छत्रपती राजाराम म.चरित्र भाग ५, (२१ ते २५)

कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अंतःकरणाला जबरदस्त पीळ पाडणारी आणि मनःचक्षुसमोर ह्रदय द्रावक देखाव्याचे चित्र उभे करणारी ती दादासाहेबssss म्हणुन ज्योत्याजी केसकरांनी मारलेली हाक ह्रदय पिळवटुन निघाली.आयुष्यभर ज्या धन्याच्या सेवेत सबंध आयुष्य घालवले त्या धन्याच्या रक्षामिश्रित अविशिष्टावर चार …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! छत्रपती राजाराम म.चरित्र!!!

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग – २१.

          आपल्याविषयीचा संशय इतर यात्रेकरुंना आला याची कल्पना राजारामादी मंडळींना आल्याने,आतां पर्यंतचा प्रवास अनेक अडचणी सोसुन पार पडला,व आतां थोड्यासाठी हे संकट उद्भवल्याने सर्वजण विवंचनेत पडले. घाईघाईने कशीतरी जेवणे आटोपली व इथला मुक्काम तात्काळ हलवुन दुसर्‍या निर्भय ठीकाणी तळ देण्याचे ठरविले. राजारामांचे जेवण झाल्यावर,त्यांच्या हातावर दाभाडेंनी पाणी घातले ही अस्वाभाविक कृती पाहुन त्या यात्रेकरुंचा संशय दृढ झाला.खात्रीने हे लोक मातब्बर असुन हातावर पाणी घालुन घेणारी व्यक्ती यांचा नायक असावा अशा समजाने ती कानडी मंडळी कागाळी करण्यासाठी सुभेदाराच्या छावणीत गेली

        महाराज!आतांपर्यंत कसेबसे निभावले,पण यापुढे कठीण दिसतय!या कानड्यांना संशय आलेला दिसतोय, हळुच खंडो बल्लाळ म्हणाला.ती मंडळी बहुतेक इथल्या अंमलदाराकडे गेली असावी.ते चौकशीला येण्यापुर्वी, महाराजांना घेऊन संताजी,धनाजी व दाभाडे यांनी आतांच्या आतां निघुन एका मार्गाने आणि दुसर्‍या मार्गाने तुम्ही, घोरपडे,दाभाडे बंधुसहित कावेरीच्या वळणावर आमची वाट पहावी.खंडो बल्लाळ म्हणाले.आम्ही चंदाजीराव, आटोळ वगैरे मंडळी इथे राहुन काय घडते ते पाहु.जर इथल्या अंमलदारा कडुन चौकशी झालीच तर प्रसंगानुरुप वागुन चंदीला आपल्याकडे पोहचु, सगळं व्यवस्थित निभावले तर,मागोमाग येऊन कावेरी वळणावर भेटु या!

     ठरल्याप्रमाणे दोन्ही जमाव जाऊन थोडा वेळ होत नाही तोच,सुभेदाराचे धरणे आलेच.महाराजांना पुढे रवाना केल्याबद्दल त्यांना समाधान वाटले. आलेल्या खानाच्या हस्तकांनी चौकशी केल्यावर आपण यात्रेकरी असून यात्रा करीत जात आहोत या ठराविक उत्तरा शिवाय त्यांनी दुसरे उत्तर दिले नाही. त्यांना खानासमोर नेऊन कसुन चौकशी केली परंतु,त्याला मिळालेल्या माहितीचे कांहीच चिन्ह न दिसल्याने,बाजीला पुढे आणुन शहानिशा केल्यावर बाजी कदम म्हणाला,खानसाहेब!याच लोकांसोबत बादशहाचा शत्रू राजाराम होते.एका मराठ्याने अशी निमकहरामी करतांना पाहुन खंडो बल्लाळला त्याच्या नरडीचा घोट घेण्याची तिव्र इच्छा झाली,पण सद्य स्थितीत आततायीपणा करणे योग्य नसल्याने,शांतपणे खंडो म्हणाला, खान साहेब आम्ही कापडी यात्रेकरु यात्रा करत रामेश्वरला जात आहोत.आम्ही उतरलो तिथे आणखीही कांही यात्रेकरु होते पण ते आपल्या मार्गाने निघुन गेले. आमचा दुसरा मार्ग म्हणुन थांबलो

        आम्ही कोणी दंगेखोर,लुटारु,डाकु नाही,उलट हाच माणुस लुटारु आहे. कांही काळ आमच्या सोबतच होता, याची वागणुक ठीक नसल्यामुळे आम्ही याला हाकलुन दिले,त्याचा बदला घेण्या साठी आमच्यावर खोटे किटाळ आणत आहे.खानसाहेब!अशा हलकट,नीच माणसाच्या सांगण्यावरुन आम्हा गरीबांना कां हैराण करताहात?

       आपल्यावरच बाजु उलटत असल्याचे पाहुन बाजी कदम गोंधळुन गेला.खानने त्याला दरडावुन विचारले असतां तो नीटपणे समर्थन करु शकला नाही.खानाला सर्वांचाच संशय आल्याने सर्वांनाच चोप देण्याचा हुकुम दिला.प्रथम  चाबकाने फोडुन काढल्यावर,प्रत्येकाच्या डोक्यावर मोठे दगड ठेवून प्रहरभर उभे राहण्याची शिक्षा दिली.बाजीने खोटे सांगीतले म्हणुन त्याच्या तोंडाला व बाकी च्यांच्याही तोंडाला गरम राखेचे तोबरे दिले.परंतु आपण कापडी यात्रेकरुच आहोत यावरच ते ठाम राहिले.खानाने असा  सतत तीन दिवस छळ करुनही ते आपल्या बोलण्यावर कायम राहिले.देईल ती शिक्षा आनंदाने भोगली कारण त्यांच्या बरोबरच राजद्रोही बाजीचाही तसाच छळ होत होता.त्याच्या वेदनेने कर्णभेदक किंकाळ्या ऐकुन त्यांना आनंद होत होता.इतका छळ निमुटपणे सहन केला त्याअर्थी ते खरेच यात्रेकरु आहेत अशी खानाची खात्री झाल्याने  सर्वांना अखेर सोडुन दिले.

      खंडो बल्लाळासारखे स्वामीभक्त आणि स्वराज्यसेवे पुढे स्वजीविताची, हालाची किंचितही फिकीर न करणारे वीर त्यावेळी स्वराज्यास लाभले म्हणुनच स्वराज्याचे परिवर्तन झाले.

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. ३०-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग – २२.

        नेहमीप्रमाणे संभाजीराजेंच्या समाधीवर फुले वाहत असलेली  मीरा, तिथुन भीमाच्या तीरावरुन जात असलेल्या एका साधुच्या दृष्टीस पडली. ज्याअर्थी इतक्या भक्तीभावाने हि मुलगी फुले वाहुन मनोभावे नमन करीत आहे, त्याअर्थी ही समाधी अशाच कोणातरी महान पुरुषाची असावी.कुतुहल वाटुन तिच्या मागोमाग तीच्या घरी आले.हरणा बाईचे दुखणे विकोपाला जाऊन ती अंथरुणाला खिळली होती.पण कोणी साधु महात्मा दारात आलेले पाहुन भक्ती भावाने नमस्कार करुन मीरेला भिक्षा वाढायला सांगीतल्यावर,साधु म्हणाले, बाई!मी भिक्षा घेत नाही.केवळ कंदमुळां वर उपजिविका करीत असतो.ही मुलगी अनन्यभावे समाधीवर फुले वाहतांना पाहुन उत्सुकतेपोटी आलोय.

       महाराज ही समाधी संपुर्ण महाराष्र्टाच्या पुज्यवर वीर संभाजीराजें ची आहे.महाराज!आपण कोण?कुठले? वैराग्य का?वास्तविक या कसोटीच्या वेळी आपल्यासारख्या जाणत्या माणसाची स्वराज्याला आवश्यकता असतांना वैराग्य घेऊन आपण तीर्थयात्रा करीत फिरता,हे कसे?

       बाई!केवळ आत्मोध्दारासाठी हा वैराग्याचा मार्ग स्विकारला नसून स्वराज्य रक्षणार्थ माझे प्रयत्न सुरु आहेत.भिऊ नका.स्वराज्यावरचे हे संकटाचे ढग लवकरच नाहीसे होतील.हरणाबाईला म्हणाले.

       थोरल्या महाराजांना रामदास स्वामींनी आत्मिक व आध्यात्मिक बळाचा पाठींबा दिला होता.तसाच प्रयत्न  सध्याच्या परिस्थितीत माझा आहे आणि स्वराज्याचे निश्चित परिवर्तन होईल.मीरा आणि नीरा आईजवळ बसुन हा संवाद ऐकत होत्या.बाई!तुमची व्याधी आली माझ्या लक्षात.मला कांही वनस्पतीची माहिती आहे.मीरा चल!आपण जंगलातुन कांही औषधीमुळ्या आणुन उपचार करुं या,शेवटी परमेश्वरी इच्छा!

         मीरा स्वामींबरोबर बाहेर पडत असतांना एक व्यक्ती कुसाच्या आड लपुन बसुन आंत चाललेला संवाद ऐकत होता. दोघे बाहेर येत असलेले पाहुन ती व्यक्ती झटकन बाजुला झाली.मीराला संशयही आला नाही.आपली आई बरी होईल या आशेने सांयकाळच्या सुमारास साधु बरोबर जंगलाकडे निघाली.बोलत बोलत साधु एका झाडाजवळ उभे राहत म्हणाले,हे झाड ओले असतांना याच्या पानाच्या रसाने कितीही मोठी जखम तात्काळ भरुन येते.झाड सुकल्यावर याची मुळी उगाळुन लावली तर,जखम भरुन चामडी पुर्ववत होते.ही एक संजीवनी आहे.मीराने त्या झाडाच्या मुळ्या तोडुन जवळ घेतल्या.मग दुसर्‍या झाडाकडे बोट दाखवुन स्वामी म्हणाले, या वनस्पतीचा अद्भुत उपयोग होतो. याचा मनुष्याच्या अंगाला स्पर्श होताच, तो शक्तीहीन होऊन जमीनीवर पडुन गलितगात्र होतो.मीराने त्याच्याही मुळ्या काळजीपुर्वक जवळ घेतल्या,

       इतक्यात मीराला एक झाड दिसले. स्वामी म्हणाले,हे मोहिनीचे झाड आहे. याच्या पानाची भुकटी हुंगली किंवा कण नाकात गेल्यास गेले तर तात्काळ गुंगी येऊन क्षणांत भानरहित होतो,ते दुसर्‍या दिवशी त्यावेळपर्यंत बेशुध्दावस्थेत राहतो मीरा त्या झाडाची पाने तोडीत असतां, बाजुच्या झाडीत खसखसलेचा आवाज आला,पण काळोख झाल्याने दोघांनीही तिकडे लक्ष दिले  नाही.त्यांचे दुर्लक्ष झाले  तुझ्या आईसाठी हवी असलेली औषधी वनस्पती इथं मिळेलसी वाटत नाही. इश्वरेच्छा!मीराला तीन दिव्य वनौषधी मिळाल्याचा आनंद पार मावळला.आशेने आल्याल्या मीराची निराशाच झाली.मुली ईश्वराची इच्छा आपल्याला कशी कळणार?आईचं भवितव्य वर्तवल्यावर, दुःखी मनाने म्हणाली,स्वामी!आम्हा दोघी बहीणींना आईशिवाय मायेचं दुसरं कोणी नाही.जर तिचं कांही….

    मुली!परमेश्वर जे करतो,ते भल्यासाठी असते.असंकसं म्हणतां स्वामी?संभाजी राजेंचा वध झाला तोही बर्‍याकरतांच झाला असं म्हणाल का?क्षणभर विचार करुन स्वामी म्हणाले,पुरातनकाळी आपल्या या भारतभूमीला रावणादी राक्षसांनी अतिशय छळलं,त्यावेळी या भारतभूमीत थोडे कां राजे होते?परंतु कोणत्याही राजाकडुन रावणादी राक्षसांचा संहार झाला नाही.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. ३१-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग  –  २३.

       पण रावणाने सीतेचे अपहरण केलेले पाहतांच रामचंद्रांनी अस्तन्या सारल्या.सीताहरणाचं वृत्त ऐकताच असंख्य सेना अहमहमिकेनं पुढं सरसावली.त्या वीरांना बरोबर घेऊन शेवटी रामाने रावणवध करुन भूभार हलका केला होता.तद्वतच सांप्रत प्रकार आहे.जानकी हरणाचं जस कारण निमित्य झाले होते, तसच संभाजीराजें च्या शिरच्छेदाचं आहे.आज सारे मराठे खळवळुन उठलेत,ते ही बादशाही उलथुन टाकल्याशिवाय शांत होणार नाही.मराठ्यांत स्वाभिमान,धर्माभिमान, स्वराज्याभिमान जागृत होण्याकरिताच तर संभाजीमहाराजांचा वध झाला नसेल कशावरुन?वाईटातुन चांगले म्हणजे शिव छत्रपतींनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपास संभाजीराजेंच्या राजरक्ताचं खत मिळालं आहे.मीरेच्या विचारांची दिशा बदलली.या नवीन विचारांतच अंधार पडल्यामुळे दोघेही घराकडे परतले.

       घरी आल्यावर आवश्यक औषधी मिळाली नाही हे ऐकुन हरणाबाई म्हणाल्या,आई अंबेची मर्जी!आई!तुझ्या करितां औषध नाही मिळाली पण तीन अद्भुत वनस्पती मिळाल्या.त्यावर स्वामी म्हणाले,अगं! तीनच काय? शेकडो औषधीवनस्पती ह्या सह्याद्रीपठारावर आहेत.ही जी रामेश्वरपर्यंत सह्याद्रीपर्वता ची रांग आहे,त्याबद्दल असे म्हटल्या जाते की,रावण युध्दात लक्ष्मणाला शक्ती लागली असतां,हनुमानाने उड्डाण करुन द्रोणगिरी पर्वत आणतांना जी ढेकळं पडत गेली तीच ही सह्याद्री पर्वतांच्या रांगा होय,म्हणुनच इथं अद्भुत वनौषधी मिळतात.

      स्वामी!तुमच्याबद्दल कांहीच सांगीतले नाही.बाई!तुम्हाला कळुन उपयोग काय? ते सांगु लागले…त्यांचा जन्म वर्‍हाडप्रातांत राजुरीनजीक दुधेवाडीत १६४९ मधे झाला.वडिल महादेवभट्ट देशस्थ रुग्वेदी ब्राम्हण!आई उमाबाई.घरची अतिशय गरीबी.भिक्षारण करुन थोडे द्रव्य जमवुन विष्णुचे मौजी बंधन केले.चार वर्षे विष्णुने वडिलांजवळ वेदाभ्यास केला.१२व्या वर्षी आईबाप निवर्तल्याने ऐहिकसुखाची विरक्ती उत्पन्न होऊन,पुढील आयुष्य ईश्वराधनेत व परमार्थप्राप्ती साधना करण्याचा निश्चय करुन राजुरीतील श्रीगजाननाची आराधना सुरु केली.अन्न वर्ज्य करुन फक्त फलाहार गोमुत्र प्राशन करुन अनुष्ठान चालवले.संकष्टी चतुर्थीला पहाटे पासुन चंद्रोदयापर्यंत एका पायावर उभे राहुन जप करावा.प्रतिवर्षी श्रावणशुध्द प्रतिपदेपासुन भाद्रपदशुध्द चतुर्थीपर्यंत एकासनी समाधीस्त बसावे,असा क्रम एक तपापर्यत चालवला.

       त्यांची ही एकनिष्ठ व निस्सीम भक्ती पाहुन,श्रीमंगलमूर्ती प्रसन्न होऊन त्यांना स्वप्नात दृष्टांत देत,”तुझी कार्यसिध्दी पूर्ण झाली.तू सर्वमान्य होशील,जे चित्ती धरशील ते मत् प्रसादे सिध्द होईल. ब्रम्हवृत्तीने सदैव माझी आराधना करीत रहावे.असा त्यांना वरदान प्राप्त झाले. सत्पुरुष समागम घडावा म्हणुन २४ व्या वर्षी काशीक्षेत्रे गेले.तिथे ज्ञानेद्रसरस्वती नामक एक महाविद्वान,वेदांतज्ञान परिपूर्ण असे तपोनिधिंची भेट घडली. त्यांनी अनुग्रह करुन परमहंस दीक्षा दिली आणि ब्रम्हेद्रास्वामी नाम प्राप्त झाले.

       त्यानंतर भारतभर तिर्थाटन केले. नंतर महाराष्र्टात आले.बर्‍याच पर्यटनाने देशस्थितीचे उत्कृष्ट ज्ञान,विविध राज पध्दती,विशिष्ट संस्कार होऊन बुध्दीस प्रशस्तपणा ब्रम्हेद्रस्वामीस सहज प्राप्त होऊन ते १६८० नंतर सातारा प्रांती आले

छत्रपती संभाजीराजेंचा औरंगजेबाने वध केल्यावर,महाराष्र्टात मोगलांचे वर्चस्व झाल्यामुळे राजारामांना चंदीस जाऊन तेथून महाराष्र्टराज्य सूत्रे हलवावे लागले.

याच काळात ब्रम्हेंद्रस्वामी गुप्तरुपाने महाराष्र्टात आले,परिस्थिती प्रतिकुल वाटल्याने देशस्थिपी अवलोकन करुन सह्याद्री उतरुन कोकणांत गमन केले.पुढे हेच ब्रम्हेंद्रस्वामी छत्रपती शाहुमहाराज व थोरले बाजीराव पेशव्यांचे गुरु म्हणुन प्रसिध्दीत आले.

       आतां शांत,निर्भय ऐकांत जागा बघुन तपश्चर्येला बसणार आहे.ही तपश्चर्या देशोध्दारासाठी आत्मिक बळाचा स्वराज्याला फायदा देण्यासाठीच होईल.

      स्वामी! माझ्या ह्या दोन्ही मुलींनी  स्वराज्यसेवेची शपथ घेतली आहे.यांच्या बद्दल कळले तर माझा प्राण सुखाने जाईल हरणाबाई म्हणाल्या.मीराकडे पाहत स्वामी म्हणाले,ही तर लोकोत्तर कार्य करुन स्वराज्याच्या शत्रूचे मित्रत्वात परिवर्तन करेल.आणि धाकटी राज्ञी पणाचे सुख उपभोगेल.पण पोरींनी लग्न न करण्याची शपथ घेतली असतांनाही?

माझ्या वाणीचा नियंता परमेश्वर आहे,तो जर सत्य असेल तर माझी वाणी सत्यच आहे.बाई!याचं उत्तर काळच देईल.

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुखख.
               दि. ३१-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग – २४.

           ब्रम्हेंद्रस्वामी बरोबर मीरा जंगलात गेल्यावर मोहिनी वनस्पतीची पाने तोडीत असतां,बाजुच्या झाडीत झालेली खसखस वन्य प्राणी किंवा पाला पाचोळा वाजल्याचा आवाज नसून,तेथे दबा धरुन त्यांच्या गोष्टी ऐकत असलेला व मीराच्या झोपडीच्या मागे लपलेली व्यकी बाजी कदम होता.मीराचा व भालेरावाचा सूड उगवण्याची संधी शोधत होता.दुसर्‍या दिवशी भालेराव आपल्यासेनेसह सेनापतीच्या अंतिम दर्शनाकरितां पन्हाळगडावर निघाले असतां,त्यांच्या पाळतीवर,कुठेतरी एकांत रात्री,भालेरावबंधु बेसावध असतांना त्यांच्या छातीत कट्यार खुपसुन सूड घेण्याच्या उद्देशाने बाजी कदम गेला होता.पण संताजीच्या छावणी जवळ जातांच राजाराम महाराज विशाळ गडला असल्याची खात्रीलायक बातमी कळतांच,भालेरावांचा सूड पुढे कधीतरी घेतां येईल,पण राजारामांच्या वास्तव्याची नक्की बातमी खानास सांगीतल्यास आपला फायदा होईल.अशा विचारांत असतांनाच,मुत्सद्यांसह राजाराम विशाळ गडावरुन निघाले तेव्हा बाजीही त्यांच्या माग काढत जाऊ लागला.वाटेत तळ असलेल्या कित्येक बादशहाच्या सरदारांना राजाराम पळुन जात आहे अशी वर्दी दिली,पण कोणीही विश्वास ठेवला नाही,कारण बादशहाने चौफेर कडेकोट बंदोबस्त ठेवला असतां,१०-२० लोकांसह राजाराम पळून जाईल हे शक्य वाटेना.शेवटी बेंगरुळच्या सुभेदारास बातमी दिल्यावर,परिणामी तोंडी राखेचा तोबरा आला.

        शेवटी निराश होऊन मीराचा सूड घेण्यावर लक्ष केंद्रीत केलं,व तुळापुरी आला.गावांत सर्वजण ओळखतात म्हणुन गांवाबाहेरील जंगलात दडुन बसला.अनायसेच त्याला मीरा व स्वामीं च्या बोलण्यातुन अद्भुत अशा मोहीनी  वनस्पतीची माहिती कळली.बरीचशी पाने तोडुन जवळ बांधुन घेतली.

      स्वामींचे व हरणाबाईचे बोलणे झाल्यावर ते जायला निघाले असतां,तीने त्यांना रात्रीचा मुक्कामाचा आग्रह केल्या वर बाहेर पडवीत झोपतो म्हणाले.थोड्या वेळाने त्यांना कांही हव नको पाहायला  मीरा बाहेर आली असतां स्वामींऐवजी बाजी दिसला.तुझ्या भेटीस व हरणाबाई ची चौकशी करायला आलोय!कोणाशी बोलते म्हणुन हरणाबाईने आवाज दिला तर तिच्यासोबत तोही घरांत आला.

            मोठ्या जिव्हाळ्याने हरणाबाई च्या तब्बेतीची चौकशी करुन,तो स्वतः कसा निरपराध आहे,बादशहाच्या सरदाराकडे नोकरी करतो ती केवळ तेथील खडानखडा माहिती काढण्या करितां,ज्यायोगे राणीसाहेब व बाल राजेंना सोडवण्याच्या उद्देशाने.खानाचा माझ्यावर विश्वास बसला की,खुद्द बादशहाच्या छावणीत कुठेही जायला मज्जाव होणार नाही,या धोरणाने मी खानाकडे नोकरीला राहिलो,पण भालेरावांना माझा उद्देश कसा कळणार? त्यानी रागाच्या भरांत फितूर ठरवुन मारहान व दुरुत्तरे केली.बाजीने आपल्या वाक्चातुर्याने हरणाबाईचे मन जिंकले. तिला त्याचे बोलणे खरे वाटले.मीरा व वीरा स्तब्धपणे त्याचे बोलणे ऐकत असलेले पाहुन त्याला वाटले यांनाही आपले बोलणे पटले,पण वस्तुस्थिती वेगळी होती.

          स्वामी एकाएकी कुठे नाहीसे झालेत,याने कांही दगा फटका तर केला नसेल ना?या विचारात मग्न होती.बाजी च्या बोलण्यावर तीचा बिलकुल विश्वास नव्हता.त्याने मीराची समजुत काढत मनधरणी करण्यास सुरुवात केल्यावर, संतापाने म्हणाली,तुमचा पाहुणचार पुरे झाला,आतां निमुट बाहेर व्हा.इतक्यात स्वामी दारात येऊन ऊभे राहिले.त्यांच्या तिक्ष्ण दृष्टीकडे पाहुन बाजीची गाळण उडाली.स्वामींना पाहतांच मीराने विचारले,कुठे गेला होतात?बाजीकडे बघत स्वामी म्हणाले, तुम्ही मायलेकींनी राहण्याचा आग्रह केला,पण रात्री कुणा कडे वस्ती न करण्याचा संकल्प असल्या मुळे नदीतीरी एखाद्या झाडाखाली पडावे या उद्देशाने निघालो व समाधीजवळ आलो.समाधीजवळ तुम्ही घेतलेल्या शपथेचा विचार करीत असतां,त्या धर्मवीराच्या समाधीतून सुक्ष्म संकेत मिळाला.मीराला दंश करण्यास एक मानवी सर्प तिच्या झोपडीत शिरला आहे तिला सावध करा!तडक इकडे निघुन आलो.स्वामी!समाधीने दिलेला संकेत सत्य आहे.तो मानवी सर्प तुमच्या समोर उभा आहे.हुकमी स्वरात मीरा बाजीला म्हणाली,ताबडतोब मुकाट्याने इथुन चालते व्हा!

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि.  ३१-५-२०२१.

!!!  छत्रपती राजाराम  !!!

भाग  – २५.

         बाजी निघुन गेल्यावर,स्वामी म्हणाले,मुली! हा मनुष्य खरोखरच मानवी सर्प आहे.तुला दंश करण्याचा अहर्निश प्रयत्नात राहिल,याच्या पासुन नेहमी सावध रहा.असे म्हणुन ते जायला वळले.मीराने भक्तीभावाने त्यांना नमस्कार केला.पडवीतुन बाहेर पडले व एकदम अदृष्य झाले.मायलेकी रात्री बराच वेळ विचार करीत होत्या.

       संध्याकाळी नेहमी प्रमाणे मीरा समाधीदर्शनाला गेली.डोळे मिटुन समाधीला नमस्कार केला.डोळे उघडले तोच बाजी समोर बाजी!तिरस्काराचा त्याच्यावर कटाक्ष टाकुन ती जायला निघाली तोच तीला थांबवत बाजी म्हणाला,मीरा थांब!मला कांहीही ऐकायचे नाही,तुम्ही मानवी सर्प आहे हे  पुरतेपणी कळुन चुकले.मी कोण हे कळलं,ठीकच झालं!आतां स्पष्टच सांगतो ऐक.तूं जशी स्वराज्यसेवेची शपथ घेतली,तशीच तुला माझी सेवा करायला लावीनच ही शपथ मी घेतली.

         जळजळीत कटाक्ष टाकुन मीरा तिथुन निघुन गेली.ती गेल्यावर बाजी पुटपुटला,समोपचाराचे प्रयत्न आतां संपले,आतां वाटेल त्या मार्गाने माझी शपथ पूर्ण करीनच!तेवढ्यात सुभानजी समोर आला.अरे तूं इकडे कुठे?तुलाच शोधायला खानसाहेबांनी मुद्दाम पाठवले. बाजी चार महिने कां गायब राहिला याचे खरेखोटे मिश्रण करुन सांगीतल्यावर, सुभान्या म्हणाला,बस झाल्या थापा!बरं आतां गेली ती चटकचांदणी कोण होती? अरे!या बिजलीला जर सरदाराच्या समोर उभे केलेस तर नक्की तुला सरदारकी मिळेल.सुभानाने बाजीच्या डोक्यात वेगळाच कीडा सोडला.त्या दिशेने तो विचार करुं लागला.दोघेही खानाच्या भेटीला निघाले.भेट झाल्यावर राजाराम चंदीला लपुन बसले हे बाजीचे म्हणने खानाला खरे वाटले नाही.आम्ही बादशहाचे इतके सरदार डोळ्यात तेल घालुन बसलो असतां राजाराम पळुन जाईल हे अशक्य आहे.बरं ते जाऊ दे! सुभानजीच्या म्हणण्यानुसार ती लावण्यवती कोण आहे?तीला कां आणले नाहीस?खानसाहेब हे काम एवढं सोपं नाही.ती भंयकर करारी व हेकेखोर आहे.तीला हस्तगत करायला बरेच प्रयत्न करावे लागतील.सर्व गोष्टी मना प्रमाणे जुळुन येत आहेसे पाहुन बाजीला अतिशय आनंद झाला.हरप्रयत्नाने प्रथम स्वतःसाठी वश करायचे,नाहीच तर तिचा तोरा उतरवण्यासाठी खानाच्या स्वाधीन करायचे असा बेत करुन तो औरंगाबाद वरुन निघाला.

        तोच बादशहाचा छावणी हलविण्या चा हुकुम दिलेरखानला आला.त्याच बरोबर मराठ्यांच्या निरनिराळ्या उद्वेजनक बातम्या येऊं लागल्या.मराठ्यां नी आपला राजा राजारामला सुरक्षित चंदीस नेऊन ठेवले,वाटेत भेटणार्‍या यवन सरदारांचा चांगलाच समाचार घेत आहेत.अशा बातम्या ऐकुन दिलेरखानचे धाबे दणाणले.इतके दिवस औरंगबाद सारख्या निसर्गरम्य,शांत,रम्य,सुपिक, प्रदेशातुन छावणी हलवण्याचे त्याच्या जीवावर आले होते.त्यातच “मरेन किंवा मारेन” या इर्षेने पेटलेल्या मराठ्यांबरोबर सामना करायचा हे कळताच त्याचे अर्धे अवसान गळाले.त्यावेळी मराठ्यांनी खरोखरच प्रलय मांडला होता.

           राजाराम महाराजांची चंदीस व्यवस्था करुन संताजी,धनाजी महाराष्र्टात येताच त्यांनी रुद्रावतार धारण केला होता.रामचंद्रपंत अमात्यांनी विशाळगडावरुन मराठी राज्याची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली.प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे कामे सोपवुन लहान थोर  सर्वांना स्वराज्यसेवेस लावले.विश्वासू परशूराम त्र्यंबक आणि शंकरजी यांना फौजफाटा देऊन किल्ल्याच्या बंदोबस्ता ची जबाबदारी सोपवुन स्वतः सरकारी सारा वसूलीच्या उद्योगाला लागले. मराठ्यांच्या अंगात एकाएकी नवा जोम शिरलेला पाहुन खुद्द बादशहाही विस्मयचकित झाला.मराठ्यांचा राजा मारला,राणी,युवराज कैद केले,राजधानी  मोडली.आतां मराठे हतबल होऊन मराठे शाही पार बुडेल या कल्पनेत असलेला, परंतु मराठ्यांनी चौफेर एकदम उठाव केलेला पाहुन,चिडलेल्या बादशहाने आपल्या सरदारांना हुकमावर हुकुम सोडण्यास सुरुवात केली.त्यापैकीच हा एक हुकुम दिलेरखानला आला होता.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि.  ३१-५-२०२१.

 

छत्रपती राजाराम म.चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading