आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग २

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


शंकर देवीच्या मंदिरातून बाहेर आल्यावर मातेने विचारलं, “तू कोणाशी बोलत होतास?” ” देवीशी”,शंकर उत्तरला….मातेचा विश्वासच बसेना. दुसर्या दिवशी सकाळी मातेला घेऊन शंकर मंदिरात आला,भगवती देवीची करूणा भाकली,आणी म्हणाला ,”हे देवी मी कधीच खोटं बोलत नाही पण मातेचा विश्वास बसत नाही, तेव्हा तू आता तिला दर्शन देऊन सत्य काय ते सांग”. देवीचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर मातेला खूप आनंद झाला व खात्रीच पटली आपला पूत्र असामान्य आहे,परंतु चार विद्वानांनी शंकराची पत्रिका बघून वर्तविलेले भविष्य,’ शंकराला वयाच्या आठव्या,सोळाव्या,व बत्तीसाव्या वर्षी मृत्युयोग संभवतो’याचे स्मरण होऊन थोडी दुःखीपण झाली. शिवगुरूंना सर्व वृत्तांत समजल्यावर खूप आनंद झाला. त्यांनी मनोमन ठरविले पाचव्याच वर्षी शंकराची मौंज करावी व त्याला गुरुकुलात पाठवून द्यावे. परंतु विधात्याची योजना वेगळीच असते.शिवगुरू अचानक शिवचरणी विलीन झाले व आर्यांबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातून सावरून पतीच्या इच्छेनुसार शंकर पाच वर्षांचा होताच विधीवत आपल्या मुलाची मौंज केली व त्याला गुरुकुलात पाठविले.


गुरुकुलातील अध्ययन:- गुरूकुलातील आचार्यांना शंकराने प्रणाम केला.त्यांच्या कानी त्याचे अद्भुततत्व आले होते,आचार्य शंकराला अहर्निश शिकवू लागले व बाल शंकर झपाटल्यासारखं सर्व ज्ञान आत्मसात करू लागला. केवळ दोन वर्षातच तो वेद,उपनिषदे, इतिहास, धर्मशास्र,न्याय, सांख्यक, पातंजल,वैशेषिक,बौद्ध व जैन मतानुवाद आदी शिकला. गुरूकुलातील परंपरेनुसार सर्व विद्यार्थी रोज भिक्षेसाठी जात असत.एके दिवशी,हा तेजःपुंज ब्रह्मचारी भिक्षेसाठी गेला असता, एक निष्कांचन अवस्थेतील ब्राह्मण स्त्री बाहेर आली, तिच्या घरी अन्नधान्यांचा कणही नव्हता. तिने आचार्यांची क्षमा मागून आपली असमर्थता प्रगट केली व एक सुकलेला आवळा भिक्षा म्हणून अर्पण केला. त्यावेळी बाल शंकर सात वर्षांचे होते, त्यांचे मन द्रवले व त्याने शीघ्रकवित्वाने ‘कनकधारा’ हे लक्ष्मीस्तुती स्तोत्र रचले ते म्हणताच साक्षात लक्ष्मी प्रगटली व प्रसन्न होऊन तिने त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरी सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव केला.

या प्रसंगामुळे त्या गावाचे आधीचे नांव बदलून कनकांबा पडले.सर्व वृत्तांत ऐकून आचार्यांना शंकराचे खूपच कौतुक वाटले व या असामान्य विद्यार्थ्याला शिकवण्यासारखे काही शिल्लक न राहिल्यामुळे जड अंतःकरणाने त्यांनी शंकराला घरी जाण्याची अनुमती दिली.साधारणपणे गुरुकुलातील ज्ञान आत्मसात करण्यासाठी सामान्य विद्यार्थ्यांना 18 वर्षं लागतात ते ज्ञान केवळ दोन वर्षातच आत्मसात करून आचार्यांना वंदन करुन शंकर सातव्या वर्षी स्वगृही परतले व त्यांनी अध्ययनाचे कार्य सुरू केले.त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली व अनेक विद्वान त्यांच्याकडे श॔का निरसनासाठी येऊ लागले. केरळचे राजे राजशेखर स्वतः शंकराच्या दर्शनासाठी आले व नमस्कार केला असता उत्तम गुणी पुत्र होईल असा आशीर्वाद राजाला दिला.नरेश म्हणाले ,”स्वामी मी निपुत्रीक आहे,”शंकर म्हणाले ,”माझा आशिर्वाद व्यर्थ जाणार नाही.

” कालांतराने शंकराचार्यांनी राजशेखर यांच्या तीन संस्कृत नाटकांचे,पुनर्लेखन करून दिले होते,जी आचार्यांनी वाचली होती, व राजशेखर यांच्या विस्मृतीत गेली होती.
आर्यांबा नित्यनेमाने सुर्योदयापूर्वी पूर्णा नदीत स्नान करून आराध्य दैवत श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन घरी येत असे. एकदा ती उष्माघाताने बेशुद्ध पडली शंकराने तिला घरी आणले. त्यानंतर शंकर पूर्णेच्या काठावर गेले,तिला प्रणाम करून तिची स्तुती केली ,पायाच्या अंगठ्याने पूर्णेच्या काठावर दाब देऊन एक रेखा काढलीआणि काय आश्चर्य पूर्णेने आपला प्रवाह बदलला पूर्णा शंकराच्या घराजवळून दुथडी वाहू लागली. हा चमत्कार बघून सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले. आर्यांबाला मनोमन कळून चुकले हे काम शंकराचेच आहे. अश्या या मातृभक्त शंकराला आठवे वर्षं लागले तेव्हा आर्यांबा त्याला जीवापाड जपू लागली.


संन्यासाश्रम;- वयाच्या आठव्या वर्षीचा मृत्यूयोग तपश्चर्येने,सोळाव्या वर्षीचा दैवयोगामुळे टळेल हे निश्चित परंतु बत्तीसाव्या वर्षीचा मृत्यूयोग कशानेही टळणार नाही असे शंकराची पत्रिका बघून ज्योतिषाने वर्तवले होते. आठव्या वर्षी संन्यास धर्म स्वीकारण्याची अनुमती मातेने नाकारली.मातेची अनुमती मिळवण्यासाठी एके दिवशी पूर्णेत स्नान करीत असतांना शंकराला मगर दिसली, त्यांनी योगबलाने मगरीला आपला उजवा पाय पकडण्याची प्रेरणा दिली व मातेकडून आतूर संन्यास घेण्याची अनुमती मिळविली. संन्यास घेण्यापूर्वी पूर्णा तिरावर श्रीकृष्णाचे मंदिर नव्याने बांधायाला घेतले.मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर जेव्हां शंकर श्रीकृष्णाच्या मूर्ती समोर उभे राहिले तेव्हा भावविभोर होऊन त्यांच्या मुखातून वयाच्या आठव्या वर्षी श्रीकृष्णाची स्तुती करणारे अच्युताष्टक रचले,’अच्युतं केशवं राम नारायणं।कृष्ण दामोदरं वासुदेवं हरी।’


मातेची समजूत काढून, तुझ्या अंतःकाळी स्मरण करताच मी योगबलाने येईन, तुला इष्ट देवतांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून आणीन. तुझा अंतिम संस्कार स्वहस्ते करीन असें सांगून प्रथम शिष्योत्तम विष्णुशर्मा जो वयाने मोठा होता,त्याला सोबत घेऊन, मातेला प्रणाम करून,योग्य गुरूंच्या शोधार्थ कालटी ग्रामातून बाहेर पडले. एका रात्री धर्मशाळेत शंकराला दृष्टांत झाला,येथून जवळ नर्मदातटी ओंकारेश्वराचे स्थान आहे. तेथे गोविंद पादाचार्य,गौड पादांचे शिष्य असुन तुझे गुरू होण्यास सर्वथैव लायक आहेत.
गोविंद पादाचार्य:- शंकर ओंकारेश्वर येथे पोहोचले तेव्हा गोविंद पादाचार्य एका गुहेत समाधिष्ट होते,शंकराने हात जोडून आचार्यांची स्तुती केली. गोविंद पादाचार्य समाधितून जागे झाले,बघतात तो समोर तेजस्वी बालक उभा होता. गोविंद पादांनी शंकराच्या डोक्यावर हात ठेऊन विचारले,”कोठून आलास?” ह्या पृच्छेवर शंकराने,”आत्मपंचक व दशश्लोकाद्वारे” उत्तर दिले.

शंकराचे शिघ्रकवित्व पाहून गोविंदपादांना खूप आनंद झाला.एका शुभदिनी त्यांनी शंकराला आनुष्ठानिक संन्यास देऊन त्यांचे नांव,”शंकर भगवत्पादाचार्य ठेवले. शंकराचार्यांनी अवघ्या तीन वर्षात,हठयोग,राजयोग,व ज्ञानयोगाचे शिक्षण पूर्ण केले,ज्यायोगे त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. ऐके दिवशी पावसाळ्यात नर्मदा नदीला प्रचंड पूर आला, नर्मदेच पाणी गुहेपर्यंत आले,त्यावेळी गोविंद पादाचार्य समाधिष्ट होते. सर्व शिष्य भयभीत झाले,आपल्या गुरुंना आता जलसमाधी मिळणार असे भय त्यांना वाटू लागले. शंकराचार्यांनी शांतपणे नर्मदेची स्तुती केली व त्यांचा कम॔डलू गुहेच्या दारात ठेवला,आणी अघटित घडले नर्मदेचं पाणी कम॔डलूत शिरून लुप्त होउ लागले. शिष्यांनी हा चमत्कार गोविंदपादांना सांगितला तेव्हा त्यांना शंकराचे अपार कौतूक वाटले.
क्रमशः
संतोष म्हैसाळकर
9869483930

श्रीमद् आद्य शंकराचार्य संपूर्ण साहित्य

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading