👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
सारासार धीर निर्गुण परते अभंग क्र.३६
सारासार धीर निर्गुण परते । सादृश्य पुरतें हरिनाम ॥
तें हे कृष्णनाम यशोदेच्या घरी । वनी गायी चारी यमुने तटी ॥
सुलभ सुभग आगमनियम । तो हा आत्माराम गोपवेषें ॥
निवृत्तिचे पार गयनीचें गुज । मज मंत्रबीज उपदेशिले ॥
अर्थ: सर्व चराचर अस्थिर आहे त्यात स्थिंत्यंतर होत असते त्यात परब्रह्म फक्त स्थिर आहे. त्या सादृश्य गुणातीत परमात्म्याचे नामच परिपुर्ण आहे. तेच परब्रह्म यशोदामातेच्या घरातील गायी यमुने तीरी चारत आहे. सर्वांना अगम्य असणारा हा परमात्मा मात्र गोपाळांशी सोपा झाला व गोपवेशे धरुन त्यांच्यात वावरु लागला निवृत्तिनाथ म्हणतात सर्वा पलिकडे असणारे ते ब्रह्म नाम मंत्राच्या आधारे प्राप्त करुन घेण्याचे गुज गौप्य श्री गुरु गहिनीनाथांमुळे मला प्राप्त झाले.
स्थिर धीर निर सविचारसार अभंग क्र.३७
स्थिर धीर निर सविचारसार । ब्रह्मांड आगर गोपेवेषें ॥
तो हा कृष्ण सखा नंदाघरी देखा । यशोदे सन्मुखा दुध मागे ॥
कळिकाळ कळिता काळ आकळिता । आपण स्वसत्ता विश्व हरि ॥
निवृत्ति निकट ज्ञानदेव धीट । खेचरासि वाट गुरुनामे ॥
अर्थ: तो गोपवेष घेऊन आलेला परमात्मा म्हणजे निर्गुण, शांत, स्थिर, सर्व विचारांचे सार व ह्या ब्रम्हांडाचे उत्पत्ती स्थान आहे. तो हा सखा कृष्ण नंदाघरी यशोदे कडे दुध मागताना पाहु शकता. तोच आपल्या सत्तेने कळिकाळाला धरुन ठेवतो व काळाची शक्ती त्याच्या आधिन असते.निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या आकलनामुळे ज्ञानदेव ब्रह्मैक्याला व खेचर गुरु कृपेने ब्रह्म वाटेला लागले.
निट पाठ आम्हा धीट हा प्रबंध अभंग क्र.३८
निट पाठ आम्हा धीट हा प्रबंध । जन वन बोध ब्रह्मरसे ॥
तें मेघःशाममूर्ति स्वरुप गोजिरी । गोकुळींची चोरी करी कृष्ण ॥
मुद्दल शामळ नित्यता अढळ । अखंड अचळ स्वरुप ज्यांचे ॥
निवृत्ति पुरता गुरु विवरण । गयनीची खुण आगम रुपे ॥
अर्थ: सर्व जगता मध्ये तो परमात्मा एक रसाने व्यापला आहे तो परमात्मा आपला विस्तार प्रबंधात्मक रुपाने बोध करुन देत आहे.तोच परमात्मा ढगाच्या रंगाचे सावळे सगुण रुप घेऊन गोकुळात चोरी करतो. असे सतत नित्य, अखंड, अचळ, अढळ असे स्वरुप काळा जसा शु्द रंग म्हणजे दुसरा रंग मिसळा तरी सावळेपण न सोडणारा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीनाथा मुळे पुर्ण स्वरुप असलेले वेदाना आगम्य असलेले परमात्म स्वरुप मला समजले.
पियुषी पुरते कासवी ते विते अभंग क्र.३९
पियुषी पुरते कासवी ते विते । संपूर्ण दुभतें कामधेनु ॥
तेंचि हे डोळस सांवळे सुंदर । यशोदे सकुमार बाळकृष्ण ॥
मधुर क्षारता माधवी अखंड । दिनकाळ प्रचंड आत्माराम ॥
निवृत्तिचे ताट पियूष पुरते । कांसवी दुभते वाढियेसि ॥
अर्थ: कासवीचे दुध फक्त तिच्या पिला पुरते असते तर कामधेनुचे दुध तिच्या वासरासकट सर्वांसाठी वापरता येते. गाय जशी सर्वांना दुध देऊन तृप्त करते तसे परब्रह्म सर्वांच्या इच्छा पुर्ण करतो. तोच परमात्मा आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सुकुमार सावळा बाळकृष्ण यशोदेचा पुत्र बनुन गोकुळात आला आहे. जसे वृक्ष एका विशिष्ट काळात मधुर, आंबट तुरट फळे देतात तसे काळाचे बंधन ह्या परमात्म्याला नाही तो भक्ताला कालातीत होऊन तृप्त करतो.निवृत्तिनाथ म्हणतात कासवी जशी आपल्या पिलास दुध देऊन वाढवते तसे भंगवता तुम्ही मला हे ज्ञानामृत देत आहात.
निर्दोष रहित सर्व गुणीं हेत अभंग क्र.४०
निर्दोष रहित सर्व गुणीं हेत । द्वैत विवर्जित अरुप सदा ॥
ते रुप स्वरुप कृष्ण बाळलीला । माजि त्या गोपाळा सदा वसे ॥
गुणागुणी धीट वासना अविट । तद्रूप प्रगट निरंजन ॥
विकार विवर्जित विवरण सोपे । आकार पै लोपे एक नामें ॥
निःसंदेह छंद वासनेचा कंद । ब्रह्माकार भेद नाही सदा ॥
निवृत्ति परिवार ब्रह्मरुप गोकुळी । वृंदावन पाळी यमुना तटी ॥
अर्थ: गुणातित, निर्दोष द्वैत नसलेले अरुप निर्गुण असलेले हे परमात्म स्वरुप आहे. असे ते निर्गुण रुप गोकुळात सगुण कृष्ण रुप घेऊन गोकुळात गोपाळासह लिला करत आहे. ते परब्रम्ह तद्रुप, निरंजन स्वरुपात असुन सगुण साकार होते तेंव्हा त्याला गुण वासना शिवत ही नाहीत. तेच परब्रह्म निर्विकार असुन त्याचा आकार नामात लोप पावतो. व त्या नामामुळे त्याचे विवरण करणे सोपे होते. वासनेचा त्याग करुन त्या परमात्म्याचा छंद धरला तर ते ब्रह्म साधकास प्राप्त होते व त्या साधकापाशी भेद राहात नाही.निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा त्या वृंदावनात यमुनेतटी राहात होता त्यांच्या सोबत मी परिवारासह होतो.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
