संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १६ ते २०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी अभंग क्र.१६

पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी । विष्णु चराचरी ग्रंथी पाहे ॥
ते रुप विठ्ठल ब्रह्माकार दिसे । पंढरी सौरस भीमा तीरी ॥
जगाचे तारक पूण्य पूज्य लोका । तृप्त सनकादिक नामे होती ॥
पतित पावन नाम हे जीवन । योगियांचे ध्यान हरि आम्हा ॥
वेणुनादी काला पिंडावती झाला । भाग्य भोगियेला दृष्टि पुढे ॥
निवृत्ति म्हणे हे रुपडे अनंत । विठ्ठल संकेत तरणोपाय ॥

अर्थ: देह तादात्म्य सोडुन हा देह देवाच्या कारणी लावावा हा अनुभव जगतातील सर्व ग्रंथ सांगत आहेत. असे हे ब्रह्माकार रुप भक्तांकरिता भीमातीरी श्री विठ्ठल रुपाने साकारले आहे. जगाला तारणारे सनकादिक संत हे नाम घेतल्याने तृप्त झाले आहेत. योग्यांचे ध्येय असणारे हे नाम पतित पावन व जिवनदायी आहे. ह्याच्या वेदुनादाने माझे देह तादात्म्य संपवुन मला भाग्य भोगायला पात्र केले. निवृत्तिनाथ म्हणतात अनंत रुप विठ्ठलाचे संकेत प्राप्त करणे हा तरणोपाय आहे.

हरिविण व्यर्थ आचार समर्थ अभंग क्र.१७

हरिविण व्यर्थ आचार समर्थ । हरि हेचि हेत अरे जना ॥
ते रुप पंढरी पुंडलिक संगे । एका नामे पांग पाश तोडी ॥
सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण । वेद मते खुण ऐसी असे ॥
निवृतिचा देव सर्व हा गोविंद । नाही भिन्न भेद विश्वी इथे ॥

अर्थ: हे लोक हो हरिविण कोणताही आचार श्रेष्ट नाही. हरिची प्राप्ती हाच समर्थ विचार आहे. त्या विठ्ठल नामाने सर्व पाश सुटतात तो श्री विठ्ठल पंढरीत उभा आहे. आपली सर्व कर्म त्याला अर्पण करावीत हे वेदांचे मत आहे. निवृतिनाथ म्हणतात हा माझा गोविंद भिन्न रुपात भासत असला तरी तो एकत्व रुपाने त्यात आहे.

भाग्याचेनि भाग्य उदो पै दैवयोगे अभंग क्र.१८

भाग्याचेनि भाग्य उदो पै दैवयोगे । ते पुंडलिका संगे भीमा तटी ॥
ध्यान मनन एक करिता सम्यक । होय एका एक एक तत्व ॥
उदो अस्तु मेळे ब्रह्म न मैळे । भोगिती सोहळे प्रेम भक्त ॥
निवृत्ति निवांत विठ्ठल सतत । ना घे दुजी मात हरिविण ॥

अर्थ: दैवयोगाने भाग्याचा उदय झाला म्हणुन पुंडलिकाच्या संगतीने भीमातीरी परब्रह्म अवतरले. हा परब्रह्म म्हणजे एकच तत्व आहे हे ध्यान व मननाने कळते. भक्त हे प्रेम सुख सतत भोगत राहतात जसा सुर्य व चंद्राला उदय अस्त असतो तसा ह्या प्रेमसुखाला नाही. निवृत्तिनाथ म्हणतात मी निवांत ह्या विठ्ठलाचे भजन करतो इतर मतांचे काही ऐकत नाही.

ध्येय ध्यान मनी उन्मनी साधनी अभंग क्र.१९

ध्येय ध्यान मनी उन्मनी साधनी । लाविता निशाणी ध्यान मागे ॥
ते रुप सधन गुणागुण संपन्न । ब्रह्म सनातन नांदे विटे ॥
विठ्ठल नाम सार ऐसाचि निर्धार । मुक्ति पारावार ती अक्षरी ॥
निवृत्ति निवांत राहिला निश्चिंत । केला मथीत पुंडलिका ॥

अर्थ: ध्येय ध्यान ध्याता ही त्रिपुटी निरास पावली की उन्मनी अवस्था प्राप्त होते. त्याची निशाणी हे योगी ध्यान मानतात.योग्यांचे ते ध्यान जे सर्व गुणांनी युक्त आहे तेच विटेवर उभे आहे. त्यामुळे श्री विठ्ठल नाम हेच सार असा निर्धार करुन ती मुक्ती प्राप्त झाली आहे. तोच हा परमात्मा आहे हे पुंडलिकाने सांगितल्यामुळे निवृत्तिनाथ निवांत राहिले.

काळ वेष दुरी काळचक्र करी अभंग क्र.२०

काळ वेष दुरी काळचक्र करी । बाह्य अभ्यंतरी हरि नांदे ॥
सर्वत्र श्रीकृष्ण नंदाघरी जाला । कृष्णे काला केला गोपवेषे ॥
गोपाळ सवंगडे खेळे लाडेकोडे । यशोदेमाये पुढे छंदलग ॥
निवृत्ति म्हणे तो स्वामी सकळाचा । दिनकाळ वाचा कृष्ण जपो ॥

अर्थ: नामसाधनेने हृदयात स्थापित झालेला हरि आत बाहेर राहुन भक्ताचे काळचक्रापासुन रक्षण करतो. चराचर भरुन राहिलेला भगवंत नंदाघरी गोपवेश घेऊन काला करित आहे. लडिवाळपणे यशोदामातेसमोर आपल्या गोपाळांबरोबर अनेक खेळ खेळतो. निवृत्तिनाथ म्हणतात तो सर्व जगाचा राजा असुन त्याचे दिवसरात्र नाम जपु.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading