काश्मीर राज्यात वाग्देवी सरस्वतीचे सुप्रसिद्ध मंदिर होते. तेथे सर्वज्ञपीठ होते. जो सर्वज्ञ असेल त्यालाच या पीठावर बसण्याचा अधिकार होता. ह्या मंदिराला चार दिशांना चार द्वारे होती. त्याच्या सभोवार पाय-या होत्या. त्या चढून गेल्यावर तेथे सिंहासन होते, त्यावर साक्षात सरस्वती देवी आरूढ होती. त्यामुळे या सिंहासनावर आरोहण करणा-याला ‘सर्वज्ञ’समजले जात होते. या पीठाची पूर्व,पश्चिम व उत्तरे कडील द्वारे काही विद्वत्तमांनी आधीच उघडली होती,
परंतु पीठाचे दक्षिण द्वार अद्याप बंदच होते कारण या द्वारावरील पंडितांना शास्त्रार्था मधे कोणीही हरवू शकले नव्हते. आचार्य दक्षिण द्वारापाशी पोहोचले अनेक विद्वानांनी आचार्यांबरोबर शास्त्रार्थ केला.
आचार्यांनी सर्वांचा पराभव करून दक्षिण
द्वार उघडले. आचार्य शांतपणे सिंहासनावर आरुढ होण्यासाठी पाय-या चढू लागले एव्हढ्यात तेथे सरस्वती प्रगटली आणि म्हणाली,” संन्याश्यासाठी स्त्री स्पर्श वर्ज असतो. तू परकाया प्रवेश करून राजा अमरकाच्या शरीरात निवास केला होता. त्यामुळे तू येथे आसनस्थ होऊ
शकत नाही “आचार्य म्हणाले,”माते मी त्या
शरिरात असुनही व्रती होतो. कामशास्त्राचे
लेखन केले पण अनुभव घेतला नाही. मी
काया,वाचा,मनाने शुद्धच आहे”.हे बोलणे
ऐकून सरस्वती अंतर्धान पावली. आचार्य
सर्वज्ञपीठावर आरूढ झाले. त्यांच्या
जयजयकाराने आसमंत निनादला.
आचार्य तेथुन हिमालयाच्या कुशीत असलेल्या नेपाळ राज्यात आले. तेथे बौद्धांचे प्राबल्य होते. पशुपतिनाथाला विधीवत अभिषेक करुन पुजा केली.शंकराचार्य आले आहेत, हे कळताच सर्व बौद्ध आचार्यांमध्ये खळबळ माजली. काहींनी पलायन केले, काही पराभूत झाले. नेपाळ बौद्धमुक्त झाला.
आचार्यांनी पशुपतीनाथ मंदिराचा जिर्णोद्धार करून विद्वान ब्राह्मण नियुक्त केला. तेथून आचार्य बदरिकाश्रमी
गौडपादाचार्यांना भेटण्यासाठी गेले. भेटी नंतर आचार्य अधिकाधिक अंतर्मुख झाले व ध्यानमग्न राहू लागले. स्वशरीराकडे त्यांचे लक्ष नसे. चित्सुख,पद्मपाद ,सुरेश्वर, हस्तमलक,तोटक,माधवादी शिष्यांना हे समजून चुकले हा देहत्यागाचा आरंभ आहे. आचार्यांनी सर्व शिष्यांसह व्यास गुहेचे दर्शन घेतले. या स्थानीच व्यास
महर्षींनी एक लक्ष श्लोकांच्या महाभारत
ग्रंथाची रचना केली होती.त्या कामात त्यांना गणेश देवता आणि सरस्वतीने सहाय्य केले होते. व्यासगुहेला प्रणाम करून आचार्य निवासस्थानी आले व आत्मानंदी लीन झाले. काही समयानंतर आचार्यांनी सर्वशिष्यांना सांगितले माझ्या प्रस्थानाचा काळ जवळ आला आहे.
केदारनाथहे माझे अंतिम स्थान असेल. तुम्ही शोक करू नका. दुस-या दिवशी सर्व शिष्यांना घेऊन आचार्य केदारनाथांच्या मंदिरात आले. सर्वांना आशिर्वाद दिला,शिष्यांनी त्यांना अंतिम प्रणाम केला. आचार्य भावावस्थेत शिवलिंगाजवळ आले. एखाद्या गृहाचे दार उघडून त्यात शिरावे तसे ते शिवलिंगात सदेह विलीन झाले. गर्भगृहातून गंभीर शब्द येत होते……..
” न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष।
श्चिदानन्दरूपः शि$वोहम् शि$वोहम् ।।
*
आचार्यांची अद्भुत ग्रंथ संपदा :- आचार्यांची विपुल ग्रंथ संपदाअसुन,
चार भागात विभागात येते.
1) भाष्य ग्रंथ:-
व्यासांच्या ब्रह्म सूत्रावर,
भगवत गीता,
उपनिषदांतील भाष्य,
ललितात्रिशती मांडूक्यकारिका,
विष्णुसहस्रनाम भाष्य.
2) स्तोत्र ग्रंथ:–
आनंदलहरी,गोविंदाष्टक,
दक्षिणामूर्ती स्तोत्र,
दशश्लोकी,हरिमीडे,
देवीभुजंग स्तोत्र,
नर्मदाष्टक,
श्रीकृष्णाष्टक,
3) प्रकरण ग्रंथ:-
विवेक चूडामणि,
आत्म-बोध,
तत्वबोध,
वाक्यसुधा,
तत्वोपदेश,
विवेकचूडामणि :-
हा वैदिक ग्रंथ असून
यात एकूण 681 श्लोकरचनेद्वारे एकूण
75 विषयांवर ऊहापोह करण्यात आला.
स्मृती प्रस्थान:- भगवद् गीतेवर विवेचन.
न्याय प्रस्थान:– वेदव्यासांच्या ब्रह्म सूत्रांवर भाष्य.
प्रकरण ग्रंथ:– एकूण 9 प्रकरणांवर भाष्य सौंदर्य लहरी:- हे स्तोत्र शंभर श्लोकांचे असून,हे खंडकाव्य फार प्रसिद्ध आहे. तंत्रातील सौंदर्य व मंत्रांची लोकोपयोगिता यांचा सुंदर संगम आहे.
मनोगत:-
अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्व-शास्त्रविद।
षोडसे कृतवान भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात्।।
अवघ्या 32 वर्षात श्रीमद् जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी “हिंदू धर्माचे पुनरुत्थान करून यदा यदाही धर्मस्य ” ही उक्ती सार्थ केली.
आचार्यांच्या या अलौकिक व अद्भुत जीवन चरित्रावर सलग सहा भागात लेखन करणे म्हणजे पणतीने सूर्याला प्रकाश दाखविण्यासारखे आहे. या अथांग ज्ञानरूपी महासागरातून माझ्या ओंजळीत
मावेल एवढेच ज्ञानकण घेऊन ‘दीपासी दीप लाविजे ‘या प्रमाणे आत्मतत्व प्रकाशमान करण्याचा प्रयत्न आचार्यांच्या
जयंती निमित्ताने केलेला आहे. त्याची
प्रेरणा आचार्यांनीच दिली असावी म्हणून, ही सेवा त्यांच्या चरणी रूजू करतो. श्री गुरुदेव दत्त.
क्रमशः
संतोष म्हैसाळकर
9869483930
