महाराणा प्रताप संपूर्ण भाग ९, (४१ ते ४५)

*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇



एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू  लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

महाराणा प्रताप

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – ४१.

         अकबर वरुन जरी शांत दिवस असला तरी आतून मानसिंहावर अतिशय संतापला होता.त्यांच्या हलगर्जीपणामुळे युध्दभूमीवरुन महाराणा निसटल्याची धारणा झाली होती.खूप विचारपूर्वक त्याने दूतामार्फत मानसिंहासाठी खलिता पाठवला.खलिता प्राप्त होताच, एक सरदार व कांही सैनिक किल्ल्याच्या रक्षणार्थ ठेवून मानसिंह फत्तेपूर शिक्री कडे निघाले.राजा मानसिंह १९ जून ते  सप्टेबर पर्यत गोगुंद्यात थांबले होते.या काळात मोगल सैन्यांचे खूपच हाल झाले थकलेले,साथीच्या रोगाने आजारी सैन्यां ना पहाडाच्या उंचसखल प्रदेशातून वाटचाल करावी लागत होती.त्यातच पहाडात लपून बसलेल्या महाराणांचे सैन्य अचानक छापे टाकून त्यांच्या जवळ च्या चीजवस्तू लांबवून,लुटमार करीत त्यांना चांगले बेजार करीत होते.अतिशय क्लेश सहन करत मानसिंह फत्तेपूर शिक्रीत येऊन पोहोचले.पण त्यांना व आसफखानला दरबार बंद केला.त्यांना आणखी अपमानीत करण्यासाठी हळदी घाटाच्या युध्दात ज्यांनी विशेष पराक्रम गाजवला त्यांना भरपूर बक्षिसे दिली. मिहितखानने अकबर आल्याची हूल उठवली म्हणून त्यालाही मोठे बक्षिसदिले

        नंतर अकबरने हळदीघाटाच्या युध्दातील तपशील घेण्यास सुरुवात केली.गोगुंड्याच्या किल्ल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात फौज असतांना फजिती कां झाली?रसद कशी बंद झाली?अर्थात मानसिंहावर चिडलेल्या सरदारांनी तेच जबाबदार असल्याचे सांगून अकबरचे कान भरवण्यात आले.कांही खुष मस्कर्यांनी आगीत तेल ओतत हेही सांगीतले की,मानसिंहांनी मुद्दामच हलगर्जीपणा करुन महाराना निसटून जाण्याची संधी उपलब्ध करुन दिली.त्या मुळे अकबर अधिकच संतप्त व नाराज झाला.सर्व बाजूंनी मानसिंहावर खापर फोडण्यांत आले.अकबरने त्यांची अपमानकारक कानउघाडणी केली.स्वतः राजपूत असल्यामुळे मुद्दामच महाराणास निसटून जाण्याची संधी उपलब्ध करुन दिली.सरदारांच्या सांगण्यानुसार राजपूत राजपूतांना मिळाले अशी अकबरची धारणा झाली होती.

        परंतु कांही दिवसांनी खरी हकिकत कळल्यावर अकबरला पश्चाताप झाला. मानसिंहाचा कांहीही दोष नसतांना त्यांना दरबार बंद केल्याने तो लज्जीत झाला.मग समजूत घालून आपला गैर समज दूर झाल्याचे सांगून,दरबारांत पाचारण करुन मानसिंह व आसफखाॅंला मोठे बक्षिस दिले.वास्तविक मानसिंहांनी आपले कर्तव्यपालन उत्तमप्रकारे केले होते.हळदीघाटाच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता.फौजेला शिस्तीत ठेवले होते.मेवाडचा राजपूत असूनसुध्दा मोगलांच्याच हिताचा विचार करुन बादशहाच्या मीठाला जागले होते.निष्ठेने अनेक वर्षे नेक वर्तन करुनही बादशहाने आपल्या माथी स्वामी द्रोहाचे खापर फोडले म्हणून त्यांचा स्वाभिमान दुखावला होता.निमूटपणे अपमान सोसत राहिले.अकबरचा गैरसमज दूर झाल्याने थोडे स्थिरावले.स्वाभिमान व स्वत्व विकणार्यांचा शेवटी अशीच दशा होते.पुढे ज्या कांही मोहिमा झाल्यात त्यात अकबरने कोणतीही महत्वाची जबाबदारी सोपवली नव्हती.

       मानसिंहांना गोगुंड्यावरुन परत बोलावल्यावर,मोठी फौज देऊन महंमद कुलीखाॅंला महाराणाचा शोध घेऊन मृत वा जिवंत पकडून आणण्याची आज्ञा दिली.कुलीखाॅं आणि कुतुबुद्दीन महंमद खान ने सारा पहाड,डोंगर,दर्या,कडे कपार्यात कसून शोध घेतला पण महाराणा कुठेही आढळले नाही.शेवटी थकून परत गोगुंड्याकिल्ल्यात परतले. ह्या सर्व हालचाली गुप्तहेरांमार्फत महाराणांना कळत होत्या.महमंदखाॅं व कुलीखाॅं गोगुंड्या किल्ल्यात आल्याचे कळतांच महाराणांनी आक्रमण करुन किल्ला ताब्यात घेतला.आणि विश्वासू किल्लेदार नेमून तडक कुंभळगडावर येऊन,तिथून आपल्या हालचालींना सुरुवात केली.त्यांनी अत्यंत कडक धोरण स्विकारुन आतां मोगलांवर कोणतीही दयामाया न दाखवता गनिमी काव्यानेच हल्ले करायच्या सूचना सर्व  सरदारां दिल्या.हळदीघाटाच्यावेळी झाले ल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगली होती.राज्यकारभार स्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. मोगलांना अन्न मिळू नये म्हणून कोणीही शेती करुं नये असा हुकुमनामा राज्यात जाहीर केला होता.त्यामुळे जनता कुंभळ गडाच्या परिसरांत स्थानांतरीत होऊ लागली.

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – ४२.

        महाराणा प्रतापांना आपण सहज जिंकून संपूर्ण मेवाड आपल्या अधिपत्या खाली आणू ही अकबरची समज,त्यांच्या जवळ सैनिकशक्ती नसतांनाही हळदी घाटाच्या युध्दात पकडू शकलो नाही ही फार मोठी खंत अकबरला वाटत होती. हळदीघाटाच्या युध्दात विजय झाला पण अकबरला हवे होते,शरणागती न पत्करणारे,न झुकणारे,स्वाभिमान न विकणारे,ताठर भूमिका ठेवणारे,मेवाड सिदूर महाराणा प्रताप!त्यांची झुकलेली मान बघायची तीव्र लालसा पूर्ण होण्याची संधी मिळत नसल्यामुळे,मोहिमेचे सुत्रधार,सरदारांवर चांगलाच संतप्त झाला होता.

        कुणालाही कळू न देता,कुणाचाही सल्ला न घेता शिकारीच्या निमित्याने मेवाडला स्वतः जाण्याची योजना आखली.दरवर्षी अकबर सप्टेंबरमधे ख्वाजा उरुससाठी जात असे.याही वर्षी अजमेरला निघाला,परंतु यावेळी फौज न घेतल्याने सर्वांना आश्चर्य वाटटले.अजमेर ला ख्वाजाचे दर्शन घेऊन प्रचंड फौजे सहित पुढे निघाला.

      स्वाभिमानी मानसिंह आमेरचे राजा असूनही अकबर दरबारी नोकरापेक्षा त्यांना अधिक महत्व नव्हते.हळदीघाटा च्या युध्दानंतर त्यांचा स्वाभिमान कवडी मोलाचा झाला तरी ते शांत होते.

      या मधल्या काळात महाराणांनी मेवाडच्या बाजूला कल असलेल्या नरेशां ची प्रत्यक्ष भेटी घेऊन मैत्रीचे संबध प्रस्थापित केले.महाराणांची निष्ठा, पराक्रम पाहून सारे प्रभावित झाल्यामुळे ते देशासाठी प्राणार्पन करण्यास सिध्द झाल्याने महाराणांचे आत्मबल खूपच वाढले.

        मेवाडमधे राजपूत राजांचे संघटन व एकी होत असल्याच्या बातम्या गुप्त हेरा कडून अकबरला कळल्यामुळे चिंतित झाला.११ आक्टोबर १५७६ ला त्याने मोहीला तळ दिला आणि खास विश्वासातील सरदारांना डेर्यात पाचारण केले.जे राजे महाराणांना मिळाले,त्यांची दोस्ती प्रथम तोडावी लागेल.त्यासाठी तरसूखाॅं,रायसिंह आणि हशीम बरहा या तिघांना प्रथम आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करा.मानले नाही तर त्यांचेवर आक्रमण करुन बंदी करा.पण ही कार्य वाही अत्यंत गुप्तरितीने व्हायला हवी!

        अकबर मेवाडात शिरतांना खूप धास्तावला होता.राजपूनी गनिमी काव्या ने केलेली राजा मानसिंहाची केलेली कोंडी,छुपे हल्ले करुन केलेली लुटालुट तो विसरला नव्हता.म्हणूनच मेवाडात शिरतांना स्वतःच्या संरक्षणाचा त्याने पक्का बंदोबस्त केला होता.

         अकबरच्या आदेशानुसार रायसिंह तरसूनखाॅं,हशिम बरवांनी सिरोहा व जालोरच्या नरेशांना आपले राज्य वाचवण्यासाठी पुनः अकबरचे वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडले!अकबर सुखावला.आणि सैन्यरक्षणात गोगुंड्यात पोहोचला.पण आधीच महाराणा सुरक्षित पहाडात निघून गेल्यामुळे अकबर नुसता हात चोळत बसला.गोगुद्यांचा किल्ला ताब्यात घेऊन महाराणांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास गोगुंड्याच्या आसपास सैन्य पसरवले.हशिम बारहा,तरसूखाॅं रायसिंल परत येताच,महाराणा गुजराथ मधे पळून जाण्याची शक्यता वाटल्याने नाकेबंदी केली,व त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी गुजराथच्या सरहद्दीवर ‘नाडोद” ला पाठवले,तसेच राजा भगवान दास इतर सरदार व कुतुबुद्दीनला महाराणांच्या शोधार्थ पहाडी भागात रवाना केले.एवढी नाकेबंदी केल्यावरही महाराणाचे सैनिक गनिमी काव्याने छुपे हल्ले करुन त्यांची लुटमार करत नुसते त्रस्त केले.हे सैन्य येतात कुठुन व जातात कुठे हेच कळत नव्हते.महाराणांचा शोध लागत नसल्यामुळे अकबरचा नुसता संताप संताप होत होता.

        याच काळात हजयात्रेला जाणारे मुसलमान जमा झालेल्या यात्रेकरुंना महाराणा सुखरुप जाऊ देईल की नाही ही शंका अकबरच्या मनात निर्माण झाली यात्रेकरुंना सुखरुप बाहेर काढण्याची जबाबदारी बादशहा या नात्याने त्याचेवर होती.ही जबाबदारी राजा भगवानदास, कुतुबुद्दीनखाॅं,आसफखाॅं यांचेवर सोपवली.पण महाराणांच्या हुकुमानुसार यात्रेकरुंना सुखरुप अहमदाबादच्या बाहेर जाऊ दिले.महाराणा झटपट स्थान बदलत असल्यामुळे,त्यांच्यावर लक्ष ठेवणार्या माणसांना त्यांचा ठावठीकाणा लागत नसल्यामुळे दिवसागणिक अकबर अस्वस्थ होत होता.

       राव नारायणदास राठोडला पकडण्यासाठी अकबरने गयासुद्दीन आसफखाॅंला ईडरला पाठवले,पण त्या आधीच ते महाराणाकडे पोहोचले असल्यामुळे,त्यांनी ईडरवर हल्ला केला. राजपूत वीरांनी जबरदस्त विरोध केला. अनेकांनी बलिदान दिले,पण शेवटी ईडर मोगलांच्या ताब्यात गेलेच.या हल्ल्यात अकबरचे दोन सरदार उमरखाॅं व हसन बहादूर मारल्या गेले.महाराणांच्या मदती ने राठोडने मोगल तुकडीवर हल्ला करुन अनेक सैन्यांना यमसदनी पाठववे,कांही जीव वाचवून पळून गेले.

               क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – ४३.

        हट्टाला पेटलेल्या अकबरचे फार मोठे नुकसान झाल्याने तो आणखीनच चिडला.बरेच दिवसांपासुन अनेक प्रयत्न करुनही महाराणा प्रतापसिंह हाती गवरसत नाहीसे पाहून हतबल झालेल्या अकबरने,गाझीखाॅं,शरीफ महमंदखाॅं, मुजाहीदखाॅं आणि तुर्क सुभान कुलीखाॅं यांच्याजवळ तीन हजार फौज मोहीला आणि अब्दुर्रहमान,मुयादबेग यांचेजवळ ५०० सैनिक देऊन मदारिया पहाडी प्रदेशात पहार्यावर व रक्षणार्थ ठेवले. आणि स्वतः हळदीघाटमार्गे उदयपूरला गुलाबबागेत मुक्काम केला.याच बागेला पुढे ‘बादशहा बाग’ असे नांव पडले.

       महाराणा ही सामान्य व्यक्ती नाही. त्यांना सार्या मेवाडचा पाठींबा,निसर्गाची साथ आहे.पहाडी मुलखात तपास करणे अशक्य असल्याची अकबरला खात्री पटली.गुप्तहेरामार्फत अकबरच्या सर्व हालचाली कळत असल्यामुळ महाराणा तशा योजना आखत त्याला हूल देत असे

कंटाळून राजा भगवानदास व कुतुबद्दीन खान परत गेल्याचे कळताच महाराणांनी हल्ला करुन गोगुंद्याचा किल्ला परत हस्तगत केल्याचे ऐकून अकबर अचंबित झाला.महाराणा प्रतापसिंहांना संपूर्ण मेवाडवासीयांचे प्रेम,सर्व जाती धर्मीयांची साथ लाभली होती.मेवाडचा प्रत्येक माणूस स्वातंत्रप्रेमाने पेटून उठला होता. महाराणांचा बंदोबस्त करण्यासाठी अकबर मेवाडला आला,पण मनिषा पूर्ण न झाल्याने त्याचा अहंकार दुखावल्या गेला.तो तुकड्यांवर तुकड्या पाठवित होता पण उपयोग शुन्य!धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या बादशहाने मग आपला राग  उदयपूरच्या निष्पाप जनतेवर अन्याय, अत्याचार करुन काढु लागला.जनतेने आपली घरेदारे सोडून पहाडात आश्रय घेतला.शेवटी हताश होऊन बांसवड्या मार्गे अजमेरला जाण्यापुर्वी,जगन्नाथ कछवाह,शाह फकरुद्दीन यांना उदयपुर च्या संरक्षणार्थ आणि सैय्यद अब्दुलखाॅं व राजा भगवानदासला देवारी घाटा जवळ पहार्यासाठी ठेवले.

          बासवाडे मार्गे जातांना रावळ प्रतापला शरण यायला भाग पाडले. रामसिंहला सिरोहीवर आक्रमण करायला  पाठवले.सिरोही ताब्यात आल्यावर सिरोहीचा सुल्तानला अकबर चे मांडलिकत्व स्विकारण्यास भाग पाडले.महाराणानी मैत्री जोडलेल्या सर्व राजांना जिंकत मांडलिकत्व स्विकाराय ला भाग पाडीत होता.महाराणांची शक्ती कमी करण्याचा अकबरने प्रयत्न चालवला होता.अजमेरला परतण्याआधी त्याने मेवाडची संपूर्ण नाकेबंदी करुन चारही बाजुंनी सैन्यांचा पहारा बसविला. अकबर अजमेरला गेल्याचे कळताच महाराणांनी सर्वात आधी पहाडी प्रदेशात पांगलेल्या सर्व सैनिकाना एकत्रीत करुन  बेसावध गोगुंड्याकिल्ल्यावर हमला करुन परत किल्ला हस्तगत केला.

        महाराणांची खरी राजधानी कुंभळगड!पण या युध्दकाळात आपली राजधानी आवरगडावर केली होती.तीथे एक महाल बांधून राजपरिवार राहण्याची व्यवस्था केली.नंतर त्यांनी एकेक मोगली ठाण्यांवर हल्ला करुन गेलेले किल्ले व मुलूख परत मिळवले आणि मोगलांच्या ताब्यात असल्याने आपला मोर्चा तिकडे वळवला.सुपिक भागातील उभे पिके कापतांना त्यांना अतिशय वाईट वाटत होते.पण देश धोक्यात असल्याने,व शत्रू ला धान्यपुरवठा होऊ नये या उद्देशाने त्यांना नाईलाजाने हा पवित्रा घ्यावा लागला.जनताही विरोध न करतां आपल्या राजाला साथ देत होते

         अकबरचे महत्वाचे मोही ठाण्यावर  महाराणांनी केलेल्या जबरदस्त हल्ल्यात बरेच मोगल सैन्य व मोहीचा ठाणेदार मुजाहित बेग ठार झाला.दोघेही आपल्या ध्येयावर अटल असल्यामुळे कुणीच मागे हटत नव्हते.हट्टाने पेटलेल्या अकबरने नविन मोहिम आखून शहाबाजखान या सरदाराची निवड करुन सर्व अधिकार व सर्व सरदार अधिन राहतील असे हक्क त्याला प्रदान केले.

       शहबाजखान फौजेसह आक्टोबर १५७७ मधे अजमेरहून पश्चिम पहाडी प्रदेशाकडे निघाला.त्यावेळी महाराणा गोगुंद्याच्या परिसरात होते.तेवढ्यात मोगलवेश धारण केलेला,महाराणांचा अत्यंत विश्वासू,धाडसी,हरहुन्नरी,गुप्त बातम्या काढण्यात निपुन हरभजनसिंह गुप्तहेराने बातमी आणली की,सेनापती शहाबाजखान प्रचंड फौजेनीशी गोगुंद्या कडे निघाला.अति महत्वाची बातमी वेळे वर दिल्यामुळे त्याचे कौतुक करुन विश्रांती घेण्यास सांगीतले.

        शहाबाजखानला मोहीमेवर पाठवल्यामुळे अकबर खुशीत मनाशी मांडे खात आपल्या दालनातील विशाल मंचकावर विराजमान होता.म्हणूनच राग डोके वर काढत होता.

                 क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – ४४.

         विचारमग्न अकबर मंचकावर पहुडला असता,त्याला एकदम शक्तिसिंह ची आठवण झाली.शक्तिसिंहने दोन मोगल सैनिकास मारुन,स्वतःचा घोडा देऊन महाराणांना निसटण्यास मदत केल्याची हकिकत कळली होती.लगेच  द्वारपालाकरवी शक्तिसिंहास पाचारण केले.शक्तिसिंहाने येऊन कुर्निसात करुन निर्देशित आसन ग्रहण केल्यावर,अकबर म्हणाला,तुम्ही आमच्या पायाशी निष्ठा वाहिली आहे,आम्हाला शरण आलात, आमचे मीठ खाताहात आणि अशी गद्दारी?मग मात्र संतापून शक्तिसिंह म्हणाला,आपले मीठ मी खात नसून, तुम्ही या हिंदुसथानचे,या देशातील मीठ खाताहात….शक्तिसिंहssss  त्याची हिम्मत बघून अकबर मनात टरकला. तुम्ही आमचा विश्वासघात केल्याबद्दल आम्ही मनात आणले तर…तर काय जहाॅंपनाह?आपण मला फाशी देऊ शकता,गर्दन उडवू शकता,पण ज्यावेळी आपल्या दरबारी येऊन मान झुकवली तेव्हाच ती उडवल्या गेली होती.जो व्यक्ती आपल्या मातीशी गद्दारी करुन शत्रूचे पाय चेपतो,तो जमीनीवर भार होतो.राजा मानसिंहांची झालेली अवस्था मी बघतोच आहे.आम्ही राजपूत राजे असलो तरी इथे बादशहाचे साधे नोकरच आहोत…आणि हो…भलतेच धाडस करुं नका.इथे येण्यापूर्वी माझ्या लोकांना सूचना दिल्या आहेत,मला कांही इजा झाली तर,ते जीवावर उदार होऊन,प्राण पणाला लावून,तुम्ही केलेल्या हळदी घाटातील अमानुष कत्तलीचा बदला घेण्यासाठी माझ्या आज्ञेच्या प्रतिक्षेत आहे.राजपूत जन्माला येतो तोच मुळी गर्दन तलवारीच्या धारेवर ठेवूनच!मी मरेन,कदाचित माझी माणसेही मारल्या जातील,पण त्याआधी किती मोगलांची डोकी उडवल्या जातील याचा विचार करावा.खाs मोs शss अकबर चित्कारला.त्वरीत इथून निघा.तुम्हाला मोगल सल्तनीतून तडीपार करीत आहोत

         कुर्निसातही न करतां शक्तिसिंह दालनातून ताडताड पावले टाकत बाहेर पडला.बाहेर उभ्या असलेल्या आपल्या घोड्यावर टांच मारुन,आपल्या सैनिक तुकडीजवळ येऊन म्हणाला,शहाबाजखाॅं जास्त दूर गेला नसेल.मार्गात कुठेतरी अडचणीच्या जागी गाठून छूप्या पध्दतीने छापा टाकून जेवढे सैन्य गारद करतां येईल तेवढे मारुन पळ काढायचा,असे ठरवून त्यांनी मेवाडकडे कूच केले.

       तुकडीच्या अग्रभागी कुॅंवर शक्तिचा घोडा वेगाने दौडू लागला.तुकडीत कडवे १०० राजपूत होते.भूभागाची चांगली माहिती असल्यामुळे जवळच्या मार्गाने जात असतां,एका वळणावर शहबाझखाॅं ची फौज दिसली.मागच्या बेसावध मोगली फौजेवर,त्यांनी शस्राला हात घालण्यापूर्वी,अकस्मात हल्ला चढवून कापाकापीला सुरुवात केली.हे सर्व अग्रभागी असलेल्या सेनापती,सरदारांना मागील भागातून आरोळ्या किंकाळ्या आल्यावरच समजले.ते सावध होण्या पूर्वीच शक्तिसिंह आपल्या सैन्यासह पसार झाले.आपल्या फौजेतील ४००-५०० सैनिक पडल्याचे बघून शहाबाजला मोठा धक्का बसला.मोहिमे च्या प्रारंभीच त्याला अपशकून वाटला.

         तिथून शक्तिसिंह आपल्या सैनिक तुकडीसह जाऊन मोगलांनी ताब्यात घेतलेल्या भिनमोर किल्ल्यावर चढाई करुन,शरण आलेल्या किल्लेदाराकडून भिनमोर किल्ला मेवाडमधे समर्पित केल्याचा दस्तऐवज तयार करवून किल्ला ताब्यात घेतला.आणि तिथे अभयसिंह राजपूतची किल्लेदार म्हणून नेमणूक करुन किल्ल्याच्या संरक्षणार्थ कांही सैन्य त्याच्या हाताखाली ठेवले.

           तब्बल चार वर्षानंतर भरीव कामगिरी करुन शक्तिसिंह,बंधू प्रतापसिहाकडे  गोगुंद्याकडे निघाला. आज त्याला खुप हलके हलके वाटत होते.भावाचा रोष निवळेल याची खात्री होती.गोगुंद्या परिसरात पोहोचला तेव्हा नुकताच सुर्योदय झाला होता.घनदाट वनाच्या कडेजवळ येऊन तो घोड्यावरुन उतरणार तोच दोन बाण सूं सूं करत त्याच्या कानाजवळून गेले.कोण?मी महाराणांचा बंधू शक्तिसिंह आहे.अकबर च्या माणसांना या जंगलात प्रवेश नाही. तुम्ही महाराणांचा बधू म्हणून फक्त इशारा दिला.मोगलांच्या माणसांना आंत शिरु देत नाही.मी..मी.. अकबरला सोडून आलोय!तुम्ही फक्त मी आल्याचा निरोप महाराणना द्या.ठीक आहे.शक्तिसिंह त्या भिल्ल तरुणांची स्वामिनिष्ठा पाहून भारावून गेला.आपल्या दादाने जीवाला जीव देणारी माणसे उभी केलेली पाहून विस्मयचकित झाला.तो भिल्ल तरुण परत येऊन शक्तिसांहाला महाराणांकडे घेऊन गेला.शक्तिसिंह आलेला बघून प्रतापसिंह पुढे होऊन त्याला मिठीत घेत म्हणाले,शक्ती आमची हरवलेली शक्ती परत मिळाली.ते बंधूप्रेम बघून सारेच भारावले.

                   क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप !!!

भाग – ४५.

          शक्तिसिंहाला जवळ बसवून त्याच्या पाठीवर हात ठेवत महाराणा विचारते झाले,शक्ति मेवाडात कसा काय?दादा हळदीघाटाच्या युध्दभूमीतून निसटून जाण्यास तुम्हाला मदत केल्याचे अकबरला कळले.त्याने मला बोलावून, मग बादशहाच्या महाली झालेली खडा जंगी सांगून,केवळ शंभर कडव्या राजपूतांच्या तुकडीसह शहाबाजखान च्या फौजेवर पिछाडीवर कसा छुपा हल्ला केला,आपल्या मोगलांच्या ताब्यात गेलेला भिनमोर किल्ला ताब्यात घेतल्याचे सांगीतले.वाss छान तोहफा दिलास आम्हाला!शक्तीने भिनमोर किल्ला जिंकल्याच्या दस्तऐवजाचा कागद खिशातून काढून म्हणाला,दादा.. ही माझ्याकडून छोटीशी भेट स्विकार करावी.

         दादाss! तुमची माफी मिळाली, मला सारं पावलंय!माझ्यासारख्या चुकले ल्याला औदार्य दाखवून क्षमा केली मी कृतार्थ झालोय!ह्यानंतर जीवात प्राण असेस्तोवर आपण दोघे बंधू मेवाडच्या स्वातंत्र्यासाठीच लढू!दादाss माझ्या मातेसमान भाभी आणि कुॅंवर अमरसिंह ला भेटण्याची आज्ञा द्यावी.कुॅंवर शक्तिसिंह महाराणांच्या राजपरिवाराकडे निघून गेला.

       शहबाजखान अजमेरहून मोठ्या दिमाखात निघाला होता.या मोहिमेत आपण कांहीच सल्ला द्यायचा नाही हे मानसिंहांनी अजमेरहून निघतांनाच ठरवले होते.शहाबाजने पहाडी प्रदेशात बरेच आंत घुसून नवीन ठाणी उभारली. पण सैन्याची संख्या कमी वाटल्याने, अधिक सैन्य पाठवण्यासाठी त्याने बादशहाला कोणचाही सल्ला न घेता खलिता पाठवला.अकबरचे बहुतेक सैन्य

बंगाल-बिहार प्रांतात अडकले होते. खलिता बघून अकबरचा संताप झाला तरी देखील फत्तेपूरच्या इब्राहिमबरोबर अधिक सैन्य देऊन मेवाडच्या पहाडी मुलखात रवाना केले.

      अरवली पर्वतात आलेल्या शहाबाज खानची प्रत्येक हालचालीची वार्ता गुप्त हेर वेळोवेळी महाराणांना कळवित असे. शेख इब्राहिम येताच शहाबाजने त्याला लालबाईच्या ठाण्यावर नेमले.स्वतः उरलेल्या सैन्यासह भोमरच्या पहाडी घनदाट अरण्यात शिरला.गोगुंद्यापासून आसपासच्या सर्व पहाडात त्याने आपले सर्व सैन्य पसरवले.त्याला वाटले आपण महाराणांची पूर्ण नाकेबंदी केली.त्याला वाटले,महाराणांना जिवंत पकडले तर सारे श्रेय आपल्या एकट्याला मिळेल. म्हणून त्याने मानसिंह व भगवानदास बद्दल शंका निर्माण झाल्यामुळे त्यांना अजमेरला पाठवण्याचा घातकी निर्णय घेतला.

        महाराणांची सामंत,राजे व मंत्र्यां बरोबर मसलत सुरु असतांनाच मानसिंह व भगवानदास अजमेरला गेल्याची बातमी गुप्तहेराने दिली.

        शहाबाजखान आता जलद गतीने हालचालीला सुरुवात करेल,लवकरच कुंभळगडाला वेढा देईल,त्याने गोगुंद्या व कुंभळगडाकडे येणार्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी केली.तो इकडे निघाला की,छूपे हल्ले करुन बेजार करायचे.कुठूनही अन्न धान्य मिळणार नाही याची काळजी घ्यावी.किल्ल्यात भक्कम दारुगोळा ठेवा कुंभळगडकिल्ला उंचावर व अभेद्य मेवाडची राजधानी,मेवाडची शान आहे. आपणांसर्वांना आबाधीत राखायची आहे नंतर महाराणांनी आणखी बर्याच सुचना  देऊन कामे वाटून दिले.सैनिकांची योग्य विभागणी करुन नेमलेल्या पहाडी मुलखात व्यवस्थित पहारे बसविले. आदिवासी भिल्ल सैनिकांवर हेरगिरीचे काम सोपवले.

        शहबाजखान पुढे पुढे सरकत ठीक ठीकाणी मोगल ठाणी उभारुन नाकेबंदी करीत होता.कुंभळगडाच्या पायथ्याशी अगदी जवळचे असलेले गांव ‘केलवाडा’  ताब्यात घेऊन शहबाजने कडक बंदोबस्त करुन छावणी उभारली

        पायथ्याशी संपर्क ठेवण्याचे महत्वा चे ठीकाण शहाबाजच्या ताब्यात गेल्याचे ऐकून महाराणा चिंतातूर झाले.कुंभळ गडाच्या पायथ्याशी येताच शहाबाजने गडावर जाणार्या वाटांची नाकेबंदी करुन प्रत्येक वाटेवर सैनिक तैनात केले. सर्व धोके लक्षात घेऊन,महाराणांच्या छापेमार सैन्यांकडून धोका नको म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था केली.एवढी कडक सुरक्षाव्यवस्था असूनही,भिल्ल सैनिक अचानक छापा मारुन पहार्यावर चे आणि छावणीत शिरुन अनेक मोगल सैन्य ठार केलेले पाहून शहाबाजचा राग अनावर झाला.लगेच आजुबाजुच्या टेकड्यांवरुन कुंभळगडावर आक्रमण करुन किल्ल्याला वेढा देऊन चारही बाजूने हल्ला चढवला.महाराणा यशस्वी पणे तोंड देत पहिला हल्ला परतवून लावल्यामुळे शहाबाज इरेला पेटून देसुरी च्या घाटाजवळ नवीन चौकी उभारुन कोळवाड्याचीही नाकेबंदी केली.

             क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

                         

महाराणा प्रताप संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading