आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग ४

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

द्वारकेच्या आसमंतात वैष्णवपंथी होते. भट्टपादाच्या मृत्यूमुळे जैन सक्रिय झाले होते. शंकराचार्यांनी जैनाचार्यांशी वादविवाद करून त्यांना पराभूत केले. हिमालयातील देवप्रयाग,नंदप्रयाग,कर्णप्रयाग,रूद्रप्रयाग आणि विष्णूप्रयागाचे दर्शन घेऊन आचार्य श्रीनगरी आले. त्या नगरीत तांत्रिकांचे प्राबल्य वाढले होते. आचार्यांनी तांत्रिकांचा पराभव केला. आचार्यांच्या कानावर मातेची करूण साद आली. आचार्य योगबलाने तात्काळ कालटीला पोहोचले,” माते मी आलो आहे .” आवाज ओळखून थरथरत्या शरीराने आर्यांबा उठली, “तू सांगितल्याप्रमाणे आलास! आता मृत्यूपूर्वी शांतपणे तुझ्या मांडीवर डोके ठेवण्याची इच्छा आहे”.शंकराचार्यांनी मातेचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले. आर्यांबा भरभरुन बोलत होती. शंकराच्या लहानपणापासूनच्या सर्व प्रसंगांची उजळणी झाली. आचार्यांनी मातेला सांगितले, “माते! तू नेत्र बंद कर.

समोर केशवाची मूर्ती आण. या विश्वाचा स्वामी असलेला श्रीकृष्ण तुला दिसो”. तीव्र प्रकाश पडला, आर्यांबाने हळूहळू नेत्र उघडले, त्या प्रकाशात तिला निळा सावळा रंग,चतुर्भुज मूर्ती,झळळता पितांबर नेसलेला,शिरोभागी मोरपिसाचा मुकुट घातलेल्या श्रीकृष्णाचे दर्शन झाले, ती आनंदाने भारून गेली आणि शांतपणे श्रीकृष्णचरणी विलीन झाली. आचार्यांनी अग्निशर्माच्या सहाय्याने ब्रह्मवृंदांच्या विरोधाला न जुमानता मंत्रोपचार करून, मातेच्या शवाला, गृहाच्या मागीलद्वारी योगबलाने अग्नि निर्माण करून अग्निसंस्कार केले. अग्निशर्माची बदरीनारायणाचा मुख्य पुजारी म्हणून व्यवस्था करून, आचार्यांनी अद्वैत मताचे पुनरूत्थान करण्यासाठी प्रस्थान केले. कालांतराने ‘विधिनिषेधात्मक’ नियमांचा ग्रंथ आकारास येऊ लागला. त्या ग्रंथाचे नांव ‘शांकरस्मृती’असे ठेवण्यात आले. आचार्यांनी तो ग्रंथ केरळचे राजे राजशेखर यांच्याकडेे पाठविला. त्याने धर्मसभा बोलावली,आचार्यांना निमंत्रण पाठविले. विद्वान धर्माचार्यांसमोर त्याचे वाचन करण्यात आले.

शांकरस्मृतीच्या चौसष्ट नियमांवर ऊहापोह झाला. आचार्य सर्व प्रश्नांची शांतपणे उत्तरे देत होते. त्यांची शांतवृत्ती पाहून धर्माचार्य खवळले. त्यांनी कोलाहल माजवला व धूर्तपणा करुन आचार्यांना कोंडीत पकडण्यासाठी एकाच दिवशी एकाचवेळी, दोन ठिकाणी आचार्यांना धर्मसभेसाठी बोलावले. धर्मसभा राजधानीतील शिवमंदिरात आणि कालटी येथे ठेवण्यात आली होती. आचार्य एकाच वेळी दोन्ही ठिकाणी विजयी झाले. त्यांना असंख्य अनुयायी मिळाले. आपले गुरू गोविंदपादांचा अंतिम समय जवळ आला आहे, हा गौडपादाचार्यांचा मानसिक संदेश मिळताच ,योगबलाने आचार्य त्वरीत तेथे पोहोचले, त्यांना बघून गोविंदपादांना हर्ष झाला. सर्व शिष्यांना जवळ बोलावून त्यांनी शेवटचा उपदेश केला,”माझ्या पश्चात शंकराला गुरू माना”, असे सांगून परमेश्वराचे स्मरण करून त्यांनी देह ठेवला.

संन्यासधर्मानुसार त्यांचे शव नर्मदा नदीत सोडून देण्यात आले. ओंकारेश्वर
येथून आचार्य प्रयागस्थानी आले. प्रयाग हे प्राचीन नगर संगमासाठी प्रख्यात होते. गंगा,यमुना व गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा येथे संगम आहे. आचार्यांना येथे अनेक अनुयायी मिळाले. एकदा आचार्यांना एक तरूण कुष्ठरोगी गळ्यात दोर अडकवून आत्महत्या करतांना दिसला . आचार्यांनी
त्याला थांबवले,त्याच्या सर्वांगावरून प्रेमाने हात फिरवतांच त्याचे शरीर चमकू
लागले.”आचार्य मला दीक्षा द्या. ” त्या युवकाने विनंती केली. आचार्यांनी दीक्षा देऊन त्याचे नांव ‘उदंकाचार्य’ असे ठेवले. आचार्य प्रयाग क्षेत्रावरून चालुक्य राज्यात आले, तेथे अद्वैत मताची ध्वजा फडकवून
पंचवटीत आले ,तेथे काही काळ वास्तव्य करून,पंढरपूर क्षेत्री आले. तिथे पांडुरंगासमोर उभे राहिले. पाहता पाहता त्यांच्या मुखातून ‘पांडुरकाष्टक’बाहेर पडू लागले. मग आचार्य श्रीशैल्य क्षेत्री आले. त्या स्थानी शाक्त ,कापालिकादी,वीराचारी वगैरे पंथ होते. हे सर्वजण शास्त्रार्थ करण्यासाठी येत,पण पद्मपाद,सुरेश्वराचार्यांपुढे पराजित होऊन परत जात असत. आचार्यांवर मात
करण्यासाठी कापालिकांची बैठक झाली.


उग्रभैरवाने सर्व जबाबदारी घेतली. गोड
बोलून आचार्यांकडून शिष्यत्व मिळविले.
त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना होमाग्नीत आपली आहुती देण्यासाठी तयार केले. निबीड अशा जंगलात होमाची सर्व सिद्धता झाली. मध्यरात्री आचार्यांना
घेऊन भैरवनाथ नियोजित स्थानी आला. आचार्यांनी सांगितले, “तुझी सर्व तयारी होईपर्यंत मी समाधी लाऊन घेतो.” आचार्यांनी आपल्या सर्व शिष्यांचे स्मरण
करायला सुरवात केली,पद्मपादांचे स्मरण
करताच ते ऊठून बसले,आचार्य दिसेना
त्यांनी समाधिस्थ होऊन शोध घेतला, तेव्हा
त्यांना भैरवनाथाचं कारस्थान लक्षात आलं. त्याक्षणी
त्यांना नृसिंहांनी दिलेल्या वराचे स्मरण झाले. त्यांनी नृसिंहाचे स्मरण करताच
पद्मपाद ….’.पद्मपाद ‘राहिले नाहीत. ते
नृसिंह झाले होते. त्यांनी मोठी गर्जना केली. आयाळयुक्त नृसिंहरूप व तेज पाहून अनेक शिष्य मूर्च्छित पडले.

नृसिंह
वेगाने अरण्यात शिरले. आचार्य नेत्र मिटून
बसले होते. उग्रभैरवाने परशू उचलला…..
तो खाली येणार इतक्यात नृसिंहाची उडी
त्याच्यावर पडली. त्याने उग्रभैरवाला मांडीवर घेऊन फाडून टाकले.ते भयानक दृश्य बघून लपलेले कपालीक पळू लागले .
त्यांच्यामागे धावून अनेकांना नृसिंहांनी ठार केले. ते परमेश्वर रूप पाहून आचार्यांचे मन भरून आले. त्यांनी ईशस्तवन करण्यास सुरुवात केली. प्रार्थना ऐकून नृसिंह शांत झाले. त्यांनी आशिर्वाद दिला. ते गुप्त झाले आणि पद्मपादाचार्य मूर्च्छित होऊन धाडकन भूमीवर पडले.त्यांना घेऊन सर्वजण मुक्कामी
पोहोचले, त्यांच्य मुखावर जल सिंचन करून,त्यांना शुद्धीवरआणले. ते आचार्यांना पाहून आनंदित झाले. आचार्यांचे चरण धरून रडू लागले. तेव्हा सुरेश्वराचार्य पुढे झाले, “पद्मपादा ,आज
तुझ्यामुळे आचार्यांचे प्राण वाचले,तू धन्य आहेस. श्रेष्ठ आहेस ,”असे ते म्हणाले.
क्रमशः
संतोष म्हैसाळकर
9869483930

श्रीमद् आद्य शंकराचार्य संपूर्ण साहित्य

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading