महाराणा प्रताप संपूर्ण भाग ६, (२६ ते ३०)

*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇



एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू  लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

महाराणा प्रताप

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – २६.

         सप्टेंबर १५७३ मधे राजा भगवान दासांनी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार वडनगरच्या किल्ल्यावर हल्ला केला. प्रतापांचा पक्का समर्थक व मोगलांचा कट्टर वैरी,किल्लेदार फौलादिया गुलाम रावळी अफगाणाने बराच प्रतिकार केला पण अकबरच्या सुधारीत शस्रस्रांच्या भडीमारापुढे त्याचा टिकाव लागला नाही त्याने शरणागती पत्करल्याचे नाकारल्या वर त्याला कैद करण्यात आले.नंतर भगवानदास इडरला पोहोचले.महाराणां चा सासरा नारायणदासांनी त्यांचे स्वागत करुन आपुलकीने येण्याचे प्रयोजन विचारल्यावर ते म्हणाले,महाराणांची समजूत काढण्यासाठी.शक्यच नाही! त्यांचा इरादा कल्पांती बदलायचा नाही. मग मला पकडून न्यावे लागेल.आपण एक राजपूत आहांत,आपल्या हातून असे दुष्कर्म होऊच शकत नाही.चला मग आमच्या सोबत गोगुंद्याला,महाराणा प्रतापसिंहांचा पाहुणचार घेऊ या!पण आपली फौज?चिंता नका करु.फौजेला इथूनच आग्र्याकडे कूच करण्याचा आदेश देतो.

          राजा भगवानदास अंगरक्षकांसह आणि नारायणदास गोगुंद्याला पोहोचल्यावर प्रतापसिंहांनी प्रसन्नपणे स्वागत केले.औपचारिक चर्चा झाल्यावर राजेसाहेब!आपल्या येण्याचे प्रयोजन? अकबरने तुम्हाला आग्रादरबारी हजर करण्याची कामगिरी आमच्यावर सोपवली.दोन्ही हात पुढे करीत प्रताप म्हणाले,आम्हाला जेरबंद करुन घेऊन चला आग्रा दरबारी!असे आगळे वेगळे त्यांचे वागणे बघून विस्मयचकित होऊन नुसते बघतच राहिले.महाराणा! एवढे मोठे पातक नाही करणार आम्ही,पुढे होणारा विनाश टळावा यासाठी थोडी तडजोड करावी एवढीच मनिषा आहे. म्हणजे लाचारीने कमरेत झुकनेच ना? राजेसाहेब!ऐहिक सुख,ऐषारामासाठी ज्या ज्या राजपुतांनी बादशहाची गुलाम गिरी पत्करली ती राजपूत घराणी कलंकित झाली.आम्ही गवताच्या शय्ये वर झोपू,उपास काढू,रानावनात भटकू पण अअकबरपुढे झुकणार नाही.आपला आग्रहच असेल तर आमचा प्रतिनिधी म्हणून,आमचा पुत्र कुॅंवर अमरसिंहाला आग्रा दरबारी घेऊन जावे.आम्ही जिवंत असेपर्यंत त्याच्यापुढे झुकणार नाही. राणाजी!. शेर का बच्चा अमरसिंहाला  आम्ही सुध्दा अकबर दरबारी लोटणार नाही.राणाजी! आपण सोयरे झालो असतो तर….रक्तसंबंधाच्या नात्याने इतिहास घडला असता.पण …दोन दिवस राजा भगवानदासांनी गोगुंद्याचा पाहुणचार घेतला.प्रतापसिंहाचे व्रतस्थ जीवन बघून फार प्रभावित झाले.जाते वेळी त्यांच्या सन्मानार्थ वस्रालकांर देऊन    सन्मान केला.दुसर्या दिवशी अग्रा दरबारी उपस्थित होऊन गोगुंद्याला घडलेला  वृतांत सांगून,अमरसिंहाला पाठवण्यास तयार होते हे ऐकून अकबरा च्या आशा पल्लवीत झाल्यात.

          वास्तविक सम्राट अशोक हा हिंदुस्थानचा दिल्लीपती!अफाट सेना सागर हाती असतांना,लष्करीदृष्ट्या बलवान असतांना देखील,तोलामोलाचे राजकारणपटु माणसं कां पाठवली?मनात आणले असते तर,संपूर्ण मेवाड प्रदेश चिरडून टाकण्याची त्याची क्षमता होती.पण महाराणाने दुर्गम भागाच्या आश्रयास असल्यामुळे त्यांचे सारे बळ डोंगर दर्याखोर्यात साठलेले,गनिमी युध्दनिती,मोगल सैन्यांना उघड्या मैदाना वर असलेली लढण्याची सवय…आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,राजपूत सैनिक जाज्वल्य देशप्रेमाणे प्रेरीत,जीवावर उदार होऊन लढणारे…अशा स्थितीत आपला पराभव झाला तर,मोठे दुषण लागेल, नामुष्की,कलंक लागेल..या भितीनेच तो महाराणांचे मतपरिवर्तन करण्याच्या प्रयत्नात आपले तीन निष्णात सरदार पाठवले होते.शेवटचा प्रयत्न म्हणून राजा तोरडमल,गुजराथमधील वसूलीसाठी जाणार असल्याने येतांना महारांणांची भेट घेऊन प्रयत्न करायची आज्ञा केली.

      राजा तोरडमल! अकबर बादशहाचा चतूर महसूलमंत्री,राजनितिज्ञ,समर्थ सेनापती,अव्वल दर्जाचा मुत्सद्दी आणि खाजगी जीवनांत उत्तम हिंदू होता.

      प्रतापसिंह कुंभळगडाच्या पायथ्याशी असलेल्या झोपडीबाहेरच्या एका शिला खंडावर विचारमग्न बसले असता, सालुम्बर नरेश चंदावत कुलश्रेष्ठ कुलचंद चा दूत येऊन,नमस्कार करुन म्हणाला, अकबराचे महसूलमंत्री राजा तोरडमल च्या इच्छेनुसार आपल्या भेटीस्तव कृष्णसिंहजी त्यांना इकडे घेऊन येत असल्याची पूर्वसुचना देण्यासाठी मला आपल्याकडे पाठविले आहे.त्यांनी अमरसिंहावर गोगुद्याला तोरडमलांची उत्तम बडदास्त ठेवण्याची आज्ञा केली.

                  क्रमशः
संकलन व©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – २७.

         महाराणा निवडक लोकांसह गोगुंद्याला पोहोचल्यावर,अमरसिंहने केलेली जय्यत तयारी बघून समाधान पावले.अलिकडे त्याचेवर महत्वाच्या जबाबदार्या सोपवून न कळत राजकारणाचे धडे देऊन,त्यांच्या पठडीत मुरब्बी राजकारणपटू तयार होत होता. सुंदर सजवण्यात आलेल्या शामियान्या तील उच्च आसन राजा तोरडमलसाठी व बाजुला महारासाठी दर्भाचे आसन तयार होती.राजा तोरडमल तेथील प्रसन्न वातावरण बघून अतिशय प्रभावित झाले गंभीरपणे म्हणाले,राजभोगाच्या मोहाचे ताट समोर भरलेले असून देखील आपण व्रतस्थ जीवन कंठीत आहांत.त्यातल्या वेदना समजतात आम्हाला.हे काम सामान्य माणसाचे नाही.ही लक्षणे योगी राजाचे असून,असा योगीराज युगायुगातू न केव्हा तरी एकदाच जन्म घेऊन आपल्या आदर्शाचा पाठपुरावा करतात. मात्र कधीही कुणापुढे झुकत नाही.

          महाराणासाहेब!आज आम्हा राजपुतांजवळ पूर्वीची शक्ती राहिली नाही.पूर्वंजांनी अशा कांही चुका करुन ठेवल्यात की,त्या सुधारणे जवळ जवळ अशक्य आहे.उसळून महाराणा म्हणाले, पूर्वजांनी चुका केल्यात?नाही..नाही राजे साहेब!उलट त्यांनी धवल इतिहास निर्माण केला.रक्ताच्या अंतिम क्षणापर्यंत लढले,पराजय दिसू लागताच,स्वतःच्या हाताने स्रीयांना जोहारात ढकलुन स्वतः केसरियाचा अंगिकार केला होता,परंतु शत्रूसमोर मान नव्हती तुकवली.पण हल्लीच्या राजपुतांनी आपल्या स्रीयांना बादशहाच्या जनान खान्यात लोटले.तो हरामखोर बादशहा राजपूत र्स्रीयांना आपल्या अंगाखाली घेतो.बिचार्याना मोगलांची शय्या सजवावी लागते. राजपूत आपला धर्म पायदळी तुडवुन वर निर्लज्जासारखे पूर्वजांवर खापर फोडून वागायचे हा राजपूतबाणा नाही राजाजी!इतके स्पष्ट आणि सडेतोड बोलणे ऐकून राजा तोरडमल चपापले.राजेसाहेब माफ करा,पण हल्लीच्या राजपूतांचे कणाहिन वागणे बघून संतापाने मन चवताळून उठते आणि मग भानच राहत नाही.

        तरीही चिकाटी न सोडतां राजा तोरडमल म्हणाले,आम्ही या सजलेल्या आसनावर व आपण दर्भासनावर?आपण फक्त इच्छा व्यक्त करा की,आम्ही आपल्याला सुखाच्या,वैभवाच्या राशीवर आरुढ करु,पण सम्राट अकबराशी स्नेह संबंध जोडूनच!ठीक आहे तयार आहोत पण,आमचा स्वाभिमान विकून नाही. आमच्या मातृभूमीत, भूप्रदेशात सन्माना ने,स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार गमावून नाही.आमचे स्वातंत्र्य आबाधित राखून,आमच्या मेवाडरुपी शरीरात टाकावा.संपूर्ण मेवाड मुक्त करावा,मग आमची मैत्री जोडण्यास हरकत नाही. राजेसाहेब!आमचे विचार ठामपणे अकबरला सांगू शकाल?निश्चित सांगू पण,फक्त एकदा आमच्याबरोबर आग्रा दरबारी चलावं लागेल.

        म्हणजे?प्रत्यक्ष मृत्युमुखात?आमची मातृभूमी गुलामगिरीत ढकलण्या साठी?नाही राजाजी! जगू द्या स्वतंत्रपणे कितीही हालअपेष्टा,दुःख वाट्याला आले तरी हसत हसत सोसू.राजेसाहेब दबाब तंत्राने स्नेहसंबंध जोडल्या जात नाही. ठीक!आमच्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला,पण आपण आपल्या विचारावर ठाम आहांत.आम्हाला जायची परवाणगी द्या.

       राजेसाहेब! आमच्याकडून अधिक उणे शब्द निघाले असल्यास मनांत कांही न ठेवतां,मनापासून आपला आशिर्वाद हवाय!तो तर फार पूर्वीच दिलेला आहे. तुम्ही सूर्यासारखे तळपत राहाल, इतिहासात तुमचे नांव सुवर्णाक्षराने कोरले जाईल.नंतर भोजनाचा कार्यक्रम, नजरांणांचे आदान प्रदान सोहळा पार पडल्यावर राजा तोरडमल रक्षकदलासह गोगुंद्यातून बाहेर पडले.

          दरबारात अकबराला गोगुंद्यात घडलेला सारा वृतांत राजा तोरडमलने सांगीतल्यावर अकबर म्हणाला,युध्द टाळण्यासाठी प्रतापसिंहांना बर्याच संधी दिल्यात,ते वाटाघाटीने,स्वेच्छेने सार्वभौमाचा त्याग करुन स्वामीत्व स्विकारणार नाही याची खात्री पटली. आतां युध्द करुनच प्रतापसिंहांना नमवावे लागेल.नाही जहाॅंपनाह!आम्ही त्यांच्याकडे नुसता पाहुणचार घेण्यास नव्हतो गेलो.सभोवतालचे निरिक्षण केले असता,त्यांचे निष्ठावंत आदिवासी भिल्ल सैनिक अति जागृत असून,महाराणा साठी ते अग्निकुंडात उडी घेऊन स्वतः तर जळतीलच पण समोरच्याला घेऊनच

त्यांची देखील जय्यत तयारी आहे,ऐकून नाराज झालेल्या अकबराला राजे म्हणाले,पुढे दोषारोपण येऊं नये म्हणून वस्तुस्थिती कथन केली.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – २८.

        महाराणा प्रतापांशी युध्द अटळ आहे हे आम्ही जाणून आहोत पण, आमची कांही मजबूरु असल्यामुळेच हे चर्चेच गुर्हाळ लावून त्यांना थोपवून आहोत. आम्ही जरी सम्राट असलो तरी आमचेही कांही दुःखं आहेत.शेरशहा सूरी या अफगाण सुल्तानाकडून दिल्लीचे तख्त मोगलांनी हिरावून घेतले होते.तो राग

अफगाणांच्या मनांत कायम खदखदत आहे.बिहार-बंंगालमधे अफगाणांचे खूप प्राबल्य व बंडाचा झेंडा सतत उभारलेला असल्यामुळे,त्याच्या बंदोबस्तास्तव फार मोठ्या फोजेसह मुनीमखानला पाठव ल्याने तो तिकडेच गुंतुन पडला.

        राजस्थान जोधपूरचा राजा चंद्रसेन राठोड मोगलांविरुध्द लढा देत असल्या मुळे त्याच्या बंदोबस्तासाठी रायसिंह, जलालखान कोर्ची,शहनाझ खान असे कसलेले सेनापती मोठ्या फौजेसह तिकडे पाठवावे लागले.अकबर असा कोंडीत सांपडल्यामुळेच या मधल्या काळात महाराणा प्रतापांना थोपवण्या साठीच शांती प्रस्तावाचे केवळ नाटक चालवले होते.अशा पार्श्वभूमीवर आपल्या दरबारातील राजपूत राजांचे मनात प्रतांपांविषयी विद्वेषाची भावना निर्माण होऊन,संभाव्य आक्रमणात मना पासून सहकार्य करावे असा कुटील डाव होता.असा तीन वर्षाचा काळ निघून गेला  १४ मार्च १५७६ ला अजमेरला दर्शनाला जाऊन,अकबरने तिथेच दरबार भरविला मान्यवर व्यक्तींना उद्देशून म्हणाला, आम्ही प्रतापसिंहाकडे सतत दोस्तीचा प्रस्ताव पाठवून युध्द टाळण्याचा प्रयत्न केला,परंतु त्यांनी आमची अवहेलना करुन प्रत्येक प्रस्ताव फेटाळून लावला. आतां त्यांना दाखवून द्यायची वेळ आली आहे,मोगल सम्राट अकबरची ताकद! जिथे मोठमोठ्या राजकर्त्यांनी आमच्या पुढे हात टेकले तिथे महाराणा काय टिकू शकेल!चुटकीसरसे मिटवून टाकु!

        राजा मानसिहाना “फर्जंद” किताब बहाल करुन,सरसेनापती म्हणून त्यांच्या वर युध्दाचे नेतृत्व सोपवले.सोबत आसफखान,जगन्नाथसिंह कछवाह, महाबतखान,माधवसिंह कछवाह,सम्बर नरेश,सय्यद हतीम बर्हा,अब्दुल कादिर बदायुनी,गाझीखान बक्षी सरदार आपाप ल्या सैनिक तुकड्या अकबरने दिल्यात.  नंतर शक्तीसिंहला म्हणाला,तुम्हाला मुद्दाम राखुन ठेवले.महाराणावर सूड घेण्यासाठी वाट मोकळी करुन दिली. असा कांही पराक्रम करा की,युध्दभूमीवर राजपूतांच्या धड,मुंडक्यांचा खच पडला पाहिजे,रक्तमासांचा चिखल व्हायला हवा तुमचा पराक्रम बघून तुमचे जेष्ठ बंधूंना असा शूर भाऊ गमावल्याचे दुःख व्हायला हवे.तुम्ही स्वतः त्यांचे शिर धडा वेगळे करा,त्याहीपेक्षा दोर काढण्यांनी जेरबंद करुन आमच्यासमोर आणून त्यांचा स्वाभिमान जमीनदोस्त झालेला पाहण्यास आम्ही अधिक उत्सुक आहोत

         अकबरने खजिन्याचे तोंड मोकळे केले.राजा मानसिंहजी!महाराणांना कमजोर नका समजू.त्यांना मेवाडच्या अनेक राजांचा पाठींबा असल्यामुळे आधी त्यांना ठेचा!राजा मानसिंहानाॅ युध्दाचे सारे सूत्र,अधिकार दिल्यामुळे बरेच मोगल सरदार अकबरच्या निर्णया वर नाराज होते,पण उघडपणे कोणी बोलू शकत नव्हते.अकबरने खेळलेला कुटील डाव मात्र कुणाच्या लक्षात आले नाही.त्यात मोठे राजकारण होते. राजा मानसिंह शूर सेनापती राजपूत,शिवाय त्याच्या अगदी जवळचा,विश्वासातला, बडी बेगम जोधाबाईचा बंधू,सख्खा मेहुणा,स्वाभिमानि,निष्ठावंत, कर्तव्यदक्ष  आणि मोठे राजकारण म्हणजे एका राजपूताकडून इतर राजपूतांचा संहार करुन त्यांच्या स्रीया विधवा करणे. महाराणांना नामोहरण करण्यासाठी एक शूर राजपूत सरसेनापती त्यांच्या समोर उभा केला.अकबराची ही रणनीती, मुत्सद्दीपणा होता शिवाय त्याने नेहमीचे युध्दतंत्र वापरले नव्हते.शिवाय महाराणा च्या भेटी दरम्यान मानसिंहाचा झालेल्या अपमानाचा बदला घेऊन नेस्तनाबूत करेलच ही अटकळ मनी धरुन,बहुतेक कसलेले मोगल सेनापती सोबत दिल्या चा अकबराचा डाव मानसिंहाच्या लक्षात आला नाही.कारण हिंदु लोकांचा पिडच असा आहे की,तो समोरच्यावर पूर्ण विश्वास टाकतो.सर्वधर्म समभाव दाखवणारा अकबर बादशहा हिंदूंचा किती द्वेष करतो हे त्याने चितोडगडवर तीन हजार निरपराध हिंदूच्या केलेल्या कत्तलीवरुन दिसून येते.

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग – २९.

        इकडे शक्तिसिंह रात्रीचे भोजन आटोपून आपल्या दालनातील बिछान्या वर विचाराच्या आवर्तनात तळमळत होता.आपल्या मोठ्या भावाच्या पराक्रमा ने द्वेषग्रस्त होऊन,ते रानडुक्कर आपणच मारल्याचे खोटे कुभांड रचून भांडण उकरुन काढले.आपल्याकडून गुरुदेवांची हत्या झाली.महाराणासमोर प्रतिज्ञा करुन अकबरच्या गोटात आलो.प्रतिज्ञा कोणती तर आपल्याच सख्ख्या भावाला ठार करण्याची!आणि धूर्त,कपटी अकबर दुफळीचा फायदा घेऊन राजपूतांकडूनच राजपूतांचा काटा काढण्यासाठी मेवाडचा विध्वंश करण्याची मेवाड मोहिम काढली.

राजपूतांचे रक्त तर सांडेलच पण बेसावध दादाश्रीवर तो घाव घालेल.मेवाड वाचवलेच पाहिजे.महाराणा उदयसिंहाचा एक पुत्र मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी शीर तळहातावर घेऊन सर्व सुखोपोभोगाचा त्याग करुन झटतो…आणि दुसरा पुत्र मेवाडभूमीला गुलामगिलीत ढकलण्यास सहाय्यभूत होत आहे. नाही…नाही..मला कांही तरी केलेच पाहीजे.

       आणि त्याच्या मनांत एक विचार आला,सकाळची प्रातःर्विधी आटोपल्या वर,एका मातृभक्त,पण नाईलाजाने अकबरची चाकरी करावी लागत असलेल्या जालिमसिंह नांवाच्या राजपूत बोलावून,तो पूर्ण विश्वासपात्र आहे ही खात्री झाल्यावर गुप्तपणे अकबराकडून मेवाडवर होत असलेल्या आक्रमणाची गुप्तवार्ता महाराणा प्रतापसींहांना कळविण्याची जबाबदारी त्याचेवर सोपवली.माझ्यावर बादशहाच्या माणसां ची पाळत असल्यामुळे इथून हलू शकत नाही.पुज्य भाभीजी व चि.अमरसिंहाची खूप आठवण येतेय.माझ्याकडून घडलेल्या अपराधाबद्दल खूप पश्चाताप होत आहे हे ही माझ्या दादांना कळव. जालिमसिंह नमस्कार करुन कामगिरी वर निघून गेला.

        शक्तिसिंहाचा विश्वासू माणूस राणा प्रतापसिंहांना भेटल्यावर,आपल्या लहान भावाचे मन साफ,निर्मळ झालेले बघून त्यांना समाधान वाटले.आम्हीही पूर्ण तयारीत असून,आम्ही अकबरसमोर कधीच वाकणार नाही.काळजी करुं नये, स्वतःला सांभाळावे असा निरोप दिला.

        महाराणा प्रपापसिंह!मेवाडचे स्वातंत्र्यप्रेम,देशप्रेमाने भारावलेलं एक धगधगता तेजस्वी,आपल्या तेजाने आकाशमंडळ उजळून टाकणारा तारा होता.२८ फेब्रुवारी १५७२ ला प्रतापसिंह मेवाडच्या राजगादीवर विराजमान झाले, त्यावेळची स्थिती अतिशय प्रतिकुल होती विरोधात होती.समोर अनेक आव्हाने उभी होती.अकबर बादशहा सारखा सामर्थ्यवान प्रबळ शत्रू,केव्हाही हल्ला होऊ शकणार होता,त्यातच त्यांचे तीन बंधू अकबराला शरण गेलेले…तरीही महाराणा खचले नाही.त्यांचेपुढे दोनच विकल्प होते.एक..अकबरला शरण जाऊन त्याचे मांडलिकत्व स्विकारुन, त्याचे दरबारात कमरेत झुकुन कुर्निसात करणे,या मार्गाने गेले तर त्यांच्या सार्या अडचणी दूर होऊन राजवैभव भोगता आले असते.पण त्यांनी दुसरा अतिशय कठीण,क्लेशदायक व मोगलांशी कायम चे शत्रूत्व पत्करुन स्वातंत्र्यासाठी सतत संघर्ष करीत राहणे.मातृभूमीच्या आसक्तीस्तव,प्रेमाखातर हा विकल्प स्विकारला.

         उदयसिंहच्या हयातीत प्रतापसिंहां नी तीन पराक्रम गाजवले होते,त्यामुळे अल्पकाळात महाराणा लोकप्रिय झाले होते.त्यांचा पराक्रम,सोज्वळ वागणूक, नीतिमत्ता बघून,ग्वाल्हेर राजा रामसिंह तंवर,मारवाडचे चंद्रसेन राठोड,पालीचे मानसिंह सोनगरा,इडरचे नारायणदास राठोड आणि अफगाण पठाण हकीमखाॅं सूर हे येऊन मिळाले व शेवटपर्यंत साथ देण्याची शपथ घेतल्यामुळे प्रतापसिंहांची शक्ती वाढली.शिवाय आदिवासी भिल्ल राजा पुंजा ह्याचाही भरघोस पाठींबा मिळाला.वास्तविक युध्द करण्याची महाराणांची स्थिती व इच्छा नव्हती.तरी सुध्दा त्यांनी युध्दाची तयारी मात्र सुरु ठेवली होती.

        अकबरला पूर्ण जाणीव होती की, इतर राजांसारखे प्रतापसिंह कधीच झुकणार नाही.एक वीर मान तुकवत नव्हता,तर दुसरा अति धूर्त राजकारणी आपला हट्ट पुढे रेटत होता.प्रतापसिंहही कांही कमी राजनितिज्ञ नव्हते.शांतीदूत म्हणून आलेल्या प्रत्येकाची उत्तम बडदास्त ठेवीत,स्वतःला झोकून देत सुहास्य मुद्रेने स्वागत करीत दीड वर्षे अकबरला झुलवत ठेवले.दोघेही आपापल्या चाली खेळत एकमेकांना पारखत होते.एक साम्राज्य विस्तारासाठी तर दुसरा आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य आबाधीत राखण्यासाठी युध्दास सज्ज झाले होते.निर्णायक युध्द अटळ झाले होते.नियती कुणाला वश होते हे काळच ठरवणार होते.

                  क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  महाराणा प्रताप  !!!

भाग  -३०.

          युध्दाची तयारी चालू असतांना, एके दिवशी अकबरने आपल्या खास महाली राजा मानसिंहांना बोलावून म्हणाला,राजाजी युध्द अटळ आहे,कांही झाले तरी हे युध्द निर्णायक व्हायलाच हवे.जहाॅंपनाहांना शंकेचे कारण?कां मनी अविश्वास?नाही..नाही..तुम्ही तर आमच्या बेगमचे बंधू,आमचे मेहुणे, आमच्या रक्तबंधात अडकल्यामुळे शंकेचे कारणच नाही.आमची एकच इच्छा आहे होणार्या युध्दात महाराणा मारल्या न जातां,जिवंत काढण्या लावून,त्यांची खाली गेलेली मान बघायचे आमचे अनेक दिवसाचे स्वप्न आहे.

        जहाॅंपनाह!आपल्याला विजय मिळेल यात मुळीच शंका नाही,पण महाराणा जिवंत हाती सांपडेल ही ग्वाही नाही देऊ शकत.ते अरवली पर्वताचा चिवट,कणखर पाषाण बनलेले आहे. त्यांच्यावर हाती पडण्याची वेळच आली तर,ते आत्मबलिदान करतील.तरीसुध्दा त्यांची कोंडी करुन जिवंत पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करुच!मानसिंह अकबराचा निरोप घेऊन आपल्या महाली आले.सुवर्णमंचकावर विराजून विचारात हरवले.त्यांचे मन त्यांना टोचत होते.पिताश्री व आपण अकबरला शरणा गत होऊन फार मोठी चुक केली,त्या चुकीचे परिणाम संपूर्ण मेवाडप्रदेशाला भोगावे लागतील.एकप्रकारे देशद्रोह, गद्दारीच करत आहोत.मातृभूमीची सेवा करण्याऐवजी आपल्याच बांधवांचे रक्त सांडवणार आहोत.

        ते विचारांच्या आवर्तनात असतांना राणी यशोमतीने प्रवेश करीत म्हणाल्या, नाथ!प्रतापसिंहावरील मोहीम जाहीर झाल्यापासून,आपण खूप विचारात गढलेले व उदास दिसताहात,जेव्हा की  युध्दाचे सर्वेसर्वा व सरसेनापती पद भुषवताहात ही आनंददायक गोष्ट नाही का?आनंद ? आम्हाला पश्चाताप होतोय, पिताश्रींनी अकबरचे मांडलिकत्व स्विकारल्याने आम्हालाही त्यांच्या पावला वर पाऊल  टाकावे लागले.नाथ! आतां पश्चाताप करुन काय उपयोग?एका चुकी च्या पावलाने पुढील हजारो पावले चुकत जातात.अशीच कांहीशी परिस्थिती अकबर दरबारी मांडलिकत्व स्विकारले ल्या राजपूत राजांची झाली आहे.स्वतःचे स्वत्व,स्वातंत्र्य हरवून अकबरच्या ताला वर झुलावे लागत आहे.जाहीर झालेल्या युध्दात दोन्ही बाजूंनी राजपूत सैन्य लढतील आणि राजपूतच मरतील.विजय मात्र अकबर बादशहाचा होईल.

         हळू बोला,भिंतीला कान असतात. म्हणजे आपल्याच घरांत बोलायचीही चोरी?राजा म्हणून मिरवत असलेले हे राजापण बेगडी दिखाऊच ना? उलट महाराणा प्रतापसिंह सर्व भोगाचा त्याग करुन,सामान्य मानसाचे जीवन जगून मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी युध्दात उतरणार आणि तुम्ही त्यांना पारतंत्र्यांत ढकलून देणार?

         राणीसा!आम्ही विवश आहोत. आम्ही खुद्द या गुलामगिरीच्या चिखलात रुतुन बसलोय!नाही…नाथ!अजुनही तुम्ही आपल्या मातृभूमीसाठी कांही करुं शकता.कछवाह राजवंशावर जी मांडलिकत्वाची  मोहोर लागली ती तरी पुसल्या जाईल.स्वातंत्र्याशी हातमिळव णी करुन जे महाराणा,उदयपूरला तुमच्या पक्तीस बसले नव्हते,तो मान घेऊ शकता.तुम्ही फक्त महाराणांशी संधान बांधा आणि इतिहासात नांव अजरामर करा!

         पण आम्ही अकबर बादशहाचे मीठ खाल्ले.कुणाचे? बादशहाचे?ते मीठ त्याने इराणमधून नाही आणलेले.याच देशाचे,याच भूमीचे मीठ तो चाखत आहे आणि आपल्या आप्त-स्वकियांना चाखवून स्वतःला हिंदूस्थानचा सम्राट म्हणून गौरवून घेत आहे.दिल्लीचे तख्त पृथ्वीराज चव्हानचेच होते ना? ह्या आक्रमकांनी पाठीत खंजीर खुपसून हडप केले,मग मीठाचा प्रश्न कसा येतो? नाथ!स्वाभिमान जागवा.अजूनही वेळ गेलेली नाही.विचार करा नाथ…विचार करा…ज्याप्रमाणे रावणाचे मतपरिवर्तन करण्यासाठी अखेरपर्यंत मंदोदरी धडपड ली पण त्याने ऐकले नाही व सर्वनाश ओढवून घेतला,तीच परिस्थिती आताही नाही कां?राणी यशोमतीने त्यांचे अनेक प्रकारे मन वळविण्याचा प्रयत्न केला,पण गंगेतील गुळगुळीत गोटा कोरडा शुष्कच, पाणी वरुनच वाहून गेले.यशोमती निराश व दुःखी अंतःकरणाने आपल्या दालनी परतली.

              क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

                         

महाराणा प्रताप संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading