पेशवाई संपुर्ण भाग ३, (११ ते १५)

कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा ............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या  स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! पेशवाई  !!!

भाग – ११.

       कोट्यामधे उतरलेल्या बाजीरावांच्या सैन्याने हरहर महादेवाच्या घोषणेत पात शहाच्या सैन्यास भिडली.कापाकापीला सुरुवात झाली.तलवारी खणखणू लागल्या.रक्तामासांचा चिखल होऊ लागला.अखेर पातशाही सैन्य जीव वाचवण्यासाठी दिल्लीच्या रोखाने पळत सुटले,ते बघुन मराठ्यांना चेव चढुन एकएकाला पकडुन मारुं लागले.

       नबाब निजाम मुन्मुलरव पातशहा समोर हजर होऊन तेच नाटक करुं लागला.आजही बंड आमच्या पाठी दिल्लीपर्यंत आलेलं आहे.कसा भरणा करावा?तेवढ्यात मराठी फौजेने दिल्ली ला वेढा दिल्याची बातमी घेऊन दूत आला.मराठ्यांशी समझौता केल्या शिवाय तरणोपाय नाही हे जाणून पातशहाने श्रीमंत बाजीराव पेशव्यांकडे दूत पाठवुन येण्याचे निमंत्रण दिले. बाजीराव अंबाजीपंतासह पातशहाच्या दरबारात  दाखल झाले. पेशवेंना त्यांच्या अटी विचारल्यावर ते म्हणाले,आमच्या मोहिमेचा खर्च तसेच पातशाही मुलखातील सनदा,सरदेशमुखी आणि चौथाईच्या मोकासा अंमलाच्या बाबी छत्रपती शाहू महाराजांच्या नांवे करुन द्याव्यात.पातशहाने सर्व अटी मान्य केल्यात आणि नबाबालाही माफ करुन त्याला दक्षिणेकडे पाठवून दिले.

           श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा पहिला विजय!याच लढाईत मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे पुढे आलेत. ऐके दिवशी तरण्याबांड मल्हारराव होळकरांवर बाजीरावांची नजर पडली. त्यांनी या हिर्याला लष्करात आणुन शिपाई बनवले.

         पेशवाईला सांपडलेला राणोजी शिंदे या अनमोल हिर्याला पैलू पाडले. राणोजी शिंदे हा मुळचा सातार्या जवळील कन्हेरखेडचा रहिवाशी! सुरुवातीला हा साधा शिपाई होता.पुढे मल्हाररावांसोबतच राणोजी शिंदेनी पराक्रम गाजवून पहिल्याच मोहिमेत स्वराज्याची धूरा उंचावली.

         बाजीराव पेशवे पहिला विजय व स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवून जेव्हा  सातार्यात दाखल झाले,तेव्हा स्वतः शाहू महाराजांनी स्वागत केले.

           बाजीराव पेशव्यांचा वाढता व्याप लक्षात घेऊन आणि सासवड आडवळणी पडत असल्यामुळे अनेक अडचणी येत असल्यामुळे शाहूमहाराजां च्या अनुमतीने व वंशपरंपरेने चालत आलेले कसबा पुणे इनाम दिल्यावर, बाजीरावांनी पुण्यात पेशवाईचा कारभार व्यवस्थित हाकण्यासाठी कोळ्यांच्या वस्तीसमोर वाडा बांधण्याची जागा निश्चित केली.ही लाल महालाच्या पश्चिमेस असलेली जागा बहिरजी व वाकोजी झांबरे पाटलांची असलेचे कळल्यावर त्यांना योग्य मोबदला देऊन जागा विकत घेण्यात आली.वाडा बांधे स्तोवर पेशवे कुटुब तात्पुरते पुण्यातील धडपड्यांच्या वाड्यात राहायला आले.

         १७२७ साल! निजाम ठरलेल्या अटी प्रमाणे वागेनासा झाला.शाहूराजें विरुध्द बंडाची भाषा करुं लागला.चौथाई देणे बंद केले.विचारणा केल्यावर म्हणाला, आम्ही नेमकी चौथाई कोणाला द्यायची? कोल्हापूर संभाजी राजेंना की सातारकर शाहूमहाराजानी?प्रथम घरची भांडणे मिटवा,मग चौथाई कोणाला  कोणाला द्यायची ठरवू!

        शाहू महाराजांनी पेशव्यांशी चर्चा केल्यावर बाजीराव म्हणाले,महाराज! घरच्याच लोकांशी लढुन कदाचित डाव उलटा पडला तर निजामाला आयतीच संधी मिळेल,व झडप घालुन स्वराज्याला अंकित करेल.उलट निजामाची नाडी आवळणे योग्य ठरेल.शाहूराजेंना विचार पटल्याने नबाबावर चालून जाण्याची आज्ञा दिली.परंतु,सावधान!हा सामान्य शत्रू नाही.क्रूर औरंगजेबाच्या हाताखाली तयार झालेला कडवा सेनापती आहे. प्रचंड सैन्यानिशी बाजीराव निघाले. व पालखेड येथे नबाबाचा जबरदस्त पराभव केला.शेवटी जेरीस येऊन निजामाने १० मार्च  १७२८ ला मुंगी येथे तह करुन स्वतःची सुटका करुन घेतली.

        या मोहिमेमुळे औरंगजेबचा सेनापती निजामाचा पराभव केल्यामुळे बाजीरावांचे नांव सर्वत्र गाजू लागले. मराठ्यांचा दरारा पसरला.मग मात्र कुणाही पातशहाची स्वराज्याकडे ढुंकुन बघण्याची हिंमत नव्हती.

     छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची महूर्तमेढ रोवली तर श्रीमंत बाजीरावांनी या स्वराज्याचे रुपांतर होण्यासाठी नव्या युध्दतंत्र व नव्या युध्द कलेला जन्म दिला.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख..

!!!  पेशवाई  !!!

भाग – १२.

          बाजीरावांनी सैन्याची पुर्नरचना केली.घोडदळात वाढ केली.गनिमी काव्याचं नवीन तंत्र विकसित करुन शत्रूची गाळण उडवली आणि बराचसा टापू स्वराज्याशी जोडला गेला.होळकर, शिंदेच्या करवी माळवा,बालगाण आणि खानदेश प्रांत हस्तगत केला.

          याचवेळी मोगल सुभेदार गिरीधर माळवा प्रांत सांभाळत होता.सवाई जयसिंग सुभेदारही याच माळवा प्रांताची सुभेदारी सांभाळत होता.परंतु सुभेदार गिरीधर व जयसिंगाचे पटेना.गिरीधर सुभेदारचा काटा काढण्यासाठी सवाई जयसिंगने बाजीरावांशी संधान बांधले. बाजीरावांनी आपले धाकटे बंधू जे सदैव त्यांच्या पाठी असायचे त्यांना फौज घेऊन गिरीधर सुभेदारावर पाठवले.या झंझावती वादळाने माळवा प्रांती जाऊन गिरीधर सुभेदारावर वाघासारखी अचानक झडप घालून मांडवगडजवळ आमझरा येथे त्याला ठार करुन यशाची पहिली तुतारी फुंकली.चिमाजीआप्पाचं हे पहिलं यश!

            १७२९ साली काशीबाईंनी द्वितिय पुत्र रघुनाथरावांना जन्म दिला. बाजीरावांचं कर्तृत्व झळाळत असतानाच आसमंतात कृष्णमेघांची दाटी झाली. याच कृष्णमेघदाटीत एक स्वप्नसुंदरी, अतृप्त हरिणी,जिच्या पावलांमागे लपलं होतं एक काळग्रहण,राऊंच्या आगमनाची वाट पाहत होतं.

          वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आईबापाच्या वियोगाने पोरक्या झालेल्या छत्रसाल बुंदेलाने जगण्यासाठी मोगल शाहीचा आश्रय घेतला.बहादूरशहा नावां च्या सरदाराबरोबर देवगडच्या युध्दात जखमी झाल्यावरही किल्ला जिंकला. छत्रसालला वाटले,दिल्लीचा  बादशहा खूष होऊन अपला सन्मान करेल,पण बहादूरने हा पराक्रम स्वतःच केला असे खोटे सांगुन बादशहाने त्याची मनसब वाढवली.छत्रसाल बुदेलाला अतिशय वाईट वाटले.याचवेळी छत्रपती शिवाजीं चे नांव गाजत होते.त्याने शिवाजीराजेंची गाठ घेऊन आपली व्यथा कथन केली. महाराजांनी त्याच्या हाती तलवार सोपवत म्हणाले,बुंधेला!स्वातंत्र्याला रक्ताचा अभिषेक करावा लागतो. महाराजांचे अलौकिक शब्द मनाच्या गाभार्यात कोरुन सुरु झाला महासंग्राम! आणि मग छत्रसाल बुंदेलेने तहवरखाॅं,अन्वरखाॅं,सदरुद्दीन हमीदखान सारख्या शूर सरदारांचा जबरदस्त पाडाव करुन बराचसा मुलूख जिंकून यशस्वी मुहूर्तमेढ रोवली.पुढे छत्रसाल बुंदेलेने  मुलादाखान,दलोलखान,सैद अफगाण,शाहकुली सरदारांचा प्रचंड पराभव करुन यमुना आणि चंबळ नद्यांचा दक्षिण प्रांताचा म्हणजेच बुंदेल खंडाचा महान राजा बनला.पुढे वय झाले दोन मुले हाताशी आले,परंतु मोगलांची  भीती कांही संपली नव्हती.

             एके  दिवशी हेरांनी वार्ता आणली.अहमदशहा बंगश चालून येत आहे.राजा छत्रसालाचा गोंधळ उडाला. त्याच्या समोर श्रीमंत बाजीराव पेशवेंचा चेहरा आला.तेच वाचवु शकतात.लगेच वकीलामार्फत पत्र पाठवले,त्यात लिहिले “जो गति ग्राह गजेंद्रकी,सो गति जानहु आज।बाजी जान बुंदेल की राखो बाजी लाज।। माणुसकीची ती हाक ऐकून बाजीरावांनी शाहू महाराजांशी सल्ला मसलत केली.आणि बुंदेलखंडात जाऊन राज्याच्या बंदोबस्त करण्याची आज्ञा दिली.

         २५००० हजार फौज घेऊन बाजीराव पेशवे बुंदेलखंडात दाखल झाले.छत्रसालशी मसलत करुन तुफान वेगाने बाजीराव ससैन्य बंगेशकडे निघाले मराठ्यांनी बंगशची रसद तोडली.त्याने बादशहाला रसद मागीतली पण आली नाही.बंगशचा मुलगा कैमखान बापाच्या मदतीस आला.पण जयपूरजवळ त्याचा पराभव केला.अखेर बंगश माफी मागत म्हणाला,यापुढे आम्ही छत्रसाल राजावर स्वारी करणार नाही.बाजीरावांनीही मोठ्या मनाने बंगशला सोडुन दिले.

         छत्रसाल राजाने खास दरबार भरवून श्रीमंत बाजीराव पेशवेंचा यथोचित सत्कार करुन कालपी,सागर, झाशी,सिरोंज आणि हरदेनगर याशिवाय  वार्षिक महसूल म्हणून सालाकाठी ३३ लाख रु.देण्याचे मंजूर केले.राजा म्हणाला,बाजीराव आम्हाला दोन बेटे आहेत,आतां आपणास तिसरा बेटा मानतो.आपल्याला एक अनमोल तोहफा देत आहोत,स्विकार करावा.बाजीराव उत्सुकतेने बघत राहिले.तेवढ्यात इशारत होताच दहा बारा दासींच्या घोळक्यात बुरखा घातलेली स्वप्नसुंदरी राजदरबारात पोहोचली.छत्रसालने तिचा हात बाजीच्या हाती देत म्हणाले,ही माझ्या जिवाचा तुकडा,लाडकी कन्या  आपल्याला अर्पन करीत आहे.तिचा स्विकार व्हावा.येवढा महाप्रतापी पुरुष तिच्या कांतीपुढे वितळला.

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – १३.

        राजा छत्रसालला ही मस्तानी यवन कंचनीपासून झालेली होती.तिला सर्व कला विद्येत निपून केले.नृत्य गायनात तर निपून होतीच त्याच बरोबर घोडदौड, भालाफेक,सर्व प्रकारची शस्रे चालवण्यातही चांगलीच तरबेज होती. छत्रसाल राजाने तिचा विवाह बाजीरावां शी लावून दिला.कांही दिवस पाहुचार घेऊन प्रिय पत्नी मस्तानीला घेऊन बाजीराव पुण्यात दाखल झाले.काशीबाई औक्षणाचं ताट घेऊन आल्या,तर  त्यांना काय दिसले?आपल्या पतीसोबत १६-१७ वर्षाची तरुणी?काशीबाईंना अंदाज आला.चेहरा काळवंडला. बाजीरावांना औक्षण करत विचारले, स्वामी,ही कोण?काशी ही आमची सखी, अर्धागिनी,हवं तर तुमची सवत म्हणा! आमचा अंदाज खरा ठरला तर!त्या मस्तानीला घेऊन आंत निघून गेल्या.

         रात्री एकांतात राधाबाईंनी राऊची कानउघाडणी केल्यावर,राऊ शांतपणे म्हणाले,आम्ही कुठलेही थेर केलेले नाही. रीतसर विवाह करुन धर्मपत्नी म्हणून आणलय!आम्हाला वेड लागलेलं नाहीय! आमच्या वडिलांनी अंगवस्र ठेवलेलं तुम्हाला चाललं,त्यांना चाकराची स्री देखील पुरली नाही.त्या स्रीपासुन भिकाजी शिंदेला जन्म दिला,हे सर्व तुम्हाला चाललं.आम्ही तर विवाह करुन आणली.राऊss राधाबाई केवढ्यांदा तरी ओरडल्या.राऊ ताडताड पाय आपटत निघून गेले.

            त्यारात्री राऊ घशात मद्याचे प्याल्यावर पेले रिचवत होते.मस्तानी त्यांचं सांत्वन करीत होती.मस्तानी,तुझ्या बद्दल आमच्या मनांत अजिबात शंका नाही परंतु जातीयवाद,धर्मवाद आणि वंशवाद हा माणसाला लावलेला मोठा डाग आहे.तो डाग पूर्णतः जाणार नाही पण कांही अंशी कमी होण्यासाठी तुला स्वतःला बदलून पुजापाठ,रीतिरिवाज, संस्कृती,परंपरा,बोलीभाषा,ज्ञान आत्मसात करुन आमच्या कुटुंबाची मने वळविण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ते स्विकार करतील.स्वामी! सर्व आपल्या मनाप्रमाणे होईल.आणि खरोखरच मस्तानीने स्वतःला नखशिखांत बदलवून घेतले.तिने त्यांच्याकडून वचन घेतले, काशीबाईंना कधीही अंतर देणार नाही. केवढा हा मनाचा उदारपणा?

        वाड्याची पायाभरणी व वास्तुशांती शनिवारला झाली.आणि वाड्याला नांव दिले शनिवारवाडा!पेशव्यांचा शनिवार वाड्याची वास्तुशांती २२ जानेवारी १७३२ ला झाली.या मधल्या काळांत १७३० मधे राऊंचा जेष्ठपुत्र नानासाहेबां चा विवाह गोपिकाबाईंशी झाला.

          बाजीराव एक रणधुरंधर सेनापती त्यांनी होळकरांना इंदौर प्रांताची सुभेदारी दिली.भोसल्यांना नागपूर,पवारांना धार प्रांत,शिंदेंना ग्वाल्हेर प्रांत आणि बडोद्याला गायकवाडांची अधिसत्ता उदयास आली.एवढच नव्हे तर दिल्लीची पातशाही,बुंदेलखंड,जंजिर्याचा सिद्दी, वसईकर मंडळी आणि पोर्तुगीज यांनाही जेरीस आणुन स्वराज्याच्या अधिपत्या खाली आणण्यांत यश मिळवले होते.

        या साम्राज्य विस्तारांत चिमाजी अप्पांची त्यांना मोलाची साथ मिळाली. पालखेडची ,डभईची,भोपाळची लढाई,

बुंदेलखंडाची,वसईची मोहिम आणि औरंगबादचं युध्द असे एकापेक्षा एक उज्वल टप्पे गाठून बाजीरावांनी चारही दिशांना साम्राज्य विस्तारला होता.

           हा झंझावती काळ सुरु असतांना प्राबळ,कोथरुडमधे मस्तानीसोबत धुंद रात्रींचा अनुभव घेतला.या अलौकिक प्रेमातूनच १७३४ साली समशेर बहाद्दर नांवाचा मुलगा जन्माला आला.इकडे काशीबाईंनाही १४ जुलै १७३५ रोजी जनार्दन नांवाचा मुलगा झाला.नाना साहेब,रघुनाथराव आणि समशेर बहाद्दर अशी चार फुलं बाजीरावांच्या आयुष्यात फुलली.सर्वीकडे एकाच नावाचा डंका वाजु लागला…श्रीमंत बाजीराव पेशवे! खरोखरच बाजीरावांनी स्वराज्याला सोन्याचे दिवस आणले.पण! घरांत?त्यांच्या विरोधात त्यांच्याच जिवाभावा च्या माणसांनी मस्तानीवरुन  त्यांना नकोसे करुन टाकले.त्यांनी शनिवार वाड्याच्या आवारांतच मस्तानीसाठी स्वतंत्र महाल बांधला.आई राधाबाईंना म्हणाले,आम्ही समाजाची पर्वा करत नाही.आम्ही मोगलांचा बिमोड करतो म्हणुन यांच्या गळ्यातील यज्ञोपवित सुरक्षित आहे.त्यांना जर बहिष्कार टाकायचा तर टाकू द्या.राधाबाईचा नाईलाज झाला.राऊंना अडवणे त्यांच्या आवाक्या बाहेर होते.

            क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – १४.

          १७३६ साली मस्तानीसाठी बांंधलेल्या महालात बाजीराव रहायला आले.जयपूरहुन खास कारागिर बोलावुन स्वतःचा स्वतंत्र दिवाणखाना व मस्तानी महल सुंदर सुंदर कलाकृतींनी सजवुन घेतला.

          एके दिवशी एकांतात काशीबाईं ना बाजीरावांनी विचारले,काशी!आम्ही चुकलो असे तुम्हाला वाटते कां?नाही स्वामी!तुमच्या मनाचं पावित्र्य आम्ही जाणतो.मस्तानीबद्दल आमच्या मनात अजिबात आकास नाही.तीने इतक्या अल्पावधीत सर्व हिंदु संस्कृतीचे रीति रिवाज आत्मसात केले आम्हाला खरं वाटत नाही.आपण तिची काळजी करुं नये.तिला दगाफटका होणार नाही. आपण निश्चिंतपणे मोहिमेवर जावे.

         शनिवारवाड्यात कृष्णाष्टमीचा सोहळा सुरु झाला.सुवासिनी टिपर्यांवर फेर धरुं लागल्या.नृत्यकलेत पारंगत मस्तानीनेही नृत्याचा सुंदर अविष्कार घडविला.तीचे अप्रतिम नृत्य बघुन सारे अचंबित झाले,पण राधाबाईच्या मनात वेगळीच ठीणगी पडली.राऊपासुन तीला वेगळं करण्याचा उपाय सांपडला. तीच्या नाचण्यावरुन बदनाम करायचे,ठरले!

          शनिवारवाड्यात विषवल्ली सळसळली.कृष्णकृत्याला सुरुवात झाली.राधाबाई,चिमाजीअप्पा आणि नानासाहेब यांच्यात खिचडी शिजू लागली.राधाबाई म्हणाल्या,मस्तानीने जर समशेर बहाद्दर साठी पेशवाईत वाटणी मागतली तर पेशवाई बुडलीच समजा!आणि पेशवाईचा ओघ जाईल बुंदेलखंडात.अप्पा,नाना वेळीच सावध व्हा!मस्तानी विरोधाची आगपाखड झाल्यावर,मस्तानीला शनिवारवाड्यातुन बाहेर काढण्याचा कट निश्चित झाला.

           पवित्र मनाची मस्तानी सर्वांशी प्रेमाने,आदराने,मनमोकळेपणे वागत असे.पण काशिबाई सोडल्या तर,फारसं कुणी तीच्याशी बोलत नव्हते.राधाबाई तर अपशकुनी म्हणुनच वागत होत्या. मोहिमेवर गेलेल्या बाजीरावांची चातका प्रमाणे मस्तानी वाट बघत होती. बाजीरावांच्या पश्चात एकटेपण तीला खायला उठे.मग ती समशेरला विविध गोष्टी शिकवण्यांत वेळ घालवी.

          बाजीराव मोहिमेवरुन परतल्यावर  समशेर बहाद्दरच्या मुंजीची तयारी केली पण एकही ब्राम्हण तयार नव्हता.सर्वांनी बहिष्कार घातला.एवढच काय,त्याच्या विवाहासाठी अनेक हिंदू मुलींसाठी मागणी घातली पण कुणीही पुढे आले नाही.अखेर बर्याच विणवण्या केल्यावर  निबागिरीकरांची कन्या मेहरबाईशी विवाह जुळला.परंतु त्यांच्या समोर व्हावा हे नियतीला मान्य नव्हते.त्यांच्या पश्चात १८ आक्टोबर १७५३ साली समशेरचा विवाह मेहरबाईशी झाला.

        एवढा मोठा योध्दा,अटकेपार झेंडा फडकवणारा,पण त्यांच्याच स्वकियांनी बहिष्कार घातला.हा फार मोठा आघात होता.त्यामुळे त्यांचे मद्यसेवन वाढले. मीतभाषी,प्रेमळ राऊ, सरदार शिलेदारां वर शुल्लक चुकांसाठी ओरडू लागले.

        शनिवारवाड्यात डावपेना उधान आले.श्रीमंत बाजीराव पेशवे मोहिमेवर निघून गेले.इकडे रस्ता मोकळा झाला. राधाबाईंच्या सांगण्यावरुन,नानासाहेब मस्तानी महालात दाखल झाले.नाना साहेबांचं मोकळं वागणं बोलणं पाहुन मस्तानीही मोकळेपणे बोलत असे.अनेक विषयांवर चर्चा घडूं लागल्या.माता-पुत्रा ची चांगलीच मैत्री जमली.नानासाहेब बघावं तेव्हा मस्तानी महालाकडे जातांना दिसू लागले.हसण्याखिदळण्याचा आवाज बाहेर कानी पडू लागला.राधा बाईचं षडयंत्र आकारास येऊं लागला. लोकं मस्तानी महालाकडे संशयाने बघू लागले.कुजबुज वाढली.आणि पुण्यात अफवांचे पिक फुटले.

         श्रीमंत बाजीराव पेशवे मोहिमे वरुन येतअसल्याची बातमी नुकतीच मस्तानीला मिळाल्यामुळे ती छान नटून थटून सजली होती.नानासाहेब आल्यावर  तिच्याकडे बघतच राहिले.त्यांची “ती” नजर ओळखायला मस्तानीला वेळ लागला नाही.मस्तानी थरारली,मनांतून घाबरली.नानासाहेब म्हणाले,तुमच्या सौंदर्याची आमच्यावर मोहिनी घातली. खूप सुंदर दिसताहात.हा देह….

         नानासाहेब!मस्तानी जोराने ओरडुन म्हणाली,आम्ही तुमच्या धाकट्या आईसाहेब आहोत,हे विसरलांत कां?

ही गोष्ट स्वामींना कळली तर ते तुम्हाला उभं चिरतील…चालते व्हा…परत तोंड दाखवु नका.अपमानीत नानासाहेब निघून गेल्यावर,आतांपर्यंत आवरुन धरलेलं अवसान गळून पडलं..मस्तानी ढसाढसा रडू लागली.

            क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – १५.

         कपटकारस्थान करणार्यांचा एक डाव फसला की,दुसरा डाव टाकण्या साठी दुप्पट जोमाने नवीन खेळी खेळण्यास तयार होतात.राधाबाईचा डाव फसला आणि चिमाजींच्या हाती आला. चिमाजीआप्पा जे सावलीसारखे राऊच्या पाठीशी असत,आज तेच कारास्थानात सामील झाले.एका बंद खोलीत राधाबाई चिमाजी अप्पा आणि नानासाहेब नवीन कट करीत होते.मस्तानी महालाला भरपूर बंदोबस्ताचा पहारा असल्यामुळे महालात मस्तानीला कैद करणे शक्य नव्हते,म्हणुन युक्क्ती प्रयुक्तीने मस्तानी ला महालाबाहेर बागेत आणायचे,कैद करुन कोथळातल्या धनगडावर सडवत ठेवण्याची योजना पक्की झाली.ठरल्या प्रमाणे मस्तानीला कैद करुन बंदिवासांत फेकून दिले.मरणयातनेची कैद!मस्तानी च्या मनाचा बांध फुटला.टाहो फोडुन प्रत्येक भिंतीला जबाब विचारुं लागली, माझा अपराध काय?प्रेम करणे हा गुन्हा आहे कां?तिच्या मनाचा तळतळाट झाला आणि शनिवारवाड्याला शाप मिळाला,या वास्तुत कुणीही सुखी राहणार नाही.

       १७३९ च्या अखेरचा काळ!राऊ अचानक शनिवारवाड्यात परतले. पण मस्तानी कुठेच दिसेना.ज्याला त्याला विचारले पण कुणीच सांगु शकले नाही. त्यांच्या ह्रदयाची शकलं शकलं झाली.व ते मद्याच्या पूर्ण अहारी गेले.खाण्या पिण्याची कशाचीच शुध्द त्यांना राहिली नाही.अरे!कुठे आहे आमची मस्तानी व समशेर बहाद्दर?

         राधाबाईंना राऊंची अवस्था बघवत नव्हती.जवळ येऊन मायेने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, कां जीवाला जाळतां?चला दोन घास खाऊन घ्या.थोडे सावरुन राऊ म्हणाले, आईसाहेब!तुमचा राऊ आज या गृह कलहात अडकून कायमचा मेला.जातो आम्ही असे म्हणून वाड्याच्या बाहेर येऊन,शनिवारवाड्याच्या सात मजली उंच इमारतीकडे डोळे भरुन बघीतलं, कदाचित शेवटचचं!अबलख घोड्यावर मांड टाकली व कुरकुंभला पोहोचले. तेथील पिंरगाईदेवीजवळ मन मोकळं करुन पाटसला पोहोचले.आतां परत पुण्यास जाणेच नको.सांभाळु देत पेशवाई नाना आणि चिमाजीअप्पांनाच!

          कांही दिवसांनी नासीर जंगावर चालुन जाण्यासाठी,छत्रपतींचे फरमान आले.नासीरजंगावर चालुन जाऊन त्याचा जबरदस्त पराभव केला.२७ फेब्रु.  १७४० ला नासीरजंगाने मुंगी पैठणला तह करुन स्वतःची सुटका करुन घेतली. नंतर राऊ नर्मदा किनारी असलेल्या रावेरखेडीला आले.यावेळी चिमाजीअप्पा ही या मोहिमेवर आले होते.बाजीराव त्यांना कळकळीने विनवत म्हणाले,अप्पा  तुम्ही पुण्यात गेल्यावर माझी मस्तानी व समशेर बहाद्दरला इकडे पाठवून द्या.

          चिमाजीअप्पा पुण्यांत पोहोचले आणि सातार्याहुन छत्रपती शाहूराजेंचे पत्र आले.त्यांनी लिहिले होते,राजश्री राऊ यास खटे करुं नये,त्यांची वस्तु त्यास द्यावी.त्यांचे समाधान करावे.

         राधाबाई,नानासाहेब आणि चिमाजीआप्पांची मसलत झाली.मस्तानी ऐवजी काशीबाई आणि पुत्र जनार्दनला रावेरखेडीला पाठवले.परंतु घात झाला. ताप असतांनाही त्यांनी नर्मदेत स्नान केल्याने विषमज्वर झाला.उपाययोजनेनं ही ताप हटेना.ते अंथरुणाला खिळले. अर्धवट शुध्दी बेशुध्दीच्या सीमारेषेवर असुनसुध्दा अडखळत्या स्वरांत मस्तानीचाच ध्यास घेतला होता.अखेर २८ एप्रील १७४० ला पहाटे राऊ पैलतीरी कायमचे निघून गेले.पुत्र जनार्दनने राऊंच्या देहाला अग्नि दिला.

           इकडे मस्तानीची अवस्था पाण्यातून काढलेल्या माशासारखी झाली तिने कैदेतून सुटका करुन घेऊन रावेरखेडीकडे निघाली असतां वाटेत पाबेळलाच राऊच्या मृत्युची बातमी मिळतांच वायुवेगाने खंजर स्वतःच्याच पोटात खुपसुन घेतला.आणि अशा तर्हेने दोन प्रेमी जीवाचा करुण अंत झाला.एक पर्व संपले.

        त्यादिवशी रावेरखेडीवरुन काशी बाई व पुत्र जनार्दन राऊंचा अस्थिकलश घेऊन पुण्याला परतले.नानासाहेब कुलाब्यावरुन पुण्यास परतले आणि शनिवारवाड्यांत एकच आकांत उठला. नानांनाही पिताश्री गेल्याचे अनावर दुःख झाले.केल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप झाला.मस्तानीआईसाहेब आम्ही आपले अनंत अपराधी आहो.क्षमा करा आम्हाला….क्षमा करा….आणि नानासाहेब ढसाढसा रडूं लागले.शेवटी त्यांना सावरलं ते काका चिमाजीअप्पानी

          नाना,शोक आवारा! नियतीने डाव साधला…आतां पुढच्या तयारीला लागले पाहिजे!बाजीरावांचे दिवस उरकले.सारा शनिवारवाडा दुःखात बुडुन गेला.चिमाजींना समोर बघून राधाबाईचा बांध फुटला,आप्पा हे काय होऊन बसले चिमाजींना त्यावेळी अश्रू आवरतां आले नाही.आईसाहेब!शोक आवरा!उद्या नानांना घेऊन सातार्याला जात आहोत..

               क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख

पेशवाई संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading