छत्रपती राजाराम म.चरित्र भाग १, (१ ते ५)

कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अंतःकरणाला जबरदस्त पीळ पाडणारी आणि मनःचक्षुसमोर ह्रदय द्रावक देखाव्याचे चित्र उभे करणारी ती दादासाहेबssss म्हणुन ज्योत्याजी केसकरांनी मारलेली हाक ह्रदय पिळवटुन निघाली.आयुष्यभर ज्या धन्याच्या सेवेत सबंध आयुष्य घालवले त्या धन्याच्या रक्षामिश्रित अविशिष्टावर चार …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! छत्रपती राजाराम म.चरित्र!!!

!!  प्रस्तावना  !!

    !! नमस्कार  !!

           आतांपर्यंत रामायण, महाभारतातील व्यक्तीरेखा,कांही संत चरीत्र,कांही ऐतिहासिक चरीत्र याशिवाय सम्राट अशोक,स्वामी विवेकानंद,तसेच दत्तचरीत्र,श्रीपाद वल्लभ चरित्र असे एकुण ३६ व्यक्तीरेखा रेखाटल्या आणि आपणां सर्वांचे प्रोत्साहन मिळत गेल्या मुळे मला एकप्रकारची उर्जा मिळत गेली व मी लिहित गेले.आतां असे चरित्र घेऊन येत आहे की,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या हिंदवी स्वराज्याचा विध्वंश होऊन,मोगलांचे वाढलेले अवाढव्य प्रबळ प्राबल्याच्या कचाट्यातुन सुटुन पुन्हा स्वराज्याची घडी कशी प्रस्थापित झाली,आणि मोगली राज्य सत्तेचा र्‍हास काळास कसा प्रारंभ झाला,आणि ही परिस्थिती निर्माण करण्यास जी व्यक्ती केवळ निस्वार्थ भावाने आपला या राज्यावर अधिकार नाही याची सतत जाणीव ठेवुन राष्र्टाचे हित कसे होईल असेच वर्तन निरंतर ठेवले,ती व्यक्ती म्हणजे छत्रपती राजाराम महाराज!

           ” हे स्वराज्य लोकांच्या सुखा करिता आहे,छत्रपतीच्या उपभोगासाठी नाही!हे स्वराज्य धर्माचे आहे,छत्रपतीच्या स्वसुखासाठी नाही! छत्रपती ही व्यक्ती आणि समाजातील व्यक्ती ही सारख्याच योग्यतेचे स्वराज्याचे घटक आहेत” ही जाणीव सदैव छत्रपती राजाराम महाराजांनी ठेवली.

       छत्रपती संभाजी महाराजांच्या वधा पासुन ते छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यभिषेका पर्यंत म्हणजे १६८९ ते १७०८ हा  १९ वर्षाचा काळ इतिहासांत अत्यंत महत्वाचा आहे.या ऐतिहासिक काळात परस्परविरोधी अनेक गोष्टी घडल्यात.एकीकडे संताजी-धनाजी यांच्या सारखे तलवारबहाद्दर रणझुंजार योध्दे,तर दुसरीकडे गळेकापूचा नीच धंदा करणारे नागोजीराव माने सारखे नराधम सरदार,एकीकडे राजाकरीतां  आपले प्राणार्पन करण्यास मागेपुढे न पाहणारे ज्योत्याजी केसकर,भक्ताजी हुजरे,बंकी गायकवाड यांच्या सारखे नेकजात स्वामीभक्त,तर दुसरीकडे सुर्याजी पिसाळ,बाजी कदम,सुभानजी आटपाडकर आणि कोंडोभट विठ्ठल सारखे फितूर बुडवे हरामखोर स्वामीद्रोही होते.तसेच एकाबाजुला राणी येसूबाई सारख्या दूरदृष्टी,मुत्सद्दी आणि राजकारणी स्री राज्य राखण्यासाठी खटपट करीत होत्या तर,दुसर्‍या बाजुला राणी ताराबाईचे मराठीशाहीवर घाव घालणारे स्वार्थी यादवीचे प्रसंग!

       त्यावेळी गादीचा खरा मालक छत्रपती संभाजींचा मुलगा शिवाजी उर्फ शाहू औरंगजेब बादशहाच्या कैदेत होते.  त्यांच्या कैदेमुळे मराठ्यांची सत्ता खालावली नाही तर,राज्यास दुसरा धनी होऊन,सर्व व्यवस्था पूर्ववत किंबहुना जास्त जोमाने चालु आहे,हे शत्रूस दाखवणे जरुर होते,आणि म्हणुनच राजाराम महाराज (जिंजीस) चंदीस गेल्यावर प्रथम राज्यव्यवस्थेचे काम हाती घेतले.ही राज्यव्यवस्था हाताळण्यासाठी राजचिन्हे धारण करणे आवश्यक होते. सर्वानुमते “छत्रपती” पद धारण केले पण स्वतःस राज्यभिषेक न करतां मंचका रोहन केले.राजाराम महाराजांनी हे पद केवळ शाहूकरीतां व राज्याच्या बचावा करितां स्विकारले.राज्याचा खरा वारसदार शाहू आहे हे ते कधीच विसरले नाही.

           संभाजीराजांच्या मृत्युने स्वराज्य मोडले,मराठेशाही साफ बुडाली असे औरंगजेबास वाटले,परंतु तेच स्वराज्य आणि तीच मराठेशाही भक्कम पायावर स्थापून राजाराम महाराजांनी पुन्हा स्वराज्याचा उत्कर्ष केला.

     नेहमीप्रमाणे आपल्या क्रिया प्रतिक्रीया अपेक्षित!

           मिनाक्षी देशमुख.
              २४-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग – १.

       अंतःकरणाला जबरदस्त पीळ पाडणारी आणि मनःचक्षुसमोर ह्रदय द्रावक देखाव्याचे चित्र उभे करणारी ती दादासाहेबssss म्हणुन ज्योत्याजी केसकरांनी मारलेली हाक ह्रदय पिळवटुन निघाली.आयुष्यभर ज्या धन्याच्या सेवेत सबंध आयुष्य घालवले त्या धन्याच्या रक्षामिश्रित अविशिष्टावर चार दिवसांपासुन मृत स्वामींची समाधी तो व त्याचे कांही मित्र बांधत असलेली समाधी आज पूर्ण झाली.ज्योत्यावर छत्री बांधतांना ज्योत्याजीच्या अंतःकरणात दुःखाचा प्रचंड लाटा उसळीत समाधीवर अश्रू ढाळीत होता.खरोखरीच तो देखावा ह्रदयाचा थरकाप,कालवाकालव करणारा होता.

         समाधी होती कोणाची? सतत नऊ वर्षे रणांगणावर विद्युल्लतेप्रमाणे चमकुन सभोवार पसरलेल्या शत्रूला “त्राही भगवान” करायला लावून ज्या नरशार्दूला ने जगाला आपले अलोट रणपांडित्य दाखवले.महाराष्र्टात चैतन्य उत्पन्न करुन हिंदुना महत्पदावर चढविणार्‍या शिव छत्रपतींनी स्थापिलेल्या स्वराज्याचे ज्या निधड्या छातीच्या वीराने १६८०ते१६८९  असे नऊ वर्षे रक्षण केले आणि शेवटी स्वातंत्र्याकरितां,स्वराज्याकरितां आणि स्वधर्माकरितां आपले जीवन तृणप्राय मानुन, एखाद्या ज्ञानी तपस्याप्रमाणे ज्यांनी आपल्या प्राणाचे अचाट धैर्याने विसर्जन केले त्या रणगाजी संभाजींची ती समाधी होती.स्वामीभक्त सेवकांनी तुळापुरी भीमेच्या काठी बांधलेली स्वराज्याच्या दुसर्‍या छत्रपतीतींची ती समाधी होती.स्वधर्मासाठी प्रत्यक्ष मोगल सम्राटाच्या तोंडावर थुंकून मृत्युच्या कराल दाढेत स्वसंतोषाने उडी टाकणार्‍या धर्मवीराची ती समाधी होती. दिग्विजयी नरकेसरी छत्रपती शिवरायांचा छावा आज त्या समाधीत कायमची झोप घेत होती.

        त्यावेळी तुळापूर हे नरकापूर झाले होते.मराठेशाही बुडवण्यासाठी बादशहा  औरंगजेब चंग बांधुन,साठ हजार लढाऊ फौज स्वार,एक लक्ष पायदळ,ओझ्या करितां पन्नास हजार उंट,नोकरचाकर धरुन एकूण पांच लाख,विस्तार सुमारे तीन मैलापर्यंत होता.

          त्याने विजापुरात तळ दिला होता. तिथे गाठीच्या रोगाची साथ उद्भवुन, सैन्यातील लोक पटापट मरु लागले. त्याची आवडती बेगम औरंगाबादी महल ही पण त्या रोगाला बळी पडल्यामुळे त्याने विजापुराहुन तळ हलवुन अक्लुजला नेला.तिथेही या रोगाने पाठ सोडली नसल्यामुळे तुळापुरी आला. तिथेही साथीच्या रोगाने उच्छाद मांडला होता.त्याच्या सैन्यातील लोक,बाजार  बुणगे,उंट,हत्ती,बैल,घोडे ही जनावरे मरत व तिथेच कुजत,सैन्याच्या गलिच्छ पणामुळे सर्वत्र घाणच घाण झाल्यामुळे छावणीला नरकपुरीचे रुप प्राप्त झाले.

      या साथीच्या रोगाने बादशहा अगदी कावुन गेला होता,परंतु जबर महत्वाकांक्षे ने मराठेशाही बुडवण्याचा चंग बांधल्या मुळे सर्व आपत्तींना टक्कर देत त्या ऐश्वर्य युक्त शामियान्यातच राहीला.तेवढ्यात महाराष्र्टाच्या दुर्देवाने संभाजीमहाराज त्याच्या हाती सांपडले.त्यांचा अमानुष छळ करुन वध केल्यावर तळ शिकारपूर ला आणले.तुळापुरचा दहा मैलाचा प्रदेश बेचिराख होऊन ओसाड पडला होता.

      तुळापुरीला बादशहाने संभाजींचा छळ करुन केलेला वध ज्योत्याजी केसकरला उघड्या डोळ्यांनी बघावा लागला.बादशहाच्या प्रचंड,अफाट शक्ती पुढे त्याला किंचितही हालचाल करता आली नाही.आपला राजा बादशहाने कैद केला ही बातमी कळतांच,चारही बाजुने सुटका करण्यास मराठे येतील असे त्याला प्रथम वाटले,पण सारं आकाशच फाटले होते.मराठी सैन्याची जिकडे तिकडे पांगापांग झालेली असल्यामुळे ज्योत्याजीची निराशाच झाली.संपूर्ण महाराष्र्टाची त्यावेळी हवालदिल स्थिती झाली होती.जो तो आपल्या दारुण दुःखात चूर झाल्यामुळे निराशेने वेड्या सारख्या झालेल्या ज्योत्याजीकडे कोण लक्ष देणार?त्याचवेळी  जोराचा वर्षकाल झाल्याने तुळापुररला आलेले औदासीन्य धुवुन निघाले.गांव सोडुन गेलेले लोक परतु लागले.कारण त्यांचे जीवन शेती वाडीवरच अवलंबुन होते.त्याचवेळी ज्योत्याजीचे खास माणसे त्याच्याभोवती गोळा होऊ लागले.

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             २४-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग – २.

          रुपाजी आणि बाबाजी भोसले दोघे भाऊ आपली मावशी हरणाबाईला भेटण्यास गुप्त रितीने आले.हरणाबाईचे पती हंसाजी मोहिते व मोठा मुलगा जानाजी स्वराज्याच्या कामी खर्ची पडले होते.बाणेदार वृत्तीचे रुपाजी व बाबाजी सेनापती हंबीररावांच्या सेनेत होते,परंतु त्यांच्या मृत्युनंतर दोघे स्वतंत्रपणे मुलुख गिरी करुं लागले.तुळापुरचा आढावा घेण्यासाठी संताजी घोरपडेंनी खास माणसं नारो महादेव व चांदांजी साळुंखेना पाठवले.तिकडुन छत्रपती राजारामानींही आपले खास हेर भक्ताजी व बंकीस बादशहाच्या टेहणींसाठी ठेवले होते तेही तुळापुरी आले.निरनिराळ्या उद्देशाने एकत्र झालेल्या माणसांनी वेड्यागत झालेल्या ज्योत्याजीला गाठले. हरणाबाईच्या दोन मुली मीरा आणि वीरा समाधीवर वाहण्यासाठी फुले निवडत होत्या.

          मीराला काय वाटले की,ती एकदम उठुन प्रथम आपले दोन भाऊ रुपाजी व बाबाजीकडे पाहिले,नंतर सर्व मंडळींकडे ते सर्व अश्रू ढाळतांना पाहुन कडाडली.हे काय?संभाजीराजे तुम्हाला रडायला सागतात की,बादशहाला रडवायला सांगतात?माझा सूड उगवा असेच सांगतात ना?समाधी बांधली म्हणुन तुमचे कार्य संपले की काय?अजुन बालराजेंना जपायचय?स्वराज्य सेवा करुन हिंदवी राज्यरक्षण करुन बादशहाचा सूड उगवायचा आहे.तुम्ही स्वतःला स्वामीनिष्ठ म्हणवतां ना? मग समाधीवर ही फुलं वाहुन शपथ घ्या आणि आतांपासुन कार्याला लागा!तीचे आवेशपूर्ण बोलणे ऐकुन जणुं संभाजीराजेंनीच मीराच्या रुपाने दिव्य संदेश दिला होता.ज्योत्याजी खडबडुन भानावर येत डोळे पुसत म्हणाले,आतां पर्यंत दादासाहेबांच्या सेवेत हा देह घालवला,आतां बाळराजांची सेवा हीच माझी शपथ!

       स्वराज्याची सेवा करुन हिंदवी राज्य रक्षण करण्याकरितां चांदाजी,भक्ताजी, बंकी यांनी देहात प्राण असेस्तोवर राजारामांच्या सदैव पाठी राहण्याची शपथ घेतली.रुपाजी,बाबाजींनी बादशहाचा सूड घेण्याची शपथ घेतली. या सर्वांच्या शपथा घेऊन झाल्यावर पुढे येऊन मीरा म्हणाली,पुर्वीच्या काळी एका मीराने सर्व सुखाचा त्याग करुन देह प्रभु चरणी वाहिला,तशीच ही मीरा सर्वस्वाचा त्याग करुन स्वराज्यसेवेत घालवील. आणि मीही मीराआक्का प्रमाणे वागेन, लहानग्या वीराने पण शपथ घेतली. तथास्तु…..

       त्यावेळी संपूर्ण महाराष्र्टात हाहाकार उडला होता.मराठ्यांचा राजा मारल्या गेला,राणी व बालराजे शाहुंना बादशहाने कैद केले होते.आतां मराठ्यांना कोणी त्राता उरला नाही, आपण सहजच मराठेशाही बुडवु असे बादशहाला वाटल्यामुळे त्याचे सरदार महाराष्र्टभर हौदोस घालुं लागले.परंतु मीरेच्या बोलण्याने ज्योत्याजीची चेतना जागृत होऊन तो राणी येसुबाई व बाळ राजे बंदोबस्तात असतील या कल्पनेने त्याने रायगडाची वाट धरली.

       नेता नसल्यामुळे भरकटलेले चौफेर विखुरलेले भयभीत मराठे,आप्तेष्टांच्या वियोगाने शोक करणारी कितीतरी लोकं वाटेत ज्योत्याजीला भेटली.अनेक येणार्‍या संकटांवर मात करत,मिळतील ती कंदमुळे खाऊन नदीनाल्याचे पाणी पिऊन,एखाद्या झाडाखाली रात्रीची विश्रांती घेत पहुडले असतां,त्याला ती घटना आठवली….

       संगमेश्वरी संभाजी असल्याची बातमी मिळाल्यावर मुकर्बबखान दोन हजार स्वार आणि एक हजार पायदळ फौज घेऊन संभाजीस पकडण्यासाठी कोल्हापुरहुन निघाल्याची बातमी हेरांनी संभाजीला कळवली पण,त्यांचा विश्वास बसला नाही.संगमेश्वरी वाड्याच्या दरवाजावर ज्योत्याजीचा पहारा होता. शत्रू चालुन आला तेव्हा पहिली झुंज त्यानेच केली.त्याच्या मदतीला आलेल्या कापशीकर मालोजी घोरपडेंना व

 सर्वांनाच  शत्रूने कापून काढले.प्रेतांचा खच पडला.तो स्वतः जखमी होऊन पडला तेव्हा छातीचा केलेला कोट फुटला.खाना ने वाड्यात प्रवेश करुन महाराजांना कैद केले.ज्यावेळी खानाची फौज येत आहेसे पाहुन कांही सैन्यासह कवी कलुष खाना वर चालुन गेले असतां,कलुषाचा उजवा हात तीर लागून जायबंदी झाल्याने घोड्यावरुन खाली पडल्यावर त्यांना कैद केले.

       मुकर्रबखानाने संभाजीस हत्तीवर बांधुन घेऊन गेला.पुढे कांही दिवसांनी दोघांचाही अतोनात छळ करुन शिरच्छेद करण्यांत आला.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              २५-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग – ३.

          आपल्या राजाचा बादशहाने खून केला हे कोणता मराठा सहन करेल?संताजी घोरपडे,त्यांचा भाऊ बहीरजी, आणि राजाराम महाराजांची खास माणसे,तसेच धनाजी जाधव,मालोजी, खंडबा दाभाडे,निंबाळकर,नाईक,भोसले ह्या सरदार मंडळींनी शपथ घेऊन बादशहाचा सूड उगवण्याच्या उद्योगाला लागले.

           राजाराम महाराजांनी रायगडाचा पक्का बंदोबस्त करुन बाल शिवाजी व राणी येसूबाई,तसेच त्यांचा कबिला यांच्या संरक्षणाची शक्य तेवढी काळजी घेतली.ते स्वतः,रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी,खंडो चिटणीस ह्या मुत्सद्यासह विशाळगडी खलबत करीत होते.बाळराजे अज्ञान असल्यामुळे राजाराम महाराजांनी कारभार पहावा असे ठरले.

          ज्योत्यांजीचा खडतड प्रवास चालुच होता.डोक्यात विचारांचे काहूर माजले होते.मुकर्रबखानची आठवण झाली की,त्वेषाने दात ओठ खात त्याच्या नरडीचा घोट घ्यायची तिव्र इच्छा व्हायची पण त्याच्या अफाट सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही हे माहित असल्या मुळे दातओठ खात अगतिकपणे चुप बसत.या विचारांत चालत असतां,मार्ग चुकुन इंदापूरला पोहोचल्याने त्याला धक्काच बसला.नाही तर आतांपर्यंत केव्हाच रायगडावर पोहोचलो असतो. दुसर्‍या दिवशी नीरेच्या काठी एक घोडा पाणी पित असलेला दिसला.आजुबाजुस कोणीच न दिसल्यामुळे घोड्याला चुचकारुन त्याच्यावर स्वार झाला.त्याच्या गतीवरुन घोडा कसलेल्या सरदाराचा असावा असे वाटले.वरंधाच्या घाटाच्या पायथ्याशी थोडी विश्रांती घेत असतां, खालुन एक स्वार रेंगाळत येत असलेला दिसला.आपल्याला या स्वाराकरवी रायगडावरची माहिती मिळेल या उत्सुकतेने त्याची प्रतिक्षा करीत होता.तो जवळ येताच,ज्योत्याजीने त्याला ओळखले.तो उध्वव होता.आतुरतेने रायगडाची माहिती विचारली असतां, ऊध्ववने अत्यंत उद्विग्न स्वरात सांगीतले की, रायगढ लढला आणि शेवटी पडला. मुकर्रबखानाने राणीसाहेब,बाळराजे व इतर मंडळींना कैद करुन नेले.अरेरे!काय ऐकतोय हे मी?रायगड पडला.राणी साहेब,बाळराजे कैद झाले? अशक्य… अगदी अशक्य…चोहोकडून आपले दुर्देव ओढवले.नेकजात समजुन थोरल्या महाराजांनी नेमलेला रायगडचा गडकरी सूर्याजी पिसाळ निमकहराम झाला. खानाने देऊ केलेल्या वाईच्या देशमुखीला भूलुन तो चांडाळ फितूर झाला. ज्योत्याजीवर या बातमीने वज्राघात झाला.बाळराजास सांभाळण्याच्या उमेदी ने,मोठ्या उत्कंंठेने रायगडी निघाला होता पण उध्ववच्या बातमीने कंबरच खचली.

           थोरल्या महाराजांची पुण्याई इतक्याच सरली की काय?त्यांना जाऊन केवळ दहा वर्षे लोटली नाही तोच,त्यांनी स्थापलेले स्वराज्य जमीनदोस्त होण्याची वेळ यावी?हे परमेश्वरा! तूं हा काय प्रसंग महाराष्र्टावर आणलास? आतां सारी भिस्त राजाराम महाराजांवरच!!!

         त्वेषाने ज्योत्याजी उध्ववला म्हणाला,चल!असचं खानाच्या मागावर जाऊन,तो बादशहाच्या छावणीत पोहचण्यापुर्वी राणीसाहेब व बाळराजेंची सुटका करु या!ज्योत्याजी शांत हो! आपल्याला कोण सहाय्य करणार?तुळापुरी महाराजांचा वध झाल्याची बातमी ऐकुन मराठ्यांचे अर्धे अवसान गेले,आणि राणीसाहेब व युवराज कैद झाल्याच्या बातमीने तर सार्‍यांची कंबरच मोडली.रायगडाचा इतका जबरदस्त बंदोबस्त असतांना,मुकर्रबखानाने रायगड लुटला,राजकैदी नेले,त्याच्याशी वाटेत सामना करायला एकदिलाने लढणारे सैन्य नको?मग उध्ववा,आपल्या राणी व स्वामींना कैद करुन नेत असतांना आपण स्वस्थ बसावं का?ज्योत्याबा,तूं मला इतके वर्ष ओळखतोस मी स्वराज्यसेवेत निमकहरामी करेल असा तुझा गैरसमज तर झाला नाही ना?

मी ही निश्चय करुनच निघालो,काय वाटेल ते झालं तरी,युक्ती प्रयुक्तीने खानाच्या छावणीत करुन राणीसाहेबांची भेट घ्यायची व त्यांच्या आज्ञेप्रमाणे पुढील बेत ठरवायचय!दोघांनी घाट चढण्यास सुरुवात केली.मोठ्या मुश्कीलिने अर्धा घाट चढल्यावर, नाइलाजास्तव त्या भयान किर्र झाडीत मुक्काम करावा लागला.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              २५-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग – ४.

           सार्‍या समस्यावर मात करत दोघेही एका झाडाखाली बसले असतां, त्यांना ढोलक्याचा व डफाचा आवाज एकू आला.आज सर्व महाराष्र्ट दुःखात चूर असतां, डफ,तुणतुणं वाजवणारे  हे कोण हरिचे लाल असतील?डफ वाजवणारे नक्कीच मराठे असावेत.सारा महाराष्र्ट शोकमग्न असतांना,डफ वाजवणारे कोण असतील याची ज्योत्याजीला अतिशय उत्सुकता असली तरी,दिवस उजाडेपर्यंत वाट पाहणे भाग होते.

       भल्या पहाटे दोघेही वर चढुन आल्यावर,त्यांना तिथे वंजारी,वडार, काथकरी,कोल्हाटी अशा मिश्र जातीचा बायकांमुलांसह तळ पडलेला दिसला.हे लोक एका जुटीने फिरत असुन,कोकणां त जायला निघाले होते.त्यांची जिविका वेगवेगळे खेळ करुन दाखवण्यावर चालत असे.तिथे ढोलकी,डफ,तुणतुणे वगैरे वाद्ये पाहुन ज्योत्याजीचे डोकेच सणकले.पण मोठ्या मुश्कीलने उध्ववने आवरले.ज्योत्याजी आपण ज्या कामा साठी निघालो,ते काम या लोकांच्या सहाय्याने सहज होईल.अरे!थोरल्या महाराजांची निती लक्षात घे!त्यांना कोणताही माणुस वा वस्तु,शुल्लक, निरोपयोगी दिसली नाही.प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वराज्याकरितां उपयोग करुन घेतला व संग्रहही केला होता.

          ज्योत्याजी!खानानं आपल्या राणीसाहेब,युवराज व इतर मंडळीस कैद केले,त्यांना सोडवण्याचा प्रयत्न मराठे करतील याची त्याला पूर्ण जाणीव असल्यामुळे खानाने कडेकोट बंदोबस्त नक्कीच केला असेल.तो कुणालाही छावणीकडे फिरकू देणार नाही,चुकुन कोणी गेलाच व संशय आलाच तर कापून काढण्यास कमी करणार नाही.या तमासगीरांना खेळाच्या निमित्याने छावणीजवळ घेऊन गेलो तर आंत प्रवेश करतां येईल,हा बेत ऐकुन ज्योत्याजीला आनंद झाला.

         उध्वव त्यातील एका वृध्दाकडे जाऊन विचारले,तुम्ही कोठे जात आहात वृध्द म्हणाला,मराठ्यांचा एक दिलदार राजा आहे,त्यांच्याकडे आमचे नाच,गाणे, खेळ दाखवल्यावर ते खुष झाले तर, आमचे दारीद्र्यच नष्ट होईल.अरेरे!मग तुमची निराशाच होईल.कारण गुणांच्या चाहत्या राजाचा बादशहाने वध केलाय!हे ऐकुन तो वृध्द दुःखी निराश झाला. उध्दव म्हणाला,आतां दुःख करुन काय उपयोग?त्यापेक्षा आम्ही सांगतो तसं वागलांत तर मात्र तुम्हाला चांगली प्राप्ती होईल.तो तयार झाल्यावर उध्दवाने त्याचेशी खलबत केले.आणि ती मंडळी  सोबत येण्यास तयार झाली.दुसर्‍या दिवशी मजल दर मजल करत निंबगांवी पोहचले.उध्दव आणि ज्योत्याजीनेही तमासगिरांसारखाच पेहराव करुन त्यांच्या सारखेच झाले.ते सर्व छावणी जवळ पोहचले.खानाजवळ दोन हजार स्वार,तीन हजार पायदळ व बाजारबुणगे होते.ठीकठीकाणी त्यांचा तळ पडलेला होता.रायगडावरुन आणलेल्या खाशा कैद्यांचा खानाने चोख बंदोबस्त ठेवला होता.ठीकठीकाणी नंग्या तलवारीचा कडेकोट अहोरात्र पहारा होता.त्याच्या परवाणगीशिवाय कोणालाही आंत बाहेर जाता येत नव्हते.इथुनच मुकर्रबखानाने राजकैदी घेऊन येत असल्याचा निरोप बादशहाला पाठवला.तो बादशहाच्या हुकुमाची वाट पाहत इंदपुरास तळ देऊन बसला होता.रायगड जिंकल्यावर,येसू बाईंना कैद करण्यास गेला असतां, येसू बाईने आपल्या जिवास अपाय होणार नाही अशी शपथ कुराणावर हात ठेवुन खानाकडुन घेववली.व खानानेही मनःपुर्वक शपथ घेतली होती.येसूबाई फार धीराच्या,मुत्सद्दी शहाण्या होत्या.

     संगमेश्वरी संभाजीराजे कैद झाल्याचे कळल्यावर,मुत्सद्याबरोबर मसलत करुन राजारामानी त्यांच्या कुटुंबकबिल्यासह बाहेर पडावे.मी व बाळराजे इथे राहण्यास रायगडासारखी दुसरी सुरक्षित जागा नाही.भावोजीसह तुम्ही सर्व बाहेर निघुन आम्हास काढुन न्यावे.राणींची मसलत ऐकुन सर्वांनाच धीर आला,पण वहिणींना एकटे टाकुन जाणे राजारामांच्या जिवावर आले.प्रसंग बाका पाहुन गुपचुप राजाराम कबिल्यासह बाहेर पडले.आणि सूर्याजी पिसाळाच्या फितूरीने खानाने रायगडावर कब्जा केला

            क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग – ५.

         खानाच्या छावणीजवळ तमास गिराचा तांडा पोहचुन वेगवेगळे खेळ  करत मोगलसैन्यांची करमणुक करत होते.इकडे ज्योत्याजी व उध्दव खानच्या छावणीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते.पण बादशहा मोठा हुशार होता. त्याला भिती होती,मराठे हुन्नरी असुन वाटेल त्या रुपात येऊन फंद फितूरी करतील.तिसर्‍या दिवशी येसूबाईंना तमासगिरांची खबर लागली.ज्याअर्थी खान नको म्हणत असतांना हे हट्ट करतात,म्हणजेच कांही तरी राजकारण आहे हे त्यांच्या लक्षांत आले.आणि त्यांना युक्ती सुचली.त्यांनी दासीकरवी खानाकडे निरोप पाठवला की, दोन दिवसांपासुन छावणीच्या आजुबाजुला ढोलकीचा आवाज येत असल्यामुळे बाळराजे तमाशा पाहण्यासाठी हट्ट धरुन बसलेत असा राणीसाहेबांचा निरोप दासीने सरळ खानाच्या डेर्‍यात जाऊन सांगीतल्यावर,त्याच्या मनांत नसले आणि आज जरी आपली कैदी असली तरी मराठ्यांची राणी आहे.निरोप फेटाळण्याचे सामर्थ्य त्याच्यात नव्हते. अनमानाने छोट्या राजेसाहेबांना खेळ दाखवण्यास कबुल झाला.

        खानाने हुसकावुन लावलेल्या तमासगीरांना परत बोलावण्याचा हुकुम दिला.इतका द्रविडी प्राणायम करुनही ज्योत्याजी व उध्ववला छावणीत शिरतां आले नाही म्हणुन निराश होऊन संचित होऊन बसले असतांनाच,खानाचा निरोप घेऊन स्वार आल्यावर दोघांच्या आशेला अंकुर फुटले.निवडक दहा लोकानाच आंत जाण्याची परवानगी मिळाली. शेवटी बरीच घासाघीस केल्यावर वीस माणसांना जाऊ दिले.आंत गेल्यावर राणीसाेबांचा बिचवा त्यांनी ओळखला. खेळ सुरु झाल्यावर यात दगाफटका नसल्याची खानाला खात्री पटली.खानाने बक्षिसी दिल्यावर,संधी साधुन उध्वव राणीच्या बिचव्याकडे जात असलेला पाहुन,खानाने त्याला हटकलेच. खान साहेब आपण जसे बक्षिस दिले,तसेच आमचे धनीसाहेबही देतील,असे म्हणुन पुढे सरकला,तोच बिचव्यातुन लहानसा हात बाहेर आला.तो लहान हात महाराष्र्टाच्या राजाचा होता.ते स्वतः जवळ बोलावत असल्यामुळे खानाचा नाईलाज झाला.पडद्याजवळ जाताच, गहिवरलेल्या अगदी हळु आवाजात म्हणाला,राणीसाहेब!मी उध्वव व ज्योत्याबा आलो आहोत.उद्या ज्योत्याबा ला खानाजवळ नोकरी मागायला सांग. ही वस्तु भावोजींना द्या.मामंजीचं हे पवित्र दैवत आहे.हा बाण(लिंग) भावोजीं ना देऊन निरोप सांगा की,या दैवताला विसरु नका,याची हेंडसाळ करुं नका. बाळराजे! आपली काय आज्ञा आहे? इथुन आम्हाला लवकर सोडवा हा निरोप काकांना द्या.

       हा सर्व प्रकार इतक्या अल्पावधित झाला की,खानाला किंचितही संशय आला नाही.उध्दवने बाण झटकन मुंडाश्यात गुंडाळला.महाराजांनी या बाणाचे नांव “चंद्रशेखर” ठेवले होते. त्यांनी संभाजीराजेंना याच्या अद्भुत सामर्थ्याविषयी सांगुन बघीतले,शेवटी येसूबाईंनी तो बाण स्वतःजवळ ठेवुन, यथाशक्ती नित्यनेमाने पुजा करीत होत्या. त्या कैद झाल्यावर बाण त्यांच्याजवळच होता.याचे काय करावे या विचारांत असतांनाच,उध्दव आला व त्यांचे काम सोपे झाले.काम फत्ते झाल्याचा उध्दवने नेत्रसंकेत करतांच ज्योत्याजीला परमानंद झाला.गळ्यात बांधलेले ढोलके जोरजोरात बडवुं लागला.बाहेर जातांना उध्दवने खानास कुर्निसात व आपल्या राजाला मुजरा केला.छावणीपासुन बरेच अंतर चालुन आल्यावर,तमासगिरांच्या तांड्याला निरोप दिला.पुढे ओढा लागल्यावर उध्दवने स्नान करुन बाणाची यथासांग पुजा केली.उध्दवा!तूं निघ ! राजाराम महाराज प्रतापगड किंवा विशाळगडावर भेटतील,त्यांना माझा मुजरा सांग,व बाळराजेंची काळजी करु नका म्हणावं,आणि बादशहाचा सूड घेण्याची शपथ सर्व मराठ्यांनी घेतली हे ही सांग!

          ज्योत्याजी दुसर्‍या दिवशी परत खानाच्या छावणीत जाऊन,खटपट केल्यावर,बाळराजेंना सांभाळण्याच्या कामगिरीवर त्याची नेमणुक झाली. संताजी व धनाजी आपली कर्नाटकातील मोहिम अर्धवट टाकुन संभाजीराजेंच्या हुकुमानुसार तातडीने महाराष्र्टात परतले त्यांचा मुक्काम पन्हाळगडाच्या खाली पडला असतां,बादशहाने संभाजीराजेंना कैद करुन त्यांचा वध केल्याची बातमी ऐकुन दोघेही थिजल्यासारखे झाले. तेवढ्यात विशाळगडावरुन रामचंद्रपंत अमात्यांची थैली आली.

             क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                            

 

छत्रपती राजाराम म.चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading