संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा ११ ते १५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

प्रारब्ध संचित विठ्ठल दैवत अभंग क्र.११

प्रारब्ध संचित विठ्ठल दैवत । कुळी उगवत भाग्य योगे ॥
जे रुप पंढरी उभे असे साने । त्रिभुवन ध्याने वेधियेले ॥
उगवती ज्योती प्रभा पै फाकती । नाही दिन राती पंढरीये ॥
प्रभात हारपे सायंकाळ लोपे । दिननिशी लोपे विठ्ठल प्रभा ॥
पृथ्वि हे ढिसाळ वायु व्योम फळ । सेविती अढळ जोडती रया ॥
निवृत्ति सप्रेम जोडती सर्वकाळ । पंढरीये राम विश्रामले ॥

अर्थ: अनेक जन्माच्या संचित व प्रारब्धामुळे भाग्य योगाने श्री विठ्ठल भक्ताच्या कुळात जन्म मिळतो.सगुण रुपाने पंढरीत साकार झालेल्या रुपाने त्रिभुवनाचे ध्यान वेधले आहे. ह्या आत्मज्योतीच्या तेजप्रभेमुळे दिनरात्रीचे भास पंढरीत होत नाहीत.ह्या विठ्ठलाच्या प्रभेमुळे सकाळ संध्याकाळ लोप पावतात. श्री विठ्ठलाच्या सेवे मुळे पृथ्वीचे जडपण वायु चे विचरण व आभाळाचा आभास स्थिरावतो. येथेच प्रभु श्रीरामाने येऊन समाधीरुपाने विश्रांती घेतली तो श्रीराम मला प्राप्त झाला असे निवृत्तिनाथ म्हणतात.

सर्व काम धन सर्व सिध्दि पूर्ण अभंग क्र.१२

सर्व काम धन सर्व सिध्दि पूर्ण । पतित पावन हरि एक ॥
ते रुप पंढरी पुंडलिका वोळले । आणूनि ठेविले भीमातीरी ॥
न लगती त्या सिध्दि करणे उपाधी । नित्य चित्त शुध्दि विठ्ठलनामे ॥
कळिकाळासी त्रास चित्ती हृषिकेश । उगवला दिवस सोनियाचा ॥
त्रिभुवनी थोर क्षेत्र पै सार । विठ्ठल उच्चार भीमातीरी ॥
निवृत्ति तत्पर निवाला सत्वर । नित्यता आचार विष्णुमय ॥

अर्थ: ह्या विठ्ठल स्वरुपात सर्व धन व सिध्दि असुन ह्यांचा मुळे पतित ही पावन होतो. ते परब्रह्म सगुण रुपात पुंडलिकांने भीमातीरी उभे केले. आता अनेक इतर साधन न करता त्या विठ्ठलनामामुळे चित्त शुध्द होते. चित्तत जर विठ्ठल धारण केला तर कळीकाळास धाक होतो असा सोन्याचा दिवस भक्तास प्राप्त होतो. विठ्ठल नामाच्या गजर भीमातीरी झाल्यामुळे ते तीर्थ सर्व त्रिभुवनात श्रेष्ट ठरते. निवृतिनाथ म्हणतात हे जगत विष्णुस्वरुप आहे ह्या त्यांच्या अनुभवामुळे त्यांना शांती मिळाली आहे.

पंढरिये चोख रुपडे अशेख अभंग क्र.१३

पंढरिये चोख रुपडे अशेख । भीमातीरी देख पुण्यभूमी ॥
आदि पीठ देव ब्रह्म हे स्वंयमेव । पुंडलिक भाव प्रगटला ॥
जन हे कोल्हाळ विठ्ठल तारक गोपाळ । कीर्तनी कळिकाऴ दूरी ठाये ॥
नाम हे विठ्ठल न लगे पै मोल । नित्यता सकळ पांडुरंग ॥
त्रिविध ताप पाप हे जिंतिल अमुप । मुरतील संकल्प एक्या नामे ॥
निवृत्ति म्हणे धन्य कीर्तन जो करी । सर्वत्र चराचरी बोलियेले ॥

अर्थ: पुण्यभूमी पंढरी ज्या भीमातीरी वसली आहे तेथे सगुण रुपातील विठ्ठल रुप तुम्हाला पाहता येईल. पुंडलिकाच्या भक्तिभावामुळे पांडुरंग प्रगट झाला व त्यामुळे पंढरी हे आदि पीठ मानले जाते. इंद्रियाचा धनी असा तारक विठ्ठल जनातील कल्लोळ दुर सारतो व हे कीर्तनामुळे साध्य होते कीर्तनात कळीकाळालाही प्रवेश नसतो. जेथे श्री विठ्ठलाचा अखंड वास आहे तेथे कोणते ही मोल न देता नामसाधना होते. विठ्ठल नामामुळे त्रिविध ताप व अनेक पापे नष्ट होऊन संकल्प ही स्थिरावतात. निवृत्तिनाथ म्हणतात जो नामसंकीर्तन करतो तो धन्य आहे आशी सर्व चराचराची धारणा आहे.

उघडे स्वरुप प्रत्यक्षाचे दीप अभंग क्र.१४

उघडे स्वरुप प्रत्यक्षाचे दीप । नाम घेता पाप हरे जना ॥
ते रुप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिन काळ पंढरीयेसी ॥
रज तमे दुरी नामाची माधुरी । निशाणी एक सरी रामकृष्ण ॥
भवाब्दि तारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥
विश्व हे तारिले नामचि पिकले । केशवी रंगले मन हेतु ॥
निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिन काळ फळ आत्माराम ॥

अर्थ: उघड्या परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात व दिपासारखा श्री विठ्ठल प्रगट होतो. ज्याची सेवा दिवसरात्र पंढरीत होते तो विठ्ठल सर्वत्र जगत रुपात वास करतो. रामकृष्ण नामाची निशाणी करुन रज व तमाचा लोप करता येतो व तेथे शुध्द सत्व उरते.पुंडलिकाने विवेकाला नावाडी करुन संसार सागरातुन स्वतःला तारुन नेले. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले.

जनासी तारक विठ्ठलचि एक अभंग क्र.१५

जनासी तारक विठ्ठलचि एक । केलासे विवेक सनकादिकी ॥
ते रुप वोळले पंढरीस देखा । द्वैताची पै शाखा तोडीयेली ॥
उगवले बिंब अद्वैत स्वयंभ । नाम हे सुलभ विठ्ठल राज ॥
निवृत्तिचे गुज विठ्ठल सहज । गयनी राजे मज सांगितले ॥

अर्थ: सनकादिक संतांनी विचार मंथनातुन जो विचार सांगतिला त्या प्रमाणे एक विठ्ठलच जगतासी तारक आहे. संत ह्याला विवेक म्हणतात. तो श्री विठ्ठल आपले अद्वैत असे निर्गुण रुप सोडुन इकडे सगुण रुपात आकारला आहे. ज्या सुलभते नित्य सुर्यबिंब उगवते तेवढ्याच सुलभतेने त्याचे नाम प्रगट होते. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गयनीनाथ कृपे मुळे नाम सुलभ आहे हे गुज मला कळले.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading