👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
ज्या रूपाकारणें देव वोळंगणे अभंग क्र.१५६
ज्या रूपाकारणें देव वोळंगणे । योगी गुरुखुणें सेविताती ॥
ते रूप गोकुळीं गोपाळांचे मेळीं । अखंड त्यामेळीं खेळतुसे ॥
ब्रह्मांड कडोविकडी ब्रह्मांड घडी । या योग परवडी हरपती ॥
निवृत्तीचे धन ब्रह्म हें रोकडें । गौळणी त्यापुढें खेळविती ॥
अर्थ: त्या ब्रह्मस्वरुपाचे चिंतन किंवा नामरुप सेवा देवादिक व योगी आपल्या गुरुकृपेने करतात.तेच परब्रह्म गोकुळात त्या गोपाळांबरोबर अखंड खेळत आहे.ते ब्रह्मस्वरुप अनेक ब्रह्मांड घडवत व मोडत असते ते नुसते ऐकुन योगी भान हरपुन जातात. निवृतिनाथ म्हणतात, ज्याला गौवळणी आपल्या पुढ्यात खेळवतात तेच माझे महाधन परब्रह्म आहे.
गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड हें पोटीं अभंग क्र.१५७
गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड हें पोटीं । चैतन्याची सृष्टि आपण हरि ॥
देखिलागे माये सुंदर जगजेठी । नंदयशोदेदृष्टी ब्रह्म खेळे ॥
आकाश सौरस तत्त्व समरस । तो हा ह्रषिकेश गोपीसंगें ॥
निवृत्ति साधन निरालंबीं ध्यान । तोचि हा श्रीकृष्ण ध्यान माझें ॥
अर्थ: ज्याच्या एका घासात गगन हरपते ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत तेच परब्रह्म ह्या जगताचे चैतन्य स्वरुप आहे. नंद यशोदेकडे त्याला खेळताना मी त्या सुंदर जगजेठीला पाहिला. जो एकत्वाने सर्व आकाश बनुन व्यापला आहे तोच हृषीकेश गोपी बरोबर आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, श्रीकृष्ण नाम सोडुन इतर कोणतेही साधनचा उपयोग मी माझ्या ध्यानासाठी करत नाही.
चिंतितां साधक मनासि ना कळे अभंग क्र.१५८
चिंतितां साधक मनासि ना कळे । तो गोपिकासी आकळे करितां ध्यान ॥
देखिलागे माये सगुणागुणनिधि । यशोदा गोविंदीं प्रेम पान्हा ॥
न माये सर्वाघटी आपणचि सृष्टी । तो यमुनेच्या तटीं गायी चारी ॥
निवृत्ति साधन कृष्णाचे रूपडें । ब्रह्मांडा एवढें तदाकार ॥
अर्थ: ज्याचे चिंतन सतत करणाऱ्या साधकाला तो सापडत नाही तो परमात्मा गोपिकांच्या प्रेमभक्तिमुळे सतत त्यांच्या ध्यानात असतो. ज्याला यशोदा आपला प्रेमपान्हा पाजते त्या सगुण गुणनिधीला मी पाहिला. यमुनेच्या तटावर गायी चारणारे ते परब्रह्म सृष्टीतील कोणत्याच स्वरुपात बंधिस्त होत नाही. निवृतिनाथ म्हणतात, त्याच कृष्णरुपाला माझे नामसाधन बनवल्यामुळे सर्व ब्रह्मांड मला तदाकार एकरुप दिसत आहे.
निज लक्षाचें लक्ष हरपलें भान अभंग क्र.१५९
निज लक्षाचें लक्ष हरपलें भान । दिन मान शून्य जया माजी ॥
तें ब्रह्म गोजिरें गोपाळ संगती । संवगडे सांगाती भाग्यवंत ॥
वेणुवाद्यध्वनि यमुनाजळ स्थिर । ध्यानाचा प्रकार कृष्णरासी ॥
निवृत्ति म्हणे तें स्वरूप सौख्य रूपडें । पाहाती चहूंकडे योगीजन ॥
अर्थ: जे स्वरुप काळ, स्थल, हुन परे आहे त्या निर्गुण परब्रह्माठायी योगी ज्याला आपले लक्ष मानतात त्या लक्षला विसरतात. तेच गोजिरे कृष्णपरब्रह्म आपले भाग्यवान सोबती गोपाळांबरोबर राहते. ज्या वेणुच्या वादनामुळे यमुनेचे जळ ही पांगुळते नव्हे नव्हे यमुनेलाही त्याचे ध्यान लागते. निवृतिनाथ म्हणतात, तेच कृष्णरुप नित्य सर्वत्र व्यापक, सुखरुप, ब्रह्मस्वरुप आहे त्यालाच योगी सर्व ठिकाणी पाहतात.
अनंतरूप देव अनंत आपण अभंग क्र.१६०
अनंतरूप देव अनंत आपण । अंतर्बाह्यखुण योगीयांसी ॥
तो हा हरिमाये गोकुळीं अवतार । गोपीसंगें श्रीधर खेळतुसे ॥
शास्त्रांसि नाकळे श्रुति ही बरळे । तें गोपवेषें खेळे गोपाळांमाजी ॥
निवृत्तिचें सार गयनीविचार । ब्रह्मचराचरमाजि वसे ॥
अर्थ: जो अनंत रुपाने सृष्टीत व्यापला आहे. त्यालाच सर्व रुपात पाहुन योग्यांना त्याच्या अंतर्बाह्य रुपात दिसतो तोच हरिचा अवतार गोकुळात झाला असुन तोच गोपीसंगे खेळत आहे. जो परमात्ना शास्त्राना कळत नाही ज्याच्या बद्दल बोलताना श्रुती ही बरळ होते. तोच परमात्मा गोपवेशात गोपाळांबरोबर खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात सर्व चराचरात व्यापुन असलेला परमात्मा आहे हे विचार सार गुरु गहिनीनाथांनी मला दिले.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
