👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
परेसी परता पश्यंति वरुता अभंग क्र.४१
परेसी परता पश्यंति वरुता । मध्यमे तत्वता न कळे हरि ॥
तें हें कृष्णरुप गौळियांचे तप । यशोदे समीप नंदाघरी ॥
चोखट चोखाळ मनाचे मवाळ । कासवीचा ढाळ जया नेत्री ॥
निवृत्ति सर्वज्ञ गुरुची धारणा । ब्रह्म सनातना माजि मन ॥
अर्थ: तो परमात्मा परेहुन परता व पश्यंतीच्या वर आहे. मध्यमेला म्हणजे जिव्हेच्या प्रकाराना ही तत्वता तो कळत नाही.तेच हे कृष्णरुप गौळियांच्या तपामुळे यशोदेच्या निकट नंदाचा घरी अवतीर्ण झाले. तो हा परमात्मा शुध्द, निर्मळ, व कोमल असुन कासवी जशी पिलांना नजरेतुन प्रेमपान्हा देते तसा भक्तांना देत असतो.निवृत्तिनाथ म्हणतात माझ्या सर्वज्ञ श्री गुरुंमुळे तो परमात्मा ब्रह्मसनातन स्वरुपात माझ्या मनात राहतो.
रुप नाम अरुप रुपाचे रुपस अभंग क्र.४२
रुप नाम अरुप रुपाचे रुपस । कांसवी डोळस निगमागमें ॥
तो हा ब्रह्मामाजि गोपाळ सांगाती । यशोदे हो प्रति दुध मागे ॥
जो रेखा अव्यक्त रेखेसिहि पर । दृश्य द्रष्टाकार सर्वाभूती ॥
निवृत्ति तटाक चक्रवाक एक । वासनासि लोक गुरुनामें ॥
अर्थ: जसे कासवीचे डोळे विशेष असतात त्याच्या माध्यमातुन ती पिलांचे पालनपोषण करते तश्या दृष्टीने पाहिले तर ज्याला रुप नाही असे निर्गुण परमतत्व नामाने रुपास आले आहे. तोच परमात्मा गोपाळांना सांगाती घेऊन यशोदे कडे दुध मागत आहे. जे अव्यक्त रुप म्हणजे शुन्याचे प्रतिक आहे पण शुन्य दाखवताना ही गोलरेखा काढावी लागते म्हणजे तिला मर्यादा असते पण ह्याच्या शुन्यत्वाला मर्यादा नाहित. तो दृष्य, द्रष्टत्व व द्रष्टा ह्या त्रिपुटीलाही परे आहे. निवृत्तिनाथ म्हणतात जसे चक्रवाकाचे मैथुन दिसत नाही नर ह्या तर मादी त्या तटावर असते तसे गुरुकृपेने मी व वासना यांची भेट होत नाही.
वर्ण व्यक्ती सरवे वर्णाश्रम मुखे अभंग क्र.४३
वर्ण व्यक्ती सरवे वर्णाश्रम मुखे । ब्रह्मनाम सौख्य योगीजन ॥
तें हे कृष्ण नाम देवकीसबळ । वसुदेवकुळ गोपवेषे ॥
धर्म धरि धार धारण धीरट । निरालंब पीठ सौख्य शोभा ॥
निवृत्ति सौभाग्य ब्रह्म सर्व सांग । गुरुनामे पांग हरे एक ॥
अर्थ: योगीजन सुध्दा जीवन पोषणासाठी आपल्या वाटेला आलेला व्यवसाय करुन तसेच आपल्या वर्णातील लोकांच्या साहाय्याने विवाह करुन जीवन व्यतीत करत असतात. अशा योगीजनांचे परब्रह्म देवकीच्या पोटी जन्माला येऊन वसुदेवाच्या घरी गोपवेशात वावरत असुन त्यामुळे त्यांचे भाग्य उजळले आहे. ते परब्रम्ह निरलंब स्थानात सौख्याने राहात असताना धर्माला धारण करुन धर्मरक्षण करते. निवृत्तिनाथ म्हणतात मला त्याचे ब्रह्मस्वरुप. मी माझ्या गुरुंच्या केलेल्या नाम चिंतनामुळे कळले.
मंगल मांगल्य बिरह्म ते सखोल अभंग क्र.४४
मंगल मांगल्य बिरह्म ते सखोल । ब्रह्मरुपे खोल ब्रह्म भोगी ॥
तें हे कृष्ण नाम वोळले त्या नंदा । आनंदे यशोदा गीत गात ॥
विश्वाद्य वेदाद्य श्रुतीसी अभेद्य । ते ब्रह्मपणे वंद्य ब्रह्म भोगी ॥
ॐकार मूर्धनि प्रणव प्रणम्य । वेदादि आगम आंगभूत ॥
निराळा वैकुंठ निराकार धीट । निकट एकट ब्रह्मपणे ॥
निवृत्ति परिवार गुरु गयनी अमर । गोरक्षीं कंदर ब्रह्म माझे ॥
अर्थ: ते हे ब्रह्म सर्व मंगलाचे मांगल्य असुन योगी सखोल चिंतन करुन ह्याचे ब्रह्मपण भोगतात.तेच परब्रह्म कृष्ण नाम घेऊन नंदाच्या घरी आवतरले व त्यामुळे गीत गाऊन यशोदा आनंद व्यक्त करते.जे वेदांचे आद्य, जे विश्वाची सुरवात जे श्रुतीला अभेद्य असलेले ब्रह्म त्याच्याशी समरसुन योगी त्याचा भोग घेतात.ॐकारचे ध्यान सहस्त्रदळ चक्राचे अंतर्गत मूर्ध्नि स्थानी करतात.ॐकार स्वरुप होऊनच ॐकाराचे ध्यान करावे. व ते करण्यासाठी वेद किंवा इतर ग्रंथानी त्या ब्रह्मस्वरुपाचे वर्णन केले आहे त्याचे चिंतन करुन केले तर फलद्रूप होते. वेदांनी वर्णन केलेले हे अद्वैत ब्रह्म निराकार असुन ते एकटे आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ज्या गुरुनी मला अमरत्व दिले त्यांनी व गोरक्षनाथांनी ज्या निगमस्थानी रहिवास केला तेथेच मी ही त्यांच्या सोबत राहिलो.
ज्ञानेसी विज्ञान उन्मनी निमग्न अभंग क्र.४५
ज्ञानेसी विज्ञान उन्मनी निमग्न । द्वैत रुपे भग्न उरो नेदी ॥
तोचि हा गोपाळ गोपीसंगे खेळे । गो गोपाळ मेऴे नंदाघरी ॥
दष्य द्रष्टा सर्व तितिक्षा उपरती । श्रुतीसी संपत्ति तेथे जाण ॥
निवृत्ति सधर गोरक्ष गयनी । ब्रह्मरुपी पूर्णी समरसे ॥
अर्थ: ज्ञान म्हणजे स्वरुपाची ओळख व विज्ञान म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जाणारी निश्चयात्मक बुध्दी आणी उन्मनी म्हणजे अवस्था, ते ब्रह्म ह्या तिन्ही मध्ये मग्न असते ते द्वैताला जवळ ही येऊ देत नाही. तोच हा गोपाळ सगुण रुप धारण करुन गोपाळांच्या मेळ्यात गोपिकांबरोबर खेळत आहे व नंदा घरी वास करते. तो ब्रह्म द्रष्टा दृष्य द्रष्टत्व ह्या त्रिपुटीचा आधिष्टाता असुन तो तितिक्षा म्हणजे शम दम विकारांना सहनकरणारा व उपरती म्हणजे वैराग्य ह्या श्रृतीनी सांगितलेल्या संपत्तीने युक्त आहे.
निवृत्तिनाथ म्हणतात गोरत्ष व गयनी ह्या नाथांच्या वैचारिक आधाराने मी ह्या ब्रह्मस्वरुपाशी समरस झालो.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६