👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
आदीची अनादि मूळ पै सर्वथा अभंग क्र.८६
आदीची अनादि मूळ पै सर्वथा । परादि या कथा हारपती ॥
ते अव्यक्त रूप देवकीचे बाळ । वसुदेवकुळ कृष्णठसा ॥
मुराली ब्रम्हांडे अमिते पै अंडे । ढिसाळ प्रचंडे जया माजी ॥
निवृत्तीचे धन माजी तो श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न गायनिराजे ॥
अर्थ: तो परमात्मा सर्वंचे अनादि मूळ आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी सारखे ह्याचे वर्णन करताना हरपून जातात. तोच निर्गुण परमात्मा श्रीकृष्ण नामाची मुद्रा लाऊन देवकी वसुदेवाच्या कुळी जन्माला आला. त्या परमात्मरुपात अनेक ब्रह्मांडे लयाला जातात व अनेक नविन ब्रह्मांडांचे बीजारोपण होते. निवृत्तिनाथ म्हणतात, मी जेंव्हा गहिनीनाथांना विचारले की मुळ ठेवा कोणता तेंव्हा त्यांनी सांगितले माझा श्रीकृष्ण हाच मुळ ठेवा आहे.
बिंबी बिंब येक बिंबिले सम्यक अभंग क्र.८७
बिंबी बिंब येक बिंबिले सम्यक । आपण तिन्हीलोक एक्यारूपे ॥
तो कृष्णरूप ठसा गोपाळा लाधला । सर्वत्र देखिला चतुर्भुज ॥
निळिमा अंबरी निजवर्ण तेज । गोपाळ सहज बिंबाकार ॥
निवृत्ति परिपाठ निळवर्ण खरा । नंदाचिया घरा कृष्ण आले ॥
अर्थ: बिंबातील बिंब म्हणजे चिदाकाशातील परमात्मा हा तिन्ही लोकात एकत्वाने समप्रमाणात राहतो. तेच मुळचे चतुर्भुज असणारे स्वरुप श्रीकृष्ण होऊन गोपाळांत राहतो. निळवर्ण बिंबाचे रुपात आपण जे पाहतो ते ह्याच्या निळवर्णी छाये मुळेच आकाशाला निलवर्ण प्राप्त झाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात नंदाच्या घरी आलेल्या निलवर्ण परमात्मा मुळे मला सर्वत्र निलवर्णाचे आवरण पडल्या सारखे वाटते.
वैकुंठ दुभते नंदाघरीं माये अभंग क्र. ८८
वैकुंठ दुभते नंदाघरीं माये । तें पुण्य पान्हा ये यशोदेसी ॥
तें रुप रुपस कांसवी प्रकाश । योगीजनमानस निवताती ॥
सुंदर सुनीळ राजस गोपाळ । भक्तीसी दयाळ एक्या नामे ॥
निवृत्ति गयनी मन ते चरणी । अखंडता ध्यानी तल्लीनता ॥
अर्थ: तो परमात्मा कृष्ण रुपात वैकुंठातील कामधेनु बनुन नंदा घरी आले आहे. व यशोदेसही त्याला पाहुन प्रेमपान्हा दाटुन येतो व ती सतत तो कृष्णाला देत आहे. ज्या प्रमाणे कांसवी आपल्या पिल्लांना दृष्टिक्षेपाने वाढवते तसा श्रीकृष्ण योगीजनांना म्हणजे भक्तांना कृपादृष्टी देत असतो. नुसत्या त्याच्या नामाच्या उच्चाराने तो सुंदर, सुनीळ, सुकुमार परमात्मा तो भक्तांवर दया करतो. निवृत्तिनाथ म्हणतात, मी गहिनीनाथांच्या चरण व मार्गावर लक्ष केंद्रित केल्याने मी सतत त्याच्या नामात तल्लीन असतो.
गोकुळी वैकुंठ वसे गोपाळा माजी अभंग क्रं. ८९
गोकुळी वैकुंठ वसे गोपाळा माजी । सौरसे अभक्ता न दिसे काय करु ॥
पूर्व पुण्य चोखडे ब्रह्मांड कोडे । तो यशोदेकडे शोभे कैसा ॥
वसुदेव आपण देवकीये समीप । वैकुंठीचे दीप लाडे कोडे ॥
उग्रसेन संप्रधार केला राज्यधर । यादव परिवार रामकृष्ण ॥
द्वारकानाथ हरि सोळासहस्त्र नारी । बळिराम परिवार हरि माझा ॥
निवृत्ति जीवन ध्यान एक रामकृष्ण । उच्चारणी कोटी यज्ञ होती नामे ॥
अर्थ: भक्तीहीन मनुष्याला गोकुळात तो गोपाळ बनुन राहतो हे कळत नाही. त्याची योग्यता ही दिसत नाही. चोख पूर्व पुण्यामुळे त्याने बनवलेल्या ब्रह्मांडाचे कोडे सुटते. व तोच परमात्मा यशोदेच्या कडेवर शोभुन दिसतो. तो वैकुंठदिप परमात्मा मोठ्या लाडाकोडाने देवकी वसुदेवाजवळ जन्माला आला.त्याच परमात्माने संपूर्ण यादवामधुन संयत व संयमी असलेल्या उग्रसेनाला राज्यावर बसवले. बळिरामाचा लहान भाऊ असुन ही द्वारकानाथ म्हणणाऱ्या परमात्म्याने कैदेतुन सोडवल्या सोळा सहस्त्र स्त्रीयांचा उध्दार केला.निवृत्तिनाथ म्हणतात, अश्या परमात्माच्या रामकृष्ण नामउच्चारणा मुळे कोटी यज्ञांचे फळ मिळते.
सर्व स्वरुप नाम राम सर्व घनःश्याम अभंग क्रं. ९०
सर्व स्वरुप नाम राम सर्व घनःश्याम । तो गोकुळी आत्माराम दुध मागे ॥
भाग्येविण दुभते दैव उघडते । नंदाघरी आवडते हरि खेळे ॥
मंजुळ वेणुवाये लुब्धत्या घेनुवा । नंदाघरी दुहावा पूर्ण वाहे ॥
घरोघरी दुभतें गौळियां परिपूर्ण । यशोदा ते आपण गोरस घुसळी ॥
गोपाळ हरिखु नंदा यशोदे देख । गौळियां कौतुक करिती हरि ॥
निवृत्ति गयनी देव उपदेशिला सर्व । गोरक्ष गुह्य भाव सांगति मज ॥
अर्थ: सर्व नामरुपाने युक्त असणारा घनश्याम, गोकुळात दुध मागतो. त्या नंदाच्या भाग्यामुळे नवनिताचा दुभत्याचा सागर त्याला मिळाले ते भाग्य कृष्णरुपाने नानाविध खेळ खेऴते. त्या परमात्माच्या मुरलीचा धुनीवर सर्व गायी लुब्ध झाल्यामुळे नंदाघरी दुभत्याचा सुकाळ करत आहेत. व गौवळ्यांच्या घरी ह्या दुधाच्या सुकाळाने ते हरखुन गेले आहेत व यशोदे सह सर्व गौळणी दह्याची घुसळण करत असतात. नंद व यशोदा हे कृष्णरुपाने हरखुन गेले आहेत व ह्याचे आश्चर्य सर्व गोकुळाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या उपदेशाने मला त्याचे गुह्यरुप दिसले व ते गुह्य मला गोरक्षानाथानी ते सोपे करुन सांगितले.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
