
श्रीमंत सवाई माधवरावांनी तो ताईत हातात घेताच त्यांना भोवळ आली दैवाचं चक्र ऊलटं फिरलं!त्या रात्री त्यांना सणसणून ताप आला.वैद्यांनी उपचार केले,पण कांही फरक पडेना.वाताचे झटके येऊंं लागले.वेड्यासारखे बडबडू लागले.दसर्याच्या शिलांगणास जात असतांना त्यांनी हत्तीवरुन उडी टाकली.
२५ ऑक्टोबर १७९५ सकाळची वेळ, जवळपास कुणी नाहीसे पाहुन सवाई माधवराव गणेश महालाच्या सज्जात ( बालकनी) आले.खाली आठ कारंजे बोलावत आहे असे वाटुन वाताच्या झटक्यात उडी टाकली.शनिवारवाडा दणाणला,आठ कारंज्याचा हौद रक्ताने माखला.मांडीत कारंज्याची तोटी घुसली. सारे दात पडले.तोंड वाकडं झालं.त्यांना गणेश महालात आणण्यात आले.औषधो पचार झाले.वेदनांचा अंतर्दाह सोसवेना. अखेर मृत्युने गाठलेच!पण ताईताची भाकडकथा मनाला पटत नाही.कदाचित कुणी त्यांना धक्का दिला असु शकते, किंवा त्यांचाच तोल गेला असेल,खरे काय ते इतिहासालाच माहित!
सवाई माधवरावांच्या चित्तेकडे बघत,नाना फडणीसांनी शपथ घेतली, आम्ही राघोबांच्या वंशाला शनिवार वाड्यात पाऊलही टाकु देणार नाही. नियती हसत होती.
नाना विचारमग्न बसले असतां, पेशवाईचे थोर सेनापती परशुराम पटवर्धन आलेत.नाना म्हणाले,भाऊ, पेशवाईचे कोणतं पाप आडवे आले? एवढा तरणाबांड पोरगा सवाई माधवराव एकाएकी गेले.त्यात त्यांची पत्नी यशोदा बाईंच्या मांडीवर कुणाला दत्तक द्यावे तर ते बाजीराव आडकाठी घालू लागले.नाना विधिलिखित कुणाला टळले?
नाना!बाजीरावांनी पेशव्याच्या गादीवर बसण्यासाठी दौलतराव शिंदेना सव्वा कोट रुपये देण्याचं कबूल केलय! बेल भंडारासह करारनामा पाठवला.नाना म्हणाले,आम्ही जिवंत असेस्तोवर तरी बाजीराव पेशवाईच्या गादीवर बसणार नाही.त्यांचा लहान भाऊ चिमणरावांना बसवु!उद्या जुन्नरला जाऊन बाजीरावांशी मसलत करुन हवा तेवढा पैसा देतो म्हणावं,पण चिमणरावांना पेशवे होण्या साठी त्यांचे मन वळवा.परशुरामभाऊ जुन्नरला जाऊन नाना फडणीसांचा विचार ऐकवल्यावर बाजीरावांचा ठाम नकार असल्याचे नानांना पत्राद्वारे कळविल्यावर,खिन्न होत,कुणाला तरी गादीवर बसवणे भाग आहे,तेव्हा दोघांना घेऊन पुण्याला या.बाजीरावांनाच पेशवाई देऊ.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.


