👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
निराकार वस्तु आकारासी आली अभंग क्र.६
निराकार वस्तु आकारासी आली । विश्रांती पै जाली विश्वजना ॥
भिवरासंगती निरंतर सम । तल्लीन ब्रह्म उभे असे ॥
पुंडलिक ध्याये पुढत पुढती सोये । विठ्ठल हेचि गाये संकीर्तनी ॥
निवृत्ति संकीर्तन ब्रह्म हे सोज्वळ । नाम हे रसाळ अनिर्वाच्य ॥
अर्थ: निर्गुण निराकार वस्तुरुप ब्रह्म हे विठ्ठल रुपात सगुण साकार रुपात आले त्यामुळे विश्वजनाना मोक्षरुप विश्रांती घेता येईल. चंद्रभागेतीरी समचरण समदृष्टी स्वरुपातील विठ्ठल भक्त भेटीसाठी तल्लीन होऊन उभे टाकले आहे. नाम संकीर्तनातुन पुंडलिक ह्याचे गायन करुन ह्यांचे ध्यान करतात.निवृत्तिनाथ म्हणतात हे सोज्वळ ब्रह्म मी रसाळपणे अनिर्वाच्च रुपात कीर्तनात सांगत आहे.
पुंडलिक पेठ वैष्णवांचा हाट अभंग क्र.७
पुंडलिक पेठ वैष्णवांचा हाट । करिती बोभाट हरिनामाचा ॥
वोळले अंबर अमृत तुषार । झेलित अमर चकोर झाले ॥
देव मुनी सर्व ब्रह्मादिक लाठे । पंढरिये पेठे प्रेमपिसे ॥
निवृत्ति निर्वाळला ज्ञानदेव सोपान । खेचर तल्लीन विनटला ॥
अर्थ: पुंडलिक सर्व संतांच्या मेळाव्यात पंढरीच्या पेठेत हरिनामाचा गजर करत आहेत चंद्राने केलेल्या अमृत वर्षावा मुळे जसे चकोर पक्षी अमर होतात तसे आकाशातुन ब्रह्म भक्तांवर अमृत वर्षाव करते. ब्रह्मादिक, ऋषी, मुनी पंढरी तील भक्तीचा गजर ऐकुन पीसे होतात. भक्तीपीसे त्यांना लागते. निवृत्तिनाथ म्हणतात त्यांच्या सकट ज्ञानेश्वर सोपान विसोबा खेचर भक्तीने विठ्ठल रुपात लीन झाले.
विठ्ठल श्रीहरी उभा भीमातीरी अभंग क्र.८
विठ्ठल श्रीहरी उभा भीमातीरी । तिष्टती कामारी मुक्तिचारी ॥
मुनिजना सुख निरंतर लक्ष । भक्ता निजसुख देत असे ॥
पुंडलिक पुण्य मेदिनी कारुण्य । उध्दरिले जन अनंत कोटी ॥
निरानिरंतर भीमारथी तीर । ब्रह्म हे साकार इटे नीट ॥
नित्यता भजन जनी जनार्दन । ब्रह्मादिक खुण पावताती ॥
निवृत्ति तत्पर हरिरुप सर्व । नाम घेता तृप्त आत्माराम ॥
अर्थ: ज्या पंढरीत श्री विठ्ठल उभे आहेत तिकडे चारी मुक्ति कामारी दासी होऊन तिष्टत आहेत. मुनिजन जेथे लक्ष केंद्रीत करुन जे सुख निरंतर भोगतात तेच सुख पंढरीत भक्तांना मिळते.पुंडलिकाने पुण्य पृथ्वीवर करुणा दावुन हे ब्रह्मस्वरुप पंढरीत भक्तजनांच्या उध्दारासाठी पंढरीत आणले.त्या पंढरीत निराभिवरे तीरावर हे परब्रह्म विटेवर उभे आहे.ब्रह्मादिकांनी खुण सांगितली आहे की हे ब्रह्म भजनामुळे जगत रुपात पाहता येते.निवृत्तिनाथ म्हणतात तत्परतेने नाम घेचल्यास तो आत्माराम तृप्त होतो.
भव जळ काया पंच तत्व माया अभंग क्र.९
भव जळ काया पंच तत्व माया । भजन उभया पंढरी रावो ॥
तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरी । ब्रीदे चराचरी बोले वेदु ॥
माया मोहजाळ ममता निखळ । सेविता सकळ होय हरी ॥
निवृत्तिचे फळ सकळ हा गोपाळ । तोडी मायाजाळ संकीर्तने ॥
अर्थ: पंचतत्वाने बनलेला देह हा भवसागरातील पाणी आहे. व ह्या जळातुन तरण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे पंढरीरावाचे भजन आहे. भवसागरातुन तरण्यासाठी तारक पंढरीत आहे असे वेद सांगतात. ह्या परब्रह्माच्या सेवे मुळे माया, ममता, मोहजाळातुन सुटका होते. निवृत्तिनाथ म्हणतात ह्याच्या संकीर्तनामुळे माया मोहाचा पाश मला तोडता आला हे साधनेचे फळ आहे.
नित्य हरिकथा नित्य नामावळी अभंग क्र.१०
नित्य हरिकथा नित्य नामावळी । वैष्णवाचे कुळी धन्य जन्म ॥
म्हणोनी पंढरी उपजावे संसारी । प्रत्यक्ष श्रीहरी तीरी उभा ॥
नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत । नित्यता अच्युत तिष्टतसे ॥
निवृत्ति सादर विष्णुमय सार । विठ्ठल आचार पंढरीये ॥
अर्थ: ज्या घरात नित्य हरिकथा व नामसंकीर्तन होते आशा वैष्णवाच्या कुळात जन्म मिळणे भाग्याचे आहे. म्हणुनच जीवाला हे सर्व ज्या पंढरीत हे होते त्या क्षेत्री जन्म घ्यावसा वाटतो.ज्या ठिकाणी श्री विठ्ठल उभा आहे तिकडे आनंदाची दिवाळी असते व द्वैत नसते. निवृत्तिनाथ म्हणतात श्री विठ्ठलाच्या रहिवासामुळे सर्व जगत विष्णुमय झाले आहे.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६