👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९४
गुणाचेनी आटोपें आकारलें ब्रह्म । भक्तभाग्य सम आले मूर्ति ॥१॥ चैतन्य परिपाठी ठसा घडलासे साकारकृष्णची आकार गोकुळी रया ॥२॥ त्या रूपें वेधिलें काय करूं गे माये । नामरुप सोय नाहीं आम्हां ॥३॥ सभाह्य सभोंवते चतुर्भुज सांवळे । सर्वभूती विवळे कृष्णरूपें ॥४॥ हरपले आकार कृष्णची क्षरला । वेदांसी अबोला श्रुतीसहित ॥५॥ ऐसें परब्रह्म सांवळे दैवत आमुचें । आतां आम्हां कैचें क्रिया कर्म ॥६॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु दैवत । मनें घर तेथें चरणीं केलें ॥७॥
अर्थ:-
भक्तांच्या परमभाग्याने भक्तावर अनुग्रह करण्याकरिता मायेच्या गुणांचा स्वीकार करून कृष्णरूपी मूर्तिच अवतीर्ण झाली आहे. चैतन्याचे कार्यक्रमांत हा सगुण कृष्णाचा आकार गोकुळांत अवतीर्ण झाला. त्याचे मनमोहक रूपाने मला सारखा वेध लावून टाकला. काय करू. त्यामुळे माझे नामरुपच नाहीसे झाले. शामसुंदर चतुर्भुज सांवळ्या श्रीकृष्णाने सभोवार सर्व रूपाला व्यापून टाकले. त्यामुळे असे आकार नष्ट होऊन ज्या रूपाच्या ठिकाणी श्रुतिसह वेद कुंठीत झाला. तेच कृष्णरूप लक्ष्य जे सांवळे परब्रह्म ते आमचे दैवत असल्यामुळे आम्हांला आता बाकीची क्रिया कर्म राहिली नाहीत. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आमचे दैवत असून त्याचे चरणाचे ठिकाणी माझ्या मनाने घर केले. असे माऊली सांगतात.