ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 893

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९३

आजि शुभ लवे लोचनु हरिखें सांगताहे शकुनु स्वप्न देखिलें सुंदरी । अलंकार लेववा चंदन चर्चावा जाति जुती पार्यातिके शेंवती करा आइती सेजारीं । शेला काढा मेचुचा हा दिन दैवाचा । सोहळा तो आमुचा मंदिरीं गे माये ॥१॥ गुढिया उभवा मखरें शृंगारा भेटी होईल आळंगी । स्फुरण आलें बाही क्षेमालागीं पाहीं काचोळी न समाये अंगीं गे माये ॥२॥ जिवीं जीव सुंदर त्याचेनी साचार तो मज भेटवा सुखाचा विसावा । सुमनें उकललीं नित्य दे माळी उचित करी तया भावा । आजी वेळु कां वो लाविला नेणों पंथीं । सीणला बुझाऊं जाऊं त्याच्या गांवा गेमाये ॥३॥ हृदयीं निर्भर प्रेम वोरबार माझे चित्तीं राहो ऐक्य मज । दुजिये वस्तुलागी रुत जाय माधवी मन्मथ करिता हे वोज । ऐसी तेथवरी जाईन सुखाची होईन नाचेन आनंदाचे भोजें गे माये ॥४॥ ऐसा विपरीत लाघवी लपे सवेंची दावी वासिपे चौके । अभ्यासें अंतर पडलें येणें तरी मी त्यजीन जिणे म्हणोनी विनवितसे चतुर सुरेखे । रात्रीचे ठायीं देख मेघःश्याम बोलला अंबरीं गे माये ॥५॥ ऐसिये निवांत मूर्ति ऐकोनी ठेली श्रुती । आकर्षोनी चित्त चैतन्य भरोनी ठेले लोचन । ध्यानीं विसर्जिलें मन परमात्मया रामा तूं एक लाघवी सावेव पावलें ज्ञान । बापरखुमादेविवरा विठ्ठला सुमन संयोगीं आजी सत्य झालें माझें स्वप्न गे माये ॥६॥

अर्थ:-

एक विरहिणी म्हणते आज माझा शुभशकुन दाखविणारा डोळा लवत आहे. त्यामुळे मला आनंद होत आहे. मला असे स्वप्न पडले. मी आपल्या मैत्रिणीला म्हणत आहे. माझ्या अंगावर अलंकार घाला. चंदनाची उटी लावा. जाई, जुई, पारिजातक, सेवंती इत्यादि सामुग्रीने शेज़ तयार करा. माझ्या अंगावर घेण्याचा शेला काढा हा दिवस मोठा आवडीचा व भाग्याचा आहे. असा त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीचा सोहळा मंदिरात होणार आहे. याकरितां तुम्ही गुढ्या उभारा, मखर शृंगारून तयार करा, आज त्या श्रीकृष्ण परमात्म्याची भेट होईल. आणि मी त्यास अलिंगन देईन पहा. त्याला अलिंगन देण्यासाठी माझे बाहु स्फुरण पावत आहेत. ही पहा अंगातील कांचोळी अंगांत मावेनाशी झाली ज्याप्रमाणे माळी सुंदर फुललेली फुलें नेहमी देतो. त्याप्रमाणे सर्व जीवांचे जीवन व सुंदर असून, सर्व जीवांचा विसावांच असणारा श्रीकृष्ण मला भेटवा. आज त्यांनी येण्याला कां बरे वेळ लावला? वाटेत येता येता थकला कां? काही समजत नाही. चला त्याच्या गावाला त्याची समजूत घालण्याकरिता जाऊ. माझ्या चित्तांत त्याच्याविषयी अत्यंत प्रेम आहे व चित्तांत त्याचे प्राप्तीची खटपट आहे. नेहेमी त्याचे ऐक्य असावे असे चित्तांत वाटते. दुसऱ्या गोष्टीकडे चित्तच जात नाही. जणू काय माझा पाय रूतून जातो. पहा, हा वसंत ऋतु माझ्या अंतःकरणांत काम उत्पन्न करीत आहे. याकरिता मी त्याच्यापर्यंत जाईन आणि मोठी आनंदी होऊन त्या आनंदाच्या जोराने त्याच्यापुढे नाचेन.जगांत आम्ही पुष्कळ पुरूष पाहतो. परंतु या श्रीकृष्णाचे लाघव विचित्र आहे. क्षणांत दिसतो, क्षणांत लपतो, क्षणांत भीती उत्पन्न होऊन अंतःकरण चकित होऊन जाते. अशी त्याचे प्राप्तीकरिता खटपट करूनही त्याच्याशी अंतर पडले म्हणजे भेट झाली नाही तर मी आपला जीव टांकून देईन. याकरिता त्याची प्राप्ती व्हावी म्हणून तुम्हा चतुर बायांना विनवित आहे. रात्रीच्या वेळी पहा ते मेघःशाम आकाशवाणी झाल्यासारखा बोलला. तें कानांनी ऐकून मी अगदी निवांत राहिले. माझे चित्त त्याचेकडे आकर्षित होऊन त्याचेकडे डोळे लावून राहिले. व मन ध्यानांत गुंतले हे परमात्मा सखारामा तूं एक जगांत लाघवी आहेस. सर्व प्रकारे तुझे ज्ञान झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ठिकाणी मनाचा संयोग होऊन आज माझे स्वप्न खरे झाले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading