
अंतःकरणाला जबरदस्त पीळ पाडणारी आणि मनःचक्षुसमोर ह्रदय द्रावक देखाव्याचे चित्र उभे करणारी ती दादासाहेबssss म्हणुन ज्योत्याजी केसकरांनी मारलेली हाक ह्रदय पिळवटुन निघाली.आयुष्यभर ज्या धन्याच्या सेवेत सबंध आयुष्य घालवले त्या धन्याच्या रक्षामिश्रित अविशिष्टावर चार …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! छत्रपती राजाराम म.चरित्र!!!
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ६.
तुळापुरहुन नारोबा आणि चांदजी चा,बादशहाचा एक मोठा सरदार रणमस्तखानने फलटणच्या आजुबाजु च्या प्रातांस उपद्रव देत असल्याचा तातडीचा निरोप आल्याबरोबर संताजीने नारोबाला कर्णा फुंकुन फौजेला कुच करण्याची आज्ञा दिली.नारोपंत हा मुळचा इचलकरंजी संस्थानचा मूळ स्थापक होता.पुढे तो कापशीमुक्कामी असलेल्या संताजीकडे आला.संताजीने या हिर्याला पैलु पाडले.त्याचा घोड्याचा शौक असल्यामुळे त्याचे जोशी आडनांव जाऊन घोरपडे पडले.दुसरी अशी कथा प्रसिध्द आहे की,एकदा संताजी जेवायला बसले असतां संताजीची पत्नी म्हणाली,तुम्ही याला पुत्र म्हणवता तर, तुमच्या ताटात भोजन करण्यास काय हरकत आहे,आणि नारोबाही तात्काळ तयार झालेला पाहुन संताजी म्हणाले, स्वजात सोडायची गरज नाही,तूं परीक्षेत पास झालास.त्या दिवशीपासुन नारोपंत आपणास घोरपडे म्हणवुन घेऊ लागला.
कर्णे,शिंगाचा आवाज दुमदुमु लागताच संताजीची सारी फौज छावणी च्या समोर जमा झाली.संताजीही सर्व आयुधांनी सज्ज होऊन,मागोमाग धाकटा भाऊ बहिर्जी आणि मालोजीही सज्ज होऊन आले.सर्व वीर जमा झाल्यावर, संताजीने सर्वांना संभोधीत केले, आपल्या सर्वांच्या शिरावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे.रणांगणावर रणमस्ती ही आपल्या मराठ्यांची दीक्षा आहे.तुमच्या पुर्वजांनी व थोरल्या महाराजांनी स्थापन केलेल्या या स्वराज्या करीतां अतोनात हाल सोसुन आपल्या राजाने स्वतःचा बळी दिला.आपल्या राजाच्या वधाचा सूड घेण्यासाठी माझी प्रतिज्ञा आहे,आज ही तलवार म्यानातुन बाहेर काढली ती शत्रूचा पूरा बिमोड झाल्यावरच म्यान होईल.सर्वांनी प्रतिज्ञा केली.संताजीच्या साध्या पण कळकळी च्या बोलण्याने व केलेल्या आव्हानाने सर्वांचे बाहू स्फुरण पावुं लागली.ह्रदयांत रणमस्तीची ज्योत पेटली.हरहर महादेव च्या गर्जनेत बादशहाचा सूड उगवण्या साठी संताजीचे निवडक सैन्य मजल दर मजल करत दुसर्या दिवशी संध्याकाळी बादशहाच्या छावणीजवळ पोहोचले. मारुं किंवा मरुं या निश्चयाने खुद्द बादशहाच्या छावणीवर तुटुन पडले. मराठ्यांचा राजा मारल्यावर हवालदिल झालेले मराठे एकाएकी एवढ्या चपल गतीने खुद्द आपल्या अंगावर धावून येतील अशी बादशहाला स्वप्नातही कल्पना केली नव्हती.पहिल्या प्रचंड हल्ल्यातच मराठ्यांनी प्रत्यक्ष बादशहाचा शामियानाच जमीनदोस्त केला.जिकडे तिकडे कापाकापी सुरु झाली.संताजी बादशहाला शोधीत होते,पण संध्याकाळी बादशहा दुसर्या तंबुत नमाज पढायला गेला असल्यामुळे बचावला.त्याअवधीत मोगल सैन्य हुशार होऊन मराठ्यांशी लढण्यास सज्ज झाले.जास्त हानी नको म्हणुन संताजीने सैन्यास मागे फिरण्याचा आदेश दिला.आणि आजच्या हल्ल्याची निशाणी व बादशहाला जन्माची आठवण राहावी म्हणुन बादशहाच्या डेर्याचे सोन्याचे कळस कापुन,फौज आली तशी माघारी फिरली.
प्रत्यक्ष आपल्याच डेर्याचे वैभव शाली सोन्याचे दोन कळस उघड उघड हल्ला करुन लुटुन नेले ही गोष्ट बादशहा च्या मनाला खुपच लागली.आपण समजतो तसे मराठे निसत्व झाले नाहीत हे त्याच्या प्रत्ययास आले.शामियान्याची केलेली दुर्दशा पाहुन त्याच्या अंगाचा भडका उडाला.त्याने आपल्या सरदारांना भराभर हुकुम सोडुन मराठ्यांवर तुटुन पडण्याची सक्त आज्ञा दिली.पाठलागावर आलेल्या बादशहाच्या सैन्यांना चुकवत संताजी फौजेसह सिंहगडला आला.तिथे प्रतापराव गुजरचा मुलगा सिधोजी गडकरी होता.सिधोजीने संताजीची कामगिरी ऐकुन विरोचित सन्मान करुन म्हणाला,संंताजी! तुम्ही इथे महाराष्र्टात असतां तर आपले महाराज शत्रूच्या हाती सांपडले नसते.तुमच्या वडिलांनी पराक्रमाची शर्थ करुन प्राणार्पन केले पण दुर्देवाने वेळ साधली व महाराजांचा भिषण अंत झाला.मीही प्रतिज्ञा केली, महाराजांच्या वधाचा सूड घेऊन बादशाही उलथून टाकीनच.आपल्या बलिदानाचा आपल्या पुत्राने सूड उगवलेला पाहुन स्वर्गात बाबांच्या आत्म्याला समाधान वाटुन शांती मिळेल.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
२६-५-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ७.
त्यावेळी मराठे कां नाही खवळणार?पुण्यशील शिवरायांनी स्वराज्य स्थापून मराठे हेच महाराष्र्टाचे खरे धनी आहे हे सिध्द केले.संपूर्ण हिंदुस्थान हा हिंदुचाच आहे ही भावना प्रत्येक मराठाच्या अंतःकरणात रुजवली होती,त्याच शिवछत्रपतींचा प्रत्यक्ष मुलगा ज्याने नऊ वर्षे हाडांची काडे करुन स्वराज्यरक्षणार्थ झुंजवण्यात घालवली, ज्यांच्या स्थैर्य,शौर्य आणि पराक्रमाबद्दल शत्रुसुध्दा चकीत झाले होते.ज्याने शत्रूच्या कब्जात सांपडल्यावरही उदात्त आचरण ठेवुन समोर प्रत्यक्ष मृत्युलाही दाद दिली नाही अश्या या वीराचा ह्या नीच बादशहाने हालहाल करुन वध केल्यावर मराठ्यांस कां चेव येणार नाही या वधाचा सूड घेणे ह्याच भावनेनं सर्व महाराष्र्टवीर शत्रुवर तुटुन पडण्यास कसे सरसावले हे संताजीच्या उपक्रमावरुन सहजच लक्षात येते.
संताजीनी सैन्यांनी पुर्ण विश्रांती देऊन सिंहगड सोडुन मजल दर मजल करत वायुवेगाने आपली छावणी गाठण्यासाठी निघाले.आपण ठीक ठीकाणी पाठवलेल्या हेरांनी कोण कोणत्या बातम्या आणल्या असतील याची संताजीच्या मनाला तळमळ, उत्कंठा लागली होती.रामचंद्र अमात्यांनी कोणता मनसुबा रचला?राजाराम महाराज कुठे आहेत?राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांनी काय योजना केली?शत्रूचा सूड उगवण्यासाठी कोणाची योजना होणार इत्यादी गोष्टींची माहिती मिळण्यासाठी हेरांची भेट घेण्यास तो आतूर झाला होता.घाट माथ्यावरुन नीरानदी ओलांडुन पुढे जाताच त्याला धनाजी भेटला.त्यावेळी संताजी व धनाजी हे दोघे स्वराज्याचे आधारस्तंभ होते.थोरल्या महाराजांचे सेनापती प्रतापराव ह्यांनी थोरल्या महाराजांच्या हुकुमावरुन ह्या दोघांना रणांगणाच्या आखाड्यातील डावपेच शिकवले होते.तेव्हापासुन ही जोडी अहमहमिकेने स्वराज्यसेवा करीत होती. दोघांचेही एकमेकांवर बंधुतुल्य प्रेम होते. आतांपर्यंत या उभयंतांची परस्परांविषयी ची असलेली चुरस स्वराज्याचे संवर्धन करण्यास अत्यंत उपयोगी पडली.
या दोन वीरांच्या भेटी होताच आपापली हकिकत सांगीतली.शेवटी संताजी म्हणाला,बादशहाचे शीर कापतां आले असते तर स्वराज्याला शत्रूच राहिला नसतां.थोडक्यांत चुकले रेss धनाजी म्हणाली,मी बादशहाच्या रणमस्तान सरदाराचा पुरा बिमोड करुन लूटीत फक्त पांच हत्ती मिळाले.
दोघेही वीर बोलत बोलत दौड करत छावणीत पोहचले,तोच मेण्यातुन जखमी महादजी नाईक पानसंबळांना विठोजी चव्हाण आणतांना दिसले आणि विशाळगडावरुन बंकी गायकवाडने राजाराम महाराजांकडुन आलेली थैली उघडणार एवढ्यात स्वराज्याचे भगवे निशाण घेऊन बरेचसे स्वार दौडत येतांना दिसले पण ते शत्रू कि मित्र ते जवळ आल्याशिवाय कळणार नव्हते.
तुळापूर हे भीमानदीच्या तीराला लागुन वसले होते.पूर्वी या गांवाला नागरगांव म्हणत.पूर्वी शहाजीराजे व आदिलशाहीचे मुख्य प्रधान मुरार जगदेव दौलताबादेवर स्वारीसाठी निघाले असतां वाटेत या नागरगांवला मुक्काम पडला होता.त्यावेळी सूर्यग्रहण होते,म्हणुन मुरार जगदेवने तुळा करुन सर्व द्रव्य दान केले होते.तेव्हापासुन या गांवाला तुळापूर नांव पडले.हे लहानसे गांव नुकतीच भयंकर आपत्ती भोगुन, प्राण संकटातून मोठ्या शर्थीने वाचले होते. महिण्यापूर्वी याच गावावर बादशाही नांगर फिरल्याने बेचिराख झाले होते. परंतु गावकर्यांनी पुन्हा वसवले,आतां हे तुळापूर संपूर्ण महाराष्र्टाला एक ह्रदय द्रावक प्रसंगाचा इतिहास सांगणारे ऐतिहासिक स्थळ झाले होते.कारण त्या गांवच्या नदीतीरी संभाजीमहाराजांची समाधी होती.
संंभाजींच्या समाधीवर १६ वर्षाची मीरा फुलं वाहुन,घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची महाराजांना आशिर्वाद मागीतला.तेवढ्यात समोरुन बाजी कदम येतांना दिसला.तिची आई हरणाबाईचा या बाजीशी मीराचा विवाह करण्याचा होता,पण मीरा आजन्म अविविहित राहुन स्वराज्य सेवा करण्याचा मानस व्यक्त केल्यामुळे हरणाबाईचा नाईलाज झाला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
२६-५-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ८.
जानोजी पाटलांचा हा मुलगा बाजी अतिशय महत्वाकांक्षी होता.त्याला वडिलांसारखे स्वराज्यात फक्त पाटीलकी करुन गुजारा करायचा नव्हता.त्याने स्वराज्यात बर्याच नोकर्या केल्यात,पण जीवाच्या भीतीने स्वराज्यात नोकर्या करण्यापेक्षा बादशहाच्या एखाद्या मोठ्या सरदाराकडे संधान बांधावे असा विचार करुन तो दिलेरखानाच्या गोटात सामील झाला.हा खान मोठा रंगेल होता.याला लढाईपेक्षा ऐषारामात,नाचरंग,शराब याचीच विशेष आवड होती.असा हा मनाजोगा धनी बाजीला मिळाला होता. सतत ७-८ महिने खानाजवळ राहुन कंटाळला होता.खानाचा मुक्काम त्या वेळी औरंगाबादला होता.एकदा घरी जाऊन वडिलांची भेट घ्यावी,हरणाबाई ला भेटुन मीरेला लग्नाची मागणी करुन लग्नही उरकुन घ्यावे या विचाराने तो खानाकडे रजा मागायला आला होता.
खानाला १५-२० दिवसांची परवानगी मागत बाजी म्हणाला,घरी जाऊन भेटी गाठी घेईन,राजाराम महाराज कुठे आहे?कोणत्या किल्ल्यात लपुन आहेत?तेथील बंदोबस्त काय आहे कोणत्या मार्गाने कोणाला फितूर करतां येईल?एखादा फितूर मिळालाच तर, राजाराम महाराजांना तुम्ही कैद करुं शकाल,असे म्हटल्यावर खानाने त्याला आनंदाने रजा दिली.घरी येऊन वडिलांना भेटला.त्याला अनेक सरदारांचे नांव माहित असल्यामुळे,अमूक एक सरदारा जवळ काम करत असल्याचे खोटे सांगुन वडिलांची दिशाभूल केली.दोन दिवस घरी थांबुन मीराला भेटायला व तिची स्वराज्याबद्दलची निष्ठा पाहुन तिच्या कलाने घ्यायचे ठरवुन तिच्या घरी तुळापूरी आला.हरणाबाईला जवळचाच नातेवाईक आल्याचा आनंद झाला.त्याच्या तिथल्या दोन दिवसांच्या मुक्कामात गोड बोलुन मीराशी लग्न करण्याचा आपला मनांतील हेतू बोलुन दाखवल्यावर हरणाबाई म्हणाली,माझी तर संमती आहे,परंतु मीरा प्रतिज्ञाबध्द असल्याने लग्नाला नाही म्हणतेय!त्यावेळी मीरा व वीरा पाणी आणण्यासाठी नदीवर गेल्या होत्या.एवढच ना? मी वळवतो तिचे मन,असे म्हणुन तो मीराकडे गेला.
मीरा समाधीवर फुले वाहुन मनोभावे नमस्कार करीत होती.तिथे जाऊन मीराचे लग्नासाठी मन वळविण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला,पण मीरा आपल्या विचारावर व शपथेवर ठाम होती.त्याचे क्षुद्र विचार ऐकुन तिचा संताप एकदम उफाळुन आल्याने त्याची निर्भत्सना करीत असतांनाच गावांत गलका ऐकु आला.पश्चिम दिशेला धूळीचे लोट दिसु लागले.नवीन आपत्ती! शत्रुची धाड येत आहे असे वाटुन सर्वत्र धावाधाव सुरु झाली.बायांनी घडे नदीवर तसेच टाकुन भयभीत स्वैरावैरा पळू लागल्या.आणि निधड्या छातीचा वीर म्हणुन वल्गना करणारा बाजीही पळतांना पाहुन त्याची लायकी मीराला समजुन चुकली.मीरा घाईघाईने घरी आली,तर बाजी हळुच डोकावतांना पाहुन,बाजी ही माझी कट्यार घ्या व शत्रूचा मुकाबला करा. भीतीने त्याची गाळण उडाली.
आक्का!स्वार अगदी आपल्या झोपडीजवळ आले म्हटल्याबरोबर बाजी जागीच कोसळला.तोच वीरा आनंदाने ओरडुन म्हणाली,आक्का!आपले बंधु आलेत.रुपाजी व बाबाजी भोसले शंभर स्वारांसह,दौड करत मावशी हरणाबाईला भेटायला आले होते.या दोन बंधूंनी बादशहाचा सूड घेण्याचा शपथेच्या पूर्तते साठी आरंभलेल्या,इतर हत्यारांसह मुख्य हत्यार भाला वापरत असल्यामुळे त्यांना “भालेराई” म्हणुन ओळखले जात.त्यांनी शिवबांच्या कारकिर्दीत शत्रूशी भाल्याने युध्द केल्यामुळे त्यांना “भालेराव” पदवी मिळाली होती.या भालेरावी सैन्यांनी मोगलांना अगदी त्रस्त केले होते.हे भालकरी संताजी घोरपड्यांच्या कडक शिस्तिखाली व अमात्य रामचंद्रपंतांच्या पक्क्या हुकमतीखाली येऊन मिळाले.
आलेले शत्रू नसून मित्र आहे हे कळतांच बाजी चटकण उठुन बसला व आपल्या वर्तनावर पांघरुण घालण्या साठी बतावणी करुं लागलेला पाहुन मीराने तुच्छतेचा कटाक्ष त्याचेकडे टाकला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
२७-५-२०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – ९.
झोपडीसमोरच्या पटांगणात सर्व स्वार घोड्यांवरुन उतरले.रुपाजी व बाबाजी भोसले पुढे आलेत,बाजीला पाहुन संतापाने म्हणाले,अरे चांडाळाss तूं त्या दिलेरखान सरदाराचे जुते उचलुन थुंकी झेलण्याची नोकरी पत्करलेला इथे स्वराज्यात कशाला आलास?बाजीने रागाचा अविर्भाव आणुन खंडण करण्याचा प्रयत्न करीत असलेला पाहुन, तिरस्काराने मीरा म्हणाली,आतां जास्त वटवट करुन तोंडाची वाफ दवडू नकोस नाहीतर शेण घालुन तोंड बंद करावे लागेल.तिने दोन्हीही भावांना त्याचे दोन दिवसांचे प्रताप सांगुन म्हणाली,आईही त्याच्या गोड भूलथापांना भाळुन माझ्या लग्नाचा होकार भरला.बाजीने बोलण्या चा प्रयत्न करतांच,रुपाजीने हातातील भाला उलट्या बाजुने त्याच्या पोटात खुपसुन म्हणाला,तुझी सर्व कुंडली आम्हाला ज्ञात आहे.तूं एक नंबरचा हलकट,पाजी व स्वराज्याशी नमकहरामी करणारा आहेस.
मीराने तो आल्यापासुनची इतंभूत माहिती आपल्या भावांना सांगीतल्यावर,दोन्ही भावांनी त्याची चांगलीच कणिक तिंबली.तो फितूर असल्याचे कबुल झाल्यावर,प्रत्येक स्वारा कडुन त्याच्या तोंडावर एक जुती मारण्या ची शिक्षा फर्मावली.थोबाड रंगुन बत्तीशी पडेपर्यंत त्याला निमूटपणे शिक्षा भोगावी लागली. त्याला हाकलुन दिल्यावर जातां जातां दातओठ खात बाजी पुटपुटला, मिजासखोर मीरे!मी तुला शरण आणुन माझी सेवा करायला लावीनच.स्वराज्य सेवेची शपथ कशी पुर्ण करते ते पाहीन, तरच नावांचा बाजी कदम!
त्याला हाकलुन लावल्यावर,दोघे बंधु रुपाजी बाबाजी आपली मावशी हरणाबाईकडे आलेत,पण अश्या हराम खोर माणसाबरोबर लाडक्या मीराचे जीवन बांधायला निघालो होतो या भावनेने ती ओशाळवाणे झाली असल्या मुळे ती नेहमीसारखी त्यांच्याशी मोकळे बोलत नव्हती.त्यात सांधेदुखीचा असह्य त्रास होत होता.
दोघे बंधुंनी चरितार्थासाठी पैशाची थैली तिच्या समोर ठेवून म्हणाले,१० हजार स्वारांचं पथक वाढवण्याचा आमचा मानस आहे.या सर्व स्वारांना समाधीपुढे शपथ घेण्यासाठी मुद्दाम इथे आणले आहे.सर्व पथकांनी समाधीपुढे शत्रूचा सूड उगवण्याची शपथ घेतली. उभयंता बंंधुनीही शांत मनाने समाधीची प्रार्थना केली.नंतर स्वार घोड्यांच्या चारा पाण्याची व स्वतःच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेला लागले.इकडे मीरानेही झटपट त्यांच्या जेवण्याची सिध्दता केली. आनंदात गप्पा गोष्टी करत जेवणे झाली.
भाऊराया! मीरा म्हणाली, वेगवेगळ्या अफवा ऐकायला येत असल्यामुळे मन व्यग्र झालय.राणीसाहेब व बाळराजे कैद झाल्याची बातमी आम्हालाही कळली,पण खरी नसावी असं वाटते,कारण अमात्य रामचद्रपंतांनी रायगडाचा इतका काटेकोर बंदोबस्त केलेला आहे की,शत्रू वर्षानुवर्षे वेढा देऊन बसला तरी स्वराज्याची ती अजिंक्य राजधानी दाद देणार नाही.पण काय सांगावे?सध्या दिवस फिरले आहेत रुपाजी म्हणाला,एका अर्थी अफवा उठतात हे पण फायद्याचेच आहे,कारण राजाराम महाराज कुठे आहेत हे अद्याप कुणालाच निश्चित माहित नाही.कोणी म्हणतात सिंहगडावर,कोणी विशाळगड,
तर प्रतापगडावर,तर लगेच बातमी येई की ते पन्हाळगडावर अशा वेगवेगळ्या कंड्या पिकत असल्यामुळे बादशहाला नेमका सुगावा लागत नसे.तो सरदारांना सतत हुकुम सोडत असे की,”राजारामां ना कैद करा.” परंतु नेमकी मुक्कामाची जागा माहित नसल्यामुळे बादशहाचे सरदार गोंधळले आहेत.
नुकतीच बातमी आली की,आपले सेनापती महादजी पानसंबंळांना जखमी अवस्थेत पन्हाळगडी आणण्यांत आले.ते स्वराज्याचे कसलेले एक अनुभवी वयोवृध्द रणझुंझार वीर आहेत.आम्ही दोघंही त्यांच्या पथकात कांही काळ घालवला होता.तेव्हा त्यांच्या दर्शनार्थ व स्वराज्य रक्षणाच्या कार्यात त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी जात आहोत.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २७-५ २०२१.
!!! छत्रपती राजाराम !!!
भाग – १०.
बरं मावशी!तुझी सर्व व्यवस्था नीट लावुन खर्चाचीही तरतूद केली आहे. उदईक आम्ही पन्हाळगडावर सेनापती पानसंबंळाकडे जात आहोत.मधून मधून तुझी खबर घेऊच,पण जर कांही आणी बाणी आलीच तर,तुझ्याकडची व माझ्या जवळची अंगठी अगदी सारखी आहे. त्यांच्या आजोबांनी आईला व मावशी हरणाबाईला सारख्या अंगठ्या करुन दिल्या होत्या.कांही विपरीत प्रसंगी तुझ्या जवळची अंगठी घेऊन कोणालाही पाठव संपूर्ण महाराष्र्टात आमचे स्वार फिरत असतात त्या स्वाराला “भालेराव” असं खुणेचा शब्द सांगीतल्यावर,त्याला ती अंगठी दाखवली की,आम्ही असू तिथे येईल किंवा पाहिजे ती मदत तात्काळ करेल.तसेच जर आमच्या बाबतीत झाले तर असेच करुं व आमच्याकडची अंगठी तुझ्याकडे पाठवु.अशा रितीने संकेत ठरल्यावर सर्वजण झोपी गेले.
ठरल्याप्रमाणे उभयंता भालेराव दुसर्या दिवशी पन्हाळ्याकडे निघाले. वाटेत स्वारांची संख्या वाढवत पन्हाळ्या पर्यंत पोहोचले.मागे आपण बघीतले की, संताजी धनाजी आपल्या छावणीत पोहोचले असतां,विठोजी चव्हाणाच्या स्वारांना जखमी सेनापतींना छावणीत आणले होते,त्याचवेळी राजाराम महाराजांची थैली घेऊन एक स्वार येतो, ते थैली उघडणार तोच कांही स्वार दौडत येत असल्याने ते शत्रू कि मित्र?ते जवळ आल्यावर हेच ते भालेराव होते.थैलीतील चिठ्ठी रामचंद्र अमात्यांची होती.धनाजी जाधव व संताजी घोरपडेंनी आपल्या विश्वासू मंडळींसह विशाळगडी तात्काळ हजर राहण्याची आज्ञा होती.
हा हुकुम ऐकुन संताजी धनाजी विचारांत पडले कारण सेनापती पानसंबंळ भयंकर जखमी असुन आसन्न मरण पडलेले,अशा अवस्थेत त्यांना टाकुन कसं जावं?तेवढ्यात भालेराव आपल्या स्वारांसह पोहोचले.वृध्द सेनापतीची विकट अवस्था पाहुन दोघाही भावांना अत्यंत वाईट वाटले.रूद्रगडावर एकाएकी झालेल्या हल्ल्यात महादजी जखमी झाले.त्यांच्या विश्वासू सेवकांनी मोठ्या शर्थीने त्यांना बाहेर काढले.त्याच वेळी विठोबा चव्हाण त्यांची कुमक करण्याकरितां जात असतां,सेनापतींचा मेणा स्वाधीन केला व विठोबांनी जवळच असलेल्या संताजी धनाजीच्या तळावर सुरक्षित आणले.त्यावेळी संताजी धनाजी च्या बायका छावणीत होत्या.त्यांनी कुशलतेने पित्यासमान महादजीची सेवा सुश्रुषा केली व उपचार केल्याने ते लवकरच शुध्दीवर आले.साठी उलटलेल्या या खर्या एकनिष्ठ सेवकाने स्वराज्यसेवे शिवाय कोणतीही महत्वा कांक्षा त्यांचे मनी नव्हती.
संताजी धनाजीची चिंताग्रस्त मुद्रा पाहुन महादजी म्हणाले,बच्चानों! धीर सोडु नका.मनुष्य जन्माला आला की, त्याचा मृत्यु अटळ आहे.मी आतांपर्यंत स्वराज्यसेवे शिवाय दुसरे कोणतेच ध्येय उरी बाळगले नाही.तेव्हा माझं हेच ध्येय तुम्ही पुढे चालवा.रुद्रगडावर लढतांना, सेनानायक पडला असे पाहतांच सर्व सैन्यात हाहाकार उडाला असेल,तोच फायदा घेऊन शत्रुने रुब्रगड काबिज केला असेल.असो…
बादशहा मोठमोठ्या मराठ्यांना सरदार करुन बहुमानाची किताब, जहागिरी देऊन त्यांना मिंधे करत आहेत, पण तुम्ही अशा प्रलोभनाला बळी पडणार नाही याची खात्री आहे.संभाजी राजांनी स्वराज्य रक्षणार्थ अहोरात्र अथक परीश्रम करुन शेवटी भिषण मृत्युला सामोरे गेले.त्यांची कर्तव्य दृष्टी समोर ठेवुन तेच पुढे चालवा.इतके बोलल्यानेही त्यांना अतिशय थकवा आला.त्या राजनिष्ठाला भावी पिढीसाठी कितीतरी संदेश द्यायचे होते,पण शक्ती क्षीण झाल्याने नाईलाज झाला. बोलायला अतिशय त्रास होत असुनही सारी शक्ती एकवटुन म्हणाले,तुम्हाला अमात्याकडुन संदेश आला म्हणतां ना? मग कां थांबलात?तुमची स्थिती…?माझी काय स्थिती? मी तर मरणारच आहे, कर्तव्य करीत मरत आहे हे लक्षात घ्या. माझ्यासाठी थांबण्याची मुळीच आवश्यकता नाही.आतां शेवटच सांगतो ते नीट ऐका.तुम्ही वीर,स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक असल्याने काळालाही तुमच्यापुढे उभे राहण्याचे सामर्थ्य नाही. वेळ आली तर ब्रम्हदेवाचा हुकुम मोडा परंतु आपल्या स्वामींच्या हुकुमाकडे चुकुनही दुर्लक्ष करुं नका.स्वामींनी विशाळगडी बोलावले आहे.तेव्हा तात्काळ निघा.तुम्ही यशस्वी व्हाल हाच माझा शेवटचा आशिर्वाद आहे.माझी मुळीच काळजी करुं नका.जा…जा..जा.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
२७-५-२०२१.


