महाराणा प्रताप संपूर्ण भाग ८, (३६ ते ४०)

*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇



एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू  लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

महाराणा प्रताप

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – ३६.

         मानसिंहांच्या अंगरक्षकांची फळी फोडण्यासाठी महाराणांनी निकराचा हल्ला चढविला.कितीतरी सैनिक कापून काढले,त्यात राजपूतच जास्त होते,त्या मुळे त्यांना तिव्र वेदना होत होत्या,पण या घटकेला ते राजपूत असले तरी शत्रू होते.

 युध्दाचा रंग पालटला,वापस आलेले मोगल सैनिक त्वेषाने लढू लागले.मिहिर खानने उठवलेली हूल कामी आली.खरं म्हणजे नियतीच महाराणांवर रुष्ट झाली होती.मेवाडचे सैन्य तिन्ही बाजूंनी घेरल्या गेलेत.परिस्थिती अतिशय विकट झाली तरी,महाराणा शोर्याने लढत हळूहळू  मानसिंहाच्या दिशेने सरकत होते. महाराणांनी राखीव सैन्य ठेवले असते तर ताज्या दमाच्या राखीव सैन्यसहाय्याने विजयाचे पारडे आपल्याकडे खेचता आले असते,पण त्यांची नजरचुकीने का होईना,झालेली चुक त्यांना चांगलीच भोवली.

         चंदावलमधल्या भिल्लराज पुंजाने मोगलांच्या बाजुने युध्दाचा कल झुकत असलेला पाहून पळ काढला.युध्द अंतिम टप्प्यात येण्याची चिन्हे दिसूं लागली. राजपूत वीर धारातीर्थी पडू लागले.मोगल सैन्याचा जोर वाढला.महाराणा लढत लढत,शत्रूंची कापाकापी करीत अधिका धिक मानसिंहाच्या दिशेने  सरकत होते चितोडगड गाजविणार्या जयमलचा पुत्र रामदास मेडतिया कछवाह जगन्नाथसिंह च्या हातून मारल्या गेला.अखेर महाराणा तलवार गाजवत मानसिंहाच्या हत्तीसमोर  येऊन एक जळजळीत कटाक्ष टाकत महाराणा कडाडले, हाजीहाजी करणार्या गद्दार राजपुताss सांभाळा स्वतःला!भयभीत,मनात थरारलेल्या मानसिंहानी उसणे अवसान आणून म्हणाले,तुम्ही चारही बाजूने घेरले असतां ना जिवंत परत जाऊ शकाल? कदाचित नाही जाणार,पण त्याआधी तुमचा समाचार नक्की घेईन.

         तेवढ्यात माधोसिंह कछवाह ससैन्य तिथे येऊन महाराणांना घेरण्याचा प्रयत्न केला.पण चेतकच्या जलद हाल चालीने शत्रूला त्यांचेवर वार करणे शक्य होत नव्हते.त्यामुळे त्यांचेवर दुरुन बाण सोडण्याचा सपाटा लावला.कांहीनी तर तलवारीचे वार केले,भाले फेकले,अनेक जखमा झालेले महाराणा जीवाच्या आकांताने तलवार चालवत होते.समोर शत्रू मानसिंह दिसत असल्यामुळे,अत्यंत चीड,घृणा निर्माण होऊन कधी उडवतो असे त्यांना झाले होते.अंगात विरश्री संचारली.दातओठ खात हाती भाला घेऊन चेतकाला केलेला इशारा  कळून, एकदम चवताळून पुढे झेप घेतली.मागचे दोन पायावर उभे राहून पुढील दोन्ही पाय मानसिंहाच्या हत्तीच्या सोंडेवर ठेवले.त्या हत्तीच्या सोंडेत ठेवलेली धारदार तलवार सारखी हलवत होता.चेतकाच्या टापांचा चांगलाच मार लागल्याने हत्ती चित्कारला पण त्याच्या तलवारीने चेतकच्या मागच्या पायाला मोठी जखम झाली.महाराणांनी सारी शक्ती एकवटून मानसिंहाच्या दिशेने भाला फेकला,पण मान झुकवल्यामुळे अचूक नेम धरुन सोडलेला भाला अंबारी च्या मागच्या भागात जाऊन रुतला व सुदैवाने मानसिंह बचावले.मानसिंहावर फेकलेला भाला सैन्यांनी बघून महाराणा च्या या आगळ्या वेगळ्या धाडसाने हादरले व चवताळले देखील!मग सारे चवताळलेल्या मोगल सैनिकांनी महाराणाभोवती चारही बाजूने गराडा घालून एकाचवेळी सारे त्यांचेवर तुटून पडले.महाराणा शत्रूंच्या तडाख्यात सांपडले होते.सपासप तलवारींचे वार होत होते.अतिशय थकलेले,जखमी अवस्थेतही सर्वांना पुरुन उरत होते. महाराणा प्रतापसिहांना संकटात घेरलेले बघून त्यांचा प्राणप्रिय मित्र मन्नासिंह बेचैन झाला.

       वेळ मोठी आणीबाणीची होती. मेवाडचा तळपता सूर्य मावळणार, अस्तास जाणार होता.संपूर्ण मेवाडप्रांत गुलामगिरीच्या अंधकारात लुप्त होऊन सैतानांचा मुक्तसंचार सुरु होणार होता. मन्नाच्या मनात एक युक्ती तरळली आणि तो महाराणाजवळ जाऊन त्यांच्या डोक्यावरचा मुकुट काढून म्हणाला, आपण अतिशय थकले व जखमी आहात.वेळ न दवडता आपले प्राण वाचवावे.आपण मेवाडचे प्राण,सर्वस्व आहात.वाचलात तर मेवाड निश्चित स्वतंत्र होईल.सच्च्या मित्राची प्रार्थना अव्हेरु नका.त्याचवेळी मोगल सैन्याचा लोंढा त्यांच्या दिशेने येतांना बघून कळकळीने म्हणाला,महाराणा!या मित्रा चा,दासाचा शेवटचा प्रणाम!त्यांना निघून जाण्यास संधी मिळावी म्हणून,मन्नासिंह ने त्यांचा मुकुट मस्तकी धारण करुन थेट त्यांच्या आवाजात सिंहगर्जना करीत  मोगलसैन्यावर तुटुन पडले.त्यांच्या आवाजातील सिंहगर्जना व मस्तकावरील मुकुट बघून मोगलसैन्य फसले.महाराणा समजून चवताळून त्याच्यावर चाल केली तोही आपली तलवार सपासप चालवू लागला.संधीचा फायदा घेऊन जड अंतःकरणाने महाराणा तिथून निसटले.

                क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – ३७.

         कुॅंवर शक्तिसिंह बाजुला ऊभा राहून हे सर्व बघत होता,त्याची त्यालाच लाज वाटली.एवढ्या अफाट मोगलसैन्या पुढे मन्नासिंह किती काळ टिकाव धरणार सर्वांगावरच्या जखमांनी शेंदरासारखा लालबुंद झालेला,शरीरातील त्राण संपले व तो खाली कोसळला.खाली पडतांना त्याच्या चेहर्यावर भव्य,दिव्यतेचे आगळे वेगळे तेज पसरले होते.तो पडताच,उंच आवाजात मोगलसैन्य भान हरवून ओरडू लागले…ठार हो गया…महाराणा प्रताप.. गिदडकी मौत मारा गया!एकदम उठले ला जल्लोष निसटून जाणार्या महाराणां च्या कानी पडला आणि मनाशी चित्कार त म्हणाले,मन्ना..माझ्या सख्या..माझ्या मित्रा.. मेवाडच्या भवितव्यासाठी,आमचे प्राण वाचवण्यासाठी त्या मोगल गिधाडा वर झोकुन दिलेस.. तुझा हा अनमोल त्याग आमच्या व मातृभूमीच्या सदैव स्मरणात राहिल.तिव्र दुःखाने त्यांंचे डोळे वाहू लागले.

          पायाला झालेल्या जखमेतून भयंकर रक्तस्ताव होत असतांना देखील ते स्वामिभक्त जनावर ‘चेतक’ आपल्या स्वामींना संकटातून बाहेर काढत दूरदूर नेत होते.

        मन्नासिंह झालाचे ते महान अलौकि क बलिदान पाहून बाजुला ऊभा  असलेला शक्तिसिंह पश्चातापदग्ध होऊन तिव्र दुःखाने अश्रू गाळीत हळहळत होता एवढ्यात त्याच्या कानावर दोन मोगल सैन्याची कुजबुज कानी आली.यहांसे तेज घोडेपर एक आदमी भागता हुआ नजर आया,शायद वह महाराणाही था! आपण त्याला ठार केले तर बादशहा मोठे बक्षिस देईल.या लालसेने ते दोघे सैनिक महाराणाच्या पाठलागावर निघून गेले.ते गेलेले पाहून शक्तिसिंहने विचार केला,चेतक व माझा दादा अत्यंत जखमी व थकलेले आहेत.अशावेळी त्यांना प्राण संकटातून वाचवणे भाऊ या नात्याने व आतांपर्यंत वाईट वागलो त्या परिमार्जना र्थ त्यांच्या मदतीसाठी दोघा सैनिकांच्या दिशेने घोडा पिटाळला.चेतकाच्या पाया मधे अत्यंत वेदना होत असतांनाही आपल्या स्वामींना पाठीवर घेऊन जिवाच्या आकांताने धावत होता.

        शक्तिसिंहाने त्या दोन यवन सैनिकां चा पाठलाग करुन त्यांचा शिरच्छेद केला थोड्याच अंतरावर मृत चेतकाजवळ सभोवतालचे भान हरपून अतिव दुःखाने महाराणा अश्रू ढाळीत बसले होते.आज पर्यंत त्यांनी अनेक मृत्यु पाहिले,व दिले सुध्दा,पण आजच्यासारखे दुःख,वेदना त्यांना कधीच झाल्या नाहीत.आपले स्वामी संकटांत आहे,त्यांना शत्रूपासून दूर नेले पाहिजे ह्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन स्वतःच्या जखमी जीवाची पर्वा न करतां एकसारखा दौडत होता.वाटेत भरपूर पाण्याचा खळखळणारा मोठा रुंद नाला लागला.त्यावरुन उंची उडी घेऊन तोंडाला फेस आला,अतिशय थकला तरी दौडत होता.शेवटी कांही अंतरावर जाऊन धाडकण कोसळला,महाराणा दूर फेकल्या गेले.लगबगीने उठून त्याच्या जवळ आले,केविलवाण्या नजरेने त्यांच्याकडे बघत,नेत्रात अश्रू आणून प्राण सोडला.महाराणा त्याच्या सर्वांगावर  प्रेमाने हात फिरवीत आकांत करुं लागले

        शक्तिसिंह ते करुण दृृष्य बघत होता.आपला दादा एका मुक्या जनावरा वर एवढे अलोट प्रेम करतो,मी तर त्यांचा सख्खा बंधू!मी नको वागायला हवे तसे वागलो,त्यांचा भयंकर अपमान केला, अकबरला जाऊन मिळालो,एवढे अक्षम्य अपराध केले असले तरी,त्यांना शरण गेलो,त्यांच्या कुशीत शिरलो तर नक्कीच माफ करतील या विचाराने प्रेरित होऊन, हातातील तलवार दूर फेकून एकदम त्यांचे अंगावर हंबरडा फोडत झोकून दिले.अरेss शक्ती,तूं इथे? मग त्याने रणांगणांवर घडलेल्या घटनेपासून,दोन यवन सैनिक कसे मागावर होते,त्यांना ठार केल्याचे सांगून मन्ना हुतात्मा झाल्या चे सांगुन म्हणाला,दादा!युध्दभूमीवरील परिस्थिती एकदम बदलेली आहे.तुमची विश्वासू माणसे सोडून गेली.कदाचित मोगलांचा विजयही झाला असेल.तुमचा प्राण धोक्यात आहे.सैनिक पाठलागावर असतील,त्वरीत निघून पुन्हा मेवाड उभारण्यासाठी जीव वाचवणे अतिशय गरजेचे आहे.

       आमची जीवाभावाची माणसे सोडून गेलीत आणि तूss तूs तर अकबरचा माणूस?दाsदाss तो जोराने किंचाळला. शक्ती!माणूस जेव्हा निष्ठेची विष्ठा करतो तेव्हा तो देशद्रोही ठरतो,तो कलंक कधीही पुसल्या जात नाही.आम्हाला प्राणाचा मोह कधीच नव्हता व आतांही नाही.आम्ही केवळ मातृभूमीच्या सेवे साठीच महाराणा पद स्विकारले.याक्षणी आमची शक्ती जरी क्षीण झाली असली, थकलो असलो तरी,केवळ मेवाडसाठी तुझ्याशी लढु शकतो.झोकांड्या खात ते कसेबसे उभे राहिले.दादाss दादाss अजूनही मला शत्रू समजता?माझ्या अपराधाचा मला भयंकर पश्चाताप झाला दाsदा दादाss फक्त एकदाच..एकदाच माफ केले म्हणा ना.. दीनवाने दोन्ही हात जोडून आर्जवं करुं लागला.दादा…फक्त एकदाच…एकदाच…

               क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – ३८.

         खरोखरच शक्तिसिंहला पश्चाताप झाल्याची खात्री होताच आवेगाने त्यांनी मिठीत घेतले.राम-भरत भेटच जणूं!दोघां  चे नेत्र पाझरत होते.महाराणांच्या शरीरा वर झालेल्या असंख्य जखमांमधून रक्त पाझरत होते.सद्गदीत स्वरात शक्तिसिंह म्हणाला,दादा माझा घोडा घेऊन त्वरीत गोगुंद्याला निघून जा.आणि तू? माझा मार्ग चुकला आहे.मेवाडचा मार्ग कायम चा बंद झालाय!मेवाड जनता देशद्रोही म्हणूनच बघते.त्या नजरा झेलतच मला जिवंत मरण भोगणे भाग आहे.पुढच्या जन्मी मेवाडात जन्म घेऊन मातृभूमीची सेवा करत या जन्माचे पातक फेडण्याचे प्रयत्न करीन.

         पण दादा!मी आपल्याला वचन देतो,आतां अकबरकडे जाऊन तेथील गुप्तवार्ता वेळोवेळी पोहचत्या करत राहीन.शत्रूकडे राहून अप्रत्यक्षरित्या मेवाडची सेवा करत राहीन.नंतर शक्तिने लाकुडफाटा गोळा करुन चेतकच्या निष्पाण देहाला अग्नी दिला.चित्ता पेटता च चितेला महाराणांनी मानवंदना दिली. शक्तिसिंहच्या घोड्यावर आरुढ होऊन टाच देत,शक्तीचा निरोप घेऊन सुसाट वेगाने कोल्यारीकडे,अरवली पर्वतात, मेवाडचा सिंह,पहाडी प्रदेशात हातावर तुरी देऊन गडप झाला.कुॅंवर शक्तिसिंह भान हरपून त्या दिशेने बघत राहिला.त्या यवन सैनिकाचा एकाचा घोड्यावर स्वार होऊन अतिव समाधानाने राजा मानसिंहाच्या छावणीकडे निघाला.

        महाराणा युध्दभूमीवरुन निसटल्या वर आणखी थोडा वेळ युध्द सुरु राहिले. त्यात महाराणांचे अतिशय शूर सरदार, पराक्रमी वीर,मातब्बर लोक,ग्वाल्हेरचा राजा रामसिंह तंवर आपल्या तीन्ही मुलां सह मारल्या गेले.तसेच राजा भीमसिंह, राजा मानसिंह सोनगरा,रावत,नैतसी, शंकरदास राठोड,रामदास मेडतिया पुत्रा सह ठार झाले.महत्वाचे सरदारच कामी आल्यामुळे सैन्यांनी माघार घेत,हळदी घाटीत शिरुन कोल्यारीकडे निघून गेले. वाचले फक्त साळंबर नलेश रावत कृष्ण सिंह,घाणे रावांचा गोपाळदास मेडतिया, भामाशाह,ताराचंद अशी फारच थोडी मान्यवर लोकं!अमरसिंहाला या युध्दा पासुन दूर ठेवले होते.मोकळ्या मैदानात युध्द असल्यामुळे आदिवासी भिल्लांचा उपयोग झाला नाही.हळदीघाटात लढण्याचा डाव ऐनवेळी फिस्कटल्यामुळे नाईलाजास्तव मैदानी युध्दात उतरावे लागले,त्यामुळे त्यांना पराभव पत्कारावा लागला.हे युध्द केवळ चार घटिका चालून दुपारी थांबले.मेवाड राजपूतांनी माघार घेऊन घाटीत प्रवेश केला त्यावेळी  पहाडातून लपून गनिमी काव्याने उलट हल्ला होण्याच्या भीतीने मोगल सैन्यांनी पाठलाग केला नाही.

        परतेलेले सैन्य हळुहळू कोल्यारीत जमा होऊं लागले.जखमी सैन्यांचा तात्काळ उपचार सुरु झाला.महाराणांची स्थिती तर अत्यंत बिकट झाली होती.सर्व शरीर जखमांनी भरुन गेले होते.तीळ ठेवायला जागा नव्हती.त्यांच्यावरही उपचार सुरु झाले.त्यांनी आपले केंद्र कोल्यारीतच केले.

        राजा मानसिंहाने विजयाची खबर कळविण्यासाठी एक सैनिक तुकडी मुल्ला बदायुनीच्या नेतृत्वाखाली, आणि जिंकलेला महाराणाचा ‘रामप्रसाद’ महाकाय हत्तीही रवाना केला.आणि स्वतः गोगुंद्याकडे जाऊन गोगुंद्यावर ताबा मिळवला.महाराणांनी दूरदर्शीपणे आधी गोगुंडा खाली करुन आपली राजधानी कुंभळगडावर हलवली होती.गोगुंद्यात फक्त २० माणसे होती.चौफेर डोंगर, झाडीने सुरक्षित गोगुंद्या उदयपूरपासुन उत्तर पश्चिम दिशेला २२ मैलावर होते. उदयपूरपासून ५० मैलावर,साडेतीन हजार फुट उंचीवर अरवली पर्वत माळां च्या एका टोकावर कुंभळगड होता.

         वास्तविक कोल्यारीपासून गोगुंडा जवळ होते.पण मानसिंहाला कोणताही प्रतिकार न करतां त्यांची नाकेबंदी करण्यासाठी सहज येऊ दिले.उपासमारी ने बेजार व्हावे म्हणून येणारी नवीन रसद पण पोहचू देत नव्हते.

       अकबर बादशहा त्यावेळी फत्तेपूर शिक्रीला होता.सैनिक तुकडीसह बदायुनी अकबरासमोर येऊन कुर्निसात करुन विजयाची खबर व महाराणाचा ‘रामप्रसाद’ हत्ती पेश केला.बादशहाने प्रतापसिंहाबद्दल विचारल्यावर,मुल्ला बदायूनी खाली मान घालून उभा राहिला. जरबेने विचारल्यावर महाराणा निसटून गेले,पण त्यांचा प्रिय हत्ती ‘रामप्रसाद’ आणल्राचे सांगीतल्यावर त्याचा राग थोडा शांत झाला.क्षणभर महाराणा निसटून गेल्याचेही विसरला.एकदा या हत्तीची ख्याती ऐकून त्याने आपल्या माणसा करवी मागणी केली होती,पण त्याला नकार मिळाला होता.राजा मानसिंहाकडे जाऊन आमची आज्ञा सांग पहाडी मुलखातील इंच इंच जागा पिंजून काढून महाराणा प्रतापांचा शोध घेऊन आमच्यासमोर हजर करायचा.कुर्निसात करुन बदायुनी गोगुंद्याकडे रवाना झाला.

                 क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – ३९.

     इकडे गोगुंद्यात मात्र राजा मानसिंहा ची स्थिती मात्र अतिशय शोचनीय झाली. अरवली पर्वतरांगेतील गोगुंद्याचा परिसर अतिशय दुर्गम,उंच उंच आकाशाला भिडणारे डोंगर,खोल दर्या खोर्यांनी व्यापलेला भूप्रदेश,जंगल इतके घनदाट होते की,आंत शिरलेल्या माणसाला बाहेर पडण्याचा मार्ग सांपडत नसे.फौज इतकी थकली होती की,महाराणांच्या फौजेला टक्कर देण्याची शक्ती नव्हती. कोल्यारात तळ देऊन बसलेल्या महाराणांनी गनिमी काव्याचे युध्दतंत्र वापरुन मानसिंहाची येत असलेली रसद अचानक छापा मारुन लुटून मोगल सैनिक ठार करुन पळून जात.आजुबाजु चा परिसर उजाड केला असल्यामुळे त्यांना दाणागोटा मिळणे तर दूरच,पण प्रतापसिंहाच्या सैनिकांकडून सपाटून मार खावा लागत असे.

       छुपे हल्ले रोखण्यासाठी मानसिंहाने गोगुंंद्याभोवती तट बांधून ठीकठीकाणी चौक्या बसवल्या.महाराणांनी सर्व वाटा अडवल्यामुळे मोगली सैन्य बाहेर पडू शकत नव्हते.राजा मानसिंह व सैनिक पिंजर्यात अडकल्या सारखी स्थिती झाली.भीतीने त्यांना रात्री झोपसुध्दा येत नव्हती.बाहेरुन येणारी रसद तोडल्यामुळे मोगल सैन्यांवर उपासमारीची पाळी आली.जनावरांना मारुन पोटाची आग शमवू लागले,त्यामुळे रोगराई पसरुन सैनिक मरुं लागले.स्थानबध्द कैद्या सारखी त्यांची अवस्था झाली.मोगल सैन्याच्या दुर्दशेला सीमाच उरली नाही.

         ऐतिहासिक आणि लौकिकदृष्ट्या मोगलांचा विजय झाला असला तरी, मेवाडच्या महाराणाने त्यांची अगदी वाईट   दशा करुन अडकित्यात सुपारी अडक ल्या सारखी अवस्था झाली होती.हळदी घाटाच्या संग्रामात फक्त एका युध्दाचा तात्कालिन शेवट झाला असला तरी, मेवाड-आग्रा संघर्ष चालूच राहीला. महाराणा प्रतापसिंहांना पकडून अकबर च्या समोर हजर तर करुं शकले नाहीच उलट त्यांच्या जाळ्यात अडकून आपल्या मृत्युघंटा मोजू लागले.हळदीघाटाच्या पराभवानंतर प्रतापसिंह हतबल होतील अशी अटकळ होती,पण दुप्पट जोमाने तुटपुंज्या सैन्यानिशी निकराची झुंजदिली

          अरवली पर्वतातील ‘मायरा’ हे फार महत्वाचे स्थान,गोगुंद्यापासून केवळ  सात मैलावर एखाद्या भुयारासारखे,दोन पहाडांच्या अरुंद वाटेतून जावे लागत.

महाराणांची नवीन राजधानी कुंभळगड जरी असली तरी,शस्रास्रे मात्र मायर्यात च ठेवली होती.गनिमी काव्याच्या हाल चालीचे हेच केंद्र होते कारण अत्यंत सुरक्षित स्थळ असल्याने,शत्रू अकस्मात हल्ला करुं धजावत नव्हता.दुसरे तेवढेच महत्वाचे स्थान होते ‘धोलिया’ इथे महाराणांचा परिवार होता.तीथे उंबरांची दाट झाडी होती.हळदीघाटाच्या युध्दा नंतर महाराणांच्या परिवारावर उपास मारीची पाळी आली होती तेव्हा हीच गोड उंबरांंची फळे खाऊन गुजराण करावी लागली होती.

       हळदीघाटाच्या युध्दामुळे महाराणा प्रतापसिंहांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला होता.आततायी,वेडाचार न करतां वास्तववादी विचार करुन सुसुत्रपणे भूमिका स्विकारुन संघर्ष चालू ठेवला.ते आपल्या साथीदारांना म्हणाले,हळदी घाटीच्या युध्दात कधीही न भरुन निघणारे नुकसान,तसेच जीवाला जीव देणारे सरदार,राजे,साथीदार,मित्र,सैनिक गमाववे पण यानंतर प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलून,भिल्लराज पुंजाच्या सहाय्याने फक्त गनिमी काव्याचा अवलंब करुनच मोगलांना मेवाडबाहेर काढायचे ठरविले.

      इकडे गोगुंद्यातील वातावरण एकसारखे घुमसत होते.मोगल सरदारांत क्षोम खदखदून उघड उघड आपला विरोध राजा मानसिंहाला दर्शवू लागले. उपासमारीने मोगल फौज बेजार झाल्या ने काही मोगल सरदारांनी राजपूतांच्या घरांत शिरुन लुटायची आज्ञा दिल्यावर मानसिंहांनी मनाई करत म्हणाले,सैनिक  आयतेच महाराणांच्या तावडीत सांपडती  ल,शिवाय त्यांनी आधीच हा भाग उजाड केल्यामुळे लोकांच्या घरांत सुध्दा कांही शिल्लक नसेल.जे कांही थोडेफार असेल व तेही आपण हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर,शांत असलेली जनता खळवळू न आपल्या जीवावर उठतील.एका बाजू ने प्रतापसिंहाचे छापामार सैन्य आणि दुसर्या बाजूने प्रक्षुब्ध जनता यांच्या चक्रात फौज सांपडली तर,इथून एक पाऊल टाकणेही अशक्य होईल.आपल्या ला सुरक्षितपणे आग्र्याला जायचेय,पण  सध्या असलेल्या विळख्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर,आपण जिंकलेला मुलूख त्यांच्या ताब्यात जाईल

                 क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी  देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग –  ४०.

        मानसिंह मोठ्या मुश्कीलीने मोगल सेनापती सरदारांना थोपवित होते.अंतरी ते देखील अतिशय बेचैन झाले होते. फौजेची अन्नान दशा पाहवत नव्हती. गोगुंद्याबाहेर पडण्याचा कोणताच मार्ग  दिसत नसल्यामुळे चूप बसण्याशिवाय कांहीच करुं शकत नव्हते.

        महाराणा कुंभळगडच्या पायथ्याशी असलेल्या झोपडीच्या बाहेर शतपावली करीत असतांना अर्जुन नाईक नांवाचा भिल्ल भयभित घाबरलेला त्यांच्यासमोर येऊन म्हणाला,महाराज!मोगल सेनेची ५० शसस्र तुकडी इकडे येत आहेत.ठीक तूं आणि कांही ४-५ लोकांना सोबत घेऊन महाराणी व मुलांना घेऊन गर्द झाडीत सुरक्षित स्थळी निघून जा.

         झोपडीजवळ येऊन पत्नीला म्हणाले,स्वयंपाक बंद करा.भिल्लीणीचा वेष धारण करुन मुलांसह भिल्लांबरोबर पुढे व्हा.आम्ही मोगल सैनिकांचा समाचार घेऊन येतोय!नाथ!स्वतःला जपा!महाराणी सुलक्ष्मी भिल्लीणीचे वेशांतर करुन,कंठात कवड्यांची माळा, दोन्ही मनगटावर फुलांच्या माळा बांधल्या.कन्या देवलौकर व मुलांना घेऊन,भिल्ल तरुणांनी आणलेल्या मोठ्या आकाराच्या टोपल्यांत बसवून व सुलक्ष्मीदेवी त्यांच्या मागे झपाझप चालत आंत जंगलात जावरांकडे निघाले.

        कांही क्षण गेले नाही तोच टिटव्यां च्या जोराने किंचाळण्याचा आवाज घुमू लागला.त्याचवेळी २५-३० धनुर्धारी आदिवासी भिल्ल झोपडीसमोरील पाषाण असलेल्या सिंहासनाकडे धावत आले.टिटवीचा आवाज म्हणजे मोगल सैन्य जंगलात घुसल्याचा संकेत होता.ते  आदिवासी तरुण आल्यावर महाराणा म्हणाले,त्यांच्या मोठ्या संख्याबळापुढे आपण टिकाव धरु शकणार नाही, म्हणून झाडीत लपून छुपा हल्ला चढवून एकही मोगल सैनिक माघारी जायला नको.महाराणांसह सर्व आदिवासी सैनिक,दाट वेलींनी विणलेल्या अवघड, एका बाजूला उंच पर्वत,दुसर्या बाजूला खोल दरी,मधे अरुंद पायवाट,तिथे बाजु ला असलेल्या कडेकपारात मोर्चे लावून सारे प्रतिक्षेत बसले.

        बेसावध मोगल सैनिक अकबरच्या सामर्थ्याच्या वल्गना करीत,हळदीघाटांत, राजपूतांना कसे पराभूत केले अशा गप्पा रंगवुन येत होते.वळणावरुन त्यांना पुढे जाऊ दिले.आणि टप्प्यात आल्याबरोबर, झाडीत लपून बसलेल्या आदिवासी भिल्लांनी सरसर बाणांचा वर्षाव केल्याने मोगल सैन्यांना पळून जायलाही वेळ मिळाला नाही.पाठीत घुसलेले बाण छातीतून निघून धडाधड कोसळू लागले. महाराणांनी आपल्या भाल्याने तुकडीच्या प्रमुखाचा वेध घेतला.महाराणांचा जयघोष करीत लपून बसलेले भिल्ल तरुणांनी मोगल सैन्यांना घेरले.मागून पुढून होणार्या बाणांच्या वर्षावाने मोगल सैन्याच्या शरीराची नुसती चाळण झाली. त्यांच्याजवळची सर्व शस्रे हस्तगत केली. महाराणा सर्वांचे कौतुक करत म्हणाले, ही सर्व शस्रे मायरा गुहेतील शस्रागारात साठवून ठेवा.आणि ते जावर्याकडे रवाना झाले.सुलक्ष्मीदेवी मुलांसह आधीच पोहोचल्या होत्या.

       उदयपूरपासून बावीस मैलावर असलेल्या डुंगरपूर मार्गावरील डोंगर कपारीतले सुरक्षित स्थान जावरा होते. अनोळखी माणसाला त्या स्थळाचा माग मूस देखील लागु शकत नाही.पहाडात कोरलेले ते एक महाकाय भूयार होते. महाराणा कुंभच्या काळी कोरलेल्या त्या भूयाराचा उपयोग मात्र आतां संकटात सांपडलेल्या मेवाडवासीयांना होत होता. भूयारात जायला छोट्या छोट्या पायर्या, आंत भयानक अंधार व पुढे अरुंद जागा! तिथे १००-२०० माणसे सहज बसू शकतील एवढीमोठी ऐसपैस जागा होती.

महाराणांनी कांही शस्रसाठा इथेही ठेवला होता.

       महाराणा भूयारात पोहोचले तेव्हा महाराणी मुलांसह व भिल्लसैनिक त्यांच्या प्रतिक्षेत होते.एकएक दिवस सरत होता.महाराणा कुटुंबासहित अतिशय खडतड,कष्टमय जीवण जगत होते.सारखी पळापळ सुरु होती.मोगलां चे हल्ले मोठ्या निकराने व खंबीरपणे परतवून लावत होते.दुपारच्यावेळी गवताच्या आसनावर महाराणा विराजमान होते.सभोवताली कांही सरदार व भिल्ल सैनिक बसले होते. संभाव्य आक्रमणाला कसे तोंड द्यायचे बद्दलची मसलत सुरु होती.

              क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

                         

महाराणा प्रताप संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading