ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 879

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८७९

घनु वाजे घुणधुणा । वारा वाजे रूणुझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटावा कां ॥१॥ चांदवो चांदणें । चापेवो चंदनु । देवकीनंदनेवीण नावडे वो ॥२॥ चंदनाची चोळी । माझें सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥ सुमनाची सेज । सितळ वो निकी । पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥ तुम्हीं गातसां सुस्वरें । ऐकोनी द्या उतरें । कोकिळें वर्जावें । तुम्हीं बाईयांनो ॥५॥ दर्पणी पाहतां । रूप न दिसे आपुलें । बापरखुमादेविवरें विठ्ठलें मज ऐसें केलें ॥६॥

अर्थ:-

मेघाचा घुणु घुणु असा सुंदर आवाज येत आहे. वारा झुळुझुळु आवाज करीत आहे. अशा स्थितित त्या भवतारक श्रीकृष्ण भेटीची तळमळ लागलेली विरहिणी आपल्या मैत्रिणीला सांगते.त्या श्रीकृष्णं परमात्याला लवकर आणून भेटवा. त्या श्रीकृष्ण परमात्म्यावांचून हे सुंदर चंद्र चांदणे व सोनचाफ्याची फुले किंवा चंदनाची उटी यापासून मला काही शांतता मिळत नाही. एकट्या देवकीनंदन श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय मला काही आवडत नाही. ही पहा चंदनाची चोळी जसी कांही माझे सर्वांगाला पोळत आहे. याकरिता तो कान्हो वनमाळी मला लवकर भेटवा. ही पुष्पशय्या अत्यंत शीतळ आहे खरी पण त्या श्रीकृष्ण परमात्म्यावांचून मला अग्नीसारखी पोळत आहे. ती लवकर विजवा. तुम्ही कोकिळासारखे सुंदर गीत माझ्या पुढे गात आहात, पण ते मला ऐकायला सुद्धा नको. तर मी तुम्हांस विचारलेले ते ऐकून उत्तर द्या. फार काय सांगू? हातांत आरसा घेऊन मी पाहाण्याला गेले तर माझे रूप सुद्धा मला दिसत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याने मला असे वेडी करून टाकले आहे.म्हणजे मला त्याच्या प्राप्तिविषयी तळमळ लागलेली आहे. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading