गोविंद पादाचार्य यांनी, शंकराचार्यांनी सर्वज्ञान आत्मसात केल्यानंतर त्यांना निरोप देऊन प्रस्थानत्रयींवर भाष्य करण्याची सुचना केली व काशीला पाठविले. विष्णुशर्माला सोबत घेऊन शंकराचार्यांनी काशीला प्रस्थान केले, जातांना आधी ते बद्रिकाश्रमी आपल्या परमगुरूंना, गौडपादाचार्यांना भेटण्यासाठी गेले, तेथे काही दिवस राहून ज्ञानामृत प्राशन करून काशीकडे प्रयाण केले. काशीला पोहोचेपर्यंत त्यांनी शतश्लोकीची रचना पूर्ण केली. काशीक्षेत्री आल्यानंतर त्यांनी आपला प्रथम शिष्य विष्णुशर्माला विधीवत दिक्षा देऊन त्याचे नांव” चित्सुखाचार्य” ठेवले. काशीत असतांना त्यांनी “काशीपंचक” रचले,
“काश्या हि काश्यते काशी,काशी सर्व
प्रकाशीका”। ….काशी म्हणजे आत्मा, तो काशीतच प्रकाशतो, त्यामुळेच काशी सर्व विश्वावर प्रकाश टाकते. काशीमध्ये आचार्यांच्या प्रतिभेला विलक्षण बहर
आला. त्यांनी “मणिकार्कीकाष्टक”,”द्वादश
ज्योतिर्लींग स्तोत्र”,”अन्नपूर्णाष्टक,” “कालभैरवाष्टक”आदि स्तोत्रांची रचना केली. तसेच वयाच्या पंधराव्या वर्षी ब्रह्मसुत्रावरील व मुख्य उपनिषदांतील भाष्य पूर्ण केले.
एकदा आचार्य चित्सुखाचार्य यांच्या सोबत, काशीला गंगेच्या किना-यावर उभे होते. पलिकडच्या किना-यावर त्यांना सनंदन उभा असलेला दिसला. आचार्य म्हणाले आज याची परीक्षा घेऊया. त्यांनी सनंदनला आवाज देऊन आपल्याकडे येण्यास सांगितले. गंगेच्या पाण्याला प्रचंड वेग होता, त्याची पर्वा न करता सनंदनने प्रवाहात पाय टाकला आणि आश्चर्य घडले त्याच्या प्रत्येक पावलाखाली”कमलदल” उभे राहिले व ते क्षणार्धात आचार्यांजवळ येऊन पोहोचले.” ये पद्मपादा”असे म्हणून आचार्यांनी त्याचे स्वागत केले व त्याला विधीवत दिक्षा देऊन त्यांचे नाव “पद्मपादाचार्य”
ठेवले. पद्मपादाचार्य जवळच्या एका पर्वतावर ध्यानधारणेसाठी जात असत. एकदा त्यांना नृसिंहानी दर्शन दिले व त्यांना वर मागण्यास सांगितले असता, “जेव्हा मी आपले स्मरण करीन तेव्हा मला आपले रूप प्राप्त होवो” असा वर मागितला, नृसिंह “तथास्तु” म्हणाले व हे फक्त एकदाच घडेल असे सांगुन अंतर्धान पावले. एकदा वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन व्यासमुनिंनी शंकराचार्यांना शास्त्रार्थाचे आव्हान दिले. हा शास्त्रार्थ अनेक दिवस चालू होता. पद्मपादाचार्य पहिल्या दिवसापासून सर्व अवलोकन करीत होते, ते बघून वृद्ध ब्राह्मणाने त्यांना विचारले,”काय रे ,तुझे येथे काय काम?” त्यावर पद्मपादांनी उत्तर दिले की
“एका बाजूला शिवावतार म्हणजे माझे आचार्य आणि दुस-या बाजूला प्रत्यक्ष कृष्णद्वैपायन बसले असतांना श्रवणाखेरीज मी कोणते काम करणार?”
हे ऐकताच व्यासांनी मूळ स्वरूप धारण केले. शंकराचार्यांनी त्यांना प्रणाम केला. “विजयी भव!वत्सा,तुला ब-याच ठिकाणी वादचर्चा, आणि शास्त्रार्थ करायचे आहेत.
या सर्वात तू विजयी होशील अशी माझी खात्री आहे, “असा आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले. त्यांच्या आशीर्वादामुळे शंकराचार्यांनाही खूप बळ मिळाले. एकदा
प्रयागस्थानी असलेल्या प्रभाकर या कट्टर मिमांसकाला शंकराचार्यांनी पराभूत केले. त्यावेळी त्यांचा आठ वर्षांचा मुलगा पूर्वाश्रमीचा योगी असुन तळहातावरच्या
फोडाप्रमाणे तो विश्व पाहतो हे आचार्यांच्या लक्षात आले.त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवताच बारा श्लोकात त्याने आचार्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
आचार्यांनी त्याला दिक्षा देऊन त्याचे नांव
“हस्तमलकाचार्य” ठेवले. कुमारिल भट्टांसोबत शास्त्रार्थ करण्यासाठी शंकराचार्य शिष्यांसह पोहोचले
असता ते तृषाग्नी पेटवून देह त्याग करतांना दिसले.शंकराचार्यांना त्यांनी त्यांचा शिष्य”मंडनमिश्रा”यांचेकडे शास्त्रार्थासाठी जाण्यास सांगितले. शंकराचार्य आपल्या शिष्यांसह महिष्मती नगरीकडे जाण्यास निघाले.
मंडनमिश्रा आणि शंकराचार्य -शास्त्रार्थ: –
मंडनांनी आचार्यांना आगमनाचा हेतू विचारला. आचार्य म्हणाले,”अद्वैत मताची पुनःस्थापना करण्याचे ईश्वरी कार्य मी करीत आहे, त्या कार्यात तुम्ही सहाय्यभूत व्हावे. तुम्ही द्वैत मताचे पुरस्कर्ते असल्यामुळे आपला उभयतांचा वाद व्हावा व वादात जो हरेल त्याने दुस-याचे शिष्यत्व स्वीकारावे”.याबाबत दोघांचे एकमत होऊन मंडनमिश्रांची पत्नी,जी साक्षात” सरस्वती देवी ” होती, ती निर्णेती म्हणून कार्य करेल असे ठरले. सरस्वतीने दोघांच्याही गळ्यात पुष्पमाला घातल्या व सांगितले, ज्याच्या गळ्यातील माला आधी कोमेजेल तो पराभूत होईल, मी स्वमुखाने निर्णय देणार नाही असे स्पष्ट केले. अशारितीने उभयतात वादचर्चेला
सुरवात झाली. जवळजवळ 21 दिवस
वाद चालला होता, त्यात मंडनमिश्रांचा
पराभव झाला. मंडनमिश्रांची पत्नी जी
साक्षात सरस्वती देवी होती तिने, मी मंडनमिश्रांची अर्धांगीनी असल्यामुळे माझा पराभव झाल्याशिवाय मंडनमिश्रांचा’पूर्ण पराभव होणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे शंकराचार्य आणि सरस्वती देवी यांच्यामध्ये पुनश्च वादचर्चा सुरू झाली .ही चर्चा खूप दिवस चालली होती, सरस्वतीची सूक्ष्म विचारशक्ती आणि धर्मशास्त्राचा असलेला गाढा अभ्यास पाहून कित्येकांना आश्चर्य वाटले. आपला पराभव समोर दिसू लागताच सरस्वतीने वेगळाच पवित्रा घेतला आणि आचार्यांना कामशास्त्रावरील प्रश्न विचारण्यास सुरवात केली. शंकराचार्यांनी तिच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी मागून घेतला. अमृतपूर नगरीचा राजा”अमरिक”याच्या मृत शरीरात” परकाया प्रवेश” करून आचार्यांनी कामशास्त्रावरील निबंध ग्रंथ लिहून सरस्वतीकडे सुपूर्त केला. सरस्वतीचे कार्य संपल्यामुळे ती अंतर्धान पावली. शंकराचार्यांनी मंडनमिश्रांना विधीवत दिक्षा देऊन त्यांचे नामकरण “सुरेश्वराचार्य”असे केले .आचार्य शीघ्रकवी असल्यामुळे त्यांनी लगेच त्यांना”तत्वोपदेश” केला व तेथून पुढे द्वारकेला प्रस्थान केले.
क्रमशः
संतोष म्हैसाळकर
9869483930
