
अंतःकरणाला जबरदस्त पीळ पाडणारी आणि मनःचक्षुसमोर ह्रदय द्रावक देखाव्याचे चित्र उभे करणारी ती दादासाहेबssss म्हणुन ज्योत्याजी केसकरांनी मारलेली हाक ह्रदय पिळवटुन निघाली.आयुष्यभर ज्या धन्याच्या सेवेत सबंध आयुष्य घालवले त्या धन्याच्या रक्षामिश्रित अविशिष्टावर चार …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! छत्रपती राजाराम म.चरित्र!!!
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – २६.
दिलेरखानने बाजी व सुभानजी ला मीराला आणायला सांगीतले,पण सुभानाला टाळुन बाजी पुढे निघुन गेला. बाजी आपल्याला टाळुन गेलाचे पाहुन त्याने वेगळाच व्यूह रचला.बाजी तुळापुरला पोहचण्या आधीच आपणच मीराला हस्तगत करुन खानाकडे नेऊन बक्षिस उकळण्याचा मनसुबा केला. खानाने दोघांनाही घोडे व वाटखर्च दिला होता.सुभाना मागुन येत असल्याची बाजीला कल्पना नव्हती.बाजी नगरहुन निघोजला आला.तिथल्या गावाच्या वेशी वरच्या देवळात मुक्काम करुन तुळापुर ला जाऊ या विचारात आहे तोच दोन बेरड हटकरी भालेरावांच्या सैन्यातील देवळात आले.त्यांनी बाजीला ओळखले. अचानक सुभानजीही तिथेच पोहचला. आपल्या गोड बोलण्याने त्या हेटकर्यां कडुन अंगठीची हकिकत ऐकल्यावर, बाजी व सुभानजी मधे दिलजमाई होऊन सुभान्याने मीराला आणण्यास जावे व बाजीने त्याला मोहिनी वनस्पती देऊन पांडवगुहेत वाट पाहण्याचे ठरविले. त्या प्रमाणे मीराकडे जाऊन तीचे दोन्ही बंधु पांडवगुहेत गंभीर जखमी अवस्थेत आहे.
अंगठीची हकिकत सांगीतल्यामुळे मीराचा विश्वास बसला.व त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाली.तिने गांवच्या पाटलाकडुन घोडा मिळवला.समाधीला मनोभावे नमस्कार करुन सुभानजी बरोबर निघाली.
सुभानजीच्या डोक्यात वेगळाच विचार आला.हाती लागलेली मीरा,बाजी च्या नकळत खानाकडे न्यावे.घोडे थकल्यामुळे एखाद्या गावांत मुक्काम करावा या विचारांत असतांना,एक वृध्द
डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन जातांना दिसल्यावर,त्याच्याकडे कुठे मुक्काम करावा असे विचारले असतां, जवळच सोनगांला आपल्या घरीच मुक्कामास येण्याचे निमंत्रण दिले.तो वृध्द होयबा चव्हाण!मागे ज्योत्याजी केसकरने त्याला संकटातुन वाचवले होते
मीरा व सुभानजी त्या वृध्द चव्हाणा कडे आले.जेवणखान झाल्यावर,मीराने सांगीतले की,माझे भाऊ पांडवगुहेत जखमी अवस्थेत असुन त्यांच्या भेटीस जात आहे,सांगीतल्यावर चव्हाण म्हणाला,बहुतेक तुम्ही वाट चुकलात असे बोलणे सुरु असतांनाच,बाजीचा सुभानजीवर विश्वास नसल्यामुळे तोही माग काढत तिथे येऊन पोहोचला.आणि दोघांच्या बाचाबाचीवरुन दोघांनी मिळुन आपल्याला फसवुन आणल्याचे तीच्या लक्षात आल्यावर दोघांना निघुन जाण्यास सांगीतले.दोघांत हातापायी पण झाली.म्हातारे जोडपे भयभीत होऊन एका कोपर्यात उभे होते.तेवढ्यात दुरुन टापांचा आवाज आल्याने सुभानजीने तीला चलण्याची घाई करत होता,ती म्हणाली मी तुम्हा दोघांबरोबर येणार नाही.मला फसवुन…
मुकाट्याने नाही आलीस तर उचलुन नेईन असे म्हणुन त्याने तिचा हात धरला.ओरडुन हात सोडवण्याच्या प्रयत्नात असतांनाच त्याने तिच्या तोंडावर मोहिनी वनस्पती टाकली.मीराने एक ह्रदयभेदक फोडली व दुसर्याच क्षणी बेशुध्द होऊन धाडकण जमीनीवर आदळली.तीची किंकाळी,त्याचवेळी सोनगांवात शिरलेल्या चार स्वारांच्या कानी पडली.किंकाळीच्या रोखाने ते झोपडीजवळ पोहोचले.म्होरक्या तलवार उपसुन झोपडीत शिरला.एका कोपर्यात भीतीने थरथर कापत वृध्द जोडपे उभे, मीरा जमीनीवर अस्तव्यस्त बेशुध्द पडलेली,आणि बाजी व सुभानजी एकमेकांकडे खुनशी नजरेने संधीची वाट बघत ऊभे दिसले.मीराकडे लक्ष जाताच म्होरक्याने तीला ओळखले.
म्होरक्या पुढे होताच सुभानजी त्याच्या अंगावर धावुन गेला.बाजीही मागे राहिला नाही.त्यांच्यात झटापट होऊन नरोबाने दोघांना कैद केले.उद्या बादशहाचा एक सरदार लष्करासह या बाजुने जाणार म्हणुन गांवाला सावधते चा इशारा देण्यासाठी सेनापती संताजीने पाठविले होते.मीराला सेनापतीच्या गोटात नेण्यासाठी बेशुध्दावस्थेत उचलुन अलगद घोड्यावर बसवले.तीची बेशुध्दी उद्या यावेळपर्यंत उतरणार नव्हती.नरोबा आपल्या साथीदारांसह मीरा व दोन कैद्यां सह मालप्याच्या घाटात सोनके मुक्कामी सेनापती संताजीच्या छावणीत मध्यरात्री पोहचले.
संताजीच्या छावणीत अगदी सामसूम होती.अर्ध्या मैलांच्या अंतरावर देखील मागमूस नव्हता.एवढी कडक शिस्त संताजीने सैन्यात ठेवली होती. एवढ्या अल्पाधित बादशहाच्या प्रचंड सेनेला संताजीने सळो की पळो करुन सोडले होते ते याच गनिमी काव्यानेच! राजारामांना चंदीला पोहचवुन परत आल्यावर बादशहाच्या एकाही सरदाराला कर्नाटकास जाऊ द्यायचे नाही या निर्धाराने त्यांनी स्वराज्याची हद्द वाटुन घेतली होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-६-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – २७.
विशाळगडावरुन लांबचा पल्ला अल्पावधी पार करुनन मालप्याच्या घाटा पर्यंत थकलेली सेना विश्रांती घेत असल्यामुळे संताजीच्या छावणीत सामसूम होती.तोच नारोबा आपल्या साथीदार,कैदी व मीरेसह घेऊन येत असल्यामुळे त्यांच्या घोड्यांच्या टापांनी छावणीतील प्रत्येक सैनिक सजग होऊन शस्रसज्ज होऊन सेनापतीच्या आज्ञेची वाट पाहत ऊभे राहिले.क्षणार्धात चुडी पेटवुन सर्वत्र उजेड करण्यांत आला. नरोबाने आपला घोडा सरळ सेनापती च्या बिचव्याजवळ नेला.त्याच्याबरोबर मीराला पाहुन,चौकशी केल्यावर नरोबाने सर्व हकिकत कथन केली.बेशुध्द मीराला बिचव्यातील अंथरुणावर निजवले. संतापाने बेभान झालेल्या संताजीने एकदम गर्जना करुन बैलवाल्याला आसुड आणण्याचा आदेश दिला व दोघेही जमीनीवर लोळेपर्यंत त्यांचेवर आसुड ओढण्याची आज्ञा केली.मार खाऊन बेशुध्द झाल्यावर छावणीबाहेर एखाद्या झाडाखाली नेऊन टाकण्याचा हुकुम केला.
सातारच्या किल्ल्यात असलेल्या सुभेदार प्रयागजीच्या बायका मंडळी असल्यामुळे मीराची व्यवस्था तिथे करणाण्याचे ठरवले.वास्तविक नारोबा अतिशय थकला होता.पण मीराविषयी त्याच्या मनांत पुज्यभाव असल्यामुळे व धन्याने आपल्यावर विश्वास दाखवल्याने ही जबाबदारी आनंदाने स्विकारली. तात्काळ डोलीची व्यवस्था केली.चार खंदे डोलकर व चार स्वार घेऊन तो सातार्याकडे रवाना झाला.रस्ता किर्र झाडीचा,डोळ्यात बोट गेले तरी समजणार नाही असा भयाण काळोख, प्रदेश डोंगराळ,वैशाख महिना असल्या मुळे दिवसा डोंगर व खडक भयंकर तापत व रात्री तेवढाच गारठा पडे. त्या मुळे अतिशय थंडी,शिवाय हिंस्र श्वापदांचा स्वैर संचार या सर्व आपत्तींना न जुमानतां नारोबा अविरत चालत होता.
पहाटेच्या सुमारास सर्वांसह नारोबा सातारा किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर पोहोचले.सेनापती संताजी घोरपडे कडुन मनुष्य आल्याचे कळताच, स्वतः सुभेदार प्रयागजी बाहेर आले. नारोबाने थोडक्यात हकिकत सांगुन, येण्याचे प्रयोजन सांगुन मीराला त्यांच्या स्वाधीन केले.परंतु सातारा किल्लाही सुरक्षित नव्हता.नुकतीच हेरांची बातमी आली की,तर्बियतखान व सर्जाखान हे दोन सरदार बादशहाच्या हुकुमाने सातार्यावर चालुन येत आहे.त्यामुळे सुभेदारांनी पोतनिसांच्या दोन मुलींना सोबत देऊन मीराला विशाळगडी पाठवण्याची व्यवस्था करण्याचे ठरले! प्रयागजी म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ थोरल्या महाराजांपासुन त्यांनी शर्थीने सेवा करुन आज ४० वर्षापासुन ते परळी व सातारा या दोन परगण्याची सुभेदारी सांभाळुन होते.जुन्या सुभेदारांत तेच एक अनुभवी स्वराज्यात होते.
सकाळच्या सूर्यकिरणांबरोबरच संताजींच्या फौजेने कुच केलेले पाहुन, जखमी सुभानजी व बाजीने उठण्याचा प्रयत्न केला पण,शक्य झाले नाही. तेवढ्यात तिथुन जात असलेल्या वाटसरु ची दृष्टी त्यांच्यावर पडली.अरेरे! काय ही हालत?हा कोंडो विठ्ठल नुसतां वैदिक ब्राम्हणच नाही तर,प्रत्यक्ष अश्विनीकुमार आहे.सुभानजीने त्याला दोन मोहर्या देऊन औषौधोपचार करण्याची विनंती केली.ब्राम्हण त्यांचावर उपचार करीत होता आणि हे दोघे संताजीवर कसा सूड उगवायचा हा विचार करत होते.
विशाळगडी राजारामांची पत्नी ताराबाईंना १६९१ ला शिवाजी नांवाचे पुत्ररत्न प्राप्त झाले.सुभेदार प्रयागजीने पाठवलेल्या दोन मुली कामाक्षी व कैकई कडे,अमात्य रामचंद्रपंतानी मीरेची चौकशी केली असतां ती अअद्यापही बेशुध्द असल्याचे सांगण्यात आले.स्वामी ब्रम्हेंद्रांंनी सांगीतलेली मोहिनी ओषधी किती जाज्वल आहे याची प्रचिती मीरावर झालेल्या प्रयोगाने आली.
सायंकाळी मीरा शुध्दीवर आल्या वर सर्व अनोळखी वातावरण व बायांना पाहुन विचारले,मी कुठे आहे?कोणी आणले?कामाक्षीने थोडक्यात सर्व सांगुन,नारोबांनी त्या चांडाळापासुन कसे सोडवले सांगीतले.तेवढ्यात ताराबाईंचा बुलावा आल्यावर,कामाक्षी,व कैकईसह मीरा त्यांच्या महालात गेली.ताराबाईनी विचारल्यावर,मीराने सर्व हकिकत कथन केल्यावर,त्या म्हणाल्या,तुझ्यासारखी निर्भिड व स्वराज्यासाठी लग्न न करण्याची शपथ घेतलेल्या मुलीची आज स्वराज्याला गररज आहे.पण बाईसाहेब! माझी आजारी आई व धाकटी बहिण माझ्या वाटेकडे डोळे लावुन बसल्या असतील.पण एवढ्या लांब कशी जाणार रामचंद्रपंत म्हणाले,वाटेत सर्वत्र शत्रू पसरला आहे.नाहीतर संताजींनी तुला घरीच पोहचवले नसते कां?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-५-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!
भाग – २८.
मीरा! वाटेत कृष्णेपासुन नीरेपर्यंत सर्व प्रदेश शत्रूने व्यापला आहे.थोडे दिवस थांब,शत्रूची थोडी हालचाल थंडावली व प्रदेश मोकळा झाला की, तात्काळ घरी पोहचवण्याची व्यवस्था करतो.रामचंद्रपंत म्हणाले.पण मीराचे सर्व लक्ष घराकडे वेधले होते.खाशा स्रीया तीला बरोबरीच्या नात्याने वागवित होत्या पण मीराला त्यात सौख्य नव्हते.आठ दिवसांनी वार्ता आली,सेनापतींनी बादशहाचा सरदार दिलावरखानचा पुरा बिमोड करुन त्याला कैद केले.त्याच्या कडुन दोन लक्ष दंड घेऊन महाराष्र्टातुन हाकलुन दिले.सातार्याला वेढा घातलेल्या दोन यवन सरदारांवर बाहेरुन हल्ला करुन धनाजी त्यांना जेरीस आणत होते आणि परशुराम त्र्यंबक शिबंदी पुरवीत होते.
पंधरा दिवसांनंतर अमात्य रामचंद्रांनी महाराष्र्टाचे माहितीगार चार स्वार देऊन मीराला पाठवण्याची व्यवस्था केली.त्या स्वारांना विश्रांतीसाठी कोणकोणत्या टप्प्यावर मुक्काम करायचा हे नीट समजावुन सांगीतले. उद्देश हाच की,वाटेतल्या शत्रूपासुन मीरा वर संकट येऊ नये.पण मीराचा प्रवास सुखकर झाला का?
तिकडे कोंडोभटाने सुभानजी व बाजीवर केलेल्या उपचाराने खरोखरच ताबडतोब फरक पडला.रात्रीचे जेवणं झाल्यावर गप्पाटप्पा करतांना कोंडोभट म्हणाला,तुम्हाला सेनापतीचा सूड घ्यायचा ना?आज संताजी-धनाजीचेच मराठेशाहीत जास्त वर्चस्व आहे.दोघेही एका ताटात खाणारे आहेत.त्यांच्यात जर वितुष्ट आणले तर तूं हमखास सूड उगवुं शकशील.पण हे कसं व्हावं?मी तुला एक पत्र लिहुन देतो,ती पत्र रामचंद्रपंतअमात्य व चंदीस राजाराम महाराजांकडे रवाना करण्याची व्यवस्था केली की,दोघांमधे चुरस लागेल.मी धनाजीच्या नांवे खोटे पत्र लिहिणार,धनाजी आपल्या विरुध्द खोट्या कागाळ्या करतो असे वाटुन संताजी नक्कीच त्याचेवर बिथरणार.ती मीरा! ती कांही कायम सातार्यास राहणार नाही.स्वाभाविकच ४-८ दिवसांत तुळापुरकडे निघेल तेव्हा तिचे सोबत जास्त स्वार नसतील,तीला हस्त गत करण्यासाठी तुम्ही मनुष्यबळ जमवा तिला हस्तगत केल्यावर एकदम मोगलाई गाठा.कोंडोभटाच्या दोन्हीही युक्त्या दोघांनाही पसंत पडल्या.खानाने वाट खर्चासाठी दिलेले द्रव्य दोघांजवळ होतेच प्रथम दोन घोडे खरेदी करुन शिलेदार बनले.सातार्याची खबर घेण्यासाठी बाजी गेला आणि सुभानजीने दर्या खोर्यात फिरुन वीस बेरड जमवले.बाजी ने खबर आणल्यावर, हे दोघे,कोंडोभट व बेडरांसह निघाले असतां,तिसर्या दिवशी कृष्णेच्या काठाने चार स्वारांसह घोड्या वर स्वार झालेली मीरा येतांना दिसली. समोरुन बाजी,सुभानजीला येतांना पाहुन तीने स्वारांना सावध केले पण,वीस बेरडां पुढे स्वारांचा निभाव लागला नाही. बिचारी असहाय्य मीरा परत त्या दोन मानवी सर्पांच्या हाती पडली.
बाजी,सुभानजी व कोंडोभट एकमेकांवर कशी कुरघडी करायची या विचारांत दंग होते.कोंडोभट आपल्या सारखाच यांच्या तावडीत सांपडला अशी तीची समजुत झाली असल्यामुळे,त्याच्या गोड भुलथापीला मीरा बळी पडली.तो म्हणाला,तुम्ही मला सहाय्य केले तर या दोघांना चुकवुन चंदीला राजाराम महाराजांकडे गेलो तर आपले दोघांचेही काम होईल.
त्या रात्रीचा मुक्काम तुंगभद्रेच्या काठी बल्लारीच्या जंगलात पडला.ठरल्या बेता प्रमाणे कोंडोभटाने बेडरांना मोहरा देऊन आपल्या अनुकुल करुन घेतले.मीरा जवळची मोहिनी ओषध संधी साधुन त्या दोघांना हुंगवली.बेडरांच्या मनांत तिच्या विषयी आदरभाव निर्माण झाला.कोंडो भटाच्याही मनातील लोभी विचार पार मावळला.
बाजी सुभानजीला बेशुध्दावस्थेत तिथेच टाकुन दोन दिवसांनी ते सर्वजण चंदीचंदावर प्रांताच्या सरहद्दीवर आलेत. कावेरीच्या आडबाजुला मुक्काम केला. परिस्थिती आटोक्यात आलेली पाहुन बर्याच दिवसांत तीला शांत झोप लागली.कोंडोभटाने विचार केला,तीच्या बरोबर प्रतारणा न करतां,सरळ महाराजां कडे नेले तर,अशा अलौकिक स्रीची संकटसमयी मदत केली म्हणुन प्रसन्न होऊन ते आपल्याला अग्रहार देतील, अशा विचारांत असतांनाच….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-५-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!
भाग – २९.
गाढ झोपेत असलेल्या मीराला उठवावे की नाही या विचारात असतांना एकाएकी शेदोनशे यवन स्वारांनी येऊन त्यांना गराडा घातला.त्यांच्या मुख्य अंमलदाराने कैद करुन खानासमोर आणल्यावर,गर्दीतुन बाजी व सुभानजी पुढे येऊन ओरडत म्हणाले,सुभेदारसाहेब हीच ती मुलगी!तीथे त्या दोघांना पाहुन कोंडभटाची पांचावर धारण बसली.आतां आपली धडगत नाही,सर्वांगाला कंप सुटला.पण मीराची स्थिती काय झाली? आगीतुन निघुन फुफाट्यात पडली.
जिथे बाजी व सुभानजी बेशुध्दा वस्थेत पडले होते,त्याच रस्त्याने बादशहा चा सरदार झुल्फिकारखान चंदीला वेढा घालण्यासाठी जात असतां हे दोघे आढळले.खानाने तिथे मुक्काम केला. दुसर्या दिवशी त्यांना शुध्द आल्यावर आम्ही दिलावरखान सरदाराची माणसे असुन त्यांच्या हुकमानुसार मीराच्या शोधार्थ निघालो होतो.ती आमच्या हाती लागलीही होती,पण आपल्या लोकां करवी आम्हाला अंमलीपदार्थाद्वारे बेशुध्द करुन पळाली.
खानांच्या स्वारांनी मीराला कैद करुन खानासमोर आणल्यावर मीराने या दोघांची सर्व हकिकत सांगुन न्यायाची मागणी केली.या दुष्टांनी माझ्या पवित्रते ला डाग लावण्याचा प्रयत्न केला पण ईश्वर माझ्या पाठीशी आहे.आपण योग्य न्याय कराल ही खात्री आहे.आपला माझे वर विश्वास असेल तर,या पाप्यांना माझे पुढे ऊभे करुन प्रचिति पहा.माझ्या पवित्र स्पर्शाने ईश्वरी न्यायाची तात्काळ प्रचिती येईल,
नको, नको! सरदारसाहेब!हीचा स्पर्श होताच आम्ही मरुन जाऊ,नका.. नका.. ते असे म्हणत असतांनाच खानाच्या हुकमाने त्यांना पुढे आणण्यांत आले.मीराने त्यांना स्पर्श करतांच दोघेही किंकाळ्या फोडत धाडकण जमीनीवर आदळले.हा स्वामींच्या दिव्य वनौषधीचा परीणाम होता.या झटापटीत तिच्या डोक्यावरचा पदर मागे पडुन तिचे मुख उघडे झाले.खानाला ती प्रत्यक्ष देवताच भासली.अतिशय संतापाने दोघांच्या तोंडी गरम राखेचे तोबरे बांधुन प्रहरभर उन्हात झाडाला उलटे टांगण्याटी शिक्षा फरमावली.आणि मीराला अत्यंत आदराने म्हणाला,तुम्हाला जिथे जायचे तिथे माझे स्वार सुरक्षित पोहचवुन देतील बाई!राग धरु नका. आमचे शत्रुत्व स्रीयां बरोबर नाही.कुठे जायचे सांगा.चंदीला राजाराम महाराजांकडे!
अफसोस!प्रत्यक्ष आमच्या शत्रूकडे ठीक आहे.जा..आणि सुरक्षित पोहोचल्याचा मला निरोप पाठवा म्हणजे मी निश्चिंत होईल.सरदारसाहेब!तुम्ही आमच्या स्वराज्याचे शत्रू असले तरी तुमची न्यायप्रियता व सद्वर्तन पाहुन मी नतमस्तक झाले.तुमच्यासाठी मी ईश्वरा जवळ दुवा मागेन.मीरा आतां निर्भय झाली.प्रत्यक्ष शत्रुनेच संकटसमयी साह्य केले होते.आपल्याला प्रत्यक्ष आपल्या महाराष्र्टाच्या दैवताचे,राजाचे दर्शन होईल या विचाराने ती आई व धाकटी बहिण वीराचीही आठवण विसरली.
रामराजे चंदीला येत असल्याचे पत्र मिळाल्याबरोबर,पेशवे निळो मोरेश्वर आणि राजारामांचे मेहुणे हरजीराणे महाडीक यांनी चंदीची उत्तम व्यवस्था व किल्ल्याचा पक्का बंदोबस्त केला.शिबंदी दारुगोळा,फौज ठेवुन राजारामांना राहण्यायोग्य स्थान तयार केले.राजाराम आपल्या विश्वासू व रणझुंजार सरदारां च्या सहाय्याने वाटेतील अनेक संकना तोंड देत सुरक्षित चंदीस पोहोचले. किल्ल्याची सर्व व्यवस्था झाल्यावर राजारामांनी पुढील व्यवस्थेसाठी सर्व मुत्सद्यांना एकत्रीत जमवुन सल्ला मसलत केली.
स्वराज्याचा खरा मालक बाळ राजे शिवाजी आपल्या मातोश्रीबरोबर औरंगजेबाच्या कैदेत आहेत.राजाशिवाय राज्य चालवणे अशक्य आहे.तेव्हा सर्वानु मते राजारामांनी छत्रपतीपद धारण करुन राज्य चालवावे.पण राजारामांना हा सल्ला मान्य नव्हता.त्यांचे म्हणणे,खरा मालक बाळशिवाजी असून मी वहिणी साहेबांशी शपथक्रीयेने बांधील आहे. तेव्हा मी अभिषेक करवुन घेणे म्हणजे, बाळराजे शिवाजींचा विश्वासघात त्यांच्या हक्काची पायमल्ली करण्यासारखे आहे.
अखेर राज्याभिषेक न करतां केवळ प्रजेला धीर येण्याकरीतां व शत्रूवर दहशत बसण्याकरितां महाराजांनी राजचिन्हे धारण करुन राज्यकारभार चालवावा असे ठरले.राजारामांनी राज्याभिषेका ऐवजी मंचकारोहन करुन छत्रपतीपद धारण केले.अशा प्रकारे राजाराम हे स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-६-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!
भाग – ३०.
राजारामांनी छत्रपती पद धारण केल्यावर अष्टप्रधानांच्या नेमणुका केल्या
निळो मोरेश्वर पेशवे,प्रल्हाद निराजी प्रतिनिधी हे नवीन पद निर्माण करुन राजपत्रावर प्रधानाचे उजवे बाजुस त्यांची मुद्रा राहिल,संताजी घोरपडे सेनापती, रामचंद्रपंतास हुकुमशहा असा नवीन किताब दिला.रामचंद्रांकडुन आलेले हुकुम छत्रपतीनेही मोडु नये अशी या पदाची योग्यता,जनार्दन हणमंतेंना अमात्यपंत,शंकरजी मल्हार सचिव, श्रीकलाचार्य कालगावकर पंडितराव, शामजीराव भिडे मंत्रीपद, याशिवाय जी कर्ती माणसे होती त्यांचाही राजारामांनी योग्य सन्मान केला.परसोजी भोसले हे नागपूरकरांचे पूर्वज होते त्यांना सेना साहेब सुभा हे पद सेनापतीप्रमाणे सरंजाम देऊन गोंडवन वर्हाड प्रांत सोपवला.सिधोजी निंबाळकरांना सरलष्कर,खंडेराव दाभाडेंना सेनाधुरंदर खंडो बल्लाळांकडे मात्र चिटणीसी कायम ठेवली.याप्रमाणे राजारामांनी संपूर्ण राज्याधिकार स्विकारुन राज्याभिषेका शक सुरु केला.ही गोष्ट जाहीर करण्याकरितां महाराष्र्टातील सर्वांना बक्षिसे,पोषाख,वस्रे पाठविली.
अष्टप्रधानांना त्यांचे पोषण,सरंजाम वाटले.तसेच सैन्यास उत्तेजनार्थ इमाने, जहागिरी,बक्षिसेही सढळ हाताने देण्याचा परिपाठ ठेवला.रामचंद्रपंताच्या सहाय्याने राजारामांनी विशेष गोष्ट ही केली,ज्यांना जहागिरी,इनामे वाटली तो बराचसा मुलुख त्यावेळी मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे त्या मुलखाचा ताबा घेण्याकरितां स्वहिंमतीवर बिनदिक्कत मोगलांच्या प्रांतात शिरुन कब्जा करुं लागले.त्यामुळे सहाजिकच पसारा वाढुं लागला.अशाप्रकारे राजाराम चंदीच्या किल्ल्यात गेल्यावर संपूर्ण राज्यव्यवस्था लावली.राज्याचा बहुतांश जमही बसला. आतां त्यांच्यापुढे महत्वाचे कार्य होते, बादशहाच्या कैदेतुन स्वराज्याचा मालक बालशिवाजीस सोडवण्याचे!आपली ही खंत बोलुन दाखवल्यावर,प्रल्हादपंत म्हणाले,सध्या बादशहाचा जोर खुप वाढला आहे,त्यापासुन आपल्या सरदारां ना थोडी उसंत मिळाली की,पहिले काम हेच हाती घ्यायचय!
बादशहाच्या गोटातील बातम्या काढण्यासाठी भक्ताजी व बंकी या दोन हुशार हेरांची नेमणुक केली.ज्योत्याजी व मोरोपंत सबनिस ही खास विश्वासाची माणसे तिथे आहेतच.त्यांच्या मदतीला उध्दव चक्रदेव,राजाज्ञा यांना पाठवुन राणीसाहेबां कडच्या बातम्या आपल्याला कळतीलच.
ठरल्याप्रमाणे बंकी,गायकवाड व उध्दवास येसूबाईकडे जाऊन आठ दिवस झाले.इकडे महाराष्र्टातुन बातम्यावर बातम्या चंदीला येऊ लागल्या.आज शत्रूने मिरज मूर्तिजापूर,उद्या पन्हाळा, परवा सातारच्या किल्ल्याला वेढा,या बातम्यांबरोबर आपल्या सरदारांनी त्यांची कशी जिरवली,कशी पळता भूमी थोडी केली,कशी खोड मोडली अशाही वार्ता येऊ लागल्या.महाराज चंदीस असल्यामुळे महाष्र्टाच्या राज्यव्यवस्थेचा सारा भार रामचंद्रपंतावर येऊन पडला. पण त्यांनी आपल्या अचाट बुध्दीसामर्थ्या वर दक्षतेने महाराष्र्टातील सर्व किल्ल्यां चा बंदोबस्त व फौजेची व्यवस्था चोख ठेवुन मोगलांचा उच्छेद आरंभला.सर्व प्रांतातुन सरकारसारा बिनतक्रार वसुल करण्याचा बंदोबस्त केला.
इतक्यात बादशहाचा मोठा सरदार झुल्फिकारखान चंदीवर चढाई करण्यास येत असल्याची बातमी आली. बातमीची खरेपणा सिध्द करण्यासाठीच की काय कांही यवनस्वार एक ब्राम्हण व मराठ्याची मुलगी मीरा यांना पोहचवण्या साठी आले हे कळतांच सर्वांना आश्चर्य वाटले.चिटणीसांनी सर्व कसुन चौकशी करुन ब्राम्हण व मीरास राजारामांसमोर आणले.राजदर्शन होताच मीराला अत्यांनद झाला.
खानाने आपली कशी सुटका केली ही हकिकत मीराने सांगीतल्यावर,त्यांनी मीरा इथे सुरक्षित पोहचल्याचे पत्र व खानाच्या न्यायप्रियतेबद्दलच्या गौरव करण्यास चिटणीसांना सांगीतले.
मीराची हकिकत राजारामांनी विचारल्यावर,तीने संभाजीमहाराजांच्या समाधीवर घेतलेल्या शपथेपासुन, बाजी सुभानजीने कसे फसवले,संतांजीच्या माणसांनी कशी सुटका करुन सातार्या हुन आपली रवानगी विशाळगडावर केल्यावर पंधरा दिवस तिथे कसे अडकुन राहावे लागले हे सर्व सांगुन,ताराबाईंना पुत्र झाला व नांव शिवाजी ठेवले हेही कथन केले.आपल्याही मुलाचे नांव तारा बाईने शिवाजी ठेवले हे राजारामांना आवडले नाही.म्हणजे आतां दोन शिवाजी झाले तर?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १-६-२०२१.


