छत्रपती राजाराम म.चरित्र भाग ४, (१६ ते २०)

कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अंतःकरणाला जबरदस्त पीळ पाडणारी आणि मनःचक्षुसमोर ह्रदय द्रावक देखाव्याचे चित्र उभे करणारी ती दादासाहेबssss म्हणुन ज्योत्याजी केसकरांनी मारलेली हाक ह्रदय पिळवटुन निघाली.आयुष्यभर ज्या धन्याच्या सेवेत सबंध आयुष्य घालवले त्या धन्याच्या रक्षामिश्रित अविशिष्टावर चार …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! छत्रपती राजाराम म.चरित्र!!!

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग  –  १६.

         इतःपर महाराजांनी विशाळगडावर राहणे धोक्याचे आहे असं सर्व मुत्सद्यांचं एकमत पडलं.मग मी काय करुं?कुठ निवार्‍यास जाऊ?रायगडासारखं अजिंक्य स्थळ शत्रूने बळकावलं,विशाळ गड काबिज करणे सहज शक्य आहे. स्वराज्याचा कारभार चालविण्याकरितां सुरक्षित असं कोणतं स्थळ?प्रतापगड, सिंहगड,राजगड,पन्हाळा ह्या महाष्र्टातील कोणत्याही गडाकडे सुरक्षिततेची शाश्वती नाही.दक्षिण सोडुन खाली जावं का?कर्नाटकांत पेशवे,पिंगळे आणि महाडीक आहेत,तेथे लागेल कां निभाव?तुम्ही सर्व मुत्सद्दी स्वराज्याचे हितचिंतक आहांत.मी कर्नाटकात गेल्यास आपला कार्यभार साधेल असं तुम्हास निश्चित वाटत असेल तर,माझी तिकडे जाण्याची व्यवस्था करा.आतां तुमच्या स्पष्ट व स्वच्छ विचारांची नितांत आवश्यकता आहे.

        प्रसंग खरोखरीच आणीबाणीचा होता.राजारामांचे स्पष्ट,निर्लोभ व निराभिमानी बोलणे ऐकुन सर्वांचेच मन द्रवले.प्रत्येकजण आपल्यापरी विचार करत होता.ठाम विचारविनिमय करुन, खंडेराव दाभाडे,संताजी घोरपडे,धनाजी जाधव,सांळुंके आणि खंडो बल्लाळ हे सर्व मुत्सद्दीवीर झटकन उठुन उभे राहिले संताजी म्हणाला,महाराज! आपल्या निवासस्थानास योग्य असा चंदीचा (जंजीरा) किल्ला आहे.थोरल्या महाराजां नी १६७७ मधे कर्नाटकाच्या स्वारीत हा चंदीचा किल्ला हस्तगत केला होता. याच्या लगतच्या प्रातांला चंदावर,तंजावर म्हणुन ओळखतात.हा चंदी किल्ला मद्रासमधील अर्काट जिल्ह्यात असून, दक्षिण हिंदुस्थानात जे अत्यंत मजबूत व अतिप्राचिन किल्ले आहेत,त्यात या चंदी च्या किल्ल्याची गणना होते.हा किल्ला राजगिरी,कृष्णागिरी आणि चांद्रायणदुर्ग या टेकड्यांच्या माथ्यावर बांधला असून ह्या तिन्हीही टेकड्या तटबंदीच्या साखळीने जखडल्या आहेत.राजगिरी ६०० फुट उंच असून चढण्यास अति दुर्घट आहे.तिन्ही टेकड्यांवरुन तटबंदी ७ मैल लांब आहे.उत्तरेस लांबरुंद खंदक आहे.फक्त किल्ल्यात जाण्यायेण्यासाठी या खंदकावर काढता घालता लाकडी पूल आहे.बाकीचे सर्व मार्ग बंद आहे. तटाची भिंत तीस फुट जाड आहे. किल्या वर मोडकळीस आलेली एक भव्य इमारत व दोन देवळं आहेत.तिथे मुबलक पाणी असून दोन जिवंत झरे आहेत. त्याचप्रमाणे एक “कैद्यांची विहिर” आहे. देहांताची शिक्षा झालेल्या कैद्याला त्या विहिरीत टाकुन अन्नपाण्यावाचुन तडफडुन मारण्यात येत असे.१६व्या शतकापर्यंत हा किल्ला विजयनगरच्या अमलांखाली होता.१५६४ मधे तालिकोट च्या लढाईत,विजयनगरच्या हिंदुराजाचा हा किल्ला मुसलमानांच्या ताब्यात गेला. पुढे कांही वर्षे विजापुरकरांच्या ताब्यात होता.१६७७ मधे शिवाजीराजांनी ताब्यात घेतला.अशा या दुर्गम किल्ल्या मधे आपण सुरक्षित राहाल.आम्ही सर्व जणं छातीची ढाल करुन महाराष्र्टाची सरहद्द सांभाळतो.शत्रूला तसूभरही कर्णाटकाकडे फिरकु देत नाही.हा किल्ला रायगडापेक्षाही अभेद्य व अजिंक्य आहे.सर्वानुमते राजारामांनी कबिला इथेच ठेवुन सड्या स्वारांनिशी  गेलो तर,कोणाला संशयही येणार नाही. शिवाय थोरल्या व मधल्या  बाईसाहेब गरोदर असल्यामुळे त्यांना इतक्या लांबचा पल्ला गाठताही येणार नाही. ठीक!चंदावरला पत्र लिहुन पेशवे आणि राजे महाडीकांना साद्यंत हकिकत कळवुन चंदीवर बंदोबस्त ठेवण्यास सांगा.

        इथली व्यवस्था ,शिवाय आमचे बरोबर कोणकोण येणार?उध्दव चक्रदेवा स “राजाज्ञा” पदाची वस्रे देणे,धनाजी, संताजी व इतर सरदारांनी इतक्या कमी अवधीत जी सेवा केली त्याचा गौरव करणे ह्या सर्व गोष्टी आटोपुन आमच्या जाण्याचा दिवस मुकर्रर करु.संध्याकाळी  सर्व मंडळी आमच्यासोबत थाळ्याला बसावे अशी आमची इच्छा आहे.

        विशाळगडी जमलेल्या सर्व सरदारांना आपल्या पंगतीला घेऊन भोजन केले.चंदीचंदावर हा प्रांत जरी स्वराज्यात मोडत असला तरी,एवढ्या लांब जाऊन एकटं पडावं लागेल या विचाराने ते अस्वस्थ झालेत परंतु गत्यंतर नव्हते.असे विचारमग्न असतांनाच तारा बाई विडा घेऊन आल्यात.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. २९-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग  –  १७.

         ताराबाई लडिवाळपणे म्हणाल्या, स्वारींनी इथेच राहुन कारभार चालवला तर नाही जमणार?अगं! बादशहा माझ्या मागे राहुकेतू सारखा लागला आहे.त्याचे सुदर्शनचक्र इथं राहुन कसे टाळतां येईल?चंदीचा किल्ला सध्या तरी स्वराज्यातील निर्भय आहे.असचं माझं व सर्वांच मत आहे.पण महाराज!तुम्ही छत्रपती म्हणून राजदंड हाती धरल्यावर कसली भीती?ताराss परत सकाळचाच प्रसंग पुढे आणलास?राजदंड हाती घेण्याचा अधिकार माझा नाही.तुझ्याशी वाद घालण्यास वेळ नाही.जाऊ शकतेस. त्या पतीचे मन वळविण्याच्या उद्देशाने आल्या होत्या,पण यावेळीही हेतू साध्य झाला नाही.जा म्हटल्यावर तिथे उभे राहण्याचे धैर्य त्यांच्या अंगी नव्हते.त्या निघुन गेल्यावर,राजाराम स्वतःशीच पुटपुटले…हे स्वराज्य घातकी विचार हिच्या डोक्यात कसे शिरले?हे स्वराज्य द्रोहाचं वारं?…

         तेवढ्यात रामचंद्रपंत,प्रल्हाद निराजी,खंडो बल्लाळ चिटणीस आंत येत असतांना राजारामांंचे अर्धवट वाक्य त्यांनी ऐकले.आश्चर्याने पंतांनी विचारले, महाराज!स्वराज्यद्रोहाचं वारं कुणाच्या अंगात शिरलय?कोण नराधाम आहे?नांव सांगा की,त्याचा गजापीरच्या टोका वरुन कडेलोट करु.अमात्य!ते अगदी दुःखी स्वरांत म्हणाले,कुणाचं नांव सांगु? प्रत्यक्ष तुमच्या थोरल्या बाईसाहेबांनी आज सकाळपासुन आम्हाला विपरित सल्ला देण्याचा उपक्रम सुरु केला असे म्हणुन साद्यंत हकीकत सांगीतल्यावर, अमात्य म्हणाले,महाराज!हे विचार बाई साहेबांचे नाहीत.भलत्याच महत्वाकांक्षे चा उगम स्वार्थसाधू मंडळीच्या सांगण्याने झाला.आणि त्यांच्या लक्षात आले, अंतर्गृहाची व्यवस्था बाईसाहेबांच्या तैनातीत असलेल्या शंकरजी नारायण व परशुराम त्र्यंबक!तसे दोघेही होतकरु आहेत.राजाराम म्हणाले,हे दोघे होतकरु व मुलुखगिरीची आवड असणारे असतील तर,त्यांचा उपयोग करुन घ्या. अशा लोकांना अमिष दाखवल्याशिवाय हुरुप यायचा नाही.

         रामचंद्र अमात्य म्हणाले,महाराज!  आज आपल्या खजिन्यात पैका नाही. सद्य परिस्थितीत वसूली नाही,अशावेळी पगारी सेना किती ठेवणार?आज संताजी जवळ ४० हजाराच्या वर फौज आहे, तेवढीच धनाजी जवळ आहे.तसेच इतर सरदारांजवळ कुणाकडे १०, कुणाकडे २० हजार,एवढ्या फौजेचा तनखा कसा आणि कोठुन द्यायचा?बादशहाबरोबर टक्कर देण्यासाठी आपल्यालाही मोठी फौज उभी करणे भाग आहे.पण सद्यस्थितीवरुन अशक्य वाटते.

       राजाराम हताश स्वरांत म्हणाले, तुम्ही,निराजीपंत आणि चिटणीस अनुभवी व मुत्सद्दी आहांत.नक्कीच कांही तरी तोड स्वराज्य हिताच्या दृष्टीने काढली असणारच!

       महाराज!एक तोड आहे.पुर्वी थोरल्या महाराजांनी जहागिरी, इनामदार्‍या किंवा स्वतंत्र सरंजाम कुणालाच दिला नव्हता.स्वराज्याच्या फौजेतील क्षुल्लक शिपाई व अष्टप्रधाना तील मुख्य पेशवाही स्वराज्याचा नोकर होता.परंतु तो काळ निराळा होता,त्या वेळी खजिना भरपूर होता.शिवाय थोरल्या महाराजांचा दरारा,शिस्त होती. तशी स्थिती आतां नाही.या आणीबाणी च्या प्रसंगातुन स्वराज्याला निभवुन न्यायचे असेल तर,सरंजामी,इनामदारी व जहागिरीची पध्दत अमलांत आणली तरच तरणोपाय आहे.ह्या योजनेमुळे खात्रीने बादशहाच्या प्रचंड शक्तीला तोंड देता येईल.

       परंतु अमात्य!स्वराज्याची सूत्रे चालवतांना अडथळे नाही येणार? अडथळे तर येतीलच,दुसरा पर्याय काय?  सरदार शेफारण्याचाही संभव आहे.परंतु त्यांना कह्यात ठेवल्यास सांप्रत हे संकट कांही अंशी दूर होऊ शकेल.ठीक आहे!

नंतर रामचंद्रांनी निरनिरळ्या सरदारांची कामगिरी राजारामांना निवेदन केली. संताजी घोरपडेनी बंधूसह खुद्द बादशहा च्या डेराचे कळस कसे कापून आणले, धनाजी जाधवने रणमस्तखानशी मुकाबला करुन त्याचे पांच हत्ती कसे पाडाव करुन आणले,विठोबा चव्हाणने त्यांना कशी मदत केली,बजाबा शितोळेने केलेली कामगिरी केली वगैरे सर्व कथन केल्यावर,राजारामांनी दरबार भरवुन त्या सर्वांची पाठ थोपटली.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             ३०-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग  –  १८.

          राजारामांनी छोटासा दरबार भरवुन उध्दव चक्रदेवास “राजाज्ञा”, संताजी घोरपडेस सेनापतीपद व ममलतदार किताब,त्यांचे बंधु बहिरजीस “हिंदुराव”,मालोजीस “अमीर उल्उमराव” धनाजी जाधवास “जयसिंगराव”,विठोजी चव्हाणास “हिंमतबहाद्दर” आणि बजाबा शितोळेस संताजीची “सरनौबती” असे किताब देऊन सर्वांचा गौरव करुन वस्रे देऊन राजाराम म्हणाले,माझी सारी भिस्त,मदार तुमच्यावर आहे. आबा साहेबांनी हे स्वराज्याचे रोपट तुमच्या सारख्या वीरांच्या सहाय्यानेच लावलं.ह्या रोपट्याला खत पाणी घालुन त्याचं जतन  करण्याचं काम सर्वस्वी तुमचं आहे. तुमच्या सर्वांच्या सल्ल्याने मी उदईक चंदीचांदवरला निघणार आहे.रामचंद्रपंत अमात्य इथली राजव्यवस्था पाहतील. माझेबरोबर प्रल्हादपंत निराजी,चिटणीस खंडो बल्लाळ,संताजी,धनाजी,खंडेराव, दाभाडे,त्यांचे बंधु, शितोळे,साळुंके, आटोळे ही मंडळी मला सुरक्षित चंदीच्या किल्ल्यात पोहचवतील.उध्दव चक्रदेव, बंकी आणि भक्ताजी हे बाळराजेंची वेळो वेळी खबर कळवतील.आम्हाबरोबर कबिला नेता येणार नाही त्यांची जोखीम रामचंद्रपंतावर  आहे.आता स्वराज्याची लाज राखणे तुमच्या हाती आहे.स्वराज्य तुमचचं आहे,रक्षण करा. सर्वांनी राजारामांच्या बेतास मान्यता दिली.

        त्याचवेळी तिकडे शत्रूच्या म्हणजे प्रत्यक्ष बादशहाच्या डेर्‍यात मराठेशाही बुडवण्याचा अट्टाहास धरुन आपल्या अफाट सेनेसह महाराष्र्टात तळ ठोकुन बसलेला बादशहा कोणती खेळी खेळत होता हे सिंहावलोकन करुन छावणीत काय चालू आहे हे बघूया!

         बादशहा नुकताच नमाज पढुन बाहेर आला.तेवढ्यात मुकर्रबरखान कडुन आलेल्या जासुदाने महाराणी येसू बाईस व बाळराजे शिवाजीस कैद करुन एका मुक्कामावर आल्याची वार्ता आणली.स्वतः बादशहाचा शामियाना अगदी कोणतेच वैभव नसलेला साधा होता,पण बाजुचा शामियाना मात्र ऐश्वर्याने ओतप्रत भरलेला होता.त्यातच तो दरबार भरवित असे.संपुर्ण किनखापा चे छत,भारी किंमतीचे गोंडे आणि सोन्या च्या तारांनी विणलेल्या झालरी लावलेल्या असल्याने डोळे दिपवत होते. त्याच शामियानात बादशहाने तातडीने सर्व सरदारांना बोलावणे पाठवले.आपण मराठ्यांचा राजा मारला,त्यांची राजधानी हस्तगत केली,मराठ्यांची राणी आणि भावी राजा कैद झाला आतां बेवारस झालेली मराठेशाही आपल्या असंख्य आणि बलाढ्य सेनेच्या सहाय्याने हां हां म्हणता चिरडुन टाकु अशी खात्री झाल्याने हे आनंदी वर्तमान स्वतः ज्याला त्याला सांगु लागला.त्याचा आनंद इतका अनिवार झाला की,मुलगी झेबुन्निसाच्या तंबुत गेला.त्यावेळी ती तीच्या आवडत्या काव्याची पुस्तके वाचत होती.

        झेबुन्निसा ही बादशहाची थोरली मुलगी असुन तीचा जन्म १६३९ मधे झाला.ती सुसंस्कृत,उच्च शिक्षित,कुराण मुखोद्गत होते.त्या ग्रंथावर तीने टीकाग्रंथ लिहिला असून,फारशी भाषेत केलेले कांही कवनेही प्रसिध्द आहेत.मोगल राज कन्येस बरोबरीचा वर मिळत नसल्यामुळे बहुतेक राजकन्या अविवाहितच राहत. सन् १६६६ मधे शिवाजी दिल्लीला गेले होते त्यावेळी ती २७ वर्षाची होती. शिवाजीमहाराजां विषयी बर्‍याच गोष्टी ऐकलेल्या,त्यांचे लोकोत्तर गुण,त्यांचा राष्र्टाभिमान,शौर्य,साहस आणि सर्वतो मुखी असलेली विलक्षण ख्याती ऐकुन तीच्या मनांत त्यांचेविषयी आदरभाव निर्माण झाला होता,एकप्रकारे त्यांचे विषयी प्रेम भावना निर्माण झाली होती. बादशहाच्या कैदेतुन निसटुन शिवाजी महाराज स्वदेशी परत आल्यावर नंतर मात्र झेबुन्निसास त्यांचे दर्शन झाले नाही.

        पुढे शिवाजीमहाराजांचे निर्वाण झाल्यावर,बादशहाने दक्षिणेवर स्वारी केली,त्यावेळी त्याचा जनाना व परिवार सोबत होता.शिवाजींसाठी तिचा जिव हुरहुरत होता.प्रिती आंधळी असते हे कांही खोटे नाही.शिवाजींवर प्रीती म्हणून त्यांच्या आप्तांवर प्रिती जडली.संभाजी राजेंंनाही वाचवण्याचा तीचा प्रयत्न सिध्दीस गेला नाही.

     रायगड पडल्यावर संभाजीराजेंची पत्नी येसूबाई व पुत्र बाळशिवाजी ह्यांना आपल्या स्वतःच्या देखरखेखाली देण्याची विनंती तीने वडिल बादशहाकडे केली.मुलीचा आग्रह,झुल्फिकारखानने येसूबाईंना दिलेले आश्वासन व पुढे प्रसंगा नुसार उपयोग करण्याचे हाती साधन असावे,या विचाराने बादशहाने मुलीची विनंती मान्य केली.

        बालराजेंच्या लडिवाळ वागण्याने बादशहा व झेबुन्निसा दोघेही मोहित झाले.तीने येसूबाईचा स्वतंत्र डेरा आपल्या डेर्‍याजवळ ठेवून येसूबाईंच्या सर्व सुखसोयींकडे जातीने तजवीज करुन दिली.बाल शिवाजीवर तीचे इतके प्रेम बसले की,स्वतःचा मुलगा असतां तर त्याचेही करणार नाही एवढी हौस पुरवीत

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि.  ३०-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग – १९.

         बादशहा झेबुन्निसाच्या तंबूत येऊन मराठ्यांची राणी व भावी राजास कैद केल्याची आनंदवार्ता सांगीतल्यावर तीला कसेसच वाटले.तिच्या मुखावरचे भाव पाहुन,बेटी तुला आनंद नाही झाला अगं!त्या पहाडी चुह्याने जी आपली राजधानी बनवली होती त्या रायगडाची आपल्या लोकांनी धूळधान केली.बाबा! आताही त्या थोर पुरुषाचा हीन वचनानं उल्लेख करतां? शिवाजी जिवंत होते तो पर्यंत तुमचे शत्रू होते,पण मरणानंतर शत्रृत्व नष्ट होते असं आपल्या कुराणांत पण सांगीतले आहे ना?बेटी! शिवाजींनी माझेशी धरलेलं वैर मी कसं विसरुं?संपूर्ण हिंदुस्थान मला महंमद पैंगबराची प्रजा करायचा माझा निर्धार होता,त्या आड आल्यामुळे एवढा माझा संताप झाला.त्यांच्या मुलाचा हालहाल करुन वध केला.सुन,नातू कैद केले.आतां ही मराठेशाही बुडवुन पैंगबराची प्रजा करणार! चल दरबारांत…

    बादशहाला जेवढा आनंद झाला तेवढाच विषाद झेबुन्निसाला झाला.एके काळी तिने शिवाजीमहाराजांवर दिव्य प्रेम केले होते.त्यांचा नातू तो आपलाच समजुन त्याचे संगोपन करायचं हा निश्चय करुन शामियान्याकडे जायला निघाली.

      मुकर्ररखानला छावणीत आणण्या साठी थोर सरदार उमराव सामोरे पाठवले.राणी येसूबाई व बाळराजे शिवाजींचा स्वतंत्र मेण्यात बंदोबस्त होता मेण्याच्या दाराला धरुन ज्योत्याजी केसकर चालत होते.शामियाण्याजवळ मेणा येताच फक्त बाळराजेंनाच आणयला सांगीतल्यावर,खान मेण्या जवळ येऊन म्हणाला,राणीसाहेब मी कुराणावर हात ठेवुन घेतलेली शपथ विसरणार नाही.तुमच्या किंवा राजेंच्या जीविताला किंचितही अपाय होणार नाही ही खात्री बाळगा आणि माझेवर विश्वास ठेवुन बाळराजेंना बादशहाच्या भेटीस पाठवा.

      खानसाहेब!तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तरी,ज्योत्याजीला संगे न्या.राणी साहेब!इथं बादशहाची पूर्ण हुकमत असल्यामुळे नाईलाजाने मी बांधील आहे पण युवराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही ही कसम खातो.मग येसू बाईंनी जास्त ओढुन न धरतां बाळराजेंना खानाबरोबर पाठवले.आपण कुठे आहोत?सांप्रत कोणत्या परिस्थितीत सांपडलो?कोणासमोर जात आहो हे त्या बालमनाला समजले असेल का?राजे खानासोबत मुख्य शामियान्यांत प्रवेशल्या बरोबर सर्वांच्या नजरा त्यांच्या कडे वळल्या.मध्यभागी सिंहासनावर बादशहा बसला असून,आजुबाजुला सर्व अमीर,उमराव व सरदार मोठ्या विनयाने हात बांधुन उभे होते.बादशहाच्या मागच्या बाजुस झेबुन्निसा उभी होती. तिला पडदा नव्हता.बादशहाने तिला पूर्ण मोकळीक दिली असल्यामुळे,छावणीत ती कुठेही संचार करुं शकत होती.तीच्या शब्दाला बादशहा इतकाच मान होता. बाल शिवाजींना आंत आणतांच ती झटकन पुढे होऊन त्यांच्या मुखावर हात फिरवत,कानशिलावर बोटे मोडलेत. मुलीची ही चमत्कारीक कृती पाहुन, बादशहा म्हणाला,बेटी!अशी वेड्या सारखी काय वागतेस?एवढं भांबावण्या सारखं त्या मुलांत काय आहे?बाबा! राज तेज आहे.याला म्हणतात खरं राजतेज जे क्वचितच पहायला मिळते.बरं!बरं त्याला कुर्निसात करायला सांग.

         बाबा! आपण हे काय बोलता?हा बालक आज जरी तुमचा कैदी असला तरी,तो मराठ्यांचा राजा आहे,संपूर्ण महाराष्र्टाची मान त्याच्यापुढे वाकते आहे हे कसं विसरतां?कुर्निसात करायचे काम तुमच्या सभोवताली असलेल्या मंडळींचे! या बालकाचा अधिकार तुमच्याशेजारी बसण्याचा आहे.एकेकाळी या बालकाच्या आज्याने आपला अधिकार कोणता हे प्रत्यक्ष तुमच्या अनुभवाला आणुन दिलेलं होतच ना?आतां या बालकाच्या अज्ञानाचा फायदा घेऊ पाहतां का?नाही..नाही हा अन्याय मी तुमच्याकडुन होऊ देणार नाही.

      बादशहाला मुलीचा संताप तर खुप आला,पण वरपांगी शांतता दाखवुन त्याने विचारले, बेटा नांव काय तुझे? शिवाजी जोरात अस्खलित उत्तर दिले. तोबा!तोबा! तुझं नाव कसं शिवाजी?हे नांव तर तुझ्या आजोबांच!मला सतावुन सोडणार्‍या त्या चोराचं!तूं कांही चोर नाहीस.तू साव आहेस.पुढे याच साव शब्दाचा अपभ्रंश होऊन “शाहु” नांव.. पडले.

           क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. ३०-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग – २०.

         दिलेरखानाच्या गोटात असलेला बाजी कदम, राजाराम महाराज कोठे आहे याची वर्दी देण्यास खानाकडे आला असता,खान म्हणाला,जर बातमी खोटी निघाली तर राखेचे तोबरे व खरी निघाली तर,बादशहाने जाहीर केलेले बक्षिस तुला मिळेल.खात्री होईस्तोवर इथुन हलायचे नाही असा हुकुम देत होता,तोच बाहेर कांही कानडी यात्रेकरुं सांगु लागले, आमच्या यात्रेंकरुंच्यामधे कांही वेशधारी लोकांची टोळी उतरली आहे.त्यांचा आम्हाला संशय आल्याने आपल्याला वर्दी देण्यास आलोत.बाजी कदमच्या बातमीला या यात्रेकरींमुळे दुजोराच मिळाला.खानाने कांही सैन्यांना पाठवुन त्या मंडळींना कैद करुन आणण्याचा हुकुम दिला.हा हुकुम होता स्वराज्य रक्षणाची संपूर्ण जबाबदारी शिरावर असलेल्या राजारामास कैद करण्याचा!

        संपूर्ण महाराष्र्टाचा अधिपती आज एखाद्या गुन्हेगारासारखे तोंड लपवत, स्वराज्यरक्षणार्थ वणवण फिरत होते. प्रत्यक्ष स्वराज्य संस्थापकाच्या मुलाला स्वतःच्या राज्यात निर्भयपणे फिरतांही येऊ नये,यापेक्षा खडतर दुर्विलास तो कोणता?कालचक्राच्या फेर्‍यामुळे त्यांची ही कोण दैना?एका कविने म्हटले…

न यत्र स्थेमानं दधुरतिभय भ्रांत नयना ।

गलद्दानोद्रेक भ्रमदलिदंबाः करटिनः ।

लुठन् मुक्ताभारे भवति परलोक गतवतो।  हरेद्यद्वारे शिव!शिवनां कलकलः ।।

    अशी स्थिती संभाजीराजेंच्या मृत्यु बरोबर सार्‍या स्वराज्याची झाली होती.

     खरोखरच त्यावेळी राजाराम रानोमाळ भटकत होते.आपल्या पांच पन्नास अनुयायांसह विशाळगड सोडतांना वाटेत आपल्यावर दारुण प्रसंग ओढवेल याची राजारामांना कल्पना नव्हती.बादशहाने आपणास पकडण्यास मोठमोठे सरदार मागावर पाठवले होते, पण त्या सरदारांनी बादशहाच्या सांगण्या वरुन महाराष्र्टात कोणता हाहाकार उडवुन दिला याची त्यांना पुरेसी कल्पना नव्हती.प्रवास करीत असतां वाटेत ठीक ठीकाणी असख्य गाईंच्या होत असलेल्या कत्तली,पवित्र हिंदुंच्या देवळावरील सुंदर सोन्याचे कळस जाऊन तेथे चांदतारा दिसणे,हिंदुची नाहक हत्या आणि डोई गणिक जिझियाकराची चालवलेली सक्ती बाजारांत जागोजागी ओले अन्न ठेवुन ते हिंदुंना बळजबरीने विकत घेण्यास भाग पाडणारे व धर्माभिमानाने अंध झालेले यवन अधिकारी असा अनाचार करतांना सर्वत्र दिसत होते.आणि हा शत्रूचा अत्याचार निमुटपणे सहन करावा लागतो सद्यपरिस्थितित तरी प्रतिकार करुं शकत नाही याचे अतोनात दुःख होत होते.

        संताजी,धनाजी,दाभाडे या भिष्म भीमासारख्या योध्यांना हा अत्याचार, अनाचार पाहुन सर्वांगांची लाही लाही होत होती.एकतर संभाजीराजेंच्या वधा मुळे सर्वांची डोकी खवळली होतीच, त्यात या अत्याचाराच्या दृष्यांची भर पडतांच ही मंडळी क्रोधारितिरेकाने भयंकर संतापले होते,परंतु राजारामांना गुप्तरितीन सुरक्षित स्थळी पोहचवण्याची त्यांचेवर जबाबदारी असल्यामुळे,प्रत्यक्ष जरी प्रतिकार करीत नसले तरी संधी साधून शक्य तेवढा प्रतिकार करीत होते.

            विशाळगड सोडल्यावर कांही प्रवास राजारामांनी मेण्यातुन केला परंतु वाटेत ठीकठीकाणी शत्रूसैन्य अडवु लागल्याने घोड्यावर स्वार होणे भाग पडले.पण तोही प्रवास सोपा नव्हता. शत्रूचे पहारे चुकवुन घोडे उडवीत जाणे मुश्कील होऊं लागले.म्हणुन गोकर्णा पासुन पुढचा प्रवास पोषाख बदलुन हाती भगवी पताका घेऊन गोसाव्या सारखे वेशांतर करुन,अशी कितीतरी वेशांतरे बदलुन पायी प्रवास करावा लागला.कांही ठीकाणी यात्रेकरुं तर कांही ठीकाणी जंगम लिंगाईत कापडी आहोत असे दर्शवत ही मंडळी कशीबशी सौंध्याहुन श्रीव्यंकटेशावरला पोहचली. तिथे कांही काळ मुक्काम करुन शत्रूला संशय येणार नाही अशा खबरदारीने बेंगरुळ गाठले.बेंगरुळला ज्या वेशीत त्यांनी मुक्काम केला होता,तिथे कांही कानडी यात्रेकरुं उतरलेले होते.

       आपल्या बरोबर मराठ्यांचा राजा आहे ही त्यांना कल्पनाही नव्हती.परंतु थोड्या सहवासाने राजारामांच्या बरोबर असलेल्या मंडळींचा त्यांच्याबरोबर अदबीचे वागणे पाहुन त्यांना संशय येऊ लागला.ही मंडळी कापडी वेशात दिसतात परंतु गंगोदकाची मोहोरबंद पात्रे जपमाळा वगैरे वस्तु त्यांच्या जवळ दिसत नसून, मातब्बर लोकांप्रमाणे असलेल्या वर्तनावरुन हे लोक कापडी वेशातील यात्रेकरुंना लुटणारे लूटारु किंवा दुसरेच कुणीतरी असावे अशी ते आपसांत कुजबुजु लागले,

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                 दि. ३०-५-२०२१.

 

छत्रपती राजाराम म.चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading