
अंतःकरणाला जबरदस्त पीळ पाडणारी आणि मनःचक्षुसमोर ह्रदय द्रावक देखाव्याचे चित्र उभे करणारी ती दादासाहेबssss म्हणुन ज्योत्याजी केसकरांनी मारलेली हाक ह्रदय पिळवटुन निघाली.आयुष्यभर ज्या धन्याच्या सेवेत सबंध आयुष्य घालवले त्या धन्याच्या रक्षामिश्रित अविशिष्टावर चार …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! छत्रपती राजाराम म.चरित्र!!!
भाग – ११.
सेनापतींचा निर्वाणीचा हुकुम डावलण्याचे धाडस संताजी धनाजी मधे नव्हते.दोघांनीही मुजरा करुन लगेच विशाळगडावर जाण्याच्या तयारीला लागले.थोडी विश्रांती घेऊन सेनापती भालेराव भावंडाकडे पाहुन विचारले, तुम्ही काय करणारहात?सेनापती महाराज! असे म्हणुन त्यांनी आपली सर्व हकिकत थोडक्यात कथन ऐकल्यावर, महादजी म्हणाले,तुमचा उद्योग स्तुत्य आहे.वाटेल ते करा पण स्वराज्य वाचवां. थोरल्या महाराजांनी लावलेला हा स्वराज्याचा रोप वाढीला लावा.ग्लानित गेलेले वयोवृध्द,अनुभवी,स्वामिनीष्ठ रणयोध्दा सेनापती डेर्याच्या मध्यभागी पसरवलेल्या शय्येवर शांतपणे पहुडले होते.त्यांची जीवन ज्योत निस्तेज होत चालली होती.वास्तविक त्यांच्या सर्वांगावरच्या जखमा इतक्या भयंकर होत्या की,दुसरा कोणी असतां तर कधीच अंत झाला असतां.पण त्यांच्या कसलेल्या शरीराने सहज सहन केल्या. क्षीण आवाजात म्हणाले,अरे वीरांनो! बादशहाचा सूड घ्या.त्याने आपल्या राजाला मारलं,छत्रपतींच कुळ स्वाधीन करुन घेतलं,थोरल्या महाराजांचं पवित्र राजसिंहासन,प्रत्यक्ष स्वराज्याचा देव्हारा फोडुन विध्वंश केला,खजिना लुटला, महाराष्र्टाला स्वातंत्र्य मिळवुन देणारी विजयी भवानी सुध्दा त्यांनी नेली. राजधानी तोडली.परंतु अद्याप मराठे जिवंत आहे म्हणावं,ते केव्हाही हार जाणार नाही,माघार घेणार नाही.बोला सूड घ्याल ना?माझे अर्धवट राहीलेले कार्य पूर्णत्वास न्याल ना?प्रतिज्ञा करा म्हणजे मला शांतपणे मरण येईल.
सेनापतीसाहेब!ते क्रोधसंतप्त आवाजांत म्हणाले,आमच्या ह्या स्वदेश मातेच्या वक्षस्थळावर विहार करणारे, तिला छळणारे जे दुष्ट आहेत त्यांचे हात पाय छाटुन,त्यांच्या नरड्या कडाकड फोडून स्वराज्याला ग्रासणार्या त्या बादशहाचा पुरा सूड उगवू हीच आमची प्रतिज्ञा!सर्वांनी गुडघे टेकून सर्व सैन्यातुन सूडाच्या प्रतिज्ञेनेचा एवढा भयंकर ध्वनी उत्पन्न झाला की,क्षणभर जमीन हादरल्यासारखी वाटली.संपूर्ण ब्रह्मांड कडाडुन सोडणारा तो नाद ऐकताच आपली शेवटची इच्छा पूर्ण होणार ही खात्री झाल्याने शरपंजरी पडलेल्या त्या मराठ्यांच्या भिष्माने शांतपणे प्राणोक्रम केले.
तिकडे विशाळगडी छत्रपती राजाराम एकटेच विचार करीत बसले होते.राजगडावर राणीसाहेब आणि बाळ राजेंच्या सरक्षणाचा योग्य बंदोबस्त करुन राजाराम आपल्या कबिल्यासह बाहेर पडले.प्रथम प्रतापगडावर जाऊन कुलस्वामीनीचे दर्शन घेऊन,समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यास परळीला गेले.बादशहाची फौज त्यांचा माग काढीत होती.तिथून ते पन्हाळ्यास आले.परंतु शत्रूला त्यांची चाहूल लागल्यामुळे मोठ्या बंदोबस्तात विशाळगडी आले.तिथला सारा बंदोबस्त रामचद्रपंतांनी फारच कडेकोट केलाहोता
रायगड पडला आणि राणीसाहेबां सह युवराजांना कैद करुन नेल्याची बातमी कळल्यापासुन राजाराम अत्यंत अस्वस्थ झालेत.रायगड सारखा अभेद्य किल्ला पडू शकतो तर,जरी अमात्य रामचंद्रपंतांनी आटोकाट बंदोबस्त केला, गडही दुर्भेद आहे,तरी त्यांचे मन शासंक होते.शिवाय हेरांकडुन निरनिराळ्या बातम्या येतच होत्या.आज काय तर भूधरगडावर हल्ला,सामानगड काबिज,मनसंतोषगड जिंकला,पावनगड ला मोर्चे लावले,रांगणा किल्ल्याला वेढा घातला अशा चौफेर येणार्या बातम्यांनी त्यांचे मनःस्वास्थ्य बिघडुन गेले.आपण विशाळगडी असल्याची बातमी बादशहाला आज ना उद्या कळेल व तो मोर्चा इकडे वळवेल ही भिती त्यांना होती
राजारामांनी विशाळगडवरुनच राज्यकारभार चालवावा अशी रामचंद्रपंत प्रल्हाद निराजी,खंडो बल्लाळ आदी मुत्सद्यांची इच्छा होती.बादशहाचे सैन्य सार्या महाराष्र्टात धुमाकुळ घालीत आहे,त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने मसलत करण्यासाठी राजारामांच्या आज्ञेने,रामचंद्रपंतांनी स्वराज्यातील योध्दे आणि मुत्सद्दींना निर्वाणीचा उपाय योजना आखण्यासाठी सर्वांना विशाळ गडला बोलावले असले तरी ते अस्वस्थ होते.आपल्यावर स्वराज्याची फारमोठी जबाबदारी आहे याची त्यांना पूर्ण जाणीव असल्यामुळे अहोरात्र विचारमग्न होते.शत्रूचा नायनाट करुन स्वराज्यात पुनरपि शांतता कशी नांदेल हा एकच विचार अहर्निश त्याच्या डोक्यात घोळत होता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
२८-५-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – १२.
राजाराम एकटेच दिवाणखान्यात विचार करीत बसले होते.आपल्या थोरल्या भावाचे हालहाल करुन बादशहाने ठार केले,त्याचा कसा सूड घ्यावा?वहिणीला व पुतण्याला बादशहा च्या कैदेतुन कसे सोडवाव?स्वराज्याची विस्कटलेली घडी परत नीट कशी करावी अशा विचांरांनी त्यांना भंडावुन सोडले होते.एवढ्यात वहिणीसाहेबांकडुन निरोप आल्याचे कळल्यावर,खानाच्या कैदेतुन निरोप पाठवता आला याचे त्यांना अतिशय आर्श्चय वाटले.उध्दवने समोर येऊन मुजरा स्विकारल्यावर,त्यांनी उध्दव ला आर्श्चयाने विचारले,तुला वहिणीची भेट घेण्याइतपत बादशहाचा पोकळ बंदोबस्त आहे?महाराज!नाही.खानाचा अतिशय कडेकोट बंदोबस्त आहे.मुंगीचा ही शिरकाव होणे अशक्य आहे तिथे मनुष्याच्या शिरकावाचा प्रश्नच उद्भवत नाही.असे म्हणुन उध्दवने,तमासगिरांच्या सहाय्याने खेळ करुन कसा प्रवेश मिळवला,किती अडचणी आल्यात?पण राणीसाहेबांच्या समयसूचकतेने आपल्याला छावणीत कसा प्रवेश मिळाला,व त्यांनी कसा बाण दिला व निरोप सांगीतला बद्दलची इतंभूत हकिकत निवेदन केल्यावर मुंडाशातुन लिंग,बाण काढुन त्यांच्या हाती देत, राणीसाहेबांचा जसाचा तसा निरोप कथन केला.राजारामांनी तो दिव्य बाण हाती घेऊन मनोमन नमस्कार करुन म्हणाले,ह्या कुलदैवताला आमरण विसरणार नाही.वहिणी आणखी पुढे काय म्हणाल्या?
राणीसाहेबांनी बाण माझ्या हाती दिल्यावर,त्यांचा निरोप घेत असतांना बालराजे पुढे येऊन म्हणाले,मांसाहेबांचा निरोप काकासाहेबांना सांगुन,त्याप्रमाणे करावे व आम्हाला इथुन लवकर सोडवावे हा निरोप दिला.
उध्दवा हा निरोप नाही,ही राजाज्ञा आहे.बाळराजे शिवाजी हे या मराठी राज्याचे अधिपती असून मी त्यांचा सेवक आहे,तशी शपथ मी वहिणीजवळ घेतली आहे.ही पहिली “राजाज्ञा” उध्दव माझे कडे घेऊन आला तेव्हा आजपासुन उध्दव चक्रदेव हा राजाज्ञा झाला.अमात्य “राजाज्ञा” हे नवीन पद निर्माण झाल!या पदाचा पोषाख उध्दवला देण्याची व्यवस्था करा,इतके बोलुन राजाराम अंर्तगृहात निघुन गेले.
राजारामांच्या पहिल्या पत्नीचे नांव जानकीबाई. ही प्रतापराव गुजर सेनापतीं ची कन्या.मुलगी होऊन जानकीबाईचा देहांत झाला.त्यानंतर संभाजीराजेंनी राजारामांची तीन लग्ने लावली.हंबीरराव मोहितेंची मुलगी ताराबाई,कागलकर घाटगेंची कन्या राजसबाई,आणि पिलाजी शिर्केंची कन्या अंबिकाबाई.ह्या तिघींवर राजारामांचे प्रेम सारखेच होते. पण तिघींचाही स्वभाव भिन्न होता. आपला पती स्वतंत्र झाला आहे,तेव्हा त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याच सल्ल्याने करावी असे ताराबाईंना वाटत होते. नवर्याचे प्रेम आपल्या एकटीवर असावे, त्यांची आवडती पत्नी व्हावे असे राजस बाईंना वाटत होते,व तसे तिचे प्रयत्नही असे.अंबिकाबाईंना मात्र कोणतीच इच्छा नव्हती.पती हेच दैवत या भावनेने ती पतीची सेवा करीत शिवाय मोठ्या सवतीनाही फार मानीत असे.
विशाळगडावर आल्यापासुन ताराबाई राजकारणांत लक्ष घालु लागल्या.या राजस्रीयांच्या तैनातीसाठी रामचंद्रपंतांनी परशुराम व शंकरजी हे दोन कुळकर्णी नेमले.परशुराम आतां पर्यंत विशाळगडी रामचंद्रपंतांचे दप्तर सांभाळत होता.नुकतीच त्याला मुजुम दारी दिली होती.आणि शंकरजीकडे पागेची व्यवस्था सोपवली होती.राजाराम विशाळगडी आल्यापासुन त्यांच्या अंतर्गृहाची सर्व व्यवस्था पाहण्याचे काम या दोघांकडे पंतांनी सोपवले होते.त्या मुळे या दोघांचेही ताराबाईकडे नेहमी जाणेयेणे असल्यामुळे,दोघेही हुशार, चालाख ब्राम्हण कारकुनांवर त्यांचा लोभ जडला.त्यांची भीड चेपल्यामुळे,बेधडक आपली मुलुखगिरी करण्याची इच्छा
ताराबाईजवळ व्यक्त केली.त्या म्हणाल्या आमचा एकदा जम बसला की,वेळकाळ पाहुन पंतांच्या व खाश्यांच्या कानावर तुमची इच्छा घालु.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
२८-५-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – १३.
परशुराम म्हणाला,बाईसाहेब! महाराजांनी मनांत आणलं तर जम बसल्यासारखच आहे.रामचंद्रपंतांच्या सल्ल्यानुसार महाराजांनी राजसूत्र आपल्या हाती घ्यावी.हो पण,कशी घेणार धनी बाळशिवाजी आहेत,तशी शपथ येसूबाईजवळ स्वारींनी घेतली आहे ना?
पण बाईसाहेब!आतां दोघे बादशहाच्या कैदेत आहेत,पुढे त्यांचे काय होईल सांगता येईल कां?थोरल्या महाराजांचे जसे संभाजीराजे पुत्र,तसेच राजाराम महाराज सुध्दा आहेत.त्यामुळे त्यांनी सूत्र घेण्यास कांहीच हरकत नसावी.खरं आहे परशूराम!आमचही हेच म्हणणं आहे. बाईसाहेब!थोरल्या महाराजांनी जसं रायगड राजधानी करुन कारभार चालवला,तसच राजाराम महाराजांनी विशाळगड ही गादीची जागा मुकर्रर करुन राज्यकारभार चालवावा.शंकरजी म्हणाला.
पण स्वारींनी भलतच वेड डोक्यात घेतलं ना?आम्ही थोडेच त्यांना कैदेत टाकले?उलट भावोजींनीच स्वारींना एक दोन नव्हे तर तब्बल नऊ वर्षे कैदेत डांबले होते.तो राग जरासुध्दा इकडे नाही,मात्र बाईंच्या व बाळराजेंच्या सुटकेची अहोरात्र काळजी करतात. परशुराम तर सहज म्हणाला,राजाराम महाराज छत्रपती व तुम्ही राणीसाहेब! हाच विचार त्यांच्या मनात घट्ट बसला. इतकी वर्षे दिराने स्वारींना कैदेत ठेवुन राज भोगाला पारखे केले,परंतु बादशहाने आतां मार्गातील सर्व कांटे दूर सारले. संभाजीराजे मारले,राणी व युवराजांना कैद केले,स्वारींना स्वतंत्रता मिळाली ती केवळ राजभोग उपभोगण्यासाठीच असा ताराबाईंचा पक्का ग्रह झाला. आपल्या पतीने छत्रपतीपद धारण केले की,ओघानेच राज्ञीपद आपल्याकडे येईल अशा विचारांत असतांनाच कुणबीण येऊन म्हणाली,महाराज दारापर्यंत येऊन मघारी गेलेत.त्यांना भेटण्यासाठी त्या त्याचे महाली गेल्या.
बादशहाने आपल्याला पकडण्या साठी मोठमोठे सरदार सोडले,ही बातमी कळल्यापासुन राजाराम मोठ्या काळजीत पडले. ते मरणाला किंवा पकडल्या गेल्यावर होणार्या छळाला मुळीच घाबरत नव्हते.दुर्देवाने तसा प्रसंग आलाच तर,संभाजीराजें प्रमाणेच सर्व संकटांना टक्कर देण्याइतके धैर्य निश्चित त्यांच्या अंगी होते.शेवटी तेही नरकेसरी शिवछत्रपतींचा छावा होता. त्यांना भीती वाटण्याची कारणे वेगळी होती.स्वराज्या ला अधिपती नसल्यामुळे हवादिल झालेल्या प्रजेचे संरक्षण करणे,वहिणी व पुतण्याची शत्रूच्या कैदेतुन सुटका करणे, इतक्या प्राणांतिक आपत्त्या कोसळल्या वरही स्वराज्याचे कांहीही नुकसान न होता,उलट सर्व कारभार सुरळीत व जोमात चालु आहे हे बादशहाला दाखवुन देणे ही अत्यंत जबाबदारीची कामे शिरावर असल्यामुळ आपण शत्रूच्या हाती पडु नये असे वाटणे सहाजिकच होते!
रामचंद्र अमात्याच्या सहाय्याने राजारामांनी आतांपर्यंत शत्रूला हुलकावणी दिली,परंतु बादशहाला अशा हुलकावणीचा चांगलाच अनुभव असल्या ने तो शहाणा झाला होता.आपले वडिल शिवाजीराजे त्याच्या भेटीस आग्र्याला गेले असतां,मोठ्या शिताफीने निसटुन महाराष्र्टात परत आले,त्यावेळी त्यांना पकडण्यासाठी बादशहाने कमी का प्रयत्न केले असतील?बादशहाने आपल्या प्रत्येक सरदाराला प्रचंड सेना देऊन प्रत्येक किल्ला हुडकण्याची आज्ञा दिली होती.तो अनुभव जमेस धरुन आज ना उद्या बादशहाची दृष्टी विशाळगडाकडे वळेल ही भीती राजारामांना चैन पडु देत नव्हती.’पुढं काय कराव’?हा एकच सप्ताक्षरी मंत्र ते जपत होते.
प्रसंग खरोखरच निर्वाणीचा होता. संपूर्ण महाराष्र्ट शोकमग्न,अस्थिर झालेला,शत्रूने हौदोस घातलेला,अशा परीस्थित स्वराज्याची जबाबदारी अकल्पित शिरावर येऊन पडल्याने राजाराम थोडे गांगरुन गेले असले तरी, आपली ही स्थिती कोणाच्या नजरेस पडू दिली नाही,उलट रामचंद्रपंत व मुत्सद्यांना धीरच देत होते.महालात एकटे असले की मात्र त्यांच्या मनाची काहिली होत होती. तेवढ्यात ताराबाई प्रवेशीत म्हणाल्या, आपण मघाशी नुसतेच डोकावुन माघारी वळलात आम्ही कोणी परके होतो का?
तुमचा विरस होऊ नये म्हणुन माघारी फिरलो.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-५-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – १४.
स्वारींंच्या येण्याने आमच्या आनंदा चा कधी तरी विरस होईल का?होय! नक्कीच झाला असतां.कारण नुकतीच राजाज्ञा आलीय!काय राजाज्ञा?कोणत्या राजाची?आश्चर्याने ताराबाईंनी विचारले. बाळराजे शिवाजींची!आमची कैदेतुन लवकर सोडवणुक करा,अशी आज्ञा पाठवली.बालराजेंनी आज्ञा पाठवली?ते छावणीत थोडेच आहेत?ते तर बादशहा चे कैदी आहेत,आणि त्यांची ती काय आज्ञा?आपण इतका बाऊ तो काय करता?
ताराsss ताराss तूच हे म्हणतेस विश्वास नाही बसत.बाळराजे शिवाजींची आज्ञा ही राजाज्ञा नाही असं तुला वाटुच कसं शकते? रायगड सोडतांना मी घेतलेली शपथ तू विसरलीस की काय? मी शपथ घेऊनही दादासाहेबांना सोडवता आले नाही,वहिणी व बाळराजें चे रक्षण करतां आले नाही आणि आतां पर्यंत शत्रूने स्वराज्याचे घेतलेले किल्ले सांभाळतां आले नाही,म्हणुन रात्रंदिवस माझ्या जीवाची नुसती घालमेल,तडफड होत आहे.पण मी म्हणते,एवढी काळजी वाटण्याचे कारणच काय?मामंजीनी स्थापलेल्या या स्वराज्यावर जेवढा भावोजींचा हक्क तेवढाच तुमचाही!नऊ वर्षे त्यांनी राजसुख भोगलं आणि बाईही महाराणी म्हणुन मिरवल्यात,आणि आता ते सुख तुमच्या वाट्याला आले,तेव्हा….
ते सुख आम्ही भोगावं आणि तुम्ही राणी म्हणुन मिरवावं,असच ना?तारा!ही किती कोती समजूत? थोरल्या महाराजांनी या स्वराज्याची स्थापना व्यक्तीसुखासाठी केली असा समज आहे का तुझा?त्यांच्यानंतर दादासाहेबांनी नऊ वर्षे कारकिर्द गाजवली ती स्वसुखासाठी, स्वराज्य उपभोगासाठी असं मानतेस कां? तारा! तूं चुकतेस!
स्वराज्य स्थापनेवेळी थोरल्या महाराजांचे ध्येय उदात्त,व्यापक आणि सत्वशील स्वरुपाचे होते.स्वराज्यातील सामान्य व्यक्ती आणि छत्रपती हे स्वराज्याचे सारखेच घटक आहेत. मी कोण राज्योपोभोग घेणारा? न्यायानं, लौकिकानं आणि धर्मानं तो अधिकार बालशिवाजींचाच आहे.मी त्यांचा व पर्यायाने स्वराज्याचा सेवक आहे.माझ्या अंगी छत्रपतींचं रक्त खेळत असल्यामुळे स्वाभाविकच जबाबदारी माझ्या शिरावर आली आहे.दादासाहेबांनी नऊ वर्षे स्वराज्याची किती खडतर सेवा केली हे विसरुं नकोस.
आमच्या मुर्खपणामुळे,हलगर्जी पणा मुळे अथवा भित्रेपणामुळे म्हण धाकट्या छत्रपतींचं रक्षण आमच्याकडुन झालं नाही हे आमचं दुर्देव!अशावेळी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न न करतां, आज या बेवारशी पडलेल्या स्वराज्यावर हक्क सांगावा असा जर तुझा सल्ला असेल तर,तुझ्या या कवडीमोल सल्ल्याची आम्हाला गरज नाही.तरीही चिकाटी न सोडतां ताराबाई म्हणाल्या, पण स्वारी!आजपर्यंत बाईंनी व बाळराजें नी राज्याचा उपभोग घेतलाच ना? होय! घेतला व पुढेही घेतील.त्यांचा शब्द तीच राजाज्ञा असेल!
आई अंबाबाईच्या कृपेने सुखाचं ताट समोर येऊनही उपभोग घ्यायचा नाही हा कपाळकरंटेपणाच नाही का?
आपल्या पत्नीचे विचार ऐकुन तीच्या डोक्यात कोणत्या प्रकारचे विचार खेळत आहे हे राजारामांच्या लक्षात आले. त्यांच्याकडे तिव्र दृष्टीने पाहत म्हणाले, तारा!हे स्वार्थी विचार खात्रीने तुझे नव्हेत बोलवतां धनी दुसराच आहे.त्याशिवाय तुझ्या निर्मळ विचारांत ही आत्मघातकी क्रांती होऊच शकत नाही.अप्रत्यक्ष आमच्या सोयरामांसाहेब,तुझ्या सासुबाई ह्या स्वार्थी विचारांमुळेच स्वजीविताला मुकल्या,हे प्रत्यक्ष उदाहरण समोर असतां तुही स्वराज्याची लालसा धरावी? तारा! आतांपर्यंतच्या तुझ्या सहवासावरुन हे विचार तुझे नाही याची खात्री आहे.तारा! हे अशुभ विचार डोक्यातुन काढून टाक. नाहीतर हेच विचार पुढे स्वराज्यात दुफळी माजविल.नऊ वर्षे दादांनी दिलेल्या बंदीवासात संतोषाने काढलेस, चुकुनही असे आत्मघातकी विचार तुझ्या डोक्यात आले नाही,आतां तर स्वतंत्र झाल्यावर तुझे विचार वेगळे असावयास हवे होते,पण नाही,बाहेरुन शिरलेल्या या विचारांनी माझा,तू स्वतःचा, व स्वराज्या चा घात करशील.जा…महाराजांच्या उदात्त विचार,ध्येय समोर ठेवुन हे घाणेरड्या विचारांना तिलांजली दे! आपल्या समजावण्याचा परिणाम झाला असेल असे त्यांना वाटले पण,वस्तुस्थिती वेगळी होती.आपला वार खाली गेला पाहुन त्या निराश झाल्या.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि.२८-५-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – १५.
रामचंद्रपंत प्रवेशुन मुजरा केला व म्हणाले,महाराज! आपल्या हुकमानुसार सर्व लहान थोर सरदार,धनाजी, संताजी, चव्हाण,निंबाळकर,साळुंके,पवार,कदम, दाभाडे बंधु आणि चोहीकडे गेलेले हेर परतले आहेत.क्षणभर विचार करुन राजाराम म्हणाले,प्रथम हेरांच्या बातम्या ऐकाव्यात म्हणजे पुढील मनसुबा करणे सोईचे होईल.नको..त्यापेक्षा सर्वानाच बोलवा म्हणजे एकाच बैठकीत मसलत करतां येईल.आज्ञा!म्हणुन पंत गेल्यावर, शेजारी बसलेल्या ताराबाईंना म्हणाले,हे नवीन विचार कोणाच्या डोक्याची देन आहे कळेल का?हे काय भलतच?मी कां दुसर्याच्या ओंजळीने पाणी पिते का?मग तुझ्या डोक्यात असे आत्मघाती विचार आलेच कसे?तुमच्या अंतर्गृहात खलबतं चालतात त्यातील कोणीतरी बोलल्याशिवाय तुझ्या डोक्यांत शिरले नाही.आमची कसली खलबतं स्वारी?
तेवढ्यात रामचंद्रपंत सर्व सरदार मंडळी व हेरांसह आंत प्रवेशले.सर्वांनी मुजरे करुन स्थानापन्न झाल्यावर, राजारामांनी सर्वावर नजर फिरवली.पंत बोलावलेली सर्व मंडळी आली परंतु सेनापती दिसत नाही.त्यांचीच तर नितांत आवश्यकता आहे.आवंढा गिळून दुःखी स्वरांत पंत म्हणाले,महाराज!दुर्दैव आपल्या हात धुवुन पाठी लागले आहे. रुद्रगडच्या चकमकीत शर्थीची तलवार गाजवुन,भयंकर गंभीर जखमी अवस्थेत सेनापती सरकार कामी आलेत.ही वार्ता ऐकुन राजारामांवर वज्राघातच झाला. ते ऐकदम स्तब्ध झाले.मुखातुन शब्द निघेनासे झाले.क्षणभराने सावरुन म्हणाले,काय हे दुर्दैव?स्वराज्य कोंदणातील एक मौलिक तेजाचा हिरा कायमचा निखळला.पंत आज स्वराज्य रक्षणार्थ ज्या अनुभवी वीरांची आवश्यकता आहे तेच सोडुन जाताहेत. ही स्वराज्यनौका कोणत्या कर्णधारावर सोपवावी?राजारामांना निराशेने ग्रासले.
महाराज!आपण बिलकुल काळजी करुं नका,संताजी उभे राहुन मुजरा करत विनयाने म्हणाला.जखमी सेनापतींना मेण्यात घालुन आमच्याच छावणीत आणले होते.अंतिम श्वास सोडतेवेळी, सबंध आकाश फाटले असतांनाही,तो अतुल पराक्रमी योध्दाने आम्हा सर्वां कडुन प्रतिज्ञा घेऊन म्हणाले, मीच त्या चांडाळ बादशहाची खबर घेतली असती पण दुर्दैवानै शरपंजरी पडलो.तुम्ही सारे स्वराज्याचे नेकजात सेवक,अभिमानी पुरस्कर्ते,माझ्या वतीने त्याचा सूड घ्या आणि छत्रपतींचं कुळ केव्हाच नामशेष होणार नाही हे त्याच्या प्रत्ययाला आणा. स्वाराज्यातील प्रत्येक मराठा स्वराज्य रक्षणार्थ अहर्निश झटतो हे त्याला दाखवुन द्या.महाराज!आम्ही सर्वांनी सेनापती महादजी पानसंबाळ समोर घेतली आहे.त्यांची अंतिम इच्छा मी पूर्ण करेन.बादशहाला सळो की पळो करुन शेवटी कुत्र्याच्या मौतीने मरायला लावीन तरच मी संताजी घोरपडे!
शाब्बास संताजी!तुमची प्रतिज्ञा ऐकुन मी स्वराज्य रक्षण करुं शकेल याची खात्री वाटते.थोरल्या महाराजांच्या पोटी जन्म घेतला म्हणुन मला मोठेपण आलय,परंतु छत्रपतीचं मोठेपण अशा आपत्काळी जगाच्या निदर्शनास आणणे आतां सर्वस्वी तुमच्यावर अवलंबुन आहे.
पंत!हेरांनी कोणत्या बातम्या आणल्या? हेरांच्या सर्व बातम्यांच एकत्रीकरण करुन पंत म्हणाले,महाराज!हेरांकडुन आलेल्या बातम्या अत्यंत उद्वेगजनक आहेत. बादशहाने संभाजीराजेंचा वध करुन राणी साहेब व युवराजास कैद केलेच आहे.आतां फक्त आपण राहिलांत. आपणांस ठार किंवा कैद केले की,तो निर्वैर होऊन सम्राट बनण्याचे स्वप्न बघत आहे.त्यासाठी त्याने आपले मोठमोठे सरदार– इस्माईलखान,रस्तुमखान, अलिमर्दानखान,हुसेनबेग हैदराबादी, विशेषतः मुकर्रबखान ज्यानं प्रथम संभाजीराजेंना पकडलं,ज्याने राजधानी रायगड पाडला आणि ज्याने राणीसाहेब व युवराजांना प्रथम कैद केलं,त्याला “झुल्फिकारखान” पदवी देऊन आपल्या ला मारण्या किंवा कैद करण्यासाठी असंख्य सेनेसह ह्या सर्वांना महाराष्र्टात पाठवले आहे.महाराष्र्टातील प्रत्येक नाकी,मोक्याचे ठीकाणं त्यांनी वेढले आहे.चौफेर शत्रुंचा धिंगाणा सुरु आहे. अशा वेळी मी काय सल्ला द्यावा कळत नाही.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २९-५-२०२१.


