संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा २०१ ते २०५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

श्यामाची श्याम सेजवरी करी परवस्तुसी भेटी अभंग क्र.२०१

श्यामाची श्याम सेजवरी करी परवस्तुसी भेटी । ऐसा तोचि तो सद्‌गुरुरे ॥१॥
सद्‌गुरुवीण मूढासि दरुशन कैचें । ऐसा तोचि तो चमत्कारगे बाईये ॥२॥
एकमंत्र एक उपदेशिती गुरु । ते जाणावें भूमीभारु ॥३॥
निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षत्वें दावी । ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥४॥

अर्थ: त्या परब्रम्हाला कोणी निळ्यारंगाचा मानते तर कोणी काळ्या रंगाचा मानते. कारण देहाचा रंग ही काळा आहे. काळ्या रंगांच्या देहाने निळ्या रंगाशी तद्रुपता पावता येते. तसेच जो परब्रम्हांशी तद्रुपता करुन देतो त्याला सद्गुरु म्हणतात. त्या देहरुपी जीवास परब्रह्माचे दर्शन फक्त सद्गुरूच करुन देतात हे आश्चर्यच आहे. साधकाच्या भावानुसार मंत्र न देता वेगळाच मंत्र देणारे गुरु हे भूमीला भारच असतात. निवृत्तिनाथ म्हणतात, गुरुनी दाखवलेले तत्त्वज्ञान साक्षत्व दाखवते तेच एक आश्चर्य आहे.

नेणो पैं द्वैत अवघेंचि अद्वैत अभंग क्र.२०२

नेणो पैं द्वैत अवघेंचि अद्वैत । एकरूप मात करूं आम्हीं ॥१॥
अवघाचि श्रीहरि नांदे घरोघरीं । दिसे चराचरीं ऐसे करा ॥२॥
सेवावे चरण गुरुमूर्ति ध्यान । गयनि संपन्न ब्रह्मरसे ॥३॥
निवृत्ति चोखडा ब्रह्मरसु उघडा । गुरुकृपें निवाडा निवडिला ॥४॥

अर्थ: सर्वत्र तो परमात्मा कोणते ही द्वैत न ठेवता एकत्वाने भरला आहे. आम्ही त्या एकच रुपाचे वर्णन करु. सर्वत्र सर्व ठिकाणी तोच परमात्मा एकत्वाने भरुन राहिला आहे. श्री गुरु गहिनीनाथ ब्रह्मरसाने परिपूर्ण आहे. त्याच गुरुमूर्तीच्या चरणाची सेवा मी करतो. निवृत्तिनाथ म्हणतात, गुरुकृपे मुळे तो शुध्द ब्रह्मरस आम्हाला निवडुन घेता आला.

म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा अभंग क्र.२०३

म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा । आपण चौवाचातीत कृष्ण ॥१॥
शब्दासि नातुडे बुद्धिसि सांकडें । तो सप्रेमें आतुडे स्मरतां नाम ॥२॥
उपचाराच्या कोटी न पाहे परवडी । तों प्रेमळाची घोडी धोई अंगें ॥३॥
निवृत्तिचें तप फळलें अमुप । गयनिराजें दीप उजळिला ॥४॥

अर्थ: नंद व यशोदेचा मुलगा म्हणवुन घेणारा तो श्रीकृष्णाचे वर्णन करणे चारी वाणीना ही शक्य नाही. त्या श्रीहरिचे प्रेमाने नाव घेतले तर तो साकार होतो नाहीतर बुध्दीला तो सापडत नाही शब्दात सांगता येत नाही. कोटी उपचार केले तरी त्यांना तो जाणत नाही पण भक्ताच्या प्रेमासाठी त्याचे घोडे ही धुतो. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथानी ज्ञानदीप उजळल्यामुळे व मागचे तप असल्यामुळे तो फलद्रुप झाला.

अनंत ब्रह्मांडें अनंत रचना अभंग क्र.२०४

अनंत ब्रह्मांडें अनंत रचना । शून्य दे वासना तेथें झाली ॥१॥
मन गेलें शून्यीं ध्यान तें उन्मनी । चित्त नारायणीं दृढ माझें ॥२॥
तेथें नाहीं ठावो वेदासि आश्रयो । लोपले चंद्र सूर्य नाहीं सृष्टीं ॥३॥
निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठा । नेतसे वैकुठा गुरुनामें ॥४॥

अर्थ: शुध्द वासनारहित अंतःकरणाने त्याने अनंत ब्रह्मांडाची रचना केली. माझ्या चित्तात त्या नारायणानामा मुळे दृढत्व आल्यामुळे मनात तोच व्यापुन राहिला व ध्यानात उन्मनी अवस्थेत तोच राहिला. त्या ब्रह्म स्वरुपाचे ठाव घेणे वेदाना अशक्य आहे. त्याच्या स्वरुपात चंद्र सुर्य व सृष्टी ही लोप पावते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या परब्रम्हाच्या नामाच्या आश्रय केल्याने तो मला सापडला आहे व गुरुनामामुळे वैकुंठाचा मार्ग ही सोपा झाला आहे.

सप्त पाताळें एकवीस स्वर्गे पुरोनि उरला हरि अभंग क्र.२०५

सप्त पाताळें एकवीस स्वर्गे पुरोनि उरला हरि ।
काया माया छाया विवर्जित दिसे तो आहे दुरी ना जवळी गे बाईये ॥१॥
प्रत्यक्ष हरितो दाविपा डोळां । ऐसा सद्‍गुरु कीजे पाहोनि ।
तनु मन धन त्यासि देऊनी । वस्तु ते घ्यावी मागोनि गे बाईये ॥२॥
पावाडां पाव आणि करी परवस्तुसि भेटी । ऐसा तोचि तो ।
सद्‍गुरुविण मूढासि दर्शन कैचें । ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥३॥
एक मंत्र एक उपदेशिती गुरु । ते जाणावे भूमिभारु ।
निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षित्वें दावी । ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥४॥

अर्थ: एकविस स्वर्ग व सप्त पाताळा भरुन तो हरि उरला आहे.त्या काया, माया व छाया नाहीत तो निर्गुण आहे. तो लांब ही नाही व जवळ ही नाही. सदगुरुकृपे मुळे तो हरि प्रत्यक्ष पाहता आला. त्याला तन मन धन सर्वकाही देऊन ती परमात्म वस्तु मागुन घेता येते. पावाडा म्हणजे झाडावर चढण्यासाठी पाय ठेवायला केलेली खाच, जसे झाडावर त्या पावाड्यातुन पाय देऊन चढणारे इच्छित फल प्राप्त करतात.तसाच तो आहे. व सदगुरुवाचुन म्हणजे सदगुरुने केलेल्या पावाड्या मधून त्या परमात्मारुपी झाडावर चढता येते हे एक आश्चर्यच आहे. जे लोक गुरुने दिलेला मंत्र न जपता इतर मंत्र जपतात ते भूमीला भार असतात. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरुमुळे ते तत्व साक्षीत्वाने दिसते ते ही एक आश्चर्यच आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading